गर्दीने भरून सांडणाऱ्या स्टेशन मधून ती कशीबशी बाहेर पडली, आणि तीच तिलाच हायसं वाटलं. हातातली पिशवी सावरत ती एका कडेला सावलीत उभी राहिली, पिशवीतून पाण्याची बाटली काढून अर्धी संपवल्यावरच तिच्या जीवात जीव आला. रुमालाने चेहरा सारखा करत तिने आईला फोन करून सुखरूप उतरल्याचे सांगितले. पण अजूनही प्रवास संपलेला नव्हता, एक महत्वाचा टप्पा पार पडला एवढेच,प्रचंड गर्दीनेच ती दडपून गेलेली होती,
उन्हाळा मी म्हणत होता. उन्हाच्या झळांनी हैराण होऊन तिने ओढणी तोंडावर बांधून घेतली .हातातला पत्ता पाठ झालेला असूनही तिने परत पाहून घेतला, हो चुकामुक नको परत. विचारत विचारत ती बस स्थानकात आली, शहरानजीकच्याच एका उपनगरात तिला जायचे होते. तरी साधारण दोनेक तासांचा प्रवास होता, बरासचा वेळ बस शोधण्यातच गेला, शेवटी तिला बस मिळाली ,आणि बसायला जागाही. बाहेरचा गरम का होईना वारा लागल्यावर तिला बरे वाटले. डोळे मिटून घेतल्यावर बाहेरच जग तात्पुरत बंद झालं आणि आतलं विचारचक्र सुरु झालं.
किती वर्ष झाली आपल्याला आत्त्याकडे येऊन, बापरे आठवावंच लागेल, हा बहुतेक आठ - दहा वर्षांपूर्वी तिच्या "वाढदिवसाच्या" सोहळ्याला आपण आलो होतो, सगळेच.. बाबा पण होते तेंव्हा, कसला जंगी सोहळा होता, पाण्यासारखा पैसा खर्च केलेला होता. आपण तशा लहानच होतो तेंव्हा पुढे आईने सांगितले म्हणून बाकी पण समजले, कशावरून काहीतरी वाद झाला, पण आत्त्याचे मिष्टर बाबांना गरीब परिस्थितीवरून चार चौघात जिव्हारी लागेल असं बोलले, आणि आपण तिथे न जेवता तसच मागे गावी आल्याच तिला अंधुकस आठवत होतं.
त्यानंतर पुन्हा बाबा कधीही आत्याकडे गेले नाहीत, न आत्त्याने कधी बाबांना संपर्क केला. तसंही आत्याचा स्वभाव तसा थोडासा आपमतलबी. सासरच्या गडगंज श्रीमंतीने तिला माहेरच्या माणसांपासून दूर नेले ते कायमचेच. चार वर्षांपूर्वी बाबा गेले अचानक, तेंव्हाही साध तिला यावस वाटलं नाही. पैसा माणसाला असं वागायला भाग पाडतो? खरय पैसाच कारण आहे.. माणूस नाही. आपणही आपल्या वडलांचा झालेला अपमान विसरून केवळ पैशासाठीच तर पुन्हा आत्याबाईकडे जातोय.
तिला पंधरा दिवसापुर्वीच प्रसंग आठवला, घरी अचानक फोन , आत्त्याच्या अमेरिकेत स्थाईक असलेल्या मुलाने केलेला, आईला पण आश्चर्य वाटलं, मग समजलं कि आत्या खूप आजारी आहे, शारीरिक म्हणण्यापेक्षा मानसिकच, हल्ली ती कोणालाच ओळखत नसे, आहार अचानक कमी झालाय, चालण फिरणं सगळंच बंद, सतत सारखा कोणाचा तरी आधार लागतो. काही दिवसांपूर्वी अचानक स्वतः उठून चालायला लागली आणि घसरून पडली, बरंच लागलं, भरपूर रक्त गेलं, आता परिस्थिती अजूनच बिकट आहे. आत्याची दोन्ही मुलं परदेशात, मिष्टरांना जाऊनही बरीच वर्ष झालेली, जवळची अशी माणस कधी जोडलीच नव्हती,
आता एकटेपणा येणारच. घरात नोकर चाकर आहेत, पण हक्काचं त्यांच्यावर आणि आत्यावर लक्ष ठेवणारं कोणी नाही.मुलांना त्यांचे व्याप सोडून इकडे येणं शक्य नाही. शिवाय कुठलाही आश्रमही अशा केसेस ठेवून घेत नाही. अशा परिस्थितीत त्यांना आमची आठवण आली. डॉक्टरांनी जेमतेम 3/४ महिने जातील एवढी मुदत दिलेली होती. अशा परिस्थितीत मी किंवा आईने तिकडे काही महिने राहून आत्याची काळजी घ्यावी असे त्यांचे म्हणणे किंवा कळकळून केलेली विनंती म्हणा हवतर होती. ते त्याचे व्यवस्थित पैसेही देणार होते.
तिची नुकतीच शेवटच्या वर्षाची परीक्षा झालेली होती, आणि भाऊ बारावीला जाणार होता.. आईने तिलाच जायला सांगितले, खरतर तिला अजिबात जायची इच्छा नव्हती , पण बाबा गेल्यानंतर घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झालेली, आई ओढाताण करून दोन्ही भावंडाच शिक्षण करत होती, जगायला पैसा तर लागतोच ना,शिवाय 3/४ महिन्यांचाच तर प्रश्न होता. पैसे तसे खूपच मिळणार होते. आईला माझ्या लग्नाची पण चिंता होती,नोकरी मिळेपर्यंत हे पैसे बाजूला पडतील, तेवढीच सोय. असा सर्व विचार मायलेकींनी करून तिला आत्याकडे पाठवायचा निर्णय घेतलेला होता.
आत्या .. कितीवर्ष झाली तिला पाहून .. ती अजूनच भूतकाळात गेली. आत्याला सुपारीची हौस, झोपाळ्यावर मंद झोके घेत, सुपारी कातरत स्वताच्या घराबद्दल अभिमानाने बोलणारी आत्या तिला आठवली, आत्याचे व्यक्तिमत्वही भारदस्त, खानदानी शोभेलसे, छान उंची, गौर वर्ण, तेजस्वी डोळे. त्या लहान वयातही आत्याच्या व्यक्तिमत्वाने तिला भुरळ घातलेली होती. पण नंतरचा तो प्रसंग...
तिला अचानक जाग आली. बस त्या उपनगरात शिरत होती, ह्या मधल्या वर्षात बरेच बदल झालेले होते, टोलेजंग इमारती उभ्या राहिलेल्या होत्या, गर्दी सुद्धा प्रचंड होती. विचारांच्या तंद्रीत आपण पोचलो आहोत हे फोन करून आत्त्याच्या घरी कळवायचे पण ती विसरून गेली. तिने घाईघाईत मोबाईल काढला आणि आत्त्याला फोन लावला. ते हि तिच्याच फोन ची वाट पाहत होते. आत्येभावाने 'निखील' ने उतरून तिथेच उभी राहा असं सांगितलं, पंधरा वीस मिनिटात तो गाडी घेऊन आला. तेही एकमेकांना बर्याच वर्षांनी भेटत होते. जुजबी बोलणं झाल्यावर ते निघाले, आता तिच्यावर अनामिक दडपण आलेलं होतं. सगळं सोडून परत गेलेलं बर . पण मग घरची परिस्थिती डोळ्यासमोर होतीच. वाटेत निखील आत्याच्या तब्येतीबद्दल सांगत राहिला.
निलीमा म्हणजे त्याची बहिण, तीही आलेली होती, पण दोघांनाही जेमतेम आठवड्याची सुटी मिळालेली होती, त्यानंतर दोघेही परत अमेरिकेत परतणार होते. तो बडबडत होता आणि ती हु हु करत होती. तिच्या डोळ्यासमोर झोपाळ्यावर बसून सुपारी कातरत बोलणारी तिच्या अत्याच येत होती. पूर्वी गावाबाहेर वाटणारी आत्याच्या बंगल्याची सोसायटी, आता विस्तारामुळे बर्यापैकी गावकुसात आल्यासारखी वाटत होती, लोकवस्ती बरीच वाढलेली होती. पण तशी तुरळकच, अजून बांधकाम सुरु होती, म्हणजे काही वर्षात हेही सगळं भरून जाणार तर, ती बघत होती. निखीलने गाडी वळवली, आणि बंगल्यांची रांग सुरु झाली. चौथा बंगला आत्त्याचा... "ध्यासपर्व" !!! दोन मजली प्रशस्त वास्तू.. ती गाडीतून उतरली, एव्हाना संध्याकाळ उतरू लागलेली होती, सूर्य बंगल्याच्या मागे गेलेला होता, त्यामुळे वास्तू काळपट दिसत होती, पूर्वीची बंगल्याची चकाकी काहीच उरलेली नव्हती.
निखील ने गाडी बाजूला लावली आणि तिला घेऊन तो आत आला. दिवाणखान्यात शिरण्यापूर्वी तिला झोपाळा दिसला. मात्र आत्ता तो रिकामाच होता, त्याची मालकीण आजारी होती. आत बरीच माणसे जमलेली होती, तिला जरा अवघडल्यासारखे झाले, पण निखील जरा बोलका होता, त्याने सर्वांशी तिची ओळख करून दिली. निखील ची बायको, त्याची दोन लहान मुल,नीलिमा तिचा नवरा, अजून पाच सहा नात्यातली मंडळी होती. आत्याच्या तब्येती विषयीच चर्चा सुरु होती.आत्याची तब्येत खालावली आहे म्हणून,का तीचं बघणार कोण,आपल्यावर ती जबाबदारी येणार नाही ना म्हणून सगळे चिंतेत आहेत, हे बाकी तिला समजत नव्हतं.
तेवढ्यात नीलिमा म्हणाली चल वर, आत्याला वरतीच ठेवलंय, बघून येऊया. ती इकडे तिकडे बघत जिन्याने वर जायला लागली, दिवाणखाना चांगलाच प्रशस्त होता, जुन्या वळणाचा होता पण, सगळं फर्निचर पण जुन्या काळातलं, जिन्याखालच्या कोपर्यात एक मोठं पुरुषभर उंचीच घड्याळ उभं होतं, शिवाय अजूनही ते चालू होतं. ती वर आली ,डावीकडे दोन आणि उजवीकडे दोन बंद खोल्या होत्या, नीलिमा डावीकडच्या पहिल्या खोलीत शिरली, तीही तिच्यापाठोपाठ आत गेली.
आत मध्ये शिरल्यावर तिला धक्काच बसला, समोर एका प्रशस्त बेड वर दोन तीन बेडशीट गुंडाळून ठेवल्यावर कसा आकार दिसेल, तशी आत्याची कुडी झोपलेली होती, जवळपास सांगाडाच शिल्लक राहिलेला होता, त्यावर एक गाऊन घातलेला होता, केस जवळपास कापूनच टाकलेले होते , डोक्याला मोठं ब्यान्डेज बांधलेलं होतं, गालफडं आत गेल्याने दात बाहेर आलेले, तिला कसेसच झालं, तिच्या डोळ्यासमोर लहान असताना पाहिलेली आत्त्याच येत होती, भारदस्त , लांब केस असलेली , तेजस्वी, करारी.. तिच्या नजरेतले भाव बहुधा नीलिमाने ओळखले असावेत, "हम्म काय अवस्था झालीयेस पाहिलंस ना.. काही पोटात जातंच नाहीये.
डॉक्टर म्हणाले हे असंच सुरु राहणार, आता रीकवर होणं कठीणच आहे, हेही आम्ही सांभाळून घेतलं असत, वसुधा मावशी आहेत, तशी त्यांची काळजी घ्यायला, स्वयंपाकाला बाई आहेत, दोन गडी आहेत, पण आईचा वेगळाच प्रॉब्लेम झालाय ग, ती आता झोपलीये म्हणून ठीके, पण एकदा कि ती जागी झाली कि जी बडबड करायला सुरुवात करते , बापरे आवरता आवरत नाही.. पोटात काही नसताना एवढ हि बाई कशी काय बडबडू शकते देवच जाणे, कशाचा कशाला संबंध नाही, जुन्या जुन्या गोष्टी, जुनी माणसं त्यांचे संदर्भ बडबडत बसते,
आता आम्हालाही ओळखत नाही. मध्येच एकदम विचित्र ओरडत उठते, भयानक आरडा ओरडा करते, 'माझ्या घरातून चालते व्हा' म्हणते ,अशा वेळी एकट्या वसुधा बाई काय करणार ? आत्ता आम्ही आहोत म्हणून ठीके, गडी माणसांना घरात जास्त थारा देऊ शकत नाही. रात्री -अपरात्री खूपच त्रास देते. आम्ही होतो काही दिवस येथे, पण जास्त दिवस नाही थांबू शकत. म्हणून तुला बोलावून घेतले. तू घरचीच आहेस. मला माहितेय तू बर्याच वर्षांनी इकडे आलीस, आपण भेटलो , कारणही खूपच विचित्र, पण परिस्थिती अशी आहे कि काय बोलायचं यावर, सगळाच गुंता झालाय. माझी सख्खी आई असली तरी तीच हे दुक्ख,त्रास पाहवत नाही आता, लवकर सुटका झाली तर चांगलंच.
' निलिमाच्या डोळ्यात पाणी तरळलं, तिलाही काय प्रतिक्रिया द्यावी ते कळेनास झालं , ती उगाच खिडकी बाहेर बघत बसली. बाहेरची झाडं मावळत्या उन्हात चमकत होती.
आत्याच्या शेजारचीच रूम तिला देण्यात आली, थोडा आराम करून फ्रेश होऊन खाली रात्री ती जेवायला आली, सगळे तसे शांतच होते, मग निखील्नेच विषय काढला, 'आम्ही परवाच्या फ्लाईट ने जाणार, उद्या मी आणि नीलिमा तुला इथली व्यवस्था लाऊन देऊच,साऱ्यांशी ओळखी,डॉक्टरांचा दवाखाना दाखवून ठेऊ, जवळच आहे. बाकी वसुधा ताई आहेतच,काय वसुधा ताई?" समोरच उभ्या असलेल्या वसुधा ताईंनी मान डोलावली. "काही लागलं तर लगेच फोन कर, अगदी कुठल्याही वेळी काय? तुला फक्त आत्यावर लक्ष ठेवायचं आहे, कारण ती स्वत: चालण्याच्या,फिरण्याचा प्रयत्न करते. कधी कधी समोरच्याला मारायचा प्रयत्नही करते, आता तिची ताकद ती काय? पण आवेश भयानक असतो, तेंव्हा घाबरून जाऊ नकोस".
"हा आणि एक तिला सुपारीच भयानक व्यसन होतं, आता तोंडात दात नाही, चावायची ताकद नाही, पण सवयीने ती जे दिसेल ते तोंडात घालून चावायला लागते, मागे तर स्वताचेच केस चावायची .. आम्ही ते कापायला लावले मग. चिंध्या , कापूस जे दिसेल ते तोंडात, तेंव्हा तेही जरा बघत राहा,उगाच घशात अडकलं तर, दुसरं लहान मुलंच झालीये ती. ह्या घरावर अतोनात प्रेम आहे तीच.. कारण ह्या घराचा पाया खणण्यापासून आई- बाबा जातीने इथे हजर असायचे, नंतर इतकी वर्ष गेली, आम्ही शिकायला म्हणून जे बाहेर गेलो ते आता कायमचेच, पण आई मात्र येथे राहण्याविषयी ठाम होती, आम्ही किती विनंती केली कि तिकडे चल, पण नाही.. तीच आपलं नेहमीच एक वाक्य. बाबांनो तुम्ही अजून स्वताचे घर बांधून त्यात राहिला नाही आहात, तुम्हाला काय कळणार घर बांधायला किती कष्ट लागतात, त्यात राहण्याची आपुलकी.. "घर पाहावे बांधून " म्हणतात ते उगाच नाही, मी काही मरेस्तोवर या घरातून हलायची नाही.."
"मला वाटत सगळा तिचा जीव ह्या घरात गुंतून राहिलाय", अचानक नीलिमा म्हणाली.आणि सगळेच एकदम तिच्याकडे पाहायला लागले, तशी तीही चमकली, मग खालच्या आवाजात म्हणाली, नाही म्हणजे इतक्या वर्षात आपल्याखालोखल तिने प्रेम केलं असेल तर ते आपल्या घरावरच , मला आठवत नाही इतक्या वर्षात आई कुठे फिरायला म्हणून तरी चार दिवस या घरातून बाहेर पडली असेल. बाबांनाही तीच हे वागणं खटकायचं, पण हिच्या फटकळ स्वभावापुढे ते नमतं घ्यायचे. तिला अचानक स्वताच्या वडिलांच्या निधनानंतर आत्याची अनुपस्थिती आठवली. नीलिमा पुढे बोलत होती,
आत्ताही हि सारखं घर-घर करत असते, एवढी कसली इच्छा म्हणायची. साध विटा- मातीच घर. फक्त काय स्वतः बांधलं इतकंच. मग अजून विषय चालू राहिला ती ऐकत होती. जेवून झाल्यावर ती वर आली.आत्याच्या खोलीचा दरवाजा बंदच होता, आतमधून कण्हण्याचा आवाज येत होता,पण तिची आत जायची हिम्मत काही झाली नाही. खोलीत येऊन तिने घरी फोन केला, आणि दिवा बंद करून झोपून गेली, जेमतेम झोप लागलीच असेल तितक्यात.. "धर त्याला.. सोडू नकोस.. धरा रे.. तो बघा माझं घर पाडतोय...सोडू नका.. घोगर्या आवाजात अत्त्या किंचाळत होती, तिला आधी
समजलंच नाही काय होतंय.. एकदम नवखी जागा, आणि बाजूने भयाण ओरडणं. ती दचकून उठली.. थरथरत्या हाताने तिने दार उघडलं, बाजूच्या खोलीचा दरवाजा उघडाच होता, आतून मंद प्रकाश बाहेर येत होता. तीने डोकावून पाहिलं, वसुधा बाईनी आणि निखील ने आत्त्याला धरून ठेवलेलं होतं, नीलिमा बाजूला औषध काढत होती. ती पटकन आत आली,
आत्याचा अवतार भयानक होता. डोळे खोबणीतून बाहेर आलेले होते, चेहरा आकसलेला होता, कपाळावर शिरांच जाळ पसरलेलं होतं. केस अस्ताव्यस्त झालेले होते. वसुधा ताईंनी आत्याचे हात बांधून ठेवलेले होते, तरी ती झटके देत ते सोडवायचा प्रयत्न करत होती, तोंडाने सतत असंबंध बडबड सुरु होती. अचानक आत्याने तिच्या कडे पाहिलं आणि जास्तच ओरडायला लागली. "तूच ती, तूच कटात सामील.. हिला आधी हाकला.. केशवा.. सुमन .. दामोदर पंत ऐकताय ना , हिला घेऊन जा. नको नको .. मी नाही मरणार.. माझं घर आहे.." अचानक अशा वागण्याने ती बावरलीच. नीलिमाने तेवढ्यात एक इंजीक्शन दिलं, काही सेकंद तिची बडबड सुरूच होती, मग आवाज कमी कमी होत गेला , डोळे मंदावत गेले. हा प्रकार पाहून तिला घामच फुटला.
निखील ने तिला बाहेर यायची खुण केली. मग सगळेच खाली आले. तिची झोप उडालेलीच होती. निखील उगाच वातावरणातला ताण हलका करण्याच्या उद्देशाने जरासं हसत म्हणाला," पाहिलंस न , आमच्या मा साहेबांचे प्रताप.. म्हणून आम्ही शक्यतो तिला दिवसा जाग ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण काल ताप आलेला म्हणून अक्खा दिवस झोपूनच होती. आता नाईट शिफ्ट सुरु झाली. तुला हे एवढंच सांभाळायच आहे. कारण ती अशी वागायला लागली कि एकट्या वासुधाबैंना आवरत नाही. स्वयंपाकीण बाई दिवसभर असतात, पण संध्याकाळी त्या घरी
जातात. दोन गडी असतात. डॉक्टर जवळच आहेत.. सो तशी मदत आहे तुला."
'ती' मुकाट ऐकत होती, खर सांगायचं तर पैशाची गरज असल्याने तिने हे काम अंगावर घेतलेलं होतं, ह्यांच्या घरगुती कारणांशी तिला काहीही घेणदेणं नव्हतं, पण आता आत्याची हि अवस्था बघता तिला कितपत जमणार होतं,देवच जाणे. पण तिने आता ठाम राहायचं ठरवलं. वसुधा ताईंनी सर्वांना कडक कॉफी करून आणली. नीलिमा म्हणाली, आम्ही उद्या संध्याकाळी निघणार. तुला मी सगळी औषध, महत्वाचे पत्ते, नंबर्स सगळ उद्या दिवसभरात दाखवून ठेवेन. तिने हो म्हटलं आणि सगळ्यांनी एकमेकांचा निरोप घेतला. रात्रभर तळमळतच गेली. झोप अशी लागली नाहीच. खिडकीतून छान चांदण्याचा कवडसा आत पडलेला होता. त्याकडे पाहत पहाटे कधीतरी तिचा डोळा लागला.
दुसर्या दिवशी तशी तिला उशिराच जाग आली, फ्रेश ती पटकन खाली आली. फक्त निखील पेपर वाचत बसलेला होता, बाकी घर झोपेतच होते अजून. तासाभरात सगळ्या घराला जाग आली. वत्सलाबाईंबरोबर ती आत्याच्या खोलीत दुध द्य्याला गेली. कालचा प्रसंग आठवला तरी तिला भीती वाटत होती. आत्या जागीच होती, पडून छताकडे डोळे विस्फारून काहीतरी पुटपुटत होती. आत्याबाई उठा दुध घ्या, तुमची भाची आलीये. बघा तिला उठ पाहू. वत्सला बाईनी तिला बसवले.बसल्यावर तशाच विस्फारलेल्या डोळ्यांनी आत्त्या तिच्याकडे पाहायला लागली. डोळ्यात कुठलेच भाव नव्हते.
तिचं ते एकटक बघण 'तिला' सहन होईनास झालं ती उगाच इकडे तिकडे पाहायला लागली. तरीही आत्याची नजर तिच्यावरच खिळलेली होती, जणू काही ते डोळे तिला आपल्यात खेचून घेत होते, अचानक तिला वातावरणात फरक जाणवायला लागला, एखादा दिवा मंद होत जात मिटून जावा, तशी ती लक्ख सुर्य्प्रकाशातली खोली हळू हळू अंधारू लागली, तिला समोर अत्त्याचे ते विचित्र डोळेच दिसायला लागले, भावशून्य बुब्बुळ.. कसली तरी अनामिक भीती आतून धडकायला लागली, प्रयत्न करूनही तिला साधी आपली नजर काढता येत नव्हती, आपण हळू हळू त्या नजरेत शिरतोय कि काय अस वाटायला लागलं. भीतीच्या लाटांवर लाटा येऊन धडकायला लागल्या, आता आजूबाजूला फक्त अंधार होता, आणि समोर फक्त ते निस्तेज, विझलेले डोळे.
अचानक एक जोरदार धक्का लागला आणि ती भानावर आली, वत्सला बाई तिला हलवत होत्या, 'काय ग काय झालं ? कुठे हरवलीस, आत्या बघत आहेत तुझ्याकडे, बोल काहीतरी' तिने दचकून आजूबाजूला पाहिलं खोली पूर्ववत होती, एक सेकंदभर लक्ष दुसरीकडे जाऊन आल्यासारखं तिला वाटलं, समोर आत्या तशीच तिच्याकडे पाहत होती, फक्त आता चेहऱ्यावर एक विचित्र हास्य होतं.वत्सला बाई संपलेला दुधाचा ग्लास घेऊन औषध आणायला बाहेर गेल्या..
ती हि थोडीशी मागे सरकली, तेवढ्यात आत्त्याने झपाट्याने पुढे सरकून तिचा हात दाबला.. " माझं घर आहे, तू.... निघून जा.. घर पाहावे बांधून ... घर निघून जा .. तुला पाहावे बांधून .... मला नाय जायचं .. बांधून टाकेन .. सगळ्यांना बांधेन ..माझं घर .. माझं घर माझ घर .. तोंडातल्या बोळक्या तून जीभ वळवळत होती, तोंडावरच्या शिरा ताणल्या गेलेल्या होत्या.. अत्त्या जवळजवळ सरकत होती..
क्रमशः
प्रतिक्रिया
17 Apr 2013 - 5:19 pm | स्पा
भागांची कथा आहे
शेवटचा भाग लवकरच टाकेन :)
17 Apr 2013 - 5:25 pm | बॅटमॅन
कथाकार स्पा इज ब्याक विथ व्हेन्जन्स!!!!!
मस्त कथाये रे. डीटेल्स लै भारी पकडलेस. चित्रकार असल्याचे जाणवते ते अशा काही गोष्टींमधून.
17 Apr 2013 - 10:11 pm | सुहास झेले
अगदी अगदी.... पुढचा भाग लवकर टाक रे :)
18 Apr 2013 - 1:34 pm | नंदन
तंतोतंत! पुढचा भाग येऊ द्या लौकर.
17 Apr 2013 - 5:29 pm | बिपिन कार्यकर्ते
मस्त!
17 Apr 2013 - 5:58 pm | छोटा डॉन
स्पावड्या, येऊ दे पुढचा भाग लवकर ( नायतर आम्ही तुझं घर उन्हात बांधून घेऊ, सध्या उन्हाळा किती आहे हे तुला माहित आहेच ) ;)
- छोटा डॉन
17 Apr 2013 - 5:29 pm | स्पंदना
सुरवात तर घरगुती वाटली पण शेवटाला घाम फुटला.
स्पाव्या आता झोप येइल का मला?
17 Apr 2013 - 5:39 pm | पैसा
अरे देवा! काय आहे हे?
17 Apr 2013 - 5:40 pm | शिद
जबरदस्त...एक फटक्यात वाचून काढली. पु.भा.प्र.
17 Apr 2013 - 6:27 pm | Mrunalini
वा... काय मस्त लिहलय.. अगदी.. शेवटच्या भागात अंगावर काटा आला. पुढचा भाग लवकर टाक.
17 Apr 2013 - 6:37 pm | कवितानागेश
च्यायला!!
17 Apr 2013 - 6:41 pm | कपिलमुनी
खतरनाक वातावरण निर्मिती केली आहेस !!
17 Apr 2013 - 7:02 pm | आतिवास
सुरुवात घरगुती वाटतावाटता कथेने एकदम जबरदस्त वेगळंच वळण घेतलंय :-)
17 Apr 2013 - 7:17 pm | स्मिता.
छान. कथेने छान पकड घेतली होती आणि एका दमात वाचून काढली. शीर्षक आणि सुरुवात वाचून वाटलं होतं यावेळी काहितरी निराळं आहे की काय. पण ही सुद्धा भयकथाच का रे???
बाय द वे, तुला सर्वनामं फार आवडतात असं वाटतं. आधीच्या भयकथांत अमानवी शक्तीला 'ते' म्हणून संबोधत होतास आणि इथेही नायिकेला 'ती' म्हणूनच! ;)
ह. घेशीलच.
17 Apr 2013 - 7:41 pm | प्रचेतस
जबरदस्त.
एका वेगळ्याच धर्तीची भयकथा दिसतेय.
पुढचा भाग लवकर टाक रे.
17 Apr 2013 - 7:44 pm | दिपक.कुवेत
एकदम सहि भयकथा....पुढचा भाग लवकर टाक. पुढे काय होणार आहे याची उत्सुकता आहे!
17 Apr 2013 - 7:45 pm | गणपा
मस्त लिहिलयस.
आवडला पहिला भाग.
18 Apr 2013 - 10:04 am | अक्षया
+ १
17 Apr 2013 - 9:17 pm | अभ्या..
बाब्बौ. स्पावड्या भारी लिहितोस की बे.
दुसरा भाग मात्र आठवणीने आणि लौकर टाक रे.
आत्ताच टाकला तरी चालेल.
17 Apr 2013 - 9:42 pm | अन्या दातार
यंदा मांजर नसल्याने वेगळे वाटले. पुढच्या भागात मांजर येणार का रे??
18 Apr 2013 - 3:03 pm | कवितानागेश
सहमत.
मांजराशिवाय भयकथेतल्या घराला अर्थ नाही.
17 Apr 2013 - 10:50 pm | चुचु
म स्त
18 Apr 2013 - 10:21 am | सुमीत भातखंडे
गुंतवून ठेवणारा पहिला भाग.
आता पुढचा भाग येऊदे लवकर
18 Apr 2013 - 10:27 am | ज्ञानोबाचे पैजार
स्पारायण धारपांचा विजय असो.
18 Apr 2013 - 12:08 pm | अमोल केळकर
पुढचा भाग वाचण्यास उत्सूक
अमोल
18 Apr 2013 - 1:59 pm | सस्नेह
प्रभावी वर्णन !
18 Apr 2013 - 2:10 pm | हासिनी
अगदी चांगला झालाय भाग!
पुढचा भाग लवकर येऊ दे.
:)
18 Apr 2013 - 2:53 pm | सौरभ उप्स
मस्तच लिहिलयस….
अगदी डोळ्यासमोर घडतंय आणि कथेतल्या 'ती' च्या डोळ्यांच्या थ्रू बघतोय सगळ अस प्रभावी लेखन जमलय …
जवळची नसून जवळची अशी वाटतेय हि कथा …. लवकर येऊ दे पुढचा भाग…
18 Apr 2013 - 3:00 pm | नगरीनिरंजन
छान! चित्रदर्शी वर्णन आहे.
पुभाप्र.
19 Apr 2013 - 9:14 am | किसन शिंदे
मस्तंच झाली रे कथा!!
आता दुसरा भाग टाकलाय तो ही वाचून घेतो.
20 Apr 2013 - 4:38 pm | निनाद मुक्काम प...
च्यायला भलताच प्रकरण आहे हे
आज रात्री झोपेतून मी अचानक स्वप्नातून जागा होऊन बडबडायला लागणार
माझे मिपा आहे , जा , जा तू येथून
21 Apr 2013 - 8:15 am | धमाल मुलगा
भिड तू! च्यायला, भयकथा लिहायचं होलसेलचं कंत्राट तुलाच बेट्या. एक नंबर पकड आलीये तुझी ह्या विषयात. एक जरा 'ऑकल्ट सायन्सेस' आणि 'प्यारानॉर्मल अॅक्टिव्हिटी' ह्यावर थोडासा अभ्यास कर...वातावरण निर्मिती तुला छानच जमतेय, कथेची पकडही चांगली सांभाळतोस, त्यात वर उल्लेखलेल्या दोन बाबींच्या अभ्यासातून आलेलं एकुण असल्या प्रकारांबद्दलचं माहितगारपण कथांच्या परिणमकारकतेसाठी खूप खूप उपयोगी पडेल असं मला वाटतं.
पुढच्या अनेक भयकथांसाठी शुभेच्छा! :)