माझी व लाखों-करोडोंची लाईफलाईन......

भानस's picture
भानस in जनातलं, मनातलं
5 May 2010 - 11:47 am

तिला प्रथम कधी बरं पाहिलं होतं मी...... आई सांगते त्यानुसार जेमतेम वर्षाची असेन. दादर ते अंधेरी हा नेहमीचा प्रवास. मामा अंधेरीला राहायचा नं. तेव्हांपासून ती माझी व मी तिची झालेली. गेल्या जन्माचे माहीत नाही पण या जन्माचे ऋणानुबंध नक्कीच होते. आम्ही ठाण्याला शिफ्ट होऊन दोन-तीनच महिने झाले होते. स्कूटर स्टॅंडला लावतानाच ८.५३ आज तिनावर येतेय हे ऐकताच मी नवऱ्याला टाटा करून पळत सुटले. ब्रिजवरून उतरतानाच लोकल आलीही त्यामुळे रोजचा डबा सोडाच पण पुढचा फस्टही गाठणे केवळ अशक्य असल्याने समोरच असलेला महिलांचा सेकंडचा डबा चटदिशी पकडला. दहा सेकंदाच्या चलबिचलीमुळे इतके जीव खाऊन धावूनही माझी गाडी सुटणार होती. हुश्श..... मिळाली बाई एकदाची.

काय कोण जाणे पण समोर आलेली गाडी कुठल्याही कारणाने चुकणे म्हणजे ' घोर अपमान ' :) , लोकलशी बेईमानीच जणू. "क्या रे, इत्ता भी नही जमताय तेरेकु? कितने सालोंसे आ रही हो? ऐसे गाडी छोडनेका नहीं....... " कितीही गर्दी असो, गाडी या प्लॅटफॉर्मवरून अचानक ट्रॅक बदलून पलीकडच्या ट्रॅकवर अवतरो...... वाटेल ते झाले तरी हवी ती गाडी मिळालीच पाहिजे हा अलिखित करार होता. मीच माझ्याशी केलेला. कायमचा करार. काळ, वेळ व दुरावा या साऱ्यावर मात करणारा....... हाडीमाशी मुरलेला. आजही मी समोर आलेली गाडी चुकूनही सोडत नाही..... केलेला करार मोडत नाही. :)

आता समजा नसती मिळाली तरी काय मोठे बिघडणार होते..... दुसरी मागोमाग येतेच की...... बरे कोणी काही सक्तीही केलेली नाही की कोणी पारितोषिकही देणार नव्हते. पण नाही...... गाडी दिसताच कधी पावले धावू लागतात ते कळतच नाही. कशी गंमत आहे पाहा, आजही मी जेव्हां जेव्हां ठाण्यात जाते लगेच दुसऱ्याच दिवशी जाऊन पास काढते. सकाळच्या धावपळीचे - कोलाहलाचे - निवेदकांचे आवाज - त्यावरच्या माणसांच्या प्रतिक्रिया - ब्रिजवरून सुसाट धावणे, चालत्या ट्रेनमधून बरोबर गेटसमोर अलगद प्लॅटफॉर्मवर उतरणारे पाय, स्टॉलवरची लगबग, तिकीटांची लाईन, टीसी व त्याला पाहून मुद्दाम समोर येणारी किंवा हमखास पळणारी माणसे, सगळी जिवंत सळसळ आसुसून नसानसात भरून घेत निदान दादरपर्यंत तरी जातेच जाते. पासही केवळ आजवरच्या लोकलच्या कराराच्या बांधीलकीसाठी. नाहीतर अशी मी कितीवेळा जाणार असते..... फार तर दोन..... अगदीच डोक्यावरून पाणी तीनदा. पण पर्स मध्ये पास नाही म्हणजे जणू चाकातली हवाच काढून घेतल्यासारखे वाटते. कुछ तो भौत गडबड हो रहेली हैं रे चे फिलिंग देणारे...... उगाचच तुटल्यासाखे वाटत राहते.

काही सवयी जन्मजात अंगात मुरलेल्या...... लोकलचा पहिला डबा स्टेशनात शिरताच प्रतिक्षिप्त क्रियेने ओढणीची गाठ मारून पटकन ती पुढे येते, पर्स काखोटीला जाते. मंगळसूत्र चटदिशी ओढणीखाली दडते आणि कधी डब्याच्या पहिल्या नाहीतर मागच्या दरवाज्याचे हॅंडल पकडले जाते कळतही नाही. आतला रेटा उतरताच टुणकन उडी मारून एकदम आत घुसले की वीरश्री ओसरते. हे सारे करताना कुठलेही श्रम नाहीत की भीती नाही. जसे आपण बोलतो- चालतो तसेच हेही एक यावर समस्त लोकल परिवार एकमताने सहमत होईल.

रोजची गाडी तर मिळाली पण डबा चुकला होता. सेकंडमधून प्रवास करणे मला मनोमन भावते मात्र अतिरेक गर्दीमुळे नाईलाजाने मी शक्यतो पहिला वर्गच पसंत करी. फर्स्टमध्ये सगळे जरा तोऱ्यातच असतात. आता हा कसला तोरा हे मला कधीच न उलगडलेले कोडे आहे. एकेकाचे अजब प्रकार. अगदी रोजचे चेहरेही एकमेकांच्या आरपार पाहताना पाहिले की मला घुसमटून जायला होई. कोरा चेहरा आणि आक्रसून घेतलेली मने...... क्वचित एखादा दुसरा हल्लागुल्ला करणारा ग्रुपही दिसे...... नाही असे नाही...... पण त्याही चौकटीत अडकलेल्या. कोणालाही सहजी आपल्यात न सामावून घेणाऱ्या. उत्स्फूर्त होणारी शब्दांची देवाणघेवाण जवळजवळ नाहीच. मुळात फक्त तेराच सीट त्याच्या कश्याबश्या मेहरबानी खातर झालेल्या पंधरा-फार तर सोळा जागा. त्यातही सीटवर तासभर बसूनही उतरणारी आधी जागेवर उभी राहील. ओढणी-साडी नीट करेल, वरची पर्स काढेल.... आणि मग कोणाचाही स्पर्श होणार नाही याची खबरदारी घेत दाराकडे वळेल. जणू बाकीच्या अछूत कन्या..... :(

कोणाची सुंदर साडी तर कोणाचा नवाकोरा पंजाबी, घातलेला मोगऱ्याच्या, चमेलीच्या कळ्यांचा घट्ट विणलेला गजरा तर कोणाच्या आकर्षक चपला........ एखादी गोडशी , नाकीडोळी रेखीव तर एखादी वेड लावणाऱ्या खळ्या गालावर अन अनेकांचे जीव त्या खळ्यांत ....... कोणाचे अपरे नाक तर कोणाचा लांबसडक शेपटा....... सगळ्याची नोंद मनात होत असते पण उघडपणे चटकन कोणी, " अगं, किती गोड दिसते आहेस गं. " असे म्हणणार नाही. एखाद्या जागेचाच दोष म्हणायचा की काय पण जरा रुक्षच मामला. अन त्या उलट सेकंडमध्ये पाहावे तर सगळे कसे भरभरून - फसफसून उतू जाणारे. मग त्या गप्पा असोत नाहीतर भांडणे असोत. कुठेही हातचे राखून काही नाही. जो भी कुछ हो पुरे दिलोजानसे....... सगळे कसे जीवनरसाने सळसळणारे. जिकडेतिकडे मोठे मोठे ग्रुप्स, त्यांचे खिदळणे, थट्टा, मध्येच खादाडी.....डोहाळजेवणे - वाढदिवस.... फेरीवाल्यांची लगबग....... मध्येच कचाकचा भांडणाचे आवाज तर कोणा गात्या गळ्यातून उमटणारी सुरेल तान.... :)

घरातून निघताना कितीही धावपळ-तणतण झालेली असू देत. एकदा का या विश्वात प्रवेश केला की नकळत ताण हलका होतो. सगळे श्रम विसरून काहीसे हलके वाटते. तासाभरासाठी सगळ्या कटकटीतून झालेली मुक्तता. लोकलच्या तालावर..... दर स्टेशनागणिक उतरणाऱ्या - चढणाऱ्या मैत्रिणी, काही ओळखीचे तर काही अनोळखी चेहरे..... एखादी नुकतेच लग्न झालेली....... लाजरी-बुजरी तर कोणी आठवा लागलेली...... अवघडून आलेली, कोणाचे स्वप्नाळू भावुक डोळे तर कोणाची चहाटळ-चावट छेडाछेडी ...... कोणाचे हळवे होऊन आसवे गाळणे तर कोणाचे घरच्यांच्या वागण्याने अगतिक होणे..... कोणाचा सात्त्विक संताप तर कोणाचा खुल्ला तळतळाट....... अनेक जणींसाठी हा सकाळचा व संध्याकाळचा लोकलचा एक तास खास स्वत:साठीचा..... हक्काचा कोपरा...... तरोताजा करणारा- भावना समजून घेणारा - ओढ लावणारा ..... जीवनरस देणारा. भले ही प्रत्यक्षात हाडामासाची नसेल पण हिला मन मात्र नक्की आहे आणि या मनाला हजारो चेहरे आहेत. अन या साऱ्या चेहऱ्यांत प्रेम - आपुलकी - स्नेह ठायीठायी समावलायं. एक आश्वस्त स्नेह.

" बाई बाई.... किती गं ही गर्दी.... कसा प्रवास करता तुम्ही दररोज कोण जाणे...... आमचा तर जीवच घाबरा होतो. लोकल समोर आली की पाय लटपटायला लागतात. गाड्यांवर गाड्या सोडत राहतो पण गर्दी काही संपत नाही. " मुंबई बाहेरच्या काही मैत्रिणींच्या या अश्या प्रश्नांवर मी नुसतीच हसते. काय आणि कसे सांगू हिला यातले रहस्य..... ते अनुभवायलाच हवे. तेही झोकून देऊन, हातचे न राखता......सर्वस्वी अधीन होऊन...... मग कितीही गर्दी वाढो...... मोटरमनचा संप होवो की पावसाने काही काळ गाड्या मंदगती चालोत-क्वचित बंदही पडोत.... का बॉम्बं ब्लास्ट होवोत...... या सगळ्यांना पुरून उरणारी, भरभरून जीवन देणारी व जीव जगवणारी, दिवसातले बावीस तास अव्याहत धावणारी........ अनेकांना हजारो करांनी आपल्यात सामावून घेत त्यांच्या जगण्याची गणिते जुळवणारी - सोडवणारी, आयुष्याचा अपरिहार्य व अविभाज्य भाग होऊन राहिलेली प्रिय सखी ...... माझी व माझ्या सारख्या लाखों-करोडोंची लाईफलाईन...... लोकल. :)

मुक्तकजीवनमानराहणीप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

5 May 2010 - 11:59 am | पर्नल नेने मराठे

९.३१ ची बॅन्ड्रा स्लो आठवली. सुरेख लिहिलेत हो.

चुचु

प्रमोद देव's picture

5 May 2010 - 12:06 pm | प्रमोद देव

धावत्या गाडीत चढणे आणि उतरणे...ही बहुदा मुंबईकराच्या बाबतीतली प्रतिक्षिप्त क्रिया झालेय असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

भोचक's picture

5 May 2010 - 12:06 pm | भोचक

मस्तच लिहिलंय. अस्सल मुंबईकराच्या भवतीचे धावते-पळते जग छानच टिपलंय.

(भोचक)
महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव

बिपिन कार्यकर्ते's picture

5 May 2010 - 12:08 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त... ८:१९ गोरेगाव लोकलची आठवण झाली. पण आता नाही जमणार... :(

बिपिन कार्यकर्ते

इंटरनेटस्नेही's picture

5 May 2010 - 12:59 pm | इंटरनेटस्नेही

मस्त!
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

समंजस's picture

5 May 2010 - 1:29 pm | समंजस

झक्कास लिहीलंय...अचूक निरीक्षण.. :)

स्पंदना's picture

5 May 2010 - 1:49 pm | स्पंदना

छान वर्णन केल आहेस. लोकल डोळ्यासमोर आली. पण तुमची ही लोकल नवीन माणसाला कशी धडकी भरवते माहीत आहे का तुला?
केव्हढी गर्दी , रुप कस पालटत लेडीज च. मी लेडीज स्पेशल घेउन सकाळी सकाळी कामाला जायची, पण एकदा सवय झाली की मग अशी म़जा नाही, हे ही तितकच खर.

शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.

Dhananjay Borgaonkar's picture

5 May 2010 - 2:54 pm | Dhananjay Borgaonkar

याला म्हणतात अस्सल मुंबईकर!!!
सुरेख लेख.

बद्दु's picture

5 May 2010 - 3:11 pm | बद्दु

६.५३ ची विरार अशीच असायची..तिच पकडण्यासाठी धावपळ ..पण २००६, ११ जुलै..वेळ आली होती पण काळ आला नव्हता...म्हणुन आज हे लिहु शकतोय...

भारद्वाज's picture

5 May 2010 - 3:13 pm | भारद्वाज

मस्त मस्त मस्त मस्त....
-
मुंबssssssई मुंबsssई !!!

राजेश घासकडवी's picture

5 May 2010 - 9:42 pm | राजेश घासकडवी

तुमची ८: ५३ मुंबईच्या धकाधकीच्या जीवनाचं प्रतीक होऊन गेली. अगदी नकळत.

स्वाती२'s picture

5 May 2010 - 10:01 pm | स्वाती२

छान लिहिलय.

भानस's picture

7 May 2010 - 8:07 am | भानस

सगळ्यांचे खूप खूप आभार. आवर्जून - मनापासून प्रतिक्रिया दिल्यात, छान वाटले. यामुळेच अजून लिहिण्याचा उत्साह वाढतो. :)

अमोल केळकर's picture

7 May 2010 - 11:53 am | अमोल केळकर

मस्तच . लोकल हा आमच्या जिव्हाळ्याचा विषय.
यासंबंधीचे एक गाणे पुर्वी इथे लिहिले होते.

अमोल केळकर

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा