अनिल आणि आदितीच्या या फुललेल्या नात्यामधे प्रपोज वगैरे करायची गरजच नव्हती. आदितीने स्पष्टपणे तसं त्याला सांगूनच टाकलं होतं.
"अनिल, मला वाटतय तु मला आवडायला लागलायस"
"अजून वाटतच आहे की बर्यापैकी खात्री ही वाटातीये?"
"हा हा हा, हो बर्यापैकी खात्री आहे."
"चला बरं झालं तुच विचारलस."
"मी विचारलं नाहीये तुला, सांगतेय." स्मितहास्याने आदितीने आपला मुद्दा स्पष्ट केला.
"ओह! मग मी ही तुला सांगतो, तुही मला आवडतेस म्हणून. पण तुला विचारायचं कसं ते नक्की कळतच नव्हतं. सरळ विचारलं तर फस्सकन अंगावर यायचीस, फिरवून फिरवून विचारलं असतं तर ’काय ते स्पष्ट बोल’ म्हणून वचकली असतीस."
"एवढी काही दुष्ट नाहीये रे मी."
"म्हणूनच आवडलीस गं तु, एक बरं झालं की बरीच नसलीस तरी थोडी फार तरी दुष्ट आहेस हे मान्य केलंस. ही प्रांजळ कबुली समजू की प्रेमळ धमकी?" असेच मग काही निरर्थक गप्पा मारून दोघे घरी जायला निघाले.
दोघे एकमेकांना आवडत होते पण हेच ते प्रेम का, याची खातरजमा करून घेण्यासाठी आदिती काही फारसा विचार करणार्यांपैकी नव्हती. एका माणसाबरोबर रहायचं म्हटल्यावर काही तडजोडी कराव्या लागतात, आणि त्या अनिलबरोबर करायला तिची ’बर्यापैकी" तयारी होती. अनिलला मात्र प्रेम म्हणजे काय ते नक्की हे का ते हे माहित नसल्यामूळे तो इतक्या खोल विचारात पडला ही नव्हता.
आदितीने अनिलबद्दल आपल्या आईला कल्पना देऊन ठेवली होतीच. तिला भावंडं नव्हती. शाळा, कॉलेजपासून फारसे मित्र-मैत्रीणी वगैरे देखील नव्हते. आधीपासूनच घरातल्या निकोप स्वातंत्र्यामूळे आणि आई-वडीलांच्या मनमोकळ्या स्वभावामूळे तिला मन मोकळं करायचं झालं तर ती आईपाशी करे. पण त्यालाही एक मर्यादा होती कारण शेवटी ’जनरेशन गॅप’ होतीच. याउलट अनिलची आणि त्याच्या बहिणीची जवळीक लहानपणापासूनच. त्याने घरी खाल्लेल्या माराएवढाच मार सवितामूळेच वाचला होता. त्याची बाहेर कोणाबरोबर भाडणं झाली तर तावातावाने त्याचीच बाजू घेणारी पहिली व्यक्ती म्हणजे सविता. चूक अनिलची असली तर घरी आल्यावर ती त्याला जाम सुनावे, पण बाहेर मात्र त्याचीच बाजू. यामूळे अगदी कमावता झाल्यावरही सविता हीच अनिलचा आधार होती. तिला फोनवरून आदितीबद्दल त्याने सगळं सांगून टाकलं शिवाय घरी सांगायची जबाबदारीही तिच्यावरच सोपवून तो निश्चिंत झाला.
कबूल केल्याप्रमाणे, सविताने आई-बाबांची समजूत घालून अनिलचा मार्ग मोकळा करून दिला. जेमतेम सात-आठ महिन्यांचं त्यांचं नातं. अनिलच्या बाबांच्या इच्छेप्रमाणे, तीन महिन्यांनी, मार्चमधे लग्न उरकायचं ठरलं. आदिती आणि तिच्या आईचीही तयारी होतीच. नाईक मॅडम कितीही पुढारलेल्या विचारांच्या असल्या तरी ’या वर्षी नाही उरकलं तर, तीन वर्ष थांबावं लागेल’ या नातेवाईकांच्या दबावाला बळी पडल्याच. या सर्वात सविता मात्र एकटीच अशी होती, जिला वाटत होतं की फारच घाई होतेय म्हणून. तिने अनिलला, आई-बाबांना, एवढंच नाही तर आदितीलाही परोपरीने सांगायचा प्रयत्न केला, पण सारे व्यर्थ. शेवटी पंचविसाव्या वर्षीच दोघे बोहल्यावर चढले.
लग्न अगदी थाटामाटात नसले तरी बर्यापैकी चांगल्या रितीने पार पडले. नव्या नवलाईचे दिवसही निघून गेले. दोघांनीही आपले मोर्चे परत कामाकडे वळवले. आणि इकडेच पुढच्या संघर्षाची नांदी सुरू झाली. संघर्ष यासाठी कारण आदिती ही नेहमी मीच कशी बरोबर ते सांगणारी, आणि तिच्या या आडमुठेपणला अनिलही नंतर नंतर ’तु बरोबर असलीस तरी तुझ्यापेक्षा मीच जास्त बरोबर आहे’ हे तत्व उराशी बाळगू लागला.
अनिलची आई ’हाऊस मेकरच’ होती. घरी असल्यामूळे तिने कधीही कामासाठी बाई लावली नव्हती. पण आताशा वय होत चालल्यामूळे जेवण सोडून बाकी कामाला बाई घरात आली. जेवण सध्या त्याच बनवत होत्या. पण आता सून घरात असताना किमान एक वेळचं तरी तिने करावं अशी त्यांची माफक अपेक्षा. तशी ती त्यांनी अनिलकडे आणि त्याच्या बाबाकंडे बोलूनही दाखवली. पण दोघांनीही त्यात फारसं लक्ष नाही घातलं. अनिलच्या बाबांनी तर "तुमची घरची आघाडी तुम्हीच लढा, आम्ही या वादात न्युट्रल!" असा अनाहूत सल्ला देऊन टाकला.
"अगं आदिती" रात्री जेवता जेवता आईने विषय काढलाच.
"भाजी छान झालीये आई"
"हं, मी काय म्हणत होते, इतके वर्ष मी घरातली कामं करते आहे. पण बाहेरच्या बाईने माझ्या घरात काही काम केलं की मला कसंकसंच वाटायचं. म्हणून इतके दिवस बाई ठेवली नव्हती. तु आलीस घरात, पण जॉब करत असल्याने सगळच करण तुला शक्य नाही हेही मला कळत. फार नाही पण एक वेळच्या जेवणात तरी मदत करत जा."
"वेळ मिळत जाईल तसं नक्की करेन." आदितीने तो विषय तिथेच तोडत चर्चेला मतभेदाचं स्वरूप येऊ नाहे दिलं.
पण रात्री अनिलच्या कानात तिने गुणगुण सुरू केलीच.
"आता जॉब करतेय म्हटल्यावर एवढं सगळं कशी करणार मी, तुच सांग. त्यातूनही ऑफिस वर्क असतं तर एक वेळच काय तर, दोन्ही वेळचं केलं असतं. पण तुलाही माहितीये की, सेल्समधे ऑफिसचं दर्शन हे फक्त रिपोर्टिंग पुरतंच होतं म्हणून."
"हम्म्म्म्म्म"
"मग अशावेळी जर त्यांना जमत नसेल तर, जेवणालाही एखादी बाई ठेवली तर बिघडलं कुठे त्यात. पण नाही. कितीवेळा समजावून सांगितलं तरी का ऐकत नाहीत त्या?"
"बाकी काही असू दे पण घरचं किचन घरच्याच बाईनेच चालवावं अशी माझीही ठाम अपेक्षा आहेच. रोज नाही पण कधीतरी....शेवटी एका घराची खाद्य संस्कृती त्या घरची आयडेंटिटी असते. आणि त्यात घरच्या बाईचाच जर हातभार नसेल तर मग त्या इतिहासात नाव कोणाचं लावायचं" अनिलने जरा विनोदनिर्मिती करून ताण सैल करायचा प्रयत्न करत आपला मुद्दा मांडला. "नाहीतर, अकाऊंट्स मधे ट्रान्स्फर करून घेऊया का आपण तुझी?"
"काही गरज नाहीये. ज्या फिल्डमधे पाच वर्ष काढली, त्यातून निघून जाऊ का? मागचं सगळं ब्लॅंक की मग...."
"डेफिनिटीव्ह स्टेटमेंट नव्हतं गं ते, सहज म्हणून एक मधला मार्ग सुचवला." अनिलने पडतं घेऊन विषय तिथेच संपवला.
त्यादिवसानंतर आदिती काही बदलली नाही, मात्र तिच्या सासूबाईंची तिच्याबद्दलची मतं मात्र अधिकच तीव्र होत गेली. तिच्या बर्याचवेळा उशीरा येण्याबद्दल, कपड्यांबद्दल, थोडक्यात जिथे जिथे म्हणून शक्य होईल, तिथे तिथे सगळीकडेच तिच्यावर बोलायला सुरूवात केली. अनिलच्या बाबांनी त्यांना भरपूर समजावण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! ज्या ज्या वेळी त्या तिला बोलत, त्या त्या रात्री अनिलच्या खोलीतला दिवा फार उशीरापर्यंत जळायला लागला. आताशा तिने आपण वेगळं राहू असं त्याच्यामागे टुमणं सुरू केलं. घाटकोपर, कांजूरला वगैरे रहायला गेलो तर प्रवासाचा वेळही वाचेल, आणि इकडची रोजची पारायणंही. अनिलचं मन मात्र काही मानत नव्हतं. एकीकडे कामाचं प्रेशर, आणि दुसरीकडे घरच्या कुरबुरी. त्यालाही समजत होतं की आईने असं नको करायला, पण आदितीनेही कुठेतरी थोडी तडजोड करावी हे त्याने सांगितल्यावर, ती जे करते ते कसे लॉजिकली बरोबर आहे हे तिच्याकडून ऐकून त्याल गप्प बसावे लागे. एक मात्र होतं, एवढं सगळं चालू असताना आदितीने आईला इतक्या दिवसांत एकदाही उलटून उत्तर दिलं नव्हतं की भांडण केलं नव्हत. तिच्यासारख्या विचारसरणीच्या मुलीने असं करावं याचं त्याला कौतुक तर होतंच पण त्याहून जास्त आश्चर्य वाटत होतं. तिचा हा शांतपणा त्याला मात्र फारच त्रासदायक ठरू लागला होता.
बर्याच दिवसांपासून आदिती दर रविवारी या घरातला वैताग चुकवण्यासाठी तिच्या माहेरी रहायला लागली. यावर अनिलची आई जामच वैतागायला लागल्या होत्या. होता होता एका रविवारी त्यांनी अनिललाच फार बोलून घेतलं. वैतागलेला अनिल मग उठला आणि आदितीला आणायला जायच्या आधी तो सविताकडे गेला. त्याचा कोंडमारा त्याने सवितासमोर अगदी सविस्तरपणे मांडला.
"यावर मी काय सांगू तुला?"
"तु काही सांगावस म्हणून सांगतच नाहीये. पण कोणी ऐकणारंच नाहीये म्हणून तुला सांगतोय. ऑफिसमधे गेलं की तिकडचं टेन्शन्स आणि घरी आलं की इकडचं. सेल्स पिच सोडलं तर जास्त बोलतच नाही मी कुठेही."
"सगळ्यांना मी त्यावेळी सांगत होते की एवढ्या लवकर नका करू काही. पण जाऊ दे."
तिथून तो निघून आदितीला आणायला गेला. परत येताना आणि नंतरही बरेच दिवस ती वेगळं रहाण्याबद्दल त्याला सतत सांगत राहिली. हा रोजचाच त्रास कमी व्हावा म्हणून मग त्यानेही अगदी निरेच्छेनेच भांडूप मधे एक भाड्याचा फ्लॅट बघितला आणि जायचा दिवस नक्की केला. घरातून जाण्याची सर्व लॉजिकल कारणं दिल्यावर बाबांचा चेहरा फारच उतरला होता. आई मात्र अगदीच तटस्थ होती. काहीतरी सुटून चाललय हे अनिललाही जाणवत होतं आणि बाबांनाही. पण परिस्थितीसमोर जे समोर आलं होतं ते स्विकारण्याचा दोघांनीही निश्चय केला.
नविन घरामधे आल्यावर सगळंच आदितीच्या मनाप्रमाणे बर्याच गोष्टी व्हायला लागल्या होत्या. त्या तशा झाल्या कारण आदिती फार हट्टी होती असं नाही, पण अनिलची फारशी मतंच नव्हती. भांडूपमधे येऊन त्यांना पाच-सहा महिने लोटले. दोघांची कामं फार वाढली होती. कामाचे तासही वाढले. कधी बाई यायची, कधी नाही, तर कधी त्यांच्या वेळा मागे-पुढे. अनिलपेक्षा आदितीच घरी जास्त वेळ असायची. बाहेरच्या कामानंतर बर्याचदा घरचं सगळंच बघणं यायचं. सासूसमोर काही न बोलणारी आदिती, अनिलशी घरच्या कामात मदत करण्यासाठी आग्रहीपणाने भांडणं करायला लागली. तिचं काही चुकत होतं असं नाही, पण अनिलने कधी घरी ग्लासही विसळला नव्हता आणि आता नविन काही शिकायची त्याची ना तयारी होती ना इच्छा. वाढता वाढता भांडणं विकोपायला जायला लागली. आताशा दोघांचा वेळ भांडूपपेक्षा आपापल्या घरीच जायला लागला होता.
एके दिवशी संध्याकाळी आईकडून आल्यावर आदिती बोलायला लागली, तिचा सूर अगदीच निर्वाणीचा होता असं अनिलला जाणवलं.
"जसं चाललय, ते व्यवस्थित आहे असं वाटतं का तुला?"
"नक्कीच नाही. पण तु कुठेच नमतं घ्यायला तयार नसतेस."
"म्हणजे माझंच चुकतं का नेहमी?"
"मी असं म्हटलं नाहीये."
"मग? कामावर तर मीपण जातेच आहे की, तुही घरामधे थोडाफार मदत केलीस तर..."
"नाही जमत नाही मला ते. आणि जमेल असंही वाटत नाही. तुला काही प्रॉब्लेम आहे का?"
"आपण जरा घाईच केली असं वाटतय."
"म्हणजे?"
"दीड वर्ष झालेय पण सलग एक आठवडाभर तरी आपण शांतपणे झोपलोय का रात्री? आणि ही घरची टेन्शन्स कामही अफेक्ट करतात."
"अं...मलाही असंच वाटतय."
"तुला सांगितलं नाहीये, म्हणजे तशी सांगावसच नाही वाटलं. मी डेल्टा इन्फ्रा मधे जॉइन करतेय एक तारखेपासून आणि दोन महिन्यांच्या ट्रेनिंगनंतर बॅंगलोरला पोस्टिंग बहुधा. मला मागे काहीच लोंबकळत ठेवायचं नाहीये, आपण वेगळं होऊया."
"हम्म्म्म्म...आईशी बोललीस तुझ्या?" अनिलच्या आवाजात किंचीतही आश्चर्य नव्हतं, जणू काही त्याला जे सांगायचं होतं ते तिच बोलत होती.
"हो."
डोंबिवलीला सविता घरी आली होती. अनिलनेच बोलावून घेतलं होतं. जे त्याने ठरवलं होतं, ते तोच सांगणार होता.
"मी आणि आदितीने वेगळं व्हायचा निर्णय घेतलाय." कोणालाच आश्चर्यही झालं नाही अथवा धक्काही. हे कधी ना कधी होणारच असं जणू गृहीतच धरलं होतं त्यांनी.
"पंचविसाव्या वर्षी लग्न आणि सत्ताविसाव्या वर्षी घटस्फोट! फार उथळ झालायस तु अनिल." बाबा एवढं बोलले आणि विषय तिथेच संपला.
प्रतिक्रिया
8 Aug 2010 - 7:32 pm | प्राजक्ताचि फुले
मला नाही वाटत की एखादी शिकलेली सुसंस्क्रुत मुलगी एव्हडया तडकाफडकी घटस्फोटाचा निर्णय घेईल म्हणुन.......
आणि मुलानेसुध्दा थोडीफार मदत केली घरच्या कामात तर काय बिघडले ? दोघानिही समजुन उमजुन घ्यायला हव होत...
8 Aug 2010 - 8:06 pm | रेवती
वाचतिये.
पुढे काय झालं?
8 Aug 2010 - 8:09 pm | भारी समर्थ
ताई, संपली पेनातली शाई.
एवढीच होती गोष्ट.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
भारी समर्थ
8 Aug 2010 - 8:09 pm | सुहास..
एका माणसाबरोबर रहायचं म्हटल्यावर काही तडजोडी कराव्या लागतात >>>
मॅन !! एकदम सही रे !!
पंचविसाव्या वर्षी लग्न आणि सत्ताविसाव्या वर्षी घटस्फोट! फार उथळ झालायस तु अनिल >>
पि ढी जा त !!
8 Aug 2010 - 8:13 pm | प्रसन्न केसकर
वाढु द्यायच्या ऐवजी स्वयंपाक शिकायचा होता ना.
आईबापांचं घर सोडलं तेव्हा नाही काही वाटलं. मग घटस्फोटाचं दु:ख एव्हढं कश्याला करायचं. अन नव्हतं तिच्याशिवाय जगायला जमत तर शिकायचा होता सैपाक-बिंपाक!
अजिबात सहानुभुती नाही वाटत अनिलबद्दल. ही गॉट व्हॉट ही डिझर्वस!
8 Aug 2010 - 8:13 pm | प्रसन्न केसकर
वाढु द्यायच्या ऐवजी स्वयंपाक शिकायचा होता ना.
आईबापांचं घर सोडलं तेव्हा नाही काही वाटलं. मग घटस्फोटाचं दु:ख एव्हढं कश्याला करायचं. अन नव्हतं तिच्याशिवाय जगायला जमत तर शिकायचा होता सैपाक-बिंपाक!
अजिबात सहानुभुती नाही वाटत अनिलबद्दल. ही गॉट व्हॉट ही डिझर्वस!
8 Aug 2010 - 8:18 pm | सनविवि
+१
8 Aug 2010 - 8:17 pm | सनविवि
कथा एवढ्या लवकर संपेल असं वाटलं नव्हतं, थोडा अपेक्षाभंगच झाला :-(
पण एकूण कथा मस्त जमली आहे. लेखनशैली आवडली :)
अजून येऊद्या!
8 Aug 2010 - 8:30 pm | भारी समर्थ
@प्राजक्ताचि फुले: बरोबर आहे. पण सिंहगडच्या रेव्ह पार्टीमधे, शेरेगरकडे पैसे गुंतवणारे, सत्यसाईबाबाकडे जाणारे आणि सगळीकडेच वाढणार्या बलात्कारांमधेही सुशिक्षित, करियर फोकस्ड मुले-मुलीच शामील असतात. मध्यंतरी लोकसत्तामधे एका बाईंनी त्यांच्या वडिलांबद्दल लिहीताना सांगितले होते की, त्यांची आई पहाटेच कामाला जायची कारण तिचं कामाचं ठिकाण घरापासून लांब होतं आणि यायचीही उशीराच. त्यांचे वडील आईला डबा करून तर द्यायचेच, शिवाय दोन्ही मुलींचं सगळही. वर, संध्याकाळचा स्वयंपाक. तेही ८० च्या दशकात. मला वाटतं एखाद्याच्या वागण्याचा स्थळ, हुद्दा, पैसा, शिक्षण (काही प्रमाणात) यासर्वांपेक्षा परिस्थितीशी संबंध जास्त आहे.
@सनविवि: पुढच्या वेळी लक्षात ठेवेन..
वाचल्याबद्दल धन्यवाद!
भारी समर्थ
8 Aug 2010 - 8:37 pm | बहुगुणी
..दुर्दैवाने थोडीफार अशीच गोष्ट वास्तवात घडलेली मी बघितली आहे (इथे कथेत निदान clean break होऊन संबंधित माणसं आयुष्यात पुढे तरी सरकली आहेत, मी पाहिलेल्या कुटूंबात पुढची ४ वर्षे कोर्ट-कचेर्या चालू आहेत!)
लेखन छानच होतं भारी समर्थ! पण कथा मध्येच संप(व)ली असं वाटतं, मुग्धा या पात्राला घेऊन कथा पुढे सरकू शकली असती (पण तुम्हाला कदाचित सुखांत शेवट न करता इथेच थांबवायची होती कथा. तरीही,) 'भाग एक' मध्येच तुम्ही घटस्फोट झाला हे सांगून टाकलं होतं, त्यामुळे पुढच्या २ भागांत केवळ तो का झाला त्याची (तुम्हाला योग्य वाटली तशी) कारणमीमांसा दिलीत, कथेत 'पुढे' काही घडलं नाही, जे काही आलं ते 'मागच्या' घटनेचं explanation. या अर्थाने कथा अपूरी वाटली, इतकंच. पण तुमची style आवडली, आणखी लिहा.
[जाता, या कथेतील नायक-नायिका आपापल्या impulse ने निर्णय घेत गेले, त्यांनी आणि इतरांनीही 'सविता' सारख्या तरूणच, पण थोड्याश्या व्यवहारी, व्यक्तींच्या hesitation ला, सबूरीच्या सल्ल्याला थोडी किंमत दिली असती तर बरं झालं असतं असं वाटलं, बरेचदा आपण स्वतःला 'ओळखतो' त्याहून काही जवळची मंडळी आपल्याला आधिक चांगलं ओळखतात, आपल्या गुण-दोष, मर्यादांसह, अशा वेळी त्यांच्या सल्ल्याचा निदान विचार तरी करावाच.]
8 Aug 2010 - 8:57 pm | ज्ञानेश...
सुंदर प्रतिक्रिया.
बरेचदा आपण स्वतःला 'ओळखतो' त्याहून काही जवळची मंडळी आपल्याला आधिक चांगलं ओळखतात, आपल्या गुण-दोष, मर्यादांसह...
क्या बात है !
कथा आवडली.
9 Aug 2010 - 12:00 am | भारी समर्थ
मुग्धाला घेऊन किंवा आणखीही प्रकारे गोष्ट पुढे सरकवता आली असती, पण त्याचा 'डेली सोप' होण्याचाच धोका जास्त. बाकी, सवितासारखी एखादी व्यक्ती आपल्या (माझ्या मते प्रत्येकाच्याच) आजूबाजूला असतेच. आपल्या इगोमूळे (मराठीतः अतिशहाणपणा) आपण असल्या सल्ल्यांकडे दुर्लक्ष करत असतो.
असो, निरीक्षण आवडले.
भारी समर्थ
14 Aug 2010 - 1:14 pm | प्राजक्ताचि फुले
मग तिला कथेत घेतलेतच कशाला ????
असो, कथेची सुरुवात छान झाली होती पण मधेच काहीतरी तोड्ल्यासारख वाटल...!
8 Aug 2010 - 11:03 pm | निखिल देशपांडे
कथा आवडली..
+१ सहमत
8 Aug 2010 - 11:05 pm | शिल्पा ब
मुलं झाली नसल्याने घटस्फोट किंवा किमान त्याचा निर्णय पटकन घेतला जातो...मुलं असतील तर त्यांच्यासाठी म्हणून एकत्र राहून तडजोडी करत कुरकुरत राहावे लागते..
हे आपलं माझं एक मत.
शिवाय ज्याची त्याची विचार करण्याची क्षमता अन कुठल्या गोष्टीला प्राधान्य द्यायचं याचा विचार महत्त्वाचा.
10 Aug 2010 - 1:52 am | हर्षद आनंदी
अनुत्तरीत प्रश्न...
१. निर्णय अपेक्षित असताना नायकाचा स्वभाव का बदलतो?
२. नाखुशीने का होईना सुखाच्या शोधात स्वतःचे वेगळे घर केल्यावर, काम शिकण्याची ईच्छा का नाही?
३. नायक स्वयंपाकासाठी बाई ठेऊ ईच्छित नाही त्याचे कारण घरातली खाद्यसंस्कृती???
४. आणि बरेच काही.. लग्नाप्रमाणेच घटस्फोटाची घाई!!
14 Aug 2010 - 1:15 pm | प्राजक्ताचि फुले
१००% सहमत!!