अगम्य (उकल)

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
18 Mar 2011 - 9:31 pm

अगम्य
पूर्वसूत्रः थोडं पुढं गेलो आणि समोरून मोहम्मदने सलाम घातला तेव्हा थोडं चुकचुकलं मनात. थोडं पुढं जाऊन थांबलो आणि वळून पाहिलं. वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून बायकोचा चेहरा डोकावत होता. केस पिंजारलेले, डोळे विस्फारलेले आणि एकटक रस्त्यावरून चाललेल्या मोहम्मदकडे पाहणारे.
पुढे

मोहम्मद आपला स्वत:च्याच तंद्रीत असल्यासारखा एका हातात किराण्याची जड पिशवी घेऊन चालला होता. घरासमोर आल्यावर तो थांबला आणि नकळत की मुद्दाम कोण जाणे घराकडे तोंड करून खाली मान घालून उभा राहिला. त्याची माझ्याकडे पाठ असल्याने तो काय करतोय ते मला कळत नव्हते. त्याचा मोकळा हात त्याने खिशात घातला एवढं मला कळलं आणि त्याने खिशातून काही तरी काढलं. काय ते मला कळलं नाही. मी पुन्हा वर पाहिलं. बायको अजूनही खिडकीत उभी होती आणि भूत पाहिल्यासारखा तिचा चेहरा पांढराफटक पडला होता. डोळे विस्फारलेले तसेच आणि मोहम्मद कडे पाहताना तिची पापणीही लवत नसावी. मोहम्मद तिथेच उभा राहून आता इकडे तिकडे पाहू लागला आणि हात आपल्या अंगाआड धरून तो बायकोला काही तरी दाखवतोय असं मला वाटलं. माझं डोकं गेलं.
"एऽऽऽऽय", मी घसा ताणून ओरडलो आणि स्कूटर जागीच टाकून मोहम्मदच्या दिशेने धावलो. कोण ओरडलं आणि काय झालं हे त्याला कळायच्या आत मी त्याच्या समोर उभा होतो. त्याची गचांडी धरून मी त्याला माझ्याकडे खेचला. त्याचा तो पठाणी कुर्ता सगळा गोळा झाला आणि माझ्यापेक्षा अर्ध्याफुटाने उंच असल्याने त्याला पाठीत वाकून झुकावं लागलं. माझ्या या अनपेक्षित कृतीने तो एकदम गडबडला आणि प्रचंड घाबरला. शिवाय माझ्या इतक्या मोठ्या ओरडण्याने रस्त्यावरच्या इतर लोकांचेही लक्ष वेधले गेले आणि काही क्षणांतच आमच्याभोवती गर्दी जमली.
"क् क् क्या हुवा साब?" चाचरत मोहम्मद म्हणाला. जमा झालेल्या सगळ्या लोकांकडून मार खावा लागण्याची भीती त्याच्या डोळ्यात साकळली होती.
माझा संतापाचा भर आता थोडा कमी झाला होता. आता कुठे माझे लक्ष त्याच्या दुसर्‍या हाताकडे गेले. त्याच्या त्या हातात एक कागद होता.
"क्या कर रहे थे?", रागाने आणि उतेजनेने थरथरणारा माझा आवाज स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करत मी विचारले.
"कुछ नही साब, ये ऐड्रेस ढूंढ रहा हूं," मोहम्मद म्हणाला.
त्याने पुढे केलेल्या कागदावर मी नजर टाकली. रतनशेटच्या अतिगचाळ अक्षरात त्यावर चार घरं पलीकडे राहणार्‍या पोतदारांचा पत्ता होता. मला एकदम गळून गेल्या सारखं झालं. मी त्याची गचांडी सोडली आणि त्याला हातानेच दिशा दाखवून तोच हात कपाळावर ठेवून त्याच्याआड डोळे मिटून घेतले. जमा झालेले लोक पांगताना एक अप्रकट निराशेचा सूर मला तरीही जाणवलाच. दोन क्षणच मी तसा उभा असेन आणि मी एकदम खाडकन डोळे उघडून वर बायकोकडे पाहिले. ती पडद्याला धरून कशीबशी उभी होती आणि तारवटलेल्या डोळ्यांनी माझ्याकडे पाहत होती. मी वर पाहिल्यावर मात्र तिचे त्राण संपले आणि ती एकदम मागे झोक जाऊन खिडकीतून दिसेनाशी झाली. मी दाराकडे धावलो.

त्या प्रसंगानंतर तर बायकोने अंथरूणच धरले. आधीच सावळा असलेला तिचा चेहरा निस्तेज होऊन बघवेनासा झाला. केस पांढरे झाल्याने ती माझ्यापेक्षा दहा वर्षांनी म्हातारी दिसू लागली. शेवटी डॉक्टरी सल्ल्याने मी तिला हवापालटासाठी बाहेरगावी महिनाभर तरी घेऊन जायचे ठरवले. आम्ही हनीमूनसाठी मसूरीला गेलो होतो म्हणून पुन्हा मी तिथेच जायचे ठरवले म्हणजे तिला जुन्या आठवणींनी बरं तरी वाटावं. मसूरीगावापासून ३-४ किलोमीटरवरचे एक रिसॉर्ट हॉटेल मी बुक केले आणि झटपट आवराआवरी करून आठवड्याभरातच आम्ही तिकडे गेलो.
सुरुवातीला एक आठवडा रिसॉर्ट सोडून बाहेर पडायचंच नाही असं मी ठरवलं होतं. उगाच कोणी लाल दाढीवाला दिसायचा आणि तिला परत अ‍ॅटॅक यायचा. आठवडाभर रिसॉर्टवरच्या निसर्गरम्य वातावरणात आणि निरव शांततेत काढल्यावर मात्र बायकोला जरा बरं वाटलं. चेहर्‍यावर जरा तुकतुकी आली आणि ती त्या लालदाढीवाल्याला विसरतेय असं मला जाणवू लागलं. मग मात्र तिला बाहेर फिरायला घेऊन जायची मला घाई झाली. मग एक दिवस आम्ही सकाळीच गनहिलवर फिरायला गेलो. दहा-साडेदहाची वेळ होती आणि मस्त कोवळी उन्हं पडली होती. बरेच पर्यटक तिथे जमा झाले होते. बायकोला एका हाताने माझ्या कवेत घेऊन आम्ही तिथे बरंच फिरलो. उंचावरून दरीतली शोभा पाहिली. दूरवर दिसणार्‍या ब्रिटीशकालीन सुंदर इमारती पाहिल्या. बायको खूश दिसत होती. मला खूप आनंद झाला. एकदा तिचा चेहरा ओंजळीत घेऊन मी तिचे हलकेसे चुंबन घेतले. ती लाजली. मग मी विषय बदलत म्हणालो,"तू इथे बस मी आपल्यासाठी लिचीची फळं आणतो."
तिने आनंदाने मान डोलावली आणि रस्त्याच्या कडेला एक दगडावर बसून खाली दरीकडे पाहू लागली. मी साधारण दोनशे मीटर जाऊन फळवाल्याकडून लिची घेतल्या. एक लिची तोंडात टाकून मी वळालो आणि बायको बसली होती तिकडे पाहिले. समोरचं दृष्य पाहून माझ्या हातापायातून जणू वीज सळसळली. बायको थरथर कापत उभी होती. तिची मान लटलट कापत "नाही, नाही" म्हणावं तशी हालत होती, सगळं अंग थरथरत होतं आणि ती एकेक पाऊल मागे टाकत होती. तिच्या समोर पंधरा-वीस फुटावर तो उभा होता. मोहम्मद? की त्याच्यासारखा दिसणारा कोणी? तो तिच्याकडे का जातोय? मी हातातली पिशवी टाकून धावत सुटलो. "एऽऽऽऽऽऽऽय," मी खच्चून ओरडलो. आजूबाजूचे लोक थबकून माझ्याकडे पाहू लागले पण मी मात्र फक्त बायकोकडेच बघत होतो. ती एकेक पाऊल मागे टाकत दरीकडे जातच होती. निम्मं अंतर धावून गेल्यावर मी थबकलो आणि पुन्हा खच्चून ओरडलो, थांऽऽऽऽब". त्या ओरडण्याने माझा घसा खरवडला गेला आणि पुढे दिसणार्‍या दृष्याने माझ्या डोळ्यात खळ्कन पाणी आलं. मी पुन्हा पळायला पाऊल उचललं पण त्याच क्षणी बायको खाली खोल दरीत पडताना मला दिसली. माझ्या हातापायातलं त्राण गेलं आणि मी कोसळलो.

शुद्धीवर आलो तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होतो. जाग आल्या आल्या मी ताडकन उठून बसलो. नर्सने ते पाहताच लगबगीने माझ्या जवळ आली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवला. मी प्रश्नार्थक मुद्रेने तिच्याकडे पाहिले. तिने नकारार्थी मान हलवली आणि मग खाली घातली. मी दोन्ही हातांनी डोळे झाकून रडू लागलो आणि ती फक्त माझ्या खांद्यावर हात ठेवून उभी राहिली.
बायकोचा अंत्यसंस्कार वगैरे सगळं तिकडेच उरकून मी पुन्हा घरी आलो. आल्यावर आधी रतनशेटला भेटलो. त्याने छातीवर हात ठेवून मोहम्मद कुठेही गेला नसल्याचे सांगितले. मला काहीच कळेनासे झाले होते. तो माणूस मी खरंच पाहिला की तो भास होता हे माझे मलाच कळेना. मसूरीच्य पोलिसांनी अपघाती मृत्यु अशीच नोंद केली होती ती मी काही बदलायला लावली नाही. एनीवे तो माणूस कोण होता हे कळल्याने बायको परत थोडीच येणार होती?
बायकोच्या दु:खात सहा महिने असेच गेले. या सहा महिन्यात मी ऑफिसात किंवा बाहेरही कोणाशीही बोललो नाही की हसलो नाही. कामापुरतं काम. लोक हळहळायचे. सहानुभूति दाखवायचे. पण मी बधलो नाही. सहा महिन्यांनी एकच जरा चांगली गोष्ट झाली. सहावर्षांपुर्वी काढलेल्या बायकोच्या विम्याचे कोटी-दीडकोटी रुपये हातात आले. मग मात्र मी या गावात तिच्या आठवणींचा छळवाद सहन करत राहायचं नाही असं ठरवलं. महिनाभर नोकरीसाठी खटपट करून सिंगापूरला नोकरी मिळवली. जाण्याआधी मोहम्मदला जो पोलिसांचा वगैरे त्रास झाला त्याबदल्यात त्याच्या मुलाच्या किडनीच्या ऑपरेशनसाठी पाच लाख रुपये दिले.
विमानात बसल्यावर मनावरून एक ओझं उतरल्यासारखं झालं. घर, जमीन वगैरे होतं नव्हतं ते सगळं विकून मी ते गाव, तो देश सोडून चाललो होतो. बायकोच्या आठवणी माझा पाठलाग करणार नाहीत अशा ठिकाणी. विमानात छानपैकी शँपेन पिऊन स्वप्नविरहीत झोप काढली आणि फ्रेश होऊन सिंगापूरच्या चकाचक विमानतळावर उतरलो. आता खूपच हलकं हलकं वाटत होतं. इमिग्रेशन चेक वगैरे झाल्यावर बॅगा घेऊन बाहेर आलो आणि जागीच स्तब्ध झालो. समोर ती हसत उभी होती......माझी सविता.
(समाप्त)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

आग्ग्गाआगा?

विश्वास घात? सरळ सरळ?

काय जमलीय. व्वा!! पैकी च्या पैकी मार्क तुम्हाला नगरी.

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2011 - 9:52 pm | नगरीनिरंजन

धन्यवाद! :-)

पुष्करिणी's picture

18 Mar 2011 - 10:07 pm | पुष्करिणी

+१ असंच म्हणते ,
मजा आली वाचताना

गोगोल's picture

18 Mar 2011 - 9:46 pm | गोगोल

छान लिहिलय .. पण असा शेवट होणार याची कल्पना आली होती.

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2011 - 9:56 pm | नगरीनिरंजन

हो. अशा कथा वाचणार्‍यांना हे काही नवीन नाही. पहिल्या भागानंतरच बर्‍याच जणाना कळलं असेल असं वाटलं. पहिला भाग ज्याना अगम्य वाटला त्यांनी अभ्यास वाढवण्याची गरज आहे. :-)

मराठे's picture

18 Mar 2011 - 9:54 pm | मराठे

अफलातून!

होय ननि, जोर का धक्का धीरेसे लगा
शेवट अपेक्षित होता :)

पण मांडणी झकास

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 10:12 pm | धमाल मुलगा

भारी कलटी दिली की. :)

शेवट अपेक्षित नव्हता. (अभ्यासाबाबत आम्ही नेहमीच ढढ्ढोबा. :) ) मला वाटलं आता कथानायकालाही तो लाल दाढीवाला दिसायला लागतो की काय आणि पुढं एकतर भुताटकी नाहीतर नायकही ठार वेडा होऊन जाणं वगैरे... :)

पैसा's picture

18 Mar 2011 - 10:17 pm | पैसा

शेवट अपेक्षित, पण कथेची मांडणी मस्त! आणि क्रमशः च्या पुढे जास्त वाट बघावी लागली नाही हे अजूनच छान!

पण नवरोबाच चालू नीघाल्यामूळे जीवात जीव आला ;)

रेवती's picture

19 Mar 2011 - 1:10 am | रेवती

आँ????

जसं की तीलाच फक्त सवीता (थारोळ्यात)दीसली, व तो लाल दाढीवाला दीसायचा/भीती वाटायची वगैरे वगैरे...व त्यामागे नवर्‍याला वेड्यात काढणे वा इतर काही कारणे आहेत असे वाटत होतं... एकदा समग्र हीचकॉक वाचलं गेलं की आपलाही माझ्यावर वीश्वास बसेल की हो हे शक्य आहे , पण कथेचा शेवट हा नवर्‍याने बायकोला फसवीण्यात झाला... म्हणून जीवात जीव आला ... तसंही नवरे म्हणजे काय इथून तीथून असेच असतात. (म्हणजे तसे रंगवले जातात हो अशा कथेमधे)

नितिन थत्ते's picture

18 Mar 2011 - 10:42 pm | नितिन थत्ते

शेवट कैच्याकै वाटला.

वाट पहायला न लावल्यामुळे धन्यवाद!
ष्टुरी खूप आवडली.
शेवट वाचून राग आला.....त्या बुवाचा!
शेवटी बायको दरीत पडण्याआधी असतो तो बुवा कोण असतो?

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2011 - 9:58 am | नगरीनिरंजन

>>शेवटी बायको दरीत पडण्याआधी असतो तो बुवा कोण असतो?

तो मला वाटतं मोहम्मदचा भाऊ की मेव्हणा होता. आता एवढं आठवत नाहीय ;-) कथा आवडली हे वाचून आनंद झाला.

अनामिक's picture

19 Mar 2011 - 1:19 am | अनामिक

चांगली जमलीये कथा. अवडली!

शिल्पा ब's picture

19 Mar 2011 - 2:10 am | शिल्पा ब

चांगली लिहिलीए कथा. आवडली.

अरुण मनोहर's picture

19 Mar 2011 - 5:45 am | अरुण मनोहर

छान जमली आहे.

कथेची कल्पना छान आहे पण जर जी व्यक्ती प्रसंग सांगते आहे तिला सर्व माहित असेल तर बायको घाबरण्याचे प्रसंग वगैरे कथेत सुट होत नाही. ह्या ऐवजी कथेत तिसरी व्यक्ती जिला कटाची कल्पना नाही तिच्याकडुन कथा वदवली असतीत तर योग्य झाले असते असे वाटते.

मन१'s picture

19 Mar 2011 - 8:02 am | मन१

.......
सी आय डी चा एक एपिसोड पाहिल्यासारखं वाटलं.

आपलाच,
म्नोबा.

चतुरंग's picture

19 Mar 2011 - 9:34 am | चतुरंग

मी पहिल्या भागानंतर विचार केला परंतु शेवट लक्षात आला नाही. खरेतर लक्षात यायला हरकत नव्हती असे वाटते.

-रंगा

पटकन संपवलेली छोटीशी छानशी गोष्ट. मजा आली वाचुन.

sneharani's picture

19 Mar 2011 - 10:12 am | sneharani

मस्त कथा!

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2011 - 10:44 am | पिवळा डांबिस

कथेच्या पूर्वार्धाच्या मानाने उत्तरार्ध अतिशय सामान्य वाटला....
स्पष्टोक्तीबद्दल क्षमस्व!
पुलेशु...

सहज's picture

19 Mar 2011 - 11:24 am | सहज

कथा फसली असे वाटले.

शिल्पा ब's picture

19 Mar 2011 - 6:01 pm | शिल्पा ब

का हो?

प्रीत-मोहर's picture

19 Mar 2011 - 11:28 am | प्रीत-मोहर

मस्त.............:)

शेवट अंदाज लाग्ला होता..पण मस्त लिवलय

आवडली.

दोघांपैकी कोणीतरी कट केला असेल..ही शंका होतीच. कट करणारा नवरा की बायको... हे फक्त पाहायचे होते...

कसेय.... हल्ली च्या काळात.... ती गायब झालेली मुलगी आणि बायको.... हे पण कॉम्बिनेशन होऊ शकते ना!!! काय सांगता येत नाही.. जमाना बदल रहा है बाबा!

नगरीनिरंजन's picture

19 Mar 2011 - 12:03 pm | नगरीनिरंजन

हा हा! खरंय! या अँगलने लिहायला पाहिजे होतं. :-)

आत्मशून्य's picture

19 Mar 2011 - 7:14 pm | आत्मशून्य

असलं काही आपल्या संस्कृतीत बसेल काय ? आठवा "फायर" चीत्रपटाच्या ज्वाळा कूठं कूठं पर्यंत पोचल्या होत्या ;)

अजातशत्रु's picture

19 Mar 2011 - 4:05 pm | अजातशत्रु

तुम्च लग्न झालय का हो.....:? ;)

प्रास's picture

19 Mar 2011 - 4:28 pm | प्रास

कथा रत्नाकर मतकरींच्या छापाची वाटली.......

शुचि's picture

19 Mar 2011 - 7:56 pm | शुचि

+१