भारतीय भोंगाशास्त्र !

ब़जरबट्टू's picture
ब़जरबट्टू in जनातलं, मनातलं
22 May 2013 - 4:46 pm

मंडळी, मिपावर पहिल्यादाच लिहायचे धाडस करतोय. सर्व जेष्ठ, श्रेष्ठ जाणत्याचा कळावे लोभ असावा.

विदेशवारीला भारतात आलेल्या एका जर्मन ला दिलेली ही दीक्षा आहे. म्हणजे द्यावीच लागली हो…

तर मुळात हापिसच्या कामासाठी भारतात आलेला हा प्राणी. आत्ता फारिनर (त्याला काय काम सांगायचे का ?) व गोरा म्हनल्यावर काय मजा होती.राव . हिकडचे काहीही काम न करता हादडुन हाण्डी वर येणार म्हनुन सकाळी सकाळी धावायला सुरुवात करतो म्हणाला. कर बाबा म्हटले . आपल्याला तर हे काही पटत नाही. असे धावून धावून पोट कमी झाले असते तर तो रमेश पोवार असा सुजला असता का ? आणि पोहल्याने बारीक होत असते तर पाम्पलेट ला ईव्हडा भाव असता का ? बरं ते जाऊ द्या.

तर सुरवातीला बिचारा दररोज जोशात घरुन निघायचा व अर्ध्या रस्त्यातुन भेदरलेल्या कोकरासारखा घाबरुन परतायचा. एकदा ढसाढसा आत ओतल्यावर त्याची व्यथा बाहेर आली
.
काय तर म्हणे , दररोज सकाळी हा रस्त्याच्या कडेने व (अस्तिव असल्यास) पदपाथाने धावायला जायचा. व मागुन येणा-या वाहनाचा भोंगा वाजला का गोंधळून जायचा. मुळात आपले काय चुकतेय तेच बिचा-याला कळेना. असल्या काही प्रकाराची त्याला सवयच नव्हती. ( आपल्याकडे नसला तरी भोंगा बडवणे विदेशात अपमान करण्यासारखे आहे म्हणे …. )

जर्मन म्हणाला, स्थिरावला समाधित तो स्थितप्रज्ञ कसा असे ?
आयला जर्मन गीता कसा गायला लागला म्हणून मी डोळे चुरू लागलो. पण नाय जरा जास्त झाली होती राव । ते बेणं तर ईचारत होत….

रस्त्यावरुन तुमच्या धावू कसा ? फिरू कसा ? चालू कसा ?

म्हणाला शरण तुम्हा आलो, तुम्हीच योग्य ती दीक्षा द्या… आता इव्हडी स्तुती एकूण आमची छाती फुलुन आली (पोट कधीचाच फुगले होते ) अन क्षणात आमचा मुरली मनोहर झाला बघा .. म्हणालो गुपित तुला सांगतो वत्सा, येथी चालायची कैसे. जीव वाचवायचा कैसे...आणि त्यानेच आर्डर केलेल्या मच्छी प्ल्याटरचा दुवा उडवत आम्ही तेंस भारतीय भोंगाशास्त्राचा महिमा वर्तविला, तो असा…

अध्याय पहिला :-
तुम्ही रस्ताच्या अगदी कडेने जाताहेत अगदी पायाखालच्या मुन्गीकडेही तुमचे बारीक लक्ष आहे. व आपण कुणाच्या अध्यात मध्यात नाही याची तुम्हाला पुर्ण जाणिव आहे… - मागुन अगदी छोटा आणि एकदाच भोंगा वाजतो. -- अजिबात घाबरायचा नाय. ह्या भोंग्याचा काहिही धोका नसतो. ती फक्त एका सुचना असते, की तुमचे शुद्र अस्तित्व वाहनचालकाने मान्य केले आहे. आहे तसाच चालत रहा. वळलास, हाललास, अगदी शिंकरलात तर मेलास म्हणुन समज.

अध्याय दुसरा :-
तुम्ही रस्ताच्या कडेने जाताहेत (अगदी नाही बरं का) आणि पदपाथावरुन चालना-या श्वानावर तुमचे बारीक लक्ष आहे ( व याला हे कसे जमते याचे आश्चर्य आहे) . व आपण कुणाच्या अध्यात मध्यात नाही असा तुमचा समज आहे. …- मागुन थोडा मोठा पण एकदाच भोंगा वाजतो - थोडे घाबरा.. मागे वळून पहा.. आपण किती मोठी चुक करणार होतो ( चुक काय हे आपल्याला समजणे येथे गौण असते) व फक्त त्या ईश्वररुपी वाहनचालकामुळे तुम्ही भुतलालावर आहात हे त्या एका कुत्सित नजरेत तुम्हाला जाणवेल. बाजूला सरका. विसरू नका - तुमचे रस्त्यावरील अस्तित्व नेहमप्रमाणे शुद्रच आहे.

अध्याय तिसरा (खंड १ ) :-
तुम्ही रस्ताने जाताहेत (मग आपल्या बापाचा नाय का पैसा लागला तो बनवण्यात असा तुमचा रुबाब आहे.) आणि पदपाथावरुन चालना-या म्हशीवर तुमचे बारीक लक्ष आहे ( मुळात तिला अडचण होऊ नये म्हणूनच तुम्ही उदार मनाने रस्त्यावरुन (बापाच्या) चालताहेत). व आपण कुणाच्या अध्यात मध्यात येऊचा शकत नाही असा तुम्हाला आत्मविश्वास आहे. मागुन अतिशय मोठठा व कर्णकर्कश भोंगा बडवल्या जातो. चालक प्राणी भोंग्यावरच बसलाय हे पण जाणवते.. घाबरा असे सांगणार नाय, तुम्हाला केव्हाच घाम फुटायला सुरवात झालेली असते. खाली नजर गेल्यावर लक्षात येते की पदपाथ काळा झाला आहे आणि बाकी सर्व त्याला रोड समजताहेत. बाप पण दूर दूरपर्यंत दिसत नाहिये.

मागे वळून पहा . - एक अतिशय थंड नजर तुम्हाला सोलुन काढत असते. आता हुश्श म्हणायला हरकत नाही. सहसा ही थंड नजर वातानुकुलित वाहनाच्या काचाआडुनच असते, व ती बर्यापैकी लौकर थंड पण होते. (गाडीबाहेर पडुन आपल्यासारख्या तुच्छ प्राण्याबरोबर बाचाबाची करण्यात त्याला वेळ नसतो, आणि वर उन्हाची, हापिसात लेट होण्याची, कपडे खराब होण्याची त्याला फार चिंता असते. ) थोडेसे ओशाल्यागत हसा.. .तो पुढे निघुन जातो, पण ते नजरेने लेखलेले तुच्छपण तुमचा पिछा काही सोडत नाही.

अध्याय तिसरा (खंड २ ) :-
मघासारखेच कुणाच्या अध्यात मध्यात नसलेले तुम्ही रस्त्यावरची "हिरवळ" न्हाहाळत रस्त्याच्या मध्ये घसरलाय… मागुन अतिशय मोठठा ( पावर हार्न का काय म्हणतात त्याला ) कर्णकर्कश भोंगा बडवल्या जातो. - तुम्ही मागे वळून पाहता, एक (सहसा पांढरी ) गाडी बिनाचालक तुमच्या बुडाला टेकुन उभी असते. बिनाचालक ही गाडी ईथे कशी ब्ब्वा ? असा ईचार मनात येईपर्यन्त तुमच्या कानाखाली भूकंप झाला असतो. क्षणात रोडवरील सर्व गाड्या फेरारी झाल्यासारख्या शांत होतात ( त्या सुजलेल्या कानावर दुसरा आवाज जातच नाय.) हळूहळू जाणीव आल्यावर "ब,भ" ची बाराखडी कानावर पडते. एक काळा पैहलवान (मग असल्याशिवाय हिम्मत करेल का तो ?) तुम्हाला कुठून सोलायचा याची पूर्वतयारी करता असतो.. मघाशी कानाखाली वाजलेल्या दवंडीमुळे आत्ता मस्त तमाशा पाहायला मिळणार म्हणून दर्शक जमलेले असतात. तर घाबरू नका. आत्ता कानाखाली वाजल्यावर घाबरुन काय फायदा तसा पण ?
अंगात विरश्री चढल्याप्रमाणे फेरहमला करा. शरीरात नसला तरी आवाजात जोर आलाच पाहीजे… ( उसना असला तरीबिन चालेल). . रस्ता त्याच्या बापाचा आहे का विचारा (सहसा नसतोच). लक्षात ठेवा, दबलात तर सुजवल्याशिवाय सोडणारा नाही तो सांड. एव्हडे होतपर्यंत तेथे ब-यापैकी न्यायमुर्ती तयार झालेल्या असत्यात. मग त्यांच्या कृपेने भेटलेला आशिर्वाद व प्रसाद घेऊन आज कुणाचे तोंड पाहीले होते हे आठवत पुढे निघा.

अध्याय तिसरा संपेपर्यंत वत्साचा दस्त सुरु झाल्यासारखा चेहरा झाला होता. आपापर्यंत डोक्यात असलेली बियर कंबरेपर्यंत खाली उतरली होती.
वत्स म्हणला, नारायणा ! असा कसा तुमच्या देशात अजब न्याय ? रस्त्यावरुन जाण्या-या सामान्यांना किंम्मतच नाय ?

म्हणालो बाबा आमच असच हाय. आम्हाला मरणाची घाई हाय, आन त्या भोंग्यावरच आमचा राग, लोभ, माया हाय,. आम्हासारखी बिझी समस्त भुतलावर कुनिबिन नाही. आम्हाला आमाच्या गाडीपुढे आलेला गरीब चालत नाही, श्रीमंत चालत नाही. खंगलेल्या जीवांची तमा झिंगलेल्या डोळ्यांना नाय. सांडलेल्या रक्तापेक्षा आणि फाटलेल्या कातडीपेक्षा गाडीला आलेल्या सुरुकुत्याची आम्हाला जास्त पर्वा हाय.

वत्साला ईशारा कळला होता. आणि आमचा पण दुष्टांत संपला होता…

निघालो शेवटी गाडीकडे झिंगतच भोंग्यावर बसायला.......

समाजसमीक्षालेखअनुभव

प्रतिक्रिया

मी_आहे_ना's picture

22 May 2013 - 5:03 pm | मी_आहे_ना

मस्त खुसखुशीत्..मिपावर स्वागत.

ओह, मला वाटलं भारतीयांच्या कपाळी असलेल्या 'भोगां'बद्दल काही आहे काय ?
जरा अनुस्वार सुधरून घ्या हो भौ संमंला सांगून !

प्यारे१'s picture

22 May 2013 - 6:32 pm | प्यारे१

+१
('कपाळी असलेल्या' वगळून) डि ट्टो.

जेपी's picture

22 May 2013 - 5:44 pm | जेपी

****

लाल टोपी's picture

22 May 2013 - 5:51 pm | लाल टोपी

मिपावर स्वागत आहे.. चांगलं लिह्लं आहे आवडलं

सोत्रि's picture

23 May 2013 - 12:52 am | सोत्रि

मस्त खुशखुषीत लेख.

- (भोंग्यावर अवलंबून रस्त्यावर चालणारा) सोकाजी

स्पंदना's picture

23 May 2013 - 7:06 am | स्पंदना

शिर्षक वाचुन लेख उघडावा की नाही असा प्रश्न पडला राव.
नाही काय आहे, हल्ली अश्या चर्चा उघडपणे करण याला प्रगतीशील म्हंटल जात ना?
म्हणजे लैगिकता, त्यात आणि वर ती स्त्रीयांची लगेच पब्लिक खेचल जाव अशी अपेक्षा असते.
आता माझ मत विचाराल तर मी म्हणेन एक पायरी पुढे प्रगती करा, अन मातृत्वावर अथवा पितृत्वावर चर्चा करा. तसाही योग्य मातापित्यांनी समाजाला फरक पडेल, नुसत्या असल्या चर्चांनी समाजाला काय फायदा?

आता मूळ लेखाकडे वळु.
मश्तु लिहिल आहे. आमच विदेशी चिरंजीव भारतात आल्यावर टॅ टॅ वाजणार्‍या या भोंग्यांवर लय म्हणजे लय खुष होते. आता त्या जर्मनाला त्याची चव काय?

ब़जरबट्टू's picture

23 May 2013 - 10:20 am | ब़जरबट्टू

टिकली चा घोळ लक्षात आलाय व दुरुस्त झालाय. पहिलेची पुस्तक "पिवळे" होणार हुते बघा. धन्यवाद !

पैसा's picture

23 May 2013 - 10:26 am | पैसा

काल लेखाचं शीर्षक बघून उघडायची हिंमत झाली नव्हती. पण आज लेख वाचला आणि आवडलाच!

रमताराम's picture

24 May 2013 - 4:27 pm | रमताराम

खुसखुशीत लेख. आगमन झोकात साजरे केले आहे. पुलेशु.

तिमा's picture

24 May 2013 - 4:53 pm | तिमा

भोंग्यामागे बसलो होतो. पुढे तीन तरुण रस्त्यामधोमध चालत होते. मनांत म्हटलं, बिचार्‍यांना उगाच आपल्या गाडीचा माज का दाखवा ? शिवाय मला कसलीच घाई नव्हती. मी त्यांच्या चालण्याच्या वेगाशी माझा वेग अ‍ॅडजस्ट केला. साधारण अर्ध्या मिनिटाने
तिघंही दचकून बाजूला झाले.(गाडी टच झाली नव्हती) एकाने काचेवर टकटक केले. काच खाली केली. 'ओ, येवढे शिकलेले वाटता,
साधा भोंगा वाजवायचे कळत नाही? "
(ह्यात माझी गाडी किती सायलेंट आहे हे सांगायचा प्रयत्न नाही, हल्लीच्या सगळ्याच तशा असतात)

-- तिरशिंगराव भोंगाघाणे

मदनबाण's picture

24 May 2013 - 6:58 pm | मदनबाण

ही भोंगा वाजवणारी माझ्या लयं म्हणजी लयं डोक्यात जातात.
समोर सिग्नल लागला आहे तो "लाल" आहे तरी काही लोक सारखे पीप्प पीप्प चालुच असतात...
ट्रॅफिक जाम आहे बराच वेळ वाहने एकाच जागी उभी आहेत,काही वाहनांनी त्यांचे इंधन वाचवण्यासाठी इंजिन बंद केलेले आहे,तरी काही मंडळींचे पीप्प पीप्प चालुच असते...
मध्यंतरी प्रवास करतान एक स्कुटी चालवणारा इसम रोज त्याच वेळी माझ्या मागे असायचा... जरा क्षण झाला नाय की याचं पीप्प पीप्प चालु ! माझी जाम सटकायची (मग मनात उगाच शांत गदाधारी भीम शांत असे स्वतःच स्वतःला समजवायचो !)परत परत त्याचे पीप्प पीप्प चालुच ( परत मी मनात मायला या बैलाला काय घाई झाली आहे ? काय मंगळावर पोहचायची घाई झाली आहे काय ?) परत (शांत गदाधारी भीम शांत असे स्वतःच स्वतःला समजले) परत पीप्प पीप्प ! (परत मी मनात च्यायची कटकट... काय मचमच आहे ? उद्या दिसला ना असाच तर टायरची हवाच काढुन टाकीन बघ.) परत पीप्प पीप्प... सिग्नल सुटला एकदाचा आणि मी पण त्या पीप्प पीप्प मधुन !

जेपी's picture

25 May 2013 - 8:21 pm | जेपी

सात वाजता सकाळी ,
भोंगा वाजे भुपाळी ...
नावाची कविता आठवली

आदूबाळ's picture

25 May 2013 - 10:12 pm | आदूबाळ

नारायण सुर्वे का हो?

कोमल's picture

25 May 2013 - 10:15 pm | कोमल

पिपिप्प.. पों पों..

मिपावर वड्डकम..
मस्त किस्सा.

सांडलेल्या रक्तापेक्षा आणि फाटलेल्या कातडीपेक्षा गाडीला आलेल्या सुरुकुत्याची आम्हाला जास्त पर्वा हाय.

हे जरा नाही पटले बॉ. अर्थात प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात पण आय ठिन्क कि अशी मंडळी कमी असावीत इन्ड्यात.
पण किस्सा आवडेश.

तुमचा अभिषेक's picture

26 May 2013 - 2:20 pm | तुमचा अभिषेक

छान खुसखुशीत आवडले

नानबा's picture

27 May 2013 - 10:02 am | नानबा

पु. ले. शु.

मुक्त विहारि's picture

27 May 2013 - 10:20 am | मुक्त विहारि

मस्त लेख...

वेल्लाभट's picture

27 May 2013 - 11:33 am | वेल्लाभट

मी चालत वा चालवत असताना मागच्या बाहनाने त्याचा कर्कश्य हॉर्न माझ्यावर लादला तर जी तिडीक जाते डोक्यात म्हणून सांगू ! तिथल्या तिथ्थेच... असो.
त्याहून जास्त राग तेंव्हा येतो जेंव्हा आपलं आपल्याला सांभाळत चालणा-या आजी आजोबांच्या मागे जाऊन पैशाने माजलेली भिक्कारचोट मंडळी हॉर्नचा ठणाणा करतात. बाकी लोकं अरे ला कारे करतील, पण इथे एखाद्याचा खेळ खलास होऊ शकतो एवढं समजण्याचीही अक्कल उरलेली नसते त्यांना. एक राज्यव्यापी जन-अभियान काढायला हवं... वाजवेल त्याला वाजवू किंवा तत्सम नावाने...

गाडी रॅश चालवत कर्कश्य हॉर्न वाजवला की सण्ण्ण्ण्ण.......

असो.....

छान लिहिलंय.... आवडलं. सही.

प्रभाकर पेठकर's picture

27 May 2013 - 6:24 pm | प्रभाकर पेठकर

इथे मस्कतात (किंवा तसेही सर्व आखातात) गाडीचा भोंगा वाजवण्याची तेवढी गरज भासत नाही. त्या मुळे भोंगा वाजवण्याची सवयच नव्हती. भारतात जेंव्हा वाहन चालविण्याच्या परवान्यासाठी वाहन प्रशिक्षण संस्थेत (ड्रायव्हिंग स्कुल) नांव नोदविले आणि सराव सुरु केला तेंव्हा मी भोंगा वाजवायचो नाही. तेंव्हा प्रशिक्षक वैतागुन म्हणायचा, ' अहो! हॉर्न वाजवा. इथे पुण्यातली माणसं गाडी पाहिली तरी हॉर्न वाजल्याशिवाय बाजूला होणार नाहीत आणि जेंव्हा तुम्ही हॉर्न वाजवाल तेंव्हाही 'काय मेली कटकट आहे, रस्त्यात चालूही देत नाहीत' असा जळजळीत दृष्टीक्षेप टाकून, तुमच्यावर उपकार केल्यासारखी सावकाssssश बाजूला होतील.' पुढे तसा अनुभव अनेकदा घेतला.

ब़जरबट्टू's picture

28 May 2013 - 10:00 am | ब़जरबट्टू

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मुळात मला या भोंग्यांचा प्रचंड राग येतो बघा. आपल्या घाईमुळे आपण किती लोकाना त्रास देतोय हे ह्या येड्याना समजतच नाही.

स्नेहांकिता - ताय, तो बदल केलाय। आता तरी लेख वाचा ब्बा

वेल्लाभट - काढा राव एकदा मंडळ, आम्ही हजेरी लावतोच.

कोमल - मी इथे वाहनचालकाच्या प्रतिक्रियेतुन बोलतोय. रस्त्यावरील ईतर लोक मदतीला धावतात आणि बळजबरी करतात म्हणून फक्त जखमिंना दवाखान्यात नेतात ही लोक. मागे तर असेच जखमीला रस्त्याच्या कडेला टाकल्याचा किस्सा आला होता न्युजमधे. असो, अर्थात प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात

ब़जरबट्टू's picture

28 May 2013 - 10:00 am | ब़जरबट्टू

आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद ! मुळात मला या भोंग्यांचा प्रचंड राग येतो बघा. आपल्या घाईमुळे आपण किती लोकाना त्रास देतोय हे ह्या येड्याना समजतच नाही.

स्नेहांकिता - ताय, तो बदल केलाय। आता तरी लेख वाचा ब्बा

वेल्लाभट - काढा राव एकदा मंडळ, आम्ही हजेरी लावतोच.

कोमल - मी इथे वाहनचालकाच्या प्रतिक्रियेतुन बोलतोय. रस्त्यावरील ईतर लोक मदतीला धावतात आणि बळजबरी करतात म्हणून फक्त जखमिंना दवाखान्यात नेतात ही लोक. मागे तर असेच जखमीला रस्त्याच्या कडेला टाकल्याचा किस्सा आला होता न्युजमधे. असो, अर्थात प्रत्येकाला वेगवेगळे अनुभव येतात