आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर - २

पंकज's picture
पंकज in जनातलं, मनातलं
1 Jun 2008 - 1:31 pm

आर्यांचे मुळस्थान कोणते? : डॉ. आंबेडकर
आर्यांचे मुळस्थान भारताबाहेरचे आहे याला वैदिक वांङ्मयात पुरावा मिळत नाही उलटपक्षी,
वैदिक आर्यांचे मुळस्थान भारतच असावे याचेच पुरावे जास्त मिळतात.

दास व दस्यू हे आर्यांचे शत्रू आहेत, असे ऋग्वेदात बरेच उल्लेख आहेत. मात्र त्यांच्यात मोठ्या लढाया झाल्या अशाप्रकारचा उल्लेख ऋग्वेदात मुळीच सापडत नाही. आर्य हा शब्द ऋग्वेदात ३३ ठिकाणी आलेला आहे. त्यातून ८ ठिकाणी तो दास ७ ठिकाणी तो दस्यू या शब्दाच्या विरोधात वापरलेला आहे.

दूसरा मुद्दा असा कि, आर्य व दास यांना समान कोणी शत्रु मिळाला कि, त्याचा पाडाव करण्यासाठी आर्य व दास एक होत असत यासंबधीचे उल्लेख ऋग्वेदात मिळतात. ऋग्वेदातील ऋचा १) ६-३३-३ , २) ७-८३-१, ३)८-५१-९, ४)१०-१०२-३

तिसरा मुद्दा असा कि, आर्य व दास यांच्यातील झगडा कितीही तीव्र असला तरी तो वंशवाचक स्वरूपाचा नव्हता; तो धार्मिक भिन्नतेमुळे झालेला होता. त्यांचे धार्मिक विधी वेगळे होते, ते अग्निपुजक नव्हते, ते प्रार्थना न करणारे वा यज्ञात पुरोहित न आणणारे होते, ब्राम्हणांचा द्वेष करणारे, त्यांना दान न करणारे होते. याबद्दलचे ऋग्वेदातील काही संदर्भ आंबेडकारांनी या मुद्यासंदर्भात दिलेले आहेत.

दास व दस्यू हे शब्द वंशवाचक अर्थाने वापरलेले आहे असे मत असणारे: मृध्रवाक् आणि अनस या ऋग्वेदातील दोन विशेषणांचा दाखला देतात तसेच दास हे कृष्ण वर्णाचे आहेत, असे ऋग्वेदातील दासांचे वर्णनाचा उल्लेख देतात.
मृध्रवाक् हा शब्द चार ठिकाणी आलेला आहे त्याचा अर्थ रांगडी भाषा बोलनारा असा आहे. परंतू रांगडी बोली वंशभिन्नता दाखवते असे मानणे म्हणजे शुध्द पोरखेळ होय.
अनस हा शब्द ऋग्वेदात (५-२९-१०) वापरलेला आहे. या शब्दाचे भिन्न अर्थ करनारे दोन पंथ आहेत,
१) एकाच्या मते उच्चार "अ+नस" याचा अर्थ 'नाक नसलेला वा चपटे नाक असलेला'.
२)दुसरा उच्चार "अन्+अस" म्हणजे बिन तोंडाचा वा चांगली बोली न बोलनारा
मात्र वैदिक वांङ्मयात दास्यू हे बिन नाकाचे लोक आहेत असा उल्लेख कोठेही सापडत नाही त्यामुळे अनस हा शब्द मृध्रवाक् या शब्दाचा समानअर्थी शब्द समजूनच अनसचा उच्चार केला पाहिजे.

दास हे कृष्णयोनी आहेत हे वर्णन ऋग्वेदात (६-४८-२१) फक्त एकाच ठिकाणी आलेले आहे. ते खरेखुरे वर्णन आहे कि अलंकारीक स्वरूपाचे आहे हे समजणे कठिण आहे, तसेच केवळ एकाच ठिकाणी हे वर्णन आल्यामुळे दास हे कृष्णवर्णी वंशाचे हा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही.
याबाबतीत खालील ऋचा लक्षात घ्याव्यात.
१) ६-२२-१० : "हे वज्रि, तु तुझ्या शक्तीने दासांना आर्य करून टाकलेस, दृष्ट लोकांना तू सृष्ट केलेस. ती तुझी शक्ती आम्हाला दे, म्हणजे तिच्या प्रभावाने आम्ही आमच्या शत्रुंना पादाक्रांत करू"
२)१०-४९-३ : (इंद्र म्हणतो) " मी दस्यूंचे आर्यत्व नष्ट केले आहे'"
३)१-१५-८: "हे इंद्रा ! आर्य कोण आहेत व दास्यू कोण आहेत हे तू शोधून काढ आणि आर्य व दस्यू यांना परस्परांपासून दूर ठेव"
वरील ऋचांवरून स्पष्ट होते कि आर्य, दास व दस्यू यांच्यातील भेद हा शारीरीक किंवा वंशसुचक स्वरूपाचा नव्हता.

वरील विवेचनावरून स्पष्ट होते कि "आर्यांनी भारतावर स्वारी केली मूळच्या रानटी रहिवाशांवर स्वार्‍या करून त्यांना जिंकले." हा सिध्दांत चुकिचा ठरतो, हा सिध्दांत मुळातच दोन रोगांनी पछाडलेला आहे. काहि गोष्टी गृहित धरायच्या व त्या गृहित गोष्टींवरून काही अनुमाने काढावयाची अशा तर्‍हेची उभारणी हा या सिध्दांताचा पहिला रोग होय. अशी उभारणी शास्त्रीय पध्दतीने केलेल्या संशोधनाच्या कसोटीस लागत नाही, हा त्या सिध्दांताचा दुसरा रोग होय.
सत्य गोष्टींची रचना करून त्या रचनेतून सिध्दांताची उत्क्रांती होऊ दिलेली नाही. उलटअंशी, सिध्दांताचे स्वरूप आधि आखण्यात आले व त्यानंतर ते स्वरूप सिध्द करण्यासाठी सत्य गोष्टींची निवड करण्यात आली.

हा सिध्दांत मुळचा युरोपियन ग्रंथकारांचा, त्यामागील प्रेरणा म्हणजे १८३५ साली प्रसिध्द झालेले डॉ. बॉप (Bop() यांचे "तुलनात्मक व्याकरण " (Comparative Grammar ) या नावाचे युगप्रवर्तक पुस्तक. युरोप व आशिया खंडात बोलल्या जाणार्‍या काहि भाषांचे मुळस्थान कोणत्यातरी एका जून्या भाषेत असले पाहिजे, असे अनुमान डॉ. बॉप यांनी मांडले होते.. डॉ. बॉप यांचे अनुमान ज्या युरोपियन व आशियन भाषांना लागू पडते त्या भाषांना हिंदी-जर्मन भाषा असे नाव दिलेले आहे. सांघिक दृष्टिने त्या भाषांना आर्यन भाषा असेच संबोधण्यात येते. कारण, वैदिक भाषा म्हणजे आर्यांची भाषा आणि आर्य लोक म्हणजे हिंदि-जर्मन लोकांचा मुळचा वंश, असा सर्वसाधारणपणे समज दृढ झालेला आहे. हा समज युरोपियन ग्रंथकारांच्या सिध्दांताचे प्रमुख अंग होऊन बसलेला आहे.

वर्णभेदाने पछाडल्यामुळेच आर्यांनी चातुर्वर्ण्य निर्माण केले, हे युरोपियन ग्रंथकारांचे विधान तर धांदात खोटे आहे. तसे जर असते तर चारी वर्गांचे चार निरनिराळे रंग असावयास पाहिजे होते. हे चार रंग धारण करणारे चार वर्ग कोणते व त्यांची चातुर्वर्ण्यात कशी गणना केली गेली, याबद्दल कोणत्याही ग्रंथकाराने स्पष्ट खुलासा केलेला नीही.

मुळात युरोपियन लोक गोरे होरे कि काळे? याबद्दल प्रो. रिप्ले (Races of Europe, by Prof. Repley, P.466) यांच्याप्रमाणे युरोपियन लोक लांब डोक्याचे व कृष्ण वर्णाचे होते, युरोपातील फार प्राचीन काळचे लिगुरियन लोक हे रंगाने काळे असले पाहिजेत...

ऋग्वेदात काहि भागात रंगाबद्दलचे उल्लेख आढळतात. १) १-११७-८: शाव्य काळा तर रुशती निमगोरी होती, २) १-११७-५: वंदन यांचा रंग पिवळा होता. ३)२-३-९ : ताबटसर-पिंगट रंग असणारा मुलगा दे, अशी प्रार्थना.
वैदिक आर्य स्वतः एका रंगाचे नव्हते, तर मग त्यांच्यात वर्णभेद कोठून उत्पन्न होणार? राम, कृष्ण, ऋग्वेदातील ऋचा लिहिणारे दिर्घतमस तसेच कण्वऋषी (१०३१-११) हे काळ्या रंगाचे होते.

१) आर्य वंश अस्तित्वात होता, याबद्दल वेदांमध्ये काही पुरावे मिळत नाहीत.
२)आर्य वंशीय लोकांनी स्वारी करून दास व दस्यू लोकांना जिंकले, याबद्दल वेदांमध्ये काही पुरावे मिळत नाहीत.
३)आर्य, दास व दस्यू यांच्यात वांशिक भेद होता, हे दाखविणारा पुरावा वेदांमध्ये नाही.
४) आर्य रंगाने दास व दस्यू यांच्याहून निराळे होते असे दाखविणरा पुरावा वेदांमध्ये नाही.

क्रमशः

इतिहासमत

प्रतिक्रिया

अनिल हटेला's picture

2 Jun 2008 - 10:04 am | अनिल हटेला

वेल!!!

माहिती अजुन ही अपूर्ण वाटतेय...

पूढील भागाच्या प्रतीक्षेत ................

सुधीर कांदळकर's picture

2 Jun 2008 - 8:01 pm | सुधीर कांदळकर

सुधीर कांदळकर.