वाड्याबाहेरील जग सुट्टीमध्ये फक्त कोणी मोठं सोबत असेल तरच पाहता यायचे एवढे कडक निर्बंध लहान मुलांच्यावर होते. रोज संध्याकाळी व्हासा झाल्यावर आजोबा आपली छडी घेऊन बाहेर पडत. ती छडी म्हणे त्यांनी पार्श्वनाथजीला* जाऊन ११ वेळा भगवान पार्श्वनाथ यांचे दर्शन घेतले म्हणून तेथील महाराजांनी भेट दिली होती. आजोबा वाड्यातून बाहेर पडायला लागले की जे कोणी लहान जवळ असेल, मग अक्का असो, सन्मती असो, सरु असो की मी असो. त्यातील एकाला सोबत घेऊन जात. त्यांचा हा रिवाज माहीत असल्यामुळे ते व्हासा करायला बसले की मी त्यावेळे पासून ते बाहेर पडण्यासाठी मोठ्या दरवाजाजवळ येवू पर्यंत मी त्या दरवाज्या जवळच घुटमळत असे. त्यामुळे ९९% मीच त्यांच्या सोबत बाहेर पडत असे.
डोक्यावर गांधी टोपी, डोळ्यावर काळी फ्रेम असलेला चष्मा, पांढरा शुभ्र सदरा, तेवढेच स्वच्छ पांढरे धोतर, हातात छडी, सदर्याच्या डाव्या खिश्यात साखळीवाले घड्याळ व एका हातात धोतराचे टोक. आजोबा जरी म्हातारे असले तरी त्यांनी गावातील व्यायामशाळेत दणकून व्यायाम करुन व जेवणानंतर शतपावली वर्षानू वर्ष करून आपले शरीर पिळदार ठेवले होते. मामा सांगायचा जेव्हा तो लहान होता तेव्हा आजोबा जोर मारायचे व हा मोजायचा. दंडबैठका मध्ये तर आजोबाचा हाथ धरणारा कोणी नव्हता त्या व्यायाम शाळेत. आजोबा जर आनंदात असले तर दर्शनमात्रे मधील श्लोक गुणगुणत जायचे व मध्येच मला कधीतरी नमोकार मंत्र म्हण रे, नाही तर चल २४ तिर्थंकरांची नावे सांग पाहू ते पण क्रमाने. असाले प्रश्न विचारून मला कोंडीत पकडायचे. अश्यावेळी काय करायचे हे माझं ठरलेले असायचे, गपचूप नमोकार मंत्र म्हणायचे व तीन वेळा म्हणून गप्प बसायचे, कारण आजोबा बाहेर पडले आहेत म्हणजे गावातील जाणकार व मोठी लोक त्याच वेळी घरातून बाहेर पडलेली असायचीच. त्यामुळे कोणी ना कोणी भेटायचे व मुळ मुद्दा बाजूला पडायचा.
गावातील मोठ्या वडाच्या झाडाखाली असलेल्या पारावर ही सगळी म्हातारी लोक जमा होत व गप्पा मारत, सगळा विषय शेती, पाणी, पाऊस व गुरे यावर फिरत असे. पाराच्या समोर गुलाबमामाचे पानाचे दुकान होते, त्याच्या दुकानात काचेच्या बरण्यामध्ये लाल गोळ्या ठेवलेल्या मला लांबून पण दिसायच्या व मी आजोबांना फक्त एवढेच विचारायचो "आप्प्पा, गुलाबमामा!" डोक्यावर टपली मारुन आजोबा हसायचे व जा असे मानेने सांगायचे. गुलाबमामा मुसलमान, आमच्या वाड्याच्या गल्लीत एका टोकाला त्यांचे घर होते, ते रोज वाड्या समोरुन येता जाता दोन्ही हात वर जोडून "नमस्कार री" असे जोराने म्हणून पुढे निघून जायचे. त्यांचा तो नमस्कार कोणाला असे हे मला कधी कळले नाही, कारण दरवाज्यावर कोणी असले नसले, दरवाजा उघडा असला नसला तरी त्या नमस्कारात खंड असलेला मला तरी आठवत नाही. गुलाबमामाच्या दुकाना समोर गेल्या गेल्या गुलाबमामा हसून स्वागत करायचा व म्हणायचा "बररी सावकार! लाल गुळगी बेकू?" मी हसून हात पुढे केला की पटापट २-३ गोळ्या हात ठेवायचा व मी लगेच धूम ठोकून आजोबांच्याकडे पळायचो.
मी पारावर पोचू पर्यंत आजोबा निघायच्या तयारीत उभे राहायचे, डोक्यावरील टोपी नीट करायचे, खिश्यातील घड्याळ काढून वेळ बघायचे, धोतराचे टोक एका हातात व छडी जमीनीवर दोनदा आपटून "नडीर, बरतेव!" म्हणायचे व सरळ चालायला सुरवात करायचे, मागू बाकीचे "बररी सावकार" म्हणायचे पण आजोबा तिकडे लक्ष न देता सरळ बस्तीकडे चालु लागायचे. बस्तीत पोचल्या पोचल्या आतून पुजारी जवळ जवळ धावत यायचे, बाजूच्या विहीरीतून एक बादली पाणी मोटीने काढून तेथे उभे रहायचे. मग आजोबा त्यातील पाण्याने पाय धुवायचे, चेहर्यावर थोडे पाणी शिंपडायचे व मानस्तंभाकडे चालू लागायचे. मी पटापट आजोबानी जे जे केले ते सगळे करायचो व धावत पळत त्यांच्या मागे जाउन उभा राहत असे. मानस्तंभाचा पहिला भाग जो जमिनीकडून वर जातो तो माझ्या उंच पेक्षा पण उंच होता व ते मला माहीती होते तरी त्या भागावर चढण्याची माझी नेहमी धडपड असे, कारण येणारा प्रत्येक भाविक तेथे मनूके, बदाम व तांदूळ वाहत असे, तांदूळ मध्ये मला रस नव्हता पण मनूके व बदाम हवे असायचे. आजोबा माझी धडपड बघायचे व छडीने पार्श्वभावर हलकासा मार देऊन मुख्य मंदिराकडे जायचे. मागू आलेले पुजारी पटकन मला उचलायचे व मी हातात येतील तेवढे मनुके व बदाम गोळा करत असे, तोच आतून आजोबा बोलवायचे.
बस्तीमध्ये असे धीरगंभीर होऊन बसलेले आजोबा, समोर पार्श्वनाथ स्वामी तसेच पद्मासनात स्मित करत बसलेले, उजवीकडे कोपर्यात पदमावतीदेवी व डावीकडे कोणीतरी गंधर्व सगळेच चूप! थोड्यावेळाने माझी चुळबुक वाढत असे, मग समोरील पाठावर असलेल्या तांदूळामध्ये स्वस्तिक काढ, झाड काढ असले खेळ चालु होत असे किंवा कोणी कुठे कुठे मनुके, बदाम ठेवले आहेत त्याचा शोध चालू होत असे. आजोबांचे ध्यान/पुजा संपत आली की ते थोडे मोठ्याने नमोकार मंत्र म्हणायचे व मी आपल्या जागेवर येऊन बसायचो. मी एवढ्यावेळात काय केले हे आजोबाना माहीती नसेल असे मला नेहमी वाटायचे पण ते जाताना मला जवळ खेचत म्हणायचे जा दो-तीन मनुके व बदाम पार्श्वनाथांना देऊन ये. मी आपला कसाबसा सगळयात छोटा मनूका व बदाम देवासमोर अगदी अनिच्छेने ठेऊन येत असे व नमोकार मंत्र म्हणून आजोबाच्या मागे मागे बाहेर पडत असे.
आजोबांची अजून गोष्टी होती ज्यांचे आम्हा सगळ्या लहानग्यांना अप्रुप होते, आजोबा झोपताना आपले दात काढून ठेवायचे. तसे आम्हाला का काढता येत नाहीत हे सगळ्या लहानग्यांनी कधी ना कधी आपल्या आईकडे तक्रार केलेली असेलच. मी आजोबा कवळी काढले की मी त्यांच्या जवळ जाऊन बसत असे व त्या काचेच्या ग्लास मध्ये ठेवलेली कवळी निरखत बसत असे. रॉकेलचे मोठे मोठे दिवे घरात सगळीकडे लावलेले असले तरी आजोबांच्या गादी जवळ एक मोठी पितळेची समई लावलेली असे. त्या समईच्या उजेडामध्ये आजोबा कधी कधी खाते वही घेऊन हिशोब करत बसलेले असायचे. अश्यावेळी त्यांच्या जवळ जाण्यास लहानांनाच काय मोठ्यांना देखील परवानगी नसावी. एकदा का त्यांनी वही बंद केली की शांत झालेले घर परत बोलू लागत असे. मग गोष्टी काय, गप्पा काय यायला उधान यायचे. मग खाली अंगणात हंतरुणे टाकली जायची, मोठा मामा कट्टावर आजोबांच्या खुर्ची शेजारी बसून, अडकित्याने सुपारी फोडत त्यातील छोटे छोटे तुकडे तोंडात टाकत शेतातील गप्पा आजोबाना सांगत बसे व आजोबा आराम खुर्चीवर डोलत फक्त ह्म्म हम्म्म करत रहायचे.
रात्री कधी तरी आम्हाला झोप लागायची पण त्यावेळी देखील ही मोठी मंडळी काहीतरी बोलत बसलेली असायचीच. मध्येच कधीतरी राज्या, कोल्हापूर असे शब्द कानावर आले की डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न अतीव झोपेमुळे राहुन जायचा. असेच एकदा रात्री जाग आली म्हणून उठलो तर सगळीकडे गुडुप्प अंधार व जवळपास सगळे झोपलेले व स्वयंपाक घरात मामी व आज्जी शेवटची आवरा आवर करत असलेला आवाज हळूहळू येत होता, इकडे तिकडे पाहिल्यावर आजोबा सगळ्या लहान मुलांच्या अंगावरील चादरी ठीक करत माझ्याजवळ येत होते. जेव्हा ते माझ्याजवळ आले तेव्हा मी डोळे मिटून गप्प पडून होतो. माझी चादर नीट करून ते तेथेच उश्याशी बसले व माझ्या डोक्यावरुन हात फिरवत म्हणाले " सुसा, निदं हुडग अंदरे नंद जिवा. नंग यानू आइतू अनंद्रे तगंद बा अप्पी." मग माझी आई म्हणाली "आप्पा, गुरुत इदे मलकोरी.. इने राजान मदवी आगले." आजोबा दिलखुलास हसले व आई व आजोबामध्ये गप्पा चालू झाल्या. अनेक विषय झाले असतील, पण तो पर्यंत मला झोप लागली असेल किंवा मला त्यातील काही आठवत नसेल.
क्रमशः
* पार्श्वनाथजी - बिहार मध्ये असलेले जैन समाजाचे एक मोठे तिर्थक्षेत्र.
* व्हासा - रात्र पडण्याआधी केलेले जेवण
* "सुसा, निदं हुडग अंदरे नंद जिवा. नंग यानू आइतू अनंद्रे तगंद बा अप्पी." - आईला आजोबा सुसा व प्रेमाने मुलींना अप्पी म्हणायचे. तुझ्या मुलावर माझा खूप जीव आहे. मला काही झाले तर आधी याला माझ्याजवळ घेऊन ये.
* "आप्पा, गुरुत इदे मलकोरी.. इने राजान मदवी आगले." - आप्पा (आजोबा) माहीती आहे, झोपा आता. अजून राजाचं लग्न व्हायचे आहे.
प्रतिक्रिया
13 May 2013 - 1:46 pm | सौंदाळा
मस्त!!
"राज्या" तो हिट हो गया
13 May 2013 - 4:04 pm | पैसा
अतिशय हृद्य आठवणी! अगदी मनाच्या तळापासून लिहिलेलं कळतं आहे. फार छान!
13 May 2013 - 6:17 pm | इनिगोय
झकास.. एकदम लंपन वगैरे आठवला, इतकी छान शैली.
पुभाप्र :-)
16 May 2013 - 3:01 pm | कोमल
असेच म्हणते..
छानच झालाय हाही भाग..
पुभाप्र
13 May 2013 - 7:52 pm | lakhu risbud
लेख आवडला. खटल्याचं,शेतीवाडी असणारं ज्याचं आजोळ असेल त्याच्या आठवणी जवळपास अशाच असणार.सुन्दर. चित्रगुप्त जी लेखात जी दुसरी भाषा आहे ती कोणती ? कानडी का ?
13 May 2013 - 7:55 pm | lakhu risbud
सावरी सावरी ओ ! दशानन सायेब ते चित्रगुप्त वायले.
13 May 2013 - 10:29 pm | दशानन
आधीच्या प्रतिसादामुळे जरा गडबडलो, पण.. हो ही कानडीच भाषा आहे.
13 May 2013 - 8:13 pm | सुहास झेले
मस्त रे.... अगदी हळवं केलंस :) :)
पुढे?
13 May 2013 - 10:30 pm | दशानन
सर्वांचे आभार!
14 May 2013 - 5:48 am | स्पंदना
आजोबांच वर्णन आवडल. भाऽऽळ सुंदर!
छान लिहिलं आहे दशानन.
पु.ले.शु.
14 May 2013 - 8:22 am | प्रभाकर पेठकर
सुंदर लेखन. कानडी भाषेचा वापर आणि आजोबांचे ममत्व ह्याने एक मस्त वेगळेपण प्रत्ययास येते आहे.
14 May 2013 - 8:33 am | अन्या दातार
पुभाप्र
14 May 2013 - 8:48 am | प्रचेतस
खूप सुरेख लेखन.
अतिशय आवडले.
14 May 2013 - 9:04 am | निवेदिता-ताई
सुरेख लेखन.
अतिशय आवडले.....आजोळची आठवण आली....सुट्टीत मामाच्या गावाला जायचे वेध लागायचे...., कधी एकदा परीक्षा होतेय आणी आम्ही जातोय असे व्हायचे.
पण आता आपल्याच मुलांना मामाच्या गावाला जायला नको असते, त्यांचे त्यांचे मित्रम्ंडळ, मोबाईल, कॉम्प्युटर..गेम्स,..
एवढे असले की बास..ही मंडळी घराबाहेर पडायचे नाव घेत नाहीत. आई नको ना जायला मामाच्या गावाला --तिथे आमाला करमत नाही, असे ही आपलीच मुले आपल्याला सांगत असतात, त्यामुळे आम्हाला पण माहेरी जास्त जायला मिळत नाही.
कारण घरात मुलांच्याजवळ कोण असा प्रश्न येतो.
15 May 2013 - 9:42 pm | दशानन
आता ती मामाची घरं राहीली नाहीत हो, माझे दोन्ही भाचे गेली महिनाभर घरी आहेत. किती वेळ देऊ शकलो याचा विचार केल्यावर समजले आपण त्यांना साधा एक तास देऊ शकलो नाही आहोत... काळ बदलला आहे.. आपण पण बदलायला हवे. आनंदासाठी आहेत गतकाळातील आठवणी सोबत आपल्या!
14 May 2013 - 12:44 pm | बॅटमॅन
भाळ चनागि बरितिरा नीवु, एकदम असे काही लोक आठवले हा लेख वाचून. :)
14 May 2013 - 2:07 pm | इरसाल
लेख आवडला.
14 May 2013 - 2:14 pm | प्यारे१
छान लिखाण.
मस्त लिहीताय राजे.
15 May 2013 - 9:42 pm | दशानन
सर्व वाचकांचे व प्रतिसाद देण्यार्यांचे मनापासून आभार!
16 May 2013 - 1:09 pm | चाणक्य
मनापासुन लिहिलेले जाणवतंय
18 May 2013 - 10:57 pm | दशानन
धन्यवाद मंडळी.. प्रत्येक प्रतिसादानंतर धन्य झालो हे लिहण्यात अर्थ नाही म्हणून सर्वाचे एकत्र आभार व्यक्त करतो आहे. जरा कामातून मोकळा झालो की पुढील भाग येईलच.
18 May 2013 - 11:22 pm | यसवायजी
भाळच मस्त..
याव्वूरा सावकार??
आणी आजोळ कुठ्लंय??
--------
पुलेशु
19 May 2013 - 10:50 am | चौकटराजा
दशानना दशानना करतो रे प्रार्थना
सदैव असे लिहित रहा
पूर्ण कर कामना !
दशानन आपला पिंड ट्रेकरचा की साहितत्यिकाचा ??
20 May 2013 - 12:36 pm | दशानन
>>दशानन आपला पिंड ट्रेकरचा की साहितत्यिकाचा ??
अजून स्वः चा शोध संपला नाही आहे :)