बाय

शुचि's picture
शुचि in जनातलं, मनातलं
27 Jul 2010 - 8:24 am

माझ्या सासूबाईंनी लिहीलेला त्यांच्या शब्दातील हा लेख -

आजकाल खूपदा वेडं मन मागे मागे जातं आणि व्याकूळ आठवण येते ती बालपणीचा रम्य काळ घलवलेल्या वसई तालुक्यातल्या विरार गावाची. हळूहळू धूसर असं एक चौसोपी घर दिसू लागतं, पुढे मागे अंगण असलेलं. घराला मागे पडवी तर रांगोळीसाठी पुढे मोठ्ठा ओटा.परसदारी आम्हा मुलांसाठी करकर आवाज करणारा, साखळ्या-साखळ्यांचा भला थोरला झोपाळा. लहानपणी तर हा झोपाळा फारच प्रशस्त भासे.
अंगणभर तगर, प्राजक्त, जाई-जुई, जास्वंद याव्यतिरीक्त आंबा, पेरू, चिक्कू,पपनस, जांभूळ, करवंद. मग काय मे महीन्यात आम्हा मुलांची मज्जाच मज्जा. अरे हो तुळशी वृंदावन सुद्धा.
कडेसरीलाच पाण्यानी भरलेली विहीर, घरगड्याच्या कुटुंबासाठी झोपडेआवजा घर व एका बाजूला जळणाची लाकड आणि शेणाच्या गोवर्‍या साठवणीकरता खोपटं.
माझी आई ८ भावंडातली ४ भाऊ आणि ४ बहीणी. सगळी भावंड तिला बाय म्हणत. तडजोड मानापमान गिळून मुकाट सोसणं अंगवळणी पडलेलं. काम करताना तोंडात देवीचं नाव. काटकसर पाचवीला पूजलेली कारण पदरी ६ पोरं. पण करणंसवरणं अतिशय निगुतीचं. तांदूळही वर्षाचा एकदम शेतावरून घरात येत असे आणि वेताच्या कणग्यात साठवला जाई. सगळे म्हणत - बायला इलुशं तूप द्या, काहीतरी चांगलच होईल त्याचं. बाय कामाला वाघीण, काटक. तीन्ही वेळचं रांधण्यात, साफसफाईत दिवसाचे २४ तास कमी पडत पण कधी त्रागा नाही की मुलांवर रागराग नाही. साधं बिरडं करायचं तर भले थोरले वाल निवडावे लागत. मग आम्ही मोठे झाल्यावर आम्हाला काम वाटून मिळू लागलं.
दिवाळी म्हणजे मोठा सण. कारण बायचे बहीण भाऊ म्हणजे आमचे मवशा मामा आणि मावस भावंड एकत्र जमत. फराळासाठी आजीचं मोठं भींतीतलं कपाट - करंजी, पापडी, लाडू,शेव, चिवडा, अनारसे, सर्व काही त्यात मोठ्या पितळी डब्यात भरलेलं.त्याला आजी कुलूप लावायची. तिच्या वेळापत्रकाप्रमाणे अम्हाला फराळ मिळायचा. पण आजी दुपारी झोपली की मावशी गुपचूप आम्हाला फराळ द्यायची.
आजीच्या पश्चात बाय असाच चवदार फराळ बनवत असे. बायला आजीने तयार केलं पण आजीला कोणी ते मात्र विचारायचं राहून गेलं ही चुट्पूट कायम राहील. बाय सुग्रणच होती. लुसलुशीत पुरण्पोळी, खमंग तेलपोळी, गणपतीत बनवलेले उकडीचे मोदक याशिवाय आमचे पारंपारीक पदार्थ म्हणाल तर - भानोळी, रवळी, गोतांबील्, सांदणे, अप्पे,आयरोळ्या, अळूवडी, गुळपापडी किती किती म्हणून सांगू? थोडक्यामधे नेटका संसार करणारी होती.
दिवाळीला बाय सर्वांना सुवासिक उटणं लावून, तेलानी मर्दन करून खसखसून आंघोळ घालायची. मग नवीन कपडे घालून देवळात जाऊन यायचा शिरस्ता होता.मग एकेकाला ओवाळलं जायचं. खूप मजा वाटायची पण धीरही सुटायचा, कधी एकदा फटाके वाजवतोय असं व्हायचं.
मी शेंडेफळ होते.बायची खूप लाडकी. तिचं आवडतं वाक्यं होतं - "शरयुला रस्त्यावरचं कोणीही हसत हसत उचलून घेऊन जाईल". माझ्या लग्नानंतर ती गेली.तिच्यापेक्षा आम्ही मुलं जास्त शिकलो. पण तिच्या हाताची चव नाही आली आम्हा बहीणींच्या हाताला. ती तिचीच खासियत. तिचे आशीर्वाद मला जन्मभर पुरले आणि पुरत आहेत.

समाजजीवनमानराहणीलेखअनुभव

प्रतिक्रिया

प्रकाश घाटपांडे's picture

27 Jul 2010 - 8:40 am | प्रकाश घाटपांडे

छान स्मृतींची सोबत जपलीय. गतकाळच्या स्मृती कधी त्रासदायक तर कधी सोबत.

शिल्पा ब's picture

27 Jul 2010 - 9:06 am | शिल्पा ब

शुची, छान लिहिलंय तुझ्या सासुबैनी...

भानोळी, रवळी, गोतांबील्, सांदणे, अप्पे,आयरोळ्या, अळूवडी, गुळपापडी किती किती म्हणून सांगू?
या पदार्थांची रेसिपी घेऊन टाक इथे..

अवांतर: बाय हे शीर्षक वाचून कोणी मिपा सोडून चाललेय काय असंच वाटलं आधी. :-)

पुष्करिणी's picture

27 Jul 2010 - 11:52 pm | पुष्करिणी

+१ लेख छान झालाय्, शिल्पातै वर म्हणताय्त तसं या सगळ्या पाकृ पण साबांना द्यायला सांगा

शुचि's picture

27 Jul 2010 - 3:46 pm | शुचि

घाटपांडे आणि शिल्पा धन्यवाद.
आमच्या दोघींचे तासन तास जातात अशा जिव्हाळ्याच्या गप्पा मारण्यात. त्या खूप रंगवून सांगतात आठवणी.

प्रभो's picture

27 Jul 2010 - 7:07 pm | प्रभो

मस्त.

मराठमोळा's picture

28 Jul 2010 - 12:14 am | मराठमोळा

मस्तच..
आयुष्यभर सोबत राहतात त्या म्हणजे आठवणीच. :)

राजेश घासकडवी's picture

28 Jul 2010 - 12:34 am | राजेश घासकडवी

लेखन चांगलं झालंय. पण इतकं कमी का लिहिलंत? हा हजार शब्दांच्या लेखात मावेल असा विषय नाही वाटत. अधिक लिहावं ही विनंती.

सन्जोप राव's picture

28 Jul 2010 - 5:02 am | सन्जोप राव

म्हणतो

बहुगुणी's picture

28 Jul 2010 - 12:48 am | बहुगुणी

छान लिहिलेला (पण थोडासा घाईत 'आटोपलेला' असावासा) लेख आवडला, आणि आठवण झाली ती या आधी स्वाती दिनेश यांनी त्यांच्या वामनसुत या सासर्‍यांना 'लिहितं' करून मिपाच्या वाचकांच्या भेटीला आणलं त्या स्मृतीगंध या मालिकेची.

माझं मिपा कर मित्र-मैत्रिणींना आवाहन आहे की त्यांनी आपापल्या घरच्या ज्येष्ठांना असंच वरचे वर लिहितं करावं, खूप जपावेत असे ठेवे आपल्या वाटेला येतील. आणि मिपाचं व्यासपीठ आणखी समृद्ध होईल.

संपादकांनीही 'ज्येष्ठ-सन्मान' नावाचं एक खास सदरच निर्माण करावं अशी सूचना मी इथे करेन.

शुचितै, छानच लिहिलय तुझ्या सासूबाईंनी!
त्यांना आणखी आठवणी लिहायला सांग ना!
त्या आठवणींमध्येच जर तुमच्या पद्धतीच्या पाकृ दिल्या तर मजा येइल.