आज तो जीने की तमन्ना है...........

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
13 Sep 2012 - 4:02 pm

काल डायव्होर्सपेपर वर सह्या केल्या.
एकाच वेळेस खूप मोकळं आणि खूप जड असं काहीतरी वाटलं.
आनंदापेक्षाही गिल्टी जास्त वाटलं.
वाक्यानंतर पूर्णविराम द्यावा आणि वाक्य संपावं तसा आपला वीस वर्षांचा संसार सहजीवन एका सहीने संपले .
रजीस्ट्रारच्या ऑफिसात सह्या करून परत जाताना मी सही केलेल्या पेनचे टोक मोडून टाकले. त्या पेनने काही आणखी पांढर्‍यावर काळे नको व्हायला.
कुठे जायची इच्छा नव्हती. पण गेलो. ऑफिसात क्युबिकलमधे तसाच बसलो. फेसबूक,सेमटाईम सगळीकडे सामसूम होती. कोणी बोलावले नाही. संध्याकाळी घरी जायचीसुद्धा इच्छा नव्हती. बार कडे पाय वळले दोन क्षण तेथे थांबून तसाच परत फिरलो. घराजवळच्या बागेत बसलो. एक प्रकारची सुन्नता होती. बहुतेक मीच सुन्न झालो होतो. खरेतर घटस्फोट दोघानाही हवा होता.माझी ही प्रतीक्रिया मलाच अनभिज्ञ होती. एकदा भांडताना मी म्हणालो होतो तसा खरेतर मी जोरदार पार्टीच्या मूड्मधे असायला हवा होतो.
आपला वीस वर्षांचा सहवास.आपले लग्न पाहून दाखवून झालेले अ‍ॅरेन्ज मॅरेज. लग्ना नंतर दोन्ही घरांचे सूर मस्त जुळले. दाखवण्याच्या कार्यक्रमात तू मला आवडली होतीस असे मी म्हणणार नाही. पण नावडली होतीस असेही नव्हते. पण कोणाशीतरी लग्न करायचेच आहे या भावनेने मी होकार दिला असेही नव्हते.
आपण त्यावेळेस भांडारकर रोडवरच्या हॉटेलात कॉफीसाठी गेलो. तेथे क्लबसँडविच खाताना तू बिंधास्त सँडविचचा एकेक दोन्ही हातात धरून मजेत खात होतीस. तुझे ते नि:संकोच मोकळे वागणे मला आवडले. खरे बोलायचे तर एकदम क्लीक झाले.
त्या नंतर फिरायला जुहू वर गेलो गेटवर गेलो तेथे तुझी वागणे एकदम साधे नि:संकोच होते.थोडेसे मॅच्युअर थोडेसे अवखळ.
मी बोलका ,तू थोडिशी अबोल , मला वाचनाची आवड मित्रांची आवड तुला भरतकाम मेहेंदी ची आवड
मी नाटकाबद्दल बोलायचो. तू फुलझाडांबद्दल. तू देवभोळी.. मी नास्तीक....आपल्या आवडीनिवडी कुठेच जुळत नव्हत्या. मला त्याबद्दल काहीच आक्षेप नव्हता. लग्ना अगोदर मी एक छोटासा ट्रेक केला होता त्याबद्दल भरभरून लिहीले होते. उत्तरादाखल तुझे पत्र आले त्यात तू माझ्या घरातल्या सर्वांची चौकशी केली होतीस.
पत्रात शेवटी काय लिहावे ते ठरवता आले नसेल बहुते म्हणुन फुलापानांची नक्षी चितारली होतीस.परवापरवा पर्यन्त ते पत्र मी जपून ठेवले होते.
आपले लग्न झाले. मला लग्न साधेसे करायचे होते तुला नातेवाइकांच्या गराड्यात थाटामाटाने वाजतगाजत करायचे होते. धुमधडाक्यात सनईचौघडे वाजले.
फोटोचे अल्बम व्हिडीऑ कॅसेट कितीदातरी पाहिली.तू पूजा करतानाचे देवघरातल्या निरांजनाच्या प्रकाशातले तुझे ते सोनेरी स्वप्नील भाव , धाकटा दीर तुझे पाय धुताना तुझ्या चेहेर्‍यावरचे बावरलेले भाव....लग्नात हार घालायच्या वेळचे तुझे ते कावरेबावरे भाव. रीसेप्शन्च्यावेळच्या वेळेस. मी अल्बम मधे पुन्हापुन्हा पहायचो. तू प्रत्येकवेळेस अधीकच आवडायला लागलीस.
एक गोष्ट जाणवली नव्हती ती आता जाणवतेय. प्रत्येक फोटोत माझ्यापेक्षा तूच जास्त महत्वाची होतीस.
लग्नानंतर लगेचच मी नोकरी सोडली आनि व्यवसाय सुरू केला. तू मला एका शब्दाने विचारले नाहीस. उलट आश्वासक नजरेने मी योग्यच केले अशी पावती दिलीस,
रडखडत चाललेल्या व्यवसायातही तू साथ देत होतीस. जे मिळेस त्यात समाधानी असायचीस. तुझी तक्रार नसायची. "होईल रे... हळूहळू होईल" तू म्हणायचीस.
तुला जेंव्हा पहिल्यांदा दिवस गेले तेंव्हा तू हळूच मला बिलगलीस आणि कानात मोठ्याने सांगितलेस "साला तू तो बाप बन गया......" आणि त्या नंतर मीच लाजलो होतो.
मुलगी झाली ती अगदी हुबेहूब माझ्यासारखी दिसत होती याचा तुलाच जास्त आनंद झाला होता.
तीला खेळवताना . मुलीला घास भरवताना, तीला ए बी सी डी शिकवताना प्रत्येकवेळेस तू मला नव्याने गवसत गेलीस.
व्यवसाय करण्याचा निर्णय चुकला किंवा मी चुकत गेलो. म्हणावे तसे यश मिळत नव्हते ..यश कशाला अपयशच म्हणना.........
माझ्या आर्थीक परीस्थितीबद्दल तुझी तक्रार नव्हती. मी कधी कुरकुर केली तर तू म्हणायचीस "आपल्याला जे मिळतय ते सुद्धा बर्‍याच जणांसाठी स्वप्न असते......." व्यवसायातील अपयशाने मी वैतागायचो. राग तुझ्यावर काढायचो.........तुला त्रास होत असेल माझ्या वागण्याचा............ एकदा मी तुला विचारले होते..तू म्हणालीस " आपल्याला जेंव्हा जेंव्हा खूप त्रास होतो तेंव्हा समजावे की देव आपली परीक्षा घेतोय...." तुझे उत्तर मला बरेच काही शिकवून गेले
व्यसायात यश मिलत नाही म्हणुन तू मला नवे शिक्षण घेण्याचा आग्रह केलास. मी काही कोर्सेस केले. बरेच दिवस नोकरी मिळाली नाही. कधी बोलली नाहीस पण तुझ्या चेहेर्‍यावर उदासी जाणवायची .ज्या दिवशी नोकरी मिळाली. त्या दिवशी नाक्यावरच्या सायबरकॅफेमधे तुला नोकरीचे ऑफरलेटर दाखवले. तुझा खुललेला चेहेरा......आपण एक आईस्क्रीम घेतले दोघानी मिळून खाल्ले. ते आपले सॅलेब्रेशन.
नोकरीसाठी मी बरेच दिवस घराबाहेरच असायचो. आपले बोलणे फोनवर व्हायचे. कधीकधी दोन दोन महीने कधी महिनाभर बाहेरच असायचो. मी येतोय म्हणायचा अवकाश.तू वाट बघायचीस. कधी येण्याची तारीख बदलली म्हणालो की नाराज व्हायचीस.
एकदा असाच तुला सरप्राईज म्हणून मी तुला दिल्लीहून मित्रासोबत एक पार्सल पाठवतोय एअरपोर्टवर घ्यायला जा म्हणुन फोन केला. आणि मी स्वतःच आलो. तू माझ्या मित्राला शोधत होतीस आनि मी समोर दिसलो...... जत्रेत चुकलेल्या लहान मुलाला आईवडील दिसावेत तितका तुला हर्ष झाला होता. कितीतरी वेळ तू हसत होतीस आणि शेवटी तर भोवतालच्या गर्दीची पर्वा न करता तू मला घट्ट मिठी मारलीस. आणो रडायला लागलीस............वेडी.
नोकरीच्या निमित्ताने मला वारंवार घराबाहेर रहावे लागत होते. आता बहुतेक तुला एकटे रहायची सवय लागली असावी. तुझा आग्रह म्हणुन मी मुद्दाम स्थिर / मुम्बैत रहता येईल असा प्रोजेक्ट घेतला. असा प्रोजेक्ट मिळाला म्हणून तू किती आनंदली होतीस. माझ्या आणि तुझ्या आईवडिलाना मुद्दाम आपल्याकडे बोलावून घेतलेस. ते दोनतीन आठवडे आपल्या घरात दिवाळी असावी असा जल्लोश होता.
तुला माझ्या नसण्याची सवय झाली होती. प्रत्येक निर्णय स्वतन्त्रपणे घ्यायची सवय झाली होती.
माझेसुद्धा निर्णय तूच घ्यावे असा तुझा आग्रह असायचा. घरातली प्रत्येक वस्तु तुझ्या निर्णयाने आलेली होती. पैपाहुणे तुझ्या आग्रहाने यायचे. सुरवातीचा बुजरेपणा जावून तुझ्यात एका नवा आत्मविश्वास आलेला पाहून मला खूप बरे वाटायचे . घरात बहुतेक निर्णय तूच घ्यायचीस.कुठे काय ठेवावे कुठे काय ठेवू नये इतकेच काय माझ्य टेबलावर कुठे काय असावे हे देखील तूच पहायचीस.
एव्हरी थिंग वॉज सो मच इन प्लेस........... दॅट यू वॉन्टेड मी ऑल्सो टो स्टे इन प्लेस.......... शोभेच्या बाहुल्यासारखा.
मी कोणाशी काय बोलावे. मी कुठे काय खरेदी करावे. तुझ्या कोणत्या नातेवाईकाना काय म्हणावे .काय वाचावे.......कोणते कपडे घ्यावे हे तूच ठरवायचीस.
आपलं एकदा भांडण झालं टेबलावरचं फ्लॉवरपॉट कुठे ठेवावा यावरून.........कधी जाणवलं नव्हतं पण ते आपल्या सहजीवनातलं पहील भांडण होतं..... आतापर्यन्त मी जे म्हणायचो त्याला तुझी मान्यता असायची. मतभेदच नसायचे....... आता ते छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा व्हायचे. दहावी नंतर मुलीला कोणत्या साईडला घालावे या वरून तू बरेच मुद्दे मांडलेस. तीने आर्ट्स घ्यावे ही माझी इच्छा तर सायन्स घ्यावे ही तुझी. प्रत्येक मतभेदाचा शेवट तुझ्या वाक्यानेच व्हावा हा तुझा आग्रह. वादविवाद नकोत म्हणून मी बर्‍याच निर्णय प्रक्रीयेतून स्वेच्छानिवृती घेतली.
ते सुद्धा तुला आवडले नाही. तुला आता बहुतेक वादविवादाची आवड निर्माण झाली असावी. ........... मी एकदा हे तुला विचारलेसुद्धा.तु म्हणालीस त्यात काय मोठेसे इतकी वर्ष एकटीनेच काढलीत ना.......... आता थोडे जास्त बोलले तर बिघडले काय.
वया परत्वे असेल किंवा कसे......... पण तुझा स्वभाव आता खूप बदलला होता. पूर्वीचा शांतपणाजावू त्याजागी चिडचिडेपणा आला होता. मी हल्ली तुझ्याशी बोलत नाही / भांडण लवकर संपवतो . बरेच दिवसात आपन बाहेर जेवायला गेलो नाही / बाहेर हॉटेलात कशाला पैसे खर्च करायचे त्यापेक्षा घरातच जेवू ....... मी माझ्या आईला आपल्या वादविवादाबद्दल फोन केला / फोन केला नाही. मी मुद्दा कोणत्याही पद्धतीने मांडला तरी तुझ्याकडे वावविवादासाठी दुसरी बाजू तयार असायची.
सततच्या भांडणांमुळे माझ्या कामावर परीणाम व्हायला लागला. ऑफिसात मी फार रीलक्टंट वागू लागलो. परीणाम माझ्या नोकरीतल्या रेटींगवर झाला. मी तसे तुला सुचवलेसुद्दा........ ते तुला पटले नाही. भांडणे चालूच राहिली. दिवसाला किमान चार मुद्द्यांवरून.......... मोबाईल वरूनसुद्धा.
सततच्या भांडणाला कंटाळून असह्य झाले तेंव्हा मी आपण वेगळे राहू म्हणालो.ते सुद्धा तुला मान्य नव्हते. तुझे म्हणणे" लोक काय म्हणतील. मुलीचे शिक्षण व्हायचय लग्न व्हायचय".
मी भांडणे बंद केले त्याचाही तुला राग यायचा.. मी शेळपटासारखा गप्प का बसतो म्हणून भांडायचीस.
हे सगळे सहन करणे माझ्या शक्तीच्या पलीकडले होते. मी संत नाही. शेवटी मी तुझीच युक्ती वापरली तू भांडायला लागलीस की कानात बोळे घालून बसू लागलो. तू वैतागलीस. वेगळे व्हायला तयार झालीस.
कोर्टात डायव्होर्स फाईल केला. मॅरेज काउन्सीलरला आमच्यात कोणतेच मतभेद नाहीत फक्त घटस्फोट हवाय असा अर्ज केला.
सह्या करण्यापूर्वी मला तुझ्या बरोबर एक आईस्क्रीम खायचं होतं......... ते जुनं सॅलेब्रेशन आठवून.
एकदाच्या सह्या झाल्या. तू मला मी तुला परके झालो.
घटस्फोटाची केस तू दाखल केलीस. जिंकलीस.मला ना जिंकण्याचा आनंद ना हरण्याचा खेद.
एक शून्यता घेवून बसलोय हातात.
पण खरं सांगू शून्यावर कितीही शून्य मांडली तरी त्याची किम्मत शून्यच रहाते.
कोर्टात त्यांचा निर्णय बदलावा यासाठी मी अर्ज करणार नाहिय्ये. मला तुला जिंकण्याचा पुन्हा एकही चान्स द्यायचा नाहिय्ये. तेवढे तरी मी करू शकतो. करणार आहे.
बाकी विचार उद्या करेन म्हणतो .......... मनाने जिवंत असलो तर.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

बॅटमॅन's picture

13 Sep 2012 - 4:12 pm | बॅटमॅन

............................

अन्या दातार's picture

13 Sep 2012 - 4:16 pm | अन्या दातार

स्सही!

फक्त ते एक्कावनचे...............

Dhananjay Borgaonkar's picture

13 Sep 2012 - 4:19 pm | Dhananjay Borgaonkar

सुन्न.

अप्रतिम!!
भावस्पर्शी लेखन..

गणपा's picture

13 Sep 2012 - 4:22 pm | गणपा

:~

मन१'s picture

13 Sep 2012 - 4:23 pm | मन१

काल्पनिक असावे अशी आशा.

हरिप्रिया_'s picture

13 Sep 2012 - 4:29 pm | हरिप्रिया_

:(
निशब्द

आनंद भातखंडे's picture

13 Sep 2012 - 5:08 pm | आनंद भातखंडे

आज असे कितीतरी सहजीवनाचे नातेसंबंध या एका उंबरठ्यावर येऊन थांबले आहेत. ज्यांनी तो पार केला त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. एकत्र राहून दुःखी होण्यापेक्षा वेगळे झालेले उत्तम.

यकु's picture

13 Sep 2012 - 5:26 pm | यकु

.

इरसाल's picture

13 Sep 2012 - 6:04 pm | इरसाल

.असं कुठे नकोच.

चौकटराजा's picture

13 Sep 2012 - 6:27 pm | चौकटराजा

लग्नाच्या २५ व्या वाढ दिवशी तो तिला घटस्फोटाचा प्रस्ताव ठेवतो म्हण्तो " आपल्या मुलांखातर मी कधी
असा विचार केला नाही, आता ती मोठी झालीयेत .समज आलीय त्याना. मग असं एकमेकाना फसवत किती दिवस समाधानाचं नाटक करायचं? अशी काहीशी कथा ( बहुदा शंन्ना ची ) वाचलेली आठवते .तसाच
काहीसा विषय येथे. आपण लिहिलेय मस्त. लेट अस होप इट्स फिक्शन ! पण जरी फिक्शन नसले तरी
मी " त्या" चे व " तिचे" अभिनंदनच करेन ! सुटले दोघेही !

नथिंग कॅन से , फ्रेन्ड्स नो ऑल !! :(

घटस्फोटाची केस तू दाखल केलीस. जिंकलीस.मला ना जिंकण्याचा आनंद ना हरण्याचा खेद.
एक शून्यता घेवून बसलोय हातात. >>>

_/\_

नाना चेंगट's picture

13 Sep 2012 - 6:59 pm | नाना चेंगट

!

प्रचेतस's picture

13 Sep 2012 - 8:14 pm | प्रचेतस

:(

कवितानागेश's picture

13 Sep 2012 - 8:20 pm | कवितानागेश

रीयलिस्टिक.
अश्या प्रकारच्या काही केसेस बघितल्या आहेत.
बर्‍याच वेळेस संसार, नवरा बायको यांचे परस्पर संबंध या बद्दल अनेकांच्या घट्ट कल्पना असतात.
त्याला धक्का लागायला लागला की राग साहजिकच एकमेकांवरच निघतो.
अश्या वेळेस अंतर्मुख होउन विचार केला जात नाही. नेहमीच दुसर्‍यकडे बोट असते.
पण आजूबाजूच्या परिस्थितीत आणि स्वतः माणसांत नेहमीच बदल होत असतात. ते बदल जे सहज स्विकारतील, ती जोडपी एकत्र म्हातारे व्हायचे सुख अनुभवू शकतात.

मनातलं लिहिल्याबद्दल धन्यवाद.

आदिजोशी's picture

13 Sep 2012 - 8:33 pm | आदिजोशी

कुठे होऊ नये असं

प्यारे१'s picture

13 Sep 2012 - 8:59 pm | प्यारे१

हम्म्म्म..........!

आपलं माणूस म्हणून गृहित धरायची एकदा सवय लागली की, त्या व्यक्तीचं वेगळं अस्तित्व मानायचं अवघड होतं नि त्यातून हे असलं काही होतं. पुरुषांची मानसिकता ह्यात जास्त असावी....

हे फक्त लिखाणच आहे असं गॄहित धरतोय. :)

मराठी_माणूस's picture

13 Sep 2012 - 9:05 pm | मराठी_माणूस

नोकरीच्या निमित्ताने मला वारंवार घराबाहेर रहावे लागत होते. आता बहुतेक तुला एकटे रहायची सवय लागली असावी

हे कारण असेल का , सहजीवन परिपक्व न होण्याचे ?

मी_आहे_ना's picture

14 Sep 2012 - 10:23 am | मी_आहे_ना

अगदी हाच विचार करत होतो...

जाई.'s picture

13 Sep 2012 - 9:27 pm | जाई.

व पुं ची आठवण झाली

अर्धवटराव's picture

13 Sep 2012 - 9:32 pm | अर्धवटराव

साहेबांची बाजु मांडुन झाली... बाईसाहेब काय म्हणताहेत? त्यांच्या रागाचे, भांडणाचे कारण निव्वळ हार्मोनल चेंजेस असावे हे पटत नाहि.

अर्धवटराव

मदनबाण's picture

13 Sep 2012 - 10:13 pm | मदनबाण

वाचुन फार वाईट वाटले ! :(
काही काळा पूर्वी दासबोधाच्या काही ओळी वाचनात आल्या होत्या त्या आठवल्याने, इथे द्याव्याश्या वाटतात...

स्त्री अत्यंत प्रीतीची | तेही सुखाच लागली ||२६||
विदेसीं बहु दगदला | विश्रांती घ्यावया आला |
स्वासहि नाहीं टाकिला | तों जाणें वोढवलें ||२७||
पुढें अपेक्षा जोसियाची | केली विवंचना मुहूर्ताची |
वृत्ति गुंतली तयाची | जातां प्रशस्त न वटे ||२८||
माया मात्रा सिद्ध केली | कांहीं सामग्री बांधली |
लेंकुरें दृष्टीस पाहिलीं | मार्गस्त जाला ||२९||
स्त्रियेस अवलोकिलें | वियोगें दुःख बहुत वाटलें |
प्रारब्धसूत्र तुकलें | रुणानबंधाचें ||३०||
कंठ सद्गदित जाला | न संवरेच गहिवरला |
लेंकुरा आणि पित्याला | तडातोडी जाली ||३१||
जरी रुणानबंध असेल | तरी मागुती भेटी होईल |
नाहीं तरी संगती पुरेल | येचि भेटीनें तुमची ||३२||
ऐसे बोलोन स्वार होये | मागुता फीरफिरों पाहे |
वियोगदुःख न साहे | परंतु कांहीं न चले ||३३||
आपुला गांव राहिला मागें | चित्त भ्रमलें संसार
उद्वेगें | दुःखवला प्रपंचसंगें | अभिमानास्तव ||३४||
संदर्भ :-- श्रीमद् दासबोध (समास चवथा : स्वगुणपरीक्षा)

बॅटमॅन's picture

14 Sep 2012 - 11:12 am | बॅटमॅन

बैलाचा डोळाच फोडलाय समर्थांनी!!! _/\_

शुन्यातुन फिरुन आल्यासारखं वाटलं :( ,दुसरी बाजु मांडण्याची इच्छा आहे .

मन१'s picture

16 Sep 2012 - 11:10 am | मन१

शुन्यातुन फिरुन आल्यासारखं वाटलं
अचूक शब्दांत मांडलत.

मांडा मांडा, दुसरी बाजु, बरं वाटेल वाचुन.

जे जुळलंच नाही, ते तुटल्याचं दु:ख तरी काय होणार?
कोणता क्षण परत फिरवता आला असता म्हणजे नातं वाचलं असतं, याचं उत्तर कितीतरी विस्कोट टाळू शकेल.

सुन्न.

स्पंदना's picture

14 Sep 2012 - 1:38 pm | स्पंदना

विजुभाउ आवडल नाही म्हणता येणार पण पोचल म्हणेन.

पैसा's picture

16 Sep 2012 - 10:50 am | पैसा

विजुभाऊंनी एका नात्याच्या विच्छेदाचं विश्लेषण इतकं सुरेख केलंय, की सुरुवातीला मी पण शॉकमधे गेले होते, केप्लर बी२२ वर राहणारे विजुभाऊ असं का लिहितायत?

मग समजलं, की हे इतर कोणाबद्दल आहे. इतकं जिवंत लिहिलंय की कोणालाही वाटेल की हा विजुभाऊंचाच अनुभव आहे की काय!! मस्तच!

असं कोणाचंही होऊ नये पण प्रत्यक्षात होतं. एखादं नातं रुक्ष कधी व्हायला लागलं आणि का हे जर वेळीच लक्षात आलं तर वाचवता येतं, पण बरेचदा आजूबाजूचे लोक पण आगीत तेल ओतायचं काम करतात. मात्र ज्यात काही अर्थ राहिलेला नाही असं लोढणं कोणी का बाळगावं हा ही प्रश्न आहेच.

पिवळा डांबिस's picture

16 Sep 2012 - 11:19 am | पिवळा डांबिस

आवडलं!

आता विजुभाऊ, दुसरी बाजू घेऊन हाच लेख पुन्हा लिहा....
मला वाटतं ते लिखाणही तितकंच मनस्पर्शी होईल....

--------------------------------------------------------------------------
आजकाल मी होमवर्क देणारा मास्तर झालोय!!!
:)

गणपा's picture

21 Sep 2012 - 1:45 pm | गणपा

+१
काकाना अनुमोदन.
विजुभाऊ लिहाच तुम्ही.

विजुभाऊ's picture

12 Aug 2013 - 1:18 am | विजुभाऊ

तिसरी बाजू http://misalpav.com/node/25357

श्रावण मोडक's picture

21 Sep 2012 - 2:24 pm | श्रावण मोडक

सहमत!

चित्रगुप्त's picture

16 Sep 2012 - 8:10 pm | चित्रगुप्त

मरून रोब, किंवा गेलाबाजार पट्ट्या-पट्ट्याचा पायजमा नव्हता का?

मित्रानो हा लेख लिहिल्यानंतर मला काहीजणानी व्यनी ने किंवा फोनवर माझी आस्थेने चौकशी केली.
त्या आपुलकीबद्दल धन्यवाद म्हणणे योग्य वाटत नाही परंतु तरीही........... _/\_

मोहनराव's picture

21 Sep 2012 - 1:45 pm | मोहनराव

वाचुन वाईट वाटले. :(

स्वप्निल घायाळ's picture

21 Sep 2012 - 2:49 pm | स्वप्निल घायाळ

वाचुन सुन्न झालो...

विजुभाऊ's picture

8 Dec 2012 - 10:19 pm | विजुभाऊ

?
लेखन क दिसत नहिय्ये?

निरन्जन वहालेकर's picture

8 Dec 2012 - 10:54 pm | निरन्जन वहालेकर

आपला हा लेख पुर्विहि कुठेतरी वाचल्याच आठवते. टचिन्ग ! ! मन खिन्न करणारा ! ! !

सुमीत भातखंडे's picture

2 Apr 2013 - 11:54 am | सुमीत भातखंडे

छान, पण असं नको व्हायला