काशीबाई..

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
28 Oct 2007 - 5:50 pm

तात्या अभ्यंकरांची व्यक्तिचित्रे आणि गणगोतातील माणसे!

१) आबा जोशी
२) बुवा
३) पाटणकर आजोबा
४) नेनेसाहेब
५) साधना कोळीण
६) गुण गाईन आवडी मधल्या काही व्यक्ति
७) रौशनी (लेखन सुरू आहे )
८) शिंत्रेगुरुजी (लेखन सुरू आहे )
९) अंता नारकर भाजीवाला (लेखन सुरू आहे )
१० ) पं यशवंतबुवा महाले (लेखन सुरू आहे )

काशीबाई!

राम राम मंडळी,

ठाण्याच्या एकविरा पोळीभाजी केन्द्राच्या बाहेर उभं राहून गरमागरम पोळीभाजी खायची आणि तिथूनच कार्यालयात जायचं हा माझा नित्याचा क्रम. घरगुती स्वरुपाची पोळीभाजी केन्द्रं, हा आम्हा चाकरमानी मुंबईकरांचा एक आधार. आज ठाण्या-डोंबिवली सारख्या शहरांत अशी अनेक पोळीभाजी केन्द्रं उभी आहेत. एकविरा पोळीभाजी केन्द्र हे त्यातलंच एक.

सकाळचे साडेआठ नऊ वाजलेले असतात. मी एकविरेच्या बाहेर उभा असतो.

"आज तुझी आवडती वांगीबटाट्याची भाजी आहे रे दादा. आज जेव बाबा जरा निवांत!"

उजळ वर्णाची, म्हातारीशी सुरकुतलेली, गोल चेहेर्‍याची, गालावर छानश्या खळ्या असलेली, कपाळावर पुसटसे तीन हिरवट त्रिकोणी ठिबके गोंदवलेली, चेहेर्‍यावर समाधान असलेली काशीबाई मला म्हणत असते!

काशीबाई!

एकविरा केन्द्रात रोजंदारीवर भाकर्‍या करणारी एक बाई! एकविराच्या त्या लहानश्या जागेत खाली जमिनीवर बसून तीन-चार बायका पोळ्याभाकर्‍या करत असतात, स्वयंपाक करत असतात, त्यातलीच काशीबाई एक! भाकर्‍या करण्याचं काम काशीबाईकडे . काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची. पण तरीही ती माझ्याकरता खूप काही आहे. तिच्या समाधानी व्यक्तिमत्वाचा मी निस्सिम चाहता आहे!

सकाळी सकाळी लवकर उठून एखाद-दोन घरी जाऊन बाळंतीणींना शेक, अंगाला लावण्याचं काम करणे हेदेखील काशीबाईच्या नित्याचंच एक काम. काशीबाई बाळंतीणींच्या अर्भकांच्या मालिशची कामं करते हे मला माझा मित्र अमित चितळे याच्या घरी मी गेलो असताना कळले. तिथे अमितच्या मुलाला मालिश करायला काशीबाई आली होती. इथे तिचा एक गंमतीशीर संवाद सांगायचा मोह मला आवरत नाही.

पोराचं मालिश करून झाल्यावर काशीबाई अमितला म्हणाली, "दादा तुमचं पोरगं मोठेपणीसुद्धा असंच अगदी गोरंपान राहील"

"ते कसं काय?" अमितने विचारलं.

"त्याचं सामान बघा. कसं अगदी गोरंगुलाबी आहे! ज्याचं सामान असं गोरंगुलाबी असतं तो मोठेपणीही छान गोराच राहतो. पण सामान जरा जरी काळपट असेल तर मात्र गोरेपणा टिकणं कठीण आहे! :)

काशीबाई किती सहजपणे बोलून गेली होती हे! तिचे विचार ऐकून मी आणि अमित खो खो हसलो होतो. या जुन्या बायकांचे काही काही शब्द आणि आडाखे मोठे मजेशीर असतात! :)

मालिशची कामं करून मग काशीबाई एकविरेत येते. तिथे भाकर्‍या बडवायचं काम सुरू! साडेदहा अकराच्या सुमारास भाकर्‍यांच्या कामातून काशीबाई जराशी मोकळी होते व तीही तिथेच चार घास खाते. त्यानंतर हळूच चंची उघडून तंबाखू मळून खाईल. जुन्या खेडवळ बायकांची तंबाखू खायची जुनी सवय काशीबाईलाही आहे.

एके दिवशी मी असाच पोळीभाजी खात एकविरेच्या बाहेर उभा होतो तेव्हा तिथेच खाली जमिनीवर बसून अगदी मन लावून भाकर्‍या करत असलेल्या काशीबाईने माझं लक्ष वेधलं.

'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!'

काशीबाई भाकर्‍या करता करता असं काहीसं छानसं कुठलंतरी खेडवळ लोकगीत आपल्याच नादात गुणगुणत होती. त्याची चाल, शब्द सगळंच मला अपरिचित होतं पण ऐकायला छान वाटत होतं. रोजंदारीवर भाकर्‍या करण्यासारखं कष्टप्रद काम करतानादेखील ही बया काय छान गुणगुणत होती! माझाही स्वभाव तसा बोलघेवडाच. मी पटकन तिला म्हटलं, "मावशे, खूप चांगलं गातेस की गं तू!"

तशी आजुबाजूच्या बायांकडे पाहात काशीबाई एकदम गोड लाजली आणि गायचीच थांबली! म्हातारीच्या खळ्या काय सुंदर दिसल्या लाजताना! त्या दिवसापासून माझी आणि काशीबाईची 'आखो ही आखोमे' गट्टीच जमली! माझ्या रोजच्या वेळेवर मी पोळीभाजी खायला गेलो की नजरेतूनच आम्ही एकमेकांची विचारपूस करायचो. अधिक काही बोलणं, गप्पा मारायला वेळही नसायचा आणि कारणही नसायचं!

एकविरेत रोज तीन चार प्रकारच्या भाज्या केल्या जायच्या, झुणका असायचा, भाकरी, पोळ्या असायच्या. एकदा पातेल्यातल्या वांगीबटाट्याच्या रस्साभाजीकडे पाहून, "अरे वा! आज वांगीबटाट्याची भाजी का? वा वा!" अशी नकळतपणे माझ्याकडून दाद गेली!

"आज हीच भाजी मला दे" असं मी काऊंटरवर बसलेल्या शिवरामला सांगितलं.

"अरे दादा, वांगीबटाट्याच्या भाजीसंगती भाकरी खा की! चपाती कशापायी खातो?" काशीबाई प्रथमच माझ्याशी बोलत होती! अगदी डायरेक्ट! :)

तिचं बोलणं ऐकून शिवरामही क्षणभर चाचपडला, मग लेगच सावरून म्हणाला, "खरंच, आज चपाती नको, भाकरीच खावा साहेब. आमची काशीबाई भाकर्‍या एकदम फस्क्लास करते! "
'First Class' या इंग्रजी शब्दांचा उच्चार 'फर्स्ट क्लास' असा आहे हे शिवरामला अमान्य होतं! :) असो, रंगाने जर्द काळ्या, बोलक्या डोळ्यांच्या, अंगाने सडपताळ परंतु देखण्या असलेल्या शिवरामविषयी पुन्हा केव्हातरी! कुणालाही हवाहवासा वाटावा असाच आमचा शिवराम आहे!:)

"थांब जरासा, आत्ता गरम भाकरी करून तुला देते!"

वास्तविक पातेल्यात आधी केलेल्या १०-१२ भाकर्‍या शिल्लक होत्या, परंतु मला गरमगरम भाकरी मिळावी अशीच माझ्या मैत्रिणीची इच्छा होती! माझ्याकडून मी काशीबाईला केव्हाच माझी मैत्रिण मानले होते परंतु तिच्याकडूनही माझ्याबद्दल तेवढाच ओलावा आहे हे वरील भाकरीच्या एका साध्या प्रसंगातून मला समजले आणि त्याचा आनंद त्या गरम भाजी भाकरीपेक्षा अंमळ अधिक होता! किंबहुना, काशीबाईने आपणहून मला गरमागरम भाकरी करून दिली त्यामुळे ती भाजीभाकरी मला अधिक गोड लागली!

मी त्या म्हातारीच्या जवळजवळ प्रेमातच पडलो होतो. मला त्या बाईबद्दल खूप उत्सुकता होती, तिच्याशी भरपूर बोलावंसं वाटत होतं! पण कधी? ती बिचारी आत बसून आपल्या भाकर्‍यांच्या व्यापात मग्न असे आणि मलाही तिथे अधिक काळ थांबायला वेळ नसे. पण एके दिवशी तिच्याशी बोलायचा, तिच्या घरी जायचा प्रसंग आला. मी नेहमीप्रमाणे एकविरेत पोळीभाजी खाण्याकरता गेलो होतो. मला पाहून काशीबाई उठली आणि तिने एक कार्डवजा कागद माझ्यापुढे धरला.

"जरा हे कार्ड बघ रे दादा. ह्याचे पैशे कधी भेटणार मला?"

पोष्टाच्या रिकरिंग डिपॉझिट स्कीमचं ते कार्ड होतं. पाच वर्ष संपलेली होती आणि आता काशीबाईला व्याजा/बोनससहीत पाच-पंचवीस हजारांची रक्कम मिळणार होती असं ते कार्ड दर्शवत होतं!

"अगं मावशे, तुला फार काही करावं लागणार नाही. आज उद्या केव्हाही टाऊन पोष्टात जा. मास्तरांना भेटून हे कार्ड दाखव, ते सांगतील तिथे सह्या कर म्हणजे लगेच तुला ह्याचे पैशे भेटतील!"

"धत तुझी मेल्या! मला कुठं सही करता येते? तू येशील का माझ्यासंगती? ती पोष्टाची बया धा धा निरोप धाडून पण येईना बघ!" निरागसपणे हसत काशीबाई म्हणाली.

काशीबाईचे पैसे गुंतवणारी कुणी महिला एजंट आता तिला भेटतही नाही ही गोष्ट माझ्या लक्षात आली. एकदोन दिवसातच मी तुझ्याबरोबर पोष्टात येईन असं मी काशीबाईला कबूल केलं आणि दुसर्‍याच दिवशी दुपारी दोनअडीचच्या सुमारास मी मुद्दाम वेळ काढून काशीबाईसोबत पोष्टात गेलो. पोष्टाच्या बाहेर आमची रिक्षा उभी राहिली. काशीबाईने आपल्या मळकटश्या बटव्यातून पैसे काढले.

"थांब मावशे. मी देतो रिक्षाचे पैसे" मी सहजंच म्हटलं.

"माझं काम अन तू कशापायी पैशे देणार? वा रं वा!" काशीबाई जवळजवळ ओरडलीच माझ्यावर! पण ते माझ्यावर ओरडणं नव्हतं तर तो तिचा स्वाभिमान होता! काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला! त्या भाकर्‍या करणार्‍या बाईची खुद्दारी माझ्यापेक्षा खूप खूप श्रीमंत होती! केवळ 'ओळखीचा चेहेरा' या आधारावर वांगीबटाट्याच्या भाजीसोबत गरम भाकरी खा असा आग्रह धरणारी प्रेमळ काशीबाई आणि रिक्षाचे पैसे मला देऊ न देणारी स्वाभिमानी काशीबाई मी पाहात होतो. प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात!

पोष्टातलं काम झालं. काशीबाईला पैसे मिळाले. आम्ही पोष्टाच्या बाहेर पडलो. समोरच रंगीत बर्फाचे गोळे विकणारा उभा होता. मी गंमतीने काशीबाईला म्हटलं, "मावशे, बर्फ खायला घाल ना मला. ऊन खूप आहे, तहान लागली आहे!"

हे ऐकून मगासची स्वाभिमानी काशीबाई पुन्हा एकदा लहान झाली, निरागस झाली! :) मग मी आणि माझ्या त्या मैत्रिणीने दुपारच्या टळटळीत उन्हात मस्तपैकी लिंबूनमक लावलेले रंगीबेरंगी बर्फाचे गोळे एन्जॉय केले! व्हॉट अ डेट! :) एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली! :)

"चल, येतोस का माझ्या घरला? इकडनं जवळंच माझं घर आहे. तुला चुरमुर्‍याचे लाडू देते!"

हे ऐकून मला आनंदच झाला. मी कोणतेही आढेवेढे न घेता तिच्या घरी गेलो. किसननगरच्या वस्तीतील एका चाळीत काशीबाईचं मोजून दीड खोल्यांचं घर. घरी एक तरुणी एका लहानग्या शेंबड्या पोराला बदडत होती. बहुधा त्या मायलेकरांचं काहीतरी बिनसलं असावं. घरात दुसरं एक लहानगं पोर होतं ते झोपलं होतं. मी आणि काशीबाई घरी पोहोचल्यावर ते शेंबडं पोर एकदम धावत आलं आणि काशीबाईला बिलगलं! काशीबाईने आभाळाच्या मायेने त्या पोराला जवळ घेतलं, आंजारलं, गोंजारलं!

बोलण्याबोलण्याच्या ओघात मला त्यांच्या घरातल्या काही हृदयद्रावक गोष्टी समजल्या! काशीबाईचा नवरा एक नंबरचा बेवडा, काही कामधंदा करत नसे. दारूच्या अतिआहारी गेला आणि मरण पावला. काशीबाईला तीन मुलं. दोन मुलगे, एक मुलगी. मोठा मुलगा-सुनबाईने वेगळी चूल मांडली होती. ती मंडळी काशीबाईला थुंकूनही विचारत नव्हती. आई मेली काय नी जगली काय, त्यांना काहीच फरक पडत नव्हता! दुसरा मुलगा चांगला हातातोंडाशी आलेला, रेल्वे अपघातात मरण पावला. त्याची बायको लहानगं मूल टाकून, त्याची जबाबदारी काशीबाईवरच सोपवून दुसर्‍या कुणाचातरी हात धरून पळून गेलेली. एक आई आपल्या मुलाला टाकून जाऊ शकते हे अविश्वसनीय होतं पण इथे मात्र तीच वस्तुस्थिती होती! मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि वर्षादोनवर्षाच्या आतच नवर्‍याने टाकली म्हणून लहानग्याला घेऊन माघारी परतलेली!

आणि काशीबाई समर्थपणे हा सगळा गाडा ओढत होती, चालवत होती!

मला दूरदर्शनवरील समस्त मालिकांमध्ये कल्पनादारिद्र्य असलेल्या लेखक-दिग्दर्शकांची, ते त्यांच्या मालिकांमधून दाखवत असलेल्या मोठ्यांच्या खोट्या दु:खांची अक्षरश: दया आली, कीव आली!

"ए सुमन, दादाला लाडू दे आणि याला पण आण."

मांडीवर घेतलेल्या लहानग्याला खेळवत काशीबाईने सुमनला, त्या लहानग्याकरता आणि माझ्याकरता लाडू आणायला सांगितले! काशीबाईने केलेले ते गूळ चुरमुर्‍याचे लाडू आम्ही तिचे दोन्ही नातू खाऊ लागलो! एक नातू अगदीच लहान,बापाने टकलेला आणि एक मी! आपली लहानसहान मध्यमवर्गीय पांढरपेशी दु:ख गोंजारणारा!!

तो गूळचुरमुर्‍याचा लाडू त्या लहानग्याच्या एकदम तोंडात जाईना म्हणून काशीबाई त्या लाडवाचे तुकडे करून त्याला भरवू लागली. ते शेंबडं, लहानगं आता तो लाडू मटामट खाऊ लागलं आणि काशीबाईच्या चेहेर्‍यावरचं कौतुक ओसंडून वाहू लागलं! मला फक्त 'आजीची माया ही घट्ट सायीसारखी' एवढंच पुस्तकी वाक्य पाठ होतं!

"मुंबईची मुंबादेवी,
तिची सोन्याची साखली......"

असं काहीसं गाणं गुणगुणत काशीबाई सुमनच्या मुलाला हसतमुखाने खेळवत होती. बिचारीला 'गतं न शोच्यम' असा काहीसं संस्कृतमध्ये म्हटलेलं आहे हेही ठाऊक नव्हतं! ते संस्कृत वचन न वाचताही ते ती किती सहजपणे आचरणात आणत होती! स्वत:च्या संसाराचा बट्ट्याबोळ झालाच होता, पण आता कडेवर पोर घेऊन मुलगी माघारी आली होती आणि धाकट्या मुलाचं पोरही काशीबाईच्याच गळ्यात! बापरे! काशीबाईच्या या वयातही तिच्या अंगावर असणार्‍या जबाबदार्‍या पाहून माझंच धाबं दणाणलं होतं! सुमन मात्र मला खरंच खूप चांगली मुलगी वाटली. धुण्याभांड्यांची चार कामं तिने मिळवली होती. काशीबाईची शेक, अंगाला लावण्याची कामं, भाकर्‍या आणि सुमनची धुणीभांडी यांच्या वेळा त्या मायलेकींनी आपापसात ऍडजस्ट केल्या होत्या आणि दोघीही त्या लहान पोरांना सांभाळत होत्या!

'तुमची पुढील पैशांची व्यवस्था काय आहे?', 'या मुलांचं तुम्ही कसं करणार?' 'सुमनच्या मुलाचं ठीक आहे, पण काशीबाईच्या दुसर्‍या नातवाची जबाबदारी काशीबाईच्या पश्चात कोण घेणार?' 'की ती जबाबदारी सुमनवरच?' असे कोणतेही प्रश्न मी तिथे विचारू शकलो नाही, नव्हे तेवढी हिंम्मतच नव्हती माझ्यात! आणि स्वाभिमानी काशीबाई हे प्रश्न घेऊन माझ्या दाराशी कधीच येणार नव्हती! उलट हे प्रश्न विचारल्यावर, "तुला का रे बाबा आमची चिंता" असं म्हणून काशीबाईनी मला अगदी सहज झाडून टाकला असता याचीही खात्री होती मला!

हीच का ती काशीबाई, जी भाकर्‍या करताना सगळी दु:ख विसरून गाणी गुणगुणते? हीच का ती काशीबाई, मी रिक्षाचे पैसे देऊ लागल्यावर हिचा स्वाभिमान खाडकन जागा होतो? आणि 'मावशे तू छान गातेस बरं' एवढी लहानशीच दाद दिल्यावर चारचौघीत गोड लाजणारी हीच का ती काशीबाई? अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा?

"दादा, ये हां पुन्हा. लाडू आवडला ना गरीबाघरचा?" काशीबाईने मला हसतमुखाने विचारलं!

'लाडू म्हणजे मोतीचुराचा आणि तोही साजूक तुपातला!' अशी लाडवांबद्दलची माझी व्याख्या! काशीबाईकडच्या गूळचुरमुर्‍याच्या लाडवाने ती व्याख्या साफ पुसून टाकली!

आता पुन्हा एकदा एकवीरेत जाईन, तिथे वांगी बटाट्याची भाजी असेल, आणि पुन्हा एकदा काशीबाई मला म्हणेल,

"आज वांगीबटाट्याची भाजी आहे. तिच्यासंगती भाकरीच खा. आत्ता करून देते गरमगरम भाकरी!"

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयअनुभवप्रतिभा

प्रतिक्रिया

सहज's picture

28 Oct 2007 - 6:26 pm | सहज

तात्या तुला माणसांचा छंद आहे अगदी जाणवते बर का! आवडले. तुझ्या व्यक्तिरेखा एकदम जिवंत वाटतात, जरा नावे बदलून तर आपली काही माणसे आहेत इतकी.

अवांतर - तात्या नुस्ता शिवराळ आहे म्हणणार्‍यांनी तात्याची व्यक्तिचित्रे नक्की वाचावीत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

28 Oct 2007 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

व्यक्तिचित्र रंगवणारा संकेतस्थळावरील एक दादा माणूस म्हणजे, आमचा तात्या !
तात्या, माणसांना वाचतो म्हणून असे लेखन येते. साधना कोळीण असू दे नाही तर, काशाबाई !
ही गणगोतातील माणसे आपल्या आजूबाजुलाच वावरत असतात फक्त त्यांना वाचावं लागतं आणि ते जमतं फक्त तात्यालाच !
म्हणूनच रांगोळी टाकतांना दोन बोटातून सुटणा-या रांगोळीसारखे तात्याचे शब्द सहजपणे येतात आणि सुंदर व्यक्तिचित्र आकाराला येते.
तात्या, असेच लेखन येऊ दे !

तात्याच्या लेखनाचा फॅन
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

देवदत्त's picture

28 Oct 2007 - 7:57 pm | देवदत्त

मस्त एकदम... तात्या तुम्हाला आलेले लोकांचे अनुभव फार काही सांगून जातात. बहुधा लोकांची आणि मग त्यांच्या मैत्रीची आवड हे कारण असेल. पुढे त्यांचे तुम्ही रेखाटलेले व्यक्तिचित्र छान असते. सुक्ष्म निरीक्षण कला आणि लिहिण्याची कला ह्यांचा उपयोग. :)

काशीबाईला रिक्षाने फिरवण्याइतका मी श्रीमंत नव्हतो हे जाणवलं मला!

प्रसंग तसे लहानसहानच असतात पण त्या त्या प्रसंगातूनदेखील आपल्याला माणसाच्या स्वभावातले बारकावे कळू शकतात!
ह्याबरोबरच असे लहानसहान प्रसंग खूप मोलाच्या गोष्टी शिकवून जातात हे मी ही शिकलो आहे.

एखाद्या देखण्या जवान तरतरीत तरुणीसोबत बास्किन रॉबिनसन्सचं आईस्क्रीम खाताना जी मजा येणार नाही ती मजा मला काशीबाईसोबत बर्फाचे गोळे खाताना आली!
मस्त एकदम :)
आणखी लिहीत रहा.

धनंजय's picture

28 Oct 2007 - 9:23 pm | धनंजय

काय सुंदर रंगवले आहे चित्र! गंमत म्हणजे बाळाच्या "सामानाचा रंग" आणि मोठेपणचा गोरेपणा याविषयी मी एका काकूंकडूनच माहिती ऐकली होती.

मेजवानीवर तृप्त ढेकर देताना एका गोष्टीबद्दल बोलतो त्याचे फार मानून घेऊ नका. माझ्यासारखी कोकणी माणसे (शिवाय काही महिने पुणे-३० चे पाणी प्यालेली) तुम्हाला भेटलीच असतील तसे मानून घ्या.

मुख्य म्हणजे ही टीका ज्याबद्दल आहे तो मुळात तुमच्या लेखनाचा सुगुण म्हणावा की अवगुण याबाबत माझ्या मनातच निश्चिती नाही - तो म्हणजे तुमच्या-आमच्या आवडत्या भाईकाकांचा कमालीचा प्रभाव. "त्या वटवृक्षाच्या छायेखाली" आपले-तुपले मराठी भाषेचे प्रेम वाढले आहे. पुलंचा एकएक शब्द आपण मनात मोत्यासारखा माळलेला असतो. पण त्यांच्या लेखन-शिष्यांनी त्यांचे आभार मानताना अगदी तेच लिहितात तसे लिहू नये असे वाटते. म्हणजे "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" वगैरे पुलंची वाक्ये मुळात हृदयाला भिडली असली, तरी ती शाब्दिक "हरकत" अगदी तशीच पुन्हा कोणी वापरली तर कोणास ठाऊक काय म्हणून, मनाला पटत नाही.

याबाबतीत पुलंनी खुद्द मते मांडली आहेत. वसंतराव देशपांड्यांच्यावर लिहिलेल्या मृत्युलेखात त्यांनी असे मत मांडले आहे की वसंतराव अमुकसारखे गायचे ती म्हणजे कोणाच्या गाण्याची नक्कल नाही, आणि का नाही. त्यात "अगदी तसेच गाणे" आणि ऋणनिर्देश मधला फरक त्यांनी मांडला आहे. शिवाय हाच विषय "सखाराम गटणे" मध्ये त्यांनी ओझरता हाताळला आहे.

पुन्हा सांगतो, की पुलंची उस्तादकी इतकी स्पष्ट लक्षात यावी हा म्हणजे वाहावा करण्यासारखा गुण की अरेरे करण्यासारखा अवगुण, याबाबत माझे मन डळमळीत आहे. पण तरीही तुमचे हे व्यक्तिचित्र, पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र वाचून मनात थोडे वैषम्य वाटत होते, ते सांगितले. तुमच्याकडे शब्द मांडण्याची स्वयंभू प्रतिभा आहे, हे दिसतच आहे.

वैषम्यावर फार वाफ दवडली तरी महत्त्वाचे पुन्हा थोडक्यात सांगतो, "मस्त आवडले".

कोलबेर's picture

28 Oct 2007 - 9:43 pm | कोलबेर

तात्या व्यक्तिचित्रण सुंदरच झाले आहे. ते खुलवण्याची तुमची हातोटी बघता तुम्ही आता पुलंच्या कुबड्या फेकुन देऊन स्वतःच्या पायावर पळत सुटावे असे वाटते. "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" अशी वाक्ये खरंच गुळगुळीत वाटतात. ती टाळळीत आणि साचा थोडा बदललात तर लोकं 'अगदी पुलंची आठवण आली' न म्हणता 'अगदी तात्यांची आठवण आली' म्हणतील!

अर्थातच सगळ्यात महत्त्वाचे "मस्त आवडले".

पुढील व्यक्तिचित्रणास शुभेच्छा!

विसोबा खेचर's picture

28 Oct 2007 - 11:33 pm | विसोबा खेचर

वरूणदेवा,

ते खुलवण्याची तुमची हातोटी बघता तुम्ही आता पुलंच्या कुबड्या फेकुन देऊन स्वतःच्या पायावर पळत सुटावे असे वाटते.

त्यांचा माझ्यावर प्रभाव जरूर आहे, परंतु मी त्यांच्या कुबड्या कधीच घेतल्या नाहीत. म्हणजे जाणूनबुजून तरी नक्कीच नाही. मला जसं सुचतं तसंच मी लिहीत जातो.

आणि साचा थोडा बदललात तर लोकं 'अगदी पुलंची आठवण आली' न म्हणता 'अगदी तात्यांची आठवण आली' म्हणतील!

साचा बदलायचा म्हणजे काय करायचं हे माझ्या लक्षात येत नाहीये. हेच व्यक्तिचित्र आपल्यापैकी इतर कुणी वेगळ्या ढंगात लिहून दाखवल्यास मला ते अधिक आवडेल व साचा बदललेल्या थोड्या वेगळ्या चवीचं माझंच व्यक्तिचित्र मला नव्याने वाचायला खरंच आवडेल!

'अगदी पुलंची आठवण आली' न म्हणता 'अगदी तात्यांची आठवण आली' म्हणतील!

अर्थात, एक गोष्ट मात्र स्पष्ट करू इच्छितो की व्यक्तिश: मला तरी 'अगदी पुलंची आठवण आली' असंच म्हटलेलं अधिक आवडेल! म्हणजे त्याचा अर्थ मी 'व्यक्तिचित्र लेखनात मला किमान ३५% इतके तरी गुण आहेत' असा घेईन! :)

आपला,
(भाईकाकांची इतर व्यक्तिचित्रे तर सोडाच परंतु फक्त एका 'अंतू बर्व्या'करता भाईकाकांना ज्ञानपिठ पुरस्कार मिळायला हवा होता असं वाटणारा!) तात्या.

कोलबेर's picture

29 Oct 2007 - 12:04 am | कोलबेर

साचा बदलायचा म्हणजे काय करायचं हे माझ्या लक्षात येत नाहीये.

तात्या हे जर मला कळत/जमत असतं तर तुमच्या पेक्षा जास्त व्यिक्तिचित्रं मी लिहीली नसती का? :-) एखाद्या पदार्थ अजुन चांगला बनण्यासाठी कोणता बदल हवा हे फार तर आम्ही सांगू शकु पण स्वयपाकघरात हा बदल प्रत्यक्षात कसा आणत येइल हे त्या बल्लवाचार्‍यालाच माहित.

आपल्यापैकी इतर कुणी वेगळ्या ढंगात लिहून दाखवल्यास मला ते अधिक आवडेल

कल्पना आवडली प्रयत्न करुन बघेन.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 12:10 am | विसोबा खेचर

कल्पना आवडली प्रयत्न करुन बघेन.

दॅट्स द स्पिरिट...जियो! :)

आम्हाला वरूणदेवांच्या उत्तम लेखणीची कल्पना आहे. त्यामुळे त्यांनी त्यांच्या ढंगात रंगवलेली काशीबाई नक्कीच सरस असेल याची आम्हाला खात्री आहे आणि तो आमचा व आमच्या मैत्रिणीचा सन्मानच असेल!:)

तात्या.

विसोबा खेचर's picture

28 Oct 2007 - 11:22 pm | विसोबा खेचर

काय सुंदर रंगवले आहे चित्र! गंमत म्हणजे बाळाच्या "सामानाचा रंग" आणि मोठेपणचा गोरेपणा याविषयी मी एका काकूंकडूनच माहिती ऐकली होती.

हा हा हा! :)

माझ्यासारखी कोकणी माणसे (शिवाय काही महिने पुणे-३० चे पाणी प्यालेली) तुम्हाला भेटलीच असतील तसे मानून घ्या.

अहो सांगा बिनधास्त. मला कोकणी माणसांची सवय आहे!:)

मुख्य म्हणजे ही टीका ज्याबद्दल आहे तो मुळात तुमच्या लेखनाचा सुगुण म्हणावा की अवगुण याबाबत माझ्या मनातच निश्चिती नाही - तो म्हणजे तुमच्या-आमच्या आवडत्या भाईकाकांचा कमालीचा प्रभाव.

हो, ही गोष्ट खरी आहे. त्यांचा माझ्यावर खूपच प्रभाव आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे व्यक्तिचित्र हा सबंध प्रकारच त्यांनी जितका समर्थपणे हाताळला आहे तेवढा माझ्या माहितीत तरी इतर कुणी हाताळला नाही. नाही म्हणायला, व्यंकटेशतात्यांची , शिरुभाऊंची, आणि दळवींची काही व्यक्तिचित्रे मला आवडतात.

म्हणजे "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" वगैरे पुलंची वाक्ये मुळात हृदयाला भिडली असली, तरी ती शाब्दिक "हरकत" अगदी तशीच पुन्हा कोणी वापरली तर कोणास ठाऊक काय म्हणून, मनाला पटत नाही.

याची नोंद घेतली आहे. तरीही "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" हे खरंच आहे आणि म्हणूनच ते तसं लिहिलं गेलं आहे. असो..

पुन्हा सांगतो, की पुलंची उस्तादकी इतकी स्पष्ट लक्षात यावी हा म्हणजे वाहावा करण्यासारखा गुण की अरेरे करण्यासारखा अवगुण, याबाबत माझे मन डळमळीत आहे.

तुमची वाहवा किंवा अरेरे, आम्ही दोन्हीही गोड मानून घेऊ आणि भाईकाकांच्या पायावर ठेवू! ते आम्हाला समजून घेतील! :)

पण तरीही तुमचे हे व्यक्तिचित्र, पाटणकर आजोबांचे व्यक्तिचित्र वाचून मनात थोडे वैषम्य वाटत होते, ते सांगितले.

याचे मात्र खरेच बरे वाटले....

तुमच्याकडे शब्द मांडण्याची स्वयंभू प्रतिभा आहे, हे दिसतच आहे.

माझ्याकडे शब्द मांडण्याची स्वयंभू प्रतिभा?? धनंजयराव, आता मात्र तुमचा सखाराम गटणे होतोय हे तुमच्या लक्षात येतंय का? :)

वैषम्यावर फार वाफ दवडली तरी महत्त्वाचे पुन्हा थोडक्यात सांगतो, "मस्त आवडले".

धन्यवाद शेठ! :)

आपला,
(भाईकाकांचा शिष्य!) तात्या.

मी वर उल्लेख केलेला उतारा येणेप्रमाणे :

(पु ल देशपांडे यांच्या "आपुलकी" लेखसंचातून, "अब्द अब्द मनीं येतें" मधला परिच्छेद. लेख वसंतराव देशपांडेंबद्दल आहे)
...
तसे पाहिले तर दीनानाथरावांची त्याला प्रत्यक्ष अशी नियमित तालीम लाभली नव्हती; पण दीनानाथरावांचा गाण्यातला अंदाज काय असतो ते त्याने नेमके टिपले होते. एखाद्या घराण्याची गायकी नेमकी आत्मसात करणे म्हणजे त्यातील गुरूची नक्कल करणे नव्हे. रागाच्या विस्ताराबद्दल गुरूचे विचार आत्मसात करणे. ही 'नजर', मला वाटते, उपजतच यावी लागते. ती नजर नसलेल्या शिष्यांचे पाठांतर चांगले होते. मेहनती असला किंवा असली तर गायनात सफाई येते. पण ही कारागिरी झाली. नुसताच तरबेजपणा झाला. असले गाणे छापील असते. ते अंगच्या गुणांनी विकसत नाही.
...

तात्या, माझे (आणि बहुतेक वरुणरावांचे) म्हणणे असे, की पुलं जर दीनानाथ, तर तुमच्यात वसंतराव होण्यासारखा अंगचा उपजत गुण आहे. येथे पुलंची, वसंतरावांची दीनानाथांबद्दल पूजाभावना शब्दाशब्दात दिसून येते. पण तरीही गुरूपेक्षा वेगळे, आपले अंगचे गुण उमटवणे किती महत्त्वाचे आहे, हे पुलंनी किती प्रभावी रीतीने पटवून दिले आहे!

तुम्ही म्हणता की "काशीबाई माझी कुणीच नाही, ना नात्याची ना गोत्याची" हे वाक्य अक्षरशः खरे आहे, आणि यावेगळे लिहिता येणे शक्य नाही. रावसाहेबांबाबत पुलंच्या मोत्यासारख्या शब्दांची ही माळ आपल्या मनात रुळली आहे, म्हणून आपल्याला वाटते की याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने शब्द मांडणे शक्यच नाही. पण इथे उत्तम-अधम भेद करू नका. तात्या अभ्यंकरांच्या स्वतंत्र शैलीत हे तथ्य कसे म्हटले जाऊ शकते हा विचार करावा. याचे उत्तर तुमचे तुम्हीच देऊ शकता. तुम्ही वरुणरावांना हे वेगळे कसे म्हटले जाऊ शकते, असे विचारले. इथे "तात्या हे वेगळे कसे म्हणू शकतील" त्याचे उदाहरण कसे बरे देता येईल? धनंजय स्वतःच्या शैलीत कसे म्हणेल ते सांगतो -
"काशीबाईचे-माझे तसे म्हटले तर काय नाते?"
"म्हणावे तर काशीबाईचे माझ्याशी काहीएक नाते नव्हते."
"काशीबाई म्हटली तर तिर्‍हाईत, पण...(पुढचे वाक्य जोडून.)"
"काशीबाई तशी माझी आवशी ना मावशी." (म्हणजे मनात जर जोरकस यमक साधायचे असेल तर... :-) )
पण हे सगळे पर्याय "धनंजय"च्या शैलीतले आहे, तात्यांच्या लेखनात चांगले दिसणार नाहीत. लेखन माझे असते तर असे अनेक पर्याय मनात मांडून मी माझ्या शैलीला पेलेल असा त्यांच्यापैकीं त्यातल्यात्यात उत्तम निवडला असता. त्याला पुलंच्या शब्दांच्या मोत्याची सर येणार नाही, पण त्यावर माझी अंगची छाप असेल. माझ्या विदेशी छापील मराठीपेक्षा तात्यांचे जिवंत शब्दभांडार मोठे आहे, त्यांना स्वतःच्या स्वतंत्र अंगाचे शब्द माझ्यापेक्षा उत्तम आणि पुलंपेक्षा वेगळे सुचतीलच अशी माझी पैज आहे.

तेव्हा तात्या, पुलंचे वरील म्हणणे तुम्हाला पटते का ते बघा. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊ नका, तर त्यांच्या पावलांने आखलेली वाट आपल्या पावलांनी चाला. टीका असली, तरी ही एका चाहत्याची टीका आहे, गोड माना.

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 12:57 am | विसोबा खेचर

त्यांना स्वतःच्या स्वतंत्र अंगाचे शब्द माझ्यापेक्षा उत्तम आणि पुलंपेक्षा वेगळे सुचतीलच अशी माझी पैज आहे.

आपली ही पैज माझ्या लेखनावरील आपले प्रेम आणि विश्वास दर्शवते. त्याबद्दल धन्यवाद मानून त्यात मी कृत्रिमता आणू इच्छित नाही!

आपले मुद्दे पटले, नव्हे ते पटण्यासारखेच आहेत. परंतु मी आत्ताच कुठे लिहू लागलो आहे, सुधारायला थोडा वेळ द्या, माझ्या लेखनात यथावकाश आपल्या आणि वरूणरावांच्या मुद्द्यांची निश्चितपणे नोंद घेतल्याचे आपल्याला दिसून येईल.

आता गाण्याचंच उदाहरण दिलंत म्हणून सांगतो, की अण्णांचं अगदी तरूणपणीचं (म्हणजे पन्नासच्या दशकातलं, अण्णांच्या तिशी-पस्तिशीतलं) गाणं हे बरचसं, म्हणजे जवळजवळ ९०% हे अगदी सही सही अब्दुल करीमखा साहेबांच्याच धाटणीतलं होतं. साधारणपणे साठाच्या दशकापासून अण्णा स्वतःचं गाणं गाऊ लागले. सांगायचा मुद्दा इतकाच की मलाही अजून थोडा वेळ मिळावा, जेणेकरून आमच्यावर असलेला पुलंकरिमखासाहेबांचा पगडा थोडा दूर होईल! :)

टीका असली, तरी ही एका चाहत्याची टीका आहे, गोड माना.

अरे बस काय शेठ! अहो टीका कसली? उलट तुमची आणि वरूणरावांची ही आत्मियता आहे असंच मी मानतो.

तात्या.

राजे's picture

28 Oct 2007 - 10:51 pm | राजे (not verified)

"अजून हिच्यात इतका गोडवा शिल्लकच कसा? "

जो मनाने समाधानी असेल त्याला इतर जागी आपले दुखः उगाळत बसण्याची गरजच भासत नाही, हे माझे मत.

लेख जबरदस्त.
तात्या, तुम्ही लिहता ते वाचनीय आहेच पण साठवण करुन ठेवण्याजोगे देखील आहे.

राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....

प्राजु's picture

28 Oct 2007 - 11:32 pm | प्राजु

तात्या,
खरंच .. काय लिहीता तुम्ही..! पु.लं च्या नंतर व्यक्तीचित्र वाचावं तर तुम्ही लिहीलेलं.
यापेक्षा आणखी काय सांगू?
काशीबाई... तुमच्या लेखातून आम्हालाही आमची "मावशी"च वाटू लागली.

- प्राजु.

अवांतर : जरा रोशनी आणि शिंत्रे गुरूजींना आधी घ्या लेखणीवर.....!

केशवसुमार's picture

29 Oct 2007 - 3:40 am | केशवसुमार

तात्या. हे ही व्यक्तीचित्र आवडल..
प्राजु म्हणते तस ते रोशनी आणि शिंत्रे गुरूजींना आधी घ्या लेखणीवर..
केशवसुमार..

बेसनलाडू's picture

29 Oct 2007 - 3:47 am | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

स्वाती दिनेश's picture

29 Oct 2007 - 12:56 pm | स्वाती दिनेश

हेच म्हणते!
लेख सुंदर झाला आहे तात्या,झकास!
पण ते जरा अर्धे राहिलेले प्रोजेक्ट...वाट पाहत आहोत आम्ही त्यांची,:)
स्वाती

प्रियाली's picture

30 Oct 2007 - 3:31 pm | प्रियाली

लेख वाचायचा राहून गेला होता म्हणून उशीरा प्रतिसाद. लेख नेहमीप्रमाणेच उत्तम!

राहिलेले लेखही लवकर पूर्ण करा.

आजानुकर्ण's picture

29 Oct 2007 - 8:24 am | आजानुकर्ण

खूप आवडले. याआधीची बरीच व्यक्तीचित्रणे पुलंष्टाईल होती.

हे जरा स्वतंत्र आणि खूप चांगले आहे.

नंदन's picture

29 Oct 2007 - 8:59 am | नंदन

काशीबाईचे व्यक्तिचित्र आवडले. तिची स्वाभिमानी वृत्ती, निरागसपणा आणि आजीची माया छान टिपली आहेस.
(अवांतर - भाकरी नि वांगा-बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन मस्त आहे :) )

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

विसोबा खेचर's picture

29 Oct 2007 - 9:20 am | विसोबा खेचर

(अवांतर - भाकरी नि वांगा-बटाट्याची भाजी हे कॉम्बिनेशन मस्त आहे :) )

'बोल तात्या, तुझी शेवटची इच्छा काय आहे?' असं जर मला मरताना यमाने विचारलंन तर मी त्याला एवढंच सांगेन की,

'बाबारे, चिंच-गूळ-दाण्याचं कुट लावून केलेली वांगीबटाट्याची भाजी, मिरचीचा खरडा आणि ज्वारीची गरम भाकरी मला खायला दे आणि त्यानंतर सातारी तंबाखूच्या पिंका टाकत टाकत रेड्यावर डब्बलशीट बसून तुझ्यसोबत तू म्हणशील तिथे मी येईन! :)

आपला,
तात्या कामत.

आजानुकर्ण's picture

29 Oct 2007 - 9:23 am | आजानुकर्ण

पण तुम्ही आधी मिसळ किंवा इंदौरची मिठाई म्हटला होता ना? चॉईस सारखी बदलत राहिली तर बिचार्‍या यमाला पंधरावीस शेफ तयार ठेवायला लागतील पर्मनंट. ;)

(काडीघालू) आजानुकर्ण

सहज's picture

29 Oct 2007 - 9:32 am | सहज

अरे सुरवात "वांगोटा"(वांग-बटाटा) भाजीने मग जरा रेडा इकडन घ्या हो करत करत बरोबर हाजमोला सकट सर्व काही हजम करून यम व तात्या एकत्र मौजेत जातिल ;-) खरं की नाय तात्या?

नंतर यमाला वरून आदेश येतील की यापूढे कूठल्याही क्लायंटला "तात्या रूट"ने आणायचे नाही.

च्यायला मस्त कल्पना सुचली आहे यम अश्याच एका नाना फडणवीसला घेऊन चाललायं :-)

सर्किट's picture

29 Oct 2007 - 11:22 pm | सर्किट (not verified)

'बाबारे, चिंच-गूळ-दाण्याचं कुट लावून केलेली वांगीबटाट्याची भाजी, मिरचीचा खरडा आणि ज्वारीची गरम भाकरी मला खायला दे आणि त्यानंतर सातारी तंबाखूच्या पिंका टाकत टाकत रेड्यावर डब्बलशीट बसून तुझ्यसोबत तू म्हणशील तिथे मी येईन! :)

तात्या,

प्लीज यमाला असल्या मागण्या करू नकोस !
तुझ्यासोबत भाजी भाकरी खाल्लीच त्याने, आणि आवडली, तर इथे भूतलावरच पर्मनंट मुक्काम ठोकायचा बेटा, रेड्यासकट !
त्यापेक्षा काय ते "तेगार" वगैरे वाचायला सांग त्याला आणि मोकळा हो बघू !!

(आणि हो, "त्यांच्या" मनातून मिसळपाव उतरले होते, त्याचे आता काय स्टेटस आहे रे ? त्यांना परत बोलवायला पोष्टमन पाठवू काय ?)

- सर्किट

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:41 am | विसोबा खेचर

त्यापेक्षा काय ते "तेगार" वगैरे वाचायला सांग त्याला आणि मोकळा हो बघू !!

चालेल! :)

(आणि हो, "त्यांच्या" मनातून मिसळपाव उतरले होते, त्याचे आता काय स्टेटस आहे रे ?

अजूनही तसेच आहे! अर्थात, त्यांची इथे फेरी असते, वाचनही असतं, परंतु ते इथे जाहीर लेखन करत नाहीत! काय करणार बाबा, मनोगताच्या संपादकीय पदावर आता त्यांना बढती मिळाली आहे ना! :) तेव्हा आपल्या मिसळपावसारख्या सामान्य जनांच्या संकेतस्थळावर लिहिणं त्यांच्या साहित्यिक स्टेटसच्या आता आड येत असेल!:)

त्यांना परत बोलवायला पोष्टमन पाठवू काय ?)

नको, त्याची विशेष गरज वाटत नाही, कारण पोष्ट्याच्या तश्या इथे फेर्‍या असतातच! मिसळपावच्या गुगल एनालिटिक्स प्रमाणे अमेरिकेतील संयुक्त राज्यांपैकी नॉर्थ कॅरिलोनाची विमानं मिसळपाववर बर्‍याच घिरट्या घालत असतात असे कळते! :)

आपला,
(शि आय डी) तात्या.

सर्किट's picture

29 Oct 2007 - 10:29 pm | सर्किट (not verified)

काशीबाईची सगळी श्रीमंती नजरेसमोर उभी राहिली !
तात्या, मस्त झालेय हेदेखील चित्र !
एक सूचना आहे. तुमच्या प्रत्येक शब्दचित्रासोबत ओंकारशेठने त्यांच्या मनःचक्षूपुढे उभे राहिलेल्या त्या व्यक्तीचे रेखाटन द्यावे !

लगे रहो तात्याभाय !

- सर्किट

विसोबा खेचर's picture

30 Oct 2007 - 1:25 am | विसोबा खेचर

काशीबाईची सगळी श्रीमंती नजरेसमोर उभी राहिली !

क्या बात है सर्कीटदेवा! तुझं हे अवघ्या एका वाक्यातलं परिक्षण मला खूप आवडलं. खरं तर मलाही या लेखातून काशीबाई किती श्रीमंत आहे हेच दाखवून द्यायचं होतं!

असो, तुझ्या या एका वाक्याच्या चपखल परिक्षणाकरता तुला वसंतरावांचं माझ्या संग्रही असलेलं 'अरे वेड्या मना तळमळसी' नक्की सप्रेम भेट म्हणून देईन. ही दृकश्राव्य ध्वनिचित्रफित एका खाजगी घरगुती मैफलीतली आहे! काय सुरेख गायलंय यार वसंतरावांनी! ही फित पाहताना गाणार्‍या वसंतरावांना एकन एक सूर असा समोर डोळ्यासमोर दिसतो आहे असं वाटतं! क्या बात है....

एक सूचना आहे. तुमच्या प्रत्येक शब्दचित्रासोबत ओंकारशेठने त्यांच्या मनःचक्षूपुढे उभे राहिलेल्या त्या व्यक्तीचे रेखाटन द्यावे !

क्या बात है! पूर्णपणे सहमत आहे. ओंकारशेठकडे ती कॅपॅबिलिटी निश्चितच आहे!

तात्या.

llपुण्याचे पेशवेll's picture

26 Jan 2009 - 8:11 am | llपुण्याचे पेशवेll

तात्या मला पण दे वेड्या मना तळमळसी चे दृक्श्राव्या रेकॉर्डींग.
पुण्याचे पेशवे
Since 1984

आजानुकर्ण's picture

30 Oct 2007 - 11:55 am | आजानुकर्ण

मस्त. असेच म्हणतो. ओंकारचा रेखाचित्रांचा उपक्रम थोडा थंड आहे का?

प्रकाश घाटपांडे's picture

29 Oct 2007 - 10:55 pm | प्रकाश घाटपांडे

त्यांचा माझ्यावर प्रभाव जरूर आहे, परंतु मी त्यांच्या कुबड्या कधीच घेतल्या नाहीत. म्हणजे जाणूनबुजून तरी नक्कीच नाही. मला जसं सुचतं तसंच मी लिहीत जातो.

प्रभाव वजा अभाव =भाव
हे प्रत्येकात असंत; ज्याच जे भावेल ते सहजतेने घेतल जातच. ही सहजता प्रेरणेतूनच येते. एके काळी प्रथितयश गायकांच्या व्यतिरिक्त इतर गायकांनी कितिही चांगल गायल तरि ते डुप्लिकेट . श्रोत्यांची ऐकून घेण्याची मानसिकताच नसायची. लगेच आयडॉलशी तुलना व्हायची. पण आता चित्र बदलल आहे. ग्लॅमरने ही किमया घडवून आणली. व्यक्तिचित्रासोबत एखाद रेखाचित्र टाकता आल तर अजून मजा येईल.
प्रकाश घाटपांडे

प्राजु's picture

30 Oct 2007 - 12:33 am | प्राजु

रेखाचित्र टाकावे एखादे..

- प्राजु.

ध्रुव's picture

30 Oct 2007 - 1:58 pm | ध्रुव

तात्या, खरच काय सुंदर लिहीलं आहे!!
मजा आया!!
ध्रुव
सद्ध्याचा पत्ता - http://www.flickr.com/photos/dhruva

विसोबा खेचर's picture

31 Oct 2007 - 9:07 am | विसोबा खेचर

सर्व वाचकांचा आणि प्रतिसाद देणार्‍यांचा मी ऋणी आहे...

माझ्या लेखनावर भाईकाकांचा प्रभाव आहे असं बर्‍याच जणांनी म्हटलं आहे आणि ते खरंही आहे!

भाईकाकांच्या प्रभावाविषयी,

प्रभाव वजा अभाव =भाव
हे प्रत्येकात असंत; ज्याच जे भावेल ते सहजतेने घेतल जातच. ही सहजता प्रेरणेतूनच येते.

असं घाटपांडेसाहेबांनी म्हटलेलं आहे, तेच मलाही म्हणायचं आहे!

सुरवातीच्या वाटचालीमध्ये गुरुचा प्रभाव हा असतोच, त्याचंच बोट धरून चालावं लागतं असं मी मानतो. कालांतराने प्रत्येकाला स्वत:ची वाट सापडते तशी ती मलाही सापडावी हीच इच्छा. तूर्तास मी आमच्या गुरुजींचंच बोट धरून चालण्यात समाधानी आहे, सुखी आहे! :)

असो, पुन्हा एकदा सर्व प्रतिसादींचे मन:पूर्वक आभार...

आपला,
(भाईकाकांचा शिष्य) तात्या.

साती's picture

1 Nov 2007 - 9:17 am | साती

तात्या, लेख आवडला. काशीबाई अगदी डोळ्यासमोर दिसल्या.सगळ्या व्यक्तिचित्रांची सूची इथे एकत्र दिलीत हे चांगले केलेत.

साती

प्रमोद देव's picture

1 Nov 2007 - 9:37 am | प्रमोद देव

व्यक्तीचित्र लेखन हे आता तात्याचे वैशिष्ठ्य झालेय ह्यात शंकाच नाही.
काशीबाईचे व्यक्तिचित्रही छान उतरले आहे. तरीही तात्या तुझ्या "बुवा" ह्या व्यक्तीचित्राने जी मोहिनी घातली होती त्या मानाने काशीबाईमध्ये काही तरी कमी वाटतंय. आता नेमके काय ते मात्र सांगता येत नाहीये. कदाचित काही तरी "खुसपट" काढायचेच आहे म्हणून, असेही म्हणता येईल.

स्वाती राजेश's picture

9 Nov 2007 - 2:16 am | स्वाती राजेश

काशिबाईचे सुंदर व्यक्तिचित्र आहे.

आजच वाचले.

बाकीची व्यक्तिचित्रे वाचली नाहीत.

लवकरच वाचेन.

अशीच सुंदर असतील यात शंका नाही.

समिधा's picture

24 Jan 2009 - 3:59 am | समिधा

फारच सुंदर लिहीलयत हो तात्या. अगदी डोळ्यासमोर काशिबाई आणि तिची परिस्थिती उभी राहीली.

विसोबा खेचर's picture

24 Jan 2009 - 8:01 am | विसोबा खेचर

देवकाका, स्वाती राजेश, समिधा,

धन्यवाद!

तात्या.

डॉ.प्रसाद दाढे's picture

24 Jan 2009 - 3:13 pm | डॉ.प्रसाद दाढे

वा तात्या, पुन्हा सिक्सर! खूपच आवडलं हे पण व्यक्तिचित्र.. पुलंचा प्रभाव असणं स्वाभाविकच आहे, त्याचा पुलंप्रेमी॑ना अभिमानच आहे.

संदीप चित्रे's picture

26 Jan 2009 - 6:33 am | संदीप चित्रे

>> 'चांदोबा माज्या म्हाह्येरचा, सून मी सुर्व्याघरची!'

काय सुरेख व्यक्तिचित्रण आहे रे... च्यायला, अस्संच निघावं आणि तुला भेटून यावं असं वाटतं असं काही वाचलं की !!
जियो...
अजून खूप खूप माणसं जोड आणि एकसे एक व्यक्तिचित्रणं लिही :)

शितल's picture

26 Jan 2009 - 8:46 am | शितल

तात्या,
काशीबाईंचे व्यक्तीचित्रण आवडले, खुपच सुंदर झाले आहे. :)

आपला अभिजित's picture

26 Jan 2009 - 10:49 am | आपला अभिजित

तात्या,
व्यक्तिचित्रणात तुमचा की-बोर्ड कुणी धरणार नाही! :)
बाहेरून सर्वसामान्य दिसणार्‍या व्यक्तींच्या अंतरंगात डोकावण्याचा आपण सहसा प्रयत्न करत नाही. पण डोकावल्यावर त्यांच्या व्यक्तिमत्वाचे सप्तरंग आयुष्य उजळून टाकतात! त्यांच्या व्यथा, वेदनाही कळतात आणि आपली त्यांच्याकडेच नव्हे, तर आयुष्याकडे बघण्याची द्रुष्टीही बदलते.

`असेच लिहीत राहा' म्हणणे म्हणजे सूर्याला `रोज उगवत राहा' म्हणण्यासारखेच आहे!
असो.

माझ्यासारख्या मुखदुर्बळांच्या आयुष्यातल्या काही उलगडलेल्या काही न उलगडलेल्या व्यक्तिमत्त्वांविषयी लिहिण्यासाठी ही आता हात शिवशिवत आहेत!

- अभिजित.

प्रभाकर पेठकर's picture

26 Jan 2009 - 12:12 pm | प्रभाकर पेठकर

तात्या,
मी सुद्धा तुमचे हे लिखाण तुम्ही लिहिलेत तेंव्हा वाचले नव्हते. आज वाचनात आहे.
'जसे सुचले तसे, मन रिकामे होईस्तोवर' लिहीणे हा तुमचा स्वभाव आणि हि तुमची लेखनशैली वाखाणण्याजोगी आहे. अभिनंदन.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!