पूर्वरंग-हिमरंग (पुस्तक परिचय) (भाग-१)
डॉ. प्रतिभा आठवले या अहमदाबादला रहाणार्या दंतवैद्य. त्या तेथे गेली एकतीस वर्षे व्यवसाय करत आहेत. या काळात त्यांनी दोन छंद जोपासले. पहिला मागास भागात मोफत दंतवैद्यकीय सेवा देणारी शिबिरे चालविणे व दुसरा भारतात, विशेषतः हिमालयात भटकंती करणे. पहिल्याकरिता त्यांनी पूर्वांचल हा प्रदेश निवडला. विवेकानंद केंद्र, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व सेवाभारती या संस्था तेथे कार्यरत आहेत. तेथील दुर्गम, अविकसित व अतिरेकींच्या हिंसाचाराच्या छायेत काम करणार्या आश्रमांत-शाळांत त्यांनी ही शिबिरे घेतली. मदतीला त्या त्या शाळेतील मुले घेऊन. केवळ समाजाचे देणे लागतो या कर्तव्य भावनेतून नव्हे तर मनाची आंतरिक ओढ म्हणून. प्रतिभाताई भारतात भरपूर हिंडल्या पण खरी ओढ लागली ती हिमालयाची. हिमालयात मनःशांती लाभते व आपण काय करावयास पाहिजे याचीही ओळख पटते. रसिक कवीमनाला चित्रकारासारखी दृष्टी लाभली की तो आपल्यासमोर काय उभे करू शकतो ते आपण अरुणा ढेरे यांच्या बदामीवरच्या लेखात पाहिले होते. तसेच काहीसे इथेही घडले. हे वाचनीय पुस्तक घरात आल्यावर तीन दिवसात आमच्या घरातील तिघांनी ते वाचून संपवले होते. आता इथे मी काहीशी झलकच दाखवू शकेन.
पुस्तकाचा पहिला भाग : पूर्वरंग, पूर्वांचलावरचा म्हणून व पहिला म्हणूनही. दुसरा भाग : हिमरंग, हिमालयातील भटकंतीवरचा म्हणून.
पूर्वरंग:
कैलास-मानसच्या यात्रेला जातांना प्रतिभाताईंनी जवळ थंडी-खोकल्या सारख्या किरकोळ आजारावरची भरपूर औषधे जवळ ठेवली होती. कारण दंतवैद्य असल्यातरी मागास भागातील लोकांना त्या एक "डागदरच" होत्या व आपल्या रोगावर त्यांनी उपचार करावेत अशी रास्त अपेक्षा त्या लोकांची होती. ही सेवा आपण करू शकतो हे जाणवल्यावर त्यांनी दंतोपचाराबरोबर हीही सेवा पुरवावयास सुरवात केली. आता कुठे काम करावयाचे हे ठरवितांना विवेकानंद केंद्राचे श्री. सतिशभाई व त्यांची मुलाखात झाली. त्यांनी प्रतिभाताईंना पूर्वांचलात काम सुरू करण्याची सूचना केली. शिबिर घेतांना काही मूलभूत सुविधा लागतातच. त्यांची पूर्तता केंद्राने करावी व मदतीला तेथील शाळेतील मुलेच घ्यावित असे ठरले. पुढचे आता लेखिकेच्या शब्दांतच पाहू.. " शिबिराच्या वेळेस डोक्टर तर मी एकटीच असते. पण मदतीला मात्र ९वी-१०वीची मुलमुली अगदी आनंदाने तयार होतात. त्या मुलांना कामं वाटून शिकवून दिली की मुलं उत्साहाने मदत करतात. कुणी केस पेपर्स लिहितात, कुणी साबणाने इन्स्ट्रुमेंट्स स्वच्छ धुतात, कुणी ती स्टरिलाईज करतात, कुणी लाइट दाखवतात, कुणी मी दिलेल्या सूचनेप्रमाणे पेशंटना औषधे देतात...
सुरवातीला ही मुळे फारशी बोलत नाहीत पण एकदा का रुळली की छान गप्पा मारतात, गाणी किंवा त्यांची लोकगीते म्हणून दाखवतात. त्यांच्या मनापर्यंत पोचण्याचा माझा प्रयत्न असतो; त्यांना मी त्यांच्यातीलच एक आहे असे वाटू लागते."
आता तिथे वर्षांनुवर्षे सेवाभावाने काम करणार्या कार्यकर्त्यांबद्दल त्या म्हणतात .... "खोन्साच्या शाळेची एक "खास खासियत " आहे. या शाळेचे व्यवस्थापन,संचालन संपूर्णपणे शारदा मिशनच्या सन्यासिनी करत आहेत. शाळेच्या प्रिन्सिपल, टीचर्स्, स्टाफ, होस्टेल प्रमुख या सर्व सन्यासिनी आहेत्.दीक्षा घेऊन सन्यास घेतला असला तरीही या सर्व उच्चशिक्षित, उत्कृष्ट इंग्रजी बोलणार्या. (काही जणी तर Ph.D. सुद्धा ) आहेत.या भगव्या वस्त्रातल्या माताजी स्वतःच्या आध्यात्मिक साधनेबरोबरच भारतातल्या दुर्लक्षित मागासलेल्या गरीब मुलींसाठी तन,मन धनाने झटत आहेत.मुलींची शैक्षणिक प्रगती तर दाद देण्यासाठी आहे.दरवर्षी इथल्या मुली(१०वी-१२वी सायन्सच्या)आल इन्डिया सायन्स कान्ग्रेसमध्ये पहिल्या-दुसर्या क्रमांकाने झळकत आहेत.या मुलींना अभ्यासाबरोबर व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभे राहून स्वतःच्या प्रोजेक्टविषयी कसे सांगावे, त्याचे प्रेझेंटेशन कसं असावयाला हवं या सगळ्या बारीकसारिक बाबतींमध्येही त्या मार्गदर्शन करत आहेत. "
दुसरे उदाहरण आहे गोलाघाट येथील शाळेतील. तेथील मुख्याध्यापिका "भारतीताई." एकदा बोडो उग्रवाद्यांनी बंद पुकारला. केंद्र सरकारकडून काहीही सुचना आली नाही म्हणून भारतीताईंनी शाळा चालू ठेवली. नऊ-साडेनऊच्या सुमारास ४-५ बंदुकधारी रायफल्स घेऊन शाळेत आले. त्यांनी भारतीताईंच्या केबिनमध्ये घुसून त्यांना शाळा बंद करावयास सांगितले. भारतीताईंनी सांगितले की केंद्र सरकारकडून काही सुचना नाही, म्हणून शाळा बंद करणार नाही. थोडा वेळ उग्रवाद्यांनी धमकावण्या चालू ठेवल्या व भारतीताईंनी नकार देणे चालू ठेवले. मग बोडोवादी भडकले व त्यांनी सांगितले की जर शाळा बंद केली नाही तर आम्ही तुम्हाला मारून टाकू. भारतीताई म्हणाल्या, "हरकत नाही. पण या केबिनमध्ये खूनखराबा नको. आपण बाहेर जाऊ, तेथे तुम्ही मला मारा." त्या शांतपणे उठल्या व बाहेर मध्यवर्ती ग्राउंडवर जाऊन बोडोवाल्यांसमोर उभ्या राहिल्या व म्हणाल्या ' मी शाळा बंद करणार नाही. हिम्मत असेल तर माझ्यावर गोळ्या झाडा."
बोडोवाले शरमले व मान खाली घालून निघून गेले. सावरकरांचे शब्द फक्त अशा माणसांसाठीच !
"तुजसाठी मरण ते जनन ! तुजविण जनन ते मरण !"
अशी अनेक उदाहरणे पुस्तकात वाचावयास मिळतात. आता त्यांनी उपभोगलेला निसर्गाच्या सांनिध्यातला आनंद बघू.
..(शिवलिंगाला नमस्कार करून आम्ही मेंगा केव्हजमधून बाहेर पडलो).लतावेलींना दूर करत बाहेर आलो.थोडे पुढे जाऊन काही पावले उतरून खाली आलो आणि पावसाची हलकिशी सर आमच्यावर पाण्याचे थेंब शिंपून गेली. पूर्वेकडे सूर्यनारायण आपल्या किरणांना दरीतील सुभानसिरीला (नदीला) नटवायला पाठवत होते. पावसाच्या सरीने सूर्यकिरणांना हाताशी धरून सुभानसिरीला सुंदरसा इंद्रधनूचा शेला पांघरला. सृष्टीचें ते मनोहर रूप न्याहाळतच आम्ही पहाड उतरू लागलो.....
पूर्वांचलच्या दुर्गम भागात, जेथे सर्वसाधारण प्रवासी (म्हणजे आपण!) पोचतच नाही, तेथे लेखिका आपणास घेऊन जाते. तेथील वर्णनही ओघवती भाषेत करते. पण प्रवासवर्णन हा या भागाचा मुख्य विषयच नव्हे. लेखिकेला ओळख करून द्यावयाची आहे ती तेथील जनतेची.त्यांच्या समस्यांची, त्यांच्या हालअपेष्टांची. सरकार व राजकारणी स्वार्थापायी करत असलेल्या निर्घृण दुर्लक्षाची व त्याच बरोबर तेथे निरपेक्षपणे काम करणार्या सेवाभावी संस्थांची ! प्रतिभादीदींनी स्वतः कायकाय केले ते वाचावयास मिळतेच पण त्याचवेळी तेथे १०-१२ वर्षे काम करत असणार्या तरुण-तरुणींच्या कामाचे स्वरूप पाहून त्या विनम्रपणे लिहतात ..." हे उत्तर ऐकून माझ्या मनात विलक्षण अपराधी भावना तरळून गेली. मनातल्या विचारांचा, भावनांचा,कल्पनांचा कल्लोळ लपवण्यासाठी मी माझी नजर खिडकीतून बाहेर वळवली. "
असो. शक्य असते तर या २४ लेखांपैकी प्रत्येकातील सारांश देणे मला आवडले असते. आपण हे पुस्तक वाचाच. त्याचा एक फायदा असा की आपणास नक्कीच वाटेल की या सेवाभावी संस्थांच्या कार्यात आपणही आपला खारीचा हिस्सा उचलावा.
पुढचा भाग "हिमरंग"
शरद
प्रतिक्रिया
10 Aug 2012 - 12:52 pm | कवितानागेश
सध्या हेच वाचतेय. :)
सविस्तर प्रतिसाद देइनच.
10 Aug 2012 - 1:39 pm | प्रभाकर पेठकर
पुस्तक परिचयाने वाचकाला 'ते' पुस्तक वाचायची उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. माझ्या बाबतीत तसे काही झाले नाही. उलट बराच अपेक्षाभंग झाला.
'तेथे १०-१२ वर्षे काम करत असणार्या तरुण-तरुणींच्या कामाचे स्वरूप पाहून त्या विनम्रपणे लिहतात ..." हे उत्तर ऐकून माझ्या मनात विलक्षण अपराधी भावना तरळून गेली. मनातल्या विचारांचा, भावनांचा,कल्पनांचा कल्लोळ लपवण्यासाठी मी माझी नजर खिडकीतून बाहेर वळवली. "'
ह्या वाक्यांचा संदर्भ लागत नाही. काय प्रश्न होता आणि त्यावर काय उत्तर मिळाले की ज्यामुळे लेखिकेची अशी अवस्था झाली हे कळावयास मार्ग नाही. त्यामुळे लेखातील अशा वाक्यांचे प्रयोजन कळले नाही.
पुढील भाग अजून व्यवस्थित मांडले जातील अशी अपेक्षा आहे.
10 Aug 2012 - 5:08 pm | शरद
माझी चूक. संदर्भ असा. ब्रह्मपुत्रा आपला प्रवाह सारखा बदलत असते. त्यामुळे चिखल सगळीकडे पसरलेला असतोच. नदीच्या पाण्याच्या प्रवाहापर्यंत पोचावयाचे म्हणजे मैलोगणती चिखल-राडा तुडवित जाणे. आता लेखिकेच्या शब्दात ...जीप मुख्य रस्ता सोडून कच्च्या खडबडीत रस्त्यावरून धावू लागली.जीपची चाके अक्षरशः चिखलाच्या फूट-दोन फूट आत रुतून बसत. इतक्या चिखलातून प्रवास करावयाची माझी ही पहिलीच वेळ्.आम्ही तरी निदान जीपमध्ये होतो.बाकीचे लोक टेंपोने प्रवास करत होते आणि चिखल दलदल आल्यावर टेंपोमधून उतरून पायी चालत पुढे जात होते.चिखलातून पाय रुतत चालणे सामान्य व्यक्तीलाही अवघड होते. अशा वेळी लहान मुले, प्रेग्नंट बायका किंवा वृद्ध वयस्कर मंड्ळींचे हाल तर बघवत नव्हते.तेवढ्यात पावसाने आवर्तने घ्यायला सुरवात केली. अशा वेळी डोक्यावर छत्री घेऊन, कपडे चिखलात खराब होऊ नयेत म्हणून एका हाताने वर उचलून, दुसर्या हातात सामानाचे एखादे बोचके पकडून, पायात चपला वगैरे न घालताच ही मंडळी चिखल, दलदल यातून मार्ग काढत होती. मी वर्षाला म्हटलं की "तुम्ही जीपने जाता तेव्हा जीप वगैरे कधी अडकत नाही ? " तेव्हा वर्षाच्या उत्तराने मी अवाक झाले. गेली १०-१२ वर्षे वर्षा, अपर्णादीदी तेथे काम करत आहेत. वर्षाने मला सांगितले " दीदी, आम्ही तर नेहमीच "टेंपोने" प्रवास करतो. चिखल तुडवत जातो, मग फेरी बोट पकडून ब्रह्मपुत्र क्रोस करतो,पुन्हा दलदलीतले दिव्य पार पाडून, जेव्हा मिळेल तेव्हा टेंपो पकडून पुढच्या प्रवासाला लागतो. खरं सांगू तुम्हाला? जीपने मी आज तुमच्याबरोबर 'प्रथमच' प्रवास करतेय". हे उत्तर ऐकून...
शरद