व्यायामाचे प्रकार

वेल्लाभट's picture
वेल्लाभट in जनातलं, मनातलं
11 May 2013 - 12:51 pm

व्यायाम हा एकंदरितच आजकालचा `हॉट टॉपिक' आहे. तरूण आहात, तर तारुण्य खुलवण्यासाठी व्यायाम; मध्यमवयीन आहात, तर तारुण्य टिकवण्यासाठी व्यायाम; वृद्ध आहात, तर फिट राहण्यासाठी किंवा, पाय, गुडघे, पाठ दुखू लागली आहे, म्हणून व्यायाम; श्रीमंत आहात, मग शो-ऑफ साठी व्यायाम; गरीब आहात, तर मग असाही काबाडकष्ट करून व्यायामच; अभिनेता/अभिनेत्री व्हायचंय, तर इंडस्ट्री ट्रेंड आणि डिमांड म्हणून व्यायाम; लग्नेच्छुक आहात, तर लग्न पटकन जमावं म्हणून छान दिसण्यासाठी व्यायाम; रोज व्यायाम, अधून मधून व्यायाम, कुणी सांगितलं म्हणून व्यायाम, आपल्याला वाटलं म्हणून व्यायाम...

पण याकडे बघण्याचे दृष्टिकोन वेगळे आहेत. गरजा वेगळ्या आहेत. तरी व्यायामाच्या आवर्ततेनुसार त्याचं तीन मुख्य प्रकारात वर्गीकरण होईल. ते प्रकार असे.

चहासारखा व्यायाम: यात जिम, किंवा योगासनं, चालणं, धावणं, नियमित खेळ खेळणं, असे प्रकार समाविष्ट होतात.
याची तल्लफ रोज येते. प्रमाण बेताचे आणि समान असते. यात सातत्य असते, परंतु दृश्य स्वरुपाचे बदल, फायदे, यात होत नाहीत. तरीही शरीराला त्याची सवय लागते. यात 'फिट' रहाण्याचे उद्दिष्ट मात्र निश्चित पूर्ण होते. आणि शरीराला, व्यायाम करणा-याला शिस्त पाळल्याचं एक आंतरिक समाधान मिळतं.

औषधासारखा व्यायामः म्हणजे, एखादा आजार, व्याधी जडल्यावर जो केला जातो तो व्यायाम. ह्रदयविकार - चालणे; पाठदुखी - चालणे, योगासने इत्यादी; किंवा फिजिओथेरपी आणि तत्सम प्रकार; यात मुख्यत्वे मानसिक समाधान मिळते, की आपण व्यायाम करत आहोत आणि आपल्याला त्याचा फायदा होणार आहे. खरंच त्याचा शरीरावर किती प्रमाणात परिणाम होतो हा एक प्रश्नच आहे. पण असो. तो वेगळा विषय झाला.
वजन वाढलं की ते (तात्पुरतं) कमी करण्यासाठी एकदम जोशात येऊन केला जातो तो व्यायामही याच प्रकारात मोडतो. जस्ट लाईक अ‍ॅलोपॅथिक मेडिसिन. तुलनेने पटकन फरक होतो, तो दृश्य स्वरुपाचाही असतो. त्यामुळे `कॉम्प्लिमेंट्स' वगैरेही मिळतात. आणि मग एकदा आजार बरा झाला की कोण औषध घेतो?

दारूसारखा व्यायामः चौकटीतले प्रयत्न केले की चौकटीतलेच फळ मिळते; असं कुणीतरी म्हटलंय. चहा पिऊन कुणी झिंगत नाही. झिंग यायला दारूच लागते. चहा-कॉफी आणि दारू तसे सारखेच प्रकार आहेत; खरा फरक आहे तो इन्टेन्सिटी चा. व्यायामाचंही तेच आहे. चहा-औषधाच्या पुढे जाऊन फिटनेस मधलं उच्च ध्येय समोर ठेवून व्यायाम करणारी मंडळी जी आहेत, त्यांचा व्यायाम हा दारूसारखा असतो. `हार्ड'. रोज करता आला तर हवाच असतो. पण मूड आला की लागतोच लागतो. मग बाकी सगळ्या गोष्टी गौण असतात. त्या व्यायामात इन्टेन्सिटी असते. फोकस असतो. दारू पिऊन जशी झिंग येते, जसा हँगओव्हर येतो, तसं हा व्यायाम केल्यावर शरीरात काहीकाळ एक वेगळंच चैतन्य येतं, स्नायू प्रसरण पावल्याने आपल्याच नेहमीच्या साईझ च्या टीशर्टातून ते बाहेर डोकावू लागतात. आपण काहीही करू शकतो, आपण सशक्त आणि सक्षम आहोत असा आत्मविश्वास संचारतो. आणि एकूणच फील गुड, लुक गुड फॅक्टर येतात. झिंग उतरली की पुन्हा आहेच. असं असूनही या व्यायामाने होणारे बदल हे लाक्षणिक असतात. त्यांचं दूरगामी असणं हे मात्र तुमच्या सातत्यावर अवलंबून आहे. आणि हो; प्रमाणाबाहेर दारूचे जसे दुष्परिणाम आहेत तसेच या व्यायामाचे ही आहेत. प्रमाणाबाहेर केल्यास `करायला गेलो एक..' ची गत होऊ शकते. अतिउत्साहात येऊन एकदम रॉ घेतली की जशी अंगाशी येऊ शकते, त्याप्रमाणे अति जोशात नको ते करायला गेलं की व्यायाम महागात पडू शकतो. तेंव्हा; कंट्रोल महत्वाचा आहे.

ex

पण मग आदर्श व्यायाम कुठला?

आदर्श असं काही नसतं यात. वर म्हटल्याप्रमाणे गरजा वेगवेगळ्या असतात. तेंव्हा आपली गरज ओळखावी आणि व्यायाम करावा. मात्र; दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात. एक म्हणजे; काहीही करावं; पण सातत्याने करावं. तरंच फरक होतो, आणि टिकतो. दुसरं म्हणजे; व्यायाम सुरू करण्या आधीच आपल्या मर्यादा ठरवून घेऊ नयेत. `चौकटीतले प्रयत्न = चौकटीतले फळ'. व्यायाम करायला लागलात; आपल्या कक्षा ओळखल्यात की मग वाटल्यास ठरवावं, त्या रूंदावायच्यात की नाही ते.
अर्थात; त्या रुंदावण्यातच आत्मविश्वासाचं खरं रहस्य आहे.

मांडणीजीवनमानविचारमतमाहिती

प्रतिक्रिया

ही पोस्ट माझ्या ब्लॉगवरची आहे. ब्लॉगचा पत्ता:
http://houndingtheworld.blogspot.in/2013/05/exercise.html

मुक्त विहारि's picture

11 May 2013 - 12:58 pm | मुक्त विहारि

मस्त..

वेल्लाभट's picture

11 May 2013 - 9:22 pm | वेल्लाभट

धन्यवाद !

पैसा's picture

11 May 2013 - 1:14 pm | पैसा

व्यायाम "चढतो" ही नवी कल्पना आवडली!

वेल्लाभट's picture

11 May 2013 - 11:21 pm | वेल्लाभट

आभार!

इनिगोय's picture

11 May 2013 - 9:42 pm | इनिगोय

संकल्पना आवडली.

विसोबा खेचर's picture

12 May 2013 - 9:36 am | विसोबा खेचर

भटसाहेब, छानच लिहिलंत. नान्या म्हणाला होता रोज सकाळच्याला उठून धावायला जात जा. तरूण वयात तोच सर्वोत्तम व्यायाम! बाय द वे, व्यायामाचे आणि निरनिराळ्या आसनांचे अजूनही काही इंटरेष्टेड प्रकार आहेत, त्याबद्दल तुमी लिवलेच नाहीत..:-)

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 1:22 pm | वेल्लाभट

त्यावर तुम्ही प्रकाश टाकावा की, विसोबा; आम्हाला बरंच वाटेल.

टवाळ कार्टा's picture

12 May 2013 - 9:57 am | टवाळ कार्टा

"चंद्रनमस्कार" ब्येश्ट ;)

दिपक.कुवेत's picture

12 May 2013 - 2:10 pm | दिपक.कुवेत

छे आता आळस झटकुन उद्यापासुन नियमीत चालायला......छे हे काय मध्यमवर्गियांसारखं...चुकल उद्यापासुन 'वॉक घ्यायला' सुरु केलं पाहिजे.

प्रसाद गोडबोले's picture

12 May 2013 - 3:08 pm | प्रसाद गोडबोले

तंबाकु सारखा व्यायाम : हा प्रकास शहराकडे तसा कमी दिसतो गावा कडेच जास्त . मस्त सगळी तयारी करुन व्यायाम शाळेत जायचं , उगाचच सगळ्या वेट्स ना डंबेल्सना करेल्स ना हात लावल्या सारखं करायचं... "मम्" म्हणायचं , अन मग बाहेरच्या कट्ट्यावर मस्त आर लावुन निवांत चकाट्या पिटत बसायचं , मग कुटं ह्याची टींगल कर त्याची मस्करी कर कुठे पार्टीचा प्लॅन कर काहीही ( जसं तंबाकुचं असतं , महत्वाच्या गप्पा,,, केवळ कारण म्हणुन तंबाकु )

=))

वेल्लाभट's picture

12 May 2013 - 5:06 pm | वेल्लाभट

हाहाहाहाहाहाहा आवडलंय !

चित्रगुप्त's picture

12 May 2013 - 5:12 pm | चित्रगुप्त

'सलाईन सारखा व्यायाम'
हा आणखी एक प्रकार. म्हणजे आपण नुस्तं पडून वा बसून रहायचं आणि फिजियोथेरापिष्टला दर वेळी पैका देऊन व्यायाम करून घ्यायचा.

वेल्लाभट's picture

13 May 2013 - 7:05 am | वेल्लाभट

राईट. पण त्यातही तुम्हाला व्यायाम करावाच लागतो. सलाईन सारखा, ही उपमा, ’पॅसिव्ह एक्सरसाईज’ सारख्या गोष्टींना लागू होईल.