एक विलक्षण अनुभव

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
25 May 2014 - 12:21 am

आताच दोन आठवड्यापूर्वी जे इ इ मेन चा लागला. मुलाचा निकाल फारसा चांगला आला नाही. तो आय आय टी च्या मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरला. आम्ही सुद्धा दोन दिवस बर्यापैकी निराश होतो. पण यात आपले नैराश्य बाजूला ठेवून मुलाला धीर देण आवश्यक होते त्यामुळे चेहेर्यावर तसे काही दिसू न देता आम्ही त्याला पुढच्या परीक्षांसाठी उत्तेजन देत होतो. तीन चार दिवसात गाडी रुळावर आली.
मुळात आयुष्यात अपयशी होण्याचा मला चांगला अनुभव असल्याने मी जास्त शांत होतो.आणि मी शांतपणे मुलाला जवळ घेऊन सांगितले की तू काही सलमान खान सारखा दारू पिऊन लोकांच्या अंगावर गाडी घालण्यसारखा गुन्हा केलेला नाहीस. जे झाले ते झाले आयुष्यात असे प्रसंग येत राहतात.मुळात त्याने आयुष्यात काय करावे हे त्याचे त्याने ठरवायचे आहे.आईबाप काही आयुष्याला पुरत नाहीत आणि तुम्ही फारतर मुलाला थोडे फार मार्गदर्शन करू शकता.

गमतिची गोष्ट म्हणजे लोकांच्या प्रतिक्रिया इतक्या सुरस आणि चमत्कारिक होत्या की मला आश्चर्यच वाटले.
१) तुम्ही दोघे डॉक्टर असून मुलाला इतके कमी मार्क कसे मिळाले?.
२) आता मुलाचे कसे होणार?
३) त्याला इंजिनियरिंग झेपणार नाही त्याला बी एस सी ला टाका
४) तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे. भरपूर डोनेशन भरून प्रवेश घ्या.
५) त्याला परत बारावीला बसावा
गमतीची गोष्ट हीच आहे कि लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. हा सल्ला दिल्यावर त्याचा परिणाम काय होईल याचा जरासुद्धा विचार न करता ते बोलत होते.
जे जवळचे मित्र होते त्यांनी फार मोलाचे सल्ले दिले. सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझ्या वडिलांनी दिला.जेंव्हा मी त्यांना म्हटले कि लोक सांगत आहेत कि त्याला अभियांत्रिकी झेपेल का ते पहा. त्यांनी एकच सांगितले कि तो इंजिनियर झाल्यावर त्या विषयातच काम करेल असे आज कसे सांगता येईल? जर त्याने उद्या व्यवस्थापन विषय घेतला ( एम बी ए किंवा तत्सम केले) किंवा एखाद्या व्यवसायात शिरला तर त्याला बारावीत किंवा अभियांत्रिकीत किती गुण आहेत त्याचा तो पुढे काय करणार आहे याच्याशी काय संबंध असेल. त्याला अभियांत्रिकीत किती गुण आहेत या पेक्षा त्याला अभियांत्रिकीचे मुलभूत ज्ञान आहे एवढे बस आहे. जर तो सॉफ्टवेअर मध्ये गेला तरीही तो मेकानिकल अभियांत्रिकीच्या ज्ञानच शून्य वापर करेल आणि जर त्याने एम टेक वाहन( ऑटोमोबाइल) किंवा वैमान शास्त्र (एरोनौटीक्स) या विषयात केले तर त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे? एका परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले म्हणून आयुष्यात काहीही फरक पडत नाही.
आमच्या वडिलांनी जमनालाल बजाज येथून व्यवस्थापनाची पदविका घेतलेली आहेत. हे वाचून मला खूप हुरूप आला.
मी इतके दिवस जो विचार करीत होतो त्याला वडिलांचाचआधार मिळतो आहे हे पाहून मला बरे वाटले.माझे एक मत मी पुष्कळ वेळा व्यक्त केले आहे कि शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.
मी जेंव्हा इतर बर्याच लोकांशी बोललो तेंव्हा अशी बरीच पोळलेली माणसे मला भेटली ज्यांनी स्वतः किंवा त्यांच्या मुलांना उज्ज्वल यश मिळालेले नव्हते आणि त्या सर्वांनी मला हेच सांगितले.
मुळात माझ्या मुलाने जेवढे प्रयत्न करायला पाहिजे होते तेवढे केलेले नव्हते हे मला स्वतःला माहित होते. त्याला आम्ही एक वर्ष अगोदर शाळेत टाकले असल्याने त्याला आपण अभ्यास करावा असा परिपक्व पणा( maturity ) आलेलाच नाही. हे अर्थात समर्थन होऊ शकत नाही हे मलाही माहित आहे कारण काही मुले त्याच्याच सारखी कमी वयाची आहेत आणि त्यांनी व्यवस्थित अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवले. पण प्रत्येक मुल वेगळे असते हे मला माहित आहे.
माझ्या मुलाच्या मित्रांपैकी काही खरच हुशार असलेली मुले या परीक्षात फारशी चमकू शकली नाहीत अशा काही मुलांच्या घरात एखादा मृत्यू झाला असावा अशी अवकळा पसरली होती. एक मुलगा भिंतीवर डोके आपटून घेऊ लागला. या मुलाच्या बापाचे वजन कमी झाले म्हणून त्याच्या बायकोने त्याला माझ्याकडे पाठविले तेंव्हा मला असे लक्षात आले कि बाप सुद्धा अत्यंत तणावाखाली आहे. त्याला पाहते ४ वाजता जाग येते आणि नंतर झोपच लागत नाही. हे दोघे आईबाप स्वतः अभियंते आहेत.
एका आईने सांगितले कि BITS( बिर्ला इन्स्टीट्युट) ची परीक्षा होई पर्यंत मी थांबले आहे. ती झाल्यावर मुलीच्या दोन मुस्कटात मारणार आहे. एवढ्या सगळ्या सुखसोयी देऊनही परीक्षेत हा निकाल कसा मिळू शकतो हेच मला कळत नाही? या बाई स्वतः आर्किटेक्ट आहेत.या बाईना मी एकच सांगितले कि तुमची मुलगी एखाद्या पान्वाल्याचा हात धरून पळून गेली असती तर? तिला एका परीक्षेत कमी गुण मिळाले तर एवढे अकांड तांडव कशासाठी? जर सुख सोयी किंवा सुविधा दिल्या तर गुण मिळत असते तर अंबानींची मुले आय आय टी मध्ये पहिल्या दहात आली असती.
या दोन्ही आईबापाना मी विश्लेषण करून सांगितले कि एक गोष्ट फार महत्त्वाची आहे कि आपल्या मुलाचे शैक्षणिक यश हा आपण प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत आहात. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. हे त्यांना पचवणे फार जड गेले.
हि गोष्ट मी मुळात मान्य केली असल्याने (माझी प्रतिष्ठा माझ्या मुलांच्या शैक्षणिक यशावर मुळीच अवलंबून नाही हे मी मुलांना पहिल्यापासून सांगत आलो आहे) तूमच्या मुलाला कमी गुण कसे मिळाले यावर मी शांतपणे त्यांना सांगितले कि अहो तो ढ आहे काय करणार?
अशा कितीतरी घरात मी सुतकी वातावरण बघत आहे जेथे मुलाला चांगले गुण मिळालेले नाहीत. किंवा मुलाने काहीतरी गंभीर गुन्हा केला असल्यासारखे आई बाप त्यांना वागवत आहेत. मुळात आय आय टी मध्ये १४ लाख मुलांपैकी केवळ २००० मुलांना आपल्या आवडीचा विषय मिळतो बाकी दोन ते तीन हजार मुले आवडीचा विषय मिळाला नाही तरी आय आय टीच्या शिक्क्यासाठी तेथे मिळेल तो विषय शिकत असतात. मग आय आय टी मध्ये प्रवेश मिळाला नाही तर आयुष्य फुकट गेले असे लोकांना का वाटत राहते?
आज प्रत्त्येक बस, रेल्वे गाडी, ट्रक वर आय आय टी किंवा वैद्यकीय परीक्षेच्या क्लास ची जाहिरात दिसत आहे. हा स्वप्नांचा बाजार मुलांना कुठे घेऊन जाणार आहे ? कोटा येथे किंवा नारायण इन्स्टीटयुट हैद्राबाद किंवा फिट जी किंवा टाईम अकादमी येथे मुलांना आठवीपासून सकाळी आठ ते रात्री दहा पर्यंत पूर्ण वेळ आय आय टी च्या क्लास साठी जुंपले जाते. ( आता हेच क्लास सहावी पासून चालू होणार अशी जाहिरात पाहिली) म्हणजे मुलांना तेराव्या वर्षापासून आईबाप या चक्रात ढकलत असतात पाच वर्षे ढोर मेहनत करून शेवटी हातात एक डिग्री पडेल किंवा न पडेल पण त्यात मुलांचे कोवळे वय मात्र नक्कीच नसून चालले आहे.
मी माझ्या मुलाला सांगितले होते किया अभियांत्रिकीत तुला प्रवेश नक्की मिळेल पण तुला नक्की काय व्हायचे आहे हे तुला ठरवावे लागेल.पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कैमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल. एकदा नोकरीला लागला कि माणूस त्या चरकात पिळून निघतो मग थोडे थांबून सिंहावलोकन करायचे असेल तर त्याला उसंत मिळत नाही. ( मी सहा महिने सुट्टी ( चार महिने भरपगारी आणि दोन महिने अर्ध पगारी) घेऊन कोणताही आजार नसताना नुसते घरी बसून काढले आहेत त्यामुळे त्याची किंमत किती अमुल्य आहे हे मला पूर्ण माहिती आहे.

जाता जाता -- माझी पत्नी पुण्यातील एका प्रथितयश खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया काय आहे ते जाणण्यासाठी जाऊन आली होती तेथे तिला एक कागद भरून दिला. आणि तेथे आम्ही दोघे डॉक्टर आहेत हे पाहून त्यांनी सतरा लाख रुपये रोख असा दर सांगितला यातील अर्धे पुढच्या चार दिवसात आणून द्या. गम्मत म्हणजे बारावीचा निकाल अजून लागलेलाच नाही. यावर तिने त्यांना विचारले कि तुमच्याकडे अभियांत्रिकी केल्यावर "प्लेसमेंट" कितीची मिळते त्यावर ते म्हणाले कि चार लाख वार्षिक. यावर मी शांतपणे पत्नीला म्हटले कि मुलाला जेथे मिळेल तेथे प्रवेश घेऊ. चार वर्षे मुलगा घरी बसला तरी चालेल एक लाख रुपये तरीही वाचतील(व्याज वेगळे). विस्तारभयास्तव येथेच थांबतो.

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

संजय क्षीरसागर's picture

28 May 2014 - 11:32 am | संजय क्षीरसागर

त्याला आता फक्त योग्य ट्रॅक हवायं.

प्रभू सरांच्या निस्पृहापणाला प्रथम दाद देतो. त्यांनी कोणता मार्ग सांगितला याची कल्पना नाही पण माझ्या भाच्यानं पॉलिटेक्निकमधून (GPP) मेकॅनिकल डिप्लोमाकरुन नंतर डिग्री घेतली. त्याला कॅम्पसमधेच L & T त नोकरी मिळाली. स्पर्धा परीक्ष्यांची जीवघेणी अनिश्चितता टाळून अ लिटील लेट बट थेट असा तो मार्ग आहे. भाच्यानं आधीच ठरवल्यानं दहावीनंतरच डिप्लोमा केला त्यामुळे बारावी आणि स्पर्धापरीक्षा या दोन्ही गोष्टींना फाटा मिळाला. तुमच्या मुलाची बारावी झाली असली तरी एकीकडे डिप्लोमाला प्रवेश घेऊन त्या बरोबर स्पर्धापरीक्षा देणं योग्य होईल. त्यानं त्याच्या आवडीप्रमाणं मेकॅनीकल इंजीनिअरींग करणं हेच श्रेयस आहे. पुढचा स्कोप वगैरे विचार आता करण्यात अर्थ नाही त्यामुळे निष्कारण दिशा भरकटेल आणि ज्यात त्याचा रस आहे त्यात तो निश्चित प्रगती करेल यात वाद नाही.

प्यारे१'s picture

28 May 2014 - 12:52 pm | प्यारे१

@ खरे सर,
वर आपण प्रतिसादामध्ये लिहीलंय की मुलाला मेकॅनिकल अथवा सिव्हील इंजिनिअरींगमध्ये जायचंय. त्याला त्या क्षेत्रांबद्दल नेमकी किती माहिती आहे? नेमकंपणा नं काय करायचं आहे ?

रंगांमधल्या बेसिक कलर्स प्रमाणं सिव्हील, मेकॅनिकल, इलेक्ट्रीकल ही बेसिक इंजिनिअरींग फील्ड्स आहेत. (सगळ्यात जुन्या कॉलेजेसमधल्या सगळ्यात जुन्या ह्याच ब्रँचेस आहेत आणि ते साहजिक देखील आहे.)

आज सिव्हील अथवा कन्स्ट्रक्शन फील्ड मधल्या पगारांबाबत विचार करता हे पगार आयटी अथवा संगणक अभियांत्रिकी च्या समान पातळीवर अथवा क्वचित वरचढ देखील आहेत. (करेक्ट मी इफ आय एम राँग) मी स्वतः ह्या क्षेत्रात असल्यानं सिव्हील इंजिनिअरींग नंतरच्या अनेक उपशाखांबाबत माहिती आहे.

बिल्डींग -रेसिडेन्शियल, कमर्शियल, मॉल्स, थिएटर
इन्फ्रास्ट्रक्चर- रोड, ब्रिजेस, डॅम, कॅनल्स, पाईपलाईन्स, टनेल्स, एअरपोर्ट, रेल्वे लाईन्स, पोर्ट नि त्यासोबतची असंख्य कामे,
इन्डस्ट्रीयल- फॅक्टरी, वेअर हाऊस इ.इ.इ.
सरकारी महत्त्वाची कामं- अणुभट्ट्या नि त्यासंबंधी ची विविध कामे

ह्याबरोबरीनं आणखीही असंख्य कामे सिव्हील इंजिनिअरींगचा भाग आहेत.

फक्त बिल्डींग कन्स्ट्रक्शन मध्येचः
आर्किटेक्ट चं काम सिव्हील इंजिनिअर करु शकतो.
डिझाईन करणं हे वेगळं नि आव्हानात्मक फिल्ड आहे,
प्रोजेक्ट मॅनेजमेण्ट हे एक वेगळं
प्रोजेक्टचं क्वालिटी कंट्रोल हे एक वेगळं नि प्रोजेक्टचं क्वान्टिटी सर्व्हेइंग (सगळ्या क्वान्टीटी वर्क ऑट करणं नि त्यांचं बिलिंग) हा वेगळा भाग आहे.
प्रोजेक्ट प्लानिंग, प्रोजेक्ट एक्जेक्युशन हे आणखी महत्त्वाचे रोल्स.
ह्यात मुख्य लक्षात घ्यावं लागतं ते म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी आपल्याकडं आवश्यक असतो तो पैसा नि त्याचं देखील वर्गीकरण महत्त्वाचं करायचं ते मटेरियल्स मॅनेजमेण्ट, मॅनपॉवर मॅनेजमेण्ट आणि टाईम मॅनेजमेण्ट ह्या द्वारे.

ह्यातल्या 'मॅनपॉवर' बाबत विचार करता सिव्हील लाईन ही सगळ्यात अनसिव्हीलाईज्ड लाईन आहे. पण हेच गरीब, न शिकलेले, अंगुठा छाप कामगारच हातात आवश्यक हत्यारं घेऊन काम करत असतात. त्यांच्याकडून काम करुन घेणं हीच एक मोठी कला आहे.

असो!
खूप विषयांतर झालं. कुठल्याही क्षेत्रात गेलं तरी काम 'नीट' केलं की पैसा नंतर येईलच म्हणावं मुलाला. पैसा हे प्रॉडक्ट आहे आपलं काम व्यवस्थित केल्याचं. तो येतो.

मला मिळालेला गुरुमंत्र 'आत्ता आराम कर नंतर आयुष्यभर कष्ट कर किंवा आत्ता कष्ट कर नंतर आयुष्यभर आराम कर. चॉईस इज युअर्स'

संदीप लेले's picture

28 May 2014 - 2:29 pm | संदीप लेले

आज अनेक महिन्यांनी (कि वर्षांनी?) मिपावर आलो आणि सर्वप्रथम तुमचा हा लेख वाचला. विषय अत्यंत महत्त्वाचा तसंच नाजूक, संवेदनशील आहे. माझा मुलगा आता दहावीत गेलाय, आणि तो ऑलरेडी लोकांच्या "काय, यंदा दहावी ना? ..." वगैरे टिपीकल प्रश्नांना कंटाळून गेलाय! दहावीत असण्याचा माझा अनुभव पस्तीस वर्षे जुना असल्याने त्याचा उपयोग पालक म्हणून फारसा होत नसला तरी समाजमन फारसं बदललं नाही हे ही अनुभवतोय!

चिगो's picture

28 May 2014 - 3:52 pm | चिगो

खरेसाहेब, अभिनंदन.. तुम्ही समजूतदारपणे मुलाच्या पाठीशी उभे आहात, आर्थिकरित्या आणि मानसिकरित्याही ह्यासाठी.. आयुष्यात आर्थिक स्थैर्य महत्त्वाचे आहेच, ह्याविषयी शंकाच नाही. "कल असलेल्या" क्षेत्रात जर पुरेसे पैसे मिळत नसतील, तर गोडी कमी होण्याचीही शक्यता असते. मी जनरलायजेशन करु इच्छित नाही, पण आजकाल मुलांना मिळणार्‍या माहिती आणि एक्स्पोजर मुळे आज आवडणारे क्षेत्र उद्या बोरींग वाटण्याची शक्यता असते. वर बर्‍याच जणांनी सांगितल्याप्रमाणे आज एक तर उद्या दुसरंच काहीतरी करावंसं वाटू शकतं. अर्थात तुम्हाला तुमच्या मुलाच्या स्वभावाची आणि इच्छांची माहिती असेलच, त्यामुळे ह्या विषयावर मी अक्कल पाजळण्यात अर्थ नाही.. तसंही, तुम्हाला प्रभूसरांनी मार्गदर्शन केलेले आहेच..

वर प्यारेने माझा उल्लेख केलाय, म्हणून हे अवांतर : माझ्याबाबतीत बोलायचे झाल्यास, आय हॅड नथिंग टू लुज. त्यामुळे मी "ब्लाईंड गेम" खेळू शकलो स्वतःबद्दल.. ती परीस्थिती प्रत्येकाचीच असेल, असे नाही. खरं सांगायचं, आयुष्यभर हुशार म्हणून नावाजल्या गेलेल्या मुलांना कॉम्पीटिशनमध्ये आलेले अपयश पचत नाही, हा अनुभव आहे. दे गेट शॅटर्ड.. माझ्यातर्फे तुमच्या मुलाला शुभेच्छा आणि एकच सल्ला द्या : त्याचा फक्त आणि फक्त त्याच्या मेहनतीवर अधिकार आणि ताबा आहे. आपल्याशी कॉम्पिटीशनमध्ये असलेल्या लोकांची ताकत, तयारी ह्यावर आपला काहीच कंट्रोल नसतो, आणि त्याचा विचार करुन वेळ वाया घालण्यात अर्थ नसतो. त्यामुळे, त्याला जे काही करायचंय त्यासाठी झोकून प्रयत्न करणे, आणि आशावादी राहणे एवढंच त्याचा हातात आहे.. वर्क फॉर द बेस्ट अँड बी प्रिपेअर्ड फॉर द वर्स्ट.. आणखी काय.. (इंग्रजाळलेल्या प्रतिसादासाठी क्षमस्व..)

काळा पहाड's picture

29 May 2014 - 12:23 am | काळा पहाड

नोकरीत यशस्वी होण्याचा आणि शिक्षणाचा अर्थाअर्थी काहीच संबंध नाही. माझ्या टीम मध्ये अनेक जण असे आहेत जे एम् टेक आणि तत्सम परिक्षा पास होवून आले आहेत, आणि साध्या साध्या गोष्टी त्यांना करता येत नाहीत. असेही आहेत जे नवीन आहेत पण त्यांची काम करण्याची पद्धत वाखाणण्यासारखी आहे. नोकरी मध्ये फक्त चार गोष्टी बघितल्या जातात.
१. तुम्ही किती जबाबदारी चे (रिस्पोन्सिबिलिटी) काम घेवू शकता
२. तुम्ही किती लवकर एखाद्या गोष्टीला आत्मसात करू शकता (अ‍ॅडाप्टीबिलिटी)
३. तुम्ही किती चांगल्या प्रकारे आव्हानांचा (चॅलेंजेस) सामना करू शकता
४. तुमचा द्रूष्टीकोन (अ‍ॅटीट्यूड)
बाकी स्वतःला बाजीराव समजणारे व एक पैशाचे पण काम न करता फुकट पगार खाणारेच जास्त.

मुक्त विहारि's picture

29 May 2014 - 3:07 pm | मुक्त विहारि

प्रतिसाद आवडला..

बाकी स्वतःला बाजीराव समजणारे व एक पैशाचे पण काम न करता फुकट पगार खाणारेच जास्त.
आमच्या दुर्दैवाने आम्हाला असे शिकवणारे भेटलेच नाहीत. इंटर्नशिपमध्ये स्त्रीरोग शास्त्र हा विषयात काम करीत असताना आमचे एक सर आम्हाला रोज काम संपताना हे विचारायचे डॉक्टर आज आपण आपला पगार कमावला काय?( पगारा इतके काम केलेत काय?)
इतर डॉक्टरांसारखे आम्हाला विद्या वेतन नव्हते तर लेफ्तनंट म्हणून पूर्ण पगार होता.
या एका वाक्याचा इतका खोलवर परिणाम झाला कि त्यानंतर जर दिवसभर काही काम केले नाही तर फार मानसिक त्रास होत असे. पण त्याचा एक मोठा फायदा सुद्धा झाला. पुण्याला असताना आमचे दोन वरिष्ठ दिवसभरात प्रत्येकी एक किंवा दोन रुग्ण बघत असत आणी मी आणी आमच्या वरिष्ठ मैडम दोघे मिळून १०० रुग्ण पाहत होतो त्याचा मला कधीही मानसिक त्रास झाला नाही. आणी या अनुभवाचा निवृत्त झाल्यावर आम्हाला फार फायदा झाला. मैडम आणी मी आमची निवृत्ती नंतर भरभराट झाली आणी त्या दोन वरिष्ठांची मात्र ससेहोलपट झाली.( पंधरा वर्षे काम न करता बसून खायची सवय सरकारी नोकरीत चालून जाते.

बोबो's picture

31 May 2014 - 11:37 am | बोबो

आवडला

उपाशी बोका's picture

3 Jun 2014 - 10:55 am | उपाशी बोका

आत्ताच मिसळपाववर हा लेख वाचला. त्यात बरेच वेगळेवेगळे मुद्दे आले आहेत.
१. आपली प्रतिष्ठा मुलाच्या परीक्षेतील यश अपयश यावर अवलंबून असू नये. - हे एकदम मान्य आहे.
२. मुलाची/मुलीची क्षमता ओळखली पाहिजे - सहमत.
३. लोक फुकटचे सल्ले देण्यात एकदम पुढे असतात. - सहमत.

(आता माझा फुकटचा सल्ला)
डॉक्टरसाहेब म्हणतात

त्याच्या चार वर्षाच्या अभियांत्रिकी ज्ञानापैकी फार तर २० टक्के ज्ञानाचा उपयोग होईल. तो आयुष्यात पुढे काय करणार आहे हे तुम्हाला कुठे माहिती आहे?

हे तर कुठल्याही क्षेत्रात खरं आहे. अभियांत्रिकी झालो तर दहावीमध्ये शिकलेल्या इतिहासाचा काय उपयोग? डॉक्टर झालो तर बारावीत शिकलेल्या इंटिग्रेशनचा काय उपयोग? बी.एस.सी. करून मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह झालो, तर शिकलेल्या भौतिकशास्त्राचा काय उपयोग?

शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते.

तसं जर असेल, तर मग IAS च्या परीक्षेची तयारी करणारा अभियांत्रिकी व्हायची काय गरज आहे, बी.ए. पण चालेल की? याचे कारण म्हणजे रिस्क मॅनॅजमेंट. IAS परीक्षा पास नाही झाला तर अभियांत्रिकी होऊन कुठेतरी नोकरी तरी मिळू शकेल, बी.ए. होण्यापेक्षा बरे, असा त्यामागचा विचार असतो.

शिक्षणाचा उपयोग काय? तर तुम्हाला अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या मुलाला काय शिकायचे आहे, ते आधीच माहित आहे, ही चांगली गोष्ट आहे. पण सगळ्याच (रादर बहुतेक) मुलांना असे माहीत नसते. चांगले कॉलेज का हवे तर त्याने तुम्हाला एक चांगला ब्रॅंड मिळतो, ज्यामुळे तुम्ही आयुष्याची सुरुवात थोड्या वरच्या पातळीवरून करू शकता. साधी गोष्ट आहे, कॉलेजने १७ लाख मागितले, तर तुम्ही विचारलंत ना की सुरुवातीचे पॅकेज ४ लाख(च) आहे का? तेच जर आय.आय.एम. मध्ये १० लाख फी भरून २५ लाखाचे पॅकेज मिळाले असते, तर कसे वाटले असते?

मुलाचा शिक्षणाचा कल महत्त्वाचा आहे.

पदवी मिळाल्यावर एक वर्ष तू काहीही केले नाहीस तरी चालेल. नुसता हातात कॅमेरा घेऊन भारतभर फिरलास तरी चालेल. त्यात तुला आयुष्य जगायचे शिक्षण मिळेल ते तुला आयुष्यभर उपयोगी ठरेल.

हे असे डायलॉग ३ एडियट सारख्या सिनेमात टाळ्या वाजवायला छान वाटतात. हातात कॅमेरा द्यायचा असेल तर मग आत्ताच का नको, पदवी मिळायची तरी का वाट बघायची? आज भारतासारख्या देशात, जिथे स्पर्धा इतकी बिकट आहे, तिथे अशी चैन बहुतेकांना परवडत नाही.

पं. मल्लिकार्जुन मन्सूर. पं शिवकुमार शर्मा यांचे गायन / वादन पाहताना एक गोष्ट जाणवते कि ते आपल्या कार्यक्रमाचा आनंद पूर्णत्वाने घेतात त्यात त्यांना कष्ट होताना दिसत नाहीत असेच आपले शिक्षण आणि व्यवसाय असावा मग त्यात पैसे किती मिळाले किंवा नाही हे गौण असावे.

चित्रकला उत्कृष्ट असणारी माणसे रस्त्यावर चित्र काढून लोकांनी फेकलेले पैसे का उचलतात कारण आपली कला बाजारात विकायची कशी यासाठी लागणारे कौशल्य किंवा त्याला लागणारे संबंध त्यांच्याकडे नसतात.

सर्वच जण कौशल्य असूनही यशस्वी होत नाहीत. त्याला नशीबपण लागते. जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करणारा एम.एफ.हुसेन हजारात एखादाच होतो. बाकीचे त्याच गॅलरीसमोर फुटपाथवर प्रदर्शन लावून बसलेले असतात.

म्हणून मी माझ्या भाच्याला तो दहावीत असताना सांगितले होते की तू आता ७ वर्ष नीट अभ्यास करून यश मिळवलेस तर पुढची ७० वर्ष आरामात जगशील. पण त्याऐवजी आता ७ वर्ष आराम केलास तर पुढे ७० वर्ष भोगशील. आता तुला काय करायचं आहे, ते तू ठरव. (त्याची क्षमता काय आहे, ते ओळखून तितपतच अपेक्षा ठेवणे, इतपतच पालकांनी करावे.)

माझे मत आहे की आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःला एक प्रॉडक्ट म्हणून समजले पाहिजे, एक एम्प्लॉई म्हणून नाही. आणि स्वतःचे मार्केटिंग व्यवस्थित केले पाहिजे आणि डोळे उघडे ठेऊन अजून कुठल्या नवीन संधी येत आहेत, ते बघितले पाहिजे. (जसं वर पेठकरकाकांनी म्हटले आहे). आपण स्वतः यशस्वी होत नसतो, तर इतर लोक आपल्याला यशस्वी करतात.

साधारणपणे यश, पैसा, कीर्ती, self-confidence, समाजातली पत हे एकत्रीत असतात. स्वतःच्या कर्तबगारीवर/आत्मविश्वासावर पैसा मिळू शकतो आणि खूप पैसा मिळाला की आत्मविश्वासपण वाढू शकतो. मग सोपा मार्ग का घेऊ नये?

शेवटी काय, आयुष्यात आपले समाधान कशात आहे ते प्रत्येकाला स्वतःलाच शोधावे लागते. पण खिशात भरपूर पैसा असेल, तर ते काम अधिक सोपे होते. Money can buy you happiness, but happiness cannot buy you money.

सुबोध खरे's picture

3 Jun 2014 - 12:25 pm | सुबोध खरे

साहेब,
त्या कॉलेजने टेबलाखालून १७ लाख मागितले का तर मी आणि माझी बायको डॉक्टर आहे म्हणून. ( अगोदर ते तुमच्याकडून एक फॉर्म भरून घेतात). कोलेजची फी वेगळी. जर कोलेजची फी चार लाख रुपये वर्षाला असेल आणि तसे स्पष्टपणे अगोदरच म्हटले असेल तर वेगळे. हे म्हणजे शिवनेरीचे भाडे सव्वा चारशे आहे ते आपणा सर्वाना माहित आहे.
पण आज गाड्यांचा गोंधळ आहे म्हणून ट्याक्सी वाला दोन हजार रुपये सीटला घेतो तेंव्हा कसे वाटेल तसे आहे.
आय आय एम ची फी दहा लाख आहे हे जगजाहीर आहे. त्यात लपवा छपवी नाही. अर्थात या संस्थेबद्दल सुद्धा एकाने मला हेच सुनावले कि अरे तुझ्याकडे टेबलाखालून द्यायला पैसे नाहीत म्हणजे इतरांकडे( इतर डॉक्टरांकडे) नाहीत असे नाही. त्यामुळे त्यांचे हिशेब किंवा धंद्यातील गणित तुझ्यापेक्षा जास्त पक्के आहे. ( हि वस्तुस्थिती मी खरं तर गृहीत धरायला हवी होती)
"शैक्षणिक यश हे फार तर १० % आयुष्यातील यशास कारणीभूत असते." आयुष्यातील यश म्हणजे फक्त पैसे मिळवणे हे नाही हे मला अधोरेखित करायचे आहे. नाहीतर माझ्या मुलाला त्याच्या इच्छेविरुद्ध मी मरीन इंजिनियरिंग ला पाठविले तर पास झाल्यावर त्याला एक हजार डॉलर महिनाची सुरुवातीची नोकरी पक्की आहे. (नौदलात काम करून मी तेवढी पुण्याई कमावलेली आहे कि माझ्या मुलाला त्या क्षेत्रात चिकटवून घेतील एवढे संबंध आहेत). पण मग आयुष्यभर जर तो नको असलेले काम करणार असेल तर काय उपयोग?
लष्करात असताना माझे एक वाक्य बरेच लोकप्रिय झाले होते. " आपला कमांडिंग ऑफिसर चांगला नसेल तर आपले एक ते दीड वर्ष कष्टात जाते, पण आपली बायको चांगली नसेल तर आयुष्य कष्टात जाते"
चांगले कॉलेज का हवे ? यात फक्त ब्रान्ड हा एकच मुद्दा नाही. चांगल्या संस्थेत शिक्षक चांगले असतात, तेथील विद्यार्थी हुशार असतात आणि अभियांत्रिकी मध्ये ज्या प्रचंड प्रयोगशाळा लागतात त्या पायाभूत सुविधा जास्त चांगल्या असतात. त्यामुळे जर सरासरी पातळीने अशा संस्थेतून ज्ञान ( केवळ पदवी नव्हे) घेऊन बाहेर पडणारा विद्यार्थी अधिक वरच्या पातळीचा असतो.
हातात क्यामेरा धरून एक वर्ष भर नुसता फिरलं तरी चालेल. "आता नको" एवढ्यासाठी कि त्याला अजून( वय वर्षे १७) परिपक्वता आली नाही.ती आली असती तर मला चालले असते.
मी माझ्या CNBC TV १८ च्या शो वर सॉमरसेट मॉम चे वाक्य म्हणून दाखविले होते “Money is like a sixth sense without which you cannot make a complete use of the other five.”तेंव्हा आपल्या मुलभूत गरजा आरामात भागविण्यासाठी किमान संपत्ती हि पाहिजेच.
इतर बाबतीत सहमत

उत्तम लेख आणि उत्तम प्रतिसाद.

टवाळ कार्टा's picture

4 Jun 2014 - 5:25 pm | टवाळ कार्टा

१०० कराच :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

4 Jun 2014 - 5:29 pm | डॉ सुहास म्हात्रे

१००

अनेक केवळ काडी टाकायची म्हणून काढलेल्या अनेक धाग्यांनी शंभरी गाठलेली पाहिली आहे. या पार्श्वभूमीवर या उत्तम धाग्यावर हा १०० वा प्रतिसाद द्यायला अभिमान वाटत आहे. :) *clapping*

अद्द्या's picture

7 Jun 2014 - 11:38 am | अद्द्या

काका लेख . आणि तुमचे विचार खूप आवडले .
माझी बारावी राहिली होती . तेव्हाचे आमच्या "जवळच्या नातेवाईकांचे "एक एक विचार ऐकून एवढा राग यायचा . .

काही उदाहरणे देतो . .
१) कॉलेज सोडवा त्याचं . तुमच्या बरोबर तुमच्या कारखान्यात घेऊन जा . पैसे तरी कमवेल .
२) आजपर्यंत च्या तुमच्या मेहनतीला आणि पैश्याला वाया घातलंय त्याने . . घरातून काढून टाका .

आणि इतरही असेच अनेक . . मुख्य म्हणजे हे लोक . असं सगळं बाबांना बोलायचे . . .

किती राग आला तरी काही करू शकत नवतो . .
त्या २-३ दिवसात बाबांना रडताना बघितलं होतं मी रात्री . .

आता वेळ अशी आहे . कि हेच नातेवाईक मला फोन करतात . . "आमच्या मुलासाठी नोकरी मिळते का बघ न . त्याने पुढे काय करावं हे सांग ना . . इंजिनियरिंग करून घरीच बसलाय रे . . वर्ष झालं आता. . "

किती म्हटलं तरी ह्या लोकांच्या तोंडी वाक्यं ऐकली कि बरं वाटतं काही वेळेला .

मुक्त विहारि's picture

9 Mar 2024 - 11:17 pm | मुक्त विहारि

वाखुसा