जंगल दर्शन - मदुमलाई २

हरिप्रिया_'s picture
हरिप्रिया_ in जनातलं, मनातलं
18 Feb 2011 - 5:47 pm

जंगल दर्शन - मदुमलाई

आमच्या दिमतीस लवकरच दोन जीप उभ्या राहिल्या.दक्षिणेत वाहनांना अस सजवतात जणू ती त्यांची आवडती मैत्रीण किंवा दुसरी बायकोच म्हणा... त्या दोन्ही जीप पण तश्याच सजवलेल्या होत्या. पुढच्या आरश्या जवळ मोगरयाच्या फुलांचे गजरे माळले होते.आणि बाह्य भाग पण वेगवेगळ्या प्रकारे सजवायचा प्रयत्न केला होता. जीप अगदी जंगलात फिरण्यासाठीचीच होती. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्याच उत्साहाला उधाण आल. ह्यात भरीस भर म्हणून आमच्या इथून अजून एक ग्रुपपण जंगल सफारीसाठी निघत होता. त्यामुळे नळकत का होईना आमच्यात स्पर्धा सुरु झाली, कोण आधी निघतंय ह्याची. पण आमच्या खराब नशीबामुळे म्हणा किंवा किंचित आळशीपणामुळे म्हणा त्या अरुंद रस्त्यावर लावलेली पहिली जीप दुसऱ्या ग्रुपने पटकावली. आम्हाला मागच्या जीप मध्ये बसणे क्रमप्राप्त झाले. पण एकाचवेळी आमच्या जीप निघाल्या. आम्ही दंगा करायच्या तयारीत होतो आणि आमचे ड्राईव्हरदादा आम्हाला सोबत करणारे होते. त्यांनी जरासा रस्ता रुंद होताच आमची गाडी पुढे दामटवली. शत्रूपक्षावर विजय मिळवताच आम्ही जोरजोरात ओरडून आनंद व्यक्त केला, त्यांच्यासाठी मात्र असा जिंकण्याचा जल्लोष नवीनच होता. आणि तो त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला . आमचे ड्राईव्हरदादाना पण आमच्या जल्लोषमुळे नवीनच हुरूप चढला. ते मुद्दाम गाडी हळू चालवून मागच्या गाडीला पुढे यायचे आव्हान देत होते आणि योग्य वेळी वेग वाढवून आम्हाला खुश करत होते. जणू त्यांना पण खूप दिवसांनी असे त्यांच्या कौशल्याला दाद देणारे प्रवासी भेटले होते. शेवटी स्वतःचा अनेकदा पराभव झाल्यावर त्या ग्रुपने आमचा नाद सोडला आणि आम्ही त्या शर्यतीचे विजेते झालो... गाडी जशी चेकपोस्ट ओलांडून जंगलच्या हद्दीत पोहचली तसे आम्ही प्राणी पाहायला सतर्क झालो आणि जंगलाच्या अलिखित नियमांनुसार शांत पण झालो.

दुपारची वेळ असल्याने मुख्य रस्त्यावर आम्हाला कोणतेही प्राणी दिसत नव्हते. त्यामुळे जंगलाच्या आतल्या रस्त्यातून जाण्यासाठी आम्ही वन खात्याच्याच एका बसने एक तास फिरणार होतो. तिथे तरी प्राणी दिसावेत अशी मी मनोमन प्रार्थना करू लागले. पुस्तक वाचून मित्रमंडळीना सांगितलेल्या सगळ्या गोष्टी माझ्या खोट्या बाता ठरल्या असत्या, अशी भीती मला वाटू लागली. मी मनोमन कृष्णमेघ कुंटेला पण आठवू लागले आणि त्याच्या अनुभवांना पण. त्यातला एक तरी अनुभव आमच्या वाटेला येऊदे अशी कळकळीची विनवणी देवाकडे करू लागली. वनखात्याच्या बस मध्ये चढतांना आधीच्या प्रवाश्यांना काही दिसले का विचारले तर "कुछ नही दिखता, सिर्फ घूम कर आते हें " अशी उत्तर मिळाली. आता आपल्या नशिबात काय लिहिलंय बघुयात अस म्हणतच आम्ही बसमध्ये चढलो. आमच्या पाठोपाठ अजून ३ बस भरल्या आणि निघाल्या पण. थोडे पुढे जातो न जातो तोच आम्हाला हरणांचा एक कळप दिसला. सुरवात तरी गोड झाली...

हरणांन पाठोपाठ आम्हाला थोड्या अंतरावर माकड आणि नंतर पुन्हा हरण दिसली. पण मदुमलाईची खासियत असलेले हत्ती आम्हाला अजून तरी दिसले नव्हते. बस आत आत जात होती आणि निम्मा वेळ तर संपला सुद्धा होता. पण हत्ती काही दर्शन देईनात. आणि अचानक लांबवर आम्हाला काही हत्ती सहकुटुंब दिसले. बसचे ब्रेक दाबले गेले. एक छोट हत्तीची पिल्लू आणि दोन-तीन हत्तीणी दिसल्या. आणि बस अशी थांबलेली बघून त्यांनी लगबगीने गर्द जंगलाचा रस्ता पकडला. फक्त पहिल्याच बसच्या नशिबी हे हत्तींच कुटुंब होत. पण अजूनही जंगलाची शान असणारे, सुळेवाले नर काही आम्हाला दिसले नव्हते. पण आता आम्हाला नशिबाची साथ होती, थोडे अंतर जाताच एक मदमस्त झालेला सुळेवाला हत्ती आपल्याच नादात झुलताना दिसला, तो पण रस्त्याच्या अगदी कडेला. त्याला आजूबाजूला कोण आहे ह्याची मुळीच फिकीर नव्हती आणि आपल्याच नादात तो सोंडेने झाडाशी खेळत होता.सगळ्यांनी पटापट फोटो काढले आणि त्या गजराजांनी कसलेही आढेवेढे न घेता मस्त छायाचित्रिकरण करू दिले.

आम्ही खुशीने पुढे निघालो, पुढे एका छोट्या डबक्याकाठी अजून एक हत्ती कुटुंब आमची वाटच पाहत होत अस वाटल.वनखात्याच्या बसमधला प्रवास आटोपला, आम्ही पुन्हा आमच्या जीप मध्ये आसनस्थ झालो. तिथल्या मोयार नदीच्या पात्रात खूप दाट जंगल आहे आणि चिक्कार प्राणी दिसतात अस "एका रानवेड्याची शोधायात्रात" वाचल होत. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणाची नाव घेऊन ड्राईव्हरदादाना आश्चर्यचकित करत होतो आणि खुश पण...कारण ते पण त्या जंगलात पूर्ण मुरलेले होते आणि स्वतः जंगलप्रेमी पण होते. मग त्यांनी स्वतः उत्साह घेऊन आम्हाला जंगल दाखवायला सुरवात केली, एखाद्या ठिकाणी प्राणी आहे अशी शंका असली तरी चारदा रिव्हर्स घेऊन तो प्राणी नीट दिसावा म्हणून आटापिटा केला. आम्हाला जंगलाच्या खुणा वाचायला शिकवल्या.
तिथून पुढे फिरताना आम्हाला मोर दिसला, वेगवेगळे पक्षी दिसले. स्वतः धोका पत्करून आपल्या मादीला सावध करणारा आणि त्यासाठी आक्रमक झालेला सुंदर काळवीट पहिला. त्याची चिंतेने व्याकुळ मादी पण पहिली. ते दृश्य पाहून का कुणास ठाऊक पण वाटून गेले आपण उगाच येतो ह्या प्राण्यांच्या शांत आयुष्याला उद्धवस्त करायला...त्यातच मग दूरवर दिसणाऱ्या उटीच्या डोंगरांआड सूर्य निघून गेला आणि कातरवेळ अधिकच गहिरी झाली. शहरच्या गजबजाटा पासून दूर खूप दिवसांनी निवांत असा सूर्यास्त पहिला आम्ही आणि रोजची संध्याकाळ क्युबिकल मध्ये कशी जाणवतच नाही ह्याची प्रकर्षाने जाणीव झाली. मग मात्र आम्ही परतीचा रस्ता पकडला. दुपारी ह्याच रस्त्यावर कुणी दिसत नव्हते आणि परत जातांना अनेक ठिकाणी सुळेवाले हत्ती दिसले.. (जंगलाबद्दल जातांना आम्ही जास्त जागरूक झालो होतो म्हणून हे बक्षीस मिळत होत की केवळ नशीब कुणास ठाऊक?) पुन्हा आमच्या दादांनी त्यांचे सारथ्य पूर्ण पणास लावून फक्त जीपच्या लाइटच्या प्रकाशात, हत्तींना बिथरू न देता शक्य तेवढ्या जवळून हत्ती दाखवले. आम्हाला पूर्ण खुश करून त्यांनी आम्हाला आमच्या तात्पुरत्या निवासस्थानी पोहचवले. ..
आकाशातील चांदण्या पाहणे आणि त्या वातावरणाला साजेश्या वेगवेगळ्या गप्पा गोष्टीत (विशेषतः भुताच्या) आम्ही रममाण झालो. अचानक प्राणी आले तर काय करता येईल ह्याची मत मांडून झाली. एकाचा पाय दुखावला गेल्याने आमचा दुसऱ्या दिवशीचा जंगलात १५-२० किमी फिरायचा बेत रद्द करण्यात आला. मग पेंगाळलेले आम्ही उद्या लवकर उठून जरा जवळच फिरायचं अस म्हणत झोपायला गेलो.
आधल्या दिवशी खूप फिरल्याने आणि गुलाबी थंडीमुळे सकाळी लवकर उठणे शक्य झाले नाही. मी मात्र लवकर नसले तरी तुलनेत लवकर उठले. एका मैत्रिणीला माझ्या सोबत सक्तीने उठवून बाहेर घेवून गेले. आदल्या दिवशीच्या झऱ्यावर आम्हा दोघीनाच जायची हुक्की झाली. आम्ही दोघी तिथे निवांत पाण्यात पाय टाकून बसुयात आणि जमल्यास काही पक्षी दिसतील ते पाहूयात अस म्हणून निघालो. ५ मिनिटातच आम्ही झऱ्याच्या काठावर पोहोचलो. थोडा वेळ तिथे बसलो असू आणि लगेचच एक वनखात्यातील अधिकारी की तत्सम व्यक्ती तिथून चालत जातांना दिसली. त्यांनी हा जंगलाचा भाग आहे आणि अस बसू नका अस रागावून सांगितलं. म्हणून जरा नाराजीनेच आम्ही तिथून उठलो आणि त्यांच्या समोर तरी नाटक करूयात म्हणून जरा लांब येवून उभे राहिलो. अशीच ५-१० मिनिटे शांततेत गेली. तेवढ्या वेळात बुलबुल आणि शिंपी पक्ष्यांनी तिथे हजेरी लावली. आणि थोड्यावेळाने माझी मैत्रीण म्हणली तुला कसला तरी आवाज येतो आहे का ग? वाघाच्या गुरगुरण्यासारखा? मी तिला वेडावत म्हटले काहीतरीच काय, जंगलाच्या एवढ्या बाहेर काही वाघ येत नाही..आणि मी आजूबाजूला बघायला सुरुवात केली,खात्री करून घेतलेली बरी म्हणून.. आणि मला झऱ्याच्या दुसऱ्या काठावर काहीतरी पिवळे-काळे पट्टे असलेले जनावर दिसले...काय करायचं काही सुचेना..एकतर झपाट्याने धुके वाढत आहे अस मला जाणवलं आणि मी तिला म्हटले काहीतरी खरच दिसतंय..तिने सुदैवाने मला दाखवच असा हट्ट धरला नाही आणि आम्ही न ओरडता सुरवातीला देवळातून जस पाठ न दाखवता मागे जातात तशी माग जात माघार घेतली. आणि नंतर ८० च्या वेगाने पळायला सुरवात केली. मघाशी येताना जे अंतर कापायला ५ मिनिट लागली होती ते अंतर अक्षरशः अर्ध्या मिनिटात पार केल. दोघी पण धापा टाकत तंबू जवळ पोहचलो. आणि सगळ्यांना सांगत सुटलो, आम्ही 'दर्शनमात्रे ' अनुभवलं,आम्ही वाघ पाहिला.. आम्हाला कल्पना होतीच की आमच्यावर कुणी विश्वास ठेवणार नाहीच आहे. त्यामुळे त्यांना सांगितलं आपण थोड्या वेळाने पुन्हा तिथे जाऊ,तुम्हाला वाघ नाही पण ठसे तर नक्की पाहायला मिळतील..
१० मिनिटातच सगळे तयार होऊन वाघाचे ठसे बघायला निघालो. चुकून-माकून वाघाने अजूनही तिथेच मुक्काम ठेवला असेल तर असा विचार करत आम्ही दबकत दबकतच तिथे पोहोचलो. आणि काय आश्चर्य अजूनही वाघ तिथेच आहे की काय असे वाटले. पण वाघ एवढा वेळ एकाच ठिकाणी कसा राहिला हा विचार करत , शांत चित्ताने बघताना आमच्या लक्षात आले की तिथे पाण्याच्या प्रवाह बरोबर वाहून आणलेले कपडे, दाट वेली आणि ऊनाचा खेळ ह्यामुळे तिथे वाघ आहे हा भास होत होता. सकाळच्यावेळी धुके, मैत्रिणीला झालेला आवाजाचा भास आणि आमची वाघ दिसावा ही तीव्र इच्छाशक्ती ह्यामुळे मी तर पूर्णपणे गंडले होते...मग मात्र कुणीही मला चिडवण्याची संधी सोडायला तयार नव्हते. (जवळ जवळ २ आठवडे माझी थट्टा सुरु होती..सगळे जिकडे तिकडे मला वाघच दाखवत होते, आणि हे कमी म्हणून की काय पण स्वप्नात पण वाघ येवून गेला.. )
जरी वाघ दिसला नव्हता तरी तो दिसल्यावर होऊ शकणारी अवस्था मी पुरेपूर अनुभवली होती. आणि पूर्णपणे तृप्त मनाने नसले तरी अंशतः खुश होत, पुन्हा वाघ बघायला परत यायचंच अस मदुमलाईला वचन देऊन आम्ही परतीचा रस्ता पकडला...

हत्तींच कुटुंब

हाच तो झरा...


(काही फोटो नीट दिसले नाहीत म्हणून पुन्हा टाकत आहे.)

प्रवासमौजमजा

प्रतिक्रिया

गणपा's picture

18 Feb 2011 - 6:18 pm | गणपा

ह्ये ब्येस :)

Mrunalini's picture

18 Feb 2011 - 8:44 pm | Mrunalini

मस्त :)

आत्मशून्य's picture

18 Feb 2011 - 9:13 pm | आत्मशून्य

दूसर्‍या ग्रूपसोबत झालेल्या शर्यतीचा थरार जास्त चांगला टीपलाय (अर्थातच शब्दामधे).

छान!
हे मदुमलाइ उटी ला जाताना लागत तेच ना?

५० फक्त's picture

20 Feb 2011 - 8:48 am | ५० फक्त

जंगल वर्णनापेक्षा प्रवास वर्णनच जास्त आवडलं, असो, सुरुवात छान आहे.

बरिच वर्षे गिर ला जायचं ठरवतो आहे, या वर्षी बघतो जमतंय का ते.?

अरे वा, हेच का ते मदुमलाई जेथे एक जण वेडा झाला अन पुढे त्याचं पुस्तक वाचुन आम्ही वेडे झालो? रानकुत्री वगैरे दिसली की नाही? बाकी जळजळ झाल्याने वर्णन पुर्ण वाचु शकलो नाही. ;-)

चिंतामणी's picture

20 Feb 2011 - 2:52 pm | चिंतामणी

फोटु टाकायला जमले तर.

मग.. अजूनपण स्वप्नात वाघ येतो काय????...:प

अमोल केळकर's picture

21 Feb 2011 - 3:32 pm | अमोल केळकर

सुंदर वर्णन

अमोल केळकर

एकदम मस्त लिहिले आहे. मजा आला

गणेशा's picture

21 Feb 2011 - 8:32 pm | गणेशा

अतिशय छान .. मस्त वर्णन..

फिरत रहा .. त्या पावलांच्या ठस्यावर कधीतरी आमची पावले पडतीलच

अवांतर : कालच रतनगड ला जावुन आलो .. पण फोटो डकवणे अआनि लिहिणे लगेच जमणे अवघड वाटते आहे,
हे वाचल्याने असे वाटते आहे लिहुन तरी बघावे ..

धन्यवाद

हरिप्रिया_'s picture

22 Feb 2011 - 10:46 am | हरिप्रिया_

सर्वांना मनापासून धन्यवाद...