जात्यावरच्या ओव्या- अहिराणी भाषेतील!

आर्या१२३'s picture
आर्या१२३ in जनातलं, मनातलं
26 May 2011 - 3:44 pm

नमस्कार! जात्यावरल्या अहिराणी भाषेतील ओव्यांचा खजिना आज तुमच्यापुढे खुला करत आहे. खरतर सुमारे २ वर्षापुर्वीच हा माझ्या हाती आला होता. हे मला ज्यांच्याकडुन मिळाले त्यांच्यापैकी सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणजे माझी मोठी आत्या विमलबाई दुसाने या आता हयात नाही (जाने.२०११ मधेच त्यांचे निधन झाले) दुर्दैवाने त्यांच्या हयातीत हे मला इथे मांडता आलं नाही....काही काही सल आयुष्यभर रहातात. हेच खरं ! दुस-या म्हणजे माझ्या मोठ्या काकु प्रमिला वानखेडे आणि माझी आई विजया वानखेडे यांच्या पाठगुळी बसुन मी हे सगळं लिहुन घेतले होते. त्यांचीही मी ऋणी आहे.

त्यांच्याकडुन जी माहिती प्राप्त झाली ती याप्रमाणे:
पुर्वी लहानपणीच मुला-मुलींची लग्न होत असल्याने सासु-सुन किंवा सासुरवास अशा गोष्टी या ओव्यांमधुन दिसत नाही. हं...मधुनच जावा-जावांचे खटके किंवा नणंद-भावजयांचे टोमणे जाणवतात. माझी आई तर नेहमी म्हणे : अगं आधी आईच्या हाताखाली सुन म्हणुन रहावं लागतं नंतर सासुच्या! पहाटे नणंद भावजयी दोघींनाही पहाटे उठुन जात्यावर ४-४ शेराचं (म्हणजे ८ किलो/पायलीभर) दळण करावं लागे. आधी घट्याची/ जात्याची हळद-कुंकु वाहुन पुजा करण्यात येइ. एवढं दळण दळतांना गाण्यात येणा-या ओव्यांमधे काही परंपरागत तर काही लगेच सुचलेल्या ओव्यांचा समावेश असे. मग त्यात नणंद-भावजयींचे खटके असो, त्या त्या काळातली परिस्थिती असो, माहेरासारखा जिव्हाळ्याचा विषय असो कि अध्यात्म...सगळ्यांचच प्रतिबिंब दिसतय. माझ्या अल्पमतीप्रमाणे मी प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केलाय.

सकाये उठुनी रामाच नाव घेऊ
मंग धरतीमातेवर पाय देवा ठेऊ

प्रभाते मनी राम चिंतित जावा... यासारखे श्लोक या अशिक्षित स्रियांनी कसे जाणले असतील बरे? आख्ख्या जगाचा भार वाहणा-या या पृथ्वीमातेवर पहाटेच्या समयी पाय ठेवण्याआधी रामाचे नाव घेउ.

सकाये उठीसन झाडु वट्याची पायरी
माले गं सापडनी लड मोत्याची गुह्यरी

पहाटे उठुन ओटा, आंगण झाडुन सडासंमार्जन करतांना जे आत्मिक समाधान मिळते ते म्हणजे अगदी मोत्याची लड सापडल्यावर होणा-या आनंदासारखं आहे.

अंगणात खेळे बाळ कोणाचा लह्यरे
त्याच्या गं कमरेत साखळी दुह्यरे

अरेच्चा! सकाळी सकाळी हा कमरेला दुहेरी साखळी बांधलेला कोणाचा बाळ अंगणात खेळतोय? सारवलेल्या अंगणात बाळकृष्णासारखा दिसतोय...

शेजी घाले सडा, मन्हा सड्याला भिडूनी
नादान हरी मन्हा, आला रांगोळी मोडोनी

शेजारीण माझ्या सड्याला जोडुन सडा टाकतेय! मोठमोठे सडा टाकायचं किती ते कौतुक.... पण माझ्या नादान हरीने रांगोळी मोडली की!

पह्यले गाऊ ओवी गं रामराया सजनाला
गाडीवर जाती, घुंगरु त्याच्या इंजनाला

पहिली ओवी गाऊ माझ्या धन्याची.. .. त्यांच्या गाडीच्या इंजनाला घुंगरु बांधलेत याचं कोण कौतुक!!

पारोळ झालं जुनं, नाशिक जमाबंदी
कोनी हौसानं बांधिली, आरधी मुंबै पान्यामंदी

त्याकाळात आपल्या गावापेक्षा मोठं, स्वप्ननगरीसारखं शहर म्हणजे मुंबई आणि मुंबै बघणे म्हणजे जीवाची मुंबई करणे हे गावातल्या कित्येकांचं स्वप्न असायचं! धुळ्याजवळ असणारं पारोळा ही आता जुनं झालं इतकच काय नाशिक ही आता नको... ! पण मुंबई हे बेट होतं हे ही ह्या सासुरवाशिणीला माहितीये. म्हणुन ती म्हणतेय कोणी हौसेनं ही मुंबई अर्धी पाण्यात बांधलीय.

काय पुण्य केलं तुम्ही नाशिकच्या बाया
गंगेची आंघोळ, दर्शनाला रामराया

त्याकाळी, पिकनीक, ट्रीपा/ टुर असं काही नाहीच. तीर्थक्षेत्री जाऊन थोडंफार स्थलदर्शन व्हायच. इतकच. नाशिकच्या बायकांनी असं कोणतं पुण्य केलय की त्यांना रोज गंगेची(गोदावरी) आंघोळ आणि रामरायाचं दर्शन होतं. इथे आम्हाला वर्षातुन एकदा ही कोणी तीर्थक्षेत्री नेत नाही....

काय पुण्य केल तुमी, नाशिकचे लोक
गंगेची आंघोळ, दर्शनाला गायमुख

नाशिकच्या लोकांचं ही पुण्य महान की त्यांना रोज गोमुखाचं दर्शन होतं!

रामकुंडावरी ढवळ्या धोतराची जोडी
आंघोळीला येती रामलक्ष्मणाची जोडी

रामकुंडावरी ओल्या धोतराचा पिळा
आंघोळीला येती साधुसंताचा मेळा

आरध्या रात्री कोण चालला एवढ्या राती
महादेव पार्वती हा कंदील डाव्या हाती

मध्यरात्री १२ वाजले की शिव-पार्वतीचा फेरा येतो म्हणतात... आणि तेव्हा त्यांना जिथे दु:ख दिसेल तिथे ते दूर करतात असं म्हणतात.

देवा रे महादेवा, काय बसला डोया लाई
पृथमी ( पृथ्वी) ढुंढल्यानी जोडी मारुतीला न्हाई

अरे महादेवा, भोळ्या शंकरा असा डोळे मिटुन काय बसलायस? आख्ख्या पृथ्वीवर मारुतीला जोडी नाही काय?

भोळा रे शंकर, भोळं तुझं घेण देण
तुझ्या बेलामधे मला सापडल सोनं

राम-लक्ष्मण नि ही तिसरी सिताबाई
पृथमीमधे जोडा मारुतिला न्हाई

राम सितामाई ही कुटुंबवत्सल जोडी! जिथे रामाने एकीकडे भावाला (लक्ष्मणाला) ही बरोबर ठेवले एकीकडे पत्नीलाही तेवढाच दर्जा दिला. पण आख्ख्या पृथ्वीवर बिचार्‍या मारुतीला जोडी सापडली नाही. तो ब्रम्हचारीच राहिला.

सिता सांगे कथा तिन्ह्या करमनी (कर्माची)
राम सांगे कथा देवधरमनी (देवधर्माची)

सिता तिच्या कर्माची कथा सांगते तर राम धर्म न्याय अशा गोष्टी करतो. सिता तिच्या दुर्दैवाला कोसतेय तर राम तिला पितृवचनपालन वै. धर्म शिकवतो.

शितेला सासरवास रामाच्या मावशीचा
असा वाळुन गेला हिरवा बाग तुळशीचा

रामाने तर वनवास भोगला...पण खरा उन्हाळा सोसला सितेने. एकीकडे कैकयीचा सासुरवास नंतर रामाबरोबर वनवास आणि लंकेत गेल्यावर विजनवास! तिच्या दु:खाने हिरवागार तुळशीची बाग ही वाळुन गेलीय.

सितेला सासुरवास रामाला कसा कळे
रामाचे रामफळे रुमाले रस गळे

सितेला घडणा-या सासुरवासाने रामही बेचैन आहे इतका की रामफळातुन रुमालाने टिपुनही रस गळतोय.

सितेला सासरवास, सासू कैकयीने केला
रामासारखा भरतार हिने भोगु नाही दिला

सासु कैकयीने सितेला इतका सासुरवास केला की , रामासारख्या एकपत्निव्रत, एकनिष्ठ, पुरुषोत्तम अशा पतीबरोबर सुद्धा तिला संसारसुख भोगता आले नाही.

गरीब दुबळा (कसा ही असो) बंधु गं असावा
दिवाळी दसरा एका रातीचा इसावा

सासुरवाशिणीला आधार फक्त भावाचा असतो. म्हणुन इथे ती म्हणतेय की गरीब दुबळा कसाही असो भाऊ असावा.... दिवाळी दसरा या सणासुदीला माहेरी जायला मिळते....तेवढाच सासरच्या धबडग्यातुन एका रात्रीचा विसावा!

भाऊ बहिणीचं भांडण तिथ कशाचा रागरोस
भाऊला ओवाळायला, भाऊबिजेचा एक दिस

अरे भाऊराया, आपलं ते भांडण काय अळवावरचं पाणी. तिथ कशाला रागरोस ठेवायचा. भावाला ओवाळण्यासाठी भाऊबिजेचा असा एकच दिवस असतो.

शिंपीच्या दुकानी उच्च खणले मारु खडा
शिंपी भाऊ मोठा येडा, भाऊ बहिणीना सौदा मोडा

शिंप्याच्या दुकानात चोळीचा खण थोड्या जास्त किंमतीचा आहे. पण तो मूर्ख शिंपी त्याची किंमत अधिक सांगुन भाऊ बहिणीचा सौदा मोडतोय.

पापी रे मानसा, हा बसला बाजारात
लोकाची लेक बाया याने घेतली नजरात

बाजारात कसले कसले लोक येतात. त्यांच्या नजरा दुस-याच्या बायाबापड्यांवर फिरत असतात...अशाच एका नजरेची तिला दळण दळता दळता आठवण होते....आणि दुसरीला सावध करण्यासाठी ती तीला हे ओवीतुन सांगते.

माझ्या घरी गं पाहुणे करु आताचा दहीभात
भाऊ गं पाहुणा, बुंदी छाटु सारी रात

खान्देशातला रोजचा आहार म्हणजे भाजी भाकरी आणि रात्रीची तांदुळाची फोडणीची खिचडी. वरण भात वरुन साजुक तुप वगैरे अगदी सणासुदीलाच होणार...किंवा पाहुण्यांना! आज माझा भाऊ घरी पाहुणा म्हणुन आलाय. त्याच्यासाठी दहीभात तर करतेच पण गोडधोड म्हणुन आख्ख्या रातभर बुंदी छाटावी लागली तरी बेहतर.

झाली संध्याकाळ, संध्याकाळले मान देऊ
स्वर्गी गेले माझे पिता, दिवा लावुन पाणी पिऊ

सायसंध्याकाळी पितरांचा फेरा असतो म्हणुन दिवेलागणीला तुळशीजवळ दिवा लावल्याखेरीज काही खाउ-पिउ नये असं म्हणतात. मुलीवरच्या प्रेमाने आलेला स्वर्गस्थ पित्याचा आत्म्याला तेलाचा दिवा दाखवुन मान देतांना ही सासुरवाशीण असं म्हणते.

आली सही सांज, आला वांझोटीचा फेरा
सांगते सुनबाई, पदराखाली झाक हिरा

नेमकं सांजसमयी कुटाळक्या करणारी वांझोटी शेजी बाई गप्पा मारायला येउन बसते. तिची नजर तुझ्या हि-याला (लहानग्याला) लागु नये म्हणुन सासुबाई इथे सुनेला म्हणते की तुझ्या मुलाला पदराखाली झाकुन ठेव.

माझा भाऊ आला आज, माझा भाचा आला
लई गं दिस झाले, आत्या माहेराला चाल काल

आज मन किती उचंबळुन येतय! कारण माझा भाऊ, भाचा माझ्याकडे आलेत आणि भाचा आग्रह करतोय की किती दिवस झालेत आत्या चल ना गं आमच्या घरी! व्वा...कोणी आपल्या येण्याची वाट बघतय ही कल्पनाच किती रम्य आहे!!

उन्हाळ्याचं उन्ह, ऊन लागे कपाळाला
नादान बंधु माझा, छत्री साजे गोपाळाला

खान्देश म्हणजे कडक उन्हाळा! अशा उन्हाळ्यात उन्हातान्हात भाऊ मला भेटायला येतोय. छत्री घेउन येतांना भाऊ किती साजेसा दिसतोय.

सासु आत्याबाई, तुमच्या पदराला ववा(ओवा)
जाते माहेराला, माझ्या पतीला जीव लावा

पुर्वी नात्यातली लग्न म्हणजे भावाची मुलगी आत्याने सुन करुन घ्यायची असे व्यवहार होत. सासवांच्या पदराला सुपारी, ओवा असं काय काय बांधलेलं असे. भाऊ घ्यायला आलाय, माहेराला तर जायचय ...पण इकडे सासरही सोडवत नाही. धन्याची चिंता ...आता आई आपल्या मुलाची काळजी घेइलच! पण सासुरवाशीण तरीही माहेरी जातांना सासुला सांगुन जातेय की पतीला जीव लावा...त्यांच्या खाण्यापिण्याची हेळसांड करु नका.

शिता भावजाई, तुझा गं मला राग येतो
चतुर भाऊ माझा हाताने पाणी घेतो

माहेरी आल्यावर एकेक चित्र उलगडत जातय. सिता भावजाईचा तोरा इतका की भाऊही तिच्या ताटाखालचं मांजर बनलाय. म्हणुन इथं ती म्हणते की तुझा राग येतो कारण इतका माझा हुशार, चतुर भाऊ ...पण आज अशी वेळ आलीये की त्याला स्वतः हाताने पाणी घ्यावं लागतय.

वडील माझा लेक देर जेठच्या बरोबरी
पुसती जन लोक कुठे गेले हो कारभारी

माझा मोठा मुलगा दीर-जेठाच्या बरोबरीला आलाय... तरी दुरदेशीला गेलेला धनी अजुन परतला नाही. आजबाजुचे लोक आडुन आडुन चौकशी करतात की कारभारी कुठे गेलेत?

गावातल्या गावात भाऊ बहिणीशी बोलेना
आस्तोरी(बायको)च्या पुढे त्याचा विलाज चालेना

कधी कधी बहिण-भावांचे खटके उडतात. म्हणुन बहिण खंत व्यक्त करतेय की गावातल्या गावात दिलय तरी भाऊ बोलत नाही...त्याच्या अस्तुरी(बायको)पुढे काही इलाज चालत नाही.

गावातल्या गावात साला बहिणोईचं नातं
भाऊ कसा म्हणे नित्य होतो रामराम

बहिणीला गावातच दिलय....लहान गाव असल्याने नित्य कुठे ना कुठे पाव्हण्याचं (मेव्हणा) दर्शन होतच.

भाऊ गं आपला, भावजाई गं लोकाची
तिच्या गं पोटची, भाची गं आपल्या गोताची

फुरंगटुन ही सासुरवाशीण म्हणते, भाऊ शेवटी आपला ...आपलं नातं रक्ताचं पण भावजाई शेवटी लोकाची पोर. हो, पण तिच्याच पोटची भाची ही आपल्या गोताची म्हणजे तिच्याही अंगात भावाचं पर्यायाने आपलंच रक्त खेळतय.

सांगस भाऊ तुले भेटी जाय उन्हाळ्यात
पानीपाऊसना माले, चार महिना धाक

भावाला सुचवलं जातय की दर उन्हाळ्यात भेट देऊन जा रे.... पावसाळ्याचे ४ महिने नदी-नाल्यांना/ओढ्यांना पाणी असतं, बैलगाड्या पैलतीरी जाउ शकत नाही. म्हणजे या काळात आपली भेट होणं तसं मुश्किलच.

मामा गं भाच्याची झुंज लागली खिंडीत
पुसती जनलोक मायलेकीचा पंडीत

मामा-भाचे...एक मायेचा पंडीत एक लेकीचा पंडीत.खिंडीत झुंजतायत...लुटुपुटुची लढाई! यात हरणार कोण जिंकणार कोण हे थोडच महत्वाचं! मामा भाच्याला ट्रेन्ड करतोय हे काय कमीये का?

नणंद भावजाया आम्ही एका चालणीच्या
बाहेर गं निघाल्या सुना कोण मालणीच्या

आम्ही नणंद भावजाया नटुन थटुन बाहेर निघाल्या की लोकही पुसतात की या सुना कोणाच्या?

देराण्या जेठाण्या आपण काळ्या साड्या नेसु
बाहेर गं निघु सुना वकीलाच्या दिसु

वकील, बॅरीस्टर, डॉक्टर आणि शिक्षक हे तसे त्याकाळातले मानमरातब प्राप्त पेशे. आम्ही जावा-जावा जेव्हा काळ्या साड्या नेसुन बाहेर निघु तर अगदी जशा वकिलाच्या सुना!

दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटातले गहू
असे ओवाळीले पाची पांडव माझे भाऊ

मोठ्या दिमाखाने ही सासुरवाशिण म्हणतेय दिवाळीच्या दिवशी माहेरी आल्यावर माझ्या पाच पांडवांसारख्या भावांना असे ओवाळीले आणि भरभरुन आशिर्वाद दिले ( भाऊ नेहमी बहिणीचा नमस्कार करतात, पण बहिण कधी भावांचा नमस्कार करत नसते एवढच काय भाच्यांनीही कधी मामाचा नमस्कार करायचा नसतो...अशी मानता होती)

दिवाळीच्या दिवशी माझ्या ताटामधे मिरे
असे ओवाळीले मायबाई तुझे हिरे

मायेला/आईलाही सांगुन ठेवते की दिवाळीच्या दिवशी तुझ्या ह्या हि-यांना मी ओवाळलेय.

माय माय करु , माय तांबानी परात
मायवाचुनि चित्त लागेना घरात

पण मधेच का आईच्या आठवणीने मन सैरभैर होतय? मुल कितीही मोठं झालं तरी आई घरात नसली की केविलवाणं होतं. म्हणुनच म्हणतात ना :
"आई म्हणजे एक नाव असतं
घरातल्या घरात एक गाव असतं"
बघा ना इथे तर ही सासुरवाशीण सासरी रमलेली आहे, एका मुलाची आई आहे तरी माहेरी आल्यावर आई दिसली नाही की कावरी बावरी होते.

मायेने दिल्या घुट्या जायफळ-एखंडाच्या
काम करी करी माझ्या दंड-बाह्या लोखंडाच्या

आपल्या आईचं कौतुक करतांना ही अभिमानानं सांगतेय की आईने लहानपणी जायफळ-वेखंडाच्या बाळघुट्या दिल्या म्हणुन आज मला कितीही काम पडु दे त्याची चिंता नाही. काम करकरुन माझे दंड लोखंडासारखे झालेत.

काम करती नारी, तुले काम करी जाऊ
माऊलीनं दूध, मी हारले ना जाऊ

पुर्वीच्या काळी स्त्रियांना दळण, कांडणं, सडा-सारवणं, धुणी-भांडी एवढी कष्टाची कामं करुन पुन्हा शेतावरही जावं लागे. इथे ही स्त्री म्हणतेय कितीही काम पडो.... मी हरणार नाही. माझ्या आईच्या दुधाचा अपमान मी होऊ देणार नाही.

भाऊ करु याही, बाप म्हने नको बाई
आताना भावजाया मान ठेवणार नाही

भावाला व्याही करायचय पण इकडे बाबा म्हणतात की नको ग बये, आताच्या भावजया मान ठेवत नाही. मुलगी दिली तरी ती कमीपणा घेणार नाहीच्...उलट भावजयीचच नाक वर राहील.

जाउ माहेराले, उभी राहु एकीकडे
भाचाले लेऊ कडे, भावजाई पाया पडे

भारतीय संस्कृतीत 'अतिथी देवो भव' असलं तरी ते तेवढचं मर्यादीत आहे. 'चार दिवसांचा पाहुणा..' असं गावाकडे म्हणतात....४ दिवसांच्या वर पाहुणे राहिले तर तो पाहुणा रहात नाही म्हणजे त्याचं तसं आदरातिथ्य ठेवलं जात नाही.सासरहुन माहेरी गेलेली मुलगी एकाकी एकीकडे उभी रहाते पण भाच्याला कडेवर घेतलं की भावजईची स्वारी खुश...मग हसत हसत ती पाय पडायला येते.

भाऊ करी याही, माले भाचीसून सोभे
तोडा पैंजनानं मन्ह तळघर वाजे

भावजाई आपली नाही तरी भाची माझी गुणाची. भावाला व्याही करुन भाचीला सून केलं तर तिच्या पैंजणांच्या मधुर आवाजानं माझं सगळं घर भरुन जाईन.

भाऊ करु याही माले पैसानी जोखम
भाची करु सून पोरी चांदीनी रकम

लखोपती भावाच्या नक्षत्रासारख्या मुलीला सुन करुन घेतलं तर तिच्या पावलांनी घरात भरभराट येइल.

गाडीमागे गाडी, एक गाडी आरशाची
भाऊले झाया लेक, चिठ्ठी आली बारशाची

दारात गाडीमागे गाडी कोणाची आलीये? हं, आरशाची गाडी म्हणजे भावाचीच. भावाला लेक झालाय त्याच्या बारशाचे आमंत्रण द्यायला भाऊ स्वतः आलाय.

नादान मनू मन्ही, तुन्हा परकराले मोती
धुळ्यात नांदती, मामा तुझे लखोपती

माझी निरागस मुलगी तिच्या परकर पोलक्याला मोती जडलेले आहेत. ऐकलस का गं धुळ्यात रहाणारे तुझे मामा लखोपती आहे म्हणुन ही हौस बरं! भावाचं कोण कौतुक!

देव रे मारुति, हा पानीना सगरले
कशी पडु पाय, दोन्ही हात घागरले

सकाळी नदीवर पाणी भरायला गेले तर वाटेतल्या मारुतिला नमस्कार करत येत नाही याची केवढी खंत वाटतेय! डोक्यावर एकावर एक २ घागरी, कमरेवर एक घागर आणि दुस-या हातात एक अशा परिस्थितीत असल्यावर मारुतिला नमस्कार करु कशी?

राम-लक्ष्मण ही तिसरी सितामाई
रामाच्या पुढे चाले हा मारुति ब्रम्हचारी


गायनं गोमतीर माझ्या अंगणी बाह्यरेला
दूर नि ओळखला माझ्या भाऊचा हिरवा शेला

गायीचं गोमुत्र गोठ्यातुन अंगणात वहातय. हा लांबुन येणारा हिरवा शेला घातलेला माणुस म्हणजे नक्की माझा भाऊच.

भाऊ जाते बहिणीच्या गाई, घोडा बांधतो जाळीला
पह्यले भेट पाव्हण्याला, मग भेटजो बहिणीला

बहिणीच्या सासरी गेलेला भाऊ आपला घोडा जाळीला बांधतो. बहिण त्याला हळुच खुणावतेय की आधी पाव्हण्याला (मेव्हण्याला) सासु सास-यांना भेटुन मगच मला भेटायला ये.
बहिणीच्या सासरी सगळ्यांचाच मान ठेवावा लागतो... नाहीतर नंतर बहिणीला टोचणुक होते. एवढ्च काय भेटायला गेलं तरी आधी मेव्हण्याची, तिच्या सासु-सास-यांची विचारपुस करावी लागते. नंतरच बहिणीला भेटता येतं.

लिंबाच्या लिंबोळ्या लिंबाखाली पसरल्या
पोटी आल्या लेकी, बहिणी भाची इसरल्या

हा थोडा तिरकस शेरा भाऊ-भावजईला की तुमच्या पोटी लेकी आल्या तर तुम्ही बहिणी भाच्यांना पण विसरलेत? पुर्वीसारखी हौसमौज होत नाही माहेरी आल्यावर.

कोण्या गाई(गावी) गेला, माझ्या पाठीचा रंगेला
असा सुना लागे, तुन्हा बैठकी बंगला

भावजईला उद्देशुन ही म्हणतेय की शेवटी घरधन्याशिवाय घराला शोभा नाही...तुझा हा बैठकी बंगला तुलाच लखलाभ होवो. माझ्या पाठचा भाऊ लांबच्या अशा कुठल्या गावाला गेलाय की त्याच्याशिवाय हा बंगला ही सुना सुना वाटतोय.

सोनाराच्या मुला, नको जाऊ देशोदेशी
हाती घेतली सांडशी, आता होतील गणपती

सोनारी कामात सांडशी किंवा पकड हा एक महत्वाचा भाग आहे. हाती घेतली सांडशी- आताच काम आलय.. हातात सांडशी घेतलीय...आणी गणपती झाले की दिवाळी दसरा म्हणजे आपली सुगी./कामं चालु होतात ...मग दुरदेशी जाण्याची का हौस तुला?

सईबहीना जोडु, माझ्या सारखी रंगिली
सगळ्यात चमकली, हुभ्या खांबाची बिजली

माझ्या मैत्रीणी माझ्यासारख्याच हौशी आहेत. लाखात एक अशी माझी सईबाई उठुन दिसते.

सईबहिना जोडु, मुसलमाननी सारजा
कपाळना कुंकू तिन्हा रामनी वरजा

खान्देश- मुसलमानी राजवटीमुळे त्यावेळच्या परिस्थितींच दर्शन अशा ओव्यातुन होतं ! खानांचं राज्य होतं ...पण हिंदु-मुस्लीम तेव्हा गुण्यागोविंदाने रहात होते. ब्रिटीशांनी नंतर यात फुट पाडली. शेजारी रहाणारी मुस्लीम सारजा हिसुद्धा माझी सईबहिणच.... तिच्या देवांनी तिला कपाळाचं कुंकू वर्ज्य सांगितलय म्हणुन काय झालं!

पंढरीच्या वाटे, कोणी लावली सुपारी
खरेदी करे हा पंढरीचा बेपारी(व्यापारी)

सरीले दळण, माझी सरती स्वस्तकी
तलवारीचा मार, हेल्याच्या मस्तकी

* हेला: रेडा. पुर्वी हेला म्हणजे रेडा याचा बळी द्यायची पद्धत होती. त्याचा संदर्भ इथे आहे.

सरीले दळण, माझी सरती आईका(ऐका)
माझ्या संगतीला, नामदेवाच्या बायका

दळण संपत आले, आता माझी शेवटची ओवी ऐका! आज अशा एकावर एक इतक्या सुंदर ओव्या सुचल्या की जणु काय माझ्या संगतीला संत नामदेवांच्या घरच्या बायका होत्या.

- ब्लॉगवर पुर्वप्रकाशित

संस्कृतीभाषासमाजराहणीआस्वाद

प्रतिक्रिया

नरेशकुमार's picture

26 May 2011 - 3:51 pm | नरेशकुमार

एकंच शब्द निघाला मुखातुन..
जब्बरदस्त !

पियुशा's picture

26 May 2011 - 4:12 pm | पियुशा

मस्त आहेत ग ओव्या :)

प्रीत-मोहर's picture

26 May 2011 - 4:29 pm | प्रीत-मोहर

मला परत वाचुन छान वाटल ग आर्या :) सही आहे

निशान्त's picture

26 May 2011 - 5:14 pm | निशान्त

एकच शब्द : अप्रतिम

ramjya's picture

26 May 2011 - 6:58 pm | ramjya

खरच अप्रतिम

शुचि's picture

26 May 2011 - 7:11 pm | शुचि

फार फार सुंदर!!!!!! धन्यवाद आर्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 May 2011 - 7:16 pm | बिपिन कार्यकर्ते

फार सुंदर!

गोगोल's picture

28 May 2011 - 6:08 am | गोगोल

.

पैसा's picture

26 May 2011 - 7:24 pm | पैसा

अहिराणी भाषेतलं आणखी वाचायला मिळू द्या!

गणेशा's picture

26 May 2011 - 7:52 pm | गणेशा

सुंदर ! आनखिन येवुद्या ...

अवांतर :
वाचायला छान असले तरी हे लिखान ओव्या नाहियेत असे वाटते. असो. त्यामुळे वाचताना येव्हडा काही फरक पडत नाहि म्हना..
पण ओव्या ही असत्या तर आनखिन मज्जा आली असती..

अतीअवांतर :
अहिराणी आणि वर्‍हाडी भाषा वेगळ्या वाटल्या तरी वाचताना किंवा ऐकताना खुप छान वाटते .

विकास's picture

26 May 2011 - 8:32 pm | विकास

खूप चांगला प्रकल्पच!

धन्यवाद. अजून येऊंनदेत! :-)

दीपा माने's picture

27 May 2011 - 1:01 am | दीपा माने

अति रुचकर जशा तुमच्या खानदेशी रेसिपी आहेत तशाच तुमच्या जात्यावरील ओव्याही!
वरचेवर दोन्हींचाही आम्हा मिपाकरांना लाभ होत रहावा.

धनंजय's picture

27 May 2011 - 1:09 am | धनंजय

या ओव्या प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद.

खुप मस्त, सरोजिनी बाबर यांनी संपादित ./ प्रकाशित केलेलं एक पुस्तक माहेरचा ठेवा की काय खुप लहानपणी वाचलंय त्याचि आठवण झालि.

विसोबा खेचर's picture

27 May 2011 - 9:21 am | विसोबा खेचर

केवळ सुरेख..!

प्यारे१'s picture

27 May 2011 - 10:09 am | प्यारे१

छान संकलन.... !

अवांतरः बॅकअप घेवून ठेवा. पुस्तक प्रकाशनावेळी उपयोगी पडणार आहे.

अमोल केळकर's picture

27 May 2011 - 10:59 am | अमोल केळकर

सुंदर खजीना !!

अमोल केळकर

रामदास's picture

27 May 2011 - 11:16 am | रामदास

मिपाद्वारे आम्हाला दिला यासाठी ध्न्यवाद. एकेक ओवी शांतपणे वाचून त्याचा आनंद घेतो आहे.

योगप्रभू's picture

27 May 2011 - 1:02 pm | योगप्रभू

खानदेशातील गृहिणींनी जपलेला हा मराठीचा खजिना पाहिला, की या भागाला खानदेश न म्हणता खाणदेश ( शब्दवैभवाच्या खाणींचा देश) म्हणण्याचा मोह होतो.

कान्हदेशावर थोर, तुम्ही कृपा केली देवा
अहिराणी बोली जणू रत्न-माणकांचा ठेवा

आर्या. खूप छान. मन भरुन पावलं. :)

श्रावण मोडक's picture

27 May 2011 - 5:43 pm | श्रावण मोडक

चांगलं काम केलंत. :)

राघव's picture

30 May 2011 - 1:27 am | राघव

अस्संच म्हणतो. :)

कर्नलतपस्वी's picture

6 Aug 2023 - 10:35 am | कर्नलतपस्वी

मुलाखत ऐकताना मर्तीकाच्या ओव्या ऐकल्या.पुढे आणखीन ओव्या शोधताना प्रविण दवणे यांनी संकलित केलेली ओवी वाचली. पुढे हा भन्नाट ओव्यांचा खजिना भेटला.

आई,मावशी ,शेजारील आया बायांना लहानपणी ओव्या गात दळण दळताना पाहीले आहे.

लेखिकेचे धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

6 Aug 2023 - 7:35 pm | चित्रगुप्त

हा अमूल्य ठेवा संकलित करून इथे मांडल्याबद्दल लेखिकेचे आणि एक तपानंतर तो पुन्हा वर आणल्याबद्दल कर्नल साहेबांचे अनेक आभार.