http://misalpav.com/node/14941
कार सिहंगडच्या दिशेने निघाली..
जाताना आम्ही पेट्रोल भरायला थांबलो. सिगरेटची तल्लफ भागवायचे कारण दाखवून मी सुन्याला जरा बाजुला नेले. त्या अनायासेच लाभलेल्या एकांतात त्याला "तू काही धतिंग-शुटिंग तर केली नाही ना?" असे विचारुन घेतले. त्याच्यावर अविश्वास दाखविण्याचे कारण नव्हते; पण विचारणा करणे मला आवश्यक वाटले. सुन्या हा एक पुरुष होता आणि पुरुषाच्या कधी ना कधी भावना उचंबळून येतात हे धडधडीत सत्य आहे. त्यावर कोणी ताबा ठेवू शकतो तर कोणी ठेवू शकत नाही. पण सुन्याच्या उत्तराने माझे समाधान झाले.
"मला घाई करायची काहीच गरज नाही." हे खरे होते. दोघांच्या घरी त्यांच्या संबधाबाबत सहमती होती.
पायथ्यापासून थोडेसे वर गेल्यावर, डाव्या बाजूला, कारने पुढचा प्रवास अशक्य असल्याने, कार पार्क करावी लागली. हातात टॉर्च घेउन सर्वात पुढे सुन्या, त्याच्यामागे तिचे पप्पा, सर्वात मागे मी असे आम्ही त्या पायवाटेने निघालो. अगदीच काळोख नव्हता. पण एखाद्या नवीन माणसाची तंतरावी इतपत अंधार मात्र नक्की होता. ती लहानशी पायवाट, आजूबाजूला वाढलेली झुडपे, रातकिड्यांची किरकिर, त्या वातावरणाच्या भयानकेत भर टाकीत होती. त्या गूढ वातावरणाचा परिणाम अनघाच्या पपांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता. पण मुलीच्या काळजीने जीव मुठीत घेउन ते चालत होते. त्यात ती सापडते की नाही ह्याची चिंता जास्त.
वीस-पंचवीस मिनिटे चालल्यावर, झाडाखाली बसलेली तिची आकृती स्पष्ट होऊ लागली. होय, ती तिच होती. शांतपणे बसलेली. दोन्ही हात गुडघ्यावर ठेवून, समोरच्या कातळाकडे एकटक बघत होती. ज्या झाडाखाली ती बसली होती ते झाड विचित्र होते. साधे कडुनिंबाचे झाड, साधारण वीस एक फूट वाढलेले असावे, हाताचा पंजा सरळ उभ्या रेषेत जमीनीवर ठेवावा आणी हाताची बोटे डाव्या बाजूला आकड्यासारखी जमिनीकडे वळलेली असावी असा त्या झाडाचा आकार होता. आम्ही तिच्या एकदम नजिक पोचलो. पण तिची नजर मात्र ढळली नाही. टॉर्चचा प्रकाश तिच्या डोळ्यांवर चमकला, मात्र तिची पापणी देखील लवली नाही. मी त्या काळ्याशार कातळाकडे पाहिले. मला क्षणभर भांबावल्यासारखे झाले.
"अनघा... अनघा" तिच्या पप्पांनी तिला हाक मारल्याने मी भानावर आलो. पण ती मात्र जागची हलली नाही. शेवटी तिच्या पप्पांनी तिला हाक मारत-मारत गदागदा हलविले. झटका बसल्यासारखी तिने मान आणि नजर फिरविली, सर्वांकडे कटाक्ष टाकला. तिने तिच्या पप्पांना ओळखले असावे. "पप्पा... पप्पा" म्हणत लहान मुलासारखी त्यांच्या कुशीत शिरुन रडायला लागली. तिचे पप्पा तिची समजूत घालत होते. "नाही ग बेटा. रडायचं नाही, चल आपण घरी जाउ." पण ती रडतच होती, आणि रडता-रडता ती अचानकच शांत झाली. डोळे बंद केले. तिच्या पप्पांनी घाबरत तिची नस चेक केली. तिचा श्वास चालू होता.
"शी ईज ब्रेदीग, आपण लवकरात लवकर हॉस्पिटलला जायला हवे." त्यांनी तिला उचलले. आम्ही धपाधप पावले उचलत कारच्या दिशेने निघालो.
ओळखीचे डॉक्टर असल्याने रुबी हॉलला जायचे ठरलं. त्या साधारण तासाभराच्या प्रवासात, मागच्या सीटवर, सुन्याच्या मांडीवर डोके ठेऊन पडलेल्या अनघाच्या तोंडून, क्षीण आवाजात "पप्पा.. पप्पा... मला... झोपायचंय" इतकेच शब्द तुटकपणे दोन-तीनदा बाहेर पडले. कार रुबी हॉलच्या मेन-गेटवर आल्यावर मी पटकन आत शिरलो. स्ट्रेचर मागविले. त्यावेळेस मला अनघाला नीटसे पहाता आले. तिची परिस्थिती खराब होती. ताप आलेला होता. सदोदित टवटवीत् असणारा चेहरा निस्तेज पडला होता. स्वप्नाळू डोळ्यांभोवती, जराशी फिक्कटच, पण काळी वर्तुळे आली होती. केस बर्याच दिवसापासून सावरले नाहीत असे दिसत होते.
पेशंटच्या सर्व टेस्ट होईपर्यंत पहाट झाली. अनघाला आय. सी. यू. त हलविण्यात आले. त्या दरम्यान अनघाची बहीण व मम्मी इस्पितळात आल्या. साधारण आठ वाजता डॉक्टरांनी तिच्या पप्पांना बोलविले. सुन्या आणि मीही आत शिरलो.
"तिच्या रक्तात **** सापडले."
"म्हणजे?"
"ते एक प्रकारचे ड्रग आहे, ती काही ड्रग्ज वगैरै घेत होती का?"
"व्हॉट द हेल?" मी एकदम चिडलो.
"आता हे ड्रग ती घेत होती की कोणी तिला देत होते हे सांगता येत नाही, तिच्या हातावर इंजेक्शनच्या खुणा आहेत, हे घेतल्यावर माणूस काय करतोय हे त्याला स्वतःलाही कळत नाही. मला वाटते आपण पोलिसांना बोलावून घ्या."
आम्ही तिघेही चाटच पडलो. काय बोलावे, काय करावे ते सुचेना. शेवटी डॉक्टरांच्या सूचनेनुसार मी बंडगार्डन पोलीस चौकीतून ओळखीच्या हवालदाराला बोलावून घेतले. दरम्यानच्या काळात अनघाची मम्मी, पप्पा आणी बहिण थोड्याश्या शुद्धीवर असलेल्या अनघाला भेटून आले. बहीण तिथेच थांबली. सुन्याने आणि मी तिच्या पप्पांशी ड्रग्जबाबत चर्चा केली. कोणालाही त्याबद्दल अजिबात कल्पना नव्हती. मग चौकीतून शेखर आला.
शेखरने सर्व माहिती घेतली. केस केल्यावरचे फायदे-तोटे समजावून सांगितले. मुलीची कशाप्रकारे बदनामी होउ शकते, व्यसनमुक्तीसाठी काय करावे अशा बाबींवर चर्चा झाली. सरतेशेवटी तिला डिस्चार्ज मिळाल्यावर तिच्या आजीकडे, सोलापूरला हलविण्याचा निर्णय तिच्या पप्पांनी घेतला. सुन्याचे हाल मला बघविले गेले नाहीत. त्याच्या चेहर्यावर अपराधीपणाचे भाव होते. "एक चूक... फक्त एक चूक... सिंहगडाला गेलो नसतो तर इतके सगळे नसते झाले..." आमच्यापैंकी कुणीही त्याला समजावून सांगू शकत नव्हते.
पाच-एक दिवसांत अनघाबरोबर, सोलापूरला, तिच्या घरचेही गेले. सुन्या तिला दर आठवड्याला भेटायचा. ती आता थोडसं नॉर्मल वागतीये म्हणून सांगायचा. दोन महिने होत आले होते. सुन्याच्या मनालाही आता जरा शांतता होती. आणि एक दिवस अनघा सोलापूरच्या घरातून गायब झाली. थोडीशी अन-ऑफिशियल पोलीस चौकशी केल्यावर कळले की तिला सिंहगड परिसरातच शेवटचे बघण्यात आले होते. आख्ख्या ग्रुपने तो सर्व परिसर पिंजून काढला; पण ती सापडली नाही. आज सहा वर्षे झाली, अनघा बेपत्ता आहे.
भेटल्या-भेटल्या डोक्यावर टप्पू मारणारी, हातवारे करत, मान डोलावत, अंताक्षरीत "मेरे नसीबमें तू है के नही, तेरे नसीबमें मैं हूं के नही" गाणे म्हणणारी, हसता-हसता हसवणारी अनघा कुठे गेली असावी? मध्यंतरी ग्रुपमधला एकजण म्हणाला की तिच्या चेहर्याशी साम्य असलेल्या एका मुलीला "तसल्या" टाईपच्या क्लिपमध्ये पाहिल्यासारख झाल. मला ते किळसवाणे वाटले. मी ती क्लिप बघितली नाही. ह्या प्रकरणात नेमके काय झाले ते आजही मला माहिती नाही. तीन-चार महिन्यापूर्वी आणखी एक मुलगी सिहंगडावरुन गायब झाली आहे. ती अजूनही सापडली नाही. त्याही प्रकरणात काय गूढ आहे ते समजत नाही. आज नाही तर उद्या सत्य बाहेर येणारच...
पण एक सत्य, मला जर अनघा भेटली तर, सांगायचेय की एरवी, कंजारभाटात, दारुच्या गुत्यावर, सहजासहजी सापडणारा सुन्या सहा महिन्यापूर्वीच वारला.....
पुर्वप्रकाशित..
प्रतिक्रिया
15 Oct 2010 - 4:11 pm | स्पा
बापरे..............
15 Oct 2010 - 4:25 pm | विजुभाऊ
जुने लेख पुन्हा पुन्हा नव्याने का टाक्ताय
16 Oct 2010 - 11:19 am | शिल्पा ब
श्रीखंड करायला वेळ नाही मिळाला का?
15 Oct 2010 - 4:39 pm | श्रीराजे
सुन्न......!
15 Oct 2010 - 4:40 pm | गणेशा
वाचुन अंगावर शहारा आला .
काय बोलु ...
जे घडले ते वाईट होते ...
परंतु अनघा सुनील पाहिले नसले तरी डोळ्यासमोर दिसत होते वाचताना. त्यांच्या घरच्यांची स्थीती तर खुप वाईट झाली असेन.
लेखा व्यतिरिक्त मत : -
सुनिल ने ज्या पद्धतीने दारु वगैरे येव्हड्या कमी वयात चालु केले . ते ही योग्य नाही वाटले पण ..
अनघा मुळे दु:ख झाले हे मान्य पण घरचे वगैरे पण असतात असे वाटते.
असो .. कमी वय असताना बर्याच गोष्टी टाळल्या पाहिजेत असे वाटते ..
15 Oct 2010 - 5:11 pm | परिकथेतील राजकुमार
हम्म्म्म. सुन्न व्हायला झाले खरे !
15 Oct 2010 - 5:32 pm | असुर
सुहास,
काय सही लिहिलंयेस मित्रा! पण परत तेच म्हणेन, ही जर खरी घटना असेल तर फार जास्त शॉकिंग आहे रे! आणि त्याचा आफ्टरइफेक्ट सुद्धा तितकाच हृदयद्रावक आहे!
--असुर
15 Oct 2010 - 6:25 pm | सूर्य
कथा आवडली.. पण रहस्य काय आहे हे उघड केले असते तर चालले असते.. की ही सत्यकथा आहे?
15 Oct 2010 - 6:26 pm | निरंजन
बापरे भयानक आहे. ही जर सत्य घटाना असेल तर फारच भयानक. एखाद्या जवळच्या मित्राला हे सहन करणं खुप कठिण आहे.
15 Oct 2010 - 6:29 pm | अवलिया
आधी वाचली होती. परत वाचली. :(
15 Oct 2010 - 8:08 pm | नगरीनिरंजन
वाचून काटा आला अंगावर. तिला ड्रग्ज कोणी दिले हे कळालंच नाही का शेवटपर्यंत?
15 Oct 2010 - 8:17 pm | पैसा
:(
15 Oct 2010 - 8:30 pm | पाषाणभेद
भयानक कथा. माणसाच्या मनाचा एक कोपरा असाही असतो तर.
16 Oct 2010 - 12:16 am | चिगो
खरंच वाईट वाटलं..
16 Oct 2010 - 12:41 am | रेवती
दोन्ही भाग वाचले.
नक्की काय, कशामुळे झालं ते समजलं नाही.
काल्पनिक कथा असेल तर अजून भयानक होवू शकली असती.
(मीही घाबरले नाही म्हणून म्हणते आहे.) ;)
खरी असेल तर डिटेल्स द्या कि राव!
म्हणजे सिंहगडावर कुठे फिरू नये, कसे लोक असतात, फसवतात वगैरे सावधानतेचे इशारे इ.
16 Oct 2010 - 3:33 am | Pain
गोष्ट आवडली.
जर अनुभव असेल तर हे खरच वाईट आहे.
पण काही गोष्टी कळल्या नाहीत. तिल ड्रग्स ची सवय कोणी लावली ? जर ती ते नियमित घेत होती तर पाळत ठेवून पेडलरला पकडायचा प्रयत्न का केला नाही ? स्रोताबद्दल तिची चौकशी का नाही केली?
16 Oct 2010 - 6:58 am | स्पंदना
तो पांढर्या साडीचा भाग वाचताना काटा आला, पण खरा धक्का बसला तो तीच्या हातावरच्या खुणा वाचताना.
शेवट तर ह्रदय्द्रावक!!
लिखाणाची स्टाइल भावली.
16 Oct 2010 - 8:53 am | अप्पा जोगळेकर
चांगली कथा आहे. पण कथाच आहे असं वाटतंय. ते पांढरी साडी वगैरे वाचून. आणि जर खरं घडल असेल तर मात्र चक्रावून टाकणारी घटना आहे.