क क कपलचा भाग -०१ -http://www.misalpav.com/node/21982
क क कपलचा भाग -०२ -http://www.misalpav.com/node/22073
क क कपलचा भाग -०३ -http://www.misalpav.com/node/22171
क क कपलचा भाग -०४ -http://www.misalpav.com/node/22222
क क कपलचा भाग -०५ -http://www.misalpav.com/node/22316
क क कपलचा भाग -०6 -http://www.misalpav.com/node/22454
क क कपलचा भाग -०७ -http://www.misalpav.com/node/22598
क क कपलचा भाग -०८ -http://www.misalpav.com/node/22711
क क कपलचा भाग -०९ -http://www.misalpav.com/node/22825
शेवट त्या दिवसांत व्हायचा तसं माझ्या रडण्याऐवजी सरांच्या चिडण्यात आरडा ओरडा करण्यत झाला होता, ते निघुन हॉलमध्ये गेले, आणि सकाळी जेंव्हा ते निघाले तेंव्हा मी त्यांच्या हातात एक जाहिरात ठेवली होती पेपरमध्ये आलेली ' अपने खोये हुवे पौरुषत्व की पुनप्राप्ती के लिये हमारे पास आये अक्सीर इलाज सिर्फ तीन दिनोमे' आणि म्हणलं ''when you cannot avoid it, try improving it' --
पुढे सुरु ..
स्मिता साधा सरळ विचार करत होती, ही असली पोचलेली बाई, हिनं दुसरा कुणीतरी गाठला असेल असा, पण स्व:त प्रेमात पडुन लग्न केलेल्या नव-याचा असा अपमान केला असेल असं तिला वाटलं नव्हतं, आणि असं का वाटलं नाही याचं तिलाच आश्चर्य वाटत होतं ' एवढ्यावरुन सरांनी तुला घटस्फोटाची मागणी केली, खरं नाही वाटत मला ' स्मितानं तिची शंका बोलुन दाखवली. अनुजा हसली ' सगळ्यांना असंच वाटतं, आजसुद्धा, जाउ दे, चुका माझ्या सुद्धा झाल्याच, ए असं करा आता जेवुनच जा, दोघंजण, आमच्या घरी आलात खरं पण घरचं जेवलाच नाहीत, काल केटरर होता आज आपण बाहेरच जेवलो, पुन्हा हर्षद रागवेल मला ' असं म्हणत अनुजा उठुन किचनकडे गेली.
तिच्या मागंमागं जात स्मितानं विचारलं ' किती वाजता येतात गं? ' दाळ तांदळाचे डबे काढत अनुजा म्हणाली' आठ साडेआठ तरी होतात, मला तरी अजुन कुठं याचं टाइमटेबल माहित झालंय, तीन महिने तर झालेत लग्नाला' ' म्हणजे अजुन दोन तास आहेत तर ' समोरच्या ड्ब्यातल्या शेंगा उचलत स्मिता बोलली. ' हो तेवढ्यात आपलं बोलुन होईल सगळं, तु नको काळजी करु आता थोडंच राहिलंय.' तांदळाचं भांडं नळाखाली धरत अनुजा बोलली, त्या पाण्याच्या आवाजात तिच्या बोलण्याचा रोख नक्की कसा आहे ते स्मिताच्या लक्षात आलं नाही. ' असं ही केसबद्दल मी फार बोलणार नाहीये, तो विषय बोलायचा नाहीये मला, मळमळतं मला ते वाद अन चर्चा आठवल्या की' दाळ धुता धुता अनुजानं क्लिअर केलं. ' पण ते वाद अन चर्चा तुम्ही जे करत होता आणि बघत होता त्याबद्दलच होत्या ना, खुशीनं असुदे कि जबरदस्तीनं तुम्ही दोघंही जे करायचा, जे पाहायचा, जे अनुभवायचा किंवा ज्याची कॉपी करायचा, त्यावरच चर्चा व्हायची ना ? स्मिताचा प्रश्न ऐकुन अनुजाच्या हातातलं दाळीचं भांडं कुकरमध्ये पडलंच, का माहित नाही या बाजुनं तिनं कधी विचारच केला नव्हता.
' हो, म्हणजे तसंच आहे थोडंफार, पण ते पाहणं आणि करणं आमच्या घरात होतं, घरातच काय घरातल्या पण एका खोलीत होतं, आमच्या दोघांत होतं, तिथंच सुरु व्हायचं अन तिथंच संपायचं, त्या सगळ्याचा असा बाजार मांडला गेला त्याचं दुख: जास्त आहे. सरांनी मला enjoy करायचा ऑप्शन दिला तो मी जमेल तेवढा स्विकारला होताच मग त्यांना improve करायचा ऑप्शन स्विकारायला काय अडचण होती ?' वाईट याचं वाटतं की, एक बाई म्हणुन मी होणारा अन्याय सुद्धा आनंद म्हणुन स्विकारला पण त्या बदल्यात मला त्या पातळीचा आनंद मिळावा ही माझी इच्छा सुद्धा पुर्ण होउ नये याचं, समोरचा तुम्हाला चाबकानं मारणार असेल तर, मार खायची तयारी आहे, पण मारताना किमान त्याचं पेटुन उठलेलं शरीर दिसावं,त्याच्या डोळ्यात रक्त उतरलेलं असावं आणि प्रत्येक फटक्याच्या आवाजाबरोबर रागानं येणारा त्याचा आरडाओरडा तरी ऐकु यावा असं मला वाटतं, enjoy करायचा आहे तर मग त्या अन्यायात पण काहीतरी थ्रिल नको का ? , हे असलं लॉ़जिक स्मिताच्या डोक्याबाहेर चाललं होतं. तिनं अनुजाच्या समोरुन कांदे अन बटाटे घेतले अन चिरायला सुरु केले. बराच वेळ दोघीजणी आपल्या घरातल्या स्वयपाकाच्या पद्धती आणि चवी यावर बोलत होत्या. तासाभरात स्वयपाक झाला, दोघी हातात कॉफीचे मग घेउन हॉलमध्ये येउन बसल्या.
'तुमच्या केसमध्ये हर्षद कसा काय आला ?' ब्रेक नंतर स्मितानं पुन्हा गाडी मुळ विषयाकडं नेली. ' केस फॅमिलि कोर्टात होती तोपर्यंत काही संबंधच नव्हता हर्षदशी, चार महिने झाले होते केस करुन तेंव्हा सरांनी आत्महत्येचा प्रयत्न केला, आणि लिहुन ठेवलेल्या चिठ्ठीत माझं नाव होतं, त्यावेळेला चौकशीला पोलिस घरी आले तेंव्हा हर्षद पहिल्यांदा भेटला. सर तर वाचले, पण हे नवं लचांड माझ्या मागं लागलं, अर्थात माझ्या वकिलांनी याचा देखील उपयोग करुन घेतलाच घटस्फोटाच्या केसमध्ये, त्यामुळं माझी सुटका जरा लवकर झाली एवढंच,पण या चौकशीच्या निमित्तानं हर्षद भेटत राहिला, आमचं बोलणं होत राहिलं आणि आम्ही प्रेमात पडलो एकमेकांच्या. माझं सगळं प्रकरण हर्षदला माहित होतंच, आणि त्यानं प्रामाणिकपणे कबुल केलं की त्याला सुद्धा अशा गोष्टीचंच जास्त आकर्षण आहे,' तिचं बोलणं तोडत स्मितानं विचारलं ' आणि तुलादेखील एक पुरुष हवा होताच, हो ना?' दोन सेकंद गप्प राहुन अनुजा थोड्या चढ्या आवाजात बोलली, ' हो मला हवाच होता पुरुष, का हवा असु नये, तुझा नवरा आठ दिवस गावाला गेला, तर तुला नाही काही वाटत, महिन्यातलं चार दिवस लांब राहणं पुरुषांच्या जीवावर येतं, तर एक वर्ष सुखापासुन लांब राहिले होते मी, उलट मलातरी वाटतं की मी याबाबतीत फार संयम बाळगला, आम्ही वेगळं राहायला लागल्यानंतर एक दोन वेळा सरांनी माझ्या रुममध्ये घुसायचा प्रयत्न केला होता, माझी केस बघणारा पहिल्या वकीलानं पण फासे टाकुन पाहिले होते, एक वेळ अशी आली होती की, जाउदे मला बोलायचंच नाही आता त्याबद्दल.' एवढं बोलुन अनुजा मग ठेवायला किचनमध्ये गेली.
हर्षद आणि शरद एकत्रच आले, दोघी अजुन घरच्याच कपड्यात होत्या, आल्या आल्या शरदनं घरी जायची गडबड सुरु केली, पण स्वयपाक तयार आहे हे कळल्यावर त्याचा नाईलाज झाला, सगळुयांनी एकत्र बसुन जेवण केलं, जेवण झाल्यावर हर्षद खाली पान आणायला गेला, तो परत येईपर्यंत स्मिताचं आवरुन झालं होतं, ती दोघं निघायच्या तयारीत होते, पुन्हा भेटायच्या आमच्या घरी या ना एकदा असल्या गप्पा झाल्या अन अकराच्या सुमारास घराचा दरवाजा लावुन हर्षद आता आला, तेंव्हा अनुजा बेडवर बसुन होती, समोरच्या भिंतीकडं पहात ' यापुढं घरात कुणलाही बोलवायचं नाही, काहीही झालं तरी, समजलास ' तो आत आल्याचं जाणवताच ति अक्षरशः ओरडलीच त्याच्या अंगावर ' नालायक साले सगळे, दुखावर औषध तर नसतंच कुणाकडं पण पट्ट्या काढुन किती लागलंय ते पहायला फार आवडतं सगळ्यांना हराखखोर कुठले एकजात ', अनुजा दिवसभराचं ओझं उतरवुन ठेवल्यासारखं बोलली, ' होय, खरंय आणि तु सुद्धा अल्बम उघडुन बसली असशील दिवसभर हा माझा अन्याय, हा माझा न्याय करत, मानसिक आजार झालाय तुला, कुणीतरी लागतं तुझ्या अन्यायाबद्दल वाईट वाटतंय म्हणणारं तुला जवळ घेउन थोपटणारं, तुझंच खरं,तुझंच बरोबर असं म्हणणारं, आणि असं झालं नाही की तुला अॅटॅक येतो अन्यायग्रस्त असल्याचा मग जाहिरात करावीशी वाटते. इथं आल्यापासुन एक निकाळजे काकु भेटल्या होत्या, आता ही एक झाली. बेडवर आडवं पडत हर्षद बोलला.
बराच वेळ दोघं घुसमटुन झोपली होती, मग दोघांनाही कधीतरी शांत झोप लागली असावी. सकाळ झाली तशी दोघंही सवय लागल्याप्रमाणे उठली अन नेहमीच्या कामाला लागली, हर्षदचं आवरुन होईपर्यंत अनुजानं त्याचा डबा करुन हॉलमधल्या टिपॉयवर ठेवला, तो बाहेर येउन बुट घालायला लागला तसं किचनच्या दारातुनच अनुजानं विचारलं ' केसचं कुठपर्यंत आलंय, कधी निकाल लागेल काही कळालंय का?' 'बघतो आज, जाउन येतो पांढरेकडं', डब्याची पिशवी उचलुन हर्षद निघुन गेला. अनुजा दरवाजा लावेपर्यंत निकाळजे काकु समोर आल्या. ' पाहुणे राहिले होते वाटतं काल पण?' मग अर्धा तास दोघींच्या दारगप्पा झाल्या, अनुजा आत येउन बेडवर पडली अन तिनं आईला फोन लावला, पुजेच्या दिवसापासुन तिचं बोलणंच झालं नव्हतं. एक तास भर ती बोलत होती. कंटाळा आल्यावर फोन ठेवुन तशीच झोपुन गेली. संध्याकाळी हर्षद आला, त्याला वकीलाकडं जाणं जमलं नव्हतं, सकाळचं गरम करुन संपवलं अन दिवस संपला. असे बरेच दिवस संपले, रात्री काही जागत काही पेंगत तर काही वाट बघण्यात गेल्या. चार महिन्यांनंतर पुन्हा केसची तारीख पडली, हर्षदनं दोन दिवस रजा काढली, एक दिवस आधी अन दुसरा केसचा दिवस कोर्टात गेला. फारसं महत्वपुर्ण काही झालं नाही, पण एक झालं की सरांच्या वकीलानं फारसं ताणुन धरलं नाही, अजुन एक दोन तारखांत केस सुटेल असं वाटायला लागलं.
आताशा दोन वर्षे झालीत, अनुजा आणि हर्षदचं तसं बरं चाललंय, ज्या एक दोन तारखांत केसचा निकाल लागायचा होता त्या अजुन आलेल्या नाहीत. केसचा निकाल लागेपर्यंत अन स्वताचं घर होईपर्यंत मुल होउ द्यायचं नाही असा निर्णय दोघांनी घेतलाय. मध्ये एक दोन वेळा अनुजाची आई गुपचुप येउन गेली घरी. हर्षद्च्या घरचं अजुनही कुणी येत नाही. तो दोन वेळा घरी जाउन आला, घराला पैसे हवे होते तेवढ्यापुरतं घरानं जेवण पाणी विचारलं, तो तेवढ्यावर खुश आहे, निदान तसं दाखवतो तरी, अनुजा पण त्याला या विषयावरुन काही बोलत नाही. स्मिताला एक मुलगा झाला, पण तिनं अनुजाला बारशाला येउ नको असं सांगितलं फोनवरुन,रडतच पण स्पष्ट सांगितलं होतं. हल्ली अनुजा सुद्धा या सगळ्याचं वाईट वाटावं याच्या फार पुढं गेली आहे किमान दिवसभर तरी, मग जेंव्हा असह्य होतं तेंव्हा फिल्म्स बघते पुन्हा जुने दिवस आठवतात, त्याकाळची गरिबी आजची श्रीमंती याची नकळत तुलना करते, आणि पुन्हा मागचं सगळं विसरायचा प्रयत्न पहिल्यापासुन सुरु करते. त्या जागलेल्या रात्रीचा आनंद पुढं चार दिवस टिकतो.
नोकरीतल्या पगारात घर घेणं शक्य नाही, वरच्या पैशात घेतलं तर दुस-या दिवशी अँटीकरप्शनवाले धरुन नेतील या भितिनं हर्षद घर घ्यायचं टाळतोय. यावर्षी गाडी घेतली खरी, एक सेकंड हँड स्कॉर्पिओ. पण साहेबच अल्टो घेउन येतो म्हणल्यावर स्टेशनला गाडी घेउन जायला अवघड होतं, मग 'कल भी आज भी' बजाज पल्सर उपयोगी पडते. नाही म्हणायला अनुजा चार गल्ल्या पलीकडे दळण न्यायला आणायाला गाडी घेउन जाते. दळणाच्या खर्चापेक्षा डिझेलचा खर्च आणि दळणाच्या वेळापेक्षा ती गाडी काढण्या घालण्याचा वेळ हेच जास्त आहेत. वर कॉलनीतल्या गिरणीवाल्याला 'असलं' गि-हाईक तुटल्याचं वाईट वाटतं. दोन वर्षात घरी बाहेरचं कुणी फारसं आलं गेलेलं नाही. घरगुती अडिनडीला निकाळजे काकु आहेतच. सोनवणे मॅडमनी केस पांढरे वकीलांना दिली तेंव्हा त्या समजवायला आल्या होत्या, त्यांच्या घरच्या एक दोन पार्ट्यांना अनुजा गेली होती.
एकुणात म्हणलं तर बरं चाललंय. वातीला काजळी पकडली असली तरी कंदिलाची वरची काच स्वच्छ आहे, खालच्या रॉकेलमध्ये कचरा आहेच, वेळ दिला तर तो साफ करता येईल पण तेवढी आज गरज नाही म्हणुन वेळ असुन देखील कुणी ते करत नाही, पण कधीतरी धक्का लागतोय, रॉकेल डहुळतंच आणि मग वात खाली वर करुन उजेड वाढवायची खटपट केली जाते. वातीत अडकलेला कचरा जळुन जातो, उजेड वाढतो. आता हवाय तेवढा पडतो. आणि तेवढ्यावर सगळे समाधानी आहेत कंदिल पण, वात पण आणि रॉकेल पण.
आपण ज्याचं उत्तर आहोत; असा प्रश्न हुडकणा-या अमर्याद उत्तरांची कहाणी काही उत्तरी सुफळ संपुर्ण.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
21 Oct 2012 - 10:42 pm | बॅटमॅन
साजेसा शेवट!!! मान गये ५०, तुम्हाला १००/१०० फक्त :)
21 Oct 2012 - 11:06 pm | किसन शिंदे
अगदी साजेसा शेवट ५०राव.
शेवटच्या परिच्छेदातल्या उपमा तर लाजवाब.
(तुमच्या पुढील लेखमालिकेची वाट पाहणारा) किसन
22 Oct 2012 - 2:15 am | रेवती
लेखमाला वाचली. स्मितानं मैत्रिणीला तोडून का टाकावं हे समजलं नाही. ष्टोरी ऐकताना तरी ती तेवढी धीट वाटत होती, रहा म्हटल्यावर राहिली, जेवायला थांब म्हटल्यावर थांबली. तेवढं जरा कळलं नाही. बाकी असे लेखन पचनी पडायला अवघड जाते, तसे समाजात घडत असले तरी (बहुतेक स्मिताचं असंच काहीतरी झालं. ;) )
22 Oct 2012 - 8:07 am | प्रभाकर पेठकर
सहमत.
कथा आवडली. वेगळा गुंतागुंतीचा विषय. संयत आणि परिपूर्ण लेखनशैली. चपखल उपमांमुळे अत्यंत वाचनिय आणि मनाला भिडणारी कथा. अभिनंदन.
22 Oct 2012 - 7:55 am | प्रास
जीवनात व्यक्ती एकमेकांशी प्रसंगी नेमक्या कशा वागतील याची काहीच शाश्वती नसते आणि स्मिताचं अनुजाशी वागणं हे तसंच आहे, अनाकलनीय, बहुदा म्हणूनच ते वास्तवतेकडे झुकतंय, असंच वाटतंय. हे गृहित धरूनच नात्यांचं व्यवस्थापन बघावं लागतं अन्यथा छोट्याशा प्रश्नाचा आवाका कुठे पोहोचणार आहे हे स्मिताबरोबरच्या पहिल्या संवादादरम्यान अनुजाला कळलं नसेल असं वाटत नाही. कदाचित आपल्या अपेक्षापूर्तीचंही माणसाला एक आकर्षण असतं. या आणि अशा जटील बांधणीमुळे आपण पन्नासरावांच्या लिखाणाचे फ्यान आहोत.
एकूण काय, पन्नासराव, अस्सल मानवी व्यक्तीरेखांनी सजलेली तुमची लेखमाला, मानवी जीवनासारखी काहीशी अधांतरीच शेवटाला गेल्यासारखी वाटत असली तरी नक्कीच आवडली आहे हे इथे नमूद करू इच्छितो.
22 Oct 2012 - 8:28 am | प्रचेतस
कथा आवडली.
शेवटच्या भागापर्यंत कथा नक्की कुठे जात आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता पण प्रत्येक भागागणीक उत्सुकता वाढतच होती.
संवादांमधून कथा उलगडत नेण्याची हातोटी आवडली. शेवटचा समारोपाचा परिच्छेद तर सर्वोत्कृष्ट.
22 Oct 2012 - 8:29 am | स्पंदना
शेवटच्या परिच्छेदाच कराव तेव्हढ पारायण कमीच म्हणाव लागेल.
संपुर्ण मालिका वाचली, अन शेवटपर्यंत औस्तुक्य वाढत राहीलं.
22 Oct 2012 - 10:04 am | मी_आहे_ना
हेच म्हणतो..शेवटचा परिच्छेद म्हणजे लाजवाब! प्रदीर्घ कथेला अनुरूप उपमा देऊन केलेला शेवट आवडला.
22 Oct 2012 - 2:47 pm | अन्या दातार
__/\__
अफाट शेवट!
22 Oct 2012 - 4:43 pm | सूड
छान शेवट केलाय!!
22 Oct 2012 - 7:17 pm | अस्वस्थामा
मला तरी भाग थोडासा घाईत संपल्यासारखा वाटला पण शेवट मस्तच..
खासकरून या ओळी..
"आपण ज्याचं उत्तर आहोत; असा प्रश्न हुडकणा-या अमर्याद उत्तरांची कहाणी काही उत्तरी सुफळ संपुर्ण."
यावर फक्त आमचा दंडवत..!
22 Oct 2012 - 7:41 pm | पंतश्री
अगदी उत्तम शेवट झाला आहे.फारच छान
23 Oct 2012 - 2:37 am | अभ्या..
एकदम परफेक्ट धी एन्ड.
५० राव परफेक्ट.
23 Oct 2012 - 6:00 pm | पैसा
सगळी मालिका कुठे जातेय याचा अंदाज येत नव्हता शेवटपर्यंत. पण परीकथातले शेवट खर्या आयुष्यात नसतात. हा "फिफ्टी-फिफ्टी" वाला शेवट आवडला.
24 Oct 2012 - 2:31 am | मोदक
उपमा जबरा टिपल्यात...
पु लि शु.
24 Oct 2012 - 5:17 pm | माजगावकर
छान कथा! लेखनशैली आवडली... मला का कोणास ठाऊक, व.पुं च्या लिखाणाची आठवण झाली..
पु.लि.शु...
11 Jun 2016 - 6:00 pm | पियू परी
निकाळजे काकुंच्या दाराबाहेर जे भारीतले बूट दिसायचे त्यांचा काहीतरी संदर्भ असेल असे वाटले होते कथेत. कारण त्यानंतर भांडण / आरडाओरडा ऐकु आला इत्यादी काही उल्लेख आहेत. 'निकाळजे काकु काही इतर मार्गानेही पैसे कमवत असतील का' (कदाचित कांचनचा वापर करून?) अश्या टाईपचा विचार त्या उल्लेखांमुळे डोक्यातून सरकून गेला. आणि कांचनचाही पुढेमागे काही उल्लेख येईल असे वाटले होते.
शिवाय हर्षदच्या पीसीतल्या ब्ल्यु फिल्म्स बघून अनुजा रागावली असेल असे वाटले नंतरच्या काही वर्णनांमुळे.. म्हणजे हर्षद-अनुजाच्या प्रणयाची वर्णने नको होती पण ते आता एकमेकांसोबत खूप खूप खूश आहेत (एकमेकांना समजुन घेणारं कोणेतरी मिळाल्याने) हे दर्शवणारे उल्लेख फारसे आले नाहीत त्यामुळे त्यांचे नाते असे इतके कोरडे का राहिले असे वाटून गेले. दुसरे लग्न असले तरी लग्न झाल्यावर काही महिने नव्याची नवलाई नात्यात राहात असेल ना?
थोडी अधांतरीच संपली कथा.. असो.. जेवढी वाचली तेवढीही चांगली लिहिलीत.