अगम्य

नगरीनिरंजन's picture
नगरीनिरंजन in जनातलं, मनातलं
18 Mar 2011 - 3:58 pm

हिला हल्ली काय झालंय तेच कळत नाहीये. गेले दोन महिने नुसती भुणभुण लावलीये डोक्यामागे. आता मला सांगा, असं स्वतःच्या गावातलं भरवस्तीतलं इतकं चांगलं स्वतःचं घर सोडून कोणी उगाच दुसर्‍या गावी जाऊन राहील का? पण नाही. हिचं आपलं एकच तुणतुणं, "गाव सोडू, गाव सोडू". का? तर म्हणे तिच्या जीवाला धोका आहे. कोणीतरी एक डोळ्याचा मारेकरी म्हणे तिच्या मागावर आहे. कुठुन हे खूळ घुसलंय तिच्या डोक्यात कोण जाणे?
दोन महिन्यांपुर्वीची गोष्ट, दळण घेऊन गेली होती गिरणीत. नेहमीची आपली ती पानसरे गल्लीतली दरेकरांची गिरणी. दळायला म्हणून गेली आणि अर्ध्या-पाऊणतासाने घाबरीघुबरी, घामाघूम होऊन धावतपळत घरी आली. आल्या आल्या संध्याकाळच्या वेळेला दारं-खिडक्या लावून घेतल्या आणि माझ्या मागं लागली पोलीस स्टेशनला जाऊ म्हणून. मला तर काही कळेचना. कसंबसं तिला शांत केलं आणि विचारलं तेव्हा कुठं धडपणे बोलली. दळायला ती गिरणीत गेली खरी पण गिरणी बंद होती आणि गिरणीच्या मागंच दरेकरांचं घर आहे त्यालापण कुलूप होतं. घरी जावं परत की त्या सुतारवाडीतल्या लांबच्या गिरणीत जावं हे तिला कळेना. दळण लगेच पाहिजे होतं असं काही नाही म्हणून दरेकर कुठं गेले विचारायला म्हणून तिनं शेजारचं दार वाजवलं, तर म्हणे एक डोळा झाकलेल्या लाल दाढीवाल्या माणसानं दार किलकिलं केलं. दरेकर कुठं गेले असं विचारल्यावर "माहिती नाही" एवढंच त्रासिकपणे तो बोलला आणि फटकन दार लावून घेतलं. तेवढ्या वेळात दाराच्या दोन-चार इंच उघडलेल्या फटीतून हिला म्हणे फरशीवर एक बाई पडलेली दिसली. रक्ताच्या थारोळ्यात. ते बघून हिची चांगलीच तंतरली आणि घाबरून ती तडक घरी आली. ती बाई दुसरी-तिसरी कोणी नसून दरेकरांची सविताच होती असं तिचं म्हणणं होतं. दरेकरांची सविता म्हटल्यावर मीही जरा सावरून बसलो. तिचं नुस्तं नाव जरी काढलं तरी लालसेची जीभ सर्वांगावरून फिरल्यासारखं व्हायचं. गावातली बरीच तालेवार मंडळी तिच्यावर आशिक होती. आता तिच्याबद्दल असं सांगितल्यावर, मनात जरा धाकधुक घेऊनच पोलीस स्टेशनला गेलो.
इन्स्पेक्टर रणदिव्यांनी बायकोचं म्हणणं ऐकून लगेच कारवाईला सुरुवात केली. तातडीनं पोलीस तिकडं गेले आणि आम्ही घरी आलो. दुसर्‍या दिवशी इन्स्पेक्टर रणदिवे थेट घरीच आले. त्यांनी सांगितलं ते विचित्रंच होतं. दरेकर मंडळी म्हणे बाहेरगावी गेली होती आणि पोलीसांनी त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्यांना तातडीने बोलावण्याची व्यवस्था केली. ते येईपर्यंत त्यांच्या आणि शेजारच्या घराचे दरवाजे उघडण्यात आले पण तिथे कोणीही नव्हतं. तरीही सगळा पंचनामा केला. कुठे रक्ताचा एक डागही नव्हता. दरेकर मंडळी परत आल्यावर कळालं की फक्त सविताला घरी ठेवून ते गेले होते पण आता सविता गायब झाली होती. नक्कीच कोणाचा तरी हात धरून पळून गेली असणार अशी मला खात्रीच पटली. पण बायको काही ऐकायला तयार होईना. तिची खात्रीच होती की तिने सविताला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं.
त्यानंतर पंधरा-वीस दिवसानंतरची गोष्ट. नेहमीप्रमाणे रतनशेटच्या दुकानातून किराणा आला. यावेळी कोणी नवाच नोकर होता, मोहम्मद म्हणून. त्याची लाल दाढी आणि एक डोळा झाकेल अशी गुंडाळलेली मफलर पाहून बायकोला पुन्हा भीतीचा झटका आला. तो आपला आला आणि गेला. त्याला काही कळालंही नसेल पण तो गेल्यावर हिने मात्र घर डोक्यावर घेतलं. "तोच तो", "तोच तो" असं वेड्यासारखा जप करायला लागली. डोळे गरागरा फिरवायला लागली. दरदरून घाम फुटलेला आणि सगळ्या अंगाचा थरकाप होतोय अशा अवस्थेत रडू लागली. आत्ताच्या आत्ता पोलीसांकडे चला म्हणू लागली. कशीबशी तिला शांत केली आणि पोलीस स्टेशनला जाऊन आलो दोघं.
दुसर्‍या दिवशी इन्स्पेक्टर रणदिवेंना फोन केला मी. ते म्हणाले की चौकशीत काहीच सापडलं नाही. त्या मोहम्मदला सविता माहिती असण्याचंही काही कारण सापडलं नाही. फोन ठेवता ठेवता बायकोला डॉक्टरला दाखवण्याबद्दल सूचक बोलले.
त्या नंतर मात्र बायकोची कटकट फारच वाढली. तो माणूस घरावरून घिरट्या घालतो असं म्हणायला लागली. मला एकट्याला कुठे जाऊ देईना. एकतर तिला घेऊन जायचं किंवा मी घरीच बसायचं असा तिचा हट्ट असायचा. शेवटी रजा टाकली महिनाभर. डॉक्टरला दाखवून झालं पण काही फरक नाही. अशा मानसिक प्रकारात लवकर फरक पडत नाही म्हणा. भीतीनं तिची अवस्था वाईट झालीये म्हणाले डॉक्टर. बीपी वाढलंय भयानक, डोळे खोल गेलेत आणि केस पांढरे झालेत. अजून जास्त भीतीचा अ‍ॅटॅक आला तर तिच्या जीवाचं बरं वाईट होण्याची शक्यता आहे म्हणतात डॉक्टर. काय करावं कळत नाहीये.
तिकडे त्या सविताचाही काही पत्ता लागला नाही. मेली असती तर प्रेत किंवा खुनाचं हत्यार किंवा काहीतरी सापडलंच असतं ना?
असो. शेवटी मात्र रजा संपली माझी. ऑफिसला जावंच लागणार म्हणून मी बाहेरून कुलूप लावून जाणार असं शेवटी ठरवलं. सकाळी बाहेरून कुलूप लावलं, लेटरबॉक्स उघडून पत्रं आलीत का पाहिलं आणि स्कूटर काढली. थोडं पुढं गेलो आणि समोरून मोहम्मदने सलाम घातला तेव्हा थोडं चुकचुकलं मनात. थोडं पुढं जाऊन थांबलो आणि वळून पाहिलं. वरच्या मजल्यावरच्या खिडकीतून बायकोचा चेहरा डोकावत होता. केस पिंजारलेले, डोळे विस्फारलेले आणि एकटक रस्त्यावरून चाललेल्या मोहम्मदकडे पाहणारे.
(क्रमशः)

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

बोंबला.. अरे काय शेवट बिवट करा की राव.. आता तो दाढीवाला आम्हाला पण दिसणार का काय?
काय नाय तर क्रमशः टाका.. हे भुत टांगुन नका ठेऊ राव!

सहज's picture

18 Mar 2011 - 4:26 pm | सहज

क्रमशः नसल्याने अजुन तरी शिर्षकाप्रमाणे अगम्य आहे!! पुन्हा एकदा सवडीने वाचेन.

राष्ट्रीय दूरदर्शनच्या जमान्यात रात्री जरा उच्च अभिरुची सिनेमे लागायचे, राष्ट्रीय पारितोषीक विजेते सिनेमे, वेगवेगळ्या भाषेतले. कधी कधी ते सिनेमे बघताना झोप यायची प्रचंड पण सिनेमा ना धड संपला असायचा की पुढे सरकला असायचा की लक्षात आला असायचा. तेव्हा कधी तरी वाटायचे की चला त्या सिनेमाच्या प्रमुख पात्राला 'रस्ता ओलाडंताना पादचार्‍याचा मृत्यु' सदराखाली मारा व संपवा सिनेमा. त्याची आठवण झाली. :-)

क्रमशः टाका हो. कथा चांगली असेल असे वाटते आहे. :-)

अरुण मनोहर's picture

18 Mar 2011 - 4:54 pm | अरुण मनोहर

कथेचे नांव आवडले
कथेसाठी अगदी योग्य!

सस्पेन्स मस्त क्रियेट झालाय

क्रमश: आहे ना

पुष्करिणी's picture

18 Mar 2011 - 4:57 pm | पुष्करिणी

शेवटी 'क्रमशः' राहिलय का लिहायच? वर निळे म्हणतात तसच, आता तो एका डोळ्याचा दाढीवाला आम्हांलाही घाबरवणार..

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2011 - 8:05 pm | नगरीनिरंजन

प्रकाटाआ.

वपाडाव's picture

18 Mar 2011 - 5:17 pm | वपाडाव

भट्टी तापत आहे....
थंड व्हायच्या आत भाकर्या-चपात्या भाजुन-शेकुन घ्या.
लौकर येउ द्या पु.ले.

अरुण मनोहर's picture

18 Mar 2011 - 5:19 pm | अरुण मनोहर

मालकांनी पैशे खर्चून स्वसंपादनाची सोय उपलब्ध करून दिली आहे, तिचा वापर करावा ही विनंती.

नगरीनिरंजन's picture

18 Mar 2011 - 8:06 pm | नगरीनिरंजन

प्रकाटाआ

बापरे!
आता पुढे काय ते लिहा बुवा पटकन.

प्रचंड उत्सुकता पुढील भागाची !!!!

आत्मशून्य's picture

18 Mar 2011 - 6:18 pm | आत्मशून्य

पू. भा. ल. टा.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

18 Mar 2011 - 6:26 pm | निनाद मुक्काम प...

क्रमश असू दे ( नव्हे असलाच पाहिजे )
नाहीतर नानि
ह्यांची मोहम्मद कडे सुपारी गेली म्हणून समजा

मग अगम्य रीत्या ननी गायब झाले म्हणून राडा नका घालू .
राडेबाज
मुक्काम पोस्ट ....

सह्हीच!
पुढचे भाग लवकर टाका!

या घाबरवणार्‍या मंडळीनी मिपा ताब्यात घेतलंय सध्या!

सॉल्लिड गुंतून ठेवतेय कथा.. ! लवकर लिहा..

पुलेशु.
आणि पुढला बहग लवकर टाका.

स्वगतः- उत्कंठावर्धक कथेचा पुढचा भाग टाकायला उशीर करणार्‍यांवर एखादं फौजदारी कलम लावावं काय?

आपलाच
मनोबा.

धमाल मुलगा's picture

18 Mar 2011 - 10:08 pm | धमाल मुलगा

वातावरण निर्मिती झकासच.
निर्‍या लिहितोय म्हणल्यावर निवांत धागा बाजूलाच काढून ठेवला होता. सवडीनं चवीचवीनं वाचायला. :)

आता पुढचा भाग घेतो वाचायला.

पिवळा डांबिस's picture

19 Mar 2011 - 12:23 am | पिवळा डांबिस

चांगली वातावरण निर्मिती!
कथा आवडत्येय! येऊ द्या!!

शिल्पा ब's picture

19 Mar 2011 - 12:37 am | शिल्पा ब

ननिंचा नविन सस्पेंस किलर थ्रीलर..पुढचे भाग लवकर टाकत चला.