मराठे दूर गेली त्यानंतर वर्षही संपलं होतं, वर्ष संपलं होतं म्हणून कॉलेज संपलं आणि बाय डिफॉल्ट बेकारी सुरु झाली होती. त्या वर्षी कोणत्याही मुलीकडे मी बघितलं सुद्धा नाही. पुन्हा ते सगळं सुरु झालं म्हणजे..?
मराठे दूर गेली म्हणून जाधवही दूर गेला आणि पाप्याही. शत्रूंचीसुद्धा सवय होते अशी विचित्र जाणीव झाली.
गावात बसून काय करणार म्हणून आम्ही पोरंही शहरात आलो. आमच्यासाठी शहर म्हणजे येऊन जाऊन पुणे अन मुंबई.
शहरात कुठेतरी कॉम्प्युटर शिकायचा असा प्लॅन होता.. परांजप्या आणि मी दोघेही एमसीए आणि तसल्या एंट्रन्स देऊन मार खाऊन बसलो होतो. आता कॉम्प्युटर क्लासमधे जाऊनच काहीतरी सुरुवात करायला हवी होती, नाहीतर रिकामे बसलो की बेकारतुंबडी म्हणणारच सगळे लोक. आणि तसं कितीवेळ चालवणार?
तसे आम्ही आपले आपण कुठेतरी जाण्याच्या हिमतीचे नव्हतोच. आणि आपण गांडू आहोत अशी जाणीवही होती. शेपटावर पाय पडेपर्यंत पेटायचे नाही अशा प्रकारातले आम्ही होतो. मोमीन त्याच्या कोणा भावबंदाच्या मदतीने पुण्यात कुठेतरी खोली घेऊन राहिला होता. मग त्याची काडी वापरुन मीही पुण्यातच जायचं असं ठरवलं आणि परांजप्याला डायरेक्ट सांगून टाकलं. आला तर आला.. असंही इथे काय शाट करियर करणार होता तो. आमच्यासारख्या सेकंडक्लास पोरांना पुढे काही खास करता येऊ शकतं असं काही माहीतच नव्हतं खरं तर.
कॉम्प्युटरला बरे दिवस आहेत आणि तो शिकला की मरण नाही असं खूपजणांकडून ऐकलं आणि परांजपेसाठी महिनाभर वाट पाहून शेवटी एकटाच निघून आलो. येण्याच्या आदल्या रात्री ब्राऊला मिठी मारुन रडलो. पण आता पूर्वीसारखं घुसमटवणारं जोरदार रडू येत नाही.. म्हणून वाचलो.
पुण्यात पोचलो रात्री झोपेच्या वेळी.. मोमीनची खोली गाठली आणि लक्षात आलं की तो आणखी तीन पोरांसोबत एका वाड्यातल्या छोट्या जळमटल्या खोलीत पालीप्रमाणे राहात होता. खोलीत चिरडलेल्या ढेकणांचा पादरट वास येत होता.
"आयच्चा.. इथे राहायला नाही जमणार मोम्या..", मी खूपच हळू मोमीनच्या कानात बोललो.
मोमीनने मात्र आवाज अजिबात न लपवता खणखणीत बोलायला सुरुवात केली, "केळ्या, भडव्या,तुझा बंगला गावी ठेवून ये आधी.. तरच इथे जमेल.."
"अरे तसं नाय रे, इथे आधीच फुल्ल आहे ना रूम, म्हणून म्हटलं..", मी त्याचा आवाज खाली आणण्यासाठी म्हटलं.. च्यायला आल्याआल्याच भांडण नको.
"फुकन्या, इकडे सगळे आपल्यासारखेच आहेत. इथे चौघात पाचवा आरामात झोपेल.", मोमीनने मधे पॉज घेतला. तो या खोलीत मला घेण्यासाठी आणखी मुद्दा शोधतोय असं वाटलं.
"आणि मेन म्हणजे इथे बाजूच्याच वाड्यात मेस आहे.. इथे राहून तुला बरं पडेल. बाहेर कुठे गेलास तर हजार बाराशेच्या खाली जागा नाही. आणि इथे राहिलास तर आम्हाला सुद्धा शेअरिंग होईल. तुझा शेअर फक्त दोनशे.."
मी इथे राहिल्याने मोमीनचेही पैसे वाचणार आहेत हे माझ्या लक्षात आलं.
कोपर्यातल्या सोलापुरी चादरीच्या ढिगातून एक काटकुळा पोरगा उठून बसला आणि कानात करंगळी घालून खटाखट हलवत म्हणे, "वैसे बी छे लोगा का रूम है.. हम पूरे रूम का भाडा देते. तुम आयेगा तो सबका भाडा बचेगा.. और तेरा बी."
मोमीनने त्याची "अरुणी" म्हणून ओळख करुन दिली.. अरुणीने स्वत:च्या नावाचा करेक्ट उच्चार अर्नी आहे असं क्लियर केलं.
मोमीनने तिथे भिंतीला लागून पडलेली दोन मोठी खोकी खोलीच्या मधे ढकलली आणि म्हणाला,"आत्ता रात्री तर नाही ना चाललास दुसरी रूम शोधायला? मग आत्ताच्या वेळी इथे पड.. नंतर बघू काय ते.."
दमलो तर मी होतोच. म्हणून मग गपचूप तिथे बॅग टाकली आणि तिचीच उशी करुन आधीच घातलेल्या चटईवर अंग सोडलं. बॅग उघडून आपली चादर इथे अंथरावी असा विचारही मनात आला नाही कारण इथल्या घाणीत ती चादरही घाण झाली असती. पुन्हा एखादा ढेकूणही त्यात भरला असता तर.. ?
इथे मी राहणं बापजन्मात शक्य नव्हतं.
खोली एकदम थंड आणि शांत होती. अंधाराने भरलेली होती. अशा जागी इतकी शांत झोप लागते हे मला सकाळी उठल्यावरच कळलं.
उठल्याबरोब्बर बघितलं तर अर्नी गायब झाला होता. पण खोलीतला आणखी एक उरलेला काळा केसाळ काटकुळा सांगाडा कुबटशा अंथरुणात उठून बसला होता.
मोमीन आधीच क्लासला पळाला होता. आणि चौथा गोराघारा गुबगुबीत पोरगा डोळे मिटून पद्मासनात उघडाबंब अन श्वास रोखून बसला होता. एका बोटाने नाकपुडी दाबून.
एकेक येडझवे नमुने दिसताहेत हे लगेच लक्षात आलं. आजच्या आज अन आत्ताच्या आत्ता उठून चांगलं हॉटेल शोधायला पाहिजे असं म्हणून उठणार होतो तितक्यात अर्नी दोन वाट्या हातात घेऊन हाय हुई करत खोलीत शिरला. त्याची बोटं पोळत होती असं वाटलं. माझ्यासमोर वाटी ठेवली तेव्हा एकात एक वाटी उलटी मारुन आणलेला चहा दिसला.
मला असला वाटी चहा अजिबात आवडत नाही. म्हणजे चहा आवडतो, पण ती वाटी नाही. काचेच्या ग्लासातून चहा पिणं म्हणजेच खरा चहा पिणं. सँडोजच्या चहाचा ग्लास आठवून जिभेला चरका लागल्याचा भास झाला. च्यायला या सौथिंडियन लोकांना बाकी खाण्यापिण्याची मजा कळते पण चहा कसा प्यायचा ते कळत नाही. मी तोंड वाकडं होताहोता सरळ केलं आणि "थँक्स रे.." म्हटलं.
मग माझ्या लक्षात आलं की सांगाडा आणि ध्यानमग्न यांच्या चहाचं काय? मलाच व्हीआयपी ट्रीटमेंट का?
"अर्नी.. इनकी चाय?"
"ये काल्या तो खुद जाके पीता.. तुम आजही आया ना तो गेष्ट है ना मोमीन का.. इसलिये. और ये फडके तो एकदम योगाचारी , वो तो सेंट आदमी.. इसलिये चाय नही पीता. ओन्ली गायका मिल्क. अबी उसका ऐसा आसनही और एक घंटा चलेगा. तुम पीले रे चाय तुम्हारी.."
वाटीत चहा ओतला. पुण्यातल्या सकाळच्या थंडीतही अर्नीने पळत पळत आणल्यामुळे चहा तसा गरम राहिला होता. पण मला एकदमच कढत चहा लागतो. पुन्हा एकदा सँडोचा वाफाळत्या चहाची सय काढत डोळे भरले आणि वाटी तोंडी लावली. चहा आणखीच कोमट लागायला लागला.. जास्त गोड होता.. मुसुंबीचा रस पिऊन आजारपण भोगल्याचा भास झाला पण अर्नीने सकाळी सकाळी माझी आठवण ठेवली होती ते जाणवलं..
प्रेशर आल्याबरोब्बर टॉवेल लावला आणि संडास कुठे म्हणून विचारलं. अर्नी मला दोन खडखडते जिने उतरुन वाड्याच्या तळाशी कुठेतरी असलेल्या त्या जागेच्या अगदी दारात घेऊन गेला. तिथे दिवसाही अंधार होता. आता हा अर्नी आतपर्यंत सोबत करतो की काय असं वाटायला लागलं.
"मैं जायेगा अर्नी अब.. थँक यू यार..", मी म्हणालो.
"तू पानी ज्यादा डालेगा हा..वो वाडा की मालकीन हर इकका होने के बाद चेक करता पानी डाला की नही..फिर चिल्लाता सब के सामने.. तू संभालो.. और बाजूवाला संडास में मत जा.. वो ओनर का संडास रेहना"
अर्नीच्या हिंदीने लईच हसू येत होतं. आणि आत गेल्यावर जो काही गुप्पकन अंधार झाला म्हणता. बसायचं कुठे तेही कळेना.
"अर्नी.. लाईट लगा ना यहांका", मी ओरडलो.
"लाईट नही लगाता मालकीन. किसदिन हमने गल्तीसे ऑन छोडा तो निकाली बल्ब... मोंबत्ती रखा उदर उप्पर.. माचिस भी रखा.. उसको जला"
थरथरत्या हाताने काड्यापेटी चाचपली अन मेणबत्तीचा अर्धा इंच उरलेला तुकडा पेटवला. दोन काड्या खर्ची पडल्या.
आता आपण बाहेर आलो की मालकीण उभी असणार चेक करायला या विचाराने आतच गोळा आला आणि दहा मिनिटांचं काम पाच मिनिटांत संपलं. संडासात नळ नव्हता. समोरच्या टाकीतून तीनचार वेळा डबा भरुन ओतणं भाग होतं.
बाहेर आवाज न करता यावं म्हटलं तर जुनाट आणि जडशीळ कोयंडा जोर लावून उघडल्याबरोब्बर खळ्ळ खाट आवाज करत दारावर आपटला.
बाहेर येतो तोच समोर लगबगीने आलेल्या मालकीणबाई दिसल्या. मी खालच्या मानेने टाकी ते संडास अशी पखालसेवा सुरु केली.
"कोणाकडे आलायत? फडक्यांकडे का?", नाकातल्या आवाजात लठ्ठ मालकीणबाई म्हणाल्या.
प्राणायाम करणारा फडके हा या खोलीचा मुख्य भाडेकरु आहे हे समजलं.
"हो. फडकेंकडे.. म्हणजे तिथेच .. मोमीन माझा मित्र..", मी हळूच बोललो.
"मोमीन? मोमीन नाव कोणाचं आहे इथे?" मालकीणबाई धक्का बसल्यासारख्या बोलल्या.
हगलो तिच्यायला.. मोमीन काय नाव लपवून राहिलाय की काय इथे? मी उगाच बल्ल्या केला की काय?
"नाही. म्हणजे मी फडकेंकडेच आलोय.. गेस्ट.. मला बाकीच्यांची नावं नीट माहीत नाहीत.. काहीतरी गोंधळ झाला असेल माझा.."
"बरं..पाणी नीट ओतत चला.."
मला एकदम चीड आली.. पण इथे रहायचं नसल्यामुळे उगं ताणाताणी कशाला, म्हणून घुटका गिळून गप्प झालो.
"किती दिवस मुक्काम आहे? रात्री मुक्कामाला तर नाहीत ना? गेस्ट चार्ज लागतो."
"नाही. मुक्काम नाही. आजच्या दिवसात इथून जाईन."
डगमगत्या जिन्याने रूमवर आलो. अर्नीने माझ्यासाठी उप्पिटाची ताटली उघडी केली आणि समोर धरली. उडप्याचं चिक्कट उप्पीट मला आवडतं तसंच.
उप्पीट खाता खाता मोमीनबद्दल मी केलेली काशी मी अर्नीच्या कानावर घातली.
ऐकता ऐकता फडकेने डोळे उघडले आणि आसन सोडलं. त्याचे डोळे हिरवेगार दिसले.
"मालक वेडझवा आहे. म्हणून आम्ही मोमीनचं नाव इथे अमित म्हणून सांगितलं आहे. तो सकाळी तुला सांगायला विसरला असणार."
"आयचा घो.. मी घाण केली उगीच खाली.",मी म्हणालो.
"हरकत नाही. आपण धुवू घाण म्हणे..", फडके हसून बोलला.
अर्नी मागून म्हणाला,"मोमीन नाम बताना तो पूरे पेठ में जगाह नही मिलना.. बोत दूर जगा मिलना..क्लास बी दूर पडना.."
दरवाजा लोटून काल्या आत आला. हातातला पेपर बघत त्याने घोषणा केली, "हा बघ पिक्चर कोणता लागलाय.. मालिबू मडस्लाईड.."
"कंप्लीट आहे का पण? की हाफ?", फडके म्हणाला.
"एकदम कंप्लीट नाही रे.. थेटरला लागतो तेवढा कंप्लीट आहे.. चल दुपारीच जाऊया..", काल्याने स्पष्ट केलं.
"केळकर येतोस का? पण गरम आहे हां पिक्चर.. तुला आवडत नसेल तर नको येऊ मग", फडके माझ्याकडे वळून म्हणाला.
मला डीके, परांजप्या आणि फॉक्सी लेडीची जाम म्हणजे जाम आठवण झाली.
"चालेल.. जाऊ या टाईमपास..", मी म्हणालो.
"मी आलोच..", फडकेने आसनाची घडी केली आणि कमरेला टॉवेल गुंडाळला.
खोलीत ढेकणांसाठी व्यवस्थित फवारा मारला आणि जरा उदबत्ती लावली तर खोली तशी ठीक होईल असं वाटायला लागलं.
....
(क्रमशः)
प्रतिक्रिया
20 Jun 2013 - 2:36 am | उपास
गवि.. पुढे येउंद्या!
ते पाणी टाकलय किती ते बघायचं डिट्टो ! आमचे मालकही तसेच... आणि दोघं राहतोय सांगून गाव जमवणही टिपिकल.
ढेकूण म्हणजे कहर.. भारतापासून अगदी अमेरिकेपर्यंतही त्यांनी पाठ सोडली नाही, इतकी दाट मैत्री आणि त्यात रक्ताचं नातं.. :-))
- (सदाशिव पेठेत रुम शेअर करुन राहिलेला बॅचलर) उपास
13 May 2013 - 10:31 pm | पिंगू
बर्याच दिवसांनी केळ्याला परत आलेला पाहून आनंद झाला..
20 Jun 2013 - 8:52 am | ब़जरबट्टू
जबरी लेखन राव.. सम्पुर्ण गवि लेखनमाला वाचायला घेतलिया,,,
2 Aug 2013 - 10:11 pm | वसईचे किल्लेदार
पुढिल भागांची वाट पहातोय.
2 Aug 2013 - 10:30 pm | आदूबाळ
क्षणभर वाटलं दोण लंबरचा भाग आला की काय...
3 Aug 2013 - 8:16 pm | देशपांडे विनायक
ढेकूण पुराण वाचून एक नक्की समजले की मिपाला ढेकणाची ALLERGY नाही
मग माझी ढेकणावरची कथा दोनदा काढली का गेली असावी ?
त्या संबधी विचारणा केली होती पण उत्तर अजुनी आले नाही .
ढेकणाचा असाही त्रास होतो तर !!!
4 Aug 2013 - 1:15 pm | दादा कोंडके
मजा आली वाचून. खोलीचं आणि पोरांचं वर्णन वाचून सुरवातीच्या दिवसांची आठवण आली.
5 Aug 2013 - 11:22 pm | विजुभाऊ
गवी इज ब्याक इन फॉर्म.
पांडुरंग सांगवीकर पुन्हा एकदा बोलता झालाय.
24 Oct 2013 - 3:41 pm | कपिलमुनी
गवि , लिहा की पुढचा भाग !!
25 Oct 2013 - 7:22 pm | राजो
पुभाप्र.. लवकर लिहा गवि
25 Oct 2013 - 7:48 pm | बोलघेवडा
गविशेट म्होरला पार्ट लिवा कि वाईच !! अवो तिसरी घंटा झाली, तुम्ही ख्येळ सुरु करा !!!
29 Oct 2013 - 7:06 pm | कपिलमुनी
आता तरी लिहा :)
दिवाळीच्या सुट्टीचा मुहुर्त साधून मेजवानी द्या !!
25 Aug 2014 - 8:28 pm | कपिलमुनी
प्रतीक्षेत :(
26 Aug 2014 - 5:47 pm | कैलासवासी सोन्याबापु
आई शपथ!!! ९ वर्षे आगोदर पुण्यात आलो होतो ते आठवले!!! टिपिकल अशीच रूम ती पण खाश्या शानवार पेठेत!!! त्यात मला गुडंग गरम फुकायची सवय, तिसर्याच सकाळी तिसरी कांडी सम्पवली तशी "अरे वर काय तंबाखू चं रान पेटवाले आहे का?" ही मालकांची अनुस्वार खैरात केलेली लाइन आज परत आठवली!!!! जल्दी आने देव!!!! :)