आमच्या विवाहाची कहाणी १ - http://www.misalpav.com/node/30588
आमच्या विवाहाची कहाणी - २- http://www.misalpav.com/node/30631
सर्व जण जाईपर्यंत साडे सहा वाजलेले होते. घरचे पाच जण आता थोडा वेळ आहे म्हणून शांत बसलो होतो. मला रात्री नउच्या चेन्नई एक्स्प्रेसने पुण्याला जायचे होते. पहिल्यांदा वडिलांनी विचारले कि मग आता काय विचार आहे. मी पहिल्यांदा मत देण्यास का कू करत होतो पण वडिलांनी सांगितले प्रथम तुझे मत हवे आहे त्यानंतर आम्ही आमची मते सांगू. त्यावर मी म्हणालो कि हि तिसरी मुलगी पसंत नाही तेंव्हा तो विचार बाजूला ठेवा. राहिल्या दोन मुली.
त्यातील आजची मुलगी कालच्या मुलीपेक्षा दिसायला जास्त सुंदर आहे. यावर माझा भाऊ म्हणाला हो तिचे कॉम्प्लेक्शन फार छान आहे. यावर आमच्या वाहिनीला प्रचंड धक्काच बसला. कारण माझा भाऊ हा फकीर म्हणून ओळखला जातो. रस्त्याने जाताना एखादी सुंदर मुलगी गेली तरी त्याचे लक्ष बाजूच्या ट्रान्सफोर्मर मधून येणाऱ्या ठिणग्यांकडे असे.वहिनीने एखादी चांगली साडी नेसली आणी कशी साडी आहे हे विचारले तर तो न बघता छानच आहे म्हणतो.( आजही हि परिस्थिती फारशी बदललेली नाही) हा अनुभव वहिनीने अडीच वर्षे( लग्न झाल्यापासून) घेतला असल्यामुळे तिला फारच आश्चर्य वाटले. आणी आजही हा किस्सा आमच्या घरात चविष्टपणे चघळला जातो.
असो. चर्चा सुरु तर झाली. दोन्ही मुली डॉक्टर होत्या. दोघींचे शैक्षणिक यश उत्तम होते.दोघींना चष्मा होता. दोघीही लेन्सेस लावत होत्या. आमच्या घरात कुणालाच चष्मा नव्हता. पण नेत्ररोगाचा विषय अभ्यासात असताना ५ नंबर पर्यंत चष्मा असणे हा दृष्टी दोष नाही तर सरासरीतील २ साधारण बदल (+/- २ SD) हे अभ्यासले होते त्यामुळे कमी नंबरचा चष्मा चालेल असे मी लिहिलेले होते.महत्त्वाचे म्हणजे आमच्या आई वडिलांचा माझ्यावर पूर्ण विश्वास होता. कुटुंबाची पार्श्वभूमी चांगली होती. दोन्हीच्या कुटुंबाबाबत चर्चा झाली तेंव्हा हि आजच्या मुलीचे कुटुंब सज्जन आणी सुसंस्कृत आहेत.अर्थात कालच्या मुलीचे कुटुंबहि जवळ जवळ तितक्याच तोडीचे होते. तसा दोन्ही बाजूंमध्ये फरक थोडाच होता. पण कालची मुलगी अहमदाबादची होती आणी आजची पनवेलची. यामुळे आमच्या आईचे पनवेलकडे दोन गुण जास्त होते. मुळात आईचे मत असे होते कि मुलीला आई असावी म्हणजे जावयाचे कौतुक व्यवस्थित होते. तेंव्हा अहमदाबाद आणी मुंबई जरा लांबच आहेत शिवाय नौदलात नोकरी म्हणजे दोन महिने वर्षातून सुटीवर येणार त्यातील अर्धा काळ दुसर्या शहरात जायचे म्हणजे मुलगा फारच कमी काळ जवळ येतो असा स्पष्ट विचार तिने बोलून दाखवला.( तिच्याच शब्दात स्वार्थी विचार). शेवटी आजची मुलगी कालपेक्षा जास्त चांगली आहे यात एकमत झाले.
थोडी फार चर्चा झाली आणी हे ठरले कि दोन तीन दिवसात आजच्या मुलीला होकार कळवायचा. (दोन्ही मुलीना एक आठवड्यात कळवतो असे सांगितलेले होते). वडिलांनी विचारले जर या मुलीचा नकार आला तर काय करायचे मी स्वच्छपणे म्हटले मग आपल्याला दुसर्या( कालच्या) मुलीचा विचार करायला हरकत नाही.
माझा भाऊ म्हणाला कि नकार येणारच नाही.आपल्या स्थळात काय कमी आहे? पण मी त्याला म्हटले कि एखाद्या मुलीला तुमचा चेहरा आवडत नाही. किंवा त्यांना मुलगी लष्करी संस्कृतीत द्यायला नको वाटत असेल तर काय ? लष्करी संस्कृती मध्ये पार्ट्या आणी त्यात सहज चालणारे मद्यपान सुद्धा येते . हि गोष्ट १९९२ साली ब्राम्हण कुटुंबात सहज स्वीकृत होईल असे नव्हते. दोन्ही मुलीनी मला विचारले होते कि तुम्ही पार्टीत थोडी फार घेता का?अर्थात मी सांगितले कि मी अजून तरी दारूच्या थेंबाला स्पर्श केलेला नाही.
यावर पनवेलच्या मुलीला होकार कळवायचा आणि गुरुवार शुक्रवार पर्यंत वाट पहायची असा सर्वानुमते निर्णय झाला.
मी रात्री ९. ३० च्या चेन्नई एक्स्प्रेस मध्ये बसून रात्री १२.३० ला पुण्यात पोहोचलो. तेंव्हा माझ्या बाजूच्या खोल्यात राहणारे वर्ग मित्र मी आलो म्हणून जमा झाले.सगळे एम डी / एम एस करायला आलेले. त्यामुळे आम्ही रात्री १.३०- २ पर्यंत अभ्यास करत असू.सगळेच ब्रम्हचारी होते वय २६-२७( लग्न झालेले आपल्या बायकांबरोबर सरकारी घरात राहत असत त्यामुळे ते तिथे नसत) त्यामुळे या सर्व प्रकरणाबद्दल जबरदस्त कुतूहल असलेले. सगळे एकदम उत्साहात आले. एकाने कोफी केली आणि विचारले काय रे काय झालं?. मी त्यांना हि सर्व हकीकत सांगितली. मग ते म्हणाले काय ठरवलं. मी त्यांना सांगितलं पनवेलच्या मुलीला होकार कळवायचा. मग? मग काय तिने हो म्हटले तर लग्न ठरले. सर्वाना असा अनुभव नवीनच होता. सगळ्यांनी तेच विचारलं कि तू मुलीत काय बघितलस? मी त्यांना म्हणालो कि मुलीशी डोळ्यात डोळे घालून बघितला तर एक अंदाज येतो कि हिच्याशी जमेल कि नाही? मुळात पसंत नाही हे सांगणे फार सोपे असते. पण पसंती द्यायची तर विचार करावा लागतो. मुलगी दिसायला कशी आहे हे तुम्हाला चार लोकसुद्धा सांगू शकतात. पण आपले हिच्याशी जमेल इ नाही हा निर्णय तुम्हाला तिच्याशी प्रत्यक्ष बोलल्यावर थोडा फार येऊ शकतो. तिची परिस्थितीशी मिळते जुळते घेण्याची क्षमता(adjustment) हि आजमावून पाहणे आवश्यक आहे. ती जे बोलते त्याकडे नीट लक्ष देऊन ऐकणे आवश्यक आहे कारण काही बाबतीत तिची मतं ठाम असू शकतात. लग्नात काय किमान हवंच हे आपण ठरवणं आवश्यक आहे.
एकाने विचारले कि सुंदर आहे कि नाही हे कसे ठरवायचे. मी त्याला हसून म्हणालो, ' हे बघ दाखवायला आलेली मुलगी सर्वात चांगला मेकअप सर्वात चांगला पोशाख करून आलेली असते,आणि तिचे वागणे "आदर्शच्या जवळपास" असते. तुम्ही म्हणाल त्यातील बर्याच गोष्टीना ती अनुमोदन देणारच. तेंव्हा जर ती तुम्हाला बरी किंवा ठीक ठाकच वाटत असेल तर ती एखाद्या गाउन मध्ये केसाला तेल लावून बसलेली मेक अप शिवाय कशी दिसेल याची कल्पना करून बघा.अशी मुलगी चालेल असे वाटले तर ठीक. नाहीतर पुढची मुलगी. शिवाय मुलीच्या आईकडे पहा म्हणजे अजून २५ वर्षांनी ती कशी दिसेल त्याचा पण अंदाज येईल. त्यावर सगळे हसले. एक मित्र आश्चर्याने म्हणाला कि तू एवढा विचार खरच केला होतास? मी होय म्हणालो. मी त्यांना एवढेच म्हणालो कि जर तुम्हाला पहिल्या भेटीतच शंका येत असेल तर दुसर्यांदा भेटण्याचा खरोखरच विचार करायला पाहिजे. सगळेच मित्र रात्री दीड वाजता डोकं खाजवत परत गेले. दोन दिवस काहीच झाले नाही.
मंगळवारी मी एस टी डी बूथ अवर जाऊन वडिलांना फोन केला. तेन्व्हा त्यानी सांगितले कि संजय( माझा भाऊ) काल पनवेलच्या मित्राकडे गेला होता. तिथे कळले कि त्या मुलीच्या भावाची घटस्फोटाची केस पुण्याच्या कोर्टात चालू आहे. म्हणून तिची वहिनी तिच्या बरोबर दाखवायच्या कार्यक्रमाला आली नव्हती. मग मी वडिलांना विचारले तुम्ही काय कळवलेत. वडील म्हणाले तुला काय वाटते? मी त्यांना म्हणालो मुलीच्या भावाचे आणि त्याच्या बायकोचे पटत नाही हा काही मुलीचा दोष नाही. तिची यात काय चूक? वडील म्हणाले सासू खाष्ट आहे असा वहिनीने कोर्टात अर्ज केलेला आहे. अशा आईची मुलगी करून घ्यायची का?
मी वडलाना म्हणालो कि सासू सुनेचे नाते हे पटणारे नसतेच. ते पटवून घ्यायचेच नाते आहे तेंव्हा सासू सुनेचे पटत नाही यात नाविन्य ते काय?
वडील परत म्हणाले मग काय करायचे?. मी त्यांना म्हणालो कि तुम्ही होकार कळवून टाका.आईच्या किंवा भाऊ वहिनीच्या भांडणात मुलीला शिक्षा देणे मला पटत नाही.( हि आमच्या वडिलांची खासियत आहे. ते कधीही आपला निर्णय आमच्यावर लादत नसत.)
त्यावर ते म्हणाले मी त्यांना अगोदरच होकार कळवलेला आहे. मला तुझ्या बद्दल खात्री होती पण एकदा तुझ्या तोंडून ऐकायचे होते म्हणून तुला अगोदर सांगितले नाही. त्यांनी( मुलीच्या वडिलांनी) गुरुवारी कळवतो म्हणून सांगितले आहे तेंव्हा तू मला गुरुवारी फोन कर.
गुरुवारी रात्री दहा वाजायच्या सुमारास मी स्कूटर काढली तेंव्हा शेजारच्या खोलीतील मित्राने विचारले कुठवर प्रगती आहे? मी हसून त्याला म्हणालो निर्णय काय आहे तेच ऐकायला घरी फोन करायला चाललो आहे. असे म्हणून मी स्कूटर चालू करून फोन बूथ वर गेलो. वडिलांना फोन केला. ते म्हणाले मुलीकडून होकार आलेला आहे आणि त्यांनी रविवारी परत सगळ्यांना पनवेलला जेवायला बोलावले आहे. मी त्यांना म्हणालो मला काही रविवार येता येणार नाही कारण या रविवारी माझी ED( इमर्जन्सी ड्युटी) आहे तुम्ही जाऊन या. मग इकडचं तिकडचं बोलून मी परत निघालो. निर्णय तर झाला होता. आनंद आश्चर्य आणि कुतूहल अशी संमिश्र भावना माझ्या मनात होतीच परंतु एक अनामिक काळजी सुद्धा होती कि आपला निर्णय चुकला तर नाही. जेमतेम अर्धा पाऊण तास जिच्याशी बोललो तिच्या बरोबर आयष्य काढायचे आहे. जर निर्णय चुकला तर? हा विचार मी मागे सारला कारण माझा माझ्या नशिबावर भरवसा होता. आयुष्यात मला बर्याचशा गोष्टी नशिबाने मिळत गेल्या होत्या. परत आलो तर माझ्या स्कूटरचा आवाज ऐकून शेजारचा लगेच बाहेर आला. आणि विचारता झाला काय झाले? मी म्हणालो कि "तिकडून" होकार आला आहे. त्याने त्यावर आरडाओरडा सुरु केला भाईयोन सुनो खरे कि शादी तय हो गयी है. मग काय दोन मिनटात सात आठ टोळ भैरव जमा झाले. सगळ्यांनी जल्लोष केला आणि पार्टी पाहिजे म्हणून आरडाओरडा सुरु केला. त्या सर्वाना घेऊन पुण्यातील चौपाटी( नेहरु हॉलच्या मागे) आता तेथे कुठला तरी मॉल झाला आहे. तेथे गेलो. सगळ्यांना फळांचा रस पाजला. काही लोकांना हुकमी भूक लागत असे त्यांना पावभाजी किंवा आलू पराठा खायला घातला आणि रात्री एक वाजता परत आलो.
बराच वेळ रात्री हाच विचार चालू होता कि आता पुढे काय? अशा विचारात केंव्हा तरी झोप लागली.
क्रमशः
प्रतिक्रिया
18 Mar 2015 - 1:46 pm | सौंदाळा
हा भाग पण मस्तच.
क्रमशः अगदी परफेक्ट टाईमला टाकलय.
+१
लय डांबिस असतात हो मित्र. पार्टी म्हटली की नेहमीच्या दुप्पट तिप्पट हादडतात
19 Mar 2015 - 7:28 am | मुक्त विहारि
आणि डामरट देखील....
तरी पण ते आवडतातच....
लग्न ठरले तरी पार्टी आणि लग्न ठरले नाही तरी पार्टी, फक्त मित्रच मागू शकतात.
18 Mar 2015 - 1:57 pm | सूड
पुभाप्र
18 Mar 2015 - 2:25 pm | कंजूस
वावा!
18 Mar 2015 - 2:39 pm | रुस्तम
पु भा प्र...
18 Mar 2015 - 2:58 pm | असंका
अप्रतिम हो डॉक्टरसाहेब...!!
धन्यवाद!!
18 Mar 2015 - 3:15 pm | प्रचेतस
मस्त लिखाण.
तिन्ही भाग आवडले.
18 Mar 2015 - 3:15 pm | अजया
लावला का क्रमशः,जरा मजा येत नाही तर!!पुभालटा!!उद्याच टाका!
18 Mar 2015 - 6:20 pm | आदूबाळ
हां ना!
बादवे नऊच्या चेन्नै एक्स्प्रेस (दादर-चेन्नै) च्या उल्लेखाने वेगळीच स्मृती जागी झाली...
18 Mar 2015 - 3:26 pm | त्रिवेणी
किती ते क्रमश.
आता पुढची स्तोरी एकदम लिहा.
18 Mar 2015 - 3:48 pm | स्पा
मस्त सुरु आहे
पु भा प्र
18 Mar 2015 - 4:05 pm | एस
मस्त! निदान पाऊण तास तरी मिळाला होता ना! :-)
18 Mar 2015 - 5:10 pm | रेवती
हे चांगलं लिहिलय. मग पुढे काय झालं?
18 Mar 2015 - 5:31 pm | नगरीनिरंजन
रंगत येत आहे. पटापटा भाग टाका पुढचे.
18 Mar 2015 - 5:46 pm | श्रीरंग_जोशी
हा ही भाग खूप आवडला.
हे सर्वाधीक भावले. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
18 Mar 2015 - 8:29 pm | खटपट्या
खूप छान.
पुभाप्र
18 Mar 2015 - 10:22 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर लिहीताय ! लवकर टाका पुढचा भाग.
18 Mar 2015 - 11:56 pm | अत्रुप्त आत्मा
@इस्पीकचा एक्का>> +++१११
18 Mar 2015 - 11:49 pm | पिलीयन रायडर
सहज एक विचार मनात आला की समजा तुमच्या मिसेसनी सुद्धा अशीच लेखमाला लिहीली तर किती मस्त होईल. म्हण्जे जशी धाक्धुक तुमच्या मनात होती, तशीच त्यांच्याही मनात असणार. जशा वरपक्षाच्या रंग, रुप (कॉम्प्लेक्शन!) ते मुलीचे गाव इथवर बारिक सारिक अपेक्षा होत्या तशा वधुपक्षाच्याही असणार. जसं त्यांना पाहुन तुम्हाला जे वाटलं ते तुम्ही लिहीत आहात, तसंच त्यांना तुम्हाला पाहुन काय वाटलं हे त्यांनी लिहीलं तर रंगत येईल!!
19 Mar 2015 - 9:48 am | सुबोध खरे
पिरा ताई,
हे सर्व भाग त्यांनी ( आमच्या सौ नि) पण वाचून पाहिलेले आहेत. त्यांचा अनुभव आमच्यापेक्षा दांडगा आहे. त्यांनी १३-१४ मुलगे पाहिले. जमले तर त्यांचे काही अनुभव त्यांच्याच शब्दात टंकायचा प्रयत्न करतो. त्यांचे मराठी टंकन अगदीच धीमे आहे.(कॉन्वेंट एजुकेटेड आहेत).
19 Mar 2015 - 1:08 am | रुपी
आवडला!
19 Mar 2015 - 7:28 am | मुक्त विहारि
पुभाप्र
19 Mar 2015 - 6:23 pm | सिरुसेरि
"मंगळवारी मी एस टी डी बूथ अवर जाऊन वडिलांना फोन केला. तेन्व्हा त्यानी सांगितले कि संजय( माझा भाऊ) काल पनवेलच्या मित्राकडे गेला होता. तिथे कळले कि त्या मुलीच्या भावाची घटस्फोटाची केस पुण्याच्या कोर्टात चालू आहे. म्हणून तिची वहिनी तिच्या बरोबर दाखवायच्या कार्यक्रमाला आली नव्हती."
एक शंका अशी की , ही गोष्ट पहिल्याच भेटीत किंवा भेटीपुर्वी मुलीकडच्यांनी आपणहुन का सांगितली नाही . अर्थात , आता तुमचे लग्न होउन खुप कालावधी झाला आहे . त्यामुळे ही शंका केवळ एक जेनेरिक केस स्ट्डी या अर्थाने घ्यावी .
19 Mar 2015 - 6:28 pm | सुबोध खरे
ते उत्तर पुढच्या भागात येत आहे.
21 Mar 2015 - 2:50 am | अभिजीत अवलिया
फारच छान. मस्त लिहिताय खरे साहेब. पुढील भागाच्या प्रतीक्षेत
21 Mar 2015 - 10:11 am | पैसा
मुलीच्या आईवडील आणि नातेवाईकांपेक्षा मुलगी महत्त्वाची हा विचार अजूनही खूपजण करू शकत नाहीत. चांगलं लिहिताय!