फाईन आर्टस्. कोणत्या? संगीत, क्रीडा, साहित्य, शिल्प, चित्र, नाट्य आणि सर्वात महत्वाची फाईन आर्ट म्हणजे पाककला..! या कला परमेश्वर सर्वांच्याच हाती देत नाही, देत नसतो. लाखोकऱोडोत एक लता होते, एक भीमण्णा होतात, एक सचिन होतो. त्याचप्रमाणे असंख्य मराठी ब्लॉग्जवर एक ब्लॉग जन्म घेतो - खा रे खा..! आणि या ब्लॉगचा कर्ता असतो माझा मित्र गणपा..!
पाककला, पाककृती, किंवा पाकक्रिया या शब्दांच्याही वरचढ एक शब्द आहे आणि तो म्हणजे पाकसिद्धी..! गणपाचं पाककौशल्य पाहिलं की त्याला या कलेतील सिद्धी प्राप्त झाली आहे असंच म्हणावं लागेल. सिद्धी असल्याशिवाय अशी देखणी, चवदार पाककृती हातातून उतरत नाही. सिद्धीला वयाचं वावडं नसावं आणि म्हणूनच इतक्या तरूण वयात गणपा 'बल्लवाचार्य' या पदास पोहोचला आहे हे सांगायला मला सार्थ अभिमान वाटतो. 'पाककलेतील सिद्धपुरुष', 'बल्लवाचार्य', 'पाकसिद्धीमहामहोपाध्याय' अश्या अनेक पदव्या आमच्या गणपाला शोभून दिसतील..!
गणपाचा खारेखा हा ब्लॉग अक्षरश: बघत राहावा असा आहे. किती नानाविध पदार्थ? तेही सचित्र, सुरेख मांडलेले..! असं म्हणतात की एखादी सुंदर नटलेली, थटलेली बाई डयरेक्ट बघण्यापेक्षा ती जेव्हा तिचा तो साजशृंगार करत असते, तिचा केशसंभार सवारत असते, खोपा घालीत असते, नाकी नथ आणि गोर्यापान दंडावर छानशी जाळीदार वाक चढवत असते तेव्हाच तिला पाहावं..! भाईकाका म्हणायचे की गाण्याच्या सुरवातीला जेव्हा वाद्य लागत असतात, तबले-तानपुरे-सारंग्या जुळत असतात ते श्रवणसुख काही औरच..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृती जेव्हा जन्म घेत असतात तेव्हापासूनच त्या पाहण्यात खरी गंमत आहे, मौज आहे, आनंद आहे. पाककृतीचं छानसं मांडलेलं साहित्य, नानाविध मसाले, कच्चामाल या सगळ्याची पूर्वतयारी याचेही अगदी स्टेप-बाय-स्टेप सुरेख फोटो गणप्याने दिले आहेत. आणि या सार्यासोबत गणपाची पाकवाणीही तेवढीच वाचनीय आणि चवदार .! :)
चला आता एक लहानशी सफरच करू या गणपाच्या या ब्लॉगची..
काय? सुरवातीलाच गरमागरम आलूपराठा खायचा म्हणता..? हा घ्या..
हे त्याचं नटणं-थटणं पाहा किती लोभसवाणं..
आणि हा घा तैय्यार आलूपराठा. हा वाढताना गणपा म्हणतो - " ताज्या ताज्या दह्या /लोणच्या बरोबर , आवडी नुसार तळलेल्या / कच्या मिरच्यांसोबत लुफ्त घ्या गरमा गरम आलु के पराठे का " :)
आता काय? डायरेक्ट दम बिर्याणी खायची म्हणता? अहो थांबा थांबा, जरा तैय्यार तर होऊ द्या. तिला जरा 'दम'देणं सुरू आहे..! :)
हम्म.. आता खा मनसोक्त... :)
तुम्हाला जयपूर गायकी आवडते का? म्हणजे तुम्हाला अनवट राग आणि अनवट पदार्थ नक्कीच आवडत असणार..! त्याकरता ही घ्या खास तुमच्याकरता सुरणाच्या वड्यांची देखणी पूर्वतयारी.. तेलात सूर मारण्यापूर्वीचे हे सुरणाचे वडे..! तैय्यार वडे पाहायला तुम्हाला त्या ब्लॉगवरच मी पाठवणार आहे..! :)
असो..
अहो इथे किती आणि कशाकशाची झलक दाखवू? अजून खूप खूप खादाडी शिल्लक आहे गणप्याच्या ब्लॉगवर. कुठे युरोपियन डोसाच आहे, तर कुठे इदेचा शीरखुर्मा आहे. कुठे पेपर चिकन आहे तर कुठे शाकाहार्यांकरता व्हेज बिर्याणी आणि सुक्या मटणाची व्हेज व्हर्जन आहे. कुठे केळफुलाचे जोरदार कबाबच आहेत तर कुठे देशप्रेम जागृत करणारे तिरंगा कबाब आहेत. मधेच छानशी कोथंबीर वडी सजूनधजून उभी आहे! :)
कुठे उडपी उत्तपा हुशारी करतो आहे तर कुठे बोंडाची भाकरी तुमचा जीव एवढुसा करते आहे. कुठे चिकन साते, तर कुठे पात्रानी मच्छी. कुठे लाजवाब वांग्याचं भरीत तर कुठे तुमचा आत्मा थंड करणारी मलई कुल्फी..!
हा ब्लॉग निर्माण करून 'देता किती घेशील दो कराने' अशी तुमची माझी अवस्था करून ठेवली आहे गणप्याने! खरंच खूप कौतुक वाटतं, कमाल वाटते..!
या ब्लॉगवर वावरत असताना सतत कुठेतरी एक प्रसन्नता डोकावत असते. ती एकापेक्षा एक अजोड पाकशिल्प पाहताना त्या मागे असलेला दैवी परीसस्पर्श सतत जाणवतो..
आमचे अण्णा माडगुळकर म्हणतात-
या वस्त्राते विणतो कोण?
एकसारखी नसती दोन
कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्याचे..!
त्याचप्रमाणे गणप्याच्या पाककृतींमागे असलेले साक्षात आई अन्नपूर्णेचे अदृष्य हात आपल्याला दिसत नाहीत इतकंच..!
-- तात्या अभ्यंकर.
प्रतिक्रिया
29 Mar 2011 - 4:33 pm | सुधीर१३७
अहो तात्या,
लेख संपूर्ण वाचल्यामुळे गैरसमज टळला......... :wink:
29 Mar 2011 - 5:27 pm | वपाडाव
हेच म्हंतोय...
पाकसिद्ध - मला वाटलं सकाळच्या पाकड्यांसारखं प्रकरन आहे की काय ?
आलु प्रटा खाउन तृप्त झालेला....
29 Mar 2011 - 4:34 pm | असुर
तात्या, मस्त लिहीलंय. भूक लागली, जे मिळेल ते हादडून येतो!!
गणपाभौ, किती दिवस असं ब्लॉग बघत जिभल्या चाटत बसायचं आम्ही? एकदा जोरदार पंगत होऊन जाऊद्या की!!!
--असुर
29 Mar 2011 - 4:36 pm | विकास
"पाकसिद्ध" बल्लवाचार्य गणपा, असे वाचले आणि वाटले की गणपाशेटनी मा. मनमोहनसिंगांच्या पाठोपाठ "फूड डिप्लोमसी" चालू केली की काय? ;)
29 Mar 2011 - 4:40 pm | रेवती
लेखन छानच!
गणपा आपल्या गावचा रहिवासी असावा असे सगळ्यांना वाटते.
गणपाचे कौतुक वाटते. स्वयंपाकाची आवड कशी निर्माण झाली?
किंवा वयाच्या कितव्या वर्षापासून तो स्वयंपाक करू लागला?
गणपाने यावर आता लिहावे असे वाटते.
29 Mar 2011 - 11:05 pm | निनाद मुक्काम प...
पाक कृती आख्यान
31 Mar 2011 - 2:22 pm | हरिप्रिया_
++१
>>गणपा आपल्या गावचा रहिवासी असावा असे सगळ्यांना वाटते.
:) अगदी मनापासून...
29 Mar 2011 - 4:40 pm | विजुभाऊ
तात्या झाकास रे मस्त ओळख करून दिलीस गणपाच्या ब्लॉग ची
29 Mar 2011 - 4:42 pm | sneharani
मस्त लिहलय! ब्लॉगपण मस्त आहे!
29 Mar 2011 - 4:43 pm | गणेशा
मस्त
29 Mar 2011 - 4:48 pm | छोटा डॉन
संपुर्ण सहमत आहे.
गणपा आहेच तसा गुणी ...
- छोटा डॉन
29 Mar 2011 - 4:55 pm | नगरीनिरंजन
खरं आहे. गणपाभौला माझा सलाम!
29 Mar 2011 - 6:14 pm | सखी
खरं आहे. गणपाभौला माझा सलाम! - असेच म्हणते.
लेख छान झालाय तात्या, मागे कोणीतरी बहुदा पावभाजीच्या पाकॄवर म्हटलं होतं की गणपाने कढईतसुद्धा भाज्यांची रंगसंगती केली होती - खरचं कला हातात असेल तर असं होत असणार. ब्लॉगही छानच झालाय :)
यानिमित्ताने तुम्ही लिहीते झालात म्हणुन बरेही वाटले :)
29 Mar 2011 - 6:34 pm | निवेदिता-ताई
एकदम झकास...........असेच म्हणते...:)
ब्लॉग खूप्प्प्प्प् आवडला..!!!!!!!
29 Mar 2011 - 5:14 pm | इंटरनेटस्नेही
मस्त! गणपा रॉक्स!
29 Mar 2011 - 7:50 pm | स्पा
लहानपणीचा गणपा
29 Mar 2011 - 5:16 pm | कच्ची कैरी
लेख पूर्ण वाचला नाही कारण आधीच फोटोंवर नजर पडली आणि बाकी लेख वाचायचाच राहिला ;)
29 Mar 2011 - 11:32 pm | स्मिता.
माझंसुद्धा असंच झालं. चित्रांवर नजर पडली आणि पुढचा लेख वाचलाच नाही.
तसेही आम्ही गणपाभाऊंचे फॅन आहोतच...
29 Mar 2011 - 5:36 pm | ५० फक्त
लई भारी, श्री. गणपा यांना मी आधीच गुरु केलेलं आहे, त्यामुळं या गुरु सत्कारासाठी तात्यांचे आभार.
29 Mar 2011 - 5:41 pm | प्रीत-मोहर
मस्त!!!
29 Mar 2011 - 5:44 pm | इरसाल
जोरदार सहमत.....................
गुरुवर्य गणपामहाराजान्चा विजय असो.
29 Mar 2011 - 5:56 pm | प्रसन्न केसकर
असशील तेथुन तातडीने परत ये आणि पाककृती टाकायला सुरुवात कर.
तुझ्या पाककृती नसल्याने मिपा अगदी बेचव झालेले आहे. (जरी निवेदिता ताई वगैरे मंडळी पाककृती टाकत असले तरी पाककृती विभागाची तर्री जरा अळणीच होत आहे.)
तू येथे येऊन पाककृती टाकत नसल्याने सर्व सदस्य वेडेपिसे झालेले आहेत. केशवसुत सारखी मंडळी तुझ्या आठवणीने व्याकुळ होऊन इथे विडंबन करण्याचे सोडुन पाककृती टाकु लागली आहेत. स्वयंपाकात ढ असलेल्या स्पा ने देखील काल चौपाटीवर जाऊन तिथल्या बिहारी भेळवाल्याच्या हातापाया पडुन भेळेची पाककृती मिळवली आणि आज इथे टाकली. (शेवटी भेळवाला बिहारीच निघाला. त्याने भेळेत उकडलेले बटाटे घालायला सांगीतले आणि एव्हढे कैरीचे दिवस असुनही कैरीबाबत मात्र उल्लेखही केला नाही.)
तुझ्या पाककृतींच्या गैरहजेरीने बेचैन झालेल्या आम्ही पुनम क्षेत्रावर जाणे बंद केले आहे. (सध्या आम्ही अन्यत्र असतो.)
तुझ्या पाककृतींच्या गैरहजेरीने संपादक मंडळ देखील चिंतीत आहे.
तुझे काही चुकले असेल तरी कोणी तुला काही बोलणार नाही. (याबाबत मी हमी देत नाही. स्वतः अनुभव घेऊन पहावा. परिणामांस मी जबाबदार नाही. रीत आहे म्हणुन असे लिहिलेय एव्हढेच.)
29 Mar 2011 - 7:04 pm | रेवती
खी खी खी!
29 Mar 2011 - 6:23 pm | अनामिक
अतिशय समर्पक शब्दात केलेलं गणपाचं कौतुक आवडलं!
गणपा - आता एक मस्तं रेसेपी येऊ दे बघू!
29 Mar 2011 - 7:19 pm | प्राजु
गणपा भौ!!! तू छुपा है कहा?
तुझ्या ब्लॉगवरचा लेख.. खा-रे-खा!! लगे रहो!
लवकर आता एक भन्नाट पाकृ येऊदेत.
*(सध्या रेवती बाई काहीतरी खिचडीचा प्रकार करून बघताहेत अशी बातमी समजली आहे.)* :)
29 Mar 2011 - 7:46 pm | लंबूटांग
<बोलाचीच कढी> करावी लागणार लवकरच ;)
29 Mar 2011 - 7:22 pm | विशाखा राऊत
लेख खुपच मस्त आहे.. अगदी गणपा ह्यांच्या रेसेपी सारखा
29 Mar 2011 - 7:41 pm | निनाद मुक्काम प...
गणपा
तुमची पाककला पंचतारांकीत आहे
तुम्ही आमच्या फिल्ड मध्ये हवे होता .( ज्याच्या हाती पाककला त्याला आमच्या फिल्ड मध्ये जगभरात अगदी मंदी मध्ये सुद्धा भरपूर मागणी असते .)
29 Mar 2011 - 8:13 pm | गणपा
बाबांनो उगाच हरभर्याच्या झाडावर चढ्वु नका. :) (सध्या वडाच्या झाडाला ही माझं वजन पेलवणार नाही. ;))
आजवर जे काही केलय ते तुम्हा मायबाप मिपाकरांच्या प्रोत्साहना आणि कोड-कौतुका मुळेच.
मिपावर येउन काल ३ वर्षे झाली. या निमित्ताने काही गोड धोड सादर करायचा बेत होता. पण सध्या कामत पुरता बुडालो आहे. तेव्हा क्षमा करा.
पण जशी सवड होईल तस काही-बाही घेउन येईनच तुमच्या दारी. तोवर आहे तो लोभ असाच वृद्धिंगत व्हावा हीच मनोकामना.
:)
29 Mar 2011 - 11:13 pm | नंदन
--- तीच आठवण करून द्यायला आलो होतो ;)
30 Mar 2011 - 10:02 am | प्यारे१
गणपा तीन वर्षांचा झालास.... !!!
मोठा हो बाळा आणखी मोठा हो...!!! (आकाराने नाय रे! )
गणपाची पाकृ म्हणजे डोळ्यांना मेजवानी असते.
दुधी हलव्याचा रंग ही त्याच्या पाकृना नजर लागू नये म्हणून लावली गेलेली हिरवी तीट जणू. ( मुद्दामच सांगतोय)
जेवण कसे सजवावे हे गणुदादाकडून शिकावे.
उदरभरण नोहे जाणिजे 'ईव्हेंट मॅनेजमेंट' . सगळे कसे नीट्नेट्के.
बास्स का रे? आता बिर्याणी नक्की ना?
29 Mar 2011 - 11:37 pm | पैसा
ब्लॉग बघायचा होता, म्हणून अजूनपर्यंत काही प्रतिक्रिया लिहिली नव्हती, आता ब्लॉग पाहिल्यावर लिहायला काही शब्द नाहीत!
30 Mar 2011 - 12:44 am | इंटरनेटस्नेही
.
29 Mar 2011 - 11:52 pm | संदीप चित्रे
सुरेख पाकृंबद्दल एक छान प्रसन्नसा फील देणारा लेख लिहिल्याबद्दल धन्स रे तात्या !
बाकी 'गणपा' म्हणजे झिंदाबाद आहे ... बाकी काय बोलणार !
30 Mar 2011 - 5:42 am | पिंगू
गणपा गुरु की जय. नाहीतरी मी पण तिथूनच प्रेरणा घेतली आहे ना..
- पिंगू
30 Mar 2011 - 10:47 am | पियुशा
क्या बात !
क्या बात !
क्या बात !
:)
30 Mar 2011 - 11:00 am | अमोल केळकर
खुप छान ब्लॉग आणि लेख ही :)
गणपा शेठ अभिनंदन
अमोल केळकर
30 Mar 2011 - 1:39 pm | प्राची
तात्या, काय मस्त ओळख करून दिलीत 'खा-रे-खा' ची!
गणपा शेठ, ब्लॉग अतिशय सुंदर आहे तुमचा.
आजच तुमच्या ब्लॉगवरचे आलू पराठे केले..मस्त मस्त झाले..आता दर सुट्टीच्या दिवशी तुमच्या ब्लॉगवरचा एकेक पदार्थ करणारे..
31 Mar 2011 - 3:51 pm | विसोबा खेचर
ये हुई ना काम की बात.! :)
प्राची, तुला सर्व पदार्थ करून पाहण्याकरता शुभेच्छा...
असो,
सर्व प्रतिसादी खाद्यरसिकांचा मी ऋणी आहे. वाचनमात्रांचेही औपचारीक आभार मानतो..
(गणपाचा फॅन) तात्या.
30 Mar 2011 - 2:22 pm | नितिन थत्ते
च्यायला, मला पाकसिद्ध म्हणजे पाकिस्तान सरकारने पुरस्कारलेले असं वाटलं. (ह घ्या)
30 Mar 2011 - 2:23 pm | दीविरा
ब्लॉग छान आणी त्यावरचे लिखाणही :)
कौतुक होतेच आता वाढले :)
सगळे प्रकार मस्त :) फोटो तर अहाहा :)
असेच लिहीत जा
30 Mar 2011 - 5:46 pm | चतुरंग
मस्तच ओळख करुन दिली आहे तात्याने! :)
-गणपामित्र रंगा
31 Mar 2011 - 1:45 pm | प्राजक्ता पवार
मस्तं !
31 Mar 2011 - 5:41 pm | अविनाशकुलकर्णी