इद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
23 Sep 2010 - 4:05 pm

ईद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू
इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्य देश (९०% जास्त) असून या देशाचा सगळ्यात मोठासण आहे ‘लबारान’. लबारान हे ईद-उल-फित्री या सणाचे इंडोनेशियन नाव आहे. या सणाला भारतात रमझान ईद म्हणतात तर अरबी रूप आहे इद्-उल-फित्र. अरब भाषेत Eid म्हणजे आनंदोत्सव, सण साजरा करणे आणि फित्र या शब्दाचा अर्थ आहे उपवासाच्या महिन्याची सांगता. थोडक्यात महिनाभर उपास करून स्वतःला पवित्र केल्यानंतर साजरा केला जाणारा सण म्हणजे लबारान. हा सण रमझान महिन्यातील उपवासानंतर येणार्‍या शावालच्या पहिल्या दिवशी (प्रतिपदेला) येतो. (इंडोनेशियात रमझानला रामादान म्हणतात)

इंडोनेशियात बरेच लोक उपास करतात, पण पोलादाच्या कारखान्यात काम करताना कांहींही न खाणे एक वेळ शक्य असेल पण पाणी न पिता भट्टीवर काम करणे महा कर्मकठीण! इथे साधारणपणे गरीब लोक कडक उपास करताना मी पाहिले आहे. माझा गाडीचालक वगैरे संध्याकाळची ‘माघरीब’ची बांग झाली कीं गाडी फूटपाथकडे थांबवून पाण्याचे कांहीं घोट घेतात आणि गाडी परत रहदारीत घालतात. जेवण घरी पोचल्यावर!
हा सण साजरा करायचे इंडोनेशियाचे वैशिष्ठ्य म्हणजे शहरात काम करणारे मुस्लिम लोक लोंढ्याने आपापल्या गांवी त्यांच्या-त्यांच्या ‘म्हातार्‍यां’ना भेटायला जातात. गंमत म्हणजे आपल्याकडे खेड्यातीला भाषेनुसार आई-वडिलांना म्हातारा-म्हातारी म्हणायची पद्धत इथेही आहे. इथे आई-वडिलांना ‘ओरांग* तुवा (वयस्क माणसं)’ असंच म्हणतात. या प्रचंड स्थलांतराला तोड नाहीं. जकार्ता पोस्टने पोलिसांच्या अंदाजानुसार ३० लाख लोक जकार्ताहून ईदच्या आधीच्या दोन-तीन दिवसात मध्य व पूर्व जावातील आपापल्या गांवी जातात तर एकूण आपापल्या घरी जाणार्‍या प्रवाशांची संख्या एक कोटी १० लाख इतकी आहे (१,१०,०००००).
(छायाचित्र क्र. १)
माझ्या अरब राष्ट्रात रहाणार्‍या मित्रांनुसार सौदी अरेबियातही अशी घरी जायची पद्धत नाहीं. ती फक्त इथे आणि कदाचित् बांग्लादेशमध्ये आहे (बिपिन-जी, मनाली गुप्ते मॅडम वगैरे मध्यपूर्वेत रहाणार्‍यांनी कृपया हे बरोबर आहे कीं नाहीं ते कळवावे ही विनंती).

(छायाचित्र क्र. २)
मी जकार्ताहून जावाल जाणारी प्रवाशांची झुंड पाहिली आहे. जकार्ताला वर्षभर राबणारा नोकरवर्ग या दिवसात आपापल्या गांवी जातो. जकार्तात आपण कसे थाटात रहातो हे दाखविण्याची ऐटही त्यात थोडाशी असतेच. त्यासाठी ही मंडळी प्रचंड खर्चही करतात. गावात त्याचवेळी शेजार्‍या-पाजार्‍यांचीही मुले-बाळे अशीच आलेली असतात. त्यामुळे ईदच्या दिवशी खेडोपाडी सारा गोतावळाच जमतो. आठ-दहा दिवस गप्पा-टप्पा, खाणे-पिणे वगैरेत जातात, कांहीं दिवस असे एकत्र व्यतीत केल्यावर सारे चाकरमाने पुन्हा मानेवर जू घ्यायला शहराकडे निघतात. या सुटीत अनेक उपवर-उपवधूंची लग्नेही जमतात. इथे दाखवून लग्न करण्याचा प्रघात नाहीं. प्रत्येकाने आपला जोडीदार स्वतःच शोधायचा असतो, पण बव्हंशी आपापसात ठरल्यावर आई-वडिलांची परवानगी घ्यायचा प्रघातही आहे. ईदच्या सणाच्यावेळी अशा उपवर-उपवधूंच्या ओळखी होण्यास मात्र मदत होते. परत येतांना पुन्हा एकदा भयंकर चोंदलेल्या रहदारीतून हा काफिला परत शहरात येतो.

(छायाचित्र क्र. ३)
ईदची सुरुवात मशीदीत जाऊन केलेल्या प्रार्थनेने होते. (छायाचित्र क्र. १ पहा) साधारणपणे गांवातले मोठे लोक पहिल्या रांगेत असतात. जकार्ताच्या 'इस्तिकलाल' या नावाच्या मशीदीत इंडोनेशियाचे राष्ट्रपती पहिल्या रांगेत खाली गालिच्यावर बसून प्रार्थना करतात. नंतर जकार्तात इथल्या इमामसाहेबांचे प्रवचन/धर्मोपदेश होतो व त्यानंतर सारे पांगतात. खेडोपाडीही हाच प्रघात असतो. गांवात ‘लूरा (सरपंच)’ तर जिल्ह्याच्या ठिकाणी ‘भूपती’ (इथे जिल्हाधिकार्‍याच्या पदाला चक्क ‘भूपती’ म्हणतात) तर प्रांताच्या राजधानीत ‘गुबुर्नूर (Governor)’ला हा मान असतो.
खेड्यातल्या अशा प्रार्थनास्थळांची २-३ छायाचित्रें इथे जोडली आहेत. (छायाचित्र क्र. १ पहा)
इंडोनेशियात ईदचा सण दोन दिवसांचा असतो. या दोन दिवसांच्या अलीकडला व पलीकडला दिवस अशी कमीतकमी चार दिवसांची सक्तीची आणि पगारी सुटी असते. पण वास्तवाकडे पाहिल्यास हा देश जवळ-जवळ १०-१२ दिवस ‘बंद’च असतो. बॅंकाही चार दिवस बंद असतात. सर्वसाधारणपणे सर्वांना या वेळी दहा दिवसांची वार्षिक सुटी असते व ती त्यांच्या privilege leaveमधून कापली जाते. पण मुस्लिमेतरांनाही यावेळीच सुटी घ्यावी लागते. पण कुणी तक्रार करत नाहीं. सरकारने ईदसाठी एक महिन्याचा ज्यादा पगार देण्याची कंपनीला सक्ती असते.
कित्येक लोक स्वतःच्या दोन चाकी-चार चाकी वाहनांतून जातात. पण बहुसंख्य लोक बसेस व लोहमार्गाने जातात. सुखवस्तू लोक हवाई मार्गानेही जातात. या मोसमात प्रवासाच्या सर्व सोयींसाठी महिना-महिना आधीपासून जागेचे आरक्षण करावे लागते. पण कसेही करून, चेंगरा-चेंगरी सोसून लोक आपापल्या गांवी आपापल्या आई-वडिलांना भेटायला खेडोपाडी जातातच.
जकार्ता ते मध्य जावा आणि पूर्व जावाला जाणारे रस्ते तुडुंब भरून overflow होत असतात. इथे जोडलेल्या छायाचित्रांत पाहिल्यास आढळून येईल कीं जकार्तापासून दूर जाणारे रस्ते तुडुंब भरलेले असून उलट्या दिशेने येणार्‍या गाड्यांसाठी असलेला रस्ताही त्यांनी ढापला आहे त्यामुळे जकार्ताकडे येणार्‍या गाड्यांना रस्ताच नसतो. पण कुणी तक्रार करत नाहीं. लबाराननंतर परिस्थिती उलटी होते!
ईदच्या आदल्या दिवशीचा उन्माद पहाण्यासारखा असतो. त्याला ‘ताकबीर’ असे म्हणतात. उपास नुकताच सोडून ढोलकी, पिपाण्या (खरं तर जे वाजेल ते सर्व वापरले जाते) वाजवत लोक रस्त्यावर येतात. दुसर्‍या दिवशी ईद असल्यामुळे उपास करायचा नसतो. मग उपवासाच्या महिन्याची यशस्वीपणे सांगता केल्याचा उन्माद सार्‍या जनतेवर असतो. नुसता हंगामा असतो. मी एकदा चुकून ‘ताकबीर’च्या वेळी एका अरुंद गल्लीत गाडी घातली व सर्व नाचणार्‍या गर्दीतून कुणालाही इजा न होऊ देता गाडी काढताना माझा गाडीचालक घामाघूम झाला होता व माझा श्वास अडकला होता! पण सुदैवाने कांहींही अप्रिय घटना न होता आम्ही त्या ‘चक्रव्यूहा’तून बाहेर पडलो.
रमझान महिन्यात प्रेषित महंमद हिरा पर्वतावर चिंतनात मग्न असताना जिब्रिल या देवदूताने त्यांना ते अल्लाचे प्रेषित असल्याचे सांगितले म्हणून या सणाला इतके अनन्यसाधारण महत्व आहे.
भारतात आपण “ईद मुबारक” म्हणतो तर इंडोनेशियात आम्ही “सलामत हारी राया” म्हणतो. ‘हारी’ म्हणजे दिवस व ‘राया’ म्हणजे मोठा. हारी राया म्हणजे मोठा दिवस म्हणजेच सण. पुढे “मोहोन (विनंती) माफ (माफी) लाहिर (प्रकट, शारीरिक) दान (आणि) बातिन (अव्यक्त, भावनिक)” असे म्हणतात म्हणजे उघड किंवा मनातल्या मनात केलेल्या गुन्ह्यांबद्दल/चुकांबद्दल माफी मागणे. भारतीय लोकांना जशी मधेच एकादे वाक्य इंग्रजीमध्ये बोलायची किंवा ब्रिटिशांना एकादे वाक्य फ्रेंचमध्ये बोलायची संवय असते तसे हल्ली-हल्ली इंडोनेशियन लोक अरबी भाषेतील वाक्ये धार्मिक कार्यक्रमात बोलतात व mohon ma'af lahir dan batin ऐवजी अरबी भाषेतील minal ’aidin wal faizin म्हणायची फॅशन सध्या आहे.
इंडोनेशियन मुस्लिम लोक रमझान महिना सुरू व्हायच्या आदल्या दिवशी कबरस्तानात जाऊन आपापल्या मृत प्रिय व्यक्तींच्या थडग्यांना भेट देतात. ईदची प्रार्थना झाल्यावरही ते पुन्हा त्यांच्या थडग्यांना भेट देतात.
आमच्या कंपनीत रमझान महिना सुरू व्हायच्या पूर्वीच्या शनिवारी आम्हा सर्व सहकार्‍यांचे सहभोजन असते. सहभोजनापूर्वी कुराणातील श्लोक म्हणणे, अल्लाकडून आशिर्वाद (दोआ) मागणे वगैरे विधीही केले जातात. त्यातली कांहीं छायाचित्रे जोडली आहेत. (छायाचित्र क्र. ४ पहा)

(छायाचित्र क्र. ४)
इंडोनेशियातील शहरांत ईदनंतर सर्व कार्यालयांत, कंपन्यांत तसेच वसाहतींत, कॉलन्यांत ‘हलाल-बीहलाल’चा कार्यक्रम होतो. या कार्यक्रमामागची भावना असते झाल्या-गेल्या चुकांबद्दल परस्परांची माफी मागणे. या कार्यक्रमाच्या वेळी जवळपासच्या मशीदीतून मुल्लासाहेबांना निमंत्रण असते (इथे त्यांना ‘उस्ताद’ म्हटले जाते). या कार्यक्रमातही अल्लाकडून आशिर्वाद (दोआ) मागणे व उस्तादजींचे धर्मोपदेशक प्रवचन ऐकणे असा कार्यक्रम असतो. (इथे कुठल्याही बैठकीच्या सुरुवातीला-अगदी युनियनच्या बैठकीआधीसुद्धा-दोआ मागण्याची चालीरीत आहे.) इथले उस्तादजीं सार्‍यांना हसत-खिदळत ठेऊन प्रवचन करतात.

(छायाचित्र क्र. ५)
जावामधील कार्यक्रमाचीही कांहीं छायाचित्रें मी जोडली आहेत. माझ्या सहकार्‍याच्या किशोरी वयातील मुलीचेही हात जोडून नमस्कार करतानाचे छायाचित्रही त्यात आहे. जावामधील लोक १५व्या शतकापर्यंत हिंदू होते व नंतर त्यांनी मुस्लिम धर्मात प्रवेश केला. तरी अशा कांहीं हिंदू प्रथा आजही जावातील लोक पाळतात.

(छायाचित्र क्र. ६)
कांही प्रश्न किंवा शंका असल्यास जरूर विचाराव्यात. जमेल तितक्या प्रश्नांना मी उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन.
*‘ओरांग उटांग’ हा शब्द आहे ‘ओरांग हुतान’. भाषा इंडोनेशियामध्ये ‘ओरांग’ म्हणजे माणूस व ‘हुतान’ म्हणजे अरण्य आणि ‘ओरांग हुतान’ म्हणजे जंगलात रहाणारा मानव.

संस्कृतीधर्मसमाजविरंगुळा

प्रतिक्रिया

मस्त. अभ्यासपूर्ण वर्णन. टॅग केलेल्या फोटोंसहित कथन करण्याची शैली आवडली!

नितिन थत्ते's picture

23 Sep 2010 - 4:15 pm | नितिन थत्ते

काळेकाकांचा प्लेझंटली सरप्राइजिंग लेख.

अजून येऊद्या.

यंदाच्या गणपतीच्या सुमारास मुंबई गोवा महामार्ग असाच तुंबला असल्याचे पेपरांतून वाचले होते.

(सौदी अरेबियात लोकल मायग्रंट लेबर किती असतो ते माहिती नाही. अशी घरी जाण्याची प्रथा मायग्रंट माणसांतच असावी).

पैसा's picture

23 Sep 2010 - 7:30 pm | पैसा

अजून येऊ द्या.

-(मायग्रंट)

जकार्तासुद्धा जावा बेटावरच आहे व त्यामुळे जकार्ताहून जावातील खेडोपाडी जाणारे लोक म्हणजे मुंबई-पुण्याहून महाराष्ट्रातील खेडोपाडी जाणार्‍या लोकांसारखेच आहेत. सौदी अरेबिया हा देश क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा आहे व तिथल्या छोट्या गांवांतून रियाध किंवा अल जुबैलसारख्या औद्योगिक शहरांत लोक येतच असतील. पण ते ईदला आपल्या 'मुलुक'ला जातात कीं नाहीं हे जाणून घ्यायचा मी प्रयत्न केला होता तेंव्हां मला माझ्या तिथल्या मित्रांनी सांगितले होते कीं ते जात नाहींत कारण बर्‍यापैकी ओव्हरटाईम मिळतो! म्हणून बिपिन-जी किंवा चुचु किंवा मनाली यांच्याकडून खात्री करून घ्यायची होती.

सहज's picture

23 Sep 2010 - 4:16 pm | सहज

चीनी लोकांच्यात त्यांच्या सणाला (नववर्षाला) गावी जाण्याची पद्धत आहे. आपल्याकडे मुंबईत काम करणारा चाकरमानी जसा सणाला कोकणात जातो. तशी ही मोठ्या सणाला गावी जायची प्रथा आली असावी का?

'ओरांग उटान' हे त्या एप जातीतल्या प्राण्याकरता व 'ओरांग असली' म्हणजे आदिवासींकरता वापरतात ना?

लेख खूप आवडला!!

उटान नव्हे, हुतान!
असली म्हणजे original. पण 'ओरांग असली' हा शब्दप्रयोग आदिवासी या अर्थाने फारसा ऐकलेला नाहींय्. उलट 'जकार्ता असली' म्हणजे जकार्तात जन्मलेला व वाढलेला (म्हणजे इमिग्रंट नसलेला, अगदी 'अस्सल पुणेरी'ची आठवण करून देणारा शब्दप्रयोग).
'जकार्ता असली' लोकांना 'बटावी' (Batavia वरून) असेही म्हणतात!

रमाझान ईद आणि इंडोनेशीया छान लिहिले आहे.

आजुनही लिहित रहा .. वाचत आहे ...

-

मिपाकरांनो,
उद्यापासून मी १० दिवस जकार्तात नाहींय्. त्यामुळे कांहीं प्रश्न असतील तर त्यांची उत्तरे कदाचित् द्यायला उशीर होईल. तरी गैरसमज नसावा!

सुनील's picture

23 Sep 2010 - 5:02 pm | सुनील

मजा आली वाचताना. मिपाचा फायदा हाच की, वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेले लोक आपापल्या अनुभवांबद्दल लिहितात.

असेच लेख येऊद्यात!

सुधीर काळे's picture

23 Sep 2010 - 9:04 pm | सुधीर काळे

जे विषय माझ्या मनाला भिडतात त्यावर मी लिहितो. इथेच नव्हे तर जकार्ता पोस्ट अथवा इतर ठिकाणीही. लोकांना आवडलं तर उत्तमच. पण एकादा विषय एकाद्याला नाहीं आवडत. पण लिहिणार्‍याला तो जे लिहितो ते बव्हंशी आवडतच असते.
आपल्याला जे आवडते ते वाचावे हेच बरे.
लिहिणाराही पहातच असतो कीं कुठला विषय कुठल्या लोकांना भावतोय्?
जे मी मिपावर लिहू शकतो (प्रो-मराठी) ते मी 'जपो'त नाहीं लिहू शकत कारण तो वाचकवर्ग वेगळा आहे.
एवढीच शिस्त मी पाळतो.

छान लेख. बोलक्या फोटोंमुळे अजूनच चांगला झालाय :)

स्वाती२'s picture

23 Sep 2010 - 6:19 pm | स्वाती२

लेख आवडला.

लेख व बरीचशी माहिती नवी आहे. दोन्ही आवडले.
असे अजून लेख येऊ देत

समंजस's picture

23 Sep 2010 - 8:03 pm | समंजस

राहणीमानाचे, जीवनाचे काही पैलू दाखवल्या बद्दल आभार :)

भारतात ईदच्या दिवशी जेव्हा मुस्लिम मित्रांसोबत भेट होते तेव्हा ते गळा भेट घेतात. ही गळा भेट पद्धत फक्त भारतातच आहे का ?

फारशी लोकप्रिय नाहीं. मला वाटते ती अरबी पद्धत आहे. इथे फक्त हस्तांदोलन करायची पद्धत आहे.

संजय अभ्यंकर's picture

23 Sep 2010 - 8:41 pm | संजय अभ्यंकर

संध्याकाळी उपवास सोडल्यानंतर (रोजा खोलनेके बाद), मुंबईतल्या भेंडीबाजार, महंमद अली रोडवर खाद्य जत्रा भरते.
विविध सामिष व गोड पदार्थांची जंत्री खादाडीला उपलब्ध असते.

इंडोनेशीयातही असेच असते काय?

सुधीर काळे's picture

23 Sep 2010 - 8:48 pm | सुधीर काळे

असते. शिवाय दररोज उपास सोडल्यावर इथे फटाके उडविण्याचीही प्रथा आहे. संध्याकाळी सर्व खाद्यगृहात खचाखच गर्दी असते.

मस्त लेख. अतिशय माहितीपूर्ण..

'लबारान'ला सगळा देश सुटीवर असतो पण आम्ही फॅक्टरीवाले maintenanceची वर्षाची कामे करण्यात गुंग असतो.
या लेखासाठी मी माझ्या इथल्या 'मुलुक'ला जाणार्‍या मित्रांना येता-जाताचे आणि गांवातले फोटो काढून आणायची विनंती केली होती. तसे त्यांनी आणले. तेच इथे जोडले आहेत.
'लबारान'ला जकार्ता शहर नव्या नवरीसारखे नटलेले असते, दिव्यांची रोषणाई तर फारच मस्त असते. पण फॅक्टरीतल्या कामामुळे मला त्या रोषणाईचे फोटो घ्यायला या वर्षी जाता आले नाहीं.
पाहू कुणाचे आयते फोटो मिळतात का! मिळाले तर इथे जोडेन, पण ४ ऑक्टोबरनंतर...