जवळपास २० वर्षांपूर्वीची माझी शोकांतिका सांगतो. देवाच्या दयेने (मार्कांच्या बाबतीत आम्ही अगदीच कंगाल होतो) एका शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात आम्हाला प्रवेश मिळाला. दिल खुश हो गया. महाविद्यालय सुरू होण्याची तारीख जशी जशी जवळ येऊ लागली तसे तसे आमचे निरागस मन कल्पनेच्या उंच उंच आकाशात एखाद्या मोरपीसासारखे तरंगू लागले. ऐन तारुण्याचे दिवस ते. आणि हिंदी सिनेमातल्या तारुण्यसुलभ प्रेमाविष्कारावर पोसलेले आमचे कोवळे मन ते! निष्पाप होते. महाविद्यालयात जायचे म्हणजे 'फूल और कांटे' मधल्या अजय देवगणसारखे जायचे आणि तिथल्या सुंदर मुलींवर अशी छाप पाडायची की पुढची चार वर्षे दिल बाग बाग झाला पाहिजे अशी गुलाबी स्वप्ने डोळ्यांमध्ये साठवत आम्ही महाविद्यालयात प्रवेश करते झालो. आमचे मन पुढच्या चार वर्षांची स्वप्ने रंगवू लागले. जिकडे तिकडे चोहीकडे सुंदर मुलींचे रमणीय ताटवे फुललेले आहेत. कुणाचे डोळे काळेभोर, कुणाचे निळसर, कुणाचे फिक्कट तपकिरी. कुणी उंच तर कुणी सुबक ठेंगणे. अभियंता होणे म्हणजे काय आणि त्यासाठी काय काय दिव्य पार पाडावे लागणार आहेत हे तेव्हा गावीही नव्हते. अशाच धुंद अवस्थेत मी माझ्या वर्गात शिरलो. आमचा देह बघून क्षणभर वर्गातल्या विद्यार्थ्यांचा प्राध्यापक आले असाच समज झाला. मी एका बाकावर जाऊन बसल्यावर सगळ्यांना कळले की हा देखील आपल्यासारखा विद्यार्थीच आहे. मी सगळीकडे पाहिले. दोन-तीन मुली एका कोपर्यात बसलेल्या होत्या. त्यांना बघून माझ्या स्वप्नांचे इमले धडाधड कोसळले. महाविद्यालयात एक फेरफटका मारल्यानंतर आणि भविष्यकालीन मित्रांबरोबर या विषयी गहन चर्चा केल्यानंतर तिथल्या वैराण वाळवंटाचा अंदाज आला. एका छोट्या गावातल्या केवळ तीन प्राथमिक शाखा असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हिरवळ असणार तरी कशी असा रोकडा सवाल सगळे एकमेकांना विचारू लागले. मला हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून आम्ही ताबडतोब बाहेरच्या टपरीवर गेलो आणि तिथल्या चहाच्या पेल्यात आमचे दु:ख बुडवून प्राशन करून टाकले. पुढची चार वर्षे आम्ही त्या वाळवंटातच राहिलो. अपेक्षाभंग जितका मोठा तितके दु:ख मोठे!
नाही ओअॅसिस, नाही हिरवळ; काय वर्णावी मनाची होरपळ!!
अभियांत्रिकी म्हणजे पेल्या पेल्यात रिचवलेली मनातील मळमळ!!!
परवा अशाच जीवघेण्या अपेक्षाभंगाचं दु:ख मला पुन्हा पचवावं लागलं. आणि या जीवघेण्या अपेक्षाभंगाचं नाव होतं 'टाईमपास २'! 'टाईमपास २' साठी मी काय आटापिटा केला म्हणून सांगू. रवी जाधव, पहिल्या 'टाईमपास'ची पुण्याई, प्रिया बापट, भाऊ कदम, वैभव मांगले अशी सयुक्तिक कारणांची जंत्री पुरेशी होती. 'नीलायम'च्या काठोकाठ भरलेल्या प्रेक्षागृहात घामाने निथळत मी आमच्या जागा शोधल्या आणि स्थानापन्न झालो. सुरुवात तर झकास झाली. रवी जाधवांवर भरोसा होताच. 'नटरंग', 'बीपी', 'बालगंधर्व', 'टीपी' अशा चित्रपटांचा कुशल दिग्दर्शक काहीतरी मस्तच देणार ही खात्री होती. सुरुवातीचं निवेदन (दगडू भाभामध्ये नोकरीला लागला...वगैरे) खुसखुशीत होतं. मी कपाळावरून वाहणार्या घामाकडे दुर्लक्ष केले. तरुण दगडूच्या सत्काराने चित्रपटाची सुरुवात झाली. दोन-पाच मिनिटे संपली असतील आणि मनात शंकेची पाल चुकचुकली. चित्रपट गंडतोय की काय अशी शंका आली. अर्ध्या तासानंतर चित्रपट गंडॅक्स होणार हे जवळपास निश्चित झाले. मध्यंतरापूर्वीच मी बायकोजवळ 'घरी जाऊ'चं तुणतुणं वाजवायला सुरुवात केली.
आई-बाबा आणि साई बाबांची शप्पथ घेऊन सांगतो; मध्यंतरानंतर माझं डोकं भयंकर ठणकायला लागलं. समोरचा पडदा जाळून टाकावा आणि शांतपणे घरी जाऊन झोपावे असे क्रूर विचार मनात येऊ लागले. चित्रपट रटाळ असण्याचे जर काही एकक नसेल तर खुशाल 'टाईमपास २' हे एकक म्हणून स्वीकारावे अशी माझी नम्र सूचना आहे. म्हणजे 'बाबुरावला पकडा' हा {२ 'टाईमपास २'} आहे असे म्हटले म्हणजे आपोआपच त्याचा दर्जा लक्षात येईल. 'कमिंग सून' हा {४ 'टाईमपास २'}आहे असे म्हटले की संपलंच सगळं! फार निबंध लिहिण्याची गरज नाही. 'टाईमपास २' एकक वापरून रटाळपणा मोजला की प्रश्न मिटला.
'टाईमपास २' मध्ये असे काय आहे? सगळ्यात महत्वाचे म्हणजे 'टाईमपास २' रवी जाधवांनी अजिबात मनापासून बनवलेला नाही. 'टाईमपास' त्यांनी अगदी 'दिल से' बनवला होता. भट्टी मस्त जमून आली होती. 'टाईमपास'मध्ये आसपास अगदी सहज आढळणारी आणि वारंवार घडणारी गोष्ट असल्याने ती मनाला भिडली. विरोधाभासामुळे विनोद खुलला. 'टाईमपास २' मध्ये रवी जाधव नेमके प्राण फुंकायचे विसरले. रवी जाधवांनी 'टाईमपास २' मध्ये गणित आणलं आणि चित्रपट फसला. गणित कसलं? एकाच वेळेस विविध प्रकारच्या प्रेक्षकांना खुश करण्याचं गणित! आणि या निसरड्या जमिनीवर चित्रपट घसरून आपटला.
दगडू एक यशस्वी आणि श्रीमंत संगीत व्यावसायिक असतो. कसा काय? अचानक तो एवढा श्रीमंत कसा काय होतो? याचं नेमकं उत्तर सापडतच नाही. तो दगडू असल्याने त्याचं वागणं बोलणं गावरानच आहे. त्याचा सत्कार समारंभ का घडवून आणला जातो हे नीटसं कळत नाही. तिथे सगळेच शर्यत लावल्यासारखे अचकट विचकट हावभाव करून बिनबुडाचे संवाद म्हणतात. बरं ते एक वेळ ठीक आहे पण लगेच तिथे कर्णकर्कश्श आवाजात एक अतिशय भयंकर गाणे सुरू होते. सगळे नाचायला लागतात. तिथूनच चित्रपटाची चड्डी सुटायला सुरुवात होते. दोन-तीन माकडचाळे करणारे मित्र नसतील तर चित्रपटाच्या बिनडोक नायकाला महत्व कसे येईल? 'टाईमपास २'मध्येही अशी तीन जवळजवळ माकडेच आहेत. संदीप पाठकने असली फालतू भूमिका करावी हे खरोखर आश्चर्य आहे. ही तीन माकडे दगडूचं सगळं ऐकतात. स्वतःचं आयुष्य सोडून ते दगडूला वाहून घेतात. मग ठरल्याप्रमाणे रात्रीच्या वेळेस एका होडक्यावर बसून दारू ढोसणं आलं; दगडूचे दु:खाचे कंटाळवाणे कढ आले; आणि माकडत्रयीचे निरर्थक चाळे आले! मग लहानपणाचा दगडू येऊन तरूण दगडूला सल्ले देऊ लागतो.
दगडू आपण भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये शास्त्रज्ञ आहे असे सांगून प्राजूच्या वडिलांच्या (लेले) कोकणातल्या घरात प्रवेश मिळवतो. लाल मातीत अणुचाचणी चांगली होते म्हणून जमीन शोधायला आलोय असं कारण तो लेलेंना सांगतो आणि इतकी वर्षे मुंबईत राहिलेल्या आणि भाभामध्येच नोकरी केलेल्या लेलेंना ते लगेच पटतं. त्याआधी घासून घासून गुळगुळीत झालेली दगडू आणि प्राजूच्या गाड्यांची थोडक्यात टळलेली टक्कर दाखवलेली आहे. तिथे अर्थातच ते एकमेकांना ओळखत नाहीत. लेले ताबडतोब दगडूचं लग्न प्राजूशी ठरवून मोकळे होतात. ते दगडूला अर्थातच ओळखत नाहीत. मग त्याच्यासोबतच ते ही खुशखबर प्राजूला देण्यासाठी मुंबईला येतात. इकडे प्राजू नटराज स्टुडिओमध्ये तोकड्या कपड्यांमध्ये ज्युनिअर डान्सर म्हणून नृत्य करत असते. लेले चिडतात. प्राजू त्यांना 'तुम्हाला कळणार नाही' असे सांगून असले काम स्वीकारण्यामागचे कारण सांगत नाही. नंतर दगडूला प्राजू असले काम करण्यामागचे 'मला एक अनुभव घ्यायचा होता' असे हास्यास्पद कारण सांगते. आणि दगडच असल्याने दगडूला ते कारण पटते आणि दोघांचे प्रेम मागील पानावरून पुढे चालू होते. दगडू आणि प्राजूची भेट कशी होते? शुटिंगच्या दरम्यान दगडू प्राजूचा गैरफायदा घेऊ पाहणार्या दिग्दर्शकाला मारतो आणि तिथे धुंवाधार मारामारी करतो. मग प्राजू त्याच्या कानशीलात भडकावते. तिथे दगडू बेंबीचा देठ तुटेल इतक्या भयंकर आवाजात "अरे हिला काय माहिती आपन कोन हाये ते. आपन आपन हाये." वगैरे भंपक आणि कंटाळवाणे संवाद म्हणतो आणि प्राजूला त्याची ओळख पटते.
एवढे निरर्थक रामायण घडूनदेखील प्राजू आणि दगडूचे लग्न ठरते कारण लेलेंना दगडूची खरी ओळख अजूनही कळलेली नसते. खरा 'दग्गड' खरं म्हणजे लेलेच वाटायला लागतो. दगडूची खरी ओळख लेलेंना कळल्यावर काय होईल याचा विचार कुणीच करत नाही. प्राजू अगदी आनंदात लग्नाच्या तयारीत स्वतःला झोकून देते. लेले मग दगडूला भेटायला त्याच्या ऑफीसमध्ये जातात. दगडूच्या आलिशान ऑफीसमध्ये दगडू सगळे कपडे काढून तो दगडू असल्याचे लेलेंसमोर जाहीर करतो. आता यासाठी सगळे कपडे उतरवण्याची काय गरज असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण रवी जाधवांना तो पडत नाही. ओळख करून देण्याची ही पद्धत जर प्रत्यक्षात आली तर काय होईल या विचारानेच मनाचा थरकाप उडतो. तर असो. दगडूच्या या अशा जगावेगळ्या ओळखपरेडीमुळे लेले संतापून निघून जातात.
दगडू आणि प्राजू एकमेकांना सुखेनैव भेटतच असतात. दगडू आपण काय काय केले याची यादी प्राजूला वाचून दाखवतो. त्यांनी ज्या बर्फवाल्याकडून बर्फाचा गोळा खाल्लेला असतो, दगडूने त्याला फ्रीज घेऊन दिलेला असतो. अजून कुणा-कुणाला त्याने काय काय घेऊन दिलेले असते. प्राजू कृतकृत्य होते. गुणाचा गो बाई माझा दगडू असा भाव तिच्या चेहर्यावर येतो.
नंतर लेले प्राजूचं लग्न गावातल्या एका फोटोग्राफरशी ठरवतात. या फोटोग्राफरइतकी ओव्हरॅक्टिंग करणारा अभिनेता अजून जन्माला यायचा असेल. अतिशय बालिश पद्धतीने रडणे याखेरीज हा नग दुसरं काहीच करत नाही. तो पडद्यावर आला की माझं डोकं दुखणं दुप्पट होत होतं. इकडे दगडू एका अतिलठ्ठ मुलीशी लग्न ठरवतो. का? माहित नाही. दगडूची तीन माकडे प्राजूला तिच्या मांडवातून दगडूच्या मांडवात घेऊन येतात आणि प्राजू दगडूचं अपहरण करते. त्याच्या मुसक्या बांधून ती त्याला आपल्या मांडवात घेऊन येते. तिथे एक भयंकर ड्रामा घडतो आणि लेले दगडू-प्राजूच्या लग्नाला परवानगी देतात आणि आपण सुटकेचा नि:श्वास टाकतो!
'टाईमपास २' हा इतर कुठल्याही इतर रटाळ मराठी चित्रपटाइतकाच रटाळ आणि डोकं उठवणारा चित्रपट आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. रवी जाधवांनी सगळा मसाला एकत्र करून एक मस्त भेळ तयार करण्याचा प्रयत्न केलाय खरा पण मसाल्याचं प्रमाण चुकल्याने आणि चिवडा शिळा असल्याने भेळ पुरती फसलेली आहे. पिटातल्या प्रेक्षकांसाठी दगडूचे संवाद, सगळ्या पात्रांचे अर्थहीन अंगविक्षेप, सोनाली कुळकर्णीचे भडक गाणे, दगडूने केलेली देमार मारामारी, वगैरे मसाला ठासून भरलेला आहे. जाणकार प्रेक्षकांसाठी उगीच लेलेंचे शुद्ध संवाद, मध्येच "काटा रुते कुणाला..." वगैरे सारखे गाणे, कोकणातला साधेपणा, वगैरे घुसवलेला आहे. शिवाय डोळे ओले करणारा बाप-मुलगा, बाप-मुलगी, भाऊ-बहीण, मित्र-माकडं छाप मेलोड्रामा ठायी ठायी पेरलेला आहेच. आणि हे 'गणित' साधण्याच्या नादात जाधव चित्रपटात प्राण फुंकण्याचे विसरले.
चित्रपटाची पटकथा अतिशय बाळबोध आणि हास्यास्पद आहे. पहिला 'टाईमपास' इतका सहज जमून आला असतांना दुसर्या 'टाईमपास'ची अतार्किक कथा चित्रपटाला बेचव करते. ठोकळेबाज प्रसंग आणि बेजान संवाद चित्रपटाच्या रटाळपणात भरच घालतात. कित्येक प्रसंग (किंबहुना संपूर्ण चित्रपटच) अगदीच उथळ आणि रसहीन आहेत.
प्रियदर्शन जाधवने अतिशय भडक आणि आक्रस्ताळा अभिनय केला आहे. प्रिया बापट छान दिसली आहे पण तिच्या व्यक्तिरेखेला काही आगापीछा नसल्याने कित्येक प्रसंगांमध्ये ती जाम गोंधळल्यासारखी वाटते. वैभव मांगलेंनी आरडाओरडा जरा जास्तच केला आहे. भाऊ कदम एक-दोन प्रसंगांमध्ये जान आणतात. बाकी ती तीन माकडं म्हणजे डोक्याला ताप! शेवटी अचानक संपदा कुळकर्णी, उदय सबनीस वगैरे दिसतात. ते मधूनच कसे काय उगवतात कोण जाणे. 'बीपी'मधला 'वहिणी वहिणी' करणारा मुलगा इथे शेवटच्या लग्नाच्या प्रसंगात ओझरता दिसतो. ठिगळ लावल्यासारखे प्रसंग सलगतेमध्ये बाधा आणतात. संकलन अतिशय वाईट आहे.
गाणी फक्त कर्णकर्कश्श आहेत. याव्यतिरिक्त गाण्यांविषयी दुसरे काहीच लिहिता येणार नाही. कथा-पटकथाच फसल्याने दिग्दर्शकाला फारशी चमक दाखवता आलेली नाही.
एकुणात काय तर 'टाईमपास २' हा चित्रपट डोके उठवतो हे नक्की. नीलायम टॉकीजला य चित्रपटाचे तिकिट चक्क ब्लॅकमध्ये मिळत होते. साठ रुपयाचे तिकिट एकशे पन्नास रुपयांना! अपेक्षा खूप वाढल्याने चित्रपटाला मिळाणारा हा प्रतिसाद साहजिक आहे. पिटातल्या प्रेक्षकांमुळे हा चित्रपट कदाचित बर्यापैकी चालेल देखील आणि मोठा गल्लादेखील कमावेल; पण रवी जाधवसारख्या कसलेल्या दिग्दर्शकाने असा चित्रपट बनवणे हा एक मोठा अपेक्षाभंग आहे हे ही खरेच!
असो. चित्रपट आणि पक्वान्न यात हेच तर साम्य असते. सतत हुकुमी यश दोघातही मिळवणे दुरापास्त असते. रवी जाधव एक हुशार दिग्दर्शक आहेत. त्यांचा पुढचा चित्रपट नक्कीच चांगला असेल अशी अपेक्षा करू या.
प्रतिक्रिया
4 May 2015 - 10:25 pm | आदूबाळ
हात ल्याका! आता पहायचा सवालच उद्भवत नाही.
4 May 2015 - 10:38 pm | सूड
मी समीक्षण वाचून ठरवत नाही चित्रपट बघावा की नाही ते, पण आता तुम्हीच लिहीलंयत म्हटल्यावर एकदा विचार करायला हवा.
4 May 2015 - 11:13 pm | टिवटिव
चित्रपट रटाळ असण्याचे जर काही एकक नसेल तर खुशाल 'टाईमपास २' हे एकक म्हणून स्वीकारावे अशी माझी नम्र सूचना आहे. :):):)
4 May 2015 - 11:29 pm | यसवायजी
चला पयशे वाचले
4 May 2015 - 11:38 pm | सतिश गावडे
जल्ला आपून ग्येलो व्हतो त्या थेटरलापन टायीमपास्टूची तिकिटा बल्याकनी मिलत व्हती. जल्ला आपून त्यांच्याकरना बल्याकची तिकीटा घेऊन पिच्चर नाय बगितला तो बराच झाला.
5 May 2015 - 2:51 pm | यसवायजी
तसाबी आपल्याला पैल्या पिच्चरमदे 'साजुक तुपातली पोली' सोडली तर कायबी आवडला नव्हता. पोली तेवढी यम्मी होती.
4 May 2015 - 11:32 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
एसवायजी शी सहमत. पहिल्याच टाईमपास ला मध्यांतरातुन उठुन आलेलो होतो.
4 May 2015 - 11:37 pm | सौन्दर्य
परीक्षण चांगले आहे. कधी कधी वाढलेल्या अपेक्षा ह्याच त्या कलाकृतीला मारक ठरतात, असे तर नाहीना झाले ?
5 May 2015 - 7:32 pm | लालगरूड
+100000
4 May 2015 - 11:44 pm | एस
पहिलाही भिकारच होता, हा सात भिकार दिसतोय.
4 May 2015 - 11:52 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं काय राव. :(
-दिलीप बिरुटे
5 May 2015 - 12:56 pm | पगला गजोधर
@स्वॅप्स - (पार्ट १ व २ दोन्ही ) भिकार चित्रपटाला भिकार ,म्हणण्याचे कार्य केल्याबद्दल अभिनंदन !
@ समीरसूर - कुठली कोअर ब्रँच तुमची ? 'मेक' काय ?
4 May 2015 - 11:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सौन्दर्य म्हणतात तसं पहिल्या टाईमपासमुळे आपल्या अपेक्षा वाढल्या आणि दुर्दैवाने तुम्ही परिक्षणात म्हणतात तसं अपेक्षा भंग दिसतो आहे.
पहिल्या भागातील दगडू आणि प्राजु आपण डोक्यात घेऊन जातो त्यामुळेही सेकंड पार्ट गंडण्याची शक्यता जास्त वाटते, अर्थात हे माझं मत झालं.
मला वेड लागले प्रेमाचे, फुलपाखरू, आणि दगडूचे निर्व्याज प्रेम विसरता येत नाही, तुमचं परिक्षण वाचुन टाईमपास टू ची उत्सुकता वाढलीच आहे. नक्की पाहतो आणि पुन्हा इथे प्रतिसादात हजर होईन. आपलं प्रेम आहे तिच्या सारखं टाईमपास नाही. ;)
-दिलीप बिरुटे
(दगडू)
4 May 2015 - 11:50 pm | एक एकटा एकटाच
रवि जाधव चे
बालक पालक
टाईमपास १
पाहून उत्कंठा वाढवलेल्या
टाईमपास २ ने फार अपेक्षाभंग केला.
उगाचच ओढुन ताणुन हा चित्रपट बनवलाय.
खर तर पहिल्या भागात अजुन १५ मिनिट वाढवली असती आणी हे सगळ दाखवल असत
तर निदान हां चित्रपट वेगळा बनवायची गरजच राहिली नसती. हां विचार चित्रपट संपल्यावर लगेचच मनात येतो.
चित्रपटाची गाणी चांगली आहेत. पण मराठी संगीताचा दर्जा चांगला असताना हल्लीच्या गाण्याना हिंदी शब्दांची जोड का लागते. हे खरच कळत नाही.
बाकी वैभव मांगलेच काम उत्तम........
5 May 2015 - 12:36 am | अत्रुप्त आत्मा
@पण मराठी संगीताचा दर्जा चांगला असताना हल्लीच्या गाण्याना हिंदी शब्दांची जोड का लागते. हे खरच कळत नाही.>>> +++१११ गेले पाचएक वर्ष हा हीन दर्जाचा दळभद्री प्रकार सुरु झालेला आहे. स्वच्छ मराठी अभिव्यक्ति होऊ शकणार्या गीतांना मधेच अर्ध्या ओळिची हिंदिची चिंधी-लावतात. काहि गाणी तर या उलट ,एक दिड ओळ मराठी आणि बाकि सारे हिंदिच हिंदी! इंडस्ट्रीमधे चित्रपटातून फक्त पैसा जमविण्यासाठी असल्या नाहक क्लुप्त्या शोधून देणारी एखादी धंदेवाइक सल्लागार समिती नेमली आहे की काय? अशी दाट शंका येऊ लागली आहे. सदर चित्रपट देखिल असल्याच हेतूनी केवळ प्रसिद्धी करवून जमेल तितकं मार्केट-मारायच्या हेतूनी बनवला असावा,अशी प्रबळ शंका येत आहे.
समीरसूर,
सदर परिक्षण फेसबुक शेअर केलं,तर चालेल काय?
5 May 2015 - 8:28 am | समीरसूर
हे परीक्षण फेसबुकवर शेअर करायला माझी हरकत नाही. :-)
मला माझ्या कार्यालयाच्या लॅपटॉपवरून लॉगइन करता येत नाहीये. मराठी टाईपच होत नाही. इंग्रजीच टाईप होतंय. मोबाईलवर देखील तोच प्रॉब्लेम आहे. माझ्या घरच्या लॅपटॉपवर मात्र मराठी टाईप करता येतं. आता मला तो लॅपटॉप काढून प्रतिसाद द्यावा लागतोय. :-(
काहीतरी उपाय सांगा...
5 May 2015 - 12:35 am | प्यारे१
govt engg college,karad??? ;)
5 May 2015 - 5:47 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सगळ्या कोअर ब्रँचेस मधे वाळवंटचं असतं. जी काही हिरवळ असते त्यासाठी जब्राट काँपिटिशन असते.
5 May 2015 - 2:11 pm | मोहनराव
मेकॅनिकल ब्रांच एकदम भंगार बगा.. हिरवळीच्या नावानं बोंब! (पुण्यातसुद्धा)
5 May 2015 - 2:54 pm | बॅटमॅन
पुण्याचं कै घेऊन बसलात, आम्रविकेत याच इशयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या आमच्या मित्रांकडून असे कळाले की तिकडेही अश्शीच बोंब आहे म्हणे!
5 May 2015 - 3:24 pm | मोहनराव
हाण तेच्यायला! तुम्ही सीओईपी वाले का? मीपण!!
5 May 2015 - 4:44 pm | बॅटमॅन
येस्सार, मीही शीओईपीचाच! हाथ मिलाओ!!!.
रच्याकने, शीओईपियन मिपाकर कोण कोण आहेत ते एकदा बघितलं पाहिजे.
5 May 2015 - 5:33 pm | मोहनराव
6 May 2015 - 6:25 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
काही दुख्ख्द आठवणी जाग्या झाल्या :( :(
5 May 2015 - 8:30 am | समीरसूर
तेच ते! :-) आपण तेथेच होतात काय? हिरवळीचं एक सोडलं तर आपल्याला कराड आणि तिथलं कॉलेज आणि वातावरण, घाट, प्रभात, रॉयल, भैरवनाथ, आमंत्रण हॉटेल, वगैरे जाम आवडलं होतं. त्यामुळे कराडचे दिवस आमच्या आयुष्यातले सगळ्यात सोनेरी दिवस होते. :-)
6 May 2015 - 12:42 am | प्यारे१
नै तिथे नव्हतो पण तिथल्या हॉस्टेलला राहिलो आहे. बरेच नातेवाईक कराडमध्ये आहेत आणि मुळात महाराष्ट्रातल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात (पुणे, नांदेड नि कराड) असं बेसिक शाखा असलेलं एकच आहे की!
सोनेरी दिवसांबाबत सहमत. दिवस सोनेरी होण्यामागे 'महाविद्यालयीन दिवसाचा काळ' हा महत्त्वाचा विषय असतो. गाव कुठलंही असो. अगदी शिरगाव किंवा डखाम्बे बुद्रुक असलं तरी. अर्थात कराड मस्त आहेच. (आता भैरवनाथ चं रूपडं बदललंय)
6 May 2015 - 8:39 pm | समीरसूर
कराड मस्तंच होतं. आणि तिथलं होस्टेल तर अहाहा...कित्येक रम्य आठवणी तिथे गुंतल्या आहेत...अर्थात मुलीच नसल्याने तो रम्यपणा काहीसा कोरडाच आहे हे ही खरं..
5 May 2015 - 4:36 am | रेवती
अरेरे!
5 May 2015 - 7:42 am | संदीप डांगे
नेहमीप्रमाणे आपले पैसे धोक्यात घालून लोकांचे पैसे वाचवणार्या थोर समाजसेवक समीरसूर यांचा विजय असो, विजय असो, विजय असो!!!
5 May 2015 - 8:32 am | समीरसूर
उगीच काहीतरी. आपण निरपेक्ष भावनेने कार्य करत रहायचं, झालं! कर्ता करविता तो आहे... ;-)
5 May 2015 - 8:43 am | श्रीरंग_जोशी
देव करो, एखादा नवा दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होवो अन त्याचे परिक्षण तुमच्या हातून मिपावर प्रकाशित होवो.
5 May 2015 - 8:44 am | अजया
सही परीक्षण!पयशे वाचल्याचा आनंद!!
5 May 2015 - 9:03 am | पैसा
समीरसूर श्टैल!
चांगल्या सिनेमांचे सीक्वेल बरेचदा बकवास असतात यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालेलं दिसतंय. सिनेमा कदाचित ४० रुपयाच्या डीव्हीडीत आला तर एकदा बघेनही. कधीतरी असले सिनेमे पण बरे असतात बघायला!
समीरसूर यांचे डोके कितीही दुखले तरी त्यांनी असे सिनेमे आवर्जून बघून त्याबद्दल लिहावे ही दोन्ही हात जोडून विनंती. ;)
5 May 2015 - 9:22 am | नाखु
एकूण चित्रपटांपैकी बालक-पालक फार म्हणजे फार संयमी हाताळणी आणि नेमके भाष्य (फक्त दिग्दर्शनातून्च) होता बाकीचे जास्त प्रचारकी/आणि आक्र्स्ताळी संवादाचे होते हे वैयक्तीक मत.
पोराबरोबर आवर्जून बालक्-पालक पाहिलेला (आणि मला काय सांगायचे ते त्याला थोडेफार कळले याचा आनंद झालेला)
बिनभाजीचा पालक
नाखु
5 May 2015 - 9:25 am | जेपी
मी चित्रपट पाहिला..आवडला..
5 May 2015 - 10:07 am | सुजल
छान परीक्षण :)
5 May 2015 - 10:13 am | किसन शिंदे
परिक्षण झक्कास! रच्याकने पहिल्या दिवसाची तिकिटे काढायचा प्रयत्न करत होतो पण ती मिळाली नाहीत, तस्मात सिनेमा पाहायचा राहुन गेला तो गेलाच. :)
5 May 2015 - 10:18 am | सुधीर
लय भारी चिरफाड... टाईमपास-१ पण मला आवडला नव्हता... भाग दोन न पाहण्याचं म्हणूनच ठरवलं होतं.
5 May 2015 - 10:52 am | प्राची अश्विनी
सहमत ! चित्रपट बिलकुल आवड्ला नाही. फसलेला वाट्ला.
चित्रपट बघताना आजकाल दोन भूमिकांतून बघते .
१ पालक म्हणून आणि २ निव्वळ प्रेक्षक म्हणून
टाईमपास-१ प्रेक्षकाच्या भूमिकेतून ठीक होता ,पण एक पालक म्हणून नाही आवडला.
5 May 2015 - 11:14 am | Vimodak
पुढच्याला ठेच् मागचा शहाणा..पैसे वाचले अन वेळही.
5 May 2015 - 11:33 am | स्मिता श्रीपाद
एक नंबर परीक्षण समीर... :-)
पहिला पॅरा जास्त आवडला ;-)
5 May 2015 - 11:41 am | मुक्त विहारि
चला आता ह्या डोकेदूखीवर एकच उपाय.
परत एकदा "सिक्स्थ सेंथ" किंवा "द टर्मिनल" बघा.
5 May 2015 - 12:41 pm | सिरुसेरि
आधीच नीलायम थिएटर बकवास त्यात टीपी २ महाबकवास .
यापेक्षा आपला 'द डीपार्टेड' , 'शटर आयलँड' , 'मुक्कामपोस्ट ढेबेवाडी'च बरा .
5 May 2015 - 1:34 pm | मुक्त विहारि
सामना किंवा सिंहासन
5 May 2015 - 12:49 pm | मधुरा देशपांडे
खास समीरसुर शैलीतले परीक्षण. झक्कास.
टाईमपास-१ ही आवडला नव्ह्ता. त्यामुळे हा तसाही बघणार नाही.
5 May 2015 - 1:55 pm | पिलीयन रायडर
मला प्रोमोज पाहुन चित्रपटाचं अचुक माप काढायची सिद्धी प्राप्त आहे. त्यायोगे मी आधीच भविष्य वर्तवलं होतं की हा एक नाही तर सात भिकार पिक्चर असणार.. त्यामुळे पहाणार नव्हतेच.. अर्थात मागचे १-२ आठवडे झी वाल्यांनी "जिकडे तिकडे प्राजु आणि दगडु गडे" केल्याने संपुर्णपणे मनस्ताप काही टळला नाहीच!
तुमच्या ह्या परीक्षणाने माझी सिद्धी काम करतेय ह्याला विदा मिळाला!
5 May 2015 - 11:33 pm | मास्टरमाईन्ड
आवडलं
अत्युत्तम
5 May 2015 - 2:01 pm | विवेकपटाईत
सोनाली कुलकर्णीचा आयटम पाहायला लोक नक्की जातील.
5 May 2015 - 2:07 pm | गणेशा
बर्याच दिवसानी आपले परिक्षण वाचले.. एकदम तीच जुनी स्टाईल.
आणि सिनेमाचे म्हणाल तर, त्याचे प्रमोज दाखवले होते त्यावरुनच चित्रपटाचा दर्जा आणि कथा काय असेल हे कळाल्याने तो पाहण्यास गेलोच नाही हे बरे झाले असे वाटते.
दुसरी गोष्ट... प्रिया बापट दिसायला सुंदर आहे असे तिच्या नवा गडी नवा राज्य या नाटक अआणि नंतर सिनेमावरुन वाटत होते.. पण्नंतर कुठे ही कुठल्याही कार्यक्रमात आली की अशी बावळट सारखे हसत असती की तिचा मला तिर्स्कारच वाटतो.. त्यामुळे केतकी माटेगावकर च्या सोज्वळ अभिनयानंतर ही कुठे पण दात विचकणारी अभिनेत्री कशी काय सोज्वळ अभिनय करेल असे आधी वाटले होते.
संदिप पाठक ने धमाल आणली असेल असे वाटुन गेले उगाच पण तुमच्या म्हणण्याने त्याला ही वाया घालावला आणि लेले ला पण तर मग सिनेमात राहिले कोण ? .. दगडु ?
5 May 2015 - 4:21 pm | जिन्क्स
पण्नंतर कुठे ही कुठल्याही कार्यक्रमात आली की अशी बावळट सारखे हसत असती की तिचा मला तिर्स्कारच वाटतो.. +++++++++१
6 May 2015 - 11:44 am | पगला गजोधर
5 May 2015 - 2:16 pm | मोहनराव
जालावर आल्यावर फास्ट फॉरवर्ड मध्ये बघण्यात येईल. तसाही प्रोमोजवरून फालतु वाटतच होता.
5 May 2015 - 2:21 pm | सस्नेह
भारी पंचनामा !
5 May 2015 - 2:37 pm | स्वाती दिनेश
खरेच भारी पंचनामा!
स्वाती
5 May 2015 - 2:33 pm | नीलमोहर
बऱ्याच दिवसांनी मंगला थिएटर मध्ये तिकीटं ब्लैक मध्ये दुप्पट किंमतीत विकतांना दिसले, सगळे शो हाऊसफुल्ल, कधी नव्हे ती गर्दी (तेही मराठी सिनेमाला) इ.बघून खूप छान वाटलं.
पण जेव्हा पिक्चरची सुरुवातच रटाळ झाली तेव्हा शंका आली काहीतरी चुकतंय आणि ती दुर्दैवाने खरीही ठरली. प्रोमोज मध्ये दाखवलेत तेव्हढेच विनोद पूर्ण सिनेमात असतील.
सुरुवातीला प्रेक्षक उत्साहात शिट्ट्या मारत होते पण नंतर त्यांना संधीच मिळेना, इंटरव्हल नंतर तर जो इमोशनल अत्याचार सुरु झाला !! लोक 'बास रे' वगैरे म्हणू लागले, आम्ही आधीच जांभया देत होतो ;)
सिनेमा संपल्यावर कोणी काही बोेलत नव्हते यातच काय ते आलं.
अतिशय चांगली टीम सिनेमापाठी असल्यामुळे अपेक्षा खूप जास्त होत्या ,पण कॉमेडी बघायला गेलेल्या लोकांना कडू इमोशनल डोस मिळाला. आश्चर्य हेच की पिक्चर रिलीज होण्याआधी अनेकांनी तो पाहिला असेल, तेव्हा या मोठमोठ्या लोकांच्या लक्षात नाही आले का पिक्चर हातचा गेलाय म्हणून !!
कधी नाही ते उत्साहाने फर्स्ट डे सिनेमा बघायला गेलो पण...
टाईमपास नाही झाला :(
5 May 2015 - 2:41 pm | सतीश कुडतरकर
मराठी चित्रपट चालत नाहीत म्हणून आरडाओरडा करायचा आणि एखादा चित्रपट गल्ला गोळा करतोय तर त्याचं कौतुक करायचं सोडून त्याच्यावर बलात्कार करायला धावले सगळे :-). अशाने आपल्या मराठी चित्रपटांच्या आर्थिक गुणवत्तेच कस व्हायचं.
तद्दन गल्लाभरू चित्रपट असताना त्याला कलात्मक चित्रपटांच्या फुटपट्टीने का मोजताय राव!
या धाग्याला आमचा प्रेमळ णिषेध!
5 May 2015 - 5:42 pm | रघुनाथ.केरकर
एवढाही ग.न्डला नाहीय
5 May 2015 - 10:07 pm | समीरसूर
चित्रपट यशस्वी झाला याचा आनंद आहेच. आवडला नाही इतकेच. :-) जाधवांचे आधीचे चित्रपट कलात्मक नव्हते पण दर्जेदार नक्कीच होते आणि प्रचंड यशस्वी झाले. 'दीवार' व्यावसायिकच होता पण दर्जेदार होता. दुर्दैवाने 'टीपी-२' नुसताच गल्लाभरू होता.
मराठी चित्रपट चालत नाहीत याचे सरळ सरळ कारण आहे की ९५% मराठी चित्रपट भिकार असतात. आणि मराठी चित्रपट जगावा म्हणून काही प्रेक्षक पदरचे कष्टाने कमावलेले पैसे खर्च करणार नाहीत. आणि ते योग्य ही नाही. कुठलाही व्यवसाय हा अंगभूत गुणांवर यशस्वी व्हावा लागतो. कुणीच काही फुकटात देत नसतांना मराठी चित्रपट तगवण्याची सगळी जबाबदारी प्रेक्षकांचीच आहे असे म्हणून कसे चालेल? आणि प्रेक्षक चांगला प्रतिसाद देतातच ना चांगल्या चित्रपटांना! 'टीपी', 'बीपी', 'अशी ही बनवाबनवी', 'कॉफी आणि बरंच काही', 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं', 'बालगंधर्व' हे आणि असे चांगले चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरलेच की. पण 'कमिंग सून' आणि 'बाबुरावला पकडा' असले चित्रपट प्रेक्षकांनी कसे उचलून धरावे? आणि दुर्दैवाने असले भिकार चित्रपट जास्त निघतात मराठीत. त्यात प्रेक्षकांचा काय दोष?
5 May 2015 - 11:36 pm | मास्टरमाईन्ड
एकदम बरोबर
6 May 2015 - 7:05 pm | बॅटमॅन
आहाहा...एकच नंबर, एकदम मार्मिक.
6 May 2015 - 11:59 pm | NiluMP
कारण अनुदान (लाखात मिळते) मिळते ते बंद करुन सरकारी पारितोषकची रक्कम (हजारात असते) (२५, ५०, १०० लाख करावी) वाढवी.
5 May 2015 - 3:13 pm | आदूबाळ
असाच एक "हमने जीना सीख लिया" नावाचा चित्रपट आठवला. मिलिंद बोकिलांच्या "शाळा" वर बेतला आहे वगैरे ऐकून फष्डे म्याटिनीला गेलो होतो. अरारारारा... स्वपीडनाची हौस असलेल्यांनी तूनळीवर शोधून नक्की पहावा. तो इतका भयाण होता की कोणाला त्यावर परीक्षण लिहायचं धैर्यही झालं नाही.
5 May 2015 - 7:52 pm | हाडक्या
हे असलं कै तरी तुम्ही करू धजलात..!! ग्रेट्ट आहात..
(स्वपीडन करुन घेतले आहे आम्हीपण आधीच, ते ही तब्बल ५ मिनिटे पाहिला, मग पळवत ५ मिनिटात संपवला.. ;) )
5 May 2015 - 10:07 pm | आदूबाळ
मनां काय माहीत असलं काहीतरी निघणार आहे ते?
या प्रयोगाच्या आधी एकच चित्रपट पाहिला होता फष्डेम्याटिनी - रहना है तेरे दिल में. दिया मिर्झासाठी. पिक्चर टुकार निघाला असता तरी हरकत नव्हती, कारण तीन तास दिया मिर्झा पडद्यावर अखंड दिसणार होती. पण बरा होता तो शिणुमा तसा.
5 May 2015 - 3:52 pm | प्रीत-मोहर
भारी परिक्षण. तुम्हाला टिकीट ब्ल्याक्मधे जरी घ्यावेलागले ,तुमचे डोके कितीही दुखले किंवा तुमचा अपेक्षाभंग जरी झाला तरी तुम्ही सारे चित्रपट पाहुन त्यांची परीक्षणे लिहा. व लोकांचे पैसे वाचवण्याचे पुण्य मिळवा ;)
5 May 2015 - 4:38 pm | निनाद मुक्काम प...
आपल्या कडे दुनियादारी व टीपी हे २ ते १२ वेळा पाहणारे निष्ठावान प्रेक्षक आहेत. हाही सिनेमा अनेकवेळा पाहिला जाईल. सदर सिनेमा सर्वत्र तुफान चालला आहे टीपी ने ३४ करोड कमावले व हा ५० कोटी पर्यंत गल्ला जमवेल असा अंदाज आहे.
आता एखाद्या सिनेमाचा कीस काढायचा म्हटला कि तो काढण्यासाठीच सिनेमा पहिल्या आठवड्यात पाहणे ओघाने आले.
रवीच्या स्पर्श ला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याच दिवशी ह्या सिनेमाने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली.
ज्यांना टीपी २ आवडला नाही किंवा हा सिनेमा पाहणार नसाल तर कोर्ट किंवा स्पर्श पहा.
पण मराठी सिनेमा अवश्य पहा
5 May 2015 - 9:54 pm | समीरसूर
निनादजी,
कृपया गैरसमज नसावा.
मिसळपाववर कीस काढता यावा किंवा लेख लिहिता यावा म्हणून मी चित्रपट पाहत नाही. चित्रपट-नाटक पाहणे ही माझी आवड आहे; माझा छंद आहे. महिन्याला २-३-४ चित्रपट/नाटक बघत असतो मी. इतके चित्रपट मल्टीप्लेक्सला पाहणं परवडत नाही म्हणून गेली कित्येक वर्षे नीलायममध्ये पाहतो. थोडा वेळ मिळाला की मी घरच्याच कपड्यांमध्ये निघून चित्रपटगृहात जाऊन बसतो. आणि हिंदी आणि मराठी दोन्ही चित्रपट आणि नाटके अगदी आवर्जून पाहतो. कित्येक चित्रपट मी एकट्याने पाहिलेले आहेत. 'बीपी', 'कोर्ट', 'कॉफी आणि बरंच काही', 'बदलापूर' हे अगदी आत्ताचे आणि 'परिंदा', 'खुदा गवाह', 'सागर संगम', 'दरिया दिल', 'शहेनशहा', 'सल्तनत' वगैरे जुने असे किमान शंभर चित्रपट मी आजवर एकट्याने पाहिलेले आहेत. आणि चित्रपट-नाटक बघतो म्हणून मिसळपाववर त्याविषयी लिहितो. मिसळपाव अस्तित्वात नव्हतं त्याच्याही कित्येक दशके आधीपासून मी अगणित चित्रपट पाहत आलोय. :-) कुणाविषयी काही आकस आहे म्हणून किंवा उगीच कुणाला झोडपायचे म्हणून मी चित्रपटांविषयी नक्कीच लिहित नाही.
आणि मिसळपाववर मी 'पुणे ५२', 'बालगंधर्व', तार्यांचे बेट', 'पारध' अशा बर्याच चित्रपटांची प्रशंसा करणारे लेखदेखील लिहिलेले आहेत. सदर लेखात रवि जाधवांच्या आधीच्या चारही चित्रपटांचे कौतुक केलेले आहे. त्यांचे आधीचे चारही चित्रपट मला मनापासून आवडले होते. 'बीपी' मी दोनदा पाहिला होता (एकट्याने). शिवाय फेसबुकवर देखील मी या चित्रपटांविषयी सकारात्मक लिहिले होते आणि सतत लिहित असतो. उद्देश एकच की मोठ्या आणि अमराठी गटाला देखील मराठी चित्रपटांचे महत्व कळावे. 'टीपी-२' यशस्वी होणार होताच कारण तो तसा बनवला आहेच. पण म्हणून तो रवि जाधवांच्या आधीच्या चित्रपटांइतकाच दर्जेदार आहे असे म्हणायला मन धजावत नाही.
गेल्या २-३ आठवड्यातच मी 'कोर्ट', 'कॉफी आणि बरंच काही', 'टीपी-२' हे चित्रपट पाहिले. एकूण प्रदर्शित होणार्या मराठी चित्रपटांपैकी दुर्दैवाने जेमतेम ८-१०% चित्रपट चांगले-बरे असतात. बाकी सगळे रटाळ (भिकार खरं तर) असतात हे कटू सत्य आहे. :-(
असो.
5 May 2015 - 10:17 pm | हाडक्या
समीर भौ.. आता कालांतरानंतर तुमचा व्यासंग लक्षात आलाय हो, पण कोर्ट अथवा इतर कुठल्या आवडलेल्या चित्रपटाबद्दल लगेच तुमच्याकडून वाचायला नै मिळालं पण तुमच्या डोक्यात जाणार्या चित्रपटांबद्दल तुमच्याकडून लगेच लिहिलं जातं असं एक निरिक्षण नोंदवतो.
थोडक्यात नकारात्मक जितके सहज आलेय तितके सहज सकारात्मक आलेले नाहीय आधी असं लोकांना वाटतंय कदाचित, असो.. आमच्या मनात कै नै हो.. फक्त एक पर्स्पेक्टिव मांडण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही समजून घ्याल याची खात्री आहेच.. :)
6 May 2015 - 8:26 pm | समीरसूर
तसे असेल कदाचित...
१. ...पण कुठल्याही लिखाणाला बॅलन्स करणं आवश्यक असतंच का? म्हणजे २ पानं टीकेची लिहिली म्हणजे २ पानं सकारात्मक लिहिली गेलीच पाहिजेत असं गणित लिखाणात जाणून-बुजून (ओढून-ताणून खरं म्हणजे) आणलं तर मग ते ठरवून केलेलं लिखाण होईल (वर्तमानपत्रातील बातम्यांसारखं). असं मुद्दाम बॅलन्स करणं तितकसं रुचत नाही.
२. मानवी स्वभाव आहे. चांगलं दुर्लक्षित केलं जातं आणि नकारात्मक असलं म्हणजे त्याची बोंबाबोंब होते. :-) मॅनेजमेंटमध्ये नाही का हायजीन फॅक्टर्स की काय असतात ते; असले तर कुणाच्या नजरेत भरत नाहीत पण नसले तर गहजब होत. तसलं काहीतरी असावं हे. सुजाणपणे संतुलित लिखाण करण्याचं कसब अजून यायचं आहे असं वाटतं. :-(
३. गुडी गुडी, अगदी आदर्श, बोधप्रद, संयमी, वगैरे लिखाण कंटाळवाणं होण्याची शक्यता असते. कालांतराने एक मरगळ येते. असं जरा तिखट लिहिलं की बरं वाटतं. :-) ट्यारपी पण मिळतो, काय? :-)
मुळात सगळ्या बाजूंनी बंदिस्त, डिप्लोमॅटीक, पोलिटीकली करेक्ट, अगदी पर्फेक्टली बॅलन्सड लिखाण किंवा अशा लेखांची मालिका असेल (एक लेख सकारात्मक, एक नकारात्मक, पुन्हा एक सकारात्मक...) तर ते कंटाळवाणंच होईल असं वाटतं कारण ते अगदी ठरवून तसं लिहिलेलं असेल; त्यातली उस्फुर्तता कदाचित हरवलेली असेल. फिर मजा नही आता...
आणि बर्याच चित्रपटांवर मी सकारात्मक लेख लिहिलेले आहेत. 'ओह माय गॉड', 'तार्यांचे बेट', 'अनस्टॉपेबल', 'पारध' या आणि अजून काही चित्रपटांविषयक लेख नितांत सकारात्मक आहेत. मराठी चित्रपटांमध्ये नि:संशय वेगळेपण आहे पण मराठी चित्रपटातला बाळबोधपणा जाता जात नाही. थातूर-मातूर हाताळणी ही मराठी चित्रपटांची जुनी खोड आहे आणि त्यामुळे मराठी चित्रपट रटाळ वाटतात. खूप कमी चित्रपट दुसर्यांदा पाहण्याच्या लायकीचे असतात. हिंदी चित्रपटांचा आवाका मोठा असल्याने निदान त्यांचा ओंगळपणा खपून जातो. असं असतांना सकारात्मक लिहिण्याची संधी फारशी असतेच कुठे?
'कोर्ट' नि:संशय चांगला आहे पण दुसर्यांदा अजिबात नाही बघू शकणार कुणी. 'कॉफी' चांगला होता पण पुन्हा तेच; खूप छोटा जीव आणि मर्यादित आवाका. दोन घटका करमणूक म्हणून बरा. एक चांगला चित्रपट पाहिल्याचे पुरेपूर समाधान देणारा आणि दीर्घकाळ त्याची मोहिनी कायम ठेवणारा सिनेमा मराठीमध्ये किती प्रमाणात आहे? अजूनही पाचकळ कॉमेडी, निरर्थक अंगविक्षेप, डोक्यात जाणारे हातवारे, भडक आभिनय, ठोकळेबाज प्रसंग यातून मराठी चित्रपट बाहेर पडलेलाच नाहीये.
हिंदीतला 'उडान' बघा. अगदी लो बजेट चित्रपट पण चित्रपट कसा मनाचा संपूर्ण कब्जा घेतो. मेंदूचा ताबा घेतो. मराठीत अशा ताकदीचे सहज आठवावेत असे किती चित्रपट आहेत? हिंदीमध्ये अशी असंख्य उदाहरणे आहेत. दुर्दैवाने मराठीमध्ये अशा चित्रपटांचे प्रमाण नगण्यच आहे. त्यामुळे ज्या जोरकसपणे नकारात्मक लिहिलं जातं त्याच जोरकसपणे सकारात्मक लिहिणे साधत नाही.
असो. सुधारणेस वाव आहे हे नक्की. :-) आपल्या प्रतिसादाबद्दल आणि सूचनेबद्दल धन्यवाद.
7 May 2015 - 2:49 pm | निनाद मुक्काम प...
समीरसूर भाऊ
मला तुमचे परीक्षण टोकाचे व अनेकवेळा एकांगी वाटले वरती नमूद केले त्याप्रमाणे सिनेमांचे नकारात्मक समीक्षण तुमच्या हातून जास्त होते असा अनुभव आहे , रवी सर्व प्रकारचे सिनेमे बनवतो , एखादा गल्ला भरू बनवला तर काय बिघडले
मुळात माझा आक्षेप असा की गल्लाभरू सिनेमाची व्याख्या काय
मुठ भर लोकांना आवडला नाही म्हणून दर्जेदार न म्हणता गल्ला भरू म्हणणे म्हणजे बहुसंख्य लोकांना तो आवडला त्यांना काडीची अक्कल नाही कोणत्याही सिनेमा ह्यांना आवडतो , ह्यांना काहीच टेस्ट नाही असे अनेक गर्भित अर्थ ध्वनित होतात .
दुसरा मुद्दा म्हणजे अनेक मान्यवरांच्या समीक्षणातून एक समान व मुलभूत गोष्ट अशी कळते की समीक्षण सकारात्मक संतुलित कि नकारात्मक असो त्यात सिनेमांची संपूर्ण कथा न सांगता सिनेमांच्या तांत्रिक बाबी एडिटिंग अभिनय व दिग्दर्शकाचा दृष्टीकोन ह्यावर भाष्य केले जाते ,
उद्या ज्याला हा सिनेमा पाहायचा असेल त्याला हे समीक्षण वाचून सिनेमातील अनेक बाबींचा आधीच माहिती असल्याने रसभंग होणार ,
गैर समज नसावा
सोशल मिडीयावर काही वर्षात नकारात्मक समीक्षण व एकेकाळच्या गाजलेल्या सिनेमांचे उगाच इनोदी अंगाने चिरफाड केलेले समीक्षण वाचण्यात आले .
एखादा चांगला सिनेमावर दर्जेदार समीक्षण क्वचित वाचायला मिळते. शेवटचे फँड्री वर मिपावरच वाचले होते.
7 May 2015 - 3:41 pm | समीरसूर
कारणे दिली आहेत. गलाभरू चितरपट दरजेदार असाय़ला हरकत नसावी. किती तरी आहोत. टीपी१ गलाभरूच होता पण दरजेदार होता. अशी शेकडो उदाहरणेआहेत.असो. मताचा आदर आहेच.
7 May 2015 - 6:14 pm | प्यारे१
>>> टीपी१ गलाभरूच होता पण दरजेदार होता.
दरजेदार ? चुकून चुकीचं लिहीलं गेलं का? दर्जेदार आणि दरजेदार मध्ये फरक असावा. ;)
बाकी झी कडून बर्याच दिवसांपासून 'दर्जेदार चित्रपट निर्मिती'पेक्षा 'दर्जेदार(?) मार्केटींग' जास्त चांगलं होतंय असं वाटतंय.
7 May 2015 - 3:45 pm | समीरसूर
लेख आवडला नाही याबदल सॉरी
7 May 2015 - 12:02 am | NiluMP
मराठी सिनेमांसाठी मिपा कट्टा करावा.
5 May 2015 - 4:49 pm | सतीश कुडतरकर
ज्यांना टीपी २ आवडला नाही किंवा हा सिनेमा पाहणार नसाल तर कोर्ट किंवा स्पर्श पहा.
पण मराठी सिनेमा अवश्य पहा>>>>>
एकदम बेष्ट!
5 May 2015 - 5:05 pm | मित्रहो
आता टाइमपास २ बघणे नाही. आपल्याला तो टाइमपास १ सुद्धा आवडला नव्हता.
अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या दुःखाने जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
5 May 2015 - 8:12 pm | चिगो
चित्रपट पाहणे नाहीच, पण हे खास समीरसूर शैलीतले फर्डा परिक्षण वाचून मजा आली..
6 May 2015 - 10:39 am | खटपट्या
जाहीराती पाहुन शंका आली होती. तरीही आंतरजालावर आल्यावर चित्रपट पाहील्या जाईल. बघुया कसा वाटतोय...
7 May 2015 - 8:45 pm | लॉर्ड फॉकलन्ड
टीपी २ मध्यन्तरापर्यन्त बर्यापैकी चान्गला वाटला.नंतर शेवटपर्यन्त बर्यापैकी कन्टाळवाणा झाला.
8 May 2015 - 4:06 am | अभिदेश
सुरुवतीलाच हे स्पष्ट करतो की मी टीपी २ अजून बघितला नाही. परन्तू मला मिपाच्या बर्याच लोकान्चे म्हणणे पटले नाही. प्रतिक्रिया वाचुन असे वाटले की आपली अपेक्षा अशी होती की हा चित्रपट काहीतरी वेगळा असेल पण तो तसा नसल्यामुळे बऱ्याच लोकांचा भ्रमनिरास झाला. काही लोकांना तर आनंदही झालेला वाटला , रविने त्याच्या पहिल्या चित्रपटाचे यश जार का encash करायचा प्रयत्न केला तर त्यात कही चुकले ऎसे मला तरी वाटत नाही. आजकालच्या जगात तुम्ही तुमचा चित्रपट जर का नीट market नहीं केला तर तो कितीही चांगला असल तरी लोक बघणार नाहीत. Full Marks to Ravi Jadhav …. त्याचा publicity वर टीका करणाऱ्या किती लोकांनी Court चित्रपट पहिला? जर का तुम्ही तो पहिला असता तर पहिल्या दिवशीच तो रिकाम्या theatre ला दाखवायची वेळ आली नसती . किती दिवसांनी मराठी चित्रपट black ने चालला ह्याचा कोणी विचार करत नहिये. शेवटी जो पर्यंत आपला commurcial चित्रपट चालणार नाही तो पर्यंत कोणीही नवीन प्रयोग करायला धजावणार नाही कारण कोणी निर्माता अशा चित्रपटांना Finance करणार नाही , हि गोष्ट आपण लक्षात घेतली पहिजे . आपण जे मत व्यक्त केलाय कि ९५% मराठी चित्रपट हे वाईट असतात हे मत जगातल्या सगळ्याच Film Industry ला लागू पडते . From hollywood तो bollywood .
प्रत्येक चित्रपट हा काहीतरी उच्च अभिरुची संपन्न असलाच पाहिजे असे नाही . बहुसंख्य लोकांना चित्रपट हा मनोरंजनाचे साधन असते , त्यामुळे तो त्यांच्या साठी बनवला जतो. Festival चे चित्रपट हे वेगळे … फार कमी चित्रपट हे दोन्हींची सांगड घालू शकतात . त्यामुळे आपण आपली typical मराठी वृत्ती बाजूला ठेवू. आज तेलुगु , तमिळ चित्रपट का एवढे चालतात ते काय उच्च अभिरुची संपन्न असतात म्हणून? कारण ते तरुणांना आवडतात , त्यांची भाषा बोलतात . दोन तास मनोरंजन करतात. मग मराठी चित्रपटाने तसे केले तर आपला पोटशूळ उठण्याचे कारण नाही . तूर्तास एवढेच ….
8 May 2015 - 5:19 am | निनाद मुक्काम प...
अभिदेश
माझे मत तू माझ्याहून अधिक प्रभावीरीत्या मांडल्याने समीक्षणाच्या विषयी अधिक लिहित नाही,
.
दुनियादारी च्या निमित्ताने असेच परीक्षण वाचायला आले होते .
सध्या मराठीत पौगंडावस्थेतील मुलांच्या भाव विश्वावर अनेक सिनेमे आले. सगळेच चालले. पण त्यामुळे हा एक ठराविक फोर्मूला होतो की काय असे वाटतांना रवी ने एक वेगळा प्रगोय जो आतपर्यंत त्यांने केला नव्हता तसा मसालेदार धंदेवाईक बोलीभाषेत गल्लाभरू शिनेमा बनवला
रवी असो किंवा संजय ह्यांनी प्रेक्षकवर्ग कमावला आहे , बॉलीवूड ला सोकावलेला डेली सोप च्या जाळ्यात अडकलेला क्वचित प्रसंगी हॉलीवूड च्या आहारी गेलेला प्रेक्षक वर्ग कमावलेला आहे.
ज्यांनी टी पी १० वेळा पहिला त्यांनी बाल गंधर्व पाहिला हि नसेल किंवा ज्यांनी बालगंधर्व पाहिला त्यांनी बिपी व टीपी पाहिला असेल ,
निशिकांत कामत डोंबिवली फास्ट ते लय भारी अशी रेंज देऊ शकतो तशीच किमया रवी ने केली आहे.
आजतागयात हिंदी वाल्यांना एवढ्या कमी कालावधातीत एखाद्या सिनेमाचा अपवाद वगळता खर्या अर्थाने सिक्वेल काढून त्यांची हवा तयार करून असे यश मिळवलेले नाही आहे.
त्यांचे सिक्वेल म्हणजे मूळ पात्र कायम ठेवून स्वतंत्र नवीन गोष्ट सांगायची जिचा आधीच्या सिनेमाच्या कथेशी काहीही संबंध नाही.
नाही म्हणा नगीना व निगाहे हे जुने उदाहरण सापडते अलीकडचे हेराफेरी आणि फिर हेराफेरी हे झाले पण त्यांना हि अपेक्षित यश संपादित करता आले नाही.
दबंग हे एकमेव उदाहरण हिंदीत आहे.
मराठीची सध्या प्रयोगशील व व्यावसायिक अश्या दोन्ही बाजूंनी
वाढत आहे दोन्ही सिनेमे पाहणारा प्रेक्षकवर्ग निर्माण होत आहे.
हि चांगली गोष्ट आहे.
आमच्याकडे जर्मनीत मामाच्या गावाला जाऊ या आणि अस्तु रमा माधव ह्या सिनेमांचे कलावंत सिनेमे घेऊन आले होते व त्यांचे सर्व शो हाउस फुल होते.
अनिवासी भारतीयांची बाजारपेठ मराठीला खुणावत आहे
अश्या वेळी टी २ नाही पाहायचा तर काय गब्बर पाहायचा का
8 May 2015 - 7:32 am | अभिदेश
मला हेच म्हणायचे आहे. आपण आपला प्रेक्षकवर्ग तयार करून चित्रपट त्या लोकांपर्यंत पोचावालाच पहिजे. nothing succeeds like success...
8 May 2015 - 3:45 pm | समीरसूर
चितरपट आवडायलाच हवा आणि तो कसाही असला तरी चांगलेच लिहायला हवे हे लॉजिक पटत नाही. मराठी चितरपट तूफान चालावा हे मत मी 8-१० वरषांपूरवी एका साईटवर मांडले होते. पण महणून चितरपट आवडला नसतांना आवडला आहे असे महणणयाची आणि तसेच लिहिणयाची बळजबरी अनाकलनीय आहे. हा खळखटयाक मराठी बाणा झाला. गलाभरू चितरपट दरजेदार असायला काहीच हरकत नाही. जनतेला आवडायचाच विचार करायचा तर जनतेला नीलचितरपट देखील आवडतील. मग ते दाखवणार आहोत का आपण सरास
चितरपट आवडला अथवा नाही हे सापेकश आहे. बळजबरीने मत बदलेल, मन कसे बदलेल
नाहीच बदलणार
असो. मी थांबतो या विषयावर आता. माझे मत मातर अजिबात बदललेले नाही. आणि बदलणार देखील नाही. :-)
माफ करा माझा टायपींगचा घोळ झाला आहे.
8 May 2015 - 3:54 pm | समीरसूर
मिपावरच बहुतांश लोकांना टीपी 2 भयंकर रटाळ वाटला यातच सारे आले. असं पटवून देऊन चितरपट इतकया लोकांना कसा आवडणार. ऐसा नही हो सकता...
आय रेसट माय केस हिअर...
8 May 2015 - 5:38 pm | अत्रुप्त आत्मा
@मिपावरच बहुतांश लोकांना टीपी 2 भयंकर रटाळ वाटला यातच सारे आले. असं पटवून देऊन चितरपट इतकया लोकांना कसा आवडणार. ऐसा नही हो सकता...>>> हेच हेच म्हणायचय..! जे छपरी आहे,ते छपरीच आहे म्हणून सांगितलं पाहिजे.
मागे तो "दे धक्का" नावाचा असाच टुकार चित्रपट पूर्वप्रसिद्धीच्या देहप्रदर्शनावर धंदा खाऊन गेला. हे प्रेक्षकांना जाणिवपूर्वक फसवून माल खायचं दळीद्री धोरण आहे. ते निंदनीय आहे. त्याचा कधिही उदोउदो होता कामा नये.
8 May 2015 - 8:50 pm | समीरसूर
गल्लाभरू चित्रपटांमध्ये खरोखर आवडणारे आणि ताजेपणा असणारे चित्रपट चिक्कार आहेत. टीपी २ इतका सरधोपट आणि बाळबोध करण्याचं कारण कळलं नाही. हायलाईट म्हणजे प्रफुल्लचं कॅरेक्टर! उठून कानशीलात भडकवावी इतका वाईट अभिनय केला आहे त्या नटाने. फुकटात दाखवतो म्हटलं तरी बघू नये इतका भयंकर आहे टीपी २.
8 May 2015 - 5:55 pm | निनाद मुक्काम प...
अनेक मिपाकरांनी ज्यांनी येथे प्रतिसाद लिहिले आहे. त्यांना भाग २ आवडला नाही. पण त्यांना भाग १ सुध्धा आवडला नसल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले आहे जो समीरसूर ह्यांना दर्जेदार वाटला.
दर्जेदार गल्लाभरू हे शब्द घरबसल्या टंकन करणे खूपच सोपे असते , मात्र सर्व सामान्य जनता तिकीटबारीवर सिनेमाचे खरे समीक्षण करते ,पण सर्व सामान्य जनतेच्या मता विरुद्ध लिहून हुच्च्भ्रू समीक्षण करणे हा ट्रेंड पिके दुनियादारी च्या निमित्ताने पाहून झाला आहे ,
सिनेमाचे प्रोमो पाहून हा सिनेमा कसा असणार व कोणत्या अंगाने जाणार ह्याची वर्षोवर्ष सिनेमे व त्यांची ट्रेलर पाहणाऱ्या मंडळींना पूर्ण कल्पना आली असणार ,
फु बाई फु ची मंडळी संपूर्ण सिनेमाभर पसरली असतांना त्याधर्तीचे मनोरंजन ह्या सिनेमातून दिसले किंबहुना ट्रेलर मधून त्यांची झलक स्पष्ट दिसत होती.
तरीही हौसेने अपेक्षाभांगांचे दुक्ख कुरवाळत बसण्यासाठी
जाधवांचा गल्ला भरण्यासाठी सिनेमाला जाऊन मग हा आमच्या अपेक्षेला उतरला नाही म्हणून गळे काढणे ओघाने आले.
मी आधी लिहिले होते बालगंधर्व आवडलेल्या लोकांना टीपी आवडला नाही हा अभिरुची चा भाग आहे.
अश्या मिपाकरांच्या प्रतिसादाशी सहमत ज्यांना दोन्ही भाग आवडले नाही. आवड ज्याची त्यांची
आता भाग दोन मधील गाण्यांना भयंक असे विशेषण लावले
निदान मला तरी दोन्ही भागातील संगीतात डावे उजवे दिसले नाही.
भाग पहिल्यात निरागस व गोंधळलेली पौगंडावस्था असलेले नायक नायिकेसाठी साजेसे संगीत होते तर तसे दुसर्या भागात
कसे असू असेल
पसंद अपनी अपनी
हे परीक्षण वाचून करण जोहर स्वताचे सिनेमे क्लासि व डेविड
धवन चे किंवा इतर मंडळींचे ......
असा उल्लेख करतो त्याची आठवण झाली.
9 May 2015 - 5:08 am | निनाद मुक्काम प...
@ अतृप्त
सिनेमा चांगला की वाईट हे माउथ पब्लिसिटी ने लोकांना पहिल्या ३ दिवसात कळतो ,गेलाबाजार
१ आठवडा खूप झाला ,मात्र जर तो सिनेमा पुढे ३ ,४ आठवडे अजून प्रेक्षकांची गर्दी खेचत असेल पडद्यावरून खाली उतरला नसेल तर तो लोकांना आवडला असे गृहीत धरण्यात हरकत नसावी , सध्या सदर सिनेमाचा दुसरा आठवडा सुरु आहे घोड्मैदान जवळच आहे ,
बाकी माझ्या पाहण्यात सिनेमा प्रदर्शित होऊन ३र्य व ४थ्या दिवशी नव्हे तर ,४थ्य आठवड्यात तो पाहून बेक्कार होता असे चेपू वर लिहिणारे महाभाग ठाऊक आहेत.
9 May 2015 - 5:46 am | अत्रुप्त आत्मा
तरीही याला जबाबदार चित्रपटाचं तथाकथित चांगलेपण नाही! हा प्रकार कंटिन्यु होतो,कारण बातम्या /बाइट्स द्वारे हे देहप्रदर्शन आणि दर्शकांच्या ठरवून करवून घेतलेल्या प्रतिक्रियांचा पाउस चालु केलेला असतो. यानिही धंदा पकडत नाही असं दिसलं,की वादाचा भोवरा-फिरवला जातो!
9 May 2015 - 3:28 pm | निनाद मुक्काम प...
अतृप्त
मराठीत एक म्हण आहे आडात असेल तर पोहऱ्यात येते.
तुम्ही म्हणतात तशी जाहिरातबाजी करून सिनेमे चालवता आले असते तर प्रत्येक सिनेमा हिट झाला असता.
एखादा मराठी सिनेमा जेव्हा सहा आठवडे चालतो तेव्हा नक्कीच त्याला रिपीट प्रेक्षक असतो. श्रेयस चा तुफान जाहिरातबाजी केलेला पोस्टर बोइज चालतो मात्र बाजी पडतो कारण एकच आडात ,,,,
असो
समज ज्याची त्याची