मी एक पसरट भांड्यातील राजकुमार आहे ज्याचे विचार क्षितिजापलीकडे जाऊन अंधुक होतात..
पण या जगात असेही लोक आहेत ज्यांच्याकडे भविष्यापलीकडे जाऊन बघण्याची शक्ती असते..
माझे आईवडील अश्यांपैकीच एक..
काय, कसे, नेमके कश्यामुळे, माहीत नाही पण माझ्या आईवडीलांनी मी पाळण्यात असतानाच ओळखले की माझे ईंग्रजी भाषेचे ज्ञान इतर मध्यमवर्गीय मराठी मुलांच्या मानाने फार कच्चे आहे... आणि... तिथेच एक ऐतिहासिक निर्णय घेतला गेला... माझे सारे शिक्षण शुद्ध मराठी माध्यमाच्या शाळेतूनच होण्याचा..
येत्या एक-दोन वर्षात मी "d फॉर बॉल" आणि "b फॉर डॉल" बोलून त्या निर्णयावर शिक्कामोर्तबही केले आणि माझी रवानगी अखिल भारतीय मराठी एज्युकेशनच्या आचार्य धोंडू केशव पाटकर गुरुजी प्राथमिक विद्यालयात झाली.
तसे पाहता आजही मी b आणि d ही दोन ईंग्रजी मुळाक्षरे सुटी सुटी लिहिली की गोंधळ हा हमखास घालतोच ही गोष्ट वेगळी, परंतु माझ्या सारख्या "द ग्रेट ब्रिटीश ऑफ ईंडीया"ला त्यांनी मराठी माध्यमात टाकून माझी ईंग्रजी भाषेपासून सुटका केली की मला आणखी त्या भाषेचा गुलाम बनवून ठेवले याचे उत्तर मी आजतागायत शोधतोच आहे. कारण आमच्या शाळेचे माध्यम मराठी असले तरी ईंग्रजी हा विषय एक भाषा म्हणून नेहमी ईंग्लिश मधूनच शिकवला जायचा.
बस्स, माझ्या याच "ई-लर्निंग वाटचालीचा वृत्तांत" म्हणूनच हा माझा लेख... माय ईंग्लिश वॉल्कींग..!
त्या काळी... आता इथे माझे वय कोणाला समजू नये म्हणून नेमके वर्ष सांगत नाही... पण तेव्हा आमच्या शाळेत पहिली ते चौथी ईंग्रजी असा वेगळा विषय नव्हता. म्हणजे त्याची परीक्षा घेतली जायची नाही की त्याचे गुण अंतिम निकालात धरले जायचे नाहीत, तरी पाचवीत गेल्यावर मुलांना ईंग्रजी हा विषय अचानक अवघड पडू नये म्हणून केवळ अक्षरओळख दिली जायची. आता ही अक्षरओळख म्हणजे ईंग्रजीची २६ मुळाक्षरे एवढेच एखाद्याला वाटेल पण ती मुळाक्षरे मुळात सव्वीस नसून तब्बल बावन्न होती. त्यातील २६ जणांना ईस्मॉल बोलले जायचे तर २६ कॅपिटॉल होती. उच्चार तसाच करायला लावायचे पण गिरवण्याचे कष्ट मात्र उगाचच्या उगाच डबल झाले होते. व्यवहारज्ञान आणि कुतूहलशास्त्रात तल्लख असलेल्या माझ्या मेंदूला तेव्हाही हा प्रश्न छळायचा की असे का बरे केले असावे. पण बाई मात्र याचे उत्तर पाचवीत गेल्यावरच समजेल असे बोलून मला गप्प करायच्या. कदाचित अभ्यासक्रमाच्या बाहेरचे शिकवण्याची त्यांना परवानगी नसावी. मी मात्र माझ्या तर्कबुद्धीचा वापर करून बावन्न पत्त्यांच्या कॅटशी याचा काहीतरी संबंध असावा असे ठरवून मोकळा झालो होतो. पण पाचवीत गेल्यावर जेव्हा मला समजले की फक्त वाक्याची किंवा एखाद्याच्या नावाची सुरुवात करण्यासाठी... आणि तेवढ्या आणि तेवढ्यासाठीच म्हणून... त्यातील केवळ एक आणि एकच अक्षर वापरले जाते... त्याच क्षणी मला आजवर शिकलेले-शिकवलेले अर्धे ईंग्लिश अक्षरश: फुकट गेल्यासारखे वाटले. जे शिकणे फारसे worth नव्हते त्यासाठी मी उगाच माझा वेळ व्यर्थ घालवल्यासारखे वाटले. आपली फार मोठी फसवणूक झाल्यासारखे वाटू लागले.
बालमनावर झालेल्या त्या आघातातून शेवटपर्यंत ना मी सावरलो ना माझे ईंग्लिश. ईंग्रजी माझ्या पाचवीलाच पूजली आहे असे मला पाचवीला असतानाच वाटू लागले. परंतु मला कल्पना नव्हती की पाचवीच नव्हे तर सहावी, सातवी, आठवी, आणि आता यापुढची सारी शैक्षणिक वर्षे या विषयामुळे माझी आरती ओवाळली जाणार होती.
पाचवीत हुशार मुलांच्या "अ" तुकडीत असलेलो मी ईंग्रजीमध्ये काठावर उत्तीर्ण झाल्यामुळे सहावीला "ब" तुकडीत गेलो. पण ईंग्रजी तिथेही माझी वाट बघत होती. असे म्हणतात की देव कोणत्याही रुपात येतो. असुराचेही तसेच असावे. यावेळी हा ईंग्रजी नावाचा राक्षस मला करमरकर बाईंच्या रुपात भेटला होता. करमरकर बाई म्हणजे अस्सखलित ईंग्रजीचा बदाबदा वाहणारा झराच जणू. फाड फाड ईंग्रजी बोलून त्या आम्हा कच्याबच्यांना अक्षरश: फाडून खायच्या. या चुकून मराठी माध्यमाच्या शाळेत नोकरीला लागल्या असाव्यात. यांना ऑक्सफर्ड-केंब्रिज अश्या एखाद्या परदेशी विद्यापीठात नाहीतर गेला बाजार सेंट पीटर, सेंट लुईस अन्यथा डॉन बॉस्को, वॉस्को द गामा तत्सम नावाच्या कॉंन्वेंट शाळेतच असायला हवे होते. यांच्या तोंडून चुकून.. चुक्कून एक मराठी शब्द बाहेर पडेल तर आईशप्पथ.. आई वरून आठवले, यांना कधी लागले, काही झाले, तरी "आई ग्ग.."च्या जागी देखील यांच्या तोंडून "ओह जीझस" बाहेर पडायचे. यांचे हेच कलागुण ओळखून आम्ही त्यांचे नामकरण करमरकरबाईंच्या जागी "डू-डाय-डू-मॅडम" केले होते.. नाही समजले.. तर मग जरा कर-मर-कर यांचे ईंग्रजी भाषांतर करून बघा...
ईंग्रजी भाषा ही ईंग्रजी बोलूनच शिकवली पाहिजे अश्या ठाम मताच्या असलेल्या करमरकरबाईंना हे कधी समजलेच नाही की त्या ज्यांना ईंग्रजी शिकवत होत्या त्यांचे ईंग्लिश टॉल्किंग आईला मम्मी बोलण्याच्या पलीकडे कधी गेलेच नव्हते.
वर्ष अखेरीपर्यंत मी करमरकर बाईंच्या कृपेने "हाय, हेल्लो, हाऊ आर यू" आणि सकाळ संध्याकाळ "गुडमॉर्निंग, गुडनाईट" बोलायला शिकलो होतो, पण त्याचा गुणतालिकेशी काही संबंध नसल्याने अंतिम परीणाम मात्र व्हायचा तोच झाला. सिक्स्थ स्टॅंडर्डच्या त्या वर्षाला त्यांनी मारलेले सारे सिक्सर माझ्या डोक्यावरून गेले आणि मी मोठ्या दिमाखात "सहावी ब" मधून "सातवी क" मध्ये प्रवेश केला.
सातवीला मात्र पहिल्याच दिवशी बर्वे बाईंना शुद्ध मराठी मध्ये ईंग्रजी शिकवताना पाहून हे वर्ष माझ्यासारख्या सार्या मराठी भाषिकांना शांतीचे, सुखसमाधानाचे आणि गुणांच्या भरभराटीचे जाणार यात मला कोणतीही शंका वाटली नाही. पण ती माझी शंका लघुशंकाच ठरली आणि चारच दिवसात माझा भ्रमनिरास झाला. तर या बर्वे बाईंनी केले काय, वर्गातील सार्या मुलांचे बसण्याच्या जागेवरून चार गट पाडले आणि ईंग्रजी-ईंग्रजीचा खेळ सुरू केला. प्रश्नमंजूषेसारखे त्या प्रत्येक गटातील कोणत्याही मुलाला उठवून प्रश्न विचारायच्या आणि त्याचे बरोबर उत्तर दिल्यास त्या ग्रूपला गुण मिळायचे. सरतेशेवटी जिंकेल त्या ग्रूपला बक्षीस म्हणून टाळ्यांचा कडकडाट आणि हरेल त्या ग्रूपला गृहपाठाचा प्रसाद मिळायचा. जेमतेम पाचसहा दिवस काय ते त्यांनी व्यवस्थित शिकवले आणि त्यानंतर मात्र प्रत्येक तासाला त्यांचा हा खेळ चालू झाला.. नव्हे हीच त्यांची शिकवण्याची पद्धत होती..
हसतखेळत शिक्षा अभियानाच्या पुरस्कर्त्या बर्वे बाईंना हे समजत नव्हते की त्यांचा खेळ होत होता मात्र माझ्यासारख्यांचा.. नव्हे माझाच.. जीव जात होता..
त्याचे व्हायचे काय, त्या प्रत्येक ग्रूपमधील कोणत्याही मुलाला उठवायच्या आणि ज्याला उत्तर देता यायचे नाही त्याचा चेहरा लक्षात ठेवायच्या. अश्यांना पुढच्या वेळी बरोबर हुडकून पुन्हा पुन्हा न चुकता उठवायच्या. अश्यातच माझे ईंग्रजीचे दिव्य ज्ञान फार काळ काही त्यांच्यापासून लपून राहिले नाही. मी स्वताही त्यांच्या नजरेस पडू नये म्हणून याच्या त्याच्या आडोश्याला किंवा पेन-पेन्सिल पडली म्हणून बाकाखाली लपायचे जे प्रयत्न केले ते ही व्यर्थ ठरले. परिणामी दहापैकी पाच प्रश्न मलाच विचारले जाऊ लागले ज्यांचे गुण प्रश्न विचारायच्या आधीच "शून्य" हे ठरलेलेच असायचे. बरे त्यांचा आणखी एक दुष्टपणा म्हणजे मला मुद्दाम सोपे प्रश्न विचारले जायचे जेणे करून माझी आणखी फजिती व्हायची. मी सोडून माझ्या ग्रूपमधील सार्यांना त्याचे उत्तर येत असल्याने ते माझ्यावर आणखी चिडायचे. त्यातूनही नाही चिडले तर दर दोन प्रश्नांनतर बर्वे बाईंचा एक डायलॉग ठरलेलाच असायचा, "या नाईकमुळे तुमचा ग्रूप हरणार असे दिसतेय.." .. आणि सरतेशेवटी तेच होणे असायचे.
दिवसभर वर्गात हिरोसारखा वावरणारा मी त्या तासाला मात्र व्हिलन बनून जायचो. प्रत्येक जण मी त्यांच्या रांगेत बसून त्यांच्या ग्रूपमध्ये येऊ नये म्हणून मला वाळीत टाकल्यासारखा वागायचा. पण पुढच्या वर्षी नवीन बाई येतील आणि नवीन चित्रपट सुरू होईल याची वाट बघण्यापलीकडे माझ्याकडे काही पर्याय नव्हता. कारण ही मानहानी टाळण्यासाठी ईंग्लिश सुधारणे हा पर्याय मला ईंग्रजांविरुद्ध लढलेल्या स्वातंत्र्यसंग्रामापेक्षा खडतर वाटत होता. पण अखेरीस.. कसे बसे.. रडतखडत.. सात समुद्र पार केल्यासारखे.. हे सातवीचे वर्ष ही सरले.. आणि मी आठवीत गेलो.......... अर्थात.... "आठवी ड" मध्येच.
यावेळी माझा सामना होता तो चौधरी बाईंशी. या आधी चौधरी हे नाव मी केवळ चाचा चौधरी या कॉमिक्समध्येच वाचले असल्याने चौधरी म्हणजे एक दिलखुलास व्यक्तीमत्व याच गैरसमजात होतो... फार काळ टिकला नाही माझा हा समज.. नवीन वर्षाच्या पहिल्याच तासाच्या सतराव्याच मिनिटाला त्यांनी मला त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता शेजारच्या मुलाशी गप्पा मारत असताना म्हणून पकडले आणि उठवले. माझी पुरेशी कानउघाडणी करून झाल्यावर त्यांना त्यांच्या ईंग्रजी शिकवणीचा शुभारंभ माझ्यापासूनच करण्याचा मोह झाला आणि सातवीत काय काय शिकलात याची उजळणी म्हणून आपल्या प्रश्नांची तोफ माझ्यावर डागली. मी त्या तोफेच्या भडीमारापुढे फार काळ टिकू शकत नाही हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी सौम्य गोळीबाराला सुरुवात केली. त्यापुढेही माझा निभाव लागला नाही तसा त्यांनी सुरसुर्या आणि फुसकुल्या सोडायला सुरुवात केली. पण त्यातही मी धारातीर्थी पडलो. हे बघून त्या जाम उसळल्या. ज्या मुलाला ईंग्लिशची स्पेलिंग " I " वरून सुरू होते की " E " वरून हे देखील माहीत नाही तो त्यांच्या शिकवण्याकडे लक्ष न देता खुशाल गप्पा मारत होता यामुळे त्यांचा रागाचा पारा आणखी चढला. हे म्हणजे असे झाले की रेल्वे टी.सी. ने एखाद्याला रेल्वेचे रूळ ओलांडताना पकडावे आणि तो वर विदाऊट तिकीट ही निघावा. अश्यावेळी तो टी.सी. अश्यांचे काय करतो हे त्याचे त्यालाच ठाऊक पण मला मात्र उरलेला पुर्ण तास शेवटच्या बाकावर उभा राहून काढावा लागला.
आता ही फक्त सुरुवात होती हे तुम्हाला नव्याने सांगायला नकोच.
पुढे जाऊन त्या बाकाची ओळख "नाईकचा बाक" अशी झाली. एका टारगट मुलाने त्या बाकाच्या मागच्या भिंतीवर वरच्या बाजुला "नाईक" नाव लिहून त्याखाली एक बाण खेचला जो मी त्या बाकावर उभा राहिलो की बरोबर माझ्या डोक्यावर यायचा. आजूबाजुच्या दोनचार वर्गातील मुलांनाही एव्हाना हे समजले होते. येताजाता ईंग्लिशच्या तासाला आमच्या वर्गात डोकावणार्यांची संख्याही हळूहळू वाढू लागली होती. पण बघता बघता हे ही एक मानहानीकारक वर्ष अखेर सरले आणि माझी इतर विषयांतील हुशारी पाहता मला नेहमीसारखे ईंग्लिशमध्ये अतिरिक्त गुण देऊन माझी बढती "नववी ई" च्या वर्गात झाली.
आता मी पुरता कोडगा झालो होतो. जोपर्यंत आपण शिकणार तोपर्यंत हेच आपले प्राक्तन आहे हे मी समजून चुकलो होतो. काही जण माझ्या जखमेवर मीठ चोळायला म्हणून मला "अॅबी", "नॅक्सी" अश्या ईंग्लिश नावांनी चिडवू लागले होते. पण हे ही मी हल्ली न चिडता एंजॉय करू लागलो होतो. मी आता वाट बघत होतो ती नवीन वर्षात येणार्या... आणि मला वर्षभर घेणार्या... नवीन ईंग्लिशच्या बाईंची... पण हाय रे माझे दुर्दैव.. पुन्हा माझ्या नशिबी आल्या त्या चौधरी बाईच..!
नवीन वर्षात काही नवीन शिक्षा प्रकार शिकायला मिळतील असे वाटले होते. पण आता तेच ते मागच्या बाकावर उभे राहणे. त्यांना पाहताच मी स्वताहूनच वर्गाच्या शेवटी एखादा बाक रिकामा आहे का म्हणून शोधू लागलो. पण त्यांनी मात्र मला गोड धक्का दिला. मला चक्क पहिल्या बाकावर बसवले. तास संपेपर्यंत मला एकही प्रश्न विचारला नाही. हे ही काय कमी म्हणून शिकवता शिकवता अधून मधून माझ्या डोक्यावरून हात फिरवत होत्या. त्यांची ही आपुलकी माया ममता ललिता मला सहन होत नव्हती. त्यांच्या प्रत्येक स्पर्शागणिक गहिवरून यायला लागले. बसून बसून माझी पाठ दुखायला लागली होती, माझ्या मांड्या अखडल्या होत्या. वाटले की स्वताच हात वर करून प्रश्न विचारण्यासाठी म्हणून उभे राहावे. पण सरतेशेवटी तास संपायच्या आधी त्यांनीच मला उठवले आणि आतापर्यंतच्या गोंजारण्या-चुचकारण्याचा अर्थ मला स्पष्ट झाला. पुर्ण तासभर आपण काय काय शिकलो याचा सारांश त्यांनी मला थोडक्यात सांगायला लावला.
पहिल्या बाकावर बसलो असलो तरी माझी नजर खिडकीच्या पलीकडे आणि मन त्याही पलीकडल्या मैदानात असल्याने माझे त्यांच्या शिकवण्याकडे जराही लक्ष नव्हते. तसे लक्ष देऊनही कधी समजले होते म्हणा, पण निदान कानावर पडलेले चार शब्द पोपटपंची केल्यासारखे बोललो तरी असतो.. छ्या.. पण आता मात्र शुंभासारखा उभा होतो. त्यातल्यात्यात एकच समाधान की तास संपत आला होता. मात्र पुढच्या तासाला सुरुवातीपासूनच मागच्या बाकावर उभे राहावे लागणार याची मनाची तयारी करून ठेवली होती. पण चौधरी बाईंच्या मनात काहीतरी वेगळेच होते. पुढचा तास पी.टी. चा म्हणजेच शारीरीक शिक्षणाचा होता. त्या सरांकडून त्यांनी स्पेशल परवानगी घेतली होती की याचे शारीरीक शिक्षण आता मी घेते म्हणून.. त्यानंतर आमच्या तासानंतर ज्या वर्गावर त्यांचा तास असायचा तिथे त्या मला घेऊन जायच्या आणि त्या परक्या वर्गात अनोळखी मुलांसमोर मला कान धरून उभ्या करायच्या. जर तो दहावीचा वर्ग असेल तर ती सिनिअर मुले चिडवून माझे रॅगिंग घ्यायचे तर याउलट ज्युनिअर मुले अश्या काही नजरेने माझ्याकडे बघायची की मी शरमेने पाणी पाणी व्हावे. माझ्या कोडगेपणाची देव जणू परीक्षाच घेत होता. मी देखील त्या मुलांना उलटून चिडवायला लागलो हे लक्षात येताच बाईंनी मला भिंतीकडे तोंड करून उभे करायला सुरुवात केली.
शब्द दिल्याप्रमाणे त्यांनी माझे खरोखरच शारीरीक शिक्षण घ्यायला सुरुवात केली. कधी ओणवे उभे करायच्या तर कधी कधी अंगठे पकडायला लावायच्या. कधी कोंबडा बनवायच्या तर कधी वेगवेगळी कष्टप्रद आसने करायला लावायच्या. कैची हा त्यांचा आवडता प्रकार. यासाठी त्या नवीन वर्गातील एखाद्या मुलालाही शिक्षा म्हणून माझ्या जोडीला उभ्या करायच्या. कैची म्हणजे एकमेकांचे कान किंवा अंगठे पकडून उभे राहणे. त्यातही कोंबडा बनून एकमेकांचे कान पकडणे हा काय अवघड प्रकार असायचा याची एकदा स्वताच कल्पना करून बघा. या कैची प्रकारासाठी सातवीतल्या एका अभिजीत नावाच्या मुलाशी माझी जोडी जरा जास्तच जमायची. सुदैवाने तेव्हा दोस्ताना वगैरे चित्रपट नव्हते.. नाहीतर... असो..
थोडक्यात काय, तर आता माझी कीर्ती अक्ख्या शाळेत पसरली होती. मला खात्री होती की जेवढ्या आतुरतेने आता मी नवीन वर्षाची आणि नवीन बाईंची वाट बघत होतो त्यापेक्षाही जास्त उत्सुकतेने त्या माझी वाट बघत असणार. फरक फक्त इतकाच की या वाटाघाटीत वाट मात्र फक्त माझीच लागणार होती...
"चल, ABCD बोलून दाखव..."
"काय...???" मी जवळपास उडालोच.
‘दहावी फ’ चा वर्ग आणि फर्स्ट डे फर्स्ट शो...
एखादी कविता, सुभाषित, श्लोक नाहीतर एखादे गाणेच बोलून दाखव असे म्हणाल्या असत्या.. पण नाही.. नवीन बाईंनी आल्याआल्याच माझ्याकडे ही अजबच फर्माईश केली होती.
या नवीन बाईंचे नाव सहस्त्रबुद्धे बाई... नावावरून एखाद्या संस्कृतच्या शिक्षिकाच वाटाव्यात.. आणि तसेच होते.. ईंग्रजी शिकवण्याचे हे त्यांचे पहिलेच वर्ष.. या आधी गेले बारा वर्षे त्या संस्कृतच शिकवत होत्या. जसे संस्कृतमध्ये रामा रामौ राम: अशी रुपे पाठ करून घेतात तसेच या देखील माझ्याकडून ईंग्लिश बाराखडी पाठ करून घेण्याच्या इराद्यानेच आल्या होत्या.
तसे पाहता "पाचवी अ" ते "दहावी फ" च्या आजवरच्या प्रवासात माझी "ए" पासून "एफ" पर्यंतची ABCD आयुष्यभराची तोंडपाठ झाली होती. पण त्यापुढची येते की नाही हे चाचपण्याचा योग कधी आला नव्हता. तरीही जे चौथी-पाचवीलाच केले आहे ते काय चुकणार असा एक आत्मविश्वास होताच. आणि त्याच जोडीला गाठ ईंग्लिश भाषेशी असल्याने हा अतिआत्मविश्वास ठरण्याची भिती देखील होती. A B C D ला झोकात घेऊन निघालेली माझी गाडी E F पर्यंत सुसाट वेगात होती. त्यानंतर G H I ला हळूवारपणे स्पर्शून J K L मोठ्या दिमाखात म्हणालो. पण पुढे मात्र M आधी की N या प्रश्नाने खिंडीत गाठलेच.. काही क्षण तिथेच थांबलो.. जरासा रेंगाळलो.. पण ABCD बोलताना एवढी टंगळमंगळ करायची परवानगी नसते हा एक अलिखित नियमच आहे. त्यामुळे मी जरी शांत झालो असलो तरी वर्गातल्या इतर मुलांची चुळबूळ सुरू झाली. एकदा वाटले की परत पहिल्यापासून सुरू करावे, बोलण्याच्या ओघात जे काही पहिला येते ते सवयीनुसार उत्स्फुर्तपणे तोंडातून बाहेर निघेल. पण मग विचार केला की त्यातही आपलीच शोभा होईल की दहावीतल्या मुलाला एका दमात साधे ABCD बोलता येत नाही..
प्रसंग बाका होता. सार्या वर्गाचे लक्ष माझ्याकडे लागले होते. आणि मी मात्र "कोंबडी आधी की अंडे आधी" यासारखे "एम" आधी की "एन" आधी या प्रश्नात अडकलो होतो.. अश्यावेळी पुन्हा एकदा माझे तर्कशास्त्र माझ्या मदतीला धाऊन आले. मी मनातल्या मनात आकडेमोड करायला घेतली. N या अक्षरात आडव्याउभ्या तीन दांड्या येतात. आणि त्याचपुढे अजून एक दांडी जोडली की M तयार झाला. छोट्या लिपीत देखील असेच घडते आणि आणखी एक दांडी जोडली की n चा m होतो. म्हणजे ज्याने सर्वप्रथम ईंग्लिश लिपी बनवायला घेतली असणार त्याला पहिल्यांदा तीन दांड्यांचा N सुचला असणार, आणि त्यानंतरच M... या हिशोबाने आधी N आणि नंतर M हे मला स्पष्ट दिसत असले तरी तर्कशास्त्राचा सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आणखी काही उदाहरणे चाचपल्याशिवाय लगेच कोणत्या निष्कर्शावर येऊ नये. यालाच अनुसरून मी हातोहात O - P चे देखील कसे आणखी एखादी दांडी जोडून Q - R आणि V चा कसा W होतो हे ही पडताळून पाहिले. आता तर माझी पक्की खात्री पटली की आधी N आणि त्यानंतरच M...
हे मला लिहायला जेवढा वेळ लागला असेल त्याच्या निम्म्या वेळेत तुम्ही हे सारे वाचले असेल आणि त्याच्याही निमिषार्धात मी मनोमन हा सारा हिशोब मांडला होता. या सर्व उदाहरणांनी माझ्या तर्काला पुष्टी दिल्यावरच मी माझ्या गाडीला पुन्हा ग्रीन सिग्नल दिला.... पण हाय रे दैवा... या ईंग्लिश भाषेने माझ्या तर्कशास्त्राचीही ऐशीतैशी केली.. N M बोलून मी पुढे "ओ" बोलणार त्याच्या आधीच सार्या वर्गातून "ओह" चा स्वर निघाला.. आणि तिथेच माझ्या गाडीला ब्रेक लागला.
पुढची तिमाही ABCD शिकण्यातच गेली आणि मग एके दिवशी एका हिंदी चित्रपटात माधुरीच्या १ २ ३ सारखे A B C D E F G H I..... J K L M... असे काहीसे गाणे आले जे थेट "वाय झेड" ला जाऊन संपत होते. ते कसे काय ठाऊक दोनचारदा गुणगुणताच पाठ झाले... आणि अचानक... मला एक साक्षात्कार झाला... तो म्हणजे चूक सर्वस्वी माझी नव्हती तर आपली शिक्षणपद्धतीच सदोष होती. चूक ही शिकवण्याच्या पद्धतीत होती.. पण आता मी एकटा ही शिक्षणपद्धती बदलू शकत नाही याची जाणीव झाल्याने आमीरखान सारखी इडीयटगिरी न करता रट्टा मारून पास होण्यातच शहाणपणा समजला.
पण नुसते ABCD पाठ करणे पुरेसे नव्हते. वर्ष दहावीचे होते. आजपर्यंत शाळेने प्रत्येक इयत्तेत चढवून इथवर आणले होते पण आता गाठ बोर्डाशी होती. सोळावे वरीस धोक्याचे ते याचसाठी म्हणत असावेत. शाळेचा शंभर टक्के निकालाचा आजवरचा रेकॉर्ड होता जो त्यांना तोडायचा नव्हता. कोणताही खाजगी क्लास मला शिकवणी द्यायला तयार नव्हता ते याच कारणासाठी की त्यांच्या क्लासचे नाव खराब होऊ नये. जे गेल्या पाच वर्षात शिकू शकलो नव्हतो ते मला या एका वर्षात शिकायचे होते. आणि नेमके हेच आव्हान सहस्त्रबुद्धे बाईंनी घेतले होते. ते ही केवळ एकाच अटीवर की मी उत्तीर्ण झालो की त्याचे सारे श्रेय त्यांचे आणि नापास झालो तर मात्र त्याची जबाबदारी माझी स्वताची.
निबंधच्या निबंध माझ्याकडून पाठ करवून घेतले जात होते.. पत्रलेखनाचेही तसेच.. एक तृतीयांश सारांश मात्र आयत्यावेळी लिहायचा असल्याने त्या साठी आम्ही एक वेगळी क्लृप्ती योजली होती. सरळ दोन वाक्य सोडून तिसरे वाक्य जसेच्या तसे लिहायचे.. एक तृतीयांश गुण मिळाले तरी पुरेसे होते.. चेंज द वॉईस हा प्रकार माझ्या डोक्यावरून जात होता.. रामाने आंबा खाल्ला चे आंब्याने राम खाल्ला असे काहीसे मी करत होतो.. माझे पास्ट प्रेजेंट फ्युचर सारे टेन्स झाले होते.. फिल इन द ब्लॅंक्स मला परीक्षेला माझ्या पुढे बसणार्या मुलाने प्रश्नपत्रिकेवर लिहून द्यायचे कबूल केले होते.. बदल्यात मी त्याला वर्षभरासाठी माझ्या जेवणाच्या डब्यातील काही हिस्सा द्यायचे कबूल केले होते.. पर्यायापैकी एक निवडा हे मात्र सर्वस्वी त्या दिवशीच्या माझ्या मटका लक वर अवलंबून होते. इतर छोट्यामोठ्या प्रश्नांसाठी सहस्त्रबुद्धे बाई माझी तयारी करून घेतच होत्या.. माझ्यासाठी त्या ईंग्लिशचा एक्स्ट्रा क्लास घेत होत्या.. शारीरीक शिक्षण, हस्तकला, चित्रकला या तासांच्या वेळेतही मला ईंग्लिश आणि ईंग्लिशच शिकवले जात होते.. एवढेच नाही तर माझा मधल्या सुट्टीचा वेळही कमी करून त्या जागी मला ईंग्लिशचा वर्गपाठ करायला लावायचे.. थोडक्यात काय तर मला जबरदस्तीची तहानभूक विसरायला लाऊन माझ्याकडून अभ्यास करवून घेतला जात होता.
अखेर परीक्षा जवळ आली तसे मात्र माझ्या हातापायांना कंप फुटू लागला. आदल्या रात्री वाचलेले सकाळी विसरू लागलो. म्हणून मग पेपरच्या आदल्या रात्री झोपलोच नाही. डोक्याखाली जाडजूड आणि डोळ्यासमोर बारीक अशी दोन ईंग्लिशची पुस्तके घेऊन बिछान्यावर रात्रभर नुसता पडून होतो. परीणाम व्हायचा तोच झाला. परीक्षागृहात पेपर लिहिता लिहिताच झोपी गेलो. झोपल्या झोपल्याही पेपर लिहित होतो.. बाहेर आल्यावर काय लिहिले आणि काय नाही काही आठवत नव्हते. पण जर खरे सांगितले तर आताच ऑक्टोबरची तयारी म्हणून पुन्हा पुस्तक हातात धरायला लावतील या भितीने सार्यांना चांगलाच गेला असे म्हणालो. निकालाची जराही उत्सुकता नव्हती पण जेव्हा लागला तेव्हा डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. ईंग्रजी भाषेत मी तब्बल पंचेचाळीस गुण मिळवून पास झालो होतो. कदाचित वर्षभर जे रटले होते ते झोपेत असल्याने कोणताही ताण किंवा भिती न बाळगता लिहिले असल्याने हे आक्रीत घडले असावे. शाळेत मात्र माझ्या इतिहासाने पुर्ण हंगामा झाला होता. कारण मला इतर विषयांमध्ये खूप चांगले गुण मिळाले असल्याने शाळेच्या इतिहासात पहिल्यांदा "दहावी फ" मधील मुलगा "दहावी अ" च्या मुलांना मागे टाकून पहिल्या पाचात आला होता.
यथावकाश चांगल्या गुणांच्या जोरावर मुंबई विद्यापीठाच्या प्रथितयश कॉलेजमध्ये अॅडमिशन देखील झाले. कॉलेज सुरू झाले तरी दहावीच्या यशाची धुंदी अजून उतरली नव्हती. यातही भर म्हणून कॉलेजच्या पहिल्याच दिवशी जेव्हा आजूबाजुला मुलामुलींना एकत्र फिरताना पाहिले तेव्हा आणखी हरखून गेलो. कॉलेजमध्ये लेक्चर बसणेही सक्तीचे नसते हे समजल्यावर तर पहिला दिवस कॉलेजच्या कॅंम्पसमध्ये बागडण्यातच गेला. शाळेच्या शिक्षेपासून आता मला स्वातंत्र्य मिळाले आहे असे वरवर जरी वाटत असले तरी इथेही इंग्रजी भाषेचा गुलाम बनून राहणे माझ्या नशीबी येणार आहे याची कल्पना मला लवकरच आली. आजूबाजुची ती फुलपाखरे नक्की कोणत्या माध्यमात शिकून आली होती ठाऊक नाही पण बोलायला तोंड उघडताच ईंग्लिशच झाडत होती. करमरकरबाईंच्या कृपेने "हाय, हेल्लो, हाऊ आर यू" बोलून तो दिवस तर कसाबसा निभावून नेला, पण दुसर्या दिवशी लेक्चरला बसल्यावर मात्र सगळीकडे, आय कॅन वॉक ईंग्लिश, आय कॅन टॉक ईंग्लिश अन आय कॅन लाफ ईंग्लिशचेच गुणगाण चालू होते. चांगले गुण मिळवून मोठ्या कॉलेजला आलो ही माझी घोर चूक झाली असे आता वाटू लागले.
या आधी ईंग्लिश हा एक विषय मला समजत नव्हता पण आता मात्र सारेच विषय ईंग्लिशमध्ये शिकवले जात होते. प्राध्यापकही ईंग्लिशमध्येच बोलायचे आणि विद्यार्थीही ईंग्लिशमध्येच शंका विचारायचे. वर्गात काही गुणी बाळासारखी शांत बसणारी मुले देखील होती जी मराठी माध्यमाची होती हे समजायला मला फारसा वेळ लागला नाही. मात्र दुर्दैवाने अश्यांची संख्या अत्यल्प होती, ज्यात एक मी देखील होतो.
दिवसाचे कितीही घंटे अभ्यास केला तरी हा विषय आपल्याला घंटा काय समजणार नाही हे लक्षात येताच माझ्या डोक्यात धोक्याची घंटा वाजू लागली आणि शेवटचा मार्ग म्हणून मी देवळातली घंटा वाजवून देवाकडे न्याय मागण्यासाठी निघालो असताना मध्येच मला चर्चच्या घंटानादाने भुरळ घातली. माझ्या आयुष्याने एक वेगळेच वळण घेतली आणि त्या वळणावर मला मोनालिसा भेटली.
मोनालिसा फर्नांडीस ही नावानेच नाही तर धर्मानेही ईंग्लिश होती. मुळातच ख्रिश्चन असल्याने ईंग्लिश अशी काही फाडफाड बोलायची की प्राध्यापकांनाही लाजवायची. माझी आणि तिची पहिली भेट कशी, कधी, कुठे, केव्हा झाली हे आता नीटसे आठवत नाही पण तिचे ईंग्लिश हे असे आणि माझे ते तसे, त्यामुळे "ऑपोजिट अॅट्रॅक्ट्स" या न्यूटन की आईनस्टाईनच्या नियमानुसार आम्ही एकमेकांकडे आकर्षिले गेलो.
त्यानंतर मात्र चमत्कार झाल्यासारखे माझे ईंग्लिश तिच्या सहवासात सुधारू लागले. ईंग्रजी ही केवळ अभ्यासाचीच भाषा नसते तर ती प्रेमाचीही भाषा असू शकते हे मला उमगले आणि अचानक ती भाषा आवडूही लागली. "माझे तुझ्यावर प्रेम आहे" या चार शब्दांपेक्षा "आय लव्ह यू" या तीन शब्दांतील गोडवा मला जास्त भावू लागला. प्रेमाचा संदेश देणारे संत वॅलेंटाईनसारखे महात्मे याच भाषेत निपजले असल्याने जगभर प्रेमाचा प्रसार होण्यासाठी ही भाषा प्रत्येकाला आलीच पाहिजे याचा साक्षात्कार झाला. एवढेच नाही तर आजच्या या युगात सबंध Earth वर कुठेही अर्थार्जनासाठी देखील या भाषेचा अर्थ समजणे खूप गरजेचे आहे हा व्यावहारीक दृष्टीकोनही पटू लागला.
............आणि या सार्याचा परीणाम म्हणजे आज मी स्वता जीभेला एकही वेलांटी न देता, ती दात व जबडा यांमध्ये न अडकवता, न अडखळता, टीटीपीपी न करता, पाण्यासारखी ईंग्लिश बोलू शकतो. पण मोनालिसाला मराठी शिकवायच्या भानगडीत मात्र मी कधी पडलो नाही. कारण त्यावाचून तिचे काही अडणार नव्हते. पण ईंग्रजी न आल्याने ज्यांचे अडते अश्यांसाठी मात्र मी मोनालिसाच्या मदतीने क्लासेस सुरू केले आहेत. क्लासमधील बर्यापैकी हुशार मुलांना ईंग्लिशमध्ये फाडफाड कोकलायला मोनालिसा शिकवते, आणि मी मात्र ज्यांची माझ्यासारखीच ईंग्लिशची बोंब आहे अश्यांना स्वत: जातीने लक्ष घालून शिकवतो.. हो, अगदी a b c d पासून...
आता ही A B C D देखील किती मानसिक त्रास देते हे मला ठाऊक असल्याने ती देखील मी त्यांना सोपी करून शिकवतो.. कशी ते उदाहरणादाखल तुम्हाला खाली देतो.. जेणेकरून तुम्ही बाहेर जाऊन माझ्या क्लासची जाहीरात कराल हीच अपेक्षा...
a
bi
see
Di
e
eph
jee
ech
aay
je
ke
el
em
en
o
pee
kyu
aar
es
tee
yu
vi
dabalyu
eks
vaay
jhed
No Thanks.! No Sorry.!
...Tumcha ABHISHEK
प्रतिक्रिया
12 Apr 2013 - 2:27 pm | अभ्या..
तुम्ही आणि अंड्या साळसकर एकाच शाळेत, एकाच वर्गात शिकलात का हो?
भर्पूर डिट्टेलमध्ये लिहिताय अगदी.
12 Apr 2013 - 9:37 pm | तुमचा अभिषेक
हा हा हा... अंड्या साळसकर.. अंड्या उर्फ आनंद.. बोले तो अंड्याचे फंडे.. गूड ऑब्जर्वेशन हं.. ;)
विषय निघालाच आहे तर.... अंड्याच्या आणि माझ्या लिखाणातील मुख्य फरक सांगायचा झाला तर अंड्या त्याच्या निरीक्षणानुसार लिहितो आणि माझे बहुतांश लिखाण अनुभवावर आधारीत असते.. अंड्या त्याच्या फंडयातून काही विचार मांडायचा प्रयत्न करतो तर मी याचा फारसा विचार न करता विरंगुळा हाच उद्देश ठेऊन हलकेफुलके लिहायला बघतो.. :)
18 Oct 2013 - 9:59 am | साळसकर
का इथे?
12 Apr 2013 - 2:45 pm | गणपा
हा हा हा
भन्नाट लिहिता राव तुम्ही.
मझा आगया. :)
12 Apr 2013 - 2:56 pm | पियुशा
आय लाइइक इट्ट ;)
12 Apr 2013 - 3:27 pm | शिद
मस्त खुमासदार लेखन आणि त्यात असलेल्या छोट्या छोट्या पंचेसमुळे आणखी रंगत आली आहे. :))
अगदी असेच मी डिप्लोमा 1st year ला करायचो कारण आमचे पण त्यावेळी इंग्रजीबद्दल असलेले अज्ञान... :)
12 Apr 2013 - 9:42 pm | तुमचा अभिषेक
अगदी अगदी... डिप्लोमा १स्ट वर्ष असो वा अकरावी... दहावीनंतरचे संपुर्ण ईंग्रजी भाषेतील पहिले वर्ष म्हणजे खरेच हालत पतली असते.. काही जण जोमाने रट्टा मारून अभ्यास करतात तर काही जणांचा आत्मविश्वास खचतो.. दोन्ही प्रकारची उदाहरणे मी बरीच पाहिली आहेत.. मी स्वतः अकरावी आणि डिप्लोमा हे दोन्ही अनुभव घेऊन झालेत. :)
12 Apr 2013 - 3:35 pm | मनराव
क्लासचा पत्ता द्या कि ओ.......
(विंग्रजीची बोंब असलेला कोंन्वेंटकर) - मनराव.......
12 Apr 2013 - 9:45 pm | तुमचा अभिषेक
तुम्ही सीआयडी मध्ये होता का राव.. एवढ्या भल्यामोठ्या सत्यघटनेवर आधारीत लेखातील नेमके एकच वाक्य जे काल्पनिक होते ते बरोब्बर पकडलेत.. ;)
12 Apr 2013 - 4:11 pm | दिपक
हाहाहा
एकदम खुशखुशीत लिखाण! :-)
हा क्लास पण भारी आहे. ;)
12 Apr 2013 - 4:13 pm | चाणक्य
एकदम खुसखुशित.....
(दहावी पर्यंत मराठी माध्यमात शिकलेला) चाणक्य
12 Apr 2013 - 5:53 pm | शुचि
हाहाहा =))
12 Apr 2013 - 6:14 pm | कोमल
खुपच रंगतदार लेख... लै भारि...
12 Apr 2013 - 6:59 pm | तर्री
जाम मजा आली वाचताना.
12 Apr 2013 - 8:10 pm | सुधीर
एकदम फक्कड! तूझा वर्गसोबती होतो म्हणून हे कळतय की, तू वास्तवातल्या घटनांमध्ये आणि टोप्या (कल्पनाविलास) फार चांगल्या घालतोस :). बाकी करमरकर बाई संस्कृत आणि मराठी पण चांगलं शिकवायच्या पण मला खूप भीती वाटायची त्यांच्या तासाला. माझं मराठी "सुद्द-लेखन" फारच वाईट्ट होतं म्हणून एकदा त्यांनी माझी वही फेकून दिली होती. त्या घटनेचा दरारा इतका होता (अजूनही आहे) की इथे "अभिव्यक्त" व्हायला वेळ लागला.
12 Apr 2013 - 8:13 pm | शुचि
हाहा चाईल्डहूड ट्रॉमा ;)
12 Apr 2013 - 9:47 pm | तुमचा अभिषेक
हा हा हा.. ए बाबा, जर हा लेख पण कोणाला मेल केलास तर त्यात डिस्क्लेमर नक्की टाक .. बाईंची नावे काल्पनिक.. नाहीतर मरवशील.. ;)
12 Apr 2013 - 8:35 pm | लॉरी टांगटूंगकर
या वाक्यांना अशक्य टाळ्या :) :), लै झ्याक
12 Apr 2013 - 9:05 pm | सस्नेह
भन्नाट वॉल्किंग अँड टॉल्किंग !
13 Apr 2013 - 12:03 am | कपिलमुनी
इंग्रजी गद्य पद्य पांठातरची स्पर्धा होती
वर्गात सर्वांचे इंग्रजी दिव्य ! एकहि स्पर्धक नाही हे पाहून बाईंना टेंशन आले
तेव्हा आम्ही सारे उतारे बाईंकडून देवनागरी मधे लिहुन घेतले होते..
सर्व जण एकदम सुरात इंग्रजी कविता म्हणत आहेत हे पाहुन हेमा खुश झाल्या होत्या
* हेमा म्हणजे हेडमास्तर
18 Oct 2013 - 12:40 pm | अविनाश पांढरकर
हेमा नहि तर हेमी हवं आहे.
*हेमी म्हणजे हेडमिस्ट्रेस
13 Apr 2013 - 6:54 pm | पैसा
मजा आली!
13 Apr 2013 - 9:26 pm | विश्वनाथ मेहेंदळे
तुझ्या लिखाणात वास्तव आणि कल्पना विलास यांची सरमिसळ असते हे याआधी तूच स्पष्ट केले आहेस. तशी ती या ही लेखात आहे. वरती सुधीरने तसे लिहिले आहे म्हणून म्हणत नाही. पण लेख वाचतानाच हे कळले होते. तुझ्या पहिल्याच लेखात मी लिहिले होते की मी तुझ्याच शाळेत तुझ्या काही batch पुढे होतो. त्यामुळे वरील सर्व शिक्षकांना मी जवळून पाहिले आहे.
वास्तवात कल्पेनेची सरमिसळ करताना खरी नावे न वापरण्याचा एक संकेत असतो. तो तू पूर्णपणे धाब्यावर बसवलेला आहेत. त्यातून शिक्षकांच्या बाबतीत असे केले आहे. हे मला व्यक्तिश: अजिबात पटले आणि आवडले नाही.
आपला नम्र मावळा,
विमे
13 Apr 2013 - 10:04 pm | तुमचा अभिषेक
माफी मागतो
पण वरीलपैकी एका बाईंचा अपवाद वगळता इतर बाई माझ्या वर्गाला तरी ईंग्लिश हा विषय शिकवायला नव्हत्या.
चुकीचे स्पष्टीकरण द्यायला म्हणून नाही पण खरे तर हे लिहिताना मी मनाने शाळेत पोहोचलो होतो. मला स्वताला झालेल्या शिक्षा आणि त्या शिक्षा करणार्या आणि तरीही माझ्या आवडीच्या असणार्या अश्या या सर्व बाईची नावे सोडून माझ्या डोक्यात दुसरी नावे खरेच आली नाहीत.. आणि सहज हे लिहिले गेले..
18 Apr 2013 - 12:34 pm | मृत्युन्जय
त्या काळी... आता इथे माझे वय कोणाला समजू नये म्हणून नेमके वर्ष सांगत नाही...
काय हो हे विमे. त्या बिचार्यानी वय लपवण्याचा प्रयत्न केला आणी तुमचे वय तर इथे सर्वांना माहिती आहे. त्यामुळे त्याच्या वयाचाही अंदाज बांधता येइल ना लोकांना. श्या ;)
बाकी लेख भारी आहे रे अभिषेक.
18 Apr 2013 - 8:10 pm | तुमचा अभिषेक
लपवावे अश्या वयात अजून मी पोहोचलो नाहिये हो.. तुर्तास विवाहित आहे हे कसे लपवावे यावर जमल्यास टिपा द्या.. :)
21 Apr 2013 - 2:47 am | विश्वनाथ मेहेंदळे
जालावर येणे म्हणजे भर रस्त्यात.... असे काहीसे आमचे प्रम्प्रिय जाल्मित्र म्हणायचे.
बाकी वयाचे बोलाल तर मी वय न लपवण्याचा फार प्रयत्न केला, पण ते लपलेच :-)
18 Apr 2013 - 12:03 pm | सुमीत भातखंडे
"डू-डाय-डू-मॅडम"...:))
18 Apr 2013 - 3:45 pm | सावत्या
हा हा हा हा !!!!
करमरकर बाई आठवलया!!!!!
18 Apr 2013 - 3:43 pm | सावत्या
तुम्ही राजा शिवाजी विद्यालायत (दादर) शिकलात का?
बाईंच्या नावावरूण तरी तस वाटतय!!!!!!!
18 Apr 2013 - 8:08 pm | तुमचा अभिषेक
हो... अगदी छोट्या शिशू पासूना दहावीपर्यंत.. :)
18 Oct 2013 - 11:37 am | ब्रिज
मस्त लिहिलेस अभिषेक!
अॅक्टीव्/पॅसीव ने तर कहर मजा आणलीये शालेय इंग्रजी शिकताना :-)
18 Oct 2013 - 12:12 pm | ब़जरबट्टू
मस्त अनुभव !! आवडेश