पूल

मिसळलेला काव्यप्रेमी's picture
मिसळलेला काव्यप्रेमी in जे न देखे रवी...
19 May 2013 - 4:30 am

हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'तो' असतो तिथे
धुकेही असते त्याच्या बरोबर
हो, रात्रिचे गर्द धुके... गुढ...
बर्‍याचदा 'ति'चा आवाज
गारुड करतो त्या धुक्यातून
त्याच्या पोटात एकच प्रश्न
या धुक्यात आवाज'सुद्धा' अडकतो?
हम्म.. हा पूल कधीच शांत नसतो
----
कधी 'ती' असते तिथे
त्याने दिलेले पिंपळपान घेऊन
जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद
खुप जपलयं तिने ते पान
ऊन-वार्‍यापासून, पावसापासून
कधी कधी तिला प्रश्न पडतो
तिच्या हातातले पिंपळपान
जास्त जिवघेणी शिक्षा,
कि,
तिच्या डोळ्यातली डबडबलेली
'त्या'ची प्रतिक्षा?
पूलावरचा मिणमिणता दिवा
थकुन थरथरत क्षीण झाल्यावर ती निघुन जाते
दिवा तसाच तिथे फडफडत असतो
हम्म... हा पूल कधीच शांत नसतो
----
आता त्या पूलाचा ताबा
नभातला चंद्र आणि
पूलाखालून वाहणारे पाणी घेते
त्यांच्या ओढाताणीत पूलाची फरफट होते
त्याची अडचण हि की दोन्ही किनार्‍यांना
या ओढाताणीत धरुन कसे ठेवायचे?
ह्या विवंचनेचा अंधांर त्याला
पुन्हा एकदा घेरतो
हम्म... हा पूल कधीच शांत नसतो
----
असं म्हणतात कि पूल दोन किनार्‍‍यांना
जोडण्यासाठी असतात..
पण ते खरं नाही
किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात
पूल मात्र बिचारे उगाच
आपला जीव टांगणीला लावतात
-----
खरचं
हा पूल कधीच शांत नसतो

|- मिसळलेला काव्यप्रेमी -|
(१८/०५/२०१३)

कविताप्रेमकाव्यमुक्तक

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

19 May 2013 - 4:50 am | यशोधरा

सु रे ख.

प्रचेतस's picture

19 May 2013 - 8:34 am | प्रचेतस

वाह!!!!!! मिका वाह!!!!!!!!!!

अप्रतिम.

प्रभाकर पेठकर's picture

19 May 2013 - 10:33 am | प्रभाकर पेठकर

अरे व्वा! मस्त आहे कविता. पुलाची अशांतता अस्वस्थ करणारी आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 May 2013 - 10:45 am | डॉ सुहास म्हात्रे

किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात
पूल मात्र बिचारे उगाच
आपला जीव टांगणीला लावतात

क्या बात है ! हे एकदम भावलं !!

अत्रुप्त आत्मा's picture

19 May 2013 - 11:37 am | अत्रुप्त आत्मा

+1 टु इस्पिक काका :-)

तिमा's picture

19 May 2013 - 11:06 am | तिमा

विशेषतः किनारे व पूल यावरील भाष्य.
कवितेतली ही ओळ वाचताना,

पिंपळपान घेऊन
जिर्ण, जर्जर, जाळीदार अन् गडद
उगाचच, आचार्य अत्र्यांनी उद्धव ज. शेळके यांच्या एका गोष्टीची केलेली चिरफाड आठवली.

चाणक्य's picture

19 May 2013 - 12:49 pm | चाणक्य

शेवट विशेष आवडला.... क्या बात है..

अभ्या..'s picture

19 May 2013 - 2:15 pm | अभ्या..

मस्त मिका. आवडली पुलाची व्यथा.
आजकाल सगळ्यांच्या व्यथा यायलागल्यात. पुलानेच काय घोडे मारलेय. ;)
बाकी मध्यस्थांची होतेच अशी ओढाताण.

प्यारे१'s picture

19 May 2013 - 2:43 pm | प्यारे१

कविता आवडली रे.
(त्या पुलाला बरं वाटेल असं लिही एकदा. ;) )

किसन शिंदे's picture

19 May 2013 - 4:40 pm | किसन शिंदे

कविता आवडली!!

पैसा's picture

19 May 2013 - 5:15 pm | पैसा

कविता आवडली!

Bhagwanta Wayal's picture

19 May 2013 - 7:32 pm | Bhagwanta Wayal

हा पुल कधीच शांत नसतो...
वाहवा..! क्या बात है. सुरेख रचना..

Bhagwanta Wayal's picture

19 May 2013 - 7:34 pm | Bhagwanta Wayal

हा पूल कधीच शांत नसतो
----
वाहवा..! क्या बात है. सुरेख रचना.

अनिदेश's picture

20 May 2013 - 4:11 pm | अनिदेश

असं म्हणतात कि पूल दोन किनार्‍‍यांना
जोडण्यासाठी असतात..
पण ते खरं नाही
किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात
पूल मात्र बिचारे उगाच
आपला जीव टांगणीला लावतात

काय लिहिलय....सुभान अल्लाह ....!!!

आगाऊ म्हादया......'s picture

24 May 2013 - 8:41 am | आगाऊ म्हादया......

असं म्हणतात कि पूल दोन किनार्‍‍यांना
जोडण्यासाठी असतात..
पण ते खरं नाही
किनारे किनार्‍यांच्याच जागेवर राहतात
पूल मात्र बिचारे उगाच
आपला जीव टांगणीला लावतात
-----
खरचं
हा पूल कधीच शांत नसतो

मिका …ख़ुप भारी मित्रा !!!