अशी करावी काटकसर! ;-)

अरुंधती's picture
अरुंधती in जनातलं, मनातलं
5 Apr 2010 - 1:56 pm

हे आहेत आमच्या पूर्वीच्या घरमालकीण बाईंचे सुपर-काटकसरीचे किस्से! अतिशयोक्ती अजिबात नाही. तसेच त्यांची हेटाळणी/ बदनामी करण्याचाही उद्देश नाही. पण एकेक नमुनेदार माणसे असतात, त्या तशाच होत्या [आता हयात नाहीत] आणि तरीही अतिशय कर्तृत्ववान बाई! पण हे किस्से वाचून तुमची नक्की करमणूक होईल!!! :)

तो काळ होता जक्कल-सुतार टोळीने पुण्यात जे हत्याकांड चालवले होते तेव्हाचा. आमचा वाडा ऐन टिळक रोडवर. त्याला ना फाटक ना कसली सुरक्षा. त्यातल्या त्यात खबरदारी म्हणून तीन मजली इमारतीच्या प्रत्येक जिन्याच्या सुरुवातीला व शेवटी असे जाळीचे दरवाजे बसवून घेतले होते. रोज रात्री दहा वाजता घरमालक त्यांना कुलुपे ठोकत असत आणि ती कुलुपे थेट दुसर्‍या दिवशी सकाळी साडेसहा-सात वाजता खोलली जात.
आम्ही तिसर्‍या मजल्यावर राहायचो. आमच्याकडे दूध घालणारा भैया सकाळी साडेपाचला यायचा. मालकीण बाईंनी सांगितले (त्या दुसर्‍या मजल्यावर राहायच्या) की आम्ही तुमच्या वाटचे दूध घेत जाऊ, तुम्ही फक्त रात्री झोपण्यापूर्वी दुधाचे पातेले खाली आणून देत जा! आई किंवा बाबा रोज रात्री दुधाचे पातेले नियमितपणे खाली घरमालकांकडे ठेवून येत. असे काही महिने गेले. एक दिवस घरमालक व मालकिण बाईंचे कडाक्याचे भांडण चालले होते. आई-बाबा नेहमीप्रमाणे मध्यस्थी करायला गेले. दोघे मालक व मालकिणबाई एकमेकांवर मुक्तकंठाने दोषारोप करत होते. मधेच घरमालक बाबांकडे वळून म्हणाले, ''तुम्हाला माहित नाही, पण रोज तुमच्याकडे जे दूध येते त्यातले एक कप दूध ही काढून घेते आणि त्यात कपभर पाणी मिसळते!!!'' आई-बाबा गार! वर घर-मालकीण बाई खांदे उडवून म्हणाल्या, ''त्यात काय एवढं!! त्यांचेच तर कष्ट वाचवते ना मी रोज सकाळी त्यांच्या वाटचे उठून, मग घेतलं कपभर दूध तर बिघडलं कुठं म्हणते मी!!'' ......... आता बोला!!!

त्यांचे कंजूषपणाचे किस्से तर इतके प्रसिध्द होते की भिशीमंडळातील त्यांच्या मैत्रिणीही त्यांना खुलेपणाने चिडवायच्या. त्यातलीच एक मैत्रिण माझ्या आईला एकदा रस्त्यावर भेटली. आमच्या घरमालकीणबाईंवर बरीच उखडलेली दिसली. आईने कारण विचारल्यावर मजेशीर कहाणी पुढे आली. : घरमालकीणबाईंच्या नातवांची मुंज होती. [आम्हीही गेलेलो] मुंजीत जेवणावळी घालून झाल्यावर उरलेले पदार्थ मालकीणबाईंनी घरी आणले व फ्रीजमध्ये ठोसले. अर्थात हे आम्हालाही माहित होते, कारण त्या कधी नव्हे तो माझ्या आईला विचारायच्या, देऊ का गं श्रीखंड? आम्हीही ''नाही, नाही,'' करायचो. असेच वीस-पंचवीस दिवस गेले. मालकिणबाईंकडे मैत्रिणींची भिशी होती. मिनी जेवणच होते म्हणा ना! त्या वेळी एका मैत्रिणीने त्यांना थट्टेने विचारले, ''काय गं, तुझ्या नातवांच्या मुंजीतलं तर नाहीए ना जेवण?'' त्यावर मालकीणबाई मंद हसून म्हणाल्या, ''अगं ती सांडग्यांची आमटी आहे ना, ती मुंजीत उरलेली मटकीची उसळ होती ती उन्हात वाळवून त्यांचे सांडगे घातले आणि त्यापासून बनवली. आठवडाभर उसळ खात होतो पण संपेचना गं! मग म्हटलं सांडगे तरी घालावेत!! मस्त लागतीए ना आमटी?!! तरी बटाट्याची भाजी खराब झाली म्हणून....नाहीतर गरम गरम बटाटेवडे तळणार होते तुमच्यासाठी!" तमाम उपस्थित मैत्रिणींचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते!!

आमच्या वाड्यात प्यायच्या पाण्याचे कनेक्शन तळमजल्यावर होते. बाकी वापराच्या पाण्यासाठी छतावर पाण्याची टाकी होती त्यातून सर्व बिर्‍हाडकरूंना [आम्ही सोडून अन्य दोन व मालकीणबाई] पाणीपुरवठा होई.
एकदा आईला वापराच्या पाण्याला कसलातरी घाणेरडा वास येत असल्याचे जाणवले, तिने तसे मालकीणबाईंनाही सांगितले. पण त्यांनी साफ इन्कार केला. [आई शेवटी वापराचे पाणीही तळमजल्यावरून भरू लागली]. दोन दिवस तसेच चालले होते. शेवटी इतर बिर्‍हाडकरू व खुद्द घरमालकही कुरकुरू लागले. मग मालकीणबाईंनी आपल्या लेकाला छतावर शिडी लावून धाडले व काय प्रकार आहे ते पहावयास सांगितले. लेकाने रिपोर्ट दिला, टाकीत साळुंकी मरून पडली आहे! ऐकूनच आम्हाला ओकार्‍या यायचे शिल्लक राहिले होते. गेले तीन दिवस तेच पाणी सर्वजण वापरत होते. मग टाकी स्वच्छ करण्यासाठी सर्वांना नळ खुले सोडण्याचे फर्मान निघाले. साळुंकीची विल्हेवाट लावण्यात आली. दुपारी सगळा निरानिपटा करून मालकीणबाई हाश्श हुश्श करत आमच्याकडे आल्या. आईला चहाचे आधण ठेवायला सांगितले मग चहा पिता पिता म्हणाल्या, ''एवढं सगळं पाणी, वाया कसं घालवायचं.....!!! मी ह्यांना आणि लेकाला सांगितलं, आंघोळी करून घ्या म्हणून.... धुणं पण त्याच पाण्यात धुवून घेतलं.... मग मीसुध्दा डोक्यावरून न्हायले! जरा वास येत होता गं पाण्याला....पण साबण लावला की झालं काम...म्हटलं उगाच पाणी वाया नको जायला!!! '' आईला चहा गेला नाही हे वेगळे सांगायला नको!

मालकीणबाईंचा एकुलता एक भाऊ परदेशात, म्हातारपणाने, अविवाहित - बाकी कोणी नाही, असा निवर्तला. सर्व कायदेशीर सोपस्कार होऊन त्याच्या अंतिम इच्छेनुसार त्याचा मृतदेह कॉफिनमधून भारतात आणण्यात आला. तोवर त्याच्या मृत्यूलाही बरेच दिवस होऊन गेलेले. येथे मालकीणबाईंच्या लेकाने मामाचे सर्व और्ध्वदेहिक केले. त्यानंतर आठवडाभराने अशाच आमच्या मालकीणबाई दुपारच्या चहासाठी वर आमच्याकडे आलेल्या. ''बरं झालं बाई, ह्या वर्षापासून साठवणीच्या गव्हाला कशात ठेवायचं प्रश्न मिटला!'' आईने प्रश्नार्थक मुद्रेने पाहिल्यावर त्या पुढे म्हणाल्या, ''अगं ते कॉफिन आहे ना, फार चांगलं आहे गं लाकूड त्याचं.... मी म्हटलं कशाला फेका उगाच.... घेतलं साफ करून आणि आता त्यातच ठेवणार आहे साठवणीचे गहू!!''

त्यानंतर त्यांच्या किचनच्या पोटमाळ्यात लपताना [आमची लाडकी लपण्याची जागा] ते कॉफिन त्या पोटमाळ्यात आरामात पोटात गहू घेऊन विश्रांती घेत बसलेलं दिसे!!

-- अरुंधती
http://iravatik.blogspot.com/

वावरजीवनमानप्रकटनअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Apr 2010 - 2:12 pm | भाग्यश्री कुलकर्णी

हा हा हा. नेहमीप्रमाणेच उ त्त म!

प्रकाश घाटपांडे's picture

5 Apr 2010 - 2:25 pm | प्रकाश घाटपांडे

काटकसर म्हंजेच बचत! हल्ली सिनेमातल्या नट्या म्हणे कापडाची बचत करतात. जळ्ळ मेल लक्षण त्या बचतीच!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

विंजिनेर's picture

5 Apr 2010 - 2:29 pm | विंजिनेर

रोचक पण स्त्रियांची (इतर स्त्रियांबद्दल)गॉसिपिंग करण्याची खोड जित्याचीच ;)

ह.घे. वे.सां. न. ल.

चिरोटा's picture

5 Apr 2010 - 2:32 pm | चिरोटा

मस्त नमुनेदार किस्से!.पर्मिट राजच्या जमान्यात मध्यमवर्ग हातचे राखूनच खर्च करायचा.पण कॉफिन वगैरे जरा अतीच.एक नात्यातल्या बाई अशाच होत्या.आंब्यांचा रस काढून झाला की कोयी,साली त्या उकळत्या पाण्यात टाकत्.थोड्यावेळाने ते पाणी आटले की ते पाणी आमरसात!.
भेंडी
P = NP

नंदन's picture

5 Apr 2010 - 2:35 pm | नंदन
शुचि's picture

5 Apr 2010 - 2:58 pm | शुचि

भन्नाट!
माझी रूममेट विचारत होती - आपण चहाचा चोथा साठवून परत परत वापरत जाऊ यात का? म्हटलं नको - नको तिथे काटकसर नको.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
But the moon is death.
Its cold rocks fill my belly as if I had
swallowed song of birds
and awakened in a tree.

रेवती's picture

5 Apr 2010 - 6:14 pm | रेवती

शेवटचा किस्सा म्हणजे कळस!
बाकिचे प्रकार फिके पडले त्यापुढे!;)

रेवती

भानस's picture

5 Apr 2010 - 6:32 pm | भानस

बाई असे नमुने. चहाचा चोथा वाळवून वापरणारे बरेच पाहीलेत. :(
मजा आली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2010 - 7:36 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लै भारी किस्से...! :)

-दिलीप बिरुटे

अरुंधती's picture

5 Apr 2010 - 7:50 pm | अरुंधती

त्यांच्याबद्दल लिहायचं ठरवलं तर एक किश्शांची मालिकाच होईल! आई-वडीलांखेरीज लहान असताना मी जवळून पाहिलेलं असं हे व्यक्तिमत्त्व! कर्तबगार वृत्ती, धारदारपणा, बेरकीपणा, लालसा, धूर्तता, पूर्वग्रह बाळगायची वृत्ती, द्वेष, धीटपणा, श्रध्दाळूपणा व आसुसून जगण्याची वृत्ती.... असे गमतीशीर गुण-दुर्गुण बघायला मिळायचे त्यांच्यात!

प्रतिसादाबद्दल धन्यवाद! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

प्रभो's picture

5 Apr 2010 - 7:50 pm | प्रभो

मस्त

डावखुरा's picture

5 Apr 2010 - 7:52 pm | डावखुरा

ह.ह.पु.वा....
=)) =)) =))
१)मग घेतलं कपभर दूध तर बिघडलं कुठं म्हणते मी!!' :B :B
२)तमाम उपस्थित मैत्रिणींचे चेहरे फोटो काढण्यालायक झाले होते!! :SS :SS
३).म्हटलं उगाच पाणी वाया नको जायला!!! :''( :''(
४)फार चांगलं आहे गं लाकूड त्याचं.. ~X( ~X(
"राजे!"

मुक्तसुनीत's picture

5 Apr 2010 - 7:56 pm | मुक्तसुनीत

लेखन खुमासदार झालेले आहे. मनसोक्त हसलो.

मेघवेडा's picture

5 Apr 2010 - 9:52 pm | मेघवेडा

असेच म्हणतो! मजा आली.. मस्तच!!

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

चतुरंग's picture

5 Apr 2010 - 8:10 pm | चतुरंग

थेट कॉफिनलाही न सोडणारी कमालीची काटकसर बघायला मिळाली की तुम्हाला! :D

(असाच एक किस्सा -माझी मामेबहीण आणि तिचा नवरा असे त्यांच्या एका मैत्रिणीकडे जेवायला गेले. इतरही मित्रमंडळी होती, सगळा मिळून आठदहा जणांचा ग्रुप होता. ज्यांच्याकडे जेवायला गेले होते त्यांच्याकडे इतर मेन्यूबरोबर मेथीची भाजीही केलेली होती. गंमत म्हणजे एवढ्या आठदहा जणात फक्त दोनच मेथीच्या जुड्यांची भाजी केल्याने, तशीही ती चोरटी होते, एका छोट्याच वाडग्यात काढून ठेवली होती. सहाजिकच कोणीही ती भाजी घेतली नाही. जेवण संपल्यावर ती भाजी उरलेली बघून त्या मैत्रिणीच्या सासूबाई म्हणाल्या "बघ, म्हटलं नव्हतं मी की एवढीही भाजी पुरेल म्हणून!"
मैत्रिणीचा चेहेरा "!!!???"
आम्ही किस्सा ऐकून हहपुवा!! ;) )

(चोरटी मेथी प्रेमी)चतुरंग

अनामिक's picture

5 Apr 2010 - 8:21 pm | अनामिक

हा हा हा मजेशीर किस्से!

-अनामिक

पिंगू's picture

5 Apr 2010 - 10:19 pm | पिंगू

भारी नमुना दाखवलात!!!!!! :))

बिपिन कार्यकर्ते's picture

5 Apr 2010 - 11:15 pm | बिपिन कार्यकर्ते

अरुंधतीम्याडम... मस्त हसवलंत हो... मजा आली वाचताना.

बिपिन कार्यकर्ते

चित्रा's picture

6 Apr 2010 - 4:18 am | चित्रा

शेवटचा किस्सा फारच भारी. :)

स्वाती दिनेश's picture

6 Apr 2010 - 11:42 am | स्वाती दिनेश

भारी किस्से,
स्वाती

समंजस's picture

6 Apr 2010 - 12:15 pm | समंजस

व्वा!!!
काय पण ही काटकसर, ह्याला तर कसलीही सर येणार नाही :D

वाहीदा's picture

6 Apr 2010 - 2:48 pm | वाहीदा

कॉफिन चा किस्सा तर खुपच भारी ...
बापरे , भिती नाही का ग वाटली त्यांना ??
त्यात ठेवलेल्या गव्हाची पोळी खाताना, जेवण तरी कसं घश्याखाली उतरलं?? @)
एकदा सुरू तर कर त्यांच्या खुमासदार किश्शांची मालिका ... हसून हसून पुरेवाट होईल :-)
~ वाहीदा

अरुंधती's picture

6 Apr 2010 - 4:09 pm | अरुंधती

करतेच! :D

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

टारझन's picture

6 Apr 2010 - 4:19 pm | टारझन

अरूंधती टारगट आहात :) किती म्हणजे किती हसवाल ?
ओवा द्या कोणीतरी =))

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~