शिष्य़ः प्रणाम गुरुजी
गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का?
शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत.
गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात.
शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात?
गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू .....
शिष्य़ः गुरूजी.
गुरूः आठवलं, ऐक. एका सुभाषितात असं म्हंटलंय् "घटम् भिन्द्यात् प़टम् छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् "
शिष्य़ः म्हणजे?
गुरूः अरे, घटम् भिन्द्यात् म्हणजे काय असेल?
शिष्य़ः धंद्यात घाटा?
गुरूः नाही रे, घटम् चा अर्थ काय हे तुला माहीत नाही का? अगदी माठ आहेस!
शिष्य़ः अरे हो, माठ किंवा मडकं.
गुरूः भिन्द्यात् म्हणजे त्याला फोडायचं. कृष्ण लहानपणी गोकृळात असतांना गोपिकांचे घट फोडायचा आणि बघ तो किती प्रसिध्द झाला?
शिष्य़ः पण मी लोकांचे माठ फोडले तर ते गप्प बसतील?
गुरूः कदाचित "प़टम् छिन्द्यात्" म्हणजे तुझे कपडे फाटेस्तोवर ते तुझी धुलाई करतील, तसे व्हायला नको असेल तर तू आपलाच एक मोठा माठ पाण्याने भरून चौकात घेऊन जा आणि आपल्याच हाताने धडाम् करून तो फोड किंवा आपल्या अंगावरचे कपडे आपणच टराटरा फाडून टाक.
शिष्य़ः कशासाठी?
गुरूः अरे, द्रौपदीने कृष्णासाठी तिच्या शालूमधून एक चिंधी फाडली आणि ती सुध्दा बघ किती प्रसिध्द झाली, नाही का?
शिष्य़ः पुढे काय?
गुरूः कुर्यात्
शिष्य़ः सदा मंगलम् ...
गुरूः तुला लग्नाची इतकी घाई झालीय् का?
शिष्य़ः मगाशी तुम्हीच "मंगलम् मंगलम्" म्हणत होतात ना?
गुरूः ध्यानधारणासाठी ते देवाचं स्तोत्र मी गुणगुणत होतो. ते जाऊ दे, पण तू म्हणालास त्याच्यातही थोडं तथ्य आहे. लग्नासाठी तयार होऊन आलेला नवरा मुलगा घोड्यावर बसून येतो, त्या ऐवजी तू गाढवावर बसून रस्त्यावर फेरफटका मार.
शिष्य़ः काहीही काय सांगताय्?
गुरूः अरे या श्लोकाचा अर्थ असा आहे की "वाटल्यास माठ फोडावा, कपडे फाडावेत, गाढवावर बसावे (असे काही तरी जगावेगळे विचित्र काम केले की त्या माणसाकडे सगळे लोक कुतूहलाने पहायला लागतात,) त्यातून त्या माणसाला लगेच प्रसिध्दी मिळते." तो कोण आहे याची लोक चौकशी करतात, त्याच्याकडे बोट दाखवून एकमेकांना दाखवतात. गावातले सगळे लोक त्या माणसाला ओळखायला लागतात. तो काय सांगतोय् आणि काय दाखवतोय् तिकडे लोकांचे लक्ष जाते. प्रसिध्द होण्याचा किंवा लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा हाही एक मार्ग आहे.
शिष्य़ः म्हणजे सगळे प्रसिध्द लोक असलं काही करतात का?
गुरूः नाही रे, जेंव्हा महान लोक चांगली आणि भरीव कामगिरी करतात तेंव्हा ती लोकांना दिसते, जाणवते आणि आपोआपच लोक त्यांच्याबद्दल आदराने बोलतात. तशा प्रकाराने मिळणारी प्रसिध्दी दीर्घकाळ टिकणारी असते. पण ज्यांना काही चांगली कामे करायचीच नसतात पण प्रसिध्द तर व्हायचं असतं त्यांच्यासाठी मी सांगितलेला शॉर्टकट आहे. अशी प्रसिध्दी तात्पुरतीच असते. या श्लोकात दडलेला दुसरा एक गूढ अर्थ पण आहे.
शिष्य़ः कोणता?
गुरूः समाजात अनेक प्रकारची माणसे असतात, काही अडमुठे नाठाळ 'माठ' मोक्याच्या जागा अडवून बसलेले असतात, त्यांना काठीने हाणायची कामगिरी काही लोक करतात, काही लोक बुरखा पांघरून किंवा पडद्याआड राहून उचापत्या करत असतात, त्यांचा बुरखा किंवा पडदा फाडून त्यांचे खरे चेहेरे आणि त्यांची कृत्ये जगासमोर आणायचे काम काही लोक करतात. काही लोक खूप कष्टाळू असतात, नेहमीच इतरांच्या विवंचनांचा भार स्वतः वाहतात. अशा चांगल्या लोकांच्या कामाचे मोल कळल्यानंतर त्यांचेही नाव होते. या लोकांना प्रसिध्दीची हाव नसते, प्रसिध्दी मिळवण्यासाठी ते लोक ही कामे करत नाहीत, पण तरीही ते सुध्दा प्रसिध्द होतात.
शिष्य़ः पण गुरूजी, या सगळ्याचा 'ट्यारपी'शी काय संबंध आहे?
गुरूः मी त्यावर येणार होतोच. समज तुला एकादी गोष्ट खूप लोकांना सांगायची असेल तर तुला त्यांच्यापर्यंत पोचायला हवं आणि त्यांनी ती ऐकायला हवी असेल तर त्यांनी तुझ्या सांगण्याकडे लक्ष द्यायला पाहिजे.
शिष्य़ः हो.
गुरूः तू किती लोकांपर्यंत पोचून त्यांना ती गोष्ट ऐकवू शकशील यालाच थोडक्यात 'टीआरपी' म्हणतात. काही करून लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले तर 'टीआरपी' वाढायला मदत होते.
शिष्य़ः पण हे 'ट्यारपी' म्हणजे काय?
गुरूः 'टीआरपी' हा जाहिरातींच्या क्षेत्रातला शब्द आहे. 'टारगेट रेटिंग पॉइंट्स' हा त्याचा फुल फॉर्म आहे. एकाद्या वस्तूची किंवा कार्यक्रमाची जाहिरात करतांना त्यासाठी असलेले संभाव्य ग्राहक म्हणजे 'टारगेट' असतात. ती जाहिरात त्यांच्यापर्यंत पोचवण्यासाठी प्रसार माध्यमाचा उपयोग केला जातो. ती जाहिरात किती लोकांनी वाचली, पाहिली किंवा ऐकली आणि त्याचा त्यांच्यावर किती परिणाम झाला वगैरेंची पाहणी करून त्याचा 'टीआरपी' ठरवतात. ते थोडेसे किचकट गणित आहे. पण टीव्हीवरला एकादा प्रोग्रॅम खूप लोक पहात असतील तर त्याचा टीआरपी वाढतो, त्यामुळे त्या प्रोग्रॅम्सच्या कमर्शियल ब्रेक्समध्ये जाहिरातींचा भडिमार होतो. तोच कंटाळवाणा आणि नकोसा झाला की त्याचा टीआरपी कमी होतो, त्याला जाहिराती मिळत नाहीत आणि तो बंद पडतो. असे घडत असतांना आपल्यालाही जाणवते ना?
शिष्य़ः हो.
गुरूः म्हणूनच 'लोकप्रिय होणे', 'प्रसिध्द होणे', 'लक्ष वेधून घेणे' अशासारख्या शब्दप्रयोगांना आताच्या भाषेत 'टीआरपी वाढणे' असा एक नवा विकल्प तयार झाला आहे. बरं हे सांग, तू हा शब्द कुठे ऐकलास?
शिष्य़ः मी सायबरलँडमध्ये भटकत असतांना तिथे 'वडापाव', 'घी रवा इडली', 'उपमा', 'शिरापुरी' वगैरेंचे पॅव्हिलियन पाहिले. तिथे 'ट्यारपी'वर्धक चूर्ण, टीआरपीटॉनिक कॅप्सूल्स वगैरे ठेवले होते. मला काही ते कळलं नाही.
गुरूः त्या पॅव्हिलियन्समध्ये तिथले मेंबरलोक आपापल्या डिशेस आणून ठेवतात आणि इतरांच्या पदार्थांच्या बाजूला आपल्याकडून चिरलेला कांदा, कोथिंबीर, लिंबू, खोवलेलं खोबरं, चटणी, सॉस, लोणचं, पापड वगैरें ठेऊन त्याची चव वाढवू शकतात. जास्तीत जास्त लोकांनी त्या गोष्टी चाखून पहाव्यात असं हे सगळे मूळ आणि पूरक पदार्थ ठेवणार्यांना वाटणारच ना?
शिष्य़ः पण तिथं तर 'बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी' असा सगळा प्रकार असतो. कोणीही कितीही डिशेस कितीही वेळा घेतल्या तरी त्या काही संपत नाहीत. लोकांनी त्या चाखल्या म्हणून त्यांना त्याचे काही दामही मिळत नाही. मग त्यांचा कसला खप आणि त्यातून कसला फायदा?
गुरूः इतक्या इतक्या लोकांनी आपल्या पदार्थाला स्पर्श केला याचे सुध्दा ती डिश तिथे ठेवणार्याला समाधान मिळते, आपल्या श्रमाचं सार्थक झालं असं त्यांना वाटणार नाही का?
शिष्य़ः पण ते त्यांना कळणार कसं?
गुरूः त्यासाठी गणकयंत्रं बसवलेली असतात. प्रत्येक पदार्थ चाखून पहायला येणार्यांचा आकडा ती यंत्रं मोजत असतात. शिवाय त्यांच्या बाजूला ठेवलेल्या साइड डिशेसचीही नोंद ठेवली जाते. या दोन्हींचे आकडे मिळून त्या डिशच्या किंवा ती आणणार्याच्या टीआरपीचा साधारण अंदाज कुणाला वाटलं तर करता येतो.
शिष्य़ः त्याचा काय फायदा?
गुरूः काही लोकांना त्यात खूप मजा वाटते. या पॅव्हिलियन्समध्ये आपले पदार्थ आणून ठेवणार्यांमध्ये निरनिराळ्या विचारांचे लोक असतात. त्यातल्या काही लोकांना नवनवे पदार्थ तयार करण्यातच आनंद वाटतो. कोणी तो चाखून पाहिला किंवा नाही याने त्यांना काही फरक पडत नाही. पदार्थ तिथे ठेवल्यावर कुणी कुणी तो चाखून पाहिला आणि त्याच्या बाजूला काय काय ठेऊन त्याची चंव कशी वाढवली हे काही जणांना खूप महत्वाचं वाटतं. काही लोकांचं मात्र किती लोकांनी तो पदार्थ पाहिला आणि किती लोकांनी त्याच्या बाजूला काय काय आणून टाकलं इकडे म्हणजे त्यांच्या टीआरपीकडे सगळं लक्ष असतं. तो कसा जास्तीत जास्त वाढवता येईल याचाच प्रयत्न ते सारखा करत असतात. मग त्या डिशच्या बाजूला जमलेल्या शंभर दोनशे वाट्या, वाडगे वगैरेंच्या ढिगार्यात मूळ पदार्थ दिसेनासा झाला तरी त्याचाही त्यांना अभिमान वाटतो. जगात अशा विविध प्रकारांनी विचार करणारी माणसं आहेत म्हणून तर त्यात गंमत आहे.
शिष्य़ः हे टीआरपीकॉन्शस लोक त्याला वाढवण्यासाठी काय करतात?
गुरूः हे सुध्दा साधारणपणे वर दिलेल्या उदाहरणासारखे असते.
शिष्य़ः म्हणजे?
गुरूः टीव्ही सीरियलवाले त्यांची टीआरपी वाढवण्यासाठी काय काय करतात ते आपण पहातोच ना? ते पहाणार्या लोकांचं लक्ष 'येनकेन प्रकारेण' वेधून घ्यायचं आणि खिळवून ठेवायचं हा त्यांचा उद्देश असतो. हे कामसुध्दा सोपं नसतं. सगळ्यांना ते जमत नाही. काही लोकांच्याकडे ते कौशल्य असतं त्यामुळे ते टिकून राहतात. सायबरलँडमध्येही तसंच असतं.
शिष्य़ः अस्सं.
गुरूः टीव्हीवरल्या प्रोग्रॅम्समध्ये अजून तरी प्रेक्षक काही सहभाग घेऊ शकत नाहीत. सायबरलँडमध्ये ती जास्तीची सोय असते.
शिष्य़ः ती कशी?
गुरूः एका सदस्याने त्याचा पदार्थ आणून मांडून ठेवला की इतर सदस्य त्याच्या आजूबाजूला शाब्दिक फुलांची सजावट करतात, त्या पदार्थाला पूरक असे चविष्ट पदार्थ त्याच्या सोबतीला ठेवतात. त्यामुळे तो पदार्थ जास्त लज्जतदार होतो, ती डिश आकर्षक होते, अधिकाधिक लोक ती चाखून पहायला येतात, त्यांच्या मित्रांना सुचवतात. त्यामुळे टीआरपी वाढत जातो.
शिष्य़ः हे नेहमीच होत असतं का?
गुरूः मूळ पदार्थ चांगला असला तर ते आपोआप होतं, पण काही मित्रमंडळी ठरवून एकमेकांचे पदार्थ सजवत असतात, मग ते कसे का असोत? बाहेरच्या जगाप्रमाणे इथेही काही युध्दे चाललेली असतात, त्यात एकमेकांच्या डिशेसवर शाब्दिक कचरा टाकला जात असतो. त्याचासुध्दा परिणाम दोघांचाही टीआरपी वाढण्यातच होतो.
शिष्य़ः गंमत आहे ना?
गुरूः इथे आणखी एक गंमत दिसते. एकाद्यानं शेवयाची खीर आणून ठेवली असली तर त्याच्या बाजूला कुणीतरी मटणाचा रस्सा आणून ठेवायचा असंही करता येतं.
शिष्य़ः हो?
गुरूः काही लोक लगेच त्या रश्श्याच्या जोडीला मिरची, मसाला, कांदा, लिंबू वगैरे ठेवतात. दुसरे काही लोक खिरीसाठी बदाम, काजू, बेदाणे वगैरे आणून टाकत राहतात. हे काय चाललं आहे ते त्रयस्थांना समजत नाही पण आता पुढे काय येणार आहे याची उत्सुकता असल्यामुळे तेही पुन्हा पुन्हा तिथे पहायला येतात. त्यामधून सगळ्यांचाच टीआरपी सटासट वाढत राहतो.
शिष्य़ः 'ट्यारपी'वर्धक चूर्ण, टीआरपीटॉनिक कॅप्सूल्स वगैरेंचा काय उपयोग असतो?
गुरूः ते त्याच्या नावातच दिलं आहे. त्यांचे सेवन केल्यावर टीआरपी वाढवण्याच्या निरनिराळ्या कल्पना सुचतात. पण त्यानं प्रत्येकाची टीआरपी वाढेलच याची काही गॅरंटी देता येणार नाही. सगळ्यांच्या प्रकृतीला ती द्रव्ये मानवतील असंही नाही.
शिष्य़ः असं आहे होय?
गुरूः तुझ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली?
शिष्य़ः हां, थोडा अंदाज आला.
प्रतिक्रिया
15 Apr 2013 - 11:59 am | प्रकाश घाटपांडे
सध्या मिपाचा ट्यार्पी वाढतोय म्हणे!
15 Apr 2013 - 2:00 pm | स्पंदना
घारे गुर्जी की जय!
तशीही हल्ली आम्हाला गुर्जींची कमतरता होतीच तुमच्या रुपाने ती पुर्ण झाली.
असच, असच आमच ज्ञान संवर्धन करत रहा.
15 Apr 2013 - 2:15 pm | पैसा
चांगली नीरिक्षणे आहेत!
17 Apr 2013 - 1:16 pm | नगरीनिरंजन
सायबरलॅन्डमध्ये जिल्बी हा पदार्थ सगळ्यात जास्त ट्यार्पीखेचक आहे हे गुरुला माहित नसावे याचे आश्चर्य वाटले.
बाकी पदार्थ खुसखुशीत आहे.
17 Apr 2013 - 6:03 pm | आनंद घारे
गुरूजींनी नमून्यादाखल काही सोपी उदाहरणे दिली आहेत. जिलबी इमरतीच्या जंजाळात शिरला तर अजाण शिष्याचा अभिमन्यू व्हायचा.
17 Apr 2013 - 8:38 pm | घाशीराम कोतवाल १.२
काल बघितलेल्या फु बाई फु च्या एपिसोडमधे टी आर पी म्हणजे ताई रडलीच पाहिजे ....
असा फुल फॉर्म ऐकला