अ‍ॅकलेशिया कार्डिया-३ - सुटका

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
21 Jun 2014 - 1:16 pm

http://www.misalpav.com/node/27881

http://www.misalpav.com/node/27905

लिक्विड डाएट वर घरी पाठवल्यावर आपण यावर चार आठवडे कसे काढणार असे वाटत होते. कारण खालचा अर्धवट घसरलेला स्टेंट अर्धा अन्ननलिकेत आणि अर्धा जठरात लोंबत होता. त्यामुळे जठरावरचा वॉल्व्ह कायमचा उघडाच राहिला होता. काहीही द्रव पदार्थ प्यायला की थोड्याच वेळांत गॅसेस होऊन ते वर येऊ लागत. अर्ध्या तासात ते कमी होत. त्यानंतरच पलंगावर आडवे होता येत असे. रात्रीच्या वेळी तर, दर दोन तासांनी जाग येऊन उठून बसावे लागे आणि दोन घोट पाणी प्यायल्यावर ढेकरा कमी झाल्यावर परत झोपता येत असे. तर अशा तर्‍हेने, चार आठवड्यांनंतर या क्षेत्रांतील एका तज्ञ डॉक्टरची अपॉइंटमेंट मिळाली. त्यांनीही, तुमचे डॉक्टर माझेच विद्यार्थी असून ते तुमची व्यवस्थित काळजी घेतील, असा दिलासा दिला. त्या सर्वांच्या मते, स्टेंटस काढण्यासाठी सहा आठवडे थांबणे जरुरी होते.

अखेर सहा आठवड्यानंतर माझी एक डायनॅमिक सी.टी. स्कॅनची टेस्ट घेण्यात आली. त्यांत, माझी अन्ननलिकेची जखम पूर्ण भरुन आल्याचे निदान झाले. ८ मे पासून स्टेंटपंजरी पडलेला मी, २१ जूनच्या दक्षिणायनाची वाट बघावी लागणार की काय, या चिंतेत होतो. पण १९ जूनच्या दिवशी डॉक्टरांनी माझे स्टेंटस काढायचा निर्णय घेतला. जनरल अ‍ॅनास्तेशिया देऊन सकाळीच माझे दोन्ही स्टेंटस काढण्यात आले. त्यांतही डॉक्टरांच्या कौशल्याची कसोटी लागली असे नंतर कळले. वरचा, नंतर बसवलेला पूर्ण सिलिकोन आच्छादित स्टेंट विनासायास निघाला. पण जठरांत अर्धवट लोंबणारा स्टेंट, हा पूर्णतः कव्हर्ड नव्हता. त्याच्या दोन्ही तोंडाला धारदार मेटलचे धागे उघडेच होते. इतक्या दिवसांत त्यावर टिश्यू ग्रोथ झाली होती. त्यामुळे तो तसाच वर ओढून घेणे शक्य नव्हते. डॉक्टरांच्या टीमने निर्णय घेऊन त्याला तसाच जठरांत ढकलला. तिथे तो पोहू लागला. मग पुन्हा त्याचे एक तोंड धरुन, तो बाहेर काढण्यात आला. या सर्व प्रकारांत, अन्ननलिकेला आतून ओरबाडले जाणे अपरिहार्य होते. पण त्या जखमा ४८ तासांत भरुन येतात. ऑपरेशननंतर दोन तास मला निरिक्षणाखाली ठेवले गेले. त्यानंतर सर्व प्रकारच्या टेस्ट करुन घरी सोडले. पहिले दोन दिवस, औषधे आणि लिक्विड डाएट वरच रहावे लागले. आज पहिल्यांदाच, न्याहारीला भाताची पातळ पेज खाताना बरे वाटले. आता काही दिवस, खिचडी, पातळ डाळभात यावर काढल्यावर मी नियमित अन्न घेऊ शकेन. या सर्व प्रकरणातून आता मी सहीसलामत बाहेर पडलो आहे, असे आता म्हणू शकतो. माझ्या या संकटाच्या काळात, मला प्रत्यक्ष वा फोनवरुन तसेच नेटवरुन तुम्ही सर्वांनी जो धीर दिला त्याबद्दल मी तुम्हा सर्व हितचिंतकांचा कृतज्ञ आहे.

जाता जाता, स्टेंटबद्दल थोडी माहिती. पहिला स्टेंट १२ सेंमी लांब व २.५ सेंमी रुंद होता. दुसरा १० सेंमी लांब व २.५ सेंमी रुंद होता.

Stent
ह्यातला स्वच्छ स्टेंट पूर्ण आच्छादित आहे तर रक्ताळलेला स्टेंट जठरांत पोहून आला आहे.

औषधोपचारअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

कवितानागेश's picture

21 Jun 2014 - 1:26 pm | कवितानागेश

तिमाकाका, आत्ता तुम्हाला ऑनलाईन पाहिल्यावर हेच विचारणार होते, की आता बरे झालात का? :)
आता अकलेच्याकांद्याचा काही प्रॉब्लेम नाही हे बघून बरं वाटलं.

केदार-मिसळपाव's picture

21 Jun 2014 - 1:44 pm | केदार-मिसळपाव

तुमचे अभिनंदन तिमा.

आयुर्हित's picture

21 Jun 2014 - 1:50 pm | आयुर्हित

या सर्व त्रासातुन मुक्तता झाल्याबद्दल सर्वप्रथम आपले अभिनंदन.
आपल्याला यापूढेही चांगले आरोग्य व दिर्घायुष्य लाभो हि परमेश्वराला प्रार्थना.

तुमची यशस्वी सुटका झाल्याचे वाचून बरे वाटले.
काळजी घ्या स्वतःची.
आरोग्यमयी दीर्घायुष्य लाभावे ही प्रार्थना.

यशोधरा's picture

21 Jun 2014 - 2:04 pm | यशोधरा

अभिनंदन! आणि आपल्याला आरोग्यमयी दीर्घायुष्य लाभावे ही सदिच्छा आणि प्रार्थना.

मृत्युन्जय's picture

21 Jun 2014 - 2:44 pm | मृत्युन्जय

अभिनंदन. आता लव्कर खडखडीत बरे होउन कुठल्यातरी कट्ट्याला हजेरी लावुन भरपुर हाणा बरे :)

एस's picture

21 Jun 2014 - 3:44 pm | एस

वेलकम बॅक.

मुक्त विहारि's picture

21 Jun 2014 - 3:19 pm | मुक्त विहारि

आणि

श्रीरंग जोशी, ह्यांच्या बरोबर कट्टा करा.

चौकटराजा's picture

21 Jun 2014 - 5:10 pm | चौकटराजा

तिमाजी साहेब आपण हे सहन केलेतच पण ते मोकळेपणाने व आपली विनोदी वृत्ती न गमावता कथन केलेत हे विशेष . याचबरोबर या वेगळ्याच आजारास अधुनिक शस्त्र चिकित्सा कशी सामोरी जाते याची ही जाता जाता माहिती मिळाली. अलीकडे रीडर्स डायजेस्ट वाचनात नाही. पण आपल्या निवेदनाने त्याचे एक पान वाचल्याचे समाधान मिळाले. व आपण बरे झालात हे दुसरे समाधान ! आपण हा किल्ला लढवलात खरोखरच " तिमाजीअप्पा" असेच म्हणावयास हवे.

असंका's picture

22 Jun 2014 - 2:09 pm | असंका

+1
अगदी खरं आहे. एवढा त्रास होत असतानाही सगळ्यांना ही महत्वपूर्ण माहिती दिलीत!
आपल्या उत्साहाला सलाम!

अरे वा! बरे झालात ना! अभिनंदन!

डॉ सुहास म्हात्रे's picture

21 Jun 2014 - 6:05 pm | डॉ सुहास म्हात्रे

समस्येचा यशस्वी उपाय झाल्याबद्दल अभिनंदन !

आणि

दीर्घ आरोग्यपूर्ण जीवनासाठी शुभेछा !!

इन्दुसुता's picture

21 Jun 2014 - 7:11 pm | इन्दुसुता

तिमाजीअप्पा,
अभिनंदन!! आणि दीर्घ आरोग्यपूर्ण जीवनासाठी शुभेछा !!

सस्नेह's picture

21 Jun 2014 - 8:20 pm | सस्नेह

कसलं काय काय सहन केलंत ओ तिमाभाऊ !
आता मात्र भरपूर खादाडी सुरु करा पाहू. खाण्यासाठी भरपूर आरोग्यमय आयुष्य लाभो !

प्यारे१'s picture

22 Jun 2014 - 3:35 pm | प्यारे१

मस्त दिसतोय की स्टेन्ट. ;)

सीरियसली, दीर्घ आयुरारोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

सौंदाळा's picture

23 Jun 2014 - 1:48 pm | सौंदाळा

+१
तिमा,
पुढील निरोगी आयुष्यासाठी शुभेच्छा

बरे झाल्याचा लेख वाचून बरं वाटलं....दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा!! :)

चाणक्य's picture

28 Jun 2014 - 11:43 am | चाणक्य

असेच म्हणतो.

चौराकाकांनी सुचवलेले नाव यथार्थ आहे. All hail तिमाजीअप्पा!!!!

पैसा's picture

26 Jun 2014 - 10:40 pm | पैसा

वाचून बरं वाटलं. तुम्हाला पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा!

तिमा's picture

29 Jun 2014 - 7:24 pm | तिमा

सर्व प्रतिसादकर्त्यांना आणि वाचकांना मनःपूर्वक धन्यवाद!