छावणी - १

स्पार्टाकस's picture
स्पार्टाकस in जनातलं, मनातलं
19 Nov 2014 - 9:49 am

पंजाबच्या पश्चिम प्रांतातील गुजरानवाला शहर.

शहराच्या मध्यवर्ती भागात एक मोठा वाडा होता. हा वाडा होता चौधरी महेंद्रनाथ यांचा. महेंद्रनाथ हे शहरातील प्रतिष्ठीत व्यापार्‍यांपैकी एक होते. समाजात त्यांना मोठा मान होता. धातूच्या भांड्यांचं एक मोठं दुकान त्यांच्या मालकीचं होतं. त्याखेरीज एका मोठ्या धान्यभांडाराचेही ते मालक होते. आपली पत्नी कमला आणि मुलगी सरिता यांच्यासह ते या वाड्यात राहत होते. या दुमजली वाड्यातील वरच्या मजल्यावर चौधरी आणि त्यांचा परिवार राहत होता तर खालच्या मजल्यावरील बिर्‍हाडांत अनेक भाडेकरु होते.

चौधरी महेंद्रनाथ यांचा मोठा मुलगा प्रताप हा आपल्या पत्नीसह पंजाबच्या पूर्व टोकाला असलेल्या सियालकोट या शहरात राहत होता. वास्तविक प्रतापने आपल्या व्यवसायात आपल्याला मदत करावी आणि दोनपैकी किमान एकातरी दुकानाची जबाबदारी घ्यावी अशी महेंद्रनाथ यांची इच्छा होती. परंतु प्रतापला आपल्या वडिलांच्या व्यवसायात अजिबात रस नव्हता. लाहोरच्या कॉलेजातून त्याने पदवी घेतली होती. सियालकोट आणि परिसरातील बांधकामांची अनेक कंत्राटं त्याने मिळवली होती. त्याचं आता व्यवस्थित बस्तान बसलं होतं. प्रतापची पत्नी उमा ही मूळची गुजरानवाला इथलीच होती.

महेंद्रनाथांची धाकटी मुलगी सरिता आता एकोणीस वर्षांची झाली होती. कोणीही दोन वेळा वळून पाहवं असं रुप तिला लाभलं होतं. चौधरींना आता तिच्या लग्नाची चिंता लागली होती. एकदा मुलीचं लग्नं करुन ती सासरी गेली की आपण गृहस्थाश्रमातून मोकळे झालो अशी त्यांची भावना होती. त्या दृष्टीने त्यांनी वरसंशोधनाला सुरवातही केली होती. परंतु स्वतः सरिताचा मात्रं लग्नाला विरोध होता! हे तिचं कॉलेजचं दुसरं वर्ष होतं. आपलं शिक्षण पूर्ण झाल्याविना आपण लग्नं करणार नाही हा तिचा ठाम निश्चय होता. . बाप-बेटीत या विषयावरुन नेहमी वाद होत असत.

एक दिवस दुपारी चहा घेताना चौधरींनी पुन्हा सरिताच्या लग्नाचा विषय काढला.

"देखो बेटी, आता तू एकोणीस वर्षांची झालीस! आता तुझ्या लग्नासाठी आम्हाला हालचाल करायला हवी!"
"पण पिताजी, मला माझं शिक्षण आधी पूर्ण करायचं आहे! आणखीन एक वर्ष-दोन वर्ष तर बाकी आहे. त्याशिवाय मी लग्नं करणार नाही!" सरितेने ठणकावलं.
"अगं पण तुला इतकं शिकून काय करायचं आहे?" महेंद्रनाथ समजावणीच्या सुरात म्हणाले, "एकतर तू कुठे नोकरी करायला जाणार नाहीस. तुझी मां तरी कुठे शिकली? काही कमी पडलं का तिला? ती तुझ्याएवढी असताना प्रताप एक वर्षाचा झाला होता!"
"ती नाही शिकली म्हणून मी पण शिकू नये असं थोडंच आहे?"
"अगं पण शिकून करणार तरी काय तू? आणि तुझ्यापेक्षा जास्तं शिकलेला नवरा कुठून आणायचा आम्ही?" सरितेच्या आईने - कमलादेवींनी संभाषणात भाग घेत विचारलं.
"मला एखाद्या शाळेत शिक्षिका किंवा कॉलेजमध्ये प्रोफेसर व्हायचं आहे! मला इतक्यात भरीला घालू नका लग्नाच्या!"
"अगं पण..."

परंतु त्यांचं ऐकायला सरिता होतीच कुठे? ती कधीच आपल्या खोलीकडे सटकली होती. पाच-दहा मिनीटांनी ती खाली उतरली ती बाहेर जाण्याच्या तयारीनेच.

"मां, मी रजनीकडे जाऊन येते. दोन पुस्तकं आणायची आहेत!"

सरितेचं वाचनाचं वेड कमलादेवीना माहीत होतं. रात्रंदिवस ती कोणती ना कोणती पुस्तकं घेऊन बसलेली असे. कमलादेवीनी मानेनेच होकार दिला. महेंद्रनाथ काहीच बोलले नाहीत. आपली मुलगी किती जिद्दी आहे ते त्यांना चांगलंच ठाऊक होतं.

"काय म्हणावं या पोरीला काही कळेनासं झालय!" महेंद्रनाथ सरिता गेलेल्या दिशेला पाहत उद्गारले.
"लहान आहे हो अजून!" कमलादेवींनी मुलीची बाजू घेतली, "आणि तुम्हाला माहीतच आहे ना किती हट्टी आहे ते! उगाच आपण जबरदस्ती केली आणि तिने काही वेडं-वाकडं पाऊल उचललं म्हणजे?"
"तिचं पाऊल वाकडं पडू नये हीच तर चिंता आहे ना! त्यात आज-कालचे दिवस कसे आहेत हे तुला ठाऊकच आहे!"
"अहो तसं काही होणार नाही. आपली पोर भलतं-सलतं काही करणार नाही ही मला खात्री आहे. तुम्ही उगाच काळजी करु नका!"
"उगाच नाही काळजी करत मी कमला. तरुण मुलगी हा बापाच्या जीवाला घोर असतो. एकदा तिचे हात पिवळे केले की आपण सुटलो!"
"अहो हे मला समजत नाही का?, पण तुम्ही उगाच स्वतःला त्रास करुन घेऊ नका. प्रत्येक गोष्टीची वेळ असते. ती वेळ आली की सगळं बरोबर होईल. आपण आपलं कर्म करत राहवं, फळाची अपेक्षा करु नये असं भगवान श्रीकृष्णानी भग्वदगीतेत सांगितलं आहे असं तुम्हीच नेहमी म्हणता ना?"

महेंद्रनाथ काही बोलणार तोच त्यांना बाहेरुन दमदार आवाजातली हाक ऐकू आली.

"अरे ओ महेंदर, कहां हो भाई?"
"आला! चहा ठेव! आल्याबरोबर चहाची फर्माईश होईल बघ!" महेंद्रनाथ कमलादेवींना उद्देशून म्हणाले.

तोपर्यंत त्या आवाजाचा मालक दारात आला होता.…
मिर्झा सिकंदरअली खान!

महेंद्रनाथ आणि सिकंदरअली मिर्झांची लहानपणापासूनची दोस्ती! दोघांचीही घराणी मूळ काश्मिरजवळील जम्मूची. कित्येक वर्षांपूर्वी महेंद्रनाथ आणि मिर्झांचे वडील जोडीनेच आपलं नशीब काढण्यासाठी जम्मूहून येऊन गुजरानवाला इथे स्थायिक झालेले होते. अपार कष्टाने त्यांनी आपला जम बसवला होता. मिर्झांच्या वडीलांची लाकडाची भलीमोठी वखार होती. ती वखार आता मिर्झा सांभाळत होते. दोन्ही कुटुंबांचे अगदी घरोब्याचे संबंध होते. महेंद्रनाथांच्या स्वैपाकघरापर्यंत मिर्झांचा मुक्त वावर होता. मिर्झांची मुलगी सना आणि सरिता यांचीही चांगली गट्टी होती.

"आदाब भाभीजी! एक प्याली..."
"ठेवला आहे!" मिर्झांचा उद्देश समजून कमलादेवी हसतच म्हणाल्या.
"ये हुई ना बात! बोलो महेंदर, क्या हालचाल?"
"आहे नेहमीचंच. तुला तर माहीतच आहे सध्या आपल्या गावात काय चाललं आहे ते!"
"हां! सुन रहा हूं मै भी. जिन्हासाब चाहते है की मुसलमीनोंका अलग वतन हो पाकीस्तान नामसे..."

महेंद्रनाथ काहीच बोलले नाहीत.

"ये कैसे हो सकता है महेंदर? हम पुश्तैनी हिंदुस्तानी है! हमारी सारी पुश्ते हिंदुस्तान में पैदा हुई और खुदा के घर चली गई. और अब जिन्हासाब ये पाकीस्तान कहांसे ले आए?"
"तुला काय वाटतं सिकंदर? जिन्हासाहेबांची पाकीस्तानची मागणी मान्य होईल?"
"बिल्कूल नहीं! अगर पाकीस्तान हुआ तो गंवार लोगोंके हाथ में जाएगा! फिर क्या होगा खुदा जाने!"

कमलादेवी चहा घेऊन आल्या आणि जोडीला खाणंही. दोघा मित्रांच्या गप्पा बराच वेळ रंगल्या.

रजनीकडे जाण्यासाठी बाहेर पडलेली सरिता शाहदरा भागात असलेल्या रजनीच्या घराकडे न जाता वझीराबाद रोडने सिव्हील लाईन्सकडे वळली. गुजरानवाला शहरातील जवळपास सर्व सरकारी कचेर्‍या याच भागात होत्या. संध्याकाळचे पाच वाजत आले होते. सिव्हील लाईन्समध्येच सरिताचं कॉलेज होतं. या कॉलेजला लागूनच एक ख्रिश्चन धर्मीयांचं कब्रस्तान होतं. या परिसरात दाट झाडी होती कब्रस्तानाचा परिसर एरवी दिवसाही तसा निर्मनुष्यच असे. या कब्रस्तानाच्या मागूनच वझीराबादला जाणारा रस्ता गेलेला होता.

शहरातील सध्याच्या तंग परिस्थितीत एकट्या-दुकट्या तरुणीने तेही सरितेसारख्या देखण्या मुलीने या कब्रस्तानात येणं हे आत्महत्या करण्यासारखंच ठरलं असतं, पण सरितेला त्याची पर्वा नव्हती. कॉलेजमध्ये ती टेरर म्हणूनच प्रसिद्ध होती. तिच्या वाटेला जाणार्‍या अनेकांना तिखट अनुभवाला सामोरं जावं लागलं होतं. तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करणार्‍या कॉलेजमधल्या एका रोमिओला तर तिने भर मार्केटमध्ये चपलेने बडवून काढलं होतं. शिष्ट, भांडकुदळ, हेकेखोर असे तिच्याविषयी कॉलेजच्या मुलांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्याचा तिने कधीही प्रयत्न केला नव्हता.

या सर्व गोष्टींना अपवाद ठरला होता तो एकच...

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असताना रजनीमुळे तिची त्याच्याशी ओळख झाली होती. रजनी त्याची धाकटी बहीण! ओळखीचं रुपांतर मैत्रीत आणि प्रेमात कधी झालं ते तिला कळलंच नव्हतं. मुलांपासून फटकून राहणारी आणि कोणालाही एका मर्यादेपुढे आपल्याशी जवळीक साधू न देणारी सरिता त्याच्यामध्ये मात्रं स्वतःच्या नकळत पार गुंतली होती. त्याने तिला अपेक्षीत प्रतिसाद दिल्यावर तर तिला स्वर्ग दोन बोटं उरला होता!

सरिता कब्रस्तानात शिरली. सुरवातीलाच असलेल्या एका कबरीवर कोणीतरी ताजी फुलं वाहीलेली दिसत होती. त्या फुलांचा सुगंध अद्यापही हवेत दरवळत होता, परंतु त्याकडे तिचं लक्षं नव्हतं. तिची नजर त्याला शोधत होती. परंतु कब्रस्तानाच्या पार दुसर्‍या टोकापर्यंत शोध घेऊनही त्याचा पत्ता नव्हता! एव्हाना सूर्य पश्चिमेला झुकला होता. तासाभरातच अंधार पडायला सुरवात झाली असती. तत्पूर्वी घरी परतणं तिच्या दृष्टीने आवश्यक होतं. निराश होऊन ती मागे फिरली..

आणि त्याच्यावर जवळजवळ आदळलीच!

"आदित्य! कधी आलास तू?"
"झाली पाच मिनीटं!" आदित्य मिस्कीलपणे म्हणाला, "इथे तुझ्या मागे येऊन उभा राहीलो तरी तुला पत्ता नाही! "कसला विचार करत होतीस इतका?"
"दुसरा कसला विचार करणार? तुझाच!"
"तो फिर...."
"फिर...चल!"

हातात हात घालून दोघं त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आले. ते एक वडाचं डेरेदार झाड होतं. झाडाचा पसारा भरपूर मोठा होता. पारंब्या पार जमिनीपर्यंत पोहोचल्या होत्या. भर उन्हाळ्यातही झाडाच्या बुंध्यापाशी गारवा असे. कब्रस्तानात एका बाजूला असलेल्या या झाडाकडे कोणाचंही लक्षं जात नसे. कब्रस्तानाच्या भिंतीमुळे वझीराबाद रोडवरुन जाणार्‍या लोकांना तर झाडाचा बुंधा दिसतच नसे! दोघांना हवा तो एकांत तिथे मिळत असे!

या एकांतातल्या ठिकाणीच त्याने पहिल्यांदा तिचं चुंबन घेतलं होतं! वर्षाभरापूर्वीचा तो प्रसंग आठवला तशी सरिता अंतर्बाह्य मोहरली. कोणताही आक्रमकपणा आणि धसमुसळेपणा न करता हळूवारपणे झालेला तो ओठांचा स्पर्श आणि त्याबरोबर रोमरोमात फुललेलं चैतन्य! निरागस कोवळ्या भावना उमलत फुललेता तो अलवार प्रणय! तारुण्यात पदार्पण केल्यावर घेतलेला तो पहिला अनुभव आणि पुनरानुभूतीसाठी असलेली ती आतुरता!

"ए सरिता!" आदित्यने तिच्या समोर चुटकी वाजवली तशी ती एकदम भानावर आली!
"काय झालं? कसला विचार करतेस?"
"काही नाही!" त्याच्या मिठीत स्वत:ला झोकून देत ती उत्तरली.

सुरवातीचा आवेग ओसरल्यानंतर ती हलकेच त्याच्या पासून दूर झाली. काही वेळ दोघं काही न बोलता शांतपणे बसून होते.

"चल, निघूयात आता!" ती उठली.

दोघं कब्रस्तानातून बाहेर पडले. सिव्हील लाईन्सच्या चौकात त्याचा निरोप घेऊन ती आपल्या घराकडे वळली. अर्थात पुढची भेट ठरवूनच!

सरिता वाड्यावर परतली तोवर सूर्यास्तं होऊन गेला होता. दिवेलागणीची वेळ झाली होती. वाड्याच्या दारातच तिची नुकतेच बाहेर पडलेल्या सिकंदर मिर्झांशी गाठ पडली. त्यांना आदाब अर्ज करुन ती वाड्यात शिरली.

सिव्हील लाईन्सच्या चौकातून आपल्या घराकडे वळलेला आदित्य शाहदरा चौकात पोहोचला. चौकात कसली तरी सभा सुरु होती. एका दुकानाच्या बाहेर असलेल्या तात्पुरत्या स्टेजवरुन कोणी पुढारी तावातावाने बोलत होता.

"आपल्याला वेगळं वतन मिळालंच पाहीजे! मुसलमानांचा हक्काचा पाकीस्तान हा झालाच पाहीजे. हिंदू आणि शीख हे काफीर आहेत. या काफीरांना इथून जावंच लागेल. बर्‍याबोलाने गेले नाहीत तर आम्ही त्यांना इथून हुसकावून लावू! त्यासाठी जिहाद करु! पाकीस्तान हा अल्लाच्या नेक बंद्यांचाच असेल..."

त्या पुढार्‍याची ही मुक्ताफळं ऐकून आदित्यच्या देहाचा संताप होत होता. गेल्या कित्येक दिवसापासून सर्वत्रं हेच सुरु होतं. पाकीस्तानच्या मागणीसाठी नेत्यांची जहाल आणि आक्रमक भाषणं रोज सुरु होती. पिढ्यानपिढ्या एकत्रं नांदत असलेले हिंदू आणि शीख आता मुसलमान पुढार्‍यांना आणि त्यांच्या आंधळ्या समर्थकांना नकोसे झाले होते. मुसलमान नसलेला प्रत्येकजण त्यांच्यादृष्टीने काफर होता आणि काफरांना हाकलून द्यावं ही उघड चिथावणी नेते देत होते! धर्माच्या नावावर फुटीची बीजं खोलवर रुजली होती!

आदित्य घरी पोहोचला तो काहीसा घुश्श्यातच. शाहदरा चौकाच्या पुढे असलेल्या गल्लीत त्याचं घर होतं. आदित्यचे वडील केशवराव पटवर्धन कचेरीतं काम आटपून नुकतेच घरी परतले होते. केशवराव मूळचे कोकणातल्या रत्नागिरीचे. मात्रं गेल्या कित्येक वर्षांत त्यांचा गावाशी संबंध आलेला नव्हता. नोकरीच्या निमित्ताने मुंबई आणि मग पुढे कित्येक वर्ष ते कराचीला होते. दहा वर्षांपूर्वी कराचीहून त्यांची गुजरानवाला इथे बदली झालेली होती.

"काय रे आदित्य? काय झालं?" आदित्यचा चेहरा पाहून त्यांनी विचारलं.
"अद्याप काही झालं नाहीये नाना! पण काहीतरी भयंकर होणार आहे हे निश्चित!”
"असं कोड्यात बोलू नकोस! नीट सांग काय झालं!"
"आता येताना चौकात सभा सुरु होती. पाकीस्तानच्या नावाने गळा काढत होते पुढारी! हिंदू आणि शीख म्हणे काफर!"
"ते तर गेल्या कित्येक दिवसांपासून गावभर सुरु आहे!" केशवराव उद्वेगाने म्हणाले, "लाल गोंड्यांच्या टोपीवाल्यांचं स्वप्नं आहे ते! दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुरु आहे हा."
"पण नाना, काँग्रेस या सगळ्या दबावापुढे झुकेल? जिन्हासाहेबांची पाकीस्तानची मागणी मान्य होईल?
"पुढे काय होईल ते मी कसं सांगू शकणार रे? आणि असा काय फरक पडतो त्याने?"
"मला नाही वाटत पाकीस्तान झालं तर आपण सुखाने इथे राहू शकू असं! अद्याप पाकीस्तानचा पत्ता नाही तरी हिंदू आणि शीखांविरुद्ध लोकांना भडकवण्याचे उद्योग सुरु झालेत. उद्या खरच पाकीस्तान अस्तित्वात आलं तर काय होईल कोणास ठाऊक? कदाचित आपल्याला इथून जावंही लागेल!"
"असं बघ आदित्य," केशवराव समजावणीच्या सुरात म्हणाले, "गेली वीस-पंचवीस वर्ष आपण सिंध आणि पंजाबातच राहतो आहोत. आपल्यासारखो हजारो-लाखो हिंदू आणि शीख आहेत. अनेकांचे इथल्या मुसलमान लोकांशी जवळचे संबंध निर्माण झाले आहेत. उद्या पाकीस्तान झालंच तरी ते आपल्याला इथून हाकलून देतील असं मला तरी वाटत नाही!"

आदित्यला वडिलांच्या प्रचंड आशावादाचं आश्चर्य वाटलं. पाकीस्तानची घोषणा होण्यापूर्वीच आणि अस्तित्वात येण्यापूर्वीच निर्माण झालेला उन्माद तो पाहत होता. खरोखरचं पाकीस्तान अस्तित्वात आलं आणि याच विखारी नेत्यांच्या हाती सत्ता एकवटली तर हिंदू आणि शीख देशोधडीला लागतील याची त्याला पक्की खात्री वाटत होती
आदित्यला वडिलांच्या प्रचंड आशावादाचं आश्चर्य वाटलं. आदल्या वर्षीच १६ ऑगस्टला मुस्लीम लीगने कलकत्त्याला डायरेक्ट अ‍ॅक्शन डे पुकारला होता. हा दिवस प्रत्यक्षात साजरा झाला तो हिंदू आणि मुसलमान दोन्ही धर्मियांनी परस्परांच्या केलेल्या निर्घृण कत्तलींनी! कलकत्त्यात या एकाच दिवशी सहा हजारावर माणसं प्राणाला मुकली. या कत्तलींचा उद्देश काय होता? जनाब महमंदअली जिन्हांना ब्रिटीशांना आपल्या सामर्थ्याचं दर्शन घडवून आणायचं होतं! असंख्य इमारतींना आगी लावण्यात आल्या. लाखो रुपयांचं नुकसान झालं कलकत्त्याची हुगळी नदी रक्ताने लालेलाल झाली. आणि जनाब जिन्हांनी मुंबईत बसून दर्पोक्ती केली,

"हिंदू काँग्रेसला युद्धाची खुमखुमी असेल तर मुस्लीम लीगची तयारी आहे! आम्ही एकतर हिंदुस्तानची फाळणी तरी घडवून आणू नाहीतर उभा हिंदुस्तान बरबाद झालेला आमच्या डोळ्यांनी पाहू!"

शहरातील वातावरण दिवसेदिवस तंग होत चाललं होतं. मुसलमान पुढार्‍यांची भडकाऊ भाषणं आणि घोषणा आगीत तेल ओतण्याचंच काम करत होत्या. जे काही थोडेफार सुसंस्कृत आणि डोकं ठिकाणावर असलेले मुसलमान होते, त्यांना ह्या सगळ्याचा उबग आला होता. पाकीस्तानची घोषणा होण्यापूर्वीच आणि ते अस्तित्वात येण्यापूर्वीच निर्माण झालेला उन्माद पाहता, खरोखरचं पाकीस्तान अस्तित्वात आलं आणि याच विखारी नेत्यांच्या हाती सत्ता एकवटली तर हिंदू आणि शीख देशोधडीला लागतील याची अनेकांना भीती वाटत होती.

अशातच एक दिवस.....

क्रमशः

कथालेख

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

19 Nov 2014 - 10:01 am | विजुभाऊ

अजब आपकी बात है
गनब आपका अंदाज है
कहां कहांसे ढुंढ के लाते हो भई........?

कवितानागेश's picture

19 Nov 2014 - 10:58 am | कवितानागेश

..... वाचतेय

आनन्दा's picture

19 Nov 2014 - 11:17 am | आनन्दा

बूक्मार्क केला आहे. नंतर सावकाश वाचेन. विषय इंटरेस्टिंग वाटतोय.

किसन शिंदे's picture

19 Nov 2014 - 11:32 am | किसन शिंदे

अतिशय उत्कंठावर्धक लिहिलेय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत...

यश राज's picture

19 Nov 2014 - 11:36 am | यश राज

पु भा प्र......

बोका-ए-आझम's picture

19 Nov 2014 - 12:05 pm | बोका-ए-आझम

स्पार्ट्या, फाळणी हा Holocaust एवढाच पण दुर्दैवाने तेवढं लक्ष न दिला गेलेला विषय आहे. सुरूवात तर छानच! पुभाप्र!

खटपट्या's picture

19 Nov 2014 - 12:11 pm | खटपट्या

मस्त सुरवात !!

पु,भा.प्र.

ही बहुतेक "जय महाराष्ट्र - व्हाया गुजरानवाला" सारखी स्टोरी दिसते आहे . सरीताचे घरी कॉलेजला जाते असे सांगुन भलतीकडेच जाणे मात्र खटकले . आजच्या काळातल्या लपुन छपुन संभाजी पार्क , झेड ब्रिज ला जाणारया मुलींच्यात आणी हिच्यात फरक काय ?

अहो सिरुसेरी ती एकटीच जातेय का भेटायला? तो ही जातोय ना?
अन प्रियकराला भेटायला जाण आपल्याच काय जगभराच्या संस्कृतीत रोमँटिक मानल गेलयं. तुम्हाला का बुवा खटकलं ते?

महायुध्दातल्या क्रौर्यकथा चालु आहेतच सध्या मिपावर.त्यात आता फाळणी वेळच्या पण येणार की काय,भयशंकित.

रच्याकने,मस्त जमलाय भाग.पुभाप्र

स्वीत स्वाति's picture

19 Nov 2014 - 3:35 pm | स्वीत स्वाति

पुभाशु

अत्रन्गि पाउस's picture

19 Nov 2014 - 5:41 pm | अत्रन्गि पाउस

puleshu

प्रचेतस's picture

20 Nov 2014 - 8:54 am | प्रचेतस

उत्तम सुरुवात.

छान सुरवात केलीय.

पैसा's picture

23 Nov 2014 - 8:43 pm | पैसा

पुढे काय काय वाचायचं आहे देवजाणे! :(