'गुगलवर मराठी यावी म्हणून मागणी' ह्या निनाद ह्यांनी काढलेल्या धाग्यावरील चर्चेत न्यूनगंडाचा मुद्दा उपस्थित झालेला दिसला. गूगलसारख्या व्यावसायिक कंपनीने मराठी भाषेसाठी एखादी सोय देणे किंवा न देणे ह्यामुळे मराठीवर अन्याय होतो ही समजूत न्यूनगंडापोटी आलेली असावी असे मत तिथे व्यक्त झाले आहे. थत्ते ह्यांनी उद्धृत केलेल्या लोकसत्तेतील प्रतिक्रियेत "आपण नेहमी अन्यायग्रस्त आहोत, असे वाटणे हे या न्यूनगंडाचेच एक लक्षण" असे म्हटलेले दिसते.
ऋषिकेश ह्यांनीही एका प्रतिसादाला उत्तर देताना प्रतिसादकर्त्यांच्या वाक्यातले "मुद्दाम, खोडसाळ्पणे, "डाउन मार्केट" समजणे, दखल न घेणे" हे शब्दप्रयोग अधोरेखित करून "अधोरेखित शब्द न्यूनगंडच दर्शवतात असे म्हटले आहे."
मुळात एखादी गोष्ट होणे अगदी साहजिक आहे असे असूनही तशी ती होताना दिसत नाही, उलट ती घडून येण्यासाठी वारंवार प्रयत्न करावे लागतात असे दिसले की तिथे काही तरी अन्याय होतो आहे असे ती गोष्ट अपेक्षणाऱ्यांना वाटत असते. असे वाटणे हे न्यूनगंडाचे लक्षण आहे हे कसे ठरते हे स्पष्ट होत नाही
गोठोसकरांच्या लेखात त्यांनी आपली भूमिका पुरेशा स्पष्टपणे मांडलेली आहे. त्यांच्या मांडणीत पुढील मुद्दे येतात.
१. गूगलने ज्या भाषांसाठी ही सोय पुरवली आहे त्यात मराठीचा समावेश न करण्याचे तार्किक कारण त्यांना दिसत नाही.
२. गूगलने ज्या भाषांसाठी सेवा पुरवली आहे त्या भाषांच्या तुलनेत मराठीचा विचार करता तिचा समावेश का व्हावा ह्यासंबंधीची स्वतःला जाणवणारी कारणे गोठोसकरांनी दिली आहेत. त्या कारणांमध्ये संख्याबळ ह्या 'व्यावसायिक दृष्ट्या'ही विचार व्हावा अशा कारणाचा समावेश आहे.
३. अशी सर्व कारणे उपस्थित असूनही मराठीसाठी संबंधित सेवा उपलब्ध नाही. आणि ती कारणे उपस्थित नसलेल्या भाषांसाठी ती आहे हे त्यांना अनाकलनीय वाटते.
४. ह्यामुळेच 'मराठी बाणा' दाखवण्यात आपण उणे पडतो की काय असा विचार त्यांनी केला आहे.
५. ह्यावर उपाय म्हणून चळवळ करण्याची आवश्यकता नसून आपली नाराजी संबंधित कंपनीपर्यंत पोहोचवावी असा मार्ग सुचवून त्यासाठी ती मागणी व्यक्त करणाऱ्या निवेदनावर स्वक्षऱ्या करण्याचा मार्ग सुचवला आहे.
आता मराठीसाठी गूगलने भाषान्तरसेवा उपलब्ध करून देण्यासाठी अनुकूल असे घटक मराठीच्या ठायी असूनही गूगलने ती सेवा उपलब्ध करून दिलेली नाही ही गोष्ट एखाद्या व्यक्तीला खटकली आणि तिने ह्यामुळे मराठीवर अन्याय होतो अशी भावना व्यक्त केली तर त्यात न्यूनगंड कसा काय दिसतो?
"किती मराठी माणसांनी (न्यूनगंड बाजूला सारून) कायदेशीर पाटी न लावल्याबद्दल रितसर तक्रार केली आहे?
किती मराठी माणसांनी मराठी गाणी नसल्यास रेडीयो ऐकणे बंद केले आहे?" असे प्रतिप्रश्न ऋषिकेश ह्यांनी केले आहेत.
मराठी पाट्यांसंबंधी रितसर तक्रारी झालेल्याच नाहीत असे नाही. अशी पत्रोपत्रीची लढाई करणारे काही लोक मला माहीत आहेत आणि ते आपले प्रयत्न गाजावाजा न करता करत असतात. 'किती' मराठी माणसांनी हे केले हा शोधाचा विषय असू शकेल. पण तो मुद्दा गौण आहे. मराठीत पाट्या लावण्याचा नियम असूनही पाट्या लावल्या जात नाहीत हे खरे असेल तर एका व्यक्तीने आक्षेप घेतला तरी पुरेसे आहे. कारण मुळात तक्रार करावी लागू नये अशी अपेक्षा असताना तक्रार करावी लागण्याची परिस्थिती आहे हाच तर आक्षेपाचा मुद्दा आहे.
व्यावसायिक सुधारणा होण्यासाठी ग्राहकाने माल घेणे बंद करून हिसका दाखवल्यास प्रश्न सहज सुटण्यासारखा आहे ही कल्पना तर्कतः योग्य असली तरी सहज व्यवहार्य नाही. ह्याचे कारण माल घेणे बंद होण्याचे प्रमाण व्यावसायिकाच्या हिताला बाध येईल इतक्या पुरेशा प्रमाणात असावे लागेल. त्यासाठी ह्या कल्पनेचा प्रसार व्हावा लागेल. तो प्रसार कसा करणार? तर 'सदर व्यावसायिक अमुक गोष्ट करणे साहजिक असूनही अमुक गोष्ट करत नाही म्हणून तुम्ही माल घेणे बंद करा' असे सांगून. आता हे असे सांगून त्याचा प्रसार करण्याचे काम कुणी करू लागले तर ती व्यक्ती न्यूनगंडाने पछाडलेली आहे असा आरोप होणार. म्हणजे अमुक उपाय करत नाही म्हणून दोष द्यायचा आणि उपाय करण्याची प्राथमिक तयारी करू लागला तरी नावे ठेवायची असा दुटप्पीपणा अशा प्रतिसादांमधून दिसतो.
वारंवार विशिष्ट अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे न्यूनगंडाने पछाडलेले असणे असा सरळ निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.
प्रतिक्रिया
24 Jul 2011 - 10:38 am | नितिन थत्ते
काही मुद्दे योग्य आहेत. तरी निनाद यांच्या धाग्यावरील टीका गूगलसारख्या व्यावसायिक संस्थेवर अन्यायाचा आरोप केल्यामुळे झाली होती.
दुसरे म्हणजे दुकानावर पाट्या मराठीत लावा असा कायदा आहे म्हणून त्याची अंमलबजावणी व्हावी असे म्हणणे ठीक आहे. पण गुजराती लोकांना दुकानाच्या पाट्या गुजरातीत नसण्याचा मानसिक त्रास होत नाही असे दिसते. (तेथे पाट्या गुजरातीत लावण्याचा कायदा आहे की नाही माहिती नाही).
मला एका केंद्र सरकारी संस्थेच्या ठाण्याच्या कार्यालयात काही अडचणीच्या निवारणासाठी फोन केला असता, "मराठी समजत नाही, हिंदीतून सांगा" असे उत्तर मिळाल्याचा त्रास झाला होता.
24 Jul 2011 - 12:26 pm | सुशान्त
गूगलसारख्या व्यावसायिक कंपनीच्या वर्तनामुळे (गोठोसकर ह्यांच्या मते) मराठीवर होत असलेला अन्याय मांडत असताना श्री. गोठोसकर ह्यांनी जी कारणे दिली होती ती चुकीची आहेत असे दाखवून टीका झाली असती तर वरील आक्षेप घेतलाच नसता. गोठोसकर ह्यांच्या लेखात त्यांनीही हे गूगलने खास मराठीला डावलण्यासाठीच केले आहे असे म्हटलेले नाही. त्यांचे म्हणणे असे होते की गूगलचे हे वर्तन अनाकलनीय आहे आणि मराठीचे महत्त्व त्यांना (गूगलला) समजून आलेले नसावे. गूगलचे वर्तन अनाकलनीय वाटण्याची कारणेही त्यांनी आपल्या लेखात दिली होती. असे असताही त्यांचे प्रयत्न न्यूनगंडातून आलेले आहेत असे प्रतिक्रिया देणाऱ्यांनी म्हटले हे चुकीचे वाटते.
हा मुद्दा निरर्थक आहे. काही जणांना एखादा कायदा मोडल्याचा त्रास होत नाही म्हणून ज्यांना त्रास होतो त्यांनी आपले म्हणणे मांडले तर ते न्यूनगंड असलेले कसे ठरतात?
25 Jul 2011 - 2:01 pm | मराठी_माणूस
वारंवार विशिष्ट अन्यायाविरुद्ध बोलणे म्हणजे न्यूनगंडाने पछाडलेले असणे असा सरळ निष्कर्ष काढणे चुकीचे वाटते.
सहमत .
25 Jul 2011 - 4:48 pm | विजुभाऊ
बेळगावात दुकानाच्या पाट्यां कानडी असण्याची सक्ती चालू शकते मराठी बद्दल तशी सक्ती केली की ती मात्र खुपते. ( कानडी मुलुखात भ्रष्टाचारी मुख्यमन्त्री चालतो.कांग्रेसच्या राज्यात मात्र एखादा मंत्री भ्रष्ट असला की सगळ्या मंत्रीमंडळाचा राजीनामा मागितला जातो)