आज बर्याच दिवसांनी अनिल फ्री होता. ना कुठले सिस्टीम डाऊन कॉल्स अटेन्ड करायचे होते, ना कोणत्या क्लायंट मिटींग्स. सहज खालच्या टपरीवर जाऊन चहा पिऊन यावा म्हणून त्याने शेखरला हाक मारली, "अरे शेखर चल, दामोदरच्या टपरीवर चहा टाकून येऊ रे. कॅन्टीनमधल्या चहाचा कंटाळा यायला लागलाय आता."
"आज काय, देवळे महाराज निवांत दिसतायत? पण मित्रा, जमणार नाही रे. ही एवढी बिलं क्लेमला लावली की लगेच परेलला पळायचय. त्या हिडिंबा मातेने १० मिनीटापूर्वीच आदेश दिलाय. घरी जायची वेळ, आणि क्लायंटचा युपीएस उडायची वेळ ही एकच असते ना रे. तुम्ही या आस्वाद घेऊन, सोबत कोणी नसेल तर हिडिंबेलाच घेऊन जा ना." शेखरच्या या वाक्यावर दोघे मनमुराद हसले आणि तेवढ्यात शेखर बिलं सबमिट करायला अकाऊंट्स मधे निघूनही गेला.
"रोज साला या कामातून एक क्षण उसंत मिळत नाही आणि वेळ मिळाला की तो घालवायचा कसा हे ही कळत नाही". अनिल स्वत:शीच विचार करत खाली निघाला. टपरीवर पहातो तर, दामोदर एका कानाला फोन टकवून होता.
"दामोदर, किससे बतिया रहा है? चाय पिला यार"
"अनिल साब, कैसे हैं? बहोत दिनों के बाद पधारे इधर? ए बाबू चाय दे साब को. गांव से फॉन हे. बिबी." एवढे बोलून तो परत त्याच्या फोनवरच्या संभाषणामधे गुंगला. टपरीवरच्या पोर्याने अनिलला चहा दिला. इतक्यात समोरून शेखर पळत पळत स्टेशनला जाणार्या बसमधे चढून निघून गेला.
अनिल देवळे हा तसा सुखवस्तू मध्यमवर्गीय चौरस घरातला. बाबा रेल्वेमधून रिटायर झालेले आणि तीनेक वर्षांपूर्वी, सामान्यत: सर्वच मध्यमवर्गीय कुटुंबांप्रमाणे माटुंग्याच्या चाळीतली ’खोली’ विकून डोंबिवलीला तिसर्या मजल्यावरच्या ’उंची’वर रहायला आलेले. सविताचे, अनिलच्या बहिणीचे लग्नही त्याच दरम्यान थाटामाटात पार पडलेले. इलेक्ट्रॉनिक्समधे डिप्लोमा करून अनिलने टेक्निकल सपोर्ट इंजिनीयर म्हणून इकडची नोकरी धरली आणि केवळ अंगभूत कौशल्यावर सर्विसबरोबर सेल्सही बघू लागला. कष्टाळू असण्यापेक्षाही, ’इथेच रमलोय, कशाला उगीच दुसरीकडची माती शिंगाने उकरत बसा’ ह्या स्वभावामूळे तो इकडे टिकला आणि चांगलीच प्रगतीही करू लागला. होता होता, लहान वयातच जबाबदारीची पदंही त्याला मिळू लागली. आता वयाच्या २७ व्या वर्षी वेस्ट झोनचा सर्विस हेड झालाय, त्याचबरोबर सेल्सही पहातोच आहे. अनिल तसा मूळातच ’गमत्या’ स्वभावाचा, अगदी व्हीपीपासून ते न्यू जॉइनीज, एवढंच कशाला तर अगदी काळे दादाच्या ऑफिस बॉइजच्या घोळक्यातही तितक्याच सहजतेने रमणारा. पण गेले तीन-चार महिने सर्वांशी जरा अलिप्तच रहात होता. पावसाळ्यात काळे दादाच्या ओळखीतला गाडीवाला गाठून लोणावळ्याला ’वर्षा सहल’ घडवून आणणारा अनिल असा बघितला की, काहीतरी चुकल्यासारखेच वाटत होते सगळ्यांना. पण आताशा सवयच होऊन गेली होती सर्वांना याची. या वेगवान माणसाच्या उधाणलेल्या आयुष्याला खिळ घातली होती ती त्याच्या घटस्फोटाने.
साधारणत: तीनेक वर्षांपूर्वी, घर बदलायच्या घाईगडबडीत असताना ’असिस्टंट मॅनेजर - सेल्स’ या पदावर आदिती नाईक नावाची तरूणी आली. तशी बर्यापैकी नविन आणि वयाने पदासाठी लहानच होती. कॉलेजपासूनच स्वावलंबीपणामूळे, आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्यासाठी म्हणा किंवा आणखी काही, पण आपला पॉकेटमनी स्वत:च कमवायला लागलेली ही तरूणी एका वर्षाच्या अनूभवावर अनिलच्याच कंपनीमधे रूजू झाली. आता सेल्समधे चारेक वर्ष काढल्यामूळे बर्यापैकी व्यावसायिक समंजसपणा तिच्यात आला होता. त्यामूळे कोणता माणूस हा आपल्या कामाचा आहे आणि कोणता नाही याचा चटकन अंदाज तिला यायचा. तिच्यादृष्टीने कमी महत्वाच्या माणसांसोबत ती अगदी माफकच बोले. कामात मात्र जितकी चाणाक्ष तितकीच चलाख आणि चपळ.
जॉइन झाल्याच्या दुसर्याच दिवशी तिला अनिलबरोबर एका सेल्स पिचसाठी जावं लागलं. जाता जाता अनिलने जरा जपूनच तिची चौकशी सुरू केली. त्याच्या अवांतर विषयांना परत कामाच्या विषयांवर आणतानाच त्याच्या माफक विनोदांना तिने काही थारा दिला नाही. त्यादिवशी अनिलला वाटलं की ही मुलगी जरा अधूच आहे डोक्याने म्हणून. पण जसजसे दिवस सरकू लागले, तसतसे तिचा क्लायंट हॅण्ड्लिंगचा सराईतपणा, तिचा गरजेएवढा फटकळपणा आणि करियर बद्दलच्या ठाम, स्पष्ट अपेक्षा ऐकून त्याचे तिच्याबद्दलचे मत नक्कीच बदलायला लागले होते. तिचे वडील, एक सामाजिक संस्थेशी निगडीत होते व पाच वर्षांपूर्वी स्वेच्छानिवृती घेऊन झारखंडमधे खाणकामामूळे होणार्या पर्यावरणहानीविरूद्ध लढणार्या त्या संस्थेत पुर्णवेळ काम करत होते. आई एका खाजगी बॅंकेत उच्चपदावर काम करत होती. एवढीच काय ती वैयक्तीक माहिती त्याला मिळू शकली.
काही दिवस असेच निघून गेल्यावर असेच एकदा त्या पावसाळ्यात अनिलने सहलीसाठी सर्वांकडे विचारणा केली. तसे ४-५ जण लगेच तयारही झाले. सहज म्हणून त्याने आदितीलाही विचारलं. अनपेक्षितपणे तिनेही होकार कळवला. ठरलेल्या वेळेला सगळे मुंबई सोडून अलिबागच्या दिशेला निघाले. सगळ्याच पिकनीकमधला दंगा इथेही सुरू झाला. सगळ्याचा केंद्रबिंदू मात्र अनिल. त्याचे ते विनोद, घडलेले किस्से सांगण्याची एक खुमासदार शैली, सगळंच नेहमीप्रमाणे. आणि नेहमीप्रमाणेच, व्हीपी जोगळेकरांची सेक्रेटरी मधुरा त्याच्याकडे गुंग होऊन पहात होती. सगळ्यांच्याच लक्षात येण्याइतपत तिचं त्याच्याकडे पहाणे इतरांच्या निदर्शक कटाक्षांमधे दिसतच होतं. काशीद लागताच जोरदार पावसाने त्यांना गाठले. तसे सर्वजण म्हणाले की, आधी पावसात भिजूया मग रूमवर जाऊया म्हणून. म्हणाले काय, सगळे उतरले सुद्धा. मग, शेखरबरोबर अनिल लॉजवर गेला, रूम वगैरे नक्की केल्या आणि सर्वांचे सामान तिकडे टाकून समुद्रकिनारी दाखल झाला. अथांग समुद्र, नयनरम्य किनारा आणि तुफान कोसळणारा तो पाऊस या सर्वांआधी त्याचे लक्ष खिळून राहिले ते चिंब भिजलेल्या आदितीकडे आणि आज वेगळ्याच भासणार्या तिच्या डोळ्यांकडे. नेहमी प्रत्येक गोष्टीत निर्णायकता दाखवणारे ते डोळे आज फक्त मुग्ध होते. कुठल्याही बाबीची चूक बरोबर करणारी आदिती समूद्राच्या पाण्यात उभी राहून आज तो पाऊस फक्त मनात साठवून घेत होती. इतर सगळे मस्त गाणी वगैरे गात होते. पण ही एकटीच. जणू काही बाकीजण हिच्या खिजगणतीतही नव्हते.
अनिल तिच्याशेजारी उभा राहिला. त्याला वाटत होतं की म्हणावं की, ’काय सही पाऊस पडतोय ना’, ’इकडे काय करतेस एकटी?’ पण काय ते नक्की ठरत नव्हतं. एवढ्यात तिच म्हणाली, "अशा पावसात कुणी काहीच बोलू नये, फक्त पाऊस, निसर्ग आणि आपण. अंतर्मुख करायला लावणारं असं सुंदर वातावरण हे."
"हं"
"तुला काय वाटतं?"
तिच्या या प्रश्नावर मात्र अनिलसारख्या किशोरभक्ताने स्वत:च्याही नकळत मराठी किशोर-सौमित्रचा हात पकडला.
"पाऊस पडून गेल्यावर मन पागोळ्यांगत झाले, क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले."
तिने त्याच्याकडे पाहिले व नुसते मंद स्मित केले. ते पहाणे चमकून पहाणे नव्हते, आश्चर्यकारक नव्हते, प्रेमळ नव्हते, तर फक्त मुग्ध होते. त्यावेळी अनिलला वाटले की, गेला, आपला तोल गेला म्हणून. त्यालाही तिच्यासारखंच फक्त पाऊस आणि समुद्रच पहावासा वाटत होता. पण भिजत्या पावसात आदितीचं ते सुंदर रूप त्याला अधिक मोहित करत होतं. अगदी प्रयत्नपूर्वक तो तिच्याकडे पहाण्याचं टाळत होता. त्याचबरोबर त्याला हेही वाटत होतं की कसं का होईना, पण तिला कळावं की ती किती मोहक दिसते आहे या भिजर्या रूपात. पण कसं? तेच तर कळत नव्हतं!
(क्रमशः)
भारी समर्थ
प्रतिक्रिया
7 Aug 2010 - 8:21 pm | सूर्यपुत्र
"भारी" बरंका....
7 Aug 2010 - 8:35 pm | सुनील
सुरुवात छान झाली आहे. पुढचा भाग लवकर टाका.
7 Aug 2010 - 9:03 pm | मितान
छान सुरुवात झालीये.
शैली आवडली.
पुढे काय झालं ?
7 Aug 2010 - 9:49 pm | बहुगुणी
येऊ द्या आणखी... (घटस्फोट झाला हे सांगून आधीच spoiler alert दिलात, पुढे कशी वळते कथा ते वाचायला आवडेल.)
7 Aug 2010 - 10:42 pm | शिल्पा ब
छान...पुढचा भाग येउ दे.
8 Aug 2010 - 2:21 am | प्रभो
पुढे??
8 Aug 2010 - 10:15 am | सुहास..
तडाखेबाज लिखाण !!
8 Aug 2010 - 8:04 pm | भारी समर्थ
भारी समर्थ