"| पालखीच्या सोहळ्यात |"
नामामधे रंगलो मी, ध्यानामधे गुंगलो मी
माउलीत दंगलो मी, पालखीच्या सोहळ्यात |
ओठी विठ्ठलाचे नाम, पाठी विठ्ठलाचे धाम
चित्ती विठ्ठलच ठाम, पालखीच्या सोहळ्यात |
कुणी गातसे अभंग, कीर्तनास चढवी रंग
तो सुटेना संतसंग, पालखीच्या सोहळ्यात |
एकमेका आलिंगूनी, सर्व जाऊ आनंदूनी
भक्तिरसात न्हाऊनी, पालखीच्या सोहळ्यात |
धावे सांजवेळी गाय, तैसे ओढतात पाय
डोळ्यांपुढे विठूमाय, पालखीच्या सोहळ्यात ||
प्रतिक्रिया
12 Jun 2012 - 8:49 am | प्रचेतस
अत्यंत सुंदर आणि समर्पक.
12 Jun 2012 - 10:46 am | मिसळलेला काव्यप्रेमी
विठ्ठल विठ्ठल
12 Jun 2012 - 4:54 pm | अमोल केळकर
छान . मस्तच
आपलेच नाव विजयकुमार देशपांडे ( विदेश ) आहे का ? कारण तोंड पुस्तकावर सकाळीच या कवितेला आवडली म्हणून टिचकी मारली :)
अमोल केळकर