(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित)
प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे " दुकान उघडल्यावर , ते चालवण्याच्या प्रक्रियेत आजी/आजोबांना बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार यांच्या कल्पना नातवंडांना (खेळता खेळता, नातवंडांवर फार भार न पडता) समजाऊन देता येतील. अर्थातच त्याकरता नातवंडांचे वय यथायोग्य असावे (आणि म्हणूनच हा "भाग २" चा पसारा "भाग १" पासून वेगळा केला आहे).
स्थळ: घरातील कुठलेही, जिथे पसारा करण्यास नातवंडांच्या आई वडिलांचा फारसा विरोध नसेल, अशा ठिकाणचे "चालू झालेले" दुकान ("दुकान मांडणे" या करता भाग १ पहा).
काळ व प्रयोगातील पात्रे: जेंव्हा कधी दुकानात "दुकानदारा"खेरीज आजी/आजोबांशिवाय "गिऱ्हाईक" देखील असू शकेल तेंव्हा हे दुकान चालेल. आजी किंवा आजोबा यातील एक "गिऱ्हाईक" तर दुसरा "दुकानदारा"चा मदतनीस हे पण चालेल. आजी/आजोबांचं काम नातवंडांच्या मदतीकरता जशी जरूर लागेल तसे हजर असणे, योग्य प्रश्न विचारून "दुकानदारा"ला वस्तू आणि पैसे मोजण्यास/वाटण्यास/राखण्यास मदत करणे, दुकान "चालवण्याकरता" वयाने पुरेशा नसलेल्या भावंडान्पासून दुकान व दुकानदार यांचे रक्षण करणे, गिऱ्हाइकाला दुकानदाराने काय काय प्रश्न विचारायला हवेत (तुम्हाला काय हवे? किती?) आणि काय उत्तरे द्यायला हवीत (आमच्याकडे फक्त "xx" एव्हढीच ही वस्तू सध्या आहे) तसेच किती पैसे घ्यायला हवेत आणि परत द्यायला हवेत अशी सगळी प्रश्नोत्तरे दुकानदाराला व्यवस्थित समजलेली असावीत.
साहित्य: आधी "भाग १" मध्ये सांगितलेल्या प्रमाणे दुकानात विक्री करता असलेल्या वस्तू, साधारण त्याच पद्धतीने रूपांतरीत पैसे आणि "कॅश रजिस्टर"
दुकानातील पैसे आणि पैशांचे व्यवहार: "मोनोपॉली" मधील प्राविण्यामुळे आम्हाला "दुकानदाराकरता" "कागदी पैसे" तयार करणे हे जरी कठीण गेले नाही तरी त्याचा उपयोग समजावणे हे करावे लागले (कारण "मोनोपॉली" मध्ये "दुकानदार" क्वचितच "बँकर" असे). "गिऱ्हाईक पैसे देऊन वस्तू घेते" म्हणजे काय आणि दुकानाकरता सुरवातीलादेखील "हातात पैसे" (की ज्यातले काही हातात पडल्याखेरीज "गिऱ्हाईक" या दुकानात येत नसे) का असायला हवेत हे समजावून सांगावे लागले. किंबहुना "दुकानदार" फक्त "आई बाबा दुकानातून वस्तू घेऊन दुकानाबाहेर पडण्याआधी काहीतरी बोलून, लिहून मगच बाहेर पडतात", एवढेच प्रत्यक्ष पहात असल्याने कुठल्याही दुकानात गेल्यावर वस्तू घेताना पैसे द्यावे लागतात हे देखील "दुकानदाराला" समजावून द्यावे लागले. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी: "पैशाचे" परिमाण शक्यतो १, २, ५ व १० या पलिकडे नसावे. वेगवेगळ्या रंगांचे आणि आकाराचे कागद "पैसे" करताना वापरावे (म्हणजे १,२,५ व १० या परिमाणांचे रंग वेगवेगळे असावेत). "पैसे" ठेवताना वेगवेगळ्या राशी करून व्यवस्थित द्यावेत व घ्यावेत (याची भरपूर उजळणी "मोनोपॉली"मध्ये झाली असली तरी हे पुन्हा सांगावे लागले) .
जेव्हा एखादे "गिऱ्हाईक" दुकानात येते तेव्हां दुकानात काय काय "विक्री" करता ठेवलेले आहे याची "दुकानदाराला" पूर्ण माहिती (जरूर असेल त्या प्रमाणे आजी/आजोबांच्या मदतीने) - परिमाणासह असणे आवश्यक. ( जसे पांढरा चौरस म्हणजे दूध आणि पांढरा गोल म्हणजे अंडे, तांबडा गोल म्हणजे स्ट्रोबेरी, केशरी कागदाचे गोल हे लाडू). "किती कुकीज", "किती किलो साखर", "किती लिटर दूध"- याचा हिशोब ठेवत "दुकानदाराला" प्रत्येक तऱ्हेची वस्तू आपल्याकडे किती उपलब्ध आहे हे "गिऱ्हाईकाला" समजावून द्यावे लागेल, हे समजल्यावर "दुकानदार" काही प्रयत्नानंतर बराच "तयार" झाला. .
किंमत: " एका कुकी करता किती पैसे", किंवा " एक किलो साखर घेतल्यास किती पैसे द्यावे लागतील" हे "गिऱ्हाईकाला" सांगण्याआधी "दुकानदाराला" समजावून द्यावे लागले. हे काम सोपे होण्याकरता सगळ्याच किमती १ , २, ३, ४ किंवा ५ अशा ठेवल्या. (गनिमी काव्याचे उद्दिष्ट: खेळातून ५ पर्यंतचे पाढे जमल्यास तयार करून घ्यावे).
या समजावून घेण्याच्या आणि देण्याच्या प्रक्रियेत "कॅश रजिस्टर" (ज्यावर लिहिलेले पुसून टाकता येईल अशी पाटी) चा आणि (गनिमी काव्याने) खेळात व्यवहारातील गणिताचा समावेश करता आल्याचा उपयोग झाला.
दुकानात विकायला "किती कुकीज" आहेत हे आधी पाहून ( "कुकीज" लिहिलेले कागद हातात घेऊन, ते मोजून, साधारणतः १० च्या आतील) कुकी हव्या असणाऱ्या "गिऱ्हाईकाला" सांगितले. "गिऱ्हाईकाला" जितक्या कुकी (साधारणतः २ ते ५) हव्या होत्या तितक्याना "कॅश रजिस्टर" वापरून, प्रत्येक कुकीच्या किमतीने "गुणून" किती पैसे द्यावे लागतील ते सांगून, पैसे घेतले. हाच प्रकार "किती लिटर" किंवा "किती किलो" वस्तू दिल्या त्याप्रमाणे बदलला. ("गुणाकारा"करता प्रथम क्रमशः बेरीज आणि नंतर क्रमशः पाढे असा जरी आजी/आजोबांचा - गनिमी काव्याचा - विचार होता तरी, बहुशः "जितक्या कुकी तितक्या वेळा किमतीची बेरीज" असेच प्रत्यक्षात हिशोब झाले, पाढे मात्र थोडे ओळखीचे झाले). आधी "दुकानात" किती वस्तू होत्या आणि त्यातील किती "गिऱ्हाईकाला" दिल्या आणि म्हणून किती शिल्लक राहिल्या हे "कॅश रजिस्टर" (ज्यावर लिहिलेले पुसून टाकता येईल अशी पाटी) वापरून समजावून घेता घेता आपण वजाबाकी शिकतो आहोत हे अर्थातच "दुकानदारा" च्या लक्षात न आल्याने खेळ जितका रंगला तितकीच (१ ते १० आकड्यातली वेगवेगळ्या वस्तू वापरून केलेली) बेरीज वजाबाकी ("बेरीज वजाबाकी" हे शब्दही न वापरल्याने असेल) "जमली".
"किती किलो साखर", "किती लिटर दूध"- याचा हिशोब नीट ठेवता येण्यासाठी, परिमाण व्यवस्थित "पदार्थावर" लिहिलेले असणे जरूर आहे आणि त्या आधी "परिमाण" म्हणजे काय हे उदाहरणे वापरून समजाऊन दिले असणेही जरूरीचे.
प्रयोगाला लागणारा वेळ : बहुतेक वेळा दुकानातील वस्तू संपून गेल्याने "आता उद्या" असे म्हणत "आजचा खेळ" संपत असे. त्या नंतर अर्थातच आवरण्यातला एक भाग म्हणजे गिऱ्हाइकाना गाठून, त्यांच्याकडचा सगळा माल परत मिळवून "उद्या" करता दुकान पुन्हा सज्ज करणे हे काम आजी/आजोबांचे.
प्रयोगाचा शेवट : मागच्या वर्षी आमचे "दुकान" बनवणे काही काही दिवसांच्या अंतराने २-३ आठवडे चालू राहिले. पूर्ण सजल्यानन्तर दुकानदार (आणि आजी/आजोबा दुकानदाराचे मदतनीस व लागेल त्या प्रमाणे "गिऱ्हाईक") असे जरी सहज जमत असले तरी जेव्हा (दुकानदाराचे) आई बाबा जेव्हा "गिऱ्हाईक" म्हणून सापडत तेव्हा खरी गम्मत यायची. दोन-तीन दिवसातून एकदा असे हे दुकान १-२ आठवडे चालले. म्हणजे एकूण "दुकान बनवणे" हाच भाग "दुकान चालवणे" यापेक्षा जास्त चालला. माझ्या अंदाजाने बाहेर सायकल चालवता येण्याइतपत हवामान सुधारल्याने घरातले दुकान बंद झाले.
प्रयोगाची फलश्रुती: "कॅश रजिस्टर" वापरून, १ ते १० आकड्यातली बेरीज, वजाबाकी, "गुणाकार" (पर्यायी क्रमशः बेरीज) झटपट हो ऊ लागली; आजी/आजोबांचा - गनिमी काव्याने पाढे पढवण्याचा विचार फारसा यशस्वी झाला नाही परंतू वेगवेगळ्या वस्तू वापरून केलेली बेरीज वजाबाकी करताना बोटे न वापरता पटापट बेरीज वजाबाकी ("बेरीज वजाबाकी" हे शब्दही न वापरल्याने असेल) जमू लागली, आणि हे सगळे सुरू असताना "आपण काही तरी कुणी तरी डोक्यावर दिलेले ओझे वाहतो आहोत" असे अजिबात न वाटता ! जर "आता आपण अभ्यास करू या" असा प्रस्ताव आजी/आजोबा (किंवा आई बाबा) यांच्याकडून आला असता तर तो ताबडतोब फेटाळला गेला असता पण दुकान "बनवणे" आणि "चालवणे" हा खेळ मात्र आवडीचा ठरला.
(फोटो डकवण्याचे प्रयत्न अजूनही अयशस्वी)
प्रतिक्रिया
23 May 2014 - 11:56 am | मीता
खुप छान उपक्रम .
23 May 2014 - 3:14 pm | साती
आम्हीसुद्धा हल्ली असे ठेले लावतो.
कारण दुकानाचा सेटप जरा मोठा होतो.
त्यापेक्षा ट्रायसिकलच्या सीटवर वस्तू मांडून त्या विकायला बरे पडते.
एक वाटी म्हणजे एक किलो-जी वस्तू असेल ती.
23 May 2014 - 3:50 pm | सुधांशुनूलकर
छान उपक्रम. लेखनशैलीही आवडली.
24 May 2014 - 6:36 am | इन्दुसुता
प्रयोग आवडला.
24 May 2014 - 3:16 pm | दादा कोंडके
रटाळ लिखाण आणि कैच्याकै प्रयोग.
24 May 2014 - 3:36 pm | प्रभाकर पेठकर
>>>>(आमच्याकडे फक्त "xx" एव्हढीच ही वस्तू सध्या आहे)
दुकानदाराला डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवायला शिकविणे जास्त जरुरीचे.
'एव्हढीच वस्तू सध्या आहे' च्या बरोबर गिर्हाईकाला काय हवे आहे. ते केंव्हा पर्यंत (उद्या, परवा) उपलब्ध होईल आणि गिर्हाईकाचा संपर्क क्रमांक घेऊन त्यांना ती 'वस्तू आली की कळविण्यात येईल' एवढे आश्वासन द्यायलाही शिकवायला हवे. गोड बोलून, उत्तम सेवा देऊन गिर्हाईकाला बांधून ठेवणे हे मुळात शिकणे अत्यंत जरूरीचे आहे. आपले कित्येक मराठी दुकानदार इथेच मागे पडतात. त्या मानाने राजस्थानी, गुजराथी दुकानदार गिर्हाईकाशी वैयक्तिक नाते निर्माण करून आपल्या दुकानाशी त्याला बांधून ठेवण्यात वाकबगार असतात. हे पुढच्या पिढीच्या अंगी बाणविणे जास्त महत्वाचे. बाकी हिशोब-टिशोब वयपरत्वे शिकतीलच ते.
28 May 2014 - 12:56 pm | शेखरमोघे
आमच्या "दुकानातील" दुकानदार फक्त वय वर्षे सहा इतका (खरे म्हणजे इतकी) "तयार" असल्याने (आणि धाकटे भावन्ड वय वर्षे ३ चे) या दुकानात काही खास गोष्टीन्ची काळजी घ्यावी लागली जसे दुकानदाराला(खरोखरीच) कुणाच्याही डोक्यावर चढू न देणे.
24 May 2014 - 3:47 pm | दादा कोंडके
गुजराथ्यांचं माहित नाही पण राजस्थानी दुकानदारांचा अनुभव काही विशेष चांगला नाही. पुण्यातल्या सर्व उपनगरांमध्ये त्यांनी बस्तान बसवलं आहे. काही वर्षांपुर्वी किराणा दुकानं होती पण आता मॉल्स आल्यामुळे खूप दुकानं आता बदलून मोबाईल शॉपी, हार्डवेअर, फ्यान्सी शॉपी वैग्रे झाली आहेत. सकाळी लवकर उघडून रात्री उशीरा बंद होत असली तरी अॅटीट्युड पुणेरी दुकानदारांसारखाच असतो असा आंड्भव आहे.
24 May 2014 - 4:25 pm | प्रभाकर पेठकर
आमच्या कोथरूड परिसरातील राजस्थानी दुकानदारांबद्दलचा माझा अनुभव माझ्या प्रतिसादात लिहीला आहे. आमच्या कॉलनीतल्या राजस्थानी दुकानदाराने स्वकौशल्यावर एकाची दोन दुकाने केली आणि एकमेव मराठी दुकानदाराने स्वतःचे दुकान बंद केले. मी, तो मराठी दुकानदार आहे म्हणून, त्याचा कायमस्वरूपी गिर्हाईक होतो. त्याच्याकडच्या चांगल्या वस्तूंचे कौतुक करायचो. पण दुर्दैवाने त्या वस्तुंच्या उपलब्धतेत सातत्य नसायचे. राजस्थानी दुकानदाराकडे एक वही असायची. गिर्हाईकाला हवी असलेली वस्तू दुकानात नसेल तर तो त्या वहीत लिहून ठेवायचा. दुसर्यादिवशी ती वस्तू त्याच्या दुकानात यायची आणि तो फोन करून तसे कळवायचा. राजस्थान्याची दुकाने पहाटे ६ वाजता उघडायची तर मराठी माणसाचे दुकान ऑफिस टाईमनुसार ९ वाजता उघडायचे. पुढे पुढे दुकानातील वस्तूंच्या अनुपलब्धतेप्रमाणे दुकानदार स्वतःही उपलब्ध राहीनासा झाला आणि शेवटी त्याच्या दुकानाचे शटर कायमस्वरुपी बंद झाले.
मोहल्यात, 'कोकणशॉपी' नांवाचे एक दोन मराठी तारे लुकलुकताहेत. आज तरी वस्तूंची उपलब्धता चांगली आहे. पण दुकान केंव्हा उघडे असेल आणि केंव्हा बंद असेल ह्याला कांही नियम नाही. त्यांचे प्रॉडक्ट्स संपूर्णतः वेगळे असल्याने राजस्थानी स्पर्धेला त्यांना तोंड द्यावे लागत नाहीए. त्यांची भरभराट होवो एवढीच इच्छा व्यक्त करतो.
28 May 2014 - 12:48 pm | शेखरमोघे
वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तरी फोटो डकविताना लिखाणातच चित्र दिसू लागण्याऐवजी एक "हिरवट" चौरस लिखाणाखाली दिसतो आहे. या चौरसावर उजवी टिचकी मारल्यावर चित्र नव्या चौकटीत (लिखाणाबाहेर) दिसते. असे होणे टाळण्याकरता/लिखाणातच चित्र दिसण्याकरता काय करावे?
29 May 2014 - 11:31 am | पैसा
खेळातून शिकवायचा प्रयोग मस्त!
http://www.misalpav.com/node/13573 इथे फोटो चिकटवण्यासाठी मदत उपलब्ध आहे.