तिरिछ

अक्षय पुर्णपात्रे's picture
अक्षय पुर्णपात्रे in जनातलं, मनातलं
24 Apr 2010 - 9:15 am

मी लहान होतो तेव्हा प्रश्नांची वारुळे उभी राहत. एकाभोवती अनेक. बसचा कंडक्टर इतके पैसे जमा करतो म्हणजे तो खूप श्रीमंत असावा का? माझे वडील कंडक्टर का नाही होत? परिवहन महामंडळाच्या जलद गाडीतून जातांना आमच्या छोट्याशा गावासमोर बसस्थानक असूनही बस का नाही थांबवत? आमच्या वाड्यासमोरच्या घरात कोण बाई आहे जिच्यापासून सर्व लांब राहतात? चिंचेच्या झाडाखाली भूत आहे ते कोणी पाहीले आहे का? भूत असूनही समोरच देशपांड्यांच्या वाड्यात लोक कसे राहतात? त्यांना भीती वाटत नाही का? अनेक प्रश्न. कधी कोणी काहीतरी सांगे. त्यातून अजुनच प्रश्न पडत. तसे माझे बालपण चारचौघांसारखेच होते. खूप कमी वेळा त्या जगात जावेसे वाटते. उदय प्रकाश यांची 'तिरिछ' ही कथा वाचली. परत त्या जगात गेलो. लेखकाशी आपण संवाद साधतो हे वाचक म्हणून ठीकच आहे. पण ही कथा वाचतांना न बदलू शकणार्‍या माझ्याच आठवणींवर तरंग रेंगाळत राहील्यासारखे वाटले. मी स्वतःच्याच भूतकाळाकडे पाहत असतांना त्या तरंगांवर प्रकाशाची बदलणारी प्रतिबिंबे चमकून लुप्त झाली. स्थैर्याला वाटा नसतांनाही प्रवाही करणारा खडा टाकून कथा संपली.

या कथेतल्या घटना माझ्या जीवनात कधीही घडलेल्या नाहीत. पण मी या कथेतील खेडे पाहीले आहे. शहरही पाहीले आहे. आजोबा धोतराचे टोक उचलून चालत असतांना मी अर्ध्या चड्डीच्या कडा चिमटीत पकडून चालण्याचा प्रयत्न केला आहे. कथेतील वडील पाहिले आहेत. त्यांच्या मानापमानाच्या चौकटींना पकडून बराच प्रवास केला आहे. उदय प्रकाश यांची तिरिछ ही कथा वाचून एक संकरीत अनुभूती मिळाली. माझ्या अनुभवांकडे नव्याने पाहतांना वेगळाच टवटवीतपणा जाणवला.

कथेचा निवेदक छोट्याशा गावातील शाळेत जाणारा एक मुलगा आहे. त्याचे वडील शाळेतील एक निवृत्त अध्यापक आहेत. ते फारसे बोलत नाहीत पण त्यांच्याकडे बोलण्यासारखे खूप काही असावे. एक दिवस त्यांना तिरिछ (घोरपडीसारखा एक विषारी प्राणी*) चावतो. हाच तिरिछ निवेदकाच्या स्वप्नात वारंवार येत असतो. त्याला या तिरिछापासून बचाव करण्याचे उपायही माहीत असतात. वडलांना तिरिछ चावल्यानंतर ते तिरिछाला मारून टाकतात. हे मारणे फार महत्त्वाचे असते. तसे न केल्यास चावा घेतलेला माणूस निश्चितपणे मरतो असे थानूने (बहूदा थानू निवेदकाचा वयाने जरासा थोराड मित्र असावा) सांगितलेले असते. वडलांनी तिरिछास मारल्याने निवेदक निश्चिंत असतो. वडिलांच्या अंगातले विष उपाय करून उतरवले जाते. ते पूर्ववत झाल्यासारखे वाटतात. दुसर्‍या दिवशी त्यांना शहरात कोर्टाच्या कुठल्या कामासाठी जायचे असते.

वडील दुसर्‍या दिवशी शहराकडे निघतात आणि कथेतील नाट्य प्रकटते. सकाळी फाट्यावर शहराकडे जाण्यासाठी मिळालेल्या ट्रॅक्टरपासून ते शहराकडून गावाकडे परतणार्‍या बसची वेळ होईपर्यंत निवेदकाच्या नजरेआड झालेल्या घटनांचा पाट उलगडतो. उलगडतोच. कारण क्षण वेळेला घड्या पाडतात. त्या घड्यांच्या गडद रेषांवरूनच निवेदक घटनांचा कयास बांधतो. कथेचा वेग हळूहळू वाढू लागतो तसेच तीव्रताही. योगायोगांचे विलक्षण क्षण आणि या क्षणांचे पात्रसापेक्ष सामान्यपण यांच्या कचाट्यात कथा संपते तेव्हा निवेदकांच्या वारंवार पडणार्‍या स्वप्नातील तिरिछाचे स्थित्यंतर झालेले असते. वाचक अंतराळ निरखत बसतो. बराचवेळ.

या कथेतील निवेदकाचे तिरिछाला स्वप्नात घाबरणे हे ग्रेसच्या 'मी भिऊन अंधाराला अडगळीत लपूनी जाई' या ओळींची आठवण घडवते. तसेच त्या अडगळीच्या पोकळीतील घनतेने मिळणार्‍या सुरक्षिततेचीही. शहर हे एक घनदाट जंगल आहे, जिथे खर्‍या जंगलाप्रमाणे श्वापदे तर असतात पण या श्वापदांनी हल्ला केल्यानंतर काय करावे हे खेड्यातल्या सूज्ञासही उमगत नाही. भक्कम भिंती सुरक्षित वाटतात पण लवचिक नसतात. लहानपण प्रश्नांनी भरलेले असते पण उत्तरांचे कोश जवळपास फिरकूही देत नाहीत. मौन म्हणजे पडू शकणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया असते. उत्तरे म्हणजे पुढच्या प्रश्नांसाठीच्या पायर्‍या असतात. आणि यातले कदाचित काहीच खरे नसते. सुरक्षिततेत स्वप्नं वास्तव भासत नाहीत आणि असुरक्षिततेत वास्तव स्वप्नातही पिच्छा सोडत नाही. असा सर्व कल्लोळ निवेदकाचे वडील शहरात असतांना कर्कशतो. तालात. शहरातल्या घटनांचे वर्णन करतांना निवेदक वस्तुनिष्ठ बनतो. अनोळखी जगाबाबत त्याला कल्पक व्हावेसे वाटत नाही. हे वस्तुनिष्ठ चित्रण अत्यंत तटस्थ आहे. शहराविषयी निवेदक काहीच गृहीत धरत नाही. तरीही कोरडेपणाचा लवलेशही निवेदनात जाणवत नाही. जाणवते फक्त एका शाळकरी मुलाची घटनांच्या तुकड्यांना एकत्र जोडणारी धडपड.

या कथेच्या निवेदनाबाबत लिहावे तितके थोडे आहे. मराठीत क्वचितच असे निवेदनाचे नाविन्य मला जाणवले आहे. उदय प्रकाश यांनी अतिशय सहजपणे बालपणीच्या निरागस पण मर्यादीत कल्पकतेला वाट मोकळी करून दिली आहे. याचा अर्थ प्रगल्भ वाचकाने त्या जगात बंदीस्त असावे असा अजिबात नाही. वाचक अगदी सहजपणे निवेदकाच्या मर्यादा ओलांडू शकतो. किंबहून ओलांडतोच. सामाजिक-राजकिय घडामोडींच्या छाया कथेत सर्वदूर पसरलेल्या आहेत. वाचकाला त्यांना ओळखण्याचे स्वातंत्र्य नाकारलेले नाही तसेच त्या छायांना शब्दबद्ध करून आयतेपणाचे (तसेच गृहीत धरल्याचे) पातकही लेखकाने स्विकारलेले नाही. उदय प्रकाश यांनी एक सुपीक चित्र रेखाटले आहे. रंग वाचकांनी भरावे.

......................
श्री मुक्त सुनीत यांनी आठवणीने 'तिरिछ' हे पुस्तक पाठवल्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. त्यांनी उदय प्रकाश यांच्याबद्दल लिहिलेला सुंदर लेख येथे वाचता येईल.

* अनुवादक श्री जयप्रकाश सावंत यांचे शब्द साभार.

वाङ्मयअनुभवमाहिती

प्रतिक्रिया

अरुण मनोहर's picture

24 Apr 2010 - 9:21 am | अरुण मनोहर

एका सुंदर आणि भावस्पर्शी कथेची ओळख करून दिल्यासाठी धन्यावाद.

प्रकाश घाटपांडे's picture

24 Apr 2010 - 9:52 am | प्रकाश घाटपांडे

आजोबा धोतराचे टोक उचलून चालत असतांना मी अर्ध्या चड्डीच्या कडा चिमटीत पकडून चालण्याचा प्रयत्न केला आहे.

उजव्या हाताच्या तीन बोटांनी पंचाच्या नीर्‍या करुन मी नीर्‍यांची हौस भागवत असे. खाकी चड्डी पांढरा सदरा व डोक्याला गांधी टोपी हाच कायमचा ड्रेस शाळेत ही तोच घरीही तोच.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

यशोधरा's picture

24 Apr 2010 - 10:18 am | यशोधरा

सुरेख लेख. आवडला.

राजेश घासकडवी's picture

24 Apr 2010 - 12:05 pm | राजेश घासकडवी

कथेची ओळख इतकी सुंदर करून दिली असेल तर ती मूळ कथा काय असेल असाच प्रश्न पडतो.

अक्षयसाहेब, जरा जास्त नियमाने लिहीत चला... मिपावर चांगलं बरेच जण लिहितात. पण इतकं समर्थ लेखन खूपच थोड्यांच्या हातनं येतं.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2010 - 1:57 pm | बिपिन कार्यकर्ते

अक्षयसाहेब, जरा जास्त नियमाने लिहीत चला... मिपावर चांगलं बरेच जण लिहितात. पण इतकं समर्थ लेखन खूपच थोड्यांच्या हातनं येतं.

+१

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

25 Apr 2010 - 9:48 pm | प्रभो

सहमत

विसोबा खेचर's picture

24 Apr 2010 - 12:32 pm | विसोबा खेचर

अक्षयराव,

आपण इतकं भरभरून लिहिलंत खरं, त्याबद्दल आपलं कौतुकही वाटतं. पण आपली भाषा जरा जडच गेली बघा आपल्याला.. आपल्या लिहिण्यावरून ती कथाही जरा हाय लेव्हलचीच असणार आणि माझ्या सारख्या सामान्य वाचकाच्या आवाक्याबाहेरची असणार, डोक्यावरून जाणारी असणार असं वाटतं..

असो..

तात्या.

परिकथेतील राजकुमार's picture

24 Apr 2010 - 12:35 pm | परिकथेतील राजकुमार

छान ओळख करुन दिली आहे :)

आवडले लेखन.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

24 Apr 2010 - 1:41 pm | निखिल देशपांडे

श्री अक्षय अतिशय उत्तम कथा ओळख आपण करुन दिलेली आहे...
उदयप्रकाश ह्यांचा बद्दल श्री मुक्तसुनीत ह्यांनी लिहिल्या पासुन वाचायचे मनात आहे.. आज तुमच्या ह्या कथेच्या मुळे आता नक्कीच वाचावेस वाटत आहे.
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!

Pain's picture

24 Apr 2010 - 2:07 pm | Pain

१) शेवटून दुसरा परिच्छेद कळला नाही.

२) पुस्तक जर इ-बुक स्वरुपात असेल तर उपलब्ध करून देता का ?

अवघड वाटले. रमलकथान्ची आठवण झाली.

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2010 - 1:56 pm | बिपिन कार्यकर्ते

अक्षय, एका उत्कृष्ट लेखकाच्या उत्कृष्ट कथेची ओळखही तितकीच उत्कृष्टपणे करून देण्याचे शिवधनुष्य सहजपणे पेलले आहेस तू. असे काही वाचले की मूळ कलाकृती वाचायची तळमळ वाढते. पुस्तक ओळखीचे हेच काम.

लहानपणी वाचलेल्या फणीश्वरनाथ 'रेणू' यांच्या कथांची आठवण परत झाली. ती पुस्तके आता परत एकदा मिळवून संग्रहित केली पाहिजे.

अक्षय लिहिता होतोय यामुळे आनंदित... बिपिन कार्यकर्ते

भोचक's picture

24 Apr 2010 - 2:38 pm | भोचक

बिकांशी सहमत. रेणुंच्या 'सर्वश्रेष्ठ कहानियॉं' सध्या वाचतोय. त्यावर आधारीत परिचय लेख लिहायची इच्छाही आहे. बघूया कधी जमते ते.

बाकी तिरीछ ही कथा इथे हिंदीत वाचता येईल.

(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव

बिपिन कार्यकर्ते's picture

24 Apr 2010 - 2:45 pm | बिपिन कार्यकर्ते

धन्यवाद !!!

बिपिन कार्यकर्ते

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2010 - 7:14 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भोचकसेठ, तिरीछच्या दुव्याबद्दल आभारी....!

-दिलीप बिरुटे

नंदन's picture

24 Apr 2010 - 2:25 pm | नंदन

पुस्तकपरिचय. उदय प्रकाश यांचं लेखन मिळवून वाचण्याचं ठरवलं आहे.

लेखकाशी आपण संवाद साधतो हे वाचक म्हणून ठीकच आहे. पण ही कथा वाचतांना न बदलू शकणार्‍या माझ्याच आठवणींवर तरंग रेंगाळत राहील्यासारखे वाटले. मी स्वतःच्याच भूतकाळाकडे पाहत असतांना त्या तरंगांवर प्रकाशाची बदलणारी प्रतिबिंबे चमकून लुप्त झाली.

--- क्या बात है! जुन्या आठवणींशी सांधा जुळवू शकणारं लेखन तसं विरळाच. थोड्या वेगळ्या संदर्भात, लंपन म्हणा, शाळा म्हणा किंवा श्रीनिवास विनायक कुलकर्णींच्या 'डोह'मधली कथा म्हणा -- त्या आवडण्यातलं हे एक प्रमुख कारण असावं.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

मदनबाण's picture

24 Apr 2010 - 2:55 pm | मदनबाण

लेख आवडला...

मदनबाण.....

There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama

चित्रा's picture

24 Apr 2010 - 5:42 pm | चित्रा

ओळख फारच आवडली. नेमाने लिहीत चला (किंवा आधी लिहीलेले प्रकाशित करा).

श्रावण मोडक's picture

24 Apr 2010 - 5:58 pm | श्रावण मोडक

+१

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Apr 2010 - 7:12 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

.

मुक्तसुनीत's picture

24 Apr 2010 - 6:35 pm | मुक्तसुनीत

कथा मी वाचली होती. परंतु आपल्याला न उमजलेल्या अनेक छटा , अनेक पदर, कथा नि शैलीचे सूक्ष्म धागे इथे पूर्णपात्रे उलगडून दाखवतात. कलाकृतीच्या आस्वादाचा एक उत्तम वस्तुपाठ.

पूर्णपात्रे फारच कमी लिहितात.त्यांच्यासारख्यांनी अधिकाधिक लिहिणे महत्त्वाचे आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

26 Apr 2010 - 4:35 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी अगदी... अक्षय पुर्णपात्रे या 'वाचका'बद्दल आदर दुणावला.

बिपिन कार्यकर्ते

अरुंधती's picture

24 Apr 2010 - 7:00 pm | अरुंधती

<< मौन म्हणजे पडू शकणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची प्रक्रिया असते. उत्तरे म्हणजे पुढच्या प्रश्नांसाठीच्या पायर्‍या असतात. आणि यातले कदाचित काहीच खरे नसते. सुरक्षिततेत स्वप्नं वास्तव भासत नाहीत आणि असुरक्षिततेत वास्तव स्वप्नातही पिच्छा सोडत नाही.>>>

त्रिकालाबाधित सत्य.....

सुंदर लेख. अजून येऊ देत.

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

शुचि's picture

25 Apr 2010 - 6:49 am | शुचि

लेख खूपच आवडला. खोली आहे कथेच्या ओळखीमधे.
>> ते फारसे बोलत नाहीत पण त्यांच्याकडे बोलण्यासारखे खूप काही असावे. >>
हे वाक्य मनाला स्पर्शून गेलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

आनंदयात्री's picture

25 Apr 2010 - 9:01 am | आनंदयात्री

लेख आवडला. इंग्रजी साहित्याबद्दल ओळख करुन देणारे लेख अधनं मधनं येत असतात, हिंदीत विरळाच. म्हणुनच धन्यवाद असे म्हणतो.
असे लेख वारंवार येउ द्या.
:)

-
(वेद प्रकाश शर्माचा फ्यान ;) )

आनंदयात्री

स्वाती दिनेश's picture

26 Apr 2010 - 4:32 pm | स्वाती दिनेश

ओळख आवडली,
स्वाती

अश्वत्थामा's picture

26 Apr 2010 - 4:48 pm | अश्वत्थामा

असेच म्हणतो.