(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित)
प्रयोगाचे उद्दिष्ट: घरी (खेळातले आणि म्हणूनच बरेचसे काल्पनिक) "आपले स्वतःचे" दुकान उघडणे, ते उभारण्याच्या प्रक्रियेत "दुकान" म्हणजे काय, त्यात काय काय हवे/ठेवता येईल, ते कसे तयार करता येईल या वर विचार करताना आजी/आजोबांना नातवंडांच्या कल्पनाशक्तीला बरीच चालना देता येईल
स्थळ: घरातील कुठलेही, जिथे पसारा करण्यास नातवंडांच्या आई वडिलांचा फारसा विरोध नसेल
काळ: आळसावलेली दुपार, आजी/आजोबांबरोबर घालवण्याकरता नातवंडांच्या हातात पुरेसा वेळ, काही तरी नवीन करण्याचा इरादा, "आपण काय बरे आता करूया" असा बराच उहापोह झाल्यानन्तरचा
साहित्य: घरातला साठलेले रद्दी कागद आणि पाकिटे (विशेषतः रोजच्या टपालातून येणाऱ्या अनेकविध रंगीबेरंगी जाहिराती ज्या एरवी कचऱ्यातच फेकल्या जातात), रिकामे बिस्किटे, कॉर्नफ्लेक्स इ. इ. चे कागदी/पुट्ठ्याचे डबे, गोळ्या वगैरेंच्या चांद्या (थोडक्यात निरुपयोगी आणि निरुपद्रवी वस्तू ज्या तशाच फेकल्या जाण्या ऐवजी, ज्यांचे - निदान काही काळ - उपयोगी वस्तूत रूपांतर करणे शक्य आहे), एखादी बऱ्यापैकी धारदार कात्री जी फक्त आजी/आजोबांनी वापरायची आहे.
दुकानात काय काय हवे/ठेवता येईल - या प्रश्नाचे उत्तर बहुतेक माहित असलेल्या आणि रोजच्या वापरातील गोष्टीतून मिळत जाते, जसे ब्रेड, बिस्किटे, दूध, फळे. जर नातवंडांच्या वयोमानानुसार फक्त रंग आणि आकार ओळखण्यापर्यन्तच त्यांची प्रगती असेल तर "पांढरा चौरस म्हणजे दूध आणि पांढरा गोल म्हणजे अंडे" अशा ढोबळ परिमाणात वस्तू ठरवता येतील. त्यात सवाल जबाब करत "तांबडा गोल म्हणजे टोमाटो का स्ट्रोबेरी" अशा गोष्टी ठरवता येतील. चांदीच्या गोल चकत्या या औषधाच्या गोळ्या असू शकतील किंवा "M & M" देखील असू शकतील. केशरी कागदाचे गोल हे लाडू किंवा चेंडू किंवा फुगे यातील काही ही असतील.
कुठल्या गोष्टी "आपल्या दुकानात" ठेवाव्यात आणि (हातातील कच्च्या मालातून) त्या कशा तयार कराव्यात (प्रत्यक्ष कापाकापी आजी/आजोबांकडे सोपवल्यावर) याची चर्चा हाच एक चांगला रंजक खेळ होईल. आजी/आजोबांना नातवंडांच्याकडून वेगवेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारून (जसे "मागच्या आठवड्यात आपण दुकानातून काय काय घेतलं?") उत्तरे मिळवत मिळवत "आपल्या दुकानात विक्रीकरता काय काय ठेवायला हवे" याचे निदान करता आल्यावर (किंवा हा विचार विनिमय करता करता एकीकडे) या वस्तू वेगवेगळ्या कच्च्या मालातून कातरून तयार करता येतील. त्या नंतर नातवंडांच्या वयोमानानुसार (आणि या वेळपर्यंत - सगळ्यांनाच - किती कंटाळा आला असेल त्या बेताने) "ज्याला आपण ब्रेड म्हणणार - जसे केशरी आयत - त्यावर "B" लिहिणे" इत्यादी सजावट हा पुढील टप्पा होईल (जमल्यास "ब्रेड" आणि "बिस्किट" याकरता वेगवेगळे "B" किंवा "b" वापरणे किंवा योग्य रेखाचित्र आधी ठरवून काढवून घेणे, हाही एक पर्याय). वयोमानानुसार तयार केलेल्या प्रत्येक वस्तूचे परिमाण समजून - जसे "किती कुकीज", "किती किलो साखर", "किती लिटर दूध"- हिशोब ठेवत प्रत्येक तऱ्हेची वस्तू वेगवेगळी ठेवण्याचे महत्व "दुकानदाराला" समजावून द्यावे लागेल (जास्त विचार "उन्हाळी उद्योग : भाग २" मध्ये पहा). त्याही पुढील टप्पा होईल - "आपल्या दुकानातल्या वस्तूंची किंमत काय ठेवावी" (ज्याचा जास्त विचार "उन्हाळी उद्योग : भाग २" मध्ये पहा).
प्रयोगाला लागणारा वेळ : "आता कंटाळा आला" असा उद्घोष होईपर्यंत. जर "आता असेच सगळे ठेऊ, म्हणजे उद्या इथून पुढॆ आपल्याला दुकान वाढवता येईल" हा पर्याय वापरता येत असेल तर आणखीच उत्तम. जर नातवंडांच्या वयोमानानुसार फक्त रंग आणि आकार ओळखण्यापर्यन्तच त्यांची प्रगती असेल तर "दुकान" बनवण्याइतकेच थोड्या वेळाने कंटाळा आल्यावर ते खोलीभर उधळणे हे देखील तितकेच रंजक ठरू शकते.
काही काही नवलाईच्या वस्तू: आमच्या दुकानात येणारे लोक जर दमले तर? आमच्या दुकानात येणाऱ्या लोकांना काही खायचे असेल तर? याला उत्तर म्हणून आजोबाना दुकानाकरता "टेबल-खुर्ची"ची सोय करावी लागली. वेगवेगळ्या फळांची मागणी पुरवण्याकरता योग्य रंगातील "रद्दी" कागद कमी पडल्याने दुकानात ठेवण्याची फळे मर्यादित करावी लागली. फक्त हिरवाच कागद सगळ्या भाज्यांची मागणी पुरवण्याकरता वापरावा लागल्याने दुकानात ठेवण्याकरता हिरवा गोल म्हणजे "कॉली फ्लॉवर" आणि हिरवा आयत म्हणजे "ढोबळी मिरची" असे ठरवून द्यावे लागले. "केळी" बनवायला कॉर्नफ्लेक्सच्या डब्याच्या पिवळ्या पुट्ठ्याचे तुकडे करून दिल्यावर त्यावर " C " लिहवून घेऊन, त्याप्रमाणे कापल्यावर "दुकान मालक" एकदम खूष! पहिली एक दोन "केळी" जराशी "नूडल्स" सारखी वाटल्यामुळे पुढची "केळी" जास्त काळजीपूर्वक (म्हणजे एकात एक दोनदा " C " लिहवून घेऊन) करावी लागली. दुकान म्हटले म्हणजे "कॅश रजिस्टर" तर असायलाच हवे! सुदैवाने ज्यावरचे लिहिलेले पुसता येईल अशी पाटी या कामाकरता सुयोग्य ठरली. (या बद्दलचा जास्त विचार "उन्हाळी उद्योग : भाग २" मध्ये पहा)
प्रयोगाचा शेवट : "कंटाळा आला" करत दुकान उधळण्यापासून ते "आता आवरून ठेऊ, उद्यापर्यंत" या मधील कुठल्याही टप्प्यावर. प्रयोग यशस्वी न झाल्यास आजी/आजोबांवर नातवंडांबरोबर हद्दपार होण्याची वेळ येऊ शकते हे लक्षात घेऊन प्रयोगांत नातवंडांच्या आई वडिलांचा सहभाग असल्यास प्रयोग हमखास यशस्वी होतो. किमानपक्षी आजी/आजोबांवर निदान प्रयोगाच्या पुढील अंकापर्यंत दुकान आवरण्याची (आणि जरूर लागल्यास नातवंडांना "पतली गलीसे" सोसायटीच्या आवारात, शेजारी-पाजारी, तळघरात किंवा इतर सुरक्षित ठिकाणी पोचवून नातवंडांच्या आई वडिलांनी निर्माण केलेलॆ - "बाई बाई बाई काय हा पसारा' वगैरे पार्श्वसंगीत वापरून केलेले वादळ शमल्यावर परत आणण्याची) जबाबदारी असते.
मागच्या वर्षी आमचे "दुकान" बनवणे काही काही दिवसांच्या अंतराने २-३ आठवडे चालू राहिले. पूर्ण सजल्यानन्तर दुकान (आणि दुकानदार) असे दिसत होते.
https://plus.google.com/u/0/photos?pid=5971945517632401602&oid=100108536...
प्रतिक्रिया
20 May 2014 - 5:47 pm | जेपी
लेख विस्कळीत वाटला.बाकी यामुळे सुट्टीत अशी दुकाने थाटली होती(लहानपणी). 1 रु चा मुरकुल पुडा आणुन प्रॉफीट मधे 20 पैशे कमवायचे आणु त्या 20 पैश्याचे चाकलेट आणुन ते आठाण्याला विकायचे. गेले ते दिवस.
20 May 2014 - 6:08 pm | रेवती
बरेच उत्साही आजीआजोबा पाहून आनंद वाटला.
20 May 2014 - 6:39 pm | शेखरमोघे
फोटो डकवण्यात काहीतरी गड्बड झालेली दिसते. पुढील भागात सुधारणा करता यावी.
20 May 2014 - 8:59 pm | प्रभाकर पेठकर
कल्पना चांगली आहे. उद्योजकता वाढण्यासाठी मूलभूत वैचारिक बैठक ह्यातून तयार व्हावी. केवळ वेळ घालविण्याचे, मुलांना कशात तरी गुंतवून ठेवायचे साधन म्हणून भर न देता त्यांच्यातून एक उद्योजक घडवायचा आहे ह्या व्यापक विचाराने विषय हाताळावा.
ज्या वयाच्या मुलांचा विचार ह्या लेखात केलेला आहे त्यापेक्षा अजून मोठ्या मुलांना गणेशोत्सवात किंवा कुठल्याही आनंद मेळाव्यात दुकान टाकून प्रत्यक्ष व्यवसायाचा अनुभव (तोटा झाला तरी चालेल) द्यावा. इतर वेळी मधून मधून चर्चा आणि माहितीचे देवाण-घेवाण व्हावे.
ह्यातूनच हळू हळू मराठी मानसिकता बदलत जाईल अशी आशा वाटते.
21 May 2014 - 11:57 am | रामदास
हे झाले तर फारच उत्तम !!!
21 May 2014 - 5:50 pm | तुमचा अभिषेक
मस्तय कल्पना. नेहमीच्या भातुकलीच्या खेळापेक्षा वेगळी आणि सरस.
बाकी सध्याची जनरेशन स्मार्ट आहे, क्रिएटीव्ह आहे, पण त्यांच्या क्रिएटीव्हेटी आणि स्मार्टनेसला वाव आपण असाच मिळवून दिला पाहिजे.
24 May 2014 - 6:30 am | इन्दुसुता
पेठकर आणि रामदास यांच्याशी सहमत.
28 May 2014 - 12:46 pm | शेखरमोघे
वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला तरी फोटो डकविताना लिखाणातच चित्र दिसू लागण्याऐवजी एक "हिरवट" चौरस लिखाणाखाली दिसतो आहे. या चौरसावर उजवी टिचकी मारल्यावर चित्र नव्या चौकटीत (लिखाणाबाहेर) दिसते. असे होणे टाळण्याकरता/लिखाणातच चित्र दिसण्याकरता काय करावे?
28 May 2014 - 3:20 pm | आतिवास
लेख चांगला आहे.
पण लेखाचं शीर्षक पाहून वेगळ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या - त्या मर्यादित अर्थाने शीर्षक फसवं वाटलं :-)
3 Jun 2014 - 6:00 pm | शेखरमोघे
म्हणून तर शीर्षकाखालीच लिहिले होते "(मागील उन्हाळ्यात - अमेरिकेत - नातवंडांबरोबर सुट्टीत केलेल्या उद्योगांवर आधारित". आता नातवंडांबरोबरचे आणि सुट्टीत केलेले असे काय उद्योग असणार की ज्यातून "वेगळ्या अपेक्षा" निर्माण व्हाव्यात? *i-m_so_happy*