पाच वाजत आलेले अन हापिसातल्या निम्म्या अर्ध्या स्टाफला बाहेरचे वेध लागलेले. अशा कातरवेळी काळेनाना क्लार्क केबिनमध्ये घुसले अन घुटमळत उभे राहिले.
‘का हो, नाना ?’ मी ऑफिसचा चार्ज घेऊन जेमतेम एक महिना झालेला. तेवढ्यात नानांच्या भिडस्त स्वभावाचा मला बराचसा अंदाज आलेला.
‘मॅडम..डिविजन वरून फोन आला होता...’
‘हं, काय ?’
‘ते..उद्या गांधी जयंती ना ?’
‘हो. मग ?’
‘नाही, म्हणतात सकाळी सातला ऑफिसात झेंडावंदन करा..’
‘गांधीजयंतीला झेंडावंदन ? आणि सकाळी सातला ?’ बापरे, सकाळी उठलं कि पळत सुटावं लागणार ! शिवाय सकाळच्या प्राणायामाला फाटा द्यावा लागणार, ते वेगळंच... मी मनात विचार केला.
नाना गंभीर. ‘मॅडम स्टाफ निम्म्यापेक्षा जास्त साईटवर गेलाय. सगळ्यांना कसा निरोप देणार आत्ता ?’
‘असं ? किती स्टाफ आहे एकूण ?’
‘म्हणजे बघा मॅडम, पाच इंजिनिअर, दहा बिलिंगवाले अन सत्तर इतर स्टाफ. पण आत्ता तीन इंजिनिअर, सहा बिलिंग अन दहा इतर एवढेच आहेत. त्यांना सांगतो सकाळी यायला. आणि बाकीच्यांना मोबाईलवर सांगतो..’
‘सांगा , सांगा....’
काम आवरून निघता निघता सहा वाजले. गाडीत बसले तर नाना हसऱ्या चेहेऱ्याने उभे.
‘सांगितलं का सगळ्यांना ?’ मी गाडीतूनच विचारले.
' मॅडम, झेंडावंदन क्यान्सल झालंय . पण..’
‘….?’
‘गांधीजींच्या फोटोला हार घालायचा आन नारळ तेवढा फोडायचा बघा उद्या.’
‘एवढंच ना ? करू की. बोलवा सगळ्याना अकरा वाजता.’ मी हुश्श.
दुसऱ्या दिवशी अकरा सव्वा अकराला मी ऑफिसात प्रवेश केला. सगळं सामसूम. माझ्या केबिनला छानपैकी टाळे लटकत होते अन झाडूवाली दोन दिवस आलेली नसल्यामुळे ऑफिसची जवळपास कचराकुंडी झालेली. मी बसण्यासाठी खुर्ची शोधण्याचा प्रयत्न करू लागले. इनवर्ड क्लार्क मुलगी तेवढी सिन्सिअरली इनवर्ड बुकात डोके घालून बसलेली. मला पाहून ती धडपडत उठली अन तिने शेजारच्या सहाय्यक इंजिनिअरची केबिन कुलूप खोलून उघडली.
‘किल्ली कुठाय माझ्या केबिनची ?’ मी सहाय्यकाच्या खुर्चीचा ताबा घेतला..
‘मोळेसाहेबांच्याकडे आहे मॅडम ‘ मोळे हे दुसरे सहाय्यक इंजिनिअर.
‘अन ते कुठे आहेत ?’
‘येणार होते आत्ता..’
तोपर्यंत माझ्या स्मार्ट ड्रायव्हरने दोघाचौघा स्टाफला अन एका इंजिनिअरला पुढे घालून आणले अन माझ्या पुढच्या खुर्च्यांना अन माझ्या ‘साहेब’पणाला शोभा आणली.
मोळेना फोन लावला गेल्यावर निष्पन्न झाले की ते आत्ताच इथून साईटवर गेले असून अर्ध्याएक तासात परत येतील.
‘मग आपण करून घेऊ ना पूजा ?’ मी.
‘मॅडम फोटो तर आतच आहे ना केबिनमध्ये ?’
‘ओह...’
तोपर्यंत कालची पेंडिंग मॅटर्स पुढे मार्गी लावण्याचा प्रयत्न मी अन आलेले टोणपे इंजिनिअर मन लावून करू लागलो. अर्धा तास होऊन गेला. मोळेचा पत्ता नाही. टोणपेनी त्यांना पुन्हा फोन लावला.
‘हो, हो, निघालो आहे ..दहा पंधरा मिनिटात येतो..’ मोळेनी पुढचा वायदा दिला.
एव्हापर्यंत पन्नासएक स्टाफ जमा झाला होता. आलेल्यांनी ऑफिसात जागोजागी अड्डे जमवले होते. मोळेच्या निरोपासरशी काहीजण उठले अन चहाच्या टपरीकडे निघाले.
ऊन ‘मी’च काय ‘तू’, ‘तुम्ही’ सुद्धा म्हणू लागलं होतं. वर फिरणाऱ्या एकुलत्या एक पंख्याच्या आडोशानं एक हवेची झुळूक मरगळून पिंगा घालत होती.
‘मॅडम, चहा सांगू ?’
‘बारा वाजता चहा ? असल्या उन्हात ? छे !’
आता ऑफिस मॅटर्सवरून बोलणे वैयक्तिक चौकशांवर घसरले. हवापाणी, एकमेकांच्या मुलाबाळांची, त्यांच्या शाळांची वगैरे चौकशी करून झाली. संभाषण खुंटले. काही क्षण मूक गेल्यावर टोणपे बाहेर जाऊन बसले. मी पंख्याची पाती मोजण्याचा प्रयत्न करू लागले.
आणखी अर्धा तास रेंगाळत पसार झाला. मोळे गायब.
या मोळ्याला मोळा मारून तसबिरीसारखे भिंतीला टांगावे, असे हिंसक विचार आता माझ्या मनात उसळू लागले. मघासपासून पिंगा घालून घालून ती इवलीशी हवेची झुळूकपण तापली, तशी मी उठले अन बाहेर स्टाफच्या रंगलेल्या गप्पांत सामील झाले.
पाच मिनिटांनी एक इनशर्ट वाला आत आला. अन टोणपेंच्या समोर बसला. अघळपघळ बोलू लागला. टोणपेनी माझी ओळख करून दिली तसा जरा सावरून बसला अन म्हणाला
‘नमस्कार. मी पत्रकार झाडबुके.’
‘नमस्कार.’ मी. ‘कोणते दैनिक आहे आपले ?’
‘अं, दैनिक नाही, साप्ताहिक आहे. पण प्रती भरपूर खपतात आजू बाजूच्या गावात वगैरे.’
‘असं. आज काय काढलं ?’
‘हे, हे. काही नाही, काय न्यूज आहे का पाहायला आलो होतो. टोणपे साहेब आपले मित्र.’
‘हं.. ’ मी टोणपेंच्याकडे वळून म्हटले
‘एक काम करा. मोळेंना म्हणावे एका स्टाफकडून किल्ली तेवढी पाठवा केबिनची.
‘पण हार, नारळ अन गुलाल मोळेच आणणार आहेत.’
‘ते आणायला ड्रायव्हरला पाठवा.’
का कोण जाणे, या बेताला टोणपेंचा विरोध असावा असे दिसले. पण आता जवळ जवळ एक वाजत आलेला. जमा झालेली मंडळी जेवणाच्या सुट्टीत पंगयाचा धोका दिसत होता. दोन क्षण विचार करून ते ड्रायव्हरकडे वळले.
इतक्यात मोळे लगबगीने आत आले.
‘काय हो, चाव्या खिशात ठेवून कसे काय जाता तुम्ही ?’ माझा पारा चांगलाच चढलेला.
‘नाही मॅडम, दुसरी चावी शिपायाकडे होती ना !’
‘मग कुठाय तो ?’
‘आज सुट्टी म्हणून कालची रजा घेऊन गावी गेला ‘ टोणपे.
अंगाचा तिळपापड संयमाच्या पुरचुंडीत गोळा करून मी केबिनमध्ये शिरले.
भिंतीवर एका भिंतीवर शिवराय, प्रतिभाताई अन गांधीजी झळकत असलेले अन दुसरीकडे बाबासाहेब आंबेडकर अन फुले पतीपत्नी सुहास्य करत असलेले.
गांधीजींना खाली घेण्यात आले. कोळीष्टके झटकून त्यांना खुर्चीवर स्थानापन्न केले गेले.एका तबकात नारळ, हार अन खडीसाखर ठेवून ते समोर मांडले गेले.
एकाएकी काळे ओरडले, ‘गुलाल कुठाय ?’
खरंच, गुलाल दिसत नव्हता.
‘ए गणा, जा रे गुलाल आण.’ मोळेनी एकाला फर्मावले.
‘साहेब, दुकानं बंद झाली आता..एक वाजून गेला..’
‘कुंकू चालेल का ? परवा गणपतीत आणलं होतं त्यातलं जरा शिल्लक आहे..’ कुणीतरी विचारले.
‘आण आण...!’
टोणपेंनी कुंकू पाण्यात कळवले अन भला थोरला टिळा गांधीबाबांच्या दोन भिवयांच्यामध्ये रेखला.
गांधीबाबांच्या चेहेऱ्यावरचे हास्य थोडे मावळल्यासारखे दिसू लागले.
‘हां मॅडम, घाला हार.’
मी हाराची दोन्ही टोके काळजीपूर्वक दोन्हीकडच्या खिळ्यांना गुंडाळली.
‘हा घ्या...’ नाना काळेंनी नारळ पुढे केला.
मी एकवार गांधीजींच्याकडे पाहिले. हाराच्या ओझ्याखाली त्यांचे हास्य काहीसे केविलवाणे झाले आहे असे मला वाटले.
‘महात्मा गांधीकी...’
‘जय...!!!’
मी ठाणकन नारळ फोडला.
पन्नास दुणे शंभर हातांनी निष्ठावंतपणे कडकडाट केला.
नारळाचे तुकडे अन खडीसाखर यांचे समान वाटप झाले अन मंडळी घाईघाईने पोटातल्या कावळ्यांना शांत करण्याच्या मार्गाला लागली.
टोणपे, मोळे अन इतर प्रतिष्ठित मंडळी माझा निरोप घेऊन उठले. काळेनाना समाधानाने ‘गांधीजयंती उत्साहात साजरी’ झाल्याचा रिपोर्ट लिहू लागले.
मी कुलूप घेऊन उठले. एक नजर गांधीबाबांकडे टाकली.
‘ह्याप्पी बर्थ डे मि. गांधी !’ मी किंचित मान तुकवली अन बाहेर पडले. माघारी वळून केबिनला कुलूप लावता लावता माझ्या कानावर एक सुस्कारा पडला.
‘....हे राम...!!’
प्रतिक्रिया
5 Oct 2013 - 4:54 pm | अनिरुद्ध प
बोला महात्मा गान्धी कि जय,
"हे राम"
5 Oct 2013 - 5:02 pm | तिमा
लेखन आवडले. तुम्हाला जो मेसेज द्यायचा होता तो वाचकांपर्यंत व्यवस्थित पोचलाय.
अवांतरः सरकारी कर्मचारी म्हणजे दावणीला बांधलेली गुरे आहेत, असा केंद्र व राज्य सरकारांचा सदैव समज असतो.
5 Oct 2013 - 5:06 pm | आतिवास
खुसखुशीत आणि कारुण्यजनक (बरोबर आहे ना शब्द?) असं दोन्ही :-)
5 Oct 2013 - 5:19 pm | दादा कोंडके
हा हा. मजा आली.
सरकारी कर्मचार्यांची शाळा सुटलीतरी जयंत्या आणि पुण्यतिथ्यांपासून सुटका नाही.
5 Oct 2013 - 5:36 pm | पैसा
बिचारे गांधीजी! वर्षभर भिंतीला लटकावून ठेवलेले असतात. एक दिवस सर्कारी हुकुमाने आठवण करायची आणि तीही अशी? हे राम!!
9 Oct 2013 - 8:26 pm | चैदजा
नाही हो !! तुम्ही तुमचा ID नेहमी विसरता. गांधीजींची आठवण नेहमीच असते सर्कारी कर्मच्यार्याला.
5 Oct 2013 - 6:08 pm | चौकटराजा
पंधरा ऑगस्ट , २६ जानेवारी , २ ऑक्टोवर या तीनही सुट्ट्या रद्द करून त्यादिवशी सरकारी कर्मचार्यानी फक्त आठ तास
इमानदारीत काम करावे. तीनही दिवसाना धन्य वाटेल ! ज्याना असे काम वर्षभर करावेच लागते उदा. डोंबिवली स्टेशनवरचा तिकीट क्लार्क .याना या दिवशी दुप्प्पट पगारी सुटी द्यावी.
5 Oct 2013 - 6:09 pm | प्रभाकर पेठकर
सुंदर, हलके-फुलके, खुसखुशीत लेखन. आवडले.
'झाडूवाली दोन दिवस आलेली नसल्यामुळे ऑफिसची जवळपास कचराकुंडी झालेली.'
'वर फिरणाऱ्या एकुलत्या एक पंख्याच्या आडोशानं एक हवेची झुळूक मरगळून पिंगा घालत होती.'
'अंगाचा तिळपापड संयमाच्या पुरचुंडीत गोळा करून मी केबिनमध्ये शिरले.'
'पन्नास दुणे शंभर हातांनी निष्ठावंतपणे कडकडाट केला.'
वगैरे वाक्ये विशेष उल्लेखनिय.
5 Oct 2013 - 6:38 pm | अत्रुप्त आत्मा
+++१११ :)
5 Oct 2013 - 6:22 pm | प्यारे१
खरंच हे राम!
5 Oct 2013 - 8:33 pm | मुक्त विहारि
मस्त..
5 Oct 2013 - 8:56 pm | मनीषा
राम राम --- अं नाही
हे राम !
5 Oct 2013 - 9:14 pm | राही
करुण विनोद आवडला. गांधीजींना याचीही सवय झालीच असेल आत्तापावेतो म्हणा. 'प्रभू, यांना क्षमा कर, ते काय करताहेत ते त्यांना समजत नाहीय' असे म्हणून सोडून देतील झाले.
5 Oct 2013 - 10:08 pm | चिगो
आमच्या कार्यालयात आणि आजुबाजूच्या सरकारी कार्यालयांत आम्ही गांधीजीपुजा न करता, कार्यालय आणि परीसर स्वच्छ करणे, कार्यालय( नीटनेटके करणे इ. केले.. गांधीबाबा खुष झाले असावेत, असा अंदाज आहे.. :-)
5 Oct 2013 - 11:24 pm | प्रचेतस
लेखन आवडले.
खुसखुशित संवादांतून प्रसंग उभे करण्याची हातोटी उल्लेखनीय आहे.
5 Oct 2013 - 11:50 pm | खेडूत
छान!:)
6 Oct 2013 - 12:38 pm | आदूबाळ
कुंकवापुरतं सौभाग्य... :(
पण हा अनुभव गांधीजयंती किंवा इतर सरकारी कार्यक्रमांपुरताच नाही. "मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव" अशा सर्वच ठिकाणी येतो.
6 Oct 2013 - 8:11 pm | एस
तितकेच छान प्रतिसाद पेठकरकाका, चिगो, आदूबाळ आणि इतरांचे.
6 Oct 2013 - 8:20 pm | यशोधरा
लिखाण आवडलं.
6 Oct 2013 - 8:40 pm | रेवती
खरच हे राम! लिखाण आवडलं.
7 Oct 2013 - 10:23 am | मदनबाण
रघुपती राघव राजा"राम" पतित पावन सिता"राम"
हे कुछ कुछ होता हे या चित्रपटातल्या याच गाण्याच्या वेस्टर्न मोडवर म्हंटले गेले आहे असे समजुन घेणे. ;)
7 Oct 2013 - 11:02 am | मितान
लेखन आवडले. :)
7 Oct 2013 - 1:14 pm | ज्ञानोबाचे पैजार
एखादा प्रसंग खुलवून सांगण्याच्या स्नेहाताईंच्या हातोटी बद्दल काय बोलावे, ते मस्तच जमले आहे नेहमी प्रमाणे
सरकारी कर्मचार्यांशी नेहमी टेबला समोरुन आणि कधिकधि टेबलाखालुन संबंध येत असल्य मुळे त्यांच्या बद्दल सहानुभुती तर कधिच वाटत नाही. त्या मुळे प्रसंग वाचुन बरे वाटले. त्या दिवशी सुट्टी न मिळाल्याबद्दलची जळजळ थोडी कमी झाली.
फक्त एखादे लांबलचक भाषण पण झोडले असते नारळ फोडल्यावर तर अजुन बरे वाटले असते.
रच्याकने :- गांधीबाबा म्हणजे काय मारुती आहे का नारळ फोडायला?
8 Oct 2013 - 3:57 am | स्पंदना
नशिब! गांधीबाबांनी दुसरी मान पुढे केली नाही हार घाला म्हणुन!
काय एकेक पंचेस आहेत. वाह! खुर्च्यांना अन साहेबपणाला शोभा काय, संयमाची पुरचुंडी काय, आग्गागागा, विचारु नको.
8 Oct 2013 - 10:58 am | सुधीर मुतालीक
ल्ल भारी ! शॉटावर शॉट हन्लयिसा !!! गांधी जयंतीचा पार बेंदूरच. गुलाल काय अन खडीसाकर काय !!! बाबाला एकदिवस दारूचाबी निवद दावतील. एकदम बेश्ट लिवलयिसा !!
8 Oct 2013 - 11:30 am | सौंदाळा
सुंदर मुक्तक, मज्जा आली वाचताना.
9 Oct 2013 - 12:48 pm | सस्नेह
सर्व वाचक आणि प्रतिसादकांचे आभार !
आय ई वापरल्यामुळे काही टायपो मिस्टेक्स राहिल्या त्याबद्दल क्षमस्व.
स्वसंपादन लवकर सुरू होवो.
9 Oct 2013 - 2:54 pm | अभ्या..
मस्त लिहिलेय स्नेहातै. अगदी परफेक्ट वातावरण उभे केलेस.
तुझ्या समर्पक शबदरचनांचा वापर लैच आवडतो. बांधीव अन अनुभवसमृध्द लिखाण.
खूप खूप शुभेच्छा. :)
9 Oct 2013 - 3:04 pm | बॅटमॅन
जबराट आवडल्या गेले आहे लेखन. नेमक्या शब्दयोजनेमुळे अन "मॅटर-ऑफ-फॅक्ट" शैलीमुळे अधिकच परिणामकारक झालेय.