भारताच्या पहिल्या अर्थमंत्र्यांनी आय ए एस अकॅडमी मध्ये केलेल्या भाषणात तिथल्या होऊ घातलेल्या सचिव अधिकार्यांना असे म्हटले होते कि आता तुम्ही जगातल्या सर्वात सुरक्षित अशा नोकरीत शिरत आहात जेथे तुम्ही जरी खून केलात तरी शिक्षा म्हणून फक्त बदली होते. आणी बर्याच वेळा तीसुद्धा बढती च्या पदावर. इतकी सुरक्षित नोकरी असल्यावर आपण त्याचा वापर जनहितासाठी केला पाहिजे. परंतु तीरुनेल्लाई नारायणन शेषन या भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या लेखनातील एक वाक्य आठवत आहे. ते म्हणाले कि I A S म्हणजे (आय एम सॉरी)हे म्हणण्याचा अधिकार.
माझी सरकारी नोकरी सुरु झाल्यावर मला वरील लेखनाचा खूप फायदा झाला याचे कारण मला एक माहिती होते कि जोवर मी कोणतेही चुकीचे काम करीत नाही( कामात चूक नव्हे) तोवर माझा पगार आणी बढतीला कोणीही हात लावू शकत नाही. यामुळे मी अतिशय नीडरपणे आपले काम करीत असे.
एक (१९८९) मी कुलाब्याच्या अश्विनी या नौदलाच्या रुग्णालयाच्या अधिकारी वार्ड चा प्रभारी होतो आणी मला अतिरिक्त असे वैद्यकीय अभिलेख कार्यालयात काम दिलेले होते. सर्व कागदी घोडे नाचविणे हे या विभागाचे काम असे. एके दिवशी एक नौदलातील कमांडर छातीत दुखते म्हणून माझ्या वार्डात भरती झाला. त्याची स्ट्रेस टेस्ट आणि आन्जीयोग्राफी केल्यावर असे लक्षात आले कि याच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ५ अडथळे आहेत आणी त्याची लवकरात लवकर बायपास शस्त्रक्रिया करणे आवश्यक होते.
त्यावेळी अश्विनी रुग्णालयात बायपास ची सोय नव्हती.त्यासाठी जसलोक आणी बॉम्बे हॉस्पिटलशी नौदलाचा करार झालेला होता.
त्याला येणाऱ्या खर्चाचे दिल्लीतील मुख्यालयातून मंजुरी घेतल्यावर नौदलाच्या वेतन कार्यालयाचे पतपत्र (credit note) दिल्यावर ती शल्यक्रिया होत असे
यासाठी त्याला लागणारी कागदपत्रे मी स्वतः तयार करून अश्विनी च्या कमांडिंग ऑफिसर ची सही घेऊन ते पत्र FAX ने तातडीचे म्हणून नौदलाच्या मुंबईच्या कमांडर इन चीफ कडे पाठवले. त्यांच्या सहीनंतर ते दिल्लीत FAX ने पाठविले जात असे आणी त्याचे उत्तर अश्विनीला FAX ने येत असे. तीन तास झाले तरी कोणतेही उत्तर आले नाही म्हणून मी दिल्लीला फोन लावला तर ते म्हणाले कागद आमच्या कडे आलेले नाहीत. म्हणून मी कमांडर इन चीफ च्या स्वीय सहाय्यकाला दूरध्वनी केला तर हे महाशय झारीतील शुक्राचार्य निघाले. ते म्हणाले कि कमांडर इन चीफ ला वेळ नाही आणी अशी कागदपत्रे एक तासात देण्याची पद्धत नाही. यावर माझा पारा चढला आणी मी त्या लेफ्टनंट ला सरळ झाडले. मी त्याला म्हटले कि हि शल्यक्रिया जर तातडीने केली नाही तर हा अधिकारी दगावेल आणी आपल्या कमांडर इन चीफ ला त्याच्या अंत्ययात्रेत उभे राहून सलामी द्यायला लागेल. म्हणजे तू जर काम केले नाहीस तर हा अधिकारी कमांडर इन चीफ ला पण वरिष्ठ होईल. तेंव्हा तू गपचूप काम कर. मुळात तू स्वतः शंकर नाहीस तू फक्त नंदी आहेस ते सुद्धा तू शंकराच्या देवळात बसला आहेस म्हणून नाहीतर बैल म्हणून तुझ्या पार्श्वभागावर लाथा घातल्या जातील. मी तुला आता परत फोन करणार नाही पण हा अधिकारी जर दगावला तर मी तुला पूर्णपणे जबाबदार धरीन. मी या गोष्टी अश्विनीच्याकमांडिंग ऑफिसर आणी दिल्लीत कळविल्या आहेत असे म्हणून मी फोन ठेवून दिला पुढच्या ४५ मिनिटात दिल्लीहून त्या अधिकार्याच्या शस्त्रक्रियेच्या मंजुरीचा FAX माझ्या कार्यालयात आला.
दुर्दैवाने सरकारी नोकरीत माणसे शक्ती आणि उपद्रवमूल्य( POWER & NUISANCE VALUE) याची गल्लत करतात. तुमची शक्ती हि इतरांच्या कामासाठी वापरणे आवश्यक आहे त्यांना त्रास देण्यासाठी नाही. ( बर्याच वेळेला तुमचे उपद्रवमूल्य किती यावर तुम्हाला मिळणारे वरकड उत्पन्न अवलंबून असते).
क्रमशः
प्रतिक्रिया
25 Apr 2013 - 10:42 am | मराठमोळा
मागे "आजचा दिवस माझा" हा चित्रपट पाहिला. bureaucrats vs Politician हा प्रकार दिग्दर्शकाला फार प्रभावीपणे मांडता आला नसला तरी साधारण याच धरतीवर आधारीत आहे. अर्थात ह्या सिनेमात सचिन खेडेकर यांनी एका चांगल्या नेत्याची भुमिका साकारली आहे जे प्रत्यक्ष जगात कधी पहायला मिळणार नाही. सत्ताधारी चांगला असेल तर bureaucrat ना ताळ्यावर आणता येते.
25 Apr 2013 - 9:08 pm | मुक्त विहारि
"अर्थात ह्या सिनेमात सचिन खेडेकर यांनी एका चांगल्या नेत्याची भुमिका साकारली आहे जे प्रत्यक्ष जगात कधी पहायला मिळणार नाही."
असे एक नेते आहेत..
नरेंद्र मोदी.. १९९२ पासून माझा आणि गुजरात चा फार जवळून संबंध आहे... चिमणराव पटेल ते नरेंद्र मोदी हा प्रवास एकदा वाचून बघा...
25 Apr 2013 - 11:06 am | राही
हेही स्फुट आवडलेच.
'विद्या विवादाय, धनं मदाय,खलस्य शक्ति: परपीडनाय |
साधोsस्तु सर्वं विपरीतमेतद, ज्ञानाय दानाय च रक्षणाय ||'
25 Apr 2013 - 1:26 pm | मन१
+१
25 Apr 2013 - 11:48 am | तुमचा अभिषेक
खरय, सुरक्षित नोकरी अन चिंतामुक्त आरामाचे काम.. माझीही सरकारी नोकरी करायची इच्छा होती.. केलीही होती.. पण केवळ मनासारखी पोस्टींग न झाल्यामुळे सात आठ महिन्यात सोडावी लागली..
25 Apr 2013 - 12:17 pm | प्रकाश घाटपांडे
अगदी यथार्थ वर्णन!
याच मानसिकतेतुन मला सरकारी नोकरीत एक रुपयाचही मेडिकल रिईंबर्समेंट कधी मिळाले नाही.मनस्ताप मात्र झाला.
25 Apr 2013 - 8:53 pm | अण्णु
+१
25 Apr 2013 - 9:57 pm | पैसा
बहुतांश अधिकारी आपले उपद्रवमूल्यच दाखवतात. क्वचितच त्या ताकदीचा चांगल्या कामासाठी उपयोग केला जातो.
26 Apr 2013 - 6:14 am | स्पंदना
सह्ही!!
हेच एकदा मी एका बँक मॅनेजरला सांगितल होत. फक्त नंदी वगैरे काय म्हण्टल नाही, पन उगा आडवं घालता येतय म्हणुन आडव पडायच असेल तर बाहेर रस्त्यावर पडावे अस सुचवल होत. असल काही कुणी ऐकवल नसल्याने महाशय गोंधळले अन काम करुन रिकामे झाले, अर्थात सगळा वेळ बैलासारखे फुसफुसत होते.
28 Apr 2013 - 1:42 pm | बॅटमॅन
भारीच! बरी अद्दल घडवलीत.
27 Apr 2013 - 12:35 pm | अभ्या..
मस्त लिहिताय डॉक्टरसाहेब. छान.
स्वत:चे उपद्रवमूल्य दाखविण्यात सुध्दा आजकाल बरीच क्रियेटीव्हीटी येत आहे. :(
28 Apr 2013 - 1:42 pm | बॅटमॅन
खतरनाक. ते शंकर अन नंदी सगळ्यात भारी.
28 Apr 2013 - 3:18 pm | अप्पा जोगळेकर
मस्तच.
बाकी चिंतामुक्त वातावरणात आणि अकाउन्टेबिलिटी नसलेल्या ठिकाणी काम करण्यात कोणता फायदा, आनंद असतो हे अजूनही कळलेले नाही.