लहानांचे दंतोपचार : वारंवार विचारले जाणारे प्रश्न ... भाग दोन - टूथपेस्ट आणि ब्रशिंग

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
26 Jun 2014 - 1:49 pm

लहानांचे दंतोपचार : भाग दोन
दात स्वच्छतेची घरगुती सफ़ाईची उपकरणे ...
टूथपेस्ट आणि ब्रशिंग

या उपकरणांचे साधारणपणे दोन प्रकार असतात. यांत्रिक आणि रासायनिक.
यांत्रिक म्हणजे टूथब्रश , फ़्लॉस आणि इन्टरडेन्टल ब्रश
रासायनिक प्रकार : टूथ पेस्ट्स, जेल, मलमे, माउथवॉश वगैरे.

बर्‍याचदा रुग्णांची डेन्टिस्टकडून आग्रहाची अपेक्षा असते की डेन्टिस्टने त्यांना असे काही औषध / गोळी / मलम / रसायन द्यावे की ज्यायोगे दात कुठल्याही यांत्रिक उपकरणाने स्वच्छ करायची गरजच राहणार नाही, कधीच कीड लागणार नाही आणि सर्व त्रास संपेल. पण हे दुर्दैवाने शक्य नाही. खड्डा पडलेल्या इनॅमल आणि डेन्टिनला पुनरुत्पादनाची शक्ती नाही. तसे असते तर असे औषध मेडिकल शॉपमधून घेऊन सर्वांनाच आपले दात परत बनवता आले असते.
( दंतक्षयाची लस caries vaccine ही संकल्पना अजून तरी संशोधनाच्या पातळीवरच आहे. स्टेमसेल संशोधन सुद्धा दात पुन्हा बनवू शकेल, असा दावा गॉथेनबर्ग , स्वीडन किंवा इस्तंबूल , टर्की इथल्या अमुकढमुक संशोधकांनी केला असे गेली अनेक वर्षे जर्नल बिर्नल मधून वाचायला मिळते, त्यापुढे काय? असो... माझा एक इन्जिनियर मित्र म्हणतो की त्याच्या कॉन्स्पिरसी थियरीप्रमाणे डेन्टल इन्डस्ट्रीवाल्यांनी हे स्टेम सेल संशोधन दाबून ठेवले आहे इ.इ. तेही असो .. सध्या तरी घरगुती ब्रशिंग फ़्लॉसिन्गला आणि दात किडल्यावर डेन्टिस्टला पर्याय नाही )

कोणत्याही रसायनांपेक्षा यांत्रिक स्वच्छता महत्त्वाची.

म्हणजे कॅविटी असलेला दात परत आपोआप भरत नाही हे ठरले.
आता हे एक लक्षात घेतले पाहिजे की दात स्वच्छ करताना रासायनिक उपायांपेक्षा यांत्रिक उपाय अधिक महत्त्वाचे. डॉक्टर एखादी भारीतली पेस्ट सांगा असे कोणी वि़चारले की मी लगेच विचारतो की ब्रश किती वेळा करता आणि कसे करता हे जास्त महत्त्वाचे आहे. आदर्श ब्रशिंग आणि फ़्लॉसिंग केले तर पेस्ट कोणतीही वापरा, फ़ारसा फ़रक पडत नाही. ( मी तुम्हाला दहा प्रकारच्या पेस्ट्स लिहून देईन पण ब्रशिंग चांगले न करता पेस्ट्स बदलत राहण्यात काही अर्थ नाही. मग काही मज्जेदार रुग्ण त्यांची मल्टिलेवल मार्केटिंगची सातशे रुपयांची भारी पेस्ट ते कशी वापरतात, ते सांगतात आणि माझ्यावर “ ती पेस्ट तुम्ही वापरा” असे सांगत त्यांचे मार्केटिंगचे मर्यादित कौशल्य ( !!) आजमावतात. मग “इतकी भारीतली पेस्ट वापरून सुद्धा तुमचे दात हे असे कसे ?” असा विचारायचा आसुरी आनंद मी घेतो ,ते असोच.)

आणखी एक म्हणजे बोटाने दात स्वच्छ करणे शक्य नाही. पावडर अजिबात वापरू नका. ही पावडरच दातांच्या आणि हिरड्यांच्या फ़टीत अडकून राहते. त्याभोवती अन्नकण अडकून राहतात आणि हिरड्या खराब होतात.

जेवल्यावर चुळा भरणे महत्त्वाचे आहेच पण गोड चिकट पदार्थ ( चॉकलेट्स, मिठाई) खाल्ल्यावर केवळ चुळा भरणे पुरेसे नाही तर दाताच्या फ़िशर्समध्ये अडकलेले चिकट पदार्थ ब्रश फ़िरवून पूर्ण काढणे अधिक महत्त्वाचे आहे. रोज फ़्लॉस केलात तर फ़ारच उत्तम. दोन दातांच्या मधले अडकलेले छोटे अन्नकण फ़्लॉस सहज काढतो. फ़टी असल्यास माउथवॉशमध्ये बुडवून इन्टरडेन्टल ब्रश वापरा पण प्लाक आणि अन्नकण काढा.
floss

interdental brush

ब्रशिंगची योग्य पद्धत :
brushing
मुलायम ब्रश, फ़िंगर ग्रिप , ( मुठीत पकडलेला ब्रश ताकद लावून चुकीच्या पद्धतीने आडवा फ़िरवला जातो, अनेक वर्षे ही प्रेशर ब्रशिंगची सवय राहिली तर दातांना खाचा पडतात) योग्य पद्धत म्हणजे दातांवर वरून खाली आणि खालून वर अशा पद्धतीने उभे ( वर्टिकल) ब्रशिंग किंवा गोल गोल ( सर्क्युलर) ब्रशिंग करणे, दाताच्या आणि दाढांच्या सर्व पृष्ठभागावरून ब्रश वर दिलेल्या दिशेने फ़िरवणे आणि दीड दोन मिनिटांत ब्रशिंग संपवणे पुरेसे असते.

काही लोकांना ब्रशिंग करणे अजिबातच आवडत नाही तर काही लोक अत्यंत हिंसक पद्धतीने ब्रश करतात. हे लोक अभिमानाने सांगतात की ते अर्धा अर्धा तास हार्ड ब्रशने ताकद लावून ब्रशिंग करतात आणि दर आठवड्याला ब्रश चे धागे वाकडे करतात आणि ब्रश बदलतात. त्यांच्या उपदाढा आणि पहिल्या दाढांचे नेहमी इनॅमल झिजलेले असते आणि मुळापाशी मोठ्या खाचा पडलेल्या असतात आणि दात सळसळ करायला लागलेले असतात. या सेन्सिटिविटीचे कारण न समजल्याने असे रुग्ण अजून जोरदार ब्रश करतात. असे हिंसक ब्रशिंग घातक असते. ब्रश साधारणपणे पाच सहा महिने तरी पुरला पाहिजे.
abrasion

( या हिंसक ब्रशवाल्यांना ब्रशिंगची योग्य पद्धत समजावून सांगताना काळजी घ्यावी लागते कारण एकदा त्यांच्या हे लक्षात आले की प्रेशर ब्रशिंगमुळे दाताला खाचा पडतात, दात सेन्सिटिव होतात तर ते अचानक आता ब्रशच बंद करतो आणि बोटाने दात घासतो असे म्हणायला लागतात. यांना पुन्हा पुन्हा सांगावे लागते की प्रेशरब्रशिंगने दाताला खाचा पडतात याचा अर्थ असा नव्हे की ब्रशिंगच बंद करा...योग्य पद्धतीने केलेल्या टूथब्रशला पर्याय नाही. )
योग्य ब्रशिंगचे यूट्यूबवरती पुष्कळ विडियो उपलब्ध आहेत. ते पहावेत, लहान मुलांनाही दाखवावेत. डेन्टल फ़्लॉसचा धागा दोन दातांच्या मधल्या भागातून कसा फ़िरवावा, हे आपल्या डेन्टिस्टकडून शिकून घ्यावे किंवा यूट्यूब आहेच.

टूथपेस्टच्या जाहिराती ... या जाहिराती खोटेनाटे अत्युच्च दावे करत असतात असे माझे वैयक्तिक मत आहे. पो्टासाठी त्यांनाही जाहिराती करायच्या आहेत, हे समजते पण जाहिरात अनेकवेळा दिशाभूल करणारी असते.
पेस्ट केल्यापासून बारा तास सुरक्षा हे एक भंपक प्रकरण आहे. एखाद्या रसायनाने दातावर वाढलेल्या जीवाणूंना अटकाव होतो, हे समजा संशोधनाने सिद्ध झाले असेल तर जाहिरात मात्र अशी असते की तेच रसायन असलेली ही पेस्ट वापरून तुम्ही बारा तास काहीही चॉकलेट्स खाल्लीत तरी दातांना काहीही होणार नाही. हे सरळ दिशाभूल करणे आहे. शिवाय कोणता डेन्टिस्ट असा हातात एक आरसा किंवा काय ते उपकरण धरून तोंडातले जर्म्स / किटाणू ( हा एक जाहिरात वाल्यांचा आवडता शब्द) बघतो ते मला माहिती नाही.
तुमच्या पेस्टमध्ये मीठ आहे का, इ.इ. तर फ़ारच भंपक. असो.. या जाहिराती तारतम्य बाळगून बघाव्यात आणि साजिद खानचा सिनेमा पाहतो तशा बघून सोडून द्याव्यात. चिडून त्यांच्याशी भांडायला जाऊ नये.

आता थोडक्यात पुन्हा ...
दाताला खड्डा पडला की त्यानंतर त्या दातासाठी अधिक ब्रशिंगचा उपयोग नाही, डेन्टिस्टला भेटणे आवश्यक.
ब्रशिंग फ़्लॉसिंग हे पेस्ट आणि माउथवॉशपेक्षा अधिक महत्त्वाचे.
बोट आणि पावडर नको.
दिवसातून किमान दोनदा थोडीशी पेस्ट लावून. ( ब्रश भरून पेस्टची गरज नसते)
ब्रश : मुलायम, हलक्या हाताने, बोटांत पकडून, वर्टिकल / सर्क्युलर हालचाल, सर्व पृष्ठभागांवरून दीड दोन मिनिटे ब्रशिंग

Happy Brushing !!!

पूर्वप्रसिद्धी फेसबुक पानावरती
https://www.facebook.com/joglekardental?ref=hl&ref_type=bookmark

जीवनमानराहणीऔषधोपचारविचारसल्लामाहिती

प्रतिक्रिया

आयुर्हित's picture

26 Jun 2014 - 2:12 pm | आयुर्हित

टूथपेस्टच्या जाहिरातींबद्दल स्पष्ट मत मांडल्याबद्दल मनापासुन धन्यवाद.
अतिशय उपयुक्त लेख!

सेन्सिटिविटीचे अजुन इतर कारणे काय असू शकतात?

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2014 - 2:37 pm | भडकमकर मास्तर

दाताची झीज होऊन डेन्टीन उघडे पडणे आणि दाताला गार, गरमच्या कळा लागणे, किंवा दात सळसळ करणे म्हणजे सेन्सिटिविटी.

सेन्सिटिविटी/ दाताची झीज होण्याची महत्त्वाची कारणे :
~एब्रेजन ( यांत्रिक घासले जाऊन) : चुकीची प्रेशर ब्रशिंग पद्धती, आणि
झोपेत दात खाणारी ( क्लेन्चिंग किंवा ब्रुक्सिझमचा त्रास असणारी) किंवा अति कठीण पदार्थ सतत चावणारी मंडळी, यांचे उतार वयात दात आणि दाढ प्रचंड झिजतात आणि सेन्सिटिव होतात.

इरोजन ( रसायनांमुळे) : १. आम्लपित्ताचा खूप त्रास असणार्‍यांच्या पोटातून सतत अ‍ॅसिड तोंदात येत राहते आणि ते दाढांवर साठून राहते.
erosion

किंवा लिंबे आणि लिंबूवर्गीय फळे अति खाल्ल्याने त्यातली आम्ले दातावर साठून राहतात, दात झिजतात आणि सेन्सिटिव होतात.

उपाय : मोठ्या झिजलेल्या खड्ड्यांना फिलिंग करता येते किंवा कॅप बसवता येते.
माफक सेन्सिटिविटी असेल तर सेन्सिटिविटीच्या पेस्ट्स वापराव्या लागतात.

आयुर्हित's picture

26 Jun 2014 - 3:10 pm | आयुर्हित

खरे आहे.
याव्यतिरिक्त सेन्सिटिविटीचे अजुन इतर कारणे काय असू शकतात?

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2014 - 3:36 pm | भडकमकर मास्तर

खरे आहे. याव्यतिरिक्तही सेन्सिटिविटीची कारणे असू शकतात.

अनुप ढेरे's picture

26 Jun 2014 - 2:13 pm | अनुप ढेरे

वा. उपयोगी!

अजया's picture

26 Jun 2014 - 2:17 pm | अजया

महागडे ब्रश आणि पेस्ट लिहुन मागणार्‍या लोकांना मी एक घरातले उदाहरण देते, तुम्ही एक्दम चकाचक इम्पोर्टेड झाडू आणलाय किंवा फ्लोअर क्लिनर आणलय पण जर तो झाडू तुम्ही घराच्या सर्व कानाकोपर्‍यातून नाही फिरवला तर झाडू न फिरवलेला भाग खराब होणारच ! साधनाचा बाऊ फार आणि साध्य दूर असा काहिसा प्रकार !!

भडकमकर मास्तर's picture

26 Jun 2014 - 2:21 pm | भडकमकर मास्तर

:) अगदी अगदी ...
मी विचारतो , " खोली झाडणार नाही पण नुसतेच फिनेल टाकणार, असे चालेल का ? नाही ना? हे तसेच आहे. एकदा सगळे घर चकाचक कानाकोपर्‍यातून झाडून काढा , मग काय रसायने, क्लीनर, फिनेल वापरायचे ते वापरा "

मधुरा देशपांडे's picture

26 Jun 2014 - 2:44 pm | मधुरा देशपांडे

अतिशय उपयुक्त लेखमाला. धन्यवाद.

एस's picture

26 Jun 2014 - 4:27 pm | एस

धन्यवाद.

रेवती's picture

26 Jun 2014 - 3:17 pm | रेवती

धन्यवाद.

ऋषिकेश's picture

26 Jun 2014 - 5:00 pm | ऋषिकेश

उत्तम. आता दरवेळी आभार म्हणण्यापेक्षा शेवटी एकदाच आभारप्रदर्शन करेन :) ;)

'लिस्टरीन'सम माऊथवॉथ रिंझिंग कितीवेळा व नक्की किती प्रमाणात करावे? काँन्सट्रेटेड असते त्याला किती डायल्युट करावे?
अतिवापराने वा योग्य डायल्युट न केल्याने काही अपाय होतो का?

इनिगोय's picture

26 Jun 2014 - 10:56 pm | इनिगोय

वाचत आहे.
ब्रशला पर्याय नाही असं तुम्ही लिहिलं आहे. तसंच पावडर वापरू नका हेही. माझे वडील साठाव्या वर्षी दररोज सकाळी विको पावडर वापरून बोटाने आणि रात्री टूथपेस्टने दात घासतात. दोनेक रूट कॅनाल वगळता अद्यापही दात उत्तम आहेत.
तेव्हा पावडर वापरून/ब्रशशिवाय दात स्वच्छ करण्याचीही काही योग्य पद्धत असू शकेल का?

भडकमकर मास्तर's picture

27 Jun 2014 - 10:44 am | भडकमकर मास्तर

गेल्या लेखात सांगितल्याप्रमाणे मागच्या पिढीतल्या लोकांच्या दातांना आजच्या मुलांच्या दातांपेक्षा कीड कमीच लागते का, चे उत्तर पहा .. पेस्ट आणि ब्रशने त्यांचे दात अधिक बरे राहिले असते असे माझे मत आहे.
( पण त्यांचे दात पावडर वापरून बरे राहिले म्हणून लहान मुलांचे दात पावडरने बरे टिकतील असे नाही कारण आहारात प्रचंड फरक आहे.)
... हिरड्यांच्या आत जाऊन बसलेली पावडर आणि प्लाक बोटाने काढता येत नाही, ब्रशने पुढच्या पृष्ठभागावरचा प्लाक निघतो, फ्लॉसिंगने आणि इन्टरडेन्टल ब्रशने दोन दातांमधला प्लाक निघतो .... पण माझा असा अनुभव आहे की बोटाने पावडर वापरणारे लोक ब्रश वापरा सांगितले की ब्रश हे अत्यंत विषारी किंवा महागडं प्रकरण असल्यासारखं त्या संकल्पनेशी निकराने लढा देत राहतात. " बाकी काहीही करायला सांगा पण ब्रश नको" वगैरे वगैरे...

त्यामुळे दातांची सफाई

पावडर वापरून : माझ्या मते ना ही
ब्रशशिवाय : माझ्या मते ना ही च ना ही

बाकी एखाद्याला खर्च करायचाच असेल तर दात स्वच्छतेचा हा एक प्रकार सांगायचा राहिला ...
सॉनिक एनर्जी वापरून दात स्वच्छ करणारा पॉवर फ्लॉसर
power flosser

साडेतीन हजार रुपयांपर्यन्त मिळतो.. पाण्याचा फवारा तोंडात मारतो वगैरे वगैरे. त्याच्या विविध टिप्स उपलब्ध आहेत. पण हा इथे सर्वांनाच वापरायला सांगण्यात काही अर्थ नाही. ( अर्थात घेणारे घेतात पण बहुसंख्य लोकांना देण्यात अर्थ नाही. )

तोंडात भरपूर इम्प्लांट केलेले रुग्ण, हिरड्यांची सर्जरी झालेले किंवा काही कारणाने ज्यांना ब्रशिंग करणे शक्य नाही, आजारी, इम्युनोकॉम्प्रमाईज्ड वगैरे मंडळींना शिफारस करतात.

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 11:33 am | सुबोध खरे

इनिगोय ताई
मी जसे पहिल्या भागात माझ्या प्रतिसादात लिहिले आहे कि व्यवस्थित दोन वेळा दात घासण्यापासून जे काही शक्य आहे ते मी करत आलो तरीही माझे दात लवकर खराब होतात. तसेच असून सुदैवाने माझ्या बायकोचे आणि मुलांचे होत नाहीत. याचे कारण आपल्या दाताचे आरोग्य मुळातून कसे आहे यावर आपले नियंत्रण नसते. श्री विन्स्टन चर्चिल दारू /सिगार वर्षानुवर्षे पिऊनही नव्वदीच्या दशकापर्यंत पोहोचले म्हणून एखादा माणूस तसेच करू लागला तर पन्नाशीतच गोवर्या मोजायला लागतील.
तशीच परिस्थिती आपल्या वडिलांच्या दातांची असावी. म्हणून आपण तसे राहिलात तर आपले दात तितके उत्तम राहतील असे नाही.
त्यामुळे अशी उदाहरणे सर्वसामान्य माणसाना अपवाद म्हणूनच दाखवावी लागतील.
आंधळी माणसे सुरळीतपणे रस्ता पार करतातच म्हणून आपण डोळे मिटून रस्ता पार करणे कितपत व्यवहार्य आहे?

सुबोध खरे's picture

27 Jun 2014 - 11:25 am | सुबोध खरे

मास्तर,
विको वज्रदंती वापरल्याने दाताचे इनामाल झिजून गेल्याचे बरेच रुग्ण पाहण्यात येतात असे मुंबईच्या नायर रुग्णालयातून कळले. दात साफ होण्यासाठी त्यात वापरलेली तत्वे जास्त कठीण असल्याने असे होते असे कळले.( दुर्दैवाने आयुर्वेदिक उत्पादनांवर कोणतेच निर्बंध नाहीत यामुळे त्यावर काही करता येत नाही) आपला अनुभव काय आहे या बाबत?

भडकमकर मास्तर's picture

27 Jun 2014 - 11:37 am | भडकमकर मास्तर

मंजन, पावडर यातील अ‍ॅब्रेजिव्ज ( घर्षण करून स्वच्छ करणारे खरखरीत कण) हानिकारक असतात ... त्यामुळे दात झिजू शकतात पण माझ्या मते पेशंटची दाब देऊन अधिक काळ पावडर घासायची सवय असेल तर झीज नक्कीच होणार... पण बोटाने थोडा काळ पावडर करणार्‍यांची दाताची झीज तितकी होणार नाही जितकी खरखरीत मंजन आणि ब्रशच्या खूप वेळ केलेल्या प्रेशर ब्रशिंगमुळे होईल....

माझ्या मते ( माझ्याकडे विदा नाही) विकोच वापरायची तर विको पेस्ट वापरा, पावडर नको.

आमच्या फॅमिली डॉक्टरांनी विविध लेख वगैरे दाखवून आमच्या लेकीच्या दातांसाठी दोन गोष्टी सांगितल्या होत्या. एक म्हण्जे तिचे दात तिच्या आईनेच घासायचे, आंणि ती चौथी पास झाली की तिचं प्रगतीपुस्तक त्यांना दाखवून, मगच तिचे तिला दात घासू द्यायचे. तोपर्यंत ते काम आमचं.

आणि दुसरी गोष्ट तिच्या नखं खाण्यासंदर्भात होती, ती काय ते नक्की आता आठवत नाही. काहीतरी भीती (का नखं खातात) वगैरे संदर्भात होती. पण ते कसं बंद करावं आणि मुळात का टाळावं - जरा पुढच्या भागांमध्ये काही यावरही सांगता आलं तर बघा ही विनंती.....

पैसा's picture

29 Jun 2014 - 12:02 am | पैसा

अतिशय उपयुक्त माहिती.

पाषाणभेद's picture

29 Jun 2014 - 5:04 pm | पाषाणभेद

धन्यवाद मास्तर.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

29 Jun 2014 - 5:33 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मास्तर लेखमाला वाचतोय.

-दिलीप बिरुटे