लायसेंसचे राज- भाग १
लायसेंसचे राज- भाग २
शेवटचा भाग तीन.
संगीता पुन्हा एजंट कंपनीच्या ऑफ़ीसात सगळे कागद घेऊन गेली. काय करायचे ते तिने व्यवस्थित ठरवून ठेवले होते. मुद्दाम लंच वेळेच्या अर्धा पाऊण तास आधी गेली. काऊंटरवरच्या व्यक्तीला भेटण्यासाठी, क्यु क्रमांक घेतला. पंधरा मिनटात तिचा नंबर आला. दोन काऊंटर्स होते. नेमका तिचा नंबर आला, त्या काउंटरवर तीच बाई, जिने आधी रिजेक्ट केले होते, ती बसली होती. संगीता उठलीच नाही. तिनवेळा टणटण वाजवून पुढचा नंबर झळकवला. संगीताने एक नवीन नंबर घेतला. लंचला अजून थोडा वेळ होता. लंच ब्रेक एक तासाचा. इथे कार्यालयात एक खुपच चांगली पद्धत असते. लंच ब्रेकमधे देखील पब्लीकसाठी काम थांबत नाही. ब्रेकमधे खिडक्यांवर दुसरे बदली कर्मचारी येऊन कामे हाताळतात. जनतेची कामे अविरत सुरू राहिली पाहिजे!
आता तरी आपला नंबर दुसऱ्या खिडकीतल्या बाईकडे येऊ दे अशी प्रार्थना संगीता करीत होती. ती दुसरी बाई जरा वयस्क आणि चेहऱ्याने प्रेमळ वा्टत होती. तिचे सर्वांशी बोलणे देखील मित्रत्वाचे वाटत होते. पण संगीताचा नंबर येण्याच्या आतच, ती प्रेमळ बाई उठली आणि हॉलबाहेर खाली गेली. बहुदा ही लंचसाठी गेली असावी. ती खडूस बाई मात्र लंचला न जाता अजूनही नंबर्सला सर्व्ह करीत होती. प्रेमळ बाईच्या जागी कोणी आले पण नव्हते. संगीताचा नंबर फ़क्त दोनच पुढे होता. म्हणजे आणखी थांबले, तर नेमका खडूस बाईकडेच नंबर येईल. संगीताने भराभर डिसीजन घेतले. त्या प्रेमळ बाई मागे ती लगबग लंच करायला गेली.
लंच हॉलमधे संगीताने थोडे जुजबी खायला घेतले, आणि त्या प्रेमळ बाईच्या टेबलवर लक्ष ठेवून बसली. तिचे जेवण जसे संपले, तशी तिच्या मागोमाग पुन्हा वरच्या हॉलमधे आली. तो पर्यंत तिचा नवीन नंबर निघून गेला होता. संगीताने आणखी एक नंबर घेतला. आता ती खडूस बाई एकटीच कामे हाताळीत होती. ही अजून लंचला जात का नाही? उपाशी पोटी कामे करणे प्रकृतिला चांगले नाही! आपल्याला खडूस बाईच्या तब्येतिची केवढी काळजी! ती दुसरी बाई अजूनही खिडकीवर आली नव्हती. तिचा बदली देखील का कोण जाणे नव्हता. तेवढ्यात संगीताचा नंबर पुन्हा झळकला.
आता गेले तर नको त्या बाईकडेच जावे लागणार! संगीताने पुन्हा तो नंबर पास होऊ दिला. आणखी एक नंबर घेऊन बसून राहिली. तिच्या शेजारी बसलेल्या एका बाईशी तिने जरा गप्पा केल्या. त्यावरून तिला एक इंटरेस्टींग माहिती मिळाली. शेजारच्या त्या बाईच्या नवऱ्याला एक महिन्यापुर्वीच मुंबईतल्या बुक लायसेंसवर कनव्हर्शन मिळाले होते. हे समजल्यामुळे संगीताला जरा धीर आला, की आपल्याला देखील मिळायलाच हवे. का तिने आपले रिजेक्ट केले होते कोण जाणे! तितक्यात ती खडूस बाई लंचला गेली, आणि प्रेमळ बाई येऊन बसली. पुन्हा एकच स्टाफ़ राहिला. आता संगीताच्या लक्षात आले, आज कदाचित लंचचा बदली स्टाफ़ उपलब्ध नसावा, म्हणून ह्या दोघीच स्टॅगर्ड लंच घेऊन काम हाताळत होत्या. चला. हे बरे झाले. आता एक तासभर ही चांगली बाईच असणार. म्हणजे आपल्याला हीच मिळणार!
तस पाहिल तर साधारण दहा मिनटे एकाला लागली, तर ती नको असलेली बाई यायच्या आत आपले काम होऊन जाईल. संगीता चुळबुळत, आणि नखे चावत वाट पहात राहीली. एकएक मिनीट पोटात क्रॅंप पाडून जात होता. काऊंटरवर काम करून घेणारे पब्लीक उगाचच जास्त वेळ त्या स्टाफ़चा घेत आहे अशी चीड येऊ लागली. लंच संपायला दहा मिनटेच राहिली. आता मात्र ती खडूस बाई लंचहून परत येण्या आधी काही करणे आवश्यक होते. नवीन नंबर अजूनही दूरच होता. काऊंटरवरच्या सध्याच्या माणसाचे काम संपल्या संपल्या संगीता उठली आणि काऊंटरवर गेली. प्रेमळ बाईने अजून पुढचा नंबर दाबलाही नव्हता. संगीताने तिच्याकडे आपला जुना, येऊन गेलेलाच नंबर सरकावला.
“This number gone ‘ready. Now must take new number.” प्रेमळ बाईने सुनावले.
“Oh, Sorry Madam, I went down for a quick lunch, and came back running. But the number gone.”
“ So take a new number.” तिने हट्ट सोडला नाही.
“Madam, please! Help me, I have some emmergency and must go back home. Can you please take this old number?”
प्रेमळ बाईने एकवार संगीताच्या त्रासलेल्या चेहऱ्याकडे सहानुभुतीने पाहिले. तिला प्रेमळ बाई ही उपाधी देणे चूक नव्हते! तिने संगीताचे पेपर्स हातात घेतले आणि म्हटले- “Next time must wait for the number. Dont just go on wandering here there.”
“होग बाई. नाही जाणार उंडारायला. शहाण्यासारखी बसून राहील वाट पहात.” हे मनात. उघड उघड- “Yes Madam. Thank you very much Madam.”
प्रेमळ बाईने कागद पाहिले. संगीताच्या छातीत ताशे, ढोल आणखी काय काय इतके जोरजोरात वाजत होते, की तो आवाज तिला ऐकू जाऊ नये म्हणून ती जरा दूरच उभी राहिली. मुंबईचे बुक लायसेंस त्या बाईने दोन तिनदा उलटे सुलटे करून पाहिले. मग संगीताकडे भेदक नजर वळवली. “Any thing wrong Madam?” संगीताने भितभितच विचारले. “The photo on the license does not seem to tally” झाले! कबाडा पुन्हा! “Yah, probably. It is five years old photo. My hair was short at that time.” बळेबळे हसून तिने म्हटले. ती स्टाफ़ वाली विचार करू लागली. पण मग तिने भारतातल्या लायसेंस वरचा शिक्का वगेरे पाहीला, आणि म्हणाली “wait, I make a photocopy” आता ही फ़ोटोकॉपी करायला जाणार, तेवढ्यात ती खडूस बाई लंच करून येणार अन आपल्याला बघणार! सत्यानाश!
“But Madam, I already attached photocopy.” संगीताला आता एक मिनीट देखील जास्त थांबणे धोक्याचे वाटू लागले. “Yes, but your face has not printed clearly. Dont worry, since you are in hurry, I make good copy for you.” अरे देवा. अशा घाईच्या वेळेस हिची मदत मला खूप महागात पडणार. प्रेमळ बाई फ़ोटोकॉपी करायला लगाबगा आत गेलीही. आणि नको तेच झाले. ती खडूस बाई लंच संपवून तिच्या जागेवर म्हणजे शेजारच्या काऊंटरवर आली. संगीताने पटकन आपला चेहरा ओढणीने झाकला आणि तिला दिसू नये अशी तिरकी उभी राहिली. ती प्रेमळ बाई तेवढ्यात फ़ोटोकॉपी घेऊन आली. तिने संगीताला ५० डॉलर कनव्हर्शन फ़ी मागीतली. संगीताने क्रेडीट कार्ड दिले. तिने काय एन्ट्री केली कोण जाणे. पण तिचा चेहरा जरा चिंताग्रस्त दिसला. आता हे काय आणखी नवीन झंझट? ती प्रेमळ बाई, शेजारच्या खडूस बाईला इथल्या भाषेत माहित नाही, काय विचारू लागली. संगीताला काही कळेना. काही प्रॉब्लेम अचानक लक्षात आल्यामुळे आपली केस ही त्या खडूस बाईला विचारून कन्फ़र्म तर करीत नसेल ना? संगीताने आता आणखीनच काळजीपुर्वक आपला चेहरा शेजारच्या काऊंटरवालीपासून लपवला. तिरके उभे राहूनच त्या प्रेमळ बाईला म्हटले “Madam is there any problem? I am in a hurry please.”
“Yah. A small problem.”
अरे कर्मा! आता काय?
“The fee is 50. But I entered 100 by mistake. Somehow I cant cancel the transaction.”
“बाई गं पन्नासच्या जागी शंभर घे हवे तर, पण कॅन्सल नको करू” संगीताला म्हणावेसे वाटले. पण ती प्रेमळ बाईच तिला म्हणाली- “I am sorry. Is it OK, if I charge you 100 and return cash 50 to you?”
“अग माझी लाडकी ताई! तू कॅश वापस दे किंवा नको देऊ. पण माझे लायसेंस मात्र लगेच दे.” हे मनात. उघडपणे- “No problem Madam. Thank you.”
पैसे, रिसीट आणि कागदपत्रे घेऊन संगीताने तिथून काढता पाय घेतला. जाता जाता काऊंटरवालीचे “The license will be mailed to your address in a week’s time.” हे वाक्य ऐकून, गंगेत घोडे न्हायले म्हणजे त्याच्या अंगात कसा उत्साह दाटत असेल, हे आज संगीताने पुरेपूर अनुभवले.
समाप्त
*********************
प्रतिक्रिया
26 Aug 2010 - 7:58 am | मृत्युन्जय
एकुण सगळा मनमानी कारभार आहे. हम करे सो कायदा. माझ्या मनी आले तर तुला लायसन्स दिले नाही तर जा उडत अशीच एकुण पद्धत. बरं या मनमानी कारभाराला आळा घालण्यासाठी पण कोणी नाही. जी शासकीय यंत्रणा आहे ती आपल्या बाबू लोकांपेक्षा फारशी वेगळी दिसत नाही. एका टेबलवरुन दुसर्या टेबलवर जनतेचा फुट्बॉल करण्यात एकुण इथले शासकीय अधिकारी पण कमी दिसत नाहीत. फक्त परदेश आणि कुठलातरी (प्रगत??) देश म्हणुन आपण कौतुक करायचे की कर्तव्यपरायण लोक असतात. जे लोक काही तरी भोंगळ नियम करतात, अपुर्या माहितीवर माझे तेच खरे अशी वृत्ती बाळगतात, सामान्य जनतेला मदत करण्याऐवजी उडवाउडवीची उत्तरे देतात, आमच्या हतुन चुक होणे शक्यच नाही, रिजेक्शन आहे म्हणजे तुमचीच चुक असणार असा तोरा मिरवतात ती लोकं मला तरी पैसे खाउन काम करणार्या भारतीय शासकीय अधिकार्यांपेक्षा भिक्कार वाटतात.
26 Aug 2010 - 8:21 am | नगरीनिरंजन
छान वर्णन आहे. माझ्या एका मित्राने त्याचे केरळ मधले लायसेन्स रुपांतरीत करून घ्यायचा प्रयत्न केला होता. त्याच्या परवान्यावर बारकोड सदृश काही तरी छापलं होतं. ते स्कॅन केल्यावर नंबर न दिसता काही तरी कचरा दिसायचा पडद्यावर म्हणून त्याचं काम नाही झालं.
26 Aug 2010 - 11:09 am | समंजस
चांगला अनुभव मिळाला म्हणायचा तर :)
या वरून तरी लक्षात आलंय की, लोकं इथून तिथून सारखीच. मला सुद्धा असे काही अनुभव येतात.
बर्याचदा बॅंकांमध्ये सुद्धा, त्या वेळेस नेमकं हेच कराव लागतं. आपलं काम आहे त्या काउंटरवर चा मनुष्य बदलण्याची वाट बघायची अडलेलं काम होउन जातं :) आता हे विचार करण्या सारखं आहे की जे काही कार्यालयीन नियम आहेत नागरीकां करता त्या नियमांची अंमलबजावणी प्रत्येक कर्मचारी वेगवेगळ्या पद्धतीने का करतो. काउंटरवरचा एखाद्या कर्मचारी कसली तरी कमतरता/चूक दाखवून काम करायला नकार देतो परंतू त्याच काउंटरवर बसणारा दुसरा कर्मचारी मात्र ते काम करून देतो आता ह्या दुसर्या कर्मचार्याला ती कमतरता/चूक का दिसली नसावी? पहिल्याच कर्मचार्यालाच ती का दिसली? की दुसर्या कर्मचार्याला नियमांची माहिती नव्हती? असे प्रश्न मला पडत असले तरी उत्तरं सापडत नाही.
परंतू बँकेत, सरकारी कार्यालयांमध्ये काम कश्या प्रकारे करून घ्यावे याचं उत्तर मात्र सापडतं :)
26 Aug 2010 - 3:15 pm | दाद
कथा चागलि आहे ! गाव कळाल नाहि? पण आवडलि!
26 Aug 2010 - 6:40 pm | स्पंदना
अगदी अगदी काका!
मला ऑसी विसा प्रोसेसिंग साठी पोलिस रेपोर्ट सबमिट करायचा होता. तेव्हढ्या साठी पेपर्स घेउन पोलिस हेड क्वार्टर ला सक्काळी सक्कळी दोघे ही गेलो.
आत इन मिन चार माणस. १ मलय ओपरेटर, जी आमची फाइल ओपन कराय्ला लागणार पेपर्स तपासुन घेणार होती. तिच्या शेजारी दुसरी एक साउथ इंडियन. जी मला वाटतय थोडी सिनिअर असावी. अन आमच्या सारख पेपर सबमिट करायला आलेल आणखी एक मलय जोडप.
टोकन घेउन आत गेलो तर ही मलय बाई त्या जोडप्या बरोबर अगदी खुलुन खुलुन गप्प मारत होती. टोन वरुन त्या गप्पा घरगुतीच वाटत होत्या. अक्षयना परत ऑफिसला जायच असल्यान आमची थोडी चुळबुळ सुरु झाली अन त्या मुळे त्यांना गप्पा आवरत्या घ्याव्या लागल्या.
त्यांना निरोप देउन मग आम्हाला बोलावल गेल. अन बाई दोन मिनिटात बदलली. प्रत्येक गोष्टी ला 'व्हाय ला?' सुरु झाल.
काय द्यायच अन काय नाही याची आम्हाला पुरी माहीती असल्यान तिचा निभाव लागेना. मग शेवटी फोटोच कमी आहेत त्यामुळे तुम्ही उद्या परत या असा सुर तिने लावला. आत्ता मात्र एव्हढा वेळ गप्प पण काण देउन ऐकणारी साउथ इंडियन पटक्न तिच्या टेबल वरुन त्रासिक चेहरा करुन या बाई कडे नुसती वळली , बस पोपट बोलल्या सारखी ही बाई 'ओ के ला. यु ब्रिन्ग इट बोफोर आफ्टर्नुन' म्हणाली.
एकुणच अम्हाला दोन क्षणात तिची आम्च्याशी बदललेली वगणुक खटकली.
मी फोटो अॅरेंज करायला अन अक्षय ऑफिस मध्ये निघालो. झाल काय अक्षय ची कलीग या पोलिस हेडक्वार्टर्च्या बॉस ची वायफी निघाली. तिने मारे थाटात त्याला सांगितल ' य्युव्वर पेपर्स विल्ल गो तु माय हसबंड ओन्ल्यी . हा ही खवळला अन त्यान मलय बाईबद्दल सांगितल. बायकोने लगेच नवर्याला फोन केला, शी ट्रीटेड देम बॅड जस्ट बिकॉज ऑफ रेसिझम.' मी धडपडत दुपारी जायला मलय बाईसाहेबांची साल निघाली होती. अक्षरशः रडकुंडी ला येउन 'सॉरी सॉरी ' चालल होत.
अन मेन म्हणजे फोटोची गरज न्हवती!
(प्रतिसाद थोडा लाम्ब झालाय , पण तिन भागांचा एकत्र हिशोब पकडावा)
26 Aug 2010 - 7:12 pm | रेवती
कथेचा शेवट साधाच आहे पण त्यावेळी मनात येणारे विचार बरोबर उतरले आहेत.
खडूस बाईला चुकवण्याची संगीताची धडपड प्रत्येकानं कुठे ना कुठे केलेलीच असते.
14 Dec 2020 - 12:03 pm | NAKSHATRA
कथा चागलि आहे