मॅडम...

फटू's picture
फटू in जनातलं, मनातलं
1 Aug 2008 - 9:44 am

दादर रत्नागिरी सवारी गाडी आपल्याच मस्तीत कोकण रेल्वेच्या सिंगल लाइनवर धावत होती...

गाडी पनवेल स्थानकात शिरली. प्रवाशांचा एकच गलका सुरू झाला. गाडीतल्या प्रवाशांची उतरण्याची तर गाडी बाहेरच्या प्रवाशांची गाडीत चढण्यासाठी एकच धावपळ चालू झाली. या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत असल्यामुळे गाडीच्या दरवाजामध्ये जे काही रणकंदन चालू होतं त्याचं वर्णन शब्दांत करताच येणार नाही. एव्हधं मात्र नक्की की आमची ती कोकणी जनता एकमेकांच्या आया बहीणींना ठेवणीतल्या शब्दांत साद घालत गाडीत चढण्याचा किंवा गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करत होती...

थोड्या वेळानं ती 'कोकण रेल्वे पेशल' चढउतार संपल्यावर 'तीने' हळूच गाडीच्या दारात बाहेरुन डोकावण्याचा प्रयत्न केला. शायनिंग मारण्यासाठी म्हणा किंवा गाडीत जागा नसल्यामुळे म्हणा, गाडीच्या दारात जे "जंटलम्यान" उभे होते त्यांनी तिला लगेच विचारलं, "मॅडम, यायचं आहे का गाडीत ?". तीने मान हलवून होकार देताच त्या सभ्य पुरुषांनी तीला गाडीत चढण्यासाठी जागा करून दिली. हे मात्र आपल्या सभ्य पुरुषांचे विशेष आहे. एखाद्या आजोबा किंवा आजीना नाही मदत करणार हे. पण तरुणी दिसली की तिच्यासाठी पायघडया घालायला हे एका पायावर उभे. (इथे मात्र खरेच काही जण एका पायावर उभे होते... कोकण रेल्वेच्या सौजन्याने...) असो. 'ओह माय गॉड' असं काहीतरी पुटपुटत ती दरवाज्याकडून गाडीच्या आतल्या दिशेनं सरकू लागली. ती हे करत असतानाच अजुन एका बसलेल्या सभ्य पुरुषाचा सभ्यपणा जागृत झाला. त्याने आगंतुकपणे विचारलं, "मॅडम, बसायचं आहे का ?" आताही तीने मान हलवून होकार दिला. आणि 'थँक्यु' असं म्हणत ती त्या आसनावर बसली. आणि आपल्या पाकीटामधून सोनेरी दांडयांचा चश्मा काढून तो नाकावर ठेवत कुठल्यातरी इंग्रजी नियतकालिकात तिने डोकं खुपसलं. (ते नियतकालिक ’फेमिना’ असणार हे जाणकारांस सांगणे न लगे...)

गाडी पेण स्थानकात शीरली. पुन्हा तोच 'कोकण रेल्वे पेशल' चढउतार प्रसंग, चित्रपटाच्या एखाद्या दृश्याच्या पुनचित्रिकरणाप्रमाणे सुरु झाला. पण आता त्या चढ उतारामध्ये अजुन एका गोष्टीची भर पडली होती. ती म्हणजे पेणला गाडीत चढणा‍र्‍या फेरीवाल्यांची. आता या पेणला गाडीत चढणा‍र्‍या फेरीवाल्यांचा महिमा काय वर्णावा महाराजा... हे सगळे पेरीवाले पेणच्या आसपासच्या गावामधले असतात. जवळ जवळ दहा बारा जणांचा गट असतो (काय म्हणालात ? गट म्हणजे काय... अहो असं काय करताय राव. गृप शब्द ऐकला आहे का कधी ? हो ना ? गृप हा शुद्ध मराठी शब्द आहे आणि गट हे त्याचं अशुद्ध किंवा गावठी रूप. असो.) तर हे फेरीवाले गाडीमध्ये खुपच स्वस्तात तुमच्या जिभेचे चोचले पुरवतात. अगदी वडापाव म्हणू नका, भजी म्हणू नका, अहो इतकंच काय घरी जाऊन भाजी बनवायची असेल तर वांगी आणि कारली सुद्धा विकतात हे फेरीवाले. पण ही झाली त्यांची एक बाजू. त्यांची दुसरी बाजू मात्र लय भारी... हे फेरीवाले एकदा पेणला गाडीत चढले की पुर्ण गाडीच्या एका टोकापासुन ते दुस‍र्‍या टोकापर्यंत आपल्याकडे जे काही असेल ते विकण्यासाठी दोन बाजुंच्या आसनामधल्या जागेतून ये जा करतात. हे करत असताना ते किती जणांच्या पायांवर पाय देतात, किती जणांना त्यांच्या डोक्यावरच्या टोपल्याचा प्रसाद मिळतो याची गणती नाही. आणि आपल्या मालाची जाहीरात करण्यासाठी अगदी बेंबीच्या देठापासून ओरडतात. (नाही म्हणायला या त्यांच्या जाहीराती अगदी मजेशीर असतात. म्हणजे असं पाहा, एक वडापाववाला वडापाव विकताना म्हणतो, "घ्या इकडे आणि खा तिकडे". आता बोला.) या "फेरीवाला" प्रकाराचा प्रवाशांना खुप त्रास होतो. पण त्रास होऊन सांगतात कुणाला. कुणा प्रवाशाने काही बोलण्याचा प्रयत्न केलाच तर लगेच हे सगळे फेरीवाले एकत्र होतात आणि त्या प्रवाशावर तोंडसुख घेतात. जणू काही कोकण रेल्वे मधू दंडवतेंनी या फेरीवाल्यांसाठीच कोकणात आणली आहे.

हे असं होतं बघा. मी तुम्हाला सांगत होतो त्या पनवेलला गाडीत चढलेल्या मॅडमबद्दल आणि मध्येच हे "फेरीवाला" पुराण चालू केलं. (कोण म्हटलं रे की माझी तीच औकात आहे...) तर आपल्या या मॅडमचं अगदी तन्मयतेने फेमिना पारायण चालू असताना त्या डब्यात एक छोटा फेरीवाला मुलगा आला. (हो... प्रत्येक गोष्टीला अपवाद असतो तसा या कोकण रेल्वेमधल्या फेरीवाल्यांनाही आहे. वर वर्णन केलेल्या मग्रुर फेरीवाल्यांप्रमाणे या छोट्या मुलासारखे गरीब बिचारे फेरीवालेही कोकण रेल्वेत कधी कधी दिसतात.) तो मुलगा थंड पाण्याच्या बाटल्या विकत होता. त्याच्या डोक्यावरच्या बिस्लेरीच्या खोक्यामधून एक ऍक्वाफ़िना कंपनीची पाण्याची बाटली डोकावत होती. तो मुलगा "घ्या रे गारेगार बिस्लेरी" म्हणत गर्दीतून धक्के खात पुढे सरकत होता. (काय दैवगती असते पाहा... ज्या रेल्वेमधून "झुक झुक झुक झुक आगिनगाडी" म्हणत हसत खेळत प्रवास करायचा त्याच आगिनगाडीमध्ये पोटासाठी पाणी विकण्याची वेळ आली होती.) हा छोटा मुलगा त्या मॅडमच्या बाजूने जात असताना त्या मॅडमनी त्याला थांबवलं.
"कितने का दिया रे एक बॉटल ?" मॅडमनी त्या छोट्याला राष्ट्रभाषेत विचारलं.
"बारा रुपाया" मुलगा बहुतेक चुणचूणीत असावा. त्यानेही "हिंदीत" उत्तर दिलं.
"बारह कैसे रे ? यही बॉटल बाहर मार्केटमें दस रुपयेमें मिलता हैं. फसाता हैं क्या लोगोंको ?" मॅडमचा चेहरा भडकल्यासारखा झाला होता. आणि तो मुलगा ते पाहून अगदी केविलवाणा झाला होता.
"दो रुप्ये का फायदा बाईसायेब". छोट्याने आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.
"हा क्या ? तो फीर नही चाहिये... जा तू."
इतरही बरेच फेरीवाले त्या डब्यात होते. पण त्या छोट्याची बाजू घ्यायला कुणीच आलं नाही. एक तर ते फेरीवाले "मॅडमना" घाबरले असावेत किंवा तो छोटा त्या फेरीवाल्यांच्या गृपमधला नसावा. मॅडमनी हाक मारताच आता एक बाटली विकणार अशी आशा निर्माण झालेला तो छोटा पुढे निघून गेला होता. मॅडमनीही फेमिनामध्ये डोकं खुपसलं होतं.

दादर रत्नागिरी सवारी गाडी आपल्याच मस्तीत कोकण रेल्वेच्या सिंगल लाइनवर धावत होती...

आपलाच (एके काळचा) कोकण रेल्वेचा प्रवासी,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

समाजजीवनमानप्रकटनविचार

प्रतिक्रिया

सुचेल तसं's picture

1 Aug 2008 - 10:12 am | सुचेल तसं

लेख मधेच संपल्यासारखा (अपुर्ण) वाटतोय.......

http://sucheltas.blogspot.com

निसर्ग's picture

1 Aug 2008 - 12:12 pm | निसर्ग

नक्की काय सांगायच आहे ? तेच समजल नाही.
२ फूट वरुन गेला हा लेख.
" DON'T AIM THE TARGET...
....JUST ACHIVE IT "

पद्मश्री चित्रे's picture

1 Aug 2008 - 12:34 pm | पद्मश्री चित्रे

म्हणुन छान आहे..

स्पृहा's picture

1 Aug 2008 - 12:39 pm | स्पृहा

ह्या लेख मधुन नक्की काय सांगायच आहे तेच समजत नाही. लेख अपुर्ण वाटतोय.

पक्या's picture

1 Aug 2008 - 12:53 pm | पक्या

लेख लिहीलाय चांगला.पण अपूर्ण वाटतोय ह्या वरील मताशी सहमत. लेख हलकाफुलका , विनोदी अंगाने जाताना शेवट काहीतरी कारुण्याकडे जाईल असे वाटत होते. पण तसे काही झाले नाही .
मॅडम ची स्टोरी अर्धवट राहील्यासारखी वाटते. लेख वाचताना चांगली लिंक लागली होती ती लेखाच्या शेवटी एकदम तुटली असे वाटले. (की क्रमशः लिहायचे विसरलात? )

विसोबा खेचर's picture

2 Aug 2008 - 1:39 pm | विसोबा खेचर

वरील सर्वांशी सहमत...

बिपिन कार्यकर्ते's picture

2 Aug 2008 - 1:50 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत...

लेखाचे नाव मॅडम, मग तिचे आणि तिच्या गाडीत चढण्याचे वर्णन इ. मुळे अशी अपेक्षा तयार झाली की हा लेख मॅडम बद्दल आहे. पण सांगायचे काहितरी वेगळेच होते म्हणून गल्लत झाली असावी. फटू, मला वाटले तसेच की 'क्रमशः' टाकायचे विसरलास?

बिपिन.

वरद's picture

2 Aug 2008 - 4:51 pm | वरद

वर्णन मस्त आहे पण शेवटी अपूर्ण वाटला (उजेड पडला नाही....)

“to be sure of hitting the target, shoot first and whatever you hit call it the target.”

भडकमकर मास्तर's picture

2 Aug 2008 - 5:34 pm | भडकमकर मास्तर

स्वदेस आठवला... रेल्वे + पाणी + लहान मुलगा
...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Aug 2008 - 7:45 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विनोधी अंगाने लेख चांगला फुलवला होता.
पण मुलावर भडकलेल्या मॅडमना कोणीही शांत केले नाही, हा लेखनाचा शेवट इतक्या सुंदर लेखाला मुळीच शोभला नाही.
लेकीन कोयी बात नही !!! लेखनाची शैली मस्तच, अजून येऊ दे अस्सेच सुरेख लेखन !!!

-दिलीप बिरुटे

जयदिप's picture

2 Sep 2008 - 4:52 pm | जयदिप

सुरुवात तर मस्त केली मात्र अपुरा