आज फिर मरने का इरादा है..........

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
23 Sep 2012 - 1:02 pm

मागील दुवा........... आज तो जीने की तमन्ना है..... http://misalpav.com/node/22730

काल डायव्होर्स पेपर्स वर सह्या केल्या. माझा हात सह्या करताना थरथरेल असे वाटत होते. सह्या करताना मी मुद्दामच तुझी नजर टाळत होते.
न जाणो तुझे डोळे मला काही सांगतील आणि मी त्याच्या आधीन होईन. मला खरेतर माझीच भीती वाटत होती. सही करताना मी तुला पाहीले नाही हे एका अर्थाने बरेच झाले तुला मोकळे व्हायचे होते. तु झालास.
सह्या करून झाल्यावर कितीतरी वेळ हे स्वप्न आहे असेच मला वाटत होते.कोणीतरी हाक मारेल , गजर होईल आणि मला जाग येईल. मग मी या असल्या स्वप्नाबद्दल स्वतःलाच एखादी टपली मारेन आणि तुझासाठी चहा ठेवायला जाईन असेच वाटत होते. तू सुद्धा हे असलं स्वप्नं ऐकून मला खुळी आहेस झालं म्हणत गालावर हळूच टीचकी मारली असतीस.
पण तुला मान खाली घालून जड पायानी जाताना पाहीले आणि मी वास्तवात आले. माझ्या पायातलं त्राणच निघून गेलं. मी तेथेच खुर्चीवर बराच वेळ बसून राहीले.
वकिलाने पाणी आणून दिले. त्यानीच मला घरी सोडले.
डायव्होर्स ला मराठीत घटस्फोट का म्हणतात हे काल उमगले. डोक्यात इस्कोट होत होता.एका सहीच्या फरकाट्याए आयुष्यात बरेच बदल होतात असे कोणी सांगीतले असते तर मी विश्वास ठेवला नसता. मी आता ते अनुभवणार होते.
एक खोल श्वास घेतला.....वातावरणात मोकळेपणा ऐवजी जडसा पोकळपणाच जास्त होता. कदाचित हे माझे मत असेल.
पुढलं आयुष्य आता स्वतन्त्र घालवायचं होतं. या अशाच मोकळेपणाने. हं......
वीस वर्षांचे सहजीवन एका सहीने संपले.
आपलं लग्न ठरवून दाखवून केलेलं. मी देवभोळ्या कुटुंबात वाढलेली. वडीलाधार्याना मान देणारी. घर मैत्रीणी यांपलीकडे फारसं जग नसलेली. दाखवण्याच्या कार्यक्रमाअगोदर बाबांनी मला तुझे फोटो दाखवले होते. तु इंजीनीयर आहेस ते संगितले होते. पण दाखवण्याच्या कार्यक्रमात मी खूप घाबरले होते.तू कसा असशील कोण जाणे. तुझा स्वभाव कसा असेल कोण जाणे याची धास्ती होती. तेथे आपण कॉफी प्यायला गेलो. परक्या अनोळखी कोणाबरोबर मी प्रथमच हॉटेलमधे जात होते. तू जे मगवशील मी तेच मागवले. समोर आलेले भलेथोरले सँडविच कसे खायचे असते ते मला माहीत नव्हते. आजूबाजूला कोणीच तसले सँडविच खात नव्हते. तु सुद्धा खायला सुरवात करत नव्हतास. शेवटी मी हातात सँडविचचा एकेक तुकडा घेवून सुरवात केली. तू हसला नाहीस. एखाद्या समजूतदार वडीलधार्‍या माणसाने लहान मुलाशी बोलावे तसा तू मला वाटलास. बाबासुद्धा कधीकधी असेच वाटतात. का कोण जाणे तुझ्यासोबत एकदम सुरक्षीत.... आश्वासक वाटायला लागले. तुझ्या डोळ्यातले सॉफ्ट भाव मला आवडले. तू मला आवडून गेलास. यालाच क्लीक होणे म्हणतात असे तू नंतर मला सांगीतलेस.
माझ्या एका आत्याचं लग्न एकदम धुमधडाक्यात झालं होतं दिव्यादिव्यांच्या गाडीतून सजलेल्या आत्याची वरात निघाली होते आपलं लग्न असंच थाटामाटत करायचं हे मी तेंव्हाच म्हणजे इयत्ता दुसरीत ठरवून टाकले होते. हनीमून च्या वेळेस हे मी जेंव्हा तुला सांगितले तेंव्हा तू बराचे वेळ हसत होतास. डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसताना कोणालातरी मी प्रथमच पहात होते.
लग्न ठरल्यानंतर आपण जूहूला फिरायला गेलो होतो. तेंव्हा तू म्हणाला होतास " आयूष्यभर तुला फुलात ठेवेन असे म्हणत नाही मात्र तुला नेहमी आनंदी ठेवायचा प्रयत्न करेन इतके वचन मात्र देतो........." तुझे ते वाक्य मी आल्यानंतर आईला सुद्धा सांगीतले होते.
आईच्या डोळ्यात पाणी आले. म्हणाली पोरी तुला समजूतदार नवरा लाभलाय. हीरा लाभावा तसा लाभेल तुला.
त्यानंतर आपण एकदा गेटवेला गेलो होतो. तेथे तू माझा हात हातात घेतलास. छातीत इतक्या जोरात धडधडत होते की बहुतेक ते आजूबाजूला निश्चीत ऐकु गेल असेल. आपण गेटवेच्या कठड्यावर बराच वेळ हात हातात घेवून न बोलता बसून होतो. तुझा हात हातात घेतल्यावर जे फीलिंग आले होते त्याची आठवण परवपरवापर्यन्त ताजी होती. तो जादूचा स्पर्ष आठवला की आजही एकदम मोहोरून जाते. तुझ्या भाषेतच बोलायचे तर " मॅजीक ऑफ स्टॅटीक इलेक्ट्रीसिटी......"
घरी जायला उशीर झाला तर माझ्या ऐवजी तूच धास्तावला होतास.
आपलं लग्न झालं.तू म्हणाला होतास तसे साधेपणाने नाही तर मला हवं होतं तसं धुमधडाक्यात वाजतगाजत.
तुमच्या घरी आल्यावर मला कधी परक्या घरी आल्यासारखं वाटलंच नाही. आई तशा साध्याच अगदी माझ्या आईसारख्याच. आण्णा तर मला त्यांच्या गेल्या जन्मीची मुलगीच म्हणायचे.
लग्न झाल्यावर तुला नोकरी सोडून व्यवसाय करायचे सुचले.त्या निर्णयाबाबत मी साशंक होते पण तुला व्यवसाय करायचा होता. मी तुला साथ देणार होते.
तुझ्या माझ्या आवडीनिवडी अगदीच भिन्न होत्या. तुला कविता आवडायच्या वाचायला आवडायचे. मी फारसे वाचले नव्हते.
मला शाळेत नववीच्या धड्यात असलेली इंदीरासंतांची " नको नको रे पावसा असा धिंगाणा घालूस......" ही कविता तु मला पडत्या धिंगाणा घालणार्‍या पावसात किती छान अनुभवून दिली होतीस.त्या धिंगाणा घालणार्‍या पावसात एकदम मनमोकळे नाचायला लागावे इतका भन्नाट आवडला होतास तू तेंव्हा. एखादी गोष्ट थेट समजावून द्यायची तुझी स्टाईल काही भन्नाटच.
तू तसा फारसा बोलका /बडबड्या असा नव्हतास. पण मित्रांच्या घोळक्यात,एखाद्या कार्यक्रमात तु एकदम खुलायचास. कार्यक्रमात निवेदन करणे तुझा हातखंडा. त्या वेळेस मला तुझ्या कडे पहातच रहावेसे वाटायचे.
मुद्दाम होऊन तू मला कधी इंप्रेस करायचा प्रयत्न केला नाहीस.हीच गोष्ट मला खूप आवडायची. तू तसा अगदी साधा होतास मला हव्वा होता तस्सा.
स्वतःचा व्यवसाय सुरू केल्यावर तू त्यात व्यस्त झालास. माझ्याशी गप्पा मारायला वेळ मिळायचा नाही. व्यवसायात म्हणावे तसे यश मिळत नव्हते. तुझी चरफड मला समजत होती. शेवटी तू आपल्या साठीच करत होतास ना. अपयशाने खचून जाणे तुझ्या स्वभावात नव्हते. पण व्यवसायात यश येत नाही म्हणून आण्णा तुझ्यावर चिडायचे. बाहेरचे व्याप / व्यवसायात बस्तान बसवण्याची धडपड आणि त्यात भर म्हणजे आण्णांचे टोमणे मारून बोलणे... तू वैतागयचास. . त्यात तुझी चूक नव्हती आण्णांचीही नव्हती. शेवटी मी तुला काहीशा धास्तीनेच नवे काहीतरी शिक्षण घेण्याबद्दल सांगीतले.तू ते मनावर घेतलेस
नवे कोर्सेस केलेस. पण नोकरीही अशी सहज मिळत नव्हती. आण्णा त्यावरूनही बोलायचे. घरात आलास की भांडणाला सुरवात व्हायची. आण्णांवर तू राग काढू शकत नव्हतास. तो सगळा राग माझ्यावर काढायचास. तू हताश होऊ नयेस म्हणून मी तुझी समजूत घालयचे. होईल रे हेही दिवस जातील रे.तुझ्याबरोबरच मी हे स्वतःलाही समजावयाचे. तू हुशार होतास कष्टाळु होतास पण यश मिळत नव्हते. काय चुकत होते तेच कळत नव्हते. एकदा तू मला रात्री जेवल्यांनंतर बाहेर नेलेस. नाक्यावरच्या सायबर कॅफेत ईमेलवर आलेले कंपनीचे ऑफर लेटर दाखवलेस. चक्रात अडकलो होतो त्यातून एकदम सुटल्यासारखे वाटले. तेंव्हा आपल्या दोघांकडे मिळून उणेपुरे बावीस रुपये होते त्यात एक आईस्क्रीम आले आपण दोघात मिळुन खाल्ले. ते आपले सॅलिब्रेशन........ मनात घट्ट करून रहीलाय तो क्षण. कधीच पुसला जाणार नाही तो तुझ्या चेहेर्‍यावरचा आनंदाचा भाव माझ्या मनातून.
मला दिवस राहीले. लहानपणी आपली मनू हुबेहूब तुझ्यासारखी दिसायची. मला तर तुलाच खेळवल्यासारखे वाटायचे. तु अस्साच असशील दुडदुड धावत अस्साच दंगा करत असशील अस्सेच भरपूर रेशमी जावळ असेल .... मी हरखून जायचे. तिच्याशी खेळताना तुला विसरून जायचे.
नोकरीच्या निमित्ताने आपन मुम्बैला आलो. नव्या उमेदीने सांसार थाटला. नव्या घरात प्रवेश करायचा म्हणून तू मला दुकानात साडी बदलून शालू नेसायला लावलास. ताटात कुंकवाचे पाणी घेवून माझी कुंकवाची पावले घरभर उमटवायला लावलीस. कित्ती आनंदी होतास तेंव्हा. दुसरी "मनू" दिसत होतास तू मला.
नव्या जॉब साठी तुला प्रोजेक्ट जेथे असेल तेथे जावे लागत होते. सुरवातीचे प्रोजेक्ट मुम्बैतच असायचे. पण तुला जबाबदार्‍या घ्यायला आवडायचे. त्यासाठी बाहेरचे प्रोजेक्ट्स घ्यायला लागलास. तू बाहेर असलास तरी रोज फोनवर माझी , मनूची चौकशी करायचास. फोनवर चौकशी करणे वेगळे आणि प्रत्यक्ष असणे वेगळे.
सुरवातीला दोन तीन महीने त्या नंतर सहासहा महीने तु बाहेरच असायचास. मी मुम्बैत एकटीच असायचे. मनूला शाळेत नेणे आणणे तिचे हवे नको बघणे. घरातील कामे / बाहेरची कामे आता मीच करायचे. काय आणायचे काय नाही हे मीच बघायचे. तू सठीसामासी यायचास तीनचार दिवस रहायचास. असूनही नसल्यासारखाच असायचास. तु नसला की मला सुरवाती सुरवातीला घर खायला उठायचे. एकटीच असायचे. घरातील प्रत्येक गोष्टीशी तुझी एकेक आठवण निगडीत होती. तुला आवडणारी पुसतके तुझ्या कॅसेट्स, तुझे कपडे , तुझे घरात असताना सतत गुणगुणत असणे या सगळ्याची मला इतकी सवय होती की तुझ्या शिवाय मला अगदीच रिकामे वाटायचे. तू यायचास त्या दोनचार दिवसात दिवाळी वाटायची. घर खूप आनंदाने भरलेले वाटायचे. चिमणीच्या पिल्लाला घरट्यात मिळत असेल तशी ऊब मला मिळायची. तू अस्साच माझ्या शेजारी असावास असे वाटायचे. तू झोपुन गेल्यावरसुद्धा मी तुझ्या चेहेर्‍याकडे बघत बसायचे.
तू जाण्याच्या दिवशी मला खूप रडावेसे वाटायचे. पण तु नेहमी म्हणायचास " हॅपी फेसेस आर ब्यूटीफूल फेसेस" म्हणून मी रडू लपवायचे.
मी मनू एवढी असते ना तर तू जाउ नयेस म्हणून मी तुझ्या ब्यागाच लपवून ठेवल्या असत्या. एकदा तू मला सरप्राईझ म्हणून मित्राबरोबर पार्सल पाठवतो असे सांगून स्वतःच आला होतास. मला इतका आनंद झाला होता की शक्य असते तर त्या दिवशी मी तुला पळवून नेले असते आणि मोगर्याच्या फुला फुलांनी सजवून ठेवले असते बाहुलीसारखे. कुण्णाकुण्णाला दाखवले नसते..
कामानिमित्त तुझे घराबाहेर रहाणे वढतच गेले. तुझा वियोग मला बरेच काही शिकवत होता. एकट्या बाईने मुंबै सारख्या शहरात कसे वागावे , कोणाला किती अंतरावर ठेवावे ,लोकांशी कसे वागावे , स्वतन्त्रपणे निर्णय कसे घ्यावे , लोकांशी कसे बोलावे. असे बरेच काही.
आता मी पूर्वीसारखी बावरत नव्हते आत्मविश्वासाने सर्वत्र वावरत होते. तुला माझे नवे रुपडे भावत गेले. माझ्यातील आत्मविश्वास तुला मनापासून आवडायचा
तू कौतूक करायचास. घरात आता बहुतेक सगळेच मीच बघायए. तू फक्त तीनचार किंवा सहासात महीन्यातू एकदा पाहुणा म्हणून यायचास्. ते दोनचार दिवस आपण बहुतेकदा कुठेतरी बाहेरच असायचो. तुला घरचे जेवण मिळावे . तुझे आवडते भाकरी आणि कांड्याचे थालीपीठ खाता यावे म्हणून मी घरीच रहायचे ठरवायचे अन तू आपल्याला दोन चार दिवस पूर्ण रीलॅक्स मिळावे म्हणून बाहेरच रहायचा प्लॅन करायचास.
शेवटी एकदा मुम्बैतला प्रोजेक्ट मिळाला. आपण ते आई आण्णाना आणि आई बाबाना मुम्बैत बोलावून घेतले आणि सॅलेब्रेट केले. मस्त मजा आली
तुझा प्रोजेक्ट सुरु झाला. आणि घरात पुन्हा एकदा पसारा सुरु झाला. मनू ला स्वतःचे स्वतः आवरण्याची शिस्त मी लावली होती. तु मात्र ती शिस्त उधळून लावायचास. दुसरर्‍या दिवशी तीची परीक्षा असली तरी तिला नाटकाला घेवून जायचास. मी काही बोलले की म्हणायचास इतके दिवस मी इथे नसायचो आता आहे तर एन्जॉय करून घेवु देत ना मला पोरीसोबत.
तिची शिस्त पार भिरकावून द्यायचास. तीला काय दंगा करायला बाबा सोबत असल्यावर अणखी काय हवे. कपडे वगैरे तर तु आवरून ठेवायचे असतात हे विसरलाच होतास. कपडे बदलताना इस्त्रीच्या कपड्यांचा ढीग विस्कटून ठेवायचास बाथरुम मधे अंघोळ केल्या नंतर शॉर्ट्स चा "ळ" आकारातला ओला बोळा तस्सा ठेवून बाहेर यायचास. खाण्यासाठी घेतलेल्या बशा टेबलावर तश्शा ठेवून जायचास. आत्ता पर्यन्त जपलेल्या शिस्तीला तू सुरुंगच लावायचास.
मला नाही आवडायचे. मी तुला तसे सांगितले की तुला राग यायचा.
एकदा टेबलावरचा फ्लॉवर पॉट डायनिंग टेबलावर ठेवलास. फ्लॉवरपॉट डायनिंग टेबलावर ठेवू नये.इतके साधे शास्त्र सुद्धा विसरलास. मी तो फ्लॉवरपॉट पुन्हा टेबलावर ठेवला तर तु अचानक भडकलास. मला म्हणालास " मला शिस्त लावायला बघु नकोस्...कुक्कुलं बाळ नहिय्ये मी"
मी पण चिडले. इतक्या साध्या गोष्टीत तुला इतके चिडण्यासारखे काय होते तेच मला कळाले नाही....... नंतर दोन दिवस आपण एकमेकांशी बोललो नाही. तुझे वागणे मला एकदम अपरीचितासारखे वाटले. कुठेतरी आपल्यातील अंतर वाढत होते. ....कधीतरी नंतर तू मनूने मला ते आपल्या दोघातले पहिले भांडण होते अशी एक अपडेट दिली.....
त्या नंतर बारीकसारीक गोष्टीत तुला माझी शिस्त डाचायला लागली. बारीकसारीक बाबींवरून तू चिडायला लागलास. प्रोजेक्ट मधले ताण असतील म्हणून मी दुर्लक्ष्य
करत गेले. पण कुरबुरी वाढतच गेल्या. अलीकडच्या काही दिवसात तर तू आई आण्णांनासुद्धा फोन करेनासा झाला होतास.ऑफिसातल्या प्रोजेक्टच्या बद्दल माझ्याशी बोलेनासा झाला होतास. घरात सुद्धा काहीसा अलीप्त रहात होतास.
ऑफिसमधले अप्रेजल तुझ्या मनासारखे झाले नाही रेटींग कमी मिळाले याचे खापर तु माझ्यावर फोडलेस. जणू मी काही तुझा ऑफिसमधल्या कामात सारखे अडथळे आणत होते. माझं काय चुकत होतं ते मलाच कळत नव्हतं.पण हल्ली तू पूर्वीसारखा राहीला नव्हतास. वयोमानानुसार माणूस स्वभाव बदलत असतो. मी देखील शारीरीक बदलांतून जात होते. माझं मला कळत होतं.अचानकच चिडचिडी व्हायचे. नंतर जाणवायचे मी उगाचच चिडले. पण व्हायचे ते होऊन गेलेले असायचे. काही कामासाठी किंवा निरोपासाठी तुला फोन केला तर आपली त्या फोनमधे सुद्धा भांडणे व्हायची.
मला कंटाळा आला होता या सगळ्याचा. एकदा रागाच्या भरात असं सदानकदा भांडत बसण्यापेक्षा वेगळे झालेले बरे असे मी म्हणाले. तुला त्या वाक्याचा धक्का बसला असावा. काही बोलला नाहीस पण अचानक खूप हिरमुसला झालास. माझी चूक मला कळाली. तुझे माझ्यावर अतोनात प्रेम होते. माझ्याशिवाय वेगळे रहाण्याचा विचारही तु कधी करू शकला नसतास. पण मीच हे वाक्य बोलले होते. पुढचे चार दिवस तू अबोलपणे काढलीस. अन मी ही. एका पलंगावर अवघ्या सहा इंच अंतरावर झोपुनही सहा हजार मैलांच्या अंतरावर असावे एवढे अंतर आपल्यात पडले होते. अंथरुणात दोघेही टक्क जागे असूनही आपण एकमेकाना न बघितल्यासारखे करत होतो.
तू बहुतेक बराच विचार करत असावास. मी तुला कुठेतरी खोल आत डिवचले होते. तू जखमी झाला होतास. आता भांडायचे नाही असे खूप ठरवले तरीही काहीतरी झाले आणि आणि तूच तो मुद्दा पुन्हा उकरून काढलास. उत्तराला उत्तर द्यायचे म्हणून मी म्हणाले मीच अर्ज करते डायव्होर्सचा. अन मी खरोखरीच अर्ज केला. मला डायव्होर्स नको होता. पण मला तुझ्यासमोर नमतेही घ्यायचे नव्हते. का म्हणून मीच प्रत्येकवेळेस माघार घ्यायची.
मी अर्ज केला तू निर्वीकरपणे रीलक्टंटली मला डायव्होर्स दिलास. कागदावर सह्या करण्यापूर्वी तू माझ्याशी काही बोलशील असे वाटले होते. निदान थोडासा हसशील. तूच म्हणायचास ना "हॅपी फेसेस आर ब्यूटीफूल फेसेस" ......आय वॉन्टेड यू टू बी ब्यूटीफूल.
तू खंबीर होतास निदान बाहेरूनतरी. डोव्होर्स मिळाला. नको असलेलं प्रेझेंट मिळावं तसा.
मी शून्यात नजर लावून नक्की आपण काय जिंकलं काय गमावलं याचा हिशेब लावत बसलेय. मला तो हिशेब जुळायला नकोय. हे असले हिशेब न जुळलेलेच बरे असतात. सस्पेन्स अकाउंटच्या नावाखाली निदान पुढचे काही दिवसतरी पुन्हा नजरेसमोर रहातात.
मला अजूनही आशा आहे तू हायकोर्टात जाशील. तिथे डायव्होर्सचा निर्णय माघारी फिरवायला लावशील. तू तेथे केस जिंकावी असं मला वाटतय. मी हरावे असे मनापासून वाटतय.
खरं सांगु तू माझ्यावर बॉसिंग करावे मला डॉमिनेट करावे असे वाटतय्......... मला तू पुन्हा हवा आहेस.... " धिंगाणा घालणार्‍या पावसात" नको नकोरे पावसा असा धिंगाणा घालूस ..."ही कविता उत्साहात सांगणारा साधासा "तू" पुन्हा हवा आहे.....
मला आनंदी ठेवण्याचे प्रॉमिस करणारा.....
करशील ना रे पुन्हा अर्ज......... दे ना असलं एक प्रॉमिस.
सध्यातरी शून्यात नजर लावून बसलेय...... सगळ्या एन्ट्रीज सस्पेन्स अकाउंट्स मध्ये टाकत............

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

23 Sep 2012 - 1:11 pm | श्रावण मोडक

लेखन छानच.
माणसं एकमेकांकडं पाठ करून का बोलतात? बहुदा आत्मसन्मान नावाची एक वृथा गोष्ट त्यामागे असावी. मग नात्यांची लांबी निर्धारित होऊ लागते.

रामपुरी's picture

23 Sep 2012 - 6:52 pm | रामपुरी

अंमळ असहमत... "आत्मसन्मान" प्रत्येकवेळी वृथाच असतो का? नात्यांमध्ये कदाचित काही वेळा असूही शकेल पण त्याचे सामान्यीकरण नक्कीच करता येणार नाही.

पैसा's picture

23 Sep 2012 - 7:22 pm | पैसा

रामपुरींशी सहमत. आत्मसन्मान पेक्षा दुरभिमान असं हवं होतं.

गणपा's picture

23 Sep 2012 - 7:40 pm | गणपा

आत्मसंन्मान म्हणा दुराभिमान म्हणा वा अहं (मराठीत इगो) यांच्यामुळे तयार झालेली कम्युनिकेशन गॅप भोवली म्हणायची.

बापु देवकर's picture

23 Sep 2012 - 1:22 pm | बापु देवकर

त्याच्या मनात काय असेल हा प्रश्न पडलाय...

मन१'s picture

23 Sep 2012 - 1:23 pm | मन१

हाही भाग ओघवता, प्रबहवी झालाय.
happy ending च करायची असे न ठरवल्याने, जातेय तशी गाडी जाउ दिल्याने जे मांडायचे आहे,ते स्पष्ट, थेट उतरले आहे.

अन्या दातार's picture

23 Sep 2012 - 2:07 pm | अन्या दातार

सहमत आहे.

जाई.'s picture

23 Sep 2012 - 4:14 pm | जाई.

+१
सहमत

sagarpdy's picture

24 Sep 2012 - 11:24 am | sagarpdy

+१

श्री गावसेना प्रमुख's picture

23 Sep 2012 - 1:35 pm | श्री गावसेना प्रमुख

मन वढाय वढाय

हरिप्रिया_'s picture

23 Sep 2012 - 2:46 pm | हरिप्रिया_

:( डोळ्यात पाणी आणल..
खुप छान लिहील आहे.

जमल विजुभाऊ दुसरीबाजु लिहायला तुम्हाला. अभिनंदन.

पैसा's picture

23 Sep 2012 - 4:29 pm | पैसा

छान जमलंय. सगळंच चांगलं असताना असं का व्हावं आणि माणसं केवळ खोट्या अभिमानामुळे काय काय गमावून बसतात हे अगदी तप्तमुद्रेसारखं डोळ्यापुढे आलं. २ अर्धुकं झाली. पण नाण्याच्या राहिलेल्या तिसर्‍या बाजूबद्दल कधी लिहिताय?

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 12:58 am | विजुभाऊ

या इथे लिहिलय तिसर्‍या बाजूबद्दल

मनुची बाजु लिहायला घ्या आता, या सगळ्यात ती जास्त करपलेली आहे.

विजुभाऊ's picture

24 Sep 2012 - 10:37 am | विजुभाऊ

हो .

बॅटमॅन's picture

23 Sep 2012 - 8:21 pm | बॅटमॅन

अप्रतिम _/\_

संजय क्षीरसागर's picture

24 Sep 2012 - 10:40 am | संजय क्षीरसागर

तुमच्या या http://www.misalpav.com/comment/reply/22396/417222 प्रतिसादामुळे कथा कशी संपतेय याची उत्सुकता आहे

स्पा's picture

24 Sep 2012 - 10:53 am | स्पा

विजाभाय...
तुस्सी ग्रेट हो ... जबरदस्त आवडलंय

मोहनराव's picture

24 Sep 2012 - 1:32 pm | मोहनराव

अगदी मस्त उतरली आहे दुसरी बाजु. _/\_

नाना चेंगट's picture

24 Sep 2012 - 4:57 pm | नाना चेंगट

मस्त लेखन.

कवितानागेश's picture

24 Sep 2012 - 6:42 pm | कवितानागेश

हम्म्म....
विचित्र मनस्थिती!
च्यायला, अशी शिस्तीच्या कारणावरुन इतकी टोकाची भांडणे झाली तर एकही जोडपं टिकणार नाही.

मराठी_माणूस's picture

24 Sep 2012 - 9:37 pm | मराठी_माणूस

माझी चूक मला कळाली...............................उत्तराला उत्तर द्यायचे म्हणून मी म्हणाले मीच अर्ज करते डायव्होर्सचा. अन मी खरोखरीच अर्ज प्रत्यअक्षा

चुक कळुन सुध्दा प्रत्यक्षात खरेच अर्ज करणे ते सुध्दा स्त्री कडुन हे थोडे पटले नाही

विजुभाऊ's picture

25 Sep 2012 - 8:45 pm | विजुभाऊ

माझी चूक मला कळाली...............................

त्या दोघाना त्यांची चूक होतेय हे परीणाम आल्यावर जाणवतेय. इगो आड येतो.अन काही निर्णय घेताना ते प्रत्यक्षात येणार नाहीत अशी एक आशा असते त्या अंदाजाने निर्णय घेतले जातात.
मी अशा काही " तो " ती आणि " मनु" ना वैयक्तीक ओळखतो.
समुपदेशन करताना असे काही लोक सामोरे येतात

संजय क्षीरसागर's picture

25 Sep 2012 - 11:56 pm | संजय क्षीरसागर

>मला अजूनही आशा आहे तू हायकोर्टात जाशील. तिथे डायव्होर्सचा निर्णय माघारी फिरवायला लावशील. तू तेथे केस जिंकावी असं मला वाटतय. मी हरावे असे मनापासून वाटतय.

एकदा संमतीनं डिवोर्स झाला की हायकोर्टात अर्ज वगैरे करता येत नाही. दोघं पूर्णपणे स्वतंत्र होतात. रीतसर पुन्हा लग्न करावं लागतं

पिवळा डांबिस's picture

26 Sep 2012 - 2:01 am | पिवळा डांबिस

तुम्ही लिहिलं तर सुरेखच आहे...
पण आता कसं, वर्तुळ पूर्ण झालं!

अती दानात् बली बद्धः, अती मानात् सुयोधनः |
रावणः अती मदात् न्रष्यु, अती सर्वत्र वर्जयेत् ||

सुमीत भातखंडे's picture

2 Apr 2013 - 11:56 am | सुमीत भातखंडे

.