कधीतरी कुठेतरी वाचले होते किंवा ऐकले होते, असे म्हणतात की कुठल्याही चित्रपटाला यशस्वी तेव्हाच म्हणायला हवे जेव्हा प्रेक्षक त्या चित्रपटाचे एक डायमेन्शन बनून जाईल. 3D मध्ये नुकताच प्रदर्शित झालेला टायटॅनिक ह्यात अगदी तंतोतंत पास झालेला आहे. ह्या नव्या, भव्य स्वरूपाच्या आणि 3D तंत्रज्ञानात प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकचे आपण बघता बघता कधी चौथे डायमेन्शन होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही.
शितयुद्धात बुडलेल्या आपल्या दोन युद्धनौका शोधण्यासाठी खरेतर अमेरिकेने मोहीम आखली होती आणि तेव्हा योगायोगानेच जलसमाधी मिळालेल्या टायटॅनिकचा शोध लागला असे म्हणतात. चित्रपटात मात्र टायटॅनिकच्या अंतर्भागातील शोधाने चित्रपटाची सुरुवात होते. ब्रॉक लोव्हेट आणि त्याच्या टीमचा शोध चालू असतो एक अत्यंत मौल्यवान अशा रत्नहाराच्या शोधासाठी. 'हार्ट ऑफ द ओशन' असे सुंदर नाव असलेल्या त्या हाराचा शोध घेताना त्यांना रत्नहाराच्या मालकाची म्हणजेच 'कॅल हॉकली' ची तिजोरी सापडते. मोठ्या उत्साहाने ते तिजोरी बाहेर काढून फोडतात, मात्र तिजोरीत हाराच्या ऐवजी काही नोटा, खराब झालेली कागदपत्रे आणि एका नग्न स्त्री चे स्केच येवढेच सापडते. ह्या शोधाची बातमी टीव्हीवरती ऐकून रोझ डॉसन नावाची एक १०० पार करत असलेली वृद्धा ते स्केच आपलेच असल्याचा दावा करते. थोडी शंका, बरीचशी उत्सुकता अशा वातावरणात तिला शोधस्थळी आणले जाते, आणि तिने सांगितलेल्या एका जहाजाच्या अद्भुत कहाणीने चित्रपटाची खरी सुरुवात होते.
खर्या आणि खोट्या कथांच्या अद्भुत मिश्रणाने दिग्दर्शक जेम्स कॅमरुन ने ह्या चित्रपटाची वीण गुंफलेली आहे. चित्रपटाच्या पहिल्या फ्रेमपासून तो आपल्याला त्यात गुंतवून ठेवतो. आणि आता 3D तंत्रज्ञानाने तर आपण त्या भव्य बोटीवरचेच एक प्रवासी बनून जातो. 'कधीही न बुडण्याचे सामर्थ्य लाभलेले पाण्यावरती तरंगते एक अद्भुत स्वप्न' असेच खरेतर ह्या भव्य दिव्य टायटॅनिक बोटीचे वर्णन करायला हवे. अमेरिकेच्या दिशेने निघालेल्या ह्या बोटीवरती रोझ (केट विन्स्लेट) ही आपली आई 'रुथ' आणि भावी अब्जाधीश नवरा 'काल' ह्यांच्या बरोबर प्रवास करत असते. रोझ आजूबाजूच्या चकचकीत आणि खोट्या दुनियेला उबलेली तर तिची आई काही करून रोझचे लवकरात लवकर लग्न व्हावे आणि आपल्यावरील कर्जे लवकर फिटावीत ह्या चिंतेत असलेली. तर प्रत्येक गोष्ट पैशात मोजणारा माजोरी कॅल त्याच्या एका वेगळ्याच दुनियेत वावरणारा. ह्याच बोटीत थर्डक्लास मधून प्रवास करत असतो तो जॅक डॉसन (लिओनार्डो डी कॅप्रिओ) हा एक धडपड्या चित्रकार. वेगवेगळे देश हिंडत चित्रकलेचा आनंद लुटणे आणि मनमौजी जगणे हा त्याचा स्वभाव. अशा विविध स्तरांच्या आणि मनोवृत्तीच्या लोकांना घेऊन टायटॅनिकचा आणि आपला प्रवास सुरू होतो.
ह्या दिखाव्याच्या आणि कसलेच निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य नसलेल्या आयुष्याला कंटाळलेली रोझ एके रात्री बोटीवरून जीव द्यायला निघते. मात्र तिथेच असलेला जॅक तिची समजूत घालून तिला वाचवतो. तिथे जमलेल्या लोकांना आणि 'कॅल' ला रोझ आपण तोल जाऊन पडणार होतो, मात्र जॅकने आपल्याला वाचवले असे खोटेच सांगते. इथेच रोझची आणि जॅकची मैत्री जमते. अर्थात अशा खालच्या दर्जाचा माणसाशी तिची मैत्री तिच्या आईला आणि होणार्या नवर्याला पसंत नसणे हे ओघानेच आले. जॅकच्या संगतीत रोझला एका वेगळ्याच विलक्षण आयुष्याची आणि जगाची ओळख होते. एकाच बोटीवरच्या ह्या आयुष्याच्या वेगवेगळ्या रंगांना पाहून ती थक्क होते. हळूहळू दोघेही एकमेकांकडे आकर्षीत व्हायला लागतात. रोझची आई आणि नवरा ह्यातला धोका वेळीच ओळखून दोघांना एकमेकांपासून दूर करण्यासाठी सर्व तर्हेचे प्रयत्न करायला सज्ज होतात.
एके रात्री जॅकने काही मॉडेल्सची ज्या प्रमाणे नग्न स्केचेस काढली आहेत तसेच एक स्केच आपले देखील काढावे अशी इच्छा रोझ व्यक्त करते आणि जॅक तसे स्केच काढतो देखील भावी नवर्याने दिलेला अमूल्य असा 'हार्ट ऑफ द ओशन' फक्त अंगावरती ठेवून रोझ मॉडेल म्हणून हजर होते. स्केच पूर्ण होत असतानाच त्यांच्या शोधात असलेला 'काल' चा नोकर त्यांच्या पर्यंत पोचतो आणि त्यांना तेथून पळ काढावा लागतो. मात्र जायच्या आधी रोझ तो नेकलेस आणि आपले स्केच 'काल'च्या तिजोरीत ठेवून त्याला गुडबाय करायला विसरत नाही. आता बोटीवरती रोझ आणि जॅकसाठी शोधमोहीम सुरू होते. रोझ आणि जॅक मात्र गोडाउनच्या अंधारात एकमेकांच्यात जगाला विसरून गेलेले असतात. मात्र बोटीचे लोक त्यांना शोधत तिथे देखील पोचतात. आरा दोघेही तिथून पळ काढून डेकवरती धावतात, आणि त्याचवेळी रात्रीच्या सुमारास टायटॅनिक नावाच्या ह्या भव्य स्वप्नाला एका हिमनगाची धडक बसते. ही धडक येवढी वेगवान असते की बोटीच्या बेसमेंटला प्रचंड नुकसान होऊन बोटीत वेगाने पाणी शिरण्यास सुरुवात होते.
ह्या प्रसंगाचे साक्षीदार असलेले आणि पुढे येणार्या संभाव्य धोक्याची जाण असलेले रोझ आणि जॅक, रोझच्या आईला आणि कॅलला सावध करण्यासाठी त्यांच्या खोलीकडे धावतात. पिसाळलेला कॅल मात्र जॅकला खोट्या चोरीच्या केसमध्ये अडकवतो आणि सुरक्षारक्षकांच्या हवाली करतो. इकडे बोटीची अवस्था क्षणा क्षणाला बिघडत चाललेली असते. जास्तीत जास्त अजून दोन तास बोट तग धरेल ह्याचा अंदाज आणि मदत मिळू शकेल अशी दुसरी बोट टायटॅनिकजवळ पोचायला कमीत कमी चार तास अशी परिस्थिती निर्माण होते आणि एका प्रेमकहाणी मागे पडून मानवी भावभावनांची आणि जीवन-मृत्यूच्या खेळाची एक वेगळीच कहाणी आकार घ्यायला सुरुवात होते. जास्तीत जास्त निम्मेच प्रवासी वाहून नेता येतील येवढ्याच लाइफबोट्स टायटॅनिकवरती असल्याने अजून एक वेगळाच कठीण प्रश्न समोर येतो. अशावेळी मुले आणि स्त्रिया ह्यांना प्राधान्य देण्यात येते. मात्र ह्या गडबडीत रोझ सगळे काही सोडून जॅकला वाचवण्यासाठी धाव घेते. ती जॅकला वाचवू शकते ?, ते दोघे ह्या संकटातून बाहेर पडतात का?, टायटॅनिक नावाचे स्वप्न कुठले वळण घेते हे सगळे अनुभवायचे असेल तर टायटॅनिकचा प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.
हतप्रभ होऊन स्वतःलाच गोळी मारून घेणारा चीफ ऑफिसर, शेवटच्या क्षणापर्यंत लोकांचे धैर्य टिकवून ठेवण्यासाठी सज्ज असलेला वाद्यवृंद, निराश आणि खचलेल्या मनाने मृत्यूला सामोरा जाणारा कॅप्टन, स्वप्नभंगाच्या दु:खात मृत्यूची वाट बघत थांबलेला बोटीचा डिझायनर असे एक ना अनेक लोक आपल्याला इथे भेटतात आणि जीवनाचे वेगळेच दर्शन घडवून जातात. टायटॅनिक मधले अनेक प्रसंग आपल्या काळजावरती कोरले जातात. स्वतःचा जीव धोक्यात असताना एका लहान मुलाला वाचवायला धावणारे जॅक आणि रोझ एका बाजूला तर लाईफ बोटीत जागा मिळावी म्हणून गर्दीत चुकलेल्या मुलीला आपलीच मुलगी सांगून जागा मिळवणारा कॅल एका बाजूला. बायकांना लाईफ बोटीत बसवता बसवता स्वतःच हळूच त्या बोटीत उडी मारून बसणारा मॅनेजींग डायरेक्टर जोसेफ एका बाजूला आणि पाणी कंबरेपर्यंत आलेले असताना लोकांना लाईफ जॅकेट्स वाटत फिरणारे पोर्टर एका बाजूला.
हे आणि असे बरेच प्रसंग आपल्याला हालवून सोडतात. ह्या अशा वेगळ्या अनुभवांसाठी का होईना पण टायटॅनिक पाहणे मस्टच.
प्रतिक्रिया
9 Apr 2012 - 1:26 pm | मुक्त विहारि
पुर्ण सिनेमा परत डोळ्यासमोर उभा केलात...
9 Apr 2012 - 1:28 pm | मृत्युन्जय
टिटॅनिक बर्याच वेळा बघितला आहे. ३डी मध्ये वेगळा काय परिणाम साध्य होतो आणि कुठल्या दृष्यात ते ही जरा सांग की.
9 Apr 2012 - 3:04 pm | स्वाती दिनेश
टिटॅनिक बर्याच वेळा बघितला आहे. ३डी मध्ये वेगळा काय परिणाम साध्य होतो आणि कुठल्या दृष्यात ते ही जरा सांग की.
हेच रे.. मला सुध्दा तीच उत्सुकता आहे.
स्वाती
9 Apr 2012 - 3:50 pm | परिकथेतील राजकुमार
टायटॅनिक मूळ २डी मध्ये बनवलेला चित्रपट आहे आणि आता तो फक्त ३डी मध्ये कन्व्हर्ट केला आहे. त्यामुळे त्याला अगदी ३डी लूक येणे शक्यच नाही. त्यामुळे जर अवतार किंवा ट्रॉन लेगसी सारख्या चित्रपटांच्या अनुभवाशी ह्याची बरोबरी करायला गेलो तर हातात फारसे काही पडणार नाही हे नक्की. मात्र टायटॅनिकच्या अंतर्भागाच शोध, हिमनगाचे बोटीला धडकणे, पाण्याचा लोंढा, टायटॅनिक मधून तुटणे हे असले काही शॉटस मात्र नक्कीच आधीपेक्षा भव्य आणि देखणे दिसतात. एकूणच एक थोडासा हटके लूक चित्रपटाला नक्की आलेला आहे. अर्थात मी काही तज्ञ वैग्रे नसल्याने मला जे भावले त्याबद्दल लिहितो आहे. कदाचीत स्पावड्या सारखे तंत्रज्ञ अधीक सांगू शकतील.
9 Apr 2012 - 1:28 pm | गवि
टू डी मधे आला होता तेव्हा पाहिला होता.. कुलाब्याच्या "रीगल"मधे. संपला तेव्हा त्या चित्रपटातून बाहेर पडलो आणि व्हीटीपर्यंत चालत कसा आलो, ट्रेन कशी पकडली आणि घरी कसा आलो त्यातलं काही नंतर आठवत नव्हतं इतकं त्या चित्रपटाने हाँट केलं होतं. अक्षरशः त्या बोटीतच अडकलो होतो. शेवटचा तो ड्रीम सीक्वेन्स.. काय बोलू..
त्यातलं एक पात्र बनून पाहिलेला आणि त्यामुळे जबरदस्त अस्वस्थ करुन गेलेला हा सिनेमा पुन्हा कधीही बघायचा नाही असं ठरवूनही पाहिला गेलाच..
ही चौथी डायमेन्शन त्या टू डी च्या वेळेलाही इतकी ताकदीची होती की शेवटच्या सीन्समधे थेटरमधे फक्त माफकच एसी असूनही बर्फाळ पाण्यात हातापायाची बोटं गोठावीत तशी थंड पडली होती..
मस्त परीक्षण लिहिलं आहेस.
9 Apr 2012 - 1:37 pm | विनायक प्रभू
छान परिक्षण.
एक प्रश्नः अरे परा तु २डी मधुन ४डी मधे कधी येणारेस?
9 Apr 2012 - 1:47 pm | यकु
तेवढा तो जॅक मरायला नको होता... :(
केट आणि लिओ पुन्हा दुसर्या कुठल्याच सिनेमात एवढे सुंदर दिसलेले नाहीत.
रिडर [http://www.imdb.com/title/tt0976051/] मधली केट पाहून तर फार वाईट वाटले होते..
9 Apr 2012 - 1:55 pm | जाई.
छान परीक्षण
सिनेमा परत एकदा पहावसा वाटतोय
9 Apr 2012 - 2:06 pm | सुहास झेले
निव्वळ अप्रतिम सिनेमा.... ३डी मध्ये बघू की नाही ह्या विचारात होतो, पण आता बघावा लागेलचं :) :)
9 Apr 2012 - 2:09 pm | Madhavi_Bhave
मला आठवते हा picture बघताना काय घाबरले होते मी. आणि सारखी देवाची प्रार्थना करत धन्यवाद देत होते कि मी त्या बोटीवर नव्हते म्हणून. मी केबल वर बघितला होता आणि एकटीच जागी होते. खूप टरकले होते. अगदी अद्भुत अनुभव. आता तर 3D आणि त्यात theater मध्ये बघणे म्हणजे खरेच जबरदस्त अनुभव असणार. बाकी मला माहित आहे बरेचजन केट विन्सलेटला (rather ........????) 3D मध्ये बघायला जातील. पण कदाचित theatre मध्ये सेन्सोर केलेले असेल.
बाकी ह्या सिनेमानंतर jack आणि केट च्या बोटीवर टोकाला उभे राहून फोटो काढण्याची खूप क्रेझ आली होती जी अजूनही चालूच आहे. खरेच न चुकवावा असा सिनेमा.
9 Apr 2012 - 2:29 pm | गणपा
हा चित्रपट उसगावात* असताना थेटरात जाउन पाहिला होता. असे चित्रपट शक्यतो भव्य पडद्यावरच पहावे म्हणुन गेलो होतो. बरिच चिल्ली पिल्ली त्यांच्या पालकां सोबत हजर होती. क्लायमॅक्स च्या वेळी गेव्हा जहाज बुडायला लागत आणि लोक घरंगळत खाली पडायला लागतात तेव्हा या कार्ट्यांनी जोरदार हशा पिकवून थेटर दणाणुन सोडलं. शेजारच कार्ट तर अवलीच होतं. "मम्मा आय टु वाँट टु गो ऑन टायटॅनिक"चा घोषा लावून बसलं होतं. गांभिर्याचा पार विचका केला राव.
बाकी मृत्युंजयाशी शमत. बहुतेक शेवटचे सीन तेवढे जास्त परिणाम कारक असावेत त्रिमितिय कॉपीमध्ये.
चला आता 3D चश्मे बनवणे आले.
*झैरात झैरात म्हणुन बोंबा-बोंब करणार्यांना योग्य त्या जागी मारल्या गेले आहे.
9 Apr 2012 - 3:07 pm | प्रीत-मोहर
लिओ चा फटु न टाकल्याने निषेध व्यक्त करण्यात येत आहे.
9 Apr 2012 - 3:09 pm | जाई.
+१
9 Apr 2012 - 4:51 pm | किचेन
एकदा नै शंभरदा निषेध !
स्त्री मनाच्या नाजुक भावनांची कदरच नै कुणाला!
10 Apr 2012 - 6:57 pm | ५० फक्त
नाजुक भावना, अरे मणामणाच्या असतात या भावना, जाम भारी पडतात खिशाला खड्डा पडतो त्यांनी.
9 Apr 2012 - 3:15 pm | कपिल काळे
नव्या, भव्य स्वरूपाच्या आणि 3D तंत्रज्ञानात प्रदर्शित झालेल्या टायटॅनिकचे आपण बघता बघता कधी चौथे डायमेन्शन होऊन जातो हे आपल्याला देखील कळत नाही
-----कालच्या वर्तमानपत्रामध्ये ह्याच चित्रपटाचे परिक्षण आले असून त्या समीक्षकाला सुद्धा तो चौथे डायमेन्शन असल्यासारखे वाटत होते. आज तुम्हाला वाटतेय. काय विलक्षण योगायोग आहे म्हणायचा हा !!
9 Apr 2012 - 3:41 pm | परिकथेतील राजकुमार
बहूदा कालच्या मटाला श्रीपाद ब्रम्हे ह्यांनी हे परिक्षण लिहिलेले आहे. असे करा, त्यांना किंवा मटाला ईमेल करून ह्या धाग्याची लिंक द्या. आणि माझे नाव देखील कळवा. ज्या कुच्छीतपणे हा योगायोग दाखवायला आला आहात, तशाच प्रमाणीकपणे त्यांच्याकडून आलेले उत्तर देखील इथे नक्की कळवा. मी वाट बघतो आहे.
9 Apr 2012 - 4:11 pm | कपिल काळे
बहुदा तुम्हाला कुत्सित असे लिहायचे होते का?
बरे.. "योगायोग दाखवायला आला आहात " म्हणजे काय ? मी इथेच असतो की.
हा प्रतिसाद कुत्सितपणे लिहिलेला आहे हे मला तुम्हीच जाणवून दिलेत. खरे तर आम्हाला जो योगायोग दिसला तो आम्ही लिहिला इतकेच!
अर्थात तुम्हाला ओरिजीनल समीक्षकाचे नाव आठवते ही बाकी तुमची जिंदादिली म्हणावी लागेल !
पण काय आहे ना आमची कातडी गेंड्याची असून तिजवर गुलाबी छटा कशी ती येत नाही !
9 Apr 2012 - 4:34 pm | परिकथेतील राजकुमार
मी तुम्हाला 'तिकडून' मिळालेल्या उत्तराची वाट पाहतो आहे. :)
9 Apr 2012 - 5:52 pm | कपिल काळे
आम्ही मुदलात तिकडे मेल पाठवणे अथवा तत्सम गोष्टी करुच कशाला?
आम्हाला गरजच काय त्याची?
योगायोगाने घडलेली गोष्ट आम्हाला जाणवली, ती लिहिली--- त्यात काय मनाला लावून घेता ?
9 Apr 2012 - 3:19 pm | अत्रुप्त आत्मा
बघणार ...बघणार...पुन्हा बघणार... (परि)निरिक्षण झ्याक जमलय :-)
9 Apr 2012 - 4:52 pm | सुहास..
परीक्षण नेहमीप्रमाणे झक्कास च ..
बाकी टायटॅनिक मुळे , फेसबुकावंर , उगा कुठे डोंगरा- बिगंरा वर , टाय्टॅनिक पोझ मध्ये फोटो काढुन डकवणार्यांची आठवण झाली ;) .....काय खुळ एकेक च्यामायला ;)
9 Apr 2012 - 5:22 pm | रेवती
आधीचा सिनेमा पाहतानाच इतकी घाबरले होते की आता पुन्हा पाहण्याची शक्यता कमीच. तरी लेखन आवडले.
9 Apr 2012 - 5:45 pm | शुचि
कालच हा सिनेमा पाहीला. धो धो रडले. लिओ आणि केट अफाट सुंदर दिसतात.
अ-फा-ट
!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सिनेमा खरच फार टचिंग आहे. परा म्हणतात त्याप्रमाणे अगदी ३-डी लुक येणे शक्य नाही. पण जरूर पहावा शांतपणे अनुभवावा असा सिनेमा आहे. विशेषतः अमेरीकेत आल्यावरती केट स्वतःचे नाव रोझ डॉसन सांगते तेव्हा आपण हलून जातो. डॉसन सिनेमात लिओ चे आडनाव आहे.
9 Apr 2012 - 7:59 pm | पैसा
परीक्षण नेहमीप्रमाणेच छान. पण एकदा बघताना या सिनेमाने एवढा त्रास दिलाय की तंत्रज्ञानासाठी म्हणूनसुद्धा परत बघावा असं वाटत नाही.
9 Apr 2012 - 8:00 pm | तिमा
पराभाऊ, परीक्षण आवडले.
परवाच त्या चेपु का थोपु वर कोणीतरी कुत्सितपणे लिहिले होते की, आता थ्रीडी मधे सुद्धा जर त्यांना तो हिमनग दिसला नाही तर देन दे डिसर्व्हड इट!
9 Apr 2012 - 10:10 pm | गणपा
=))
9 Apr 2012 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लैच भारी.
-दिलीप बिरुटे
9 Apr 2012 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
परीक्षण झकास. थ्रीडी चित्रपट नक्कीच पाहणार. धन्स.
बाकी, यकु सारखंच म्हणतो 'तेवढा तो जॅक मरायला नको होता'
-दिलीप बिरुटे
9 Apr 2012 - 11:55 pm | खेडूत
हो, पण त्यामुळेच शेवट एव्हढा परिणामकारक वाटतो.
तो राहिला असता, मग त्याने ५-५० जणांचे जीव वाचवले असते आणि मग ते सुखाने राहू लागले असते तर त्याचा पार बॉलीवूड पट झाला असता.
शेवटी येणारया सुन्नपणा मध्ये त्याच्या जाण्याचा मोठा वाटा आहे असे वाटते.
10 Apr 2012 - 1:08 am | अर्धवटराव
"शोले" मध्ये देखील हीच प्रेरणा असावी !!
अर्धवटराव
10 Apr 2012 - 10:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>>>शेवटी येणारया सुन्नपणा मध्ये त्याच्या जाण्याचा मोठा वाटा आहे असे वाटते.
सहमत आहे.
-दिलीप बिरुटे
10 Apr 2012 - 12:20 am | चिंतामणी
>>>>>>>टायटॅनिक नावाचे स्वप्न कुठले वळण घेते हे सगळे अनुभवायचे असेल तर टायटॅनिकचा प्रवास करण्यावाचून पर्याय नाही.
परीक्षण नेहमीप्रमाणेच उत्तम.
आता पुन्हा पहाण्यावाचुन पर्याय नाही.
10 Apr 2012 - 1:35 pm | राजो
१५ ऑगस्ट ल शोले सुदधा 3D मध्ये येणार आहे..
10 Apr 2012 - 2:09 pm | दिपोटी
माझा प्रश्न हा थेट 'टायटॅनिक'शी संबंधित नाही आहे, पण त्यासारख्याच मूळ 2D असलेल्या व त्यावरुन 3D मध्ये रुपांतर झालेल्या चित्रपटांशी निगडीत आहे.
एखाद्या वस्तूचे 3D (म्हणजेच त्रिमितीय) रुप पहाण्यासाठी आपल्या डोळ्यांच्याच अंतरावर असलेल्या दोन भिन्न भिंगांमधून (म्हणजेच lenses मधून) पाहिलेल्या दोन साधारणपणे सारख्या वाटणार्या पण (अगदी बारकाईने पाहिल्यास) दोन वेगवेगळ्या perspectives मधून पाहिल्यामुळे किंचित भिन्न असणार्या - डाव्या आणि उजव्या - प्रतिमांची गरज आहे. एखाद्या 3D कॅमेरामध्ये अशीच (डोळ्यांच्या अंतरावर असलेली) दोन भिंगे असतात.
मात्र 'टायटॅनिक' वा 'शोले' सारखे चित्रपट - जे मूळ एकाच भिंगाच्या किंवा 2D कॅमेर्याने चित्रित झाले आहेत - ते 2D चित्रपट आता चित्रिकरणानंतर 3D चित्रपटांमध्ये कसे काय रुपांतरीत होऊ शकतात?
वर पराने सांगितल्याप्रमाणे 'त्याला अगदी ३डी लूक येणे शक्यच नाही' हे बरोबर आहे, पण तरीही 'थोडाफार' 3D लूक येण्यासाठी तरी काय केले आहे - हा बदल कसा घडवून आला आहे - हे येथे मिपावर कोणाला माहित आहे काय?
- दिपोटी
10 Apr 2012 - 5:05 pm | वपाडाव
दिपोटीजी, यावर कदाचित स्पावड्या उजेड पाडु शकेल असे वाट्टे...
10 Apr 2012 - 5:21 pm | पहाटवारा
मूळात आप्ल्या मेन्दू ला जे ३डि दिसते , ते २ डोळ्यांनी पाहिलेल्या २ प्रतीमा जेव्हा एकत्र होतात तेव्हा .. प्रत्येक प्रतीमेत काहि बिन्दू असे असतात कि जे 'डेप्थ ' ची जाणीव आप्ल्या मेन्दू ला करून देतात.
जेव्हा २ कॅमेरे वापरून चित्रिकरण होते , तेव्हा २ डोळ्यांमधे असलेले अंतर राखून जसे दिसेल प्रत्येक डोळ्याला , तशा २ प्रतीमा चित्रीत करतात .
आता जेव्हा मूळात एकच जर प्रतीमा असेल , तर ह्या डेप्थ च्या बिन्दूना टार्गेट करून एक प्रकार चे इमेज प्रोसेसींग केले जाते आणी अजून एक प्रतीमा तयार केली जाते. आणी जेव्हा पड्द्यावर या २ प्रतीमा परत प्रोजेक्ट केल्या जातात, जेणेकरून आप्ल्या मेन्दूला ३डि ची संवेदना व्हावी.
10 Apr 2012 - 7:10 pm | बिपिन कार्यकर्ते
पर्या! मस्त लिहिलं आहेस. मात्र हा पिक्चर परत बघेन असं वाटत नाही. :(
10 Apr 2012 - 7:14 pm | स्मिता.
टायटॅनिकची नव्याने करून दिलेली ओळख आवडली. पण फक्त स्टोरीच सांगितली. ३ D बघताना आपण तिथेच आहोत असा भास वगैरे तरी होतो की नाही? नाहितर एवढं तिकीट काढून जायचं आणि पिच्चर जळगावातल्या थेटरात पाहिला होता तसाच दिसणार असेल तर काय उपयोग?
10 Apr 2012 - 10:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
३ D बघताना आपण तिथेच आहोत असा भास वगैरे तरी होतो की नाही? नाहितर एवढं तिकीट काढून जायचं आणि पिच्चर जळगावातल्या थेटरात पाहिला होता तसाच दिसणार असेल तर काय उपयोग?
सहमत आहे. प-यानं थोडं ३ डी इफेक्टवर भर द्यायला पाहिजे होता. पण, तो अनुभव पब्लिकनंच घ्यावा असाही उद्देश लेखकाचा असु शकतो. खरं तर असे पिच्चर पाहतांना आपल्या खुर्च्या हलल्या पाहिजेत. बोटीवरुन पब्लिक घरंगळायला लागल्यावर आपण खुर्चीतून घरंगळत गेलो पाहिजे.समुद्रातलं पाणी कमीत-कमी आपल्या गुढघ्यापर्यंत तरी आलं पाहिजे. साऊंड सिस्टीमही त्याला पुरक अशी की रक्तदाब असणा-यांना असा चित्रपट पाहण्यापूर्वी तपासणी करुनच आत सोडावे लागेल. असं काही तरी थेटर आणि थ्रीडीत असलं पाहिजे. मागे एकदा कोणत्या तरी वाहिनीवर अशा थेट्राच्या बांधणीबद्दल पाहिलं होतं आता काही आठवत नाही.
-दिलीप बिरुटे
11 Apr 2012 - 1:40 am | अर्धवटराव
चार मितीय चित्रपटांमध्ये खरच असं होतं. त्रीमीतीय चित्रपट दाखवायचा आणि त्याच वेळी वारा, पाणि, लाईट्स, खुर्चीचे कंपन इ. इफेक्ट वापरुन प्रेक्षकाला चित्रपटातील प्रसंगांचा अनुभव द्यायचा अशे प्रयोग सध्या सुरु आहेत. एखादा संपूर्ण चित्रपट तसा बनलाय का याची कल्पना नाहि.
अर्धवटराव
11 Apr 2012 - 1:53 am | गणपा
चित्रपट नाही पण एका धमाल डॉक्युमेंट्री पहाताना याचा अनुभव घेतलाय. :)
20 Apr 2012 - 9:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अजून कै टायटॅनिक पाहिला नाही. पण, लोकसत्तात एक चांगला लेख सापडला ''टायटॅनिक : पाशवी करमणुकीचे शतक'' लेखाचा दुवा डकवायला योग्य जागा सापडत नव्हती, टेंप्रररी पर्याचा धागा निवडला.
-दिलीप बिरुटे