खटाऊची नोकरी

हेमंत बर्वे's picture
हेमंत बर्वे in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 11:03 pm

मी इंजीनीअर होणार की हे जसं मला माहीती नव्हतं तसंच मी टेक्स्टाईल इंजीनीअर होणार हे पण मला माहीती नव्हतं.इंटरला जे मार्क मिळाले होते त्यावर जी अ‍ॅडमीशन मिळेल ती घ्यायची असं ठरवून मी व्हिजेटीआयची पायरी चढलो होतो.
आता अ‍ॅडमीशन घ्यायला आई -बाबा -आजी-आजोबा असा ताफा जातो पण तेव्हा असं काही नव्हतं.
अ‍ॅडमीशनच्या दिवशी मी एकटाच ऑडीटोरीअम मध्ये बसलो होतो.
एकेका मुलाचं(मुली नव्हत्याच)नाव पुढे येत होतं . माझं नाव काही मला ऐकू ये ईना मग मी थोडासा नर्व्हस झालो.
मला काही अगदी वाईट्ट मार्क नव्हते.इंटरला मला घसघशीत ५९ टक्के मिळाले होते.(इंटरला ५९टक्के हे तेव्हाच्या काळात फारच चांगले मार्क होते).
शेवटचं नाव पुकारलं आणि माझं ते नव्हतं .
मी थोडासा खिन्न झालो खरा पण शेवटपर्यंत खिंड लढवणे हा माझा अंगचा गुण असल्याने मी सिटवर गप्प बसून होतो.
कसं नशीब असतं बघा.स्टेजवर शेवटच्या हालचाली सुरु होत्या. खुर्च्या उचलून ठेवण्याचा कार्यक्रम चालू झाला आणि एक विद्यार्थी धावत आला.त्याला अ‍ॅडमीशन नको होती आणि इच्छुक उमेदवार मी एकटाच ऑडीटोरीयम मध्ये शिल्लक होतो.
टेक्सटाईल च्या विस सिटपैकी विसावी सिट माझ्या पदरात पडली आणि मी व्हिजेटीआयचा विद्यार्थी झालो आणि चार वर्षात इंजीनीअर पण झालो.
******************
त्यावेळी मुंबईत बासश्ठ गिरण्या होत्या आणि तो काळ गिरण्यांचा सुवर्णकाळ होता. माझ्यापुढे तीन ऑप्शन .स्वदेशी मिल. मोरारजी मिल आणि तिसरा खटाऊ माकनजी.माणसांचं प्रचंड शॉर्टेज .सकाळी इंटरव्ह्यु झाला की दुपारी सेकंड शिफ्टला जॉईन व्हा अशी परीस्थीती .
खटाऊ आणि बाँबे डाईंग तेव्हाच्या अग्रगण्य गिरण्या समजल्या जायच्या.
आपली गिरणी कशी बेष्ट आहे हा तेव्हाचा कामगार वर्गाचा चर्चेचा विषय असायचा.
बोनस पण जाहीर करताना या दोन्ही गिरण्यांच्या मध्ये एक होड असायची.
बाँबे डाईंगचा बोनस जाहीर झाल्याशिवाय खटाऊचा जाहीर व्हायचा नाही. कारण खटाऊचा बोनस त्यांच्यापेक्षा एक टक्का जास्त असावा ही धरमसी शेठची कायम इच्छा असायची त्यामुळे साडेआठ वाजता बॉंबेडाईंगचा दहा टक्के बोनस आला की नऊ वाजता आमचा अकरा ट़क्के.

एका दिवाळीत बाँबे डाईंगवाल्यांनी धरमशी शेठला पेचात पकडलं .अगदी शेवटच्या क्षणी बोनस जाहीर केला .आता त्यांनी सगळी तयारी केली होती पण आमच्या मिलची तयारी झाली नव्हती.दुसरा दिवस रविवारचा .बॅका बंद.सोमवारी दिवाळी .आता काय करायचं. तेव्हाचे पर्सनल मॅनेजर भक्ता आणि जनरल मॅनेजर जगेशिया.कामगारांची तोंडं चिमणीसारखी. धरमसी शेठकडे जाऊन सांगण्याखेरीज काही उपायच नव्हता.शेठ रहायचे मलबार हिलला.
मग ही जोडगोळी गेली तिकडे .शेठ समोर उभं राहून समस्या सांगीतली.
शेठनी क्षणभर विचार केला.मग सांगीतलं काकूको फोन लगाव.रात्रीचे साडेनऊ वाजलेले.
शेठनी फोनवर काकूभाई डोड करोड केश मोकलावो एव्हढंच सांगीतलं .
तासाभरात दिडकोटी रुपये आले.साडेदहा वाजता कॅशर ,पेट्या आणि दोन बंदुकवाले आले.
गावाला जायचं म्हणून कामगार गेटवर थांबलेले. रात्रभर कारकून काम करत होते.
सकाळी बोनसाचं वाटप झालं.
कदाचीत आता दिड कोटी फार रक्कम नसेल पण ही गोष्ट आहे ऐंशी सालची.धरमसी शेठचा आवाज आणि दिड कोटी हजर अशा तालेवारीचे दिवस.
पण हे मला सगळं नंतर कळलं.
मी खटाऊ मध्ये इंटरव्ह्यु साठी गेलो तेव्हाची गंमत सांगतो.
एकतर मी व्हिजेटीआयचा विद्यार्थी म्हटल्यावर मला फक्त दोन प्रश्न विचारले गेले.
रंगाणी आणि चौबळ हे दोघ मॅनेजर मुलाखत घेत होते.
पहीला प्रश्न नाव काय?
मी सांगीतलं.
दुसरा प्रश्न :व्हिजेटीआयची उजवी कडून सहावी लूम आहे तशीच आहे की बदलली आहे?
आता व्हिजेटीयचा प्रश्न आल्यावर मी पण जरा सैलावलो.खरं सांगायचं तर तेव्हा सगळेजण व्हिजेटीआयचेच असायचे कारण टेक्सटाईल इंजीनीअरींङ फक्त तिथेच होतं.
इंटरव्ह्यु संपला. बाहेर जाउन एक फॉर्म भरायला सांगीतला. तो भरल्यावर रंगाणी मला जगेशीयांकडे घेऊन गेले. जाताना त्यांनी मला एक सूचना दिली.
साहेब काही म्हणाले तरी यस असंच उत्तर द्यायचं .(जगेशीया काय बोलायचे हे बर्‍याच वेळा कळायचंच नाही)मी मान डोलावली.झालं .
नोकरी मिळाली .पहील्याच दिवशी कामावर गेल्यावर मला कळलं की ज्या वातावरणात मी लहानाचा मोठा झालो त्यापेक्षा एका वेगळ्याच जगात मी आलो आहे.मग चार दिवस जुळवून घेण्यात गेले आणि मग मी पण सरावलो.दिवसरात्र साचे चालत रहायचे. एकाच वेळी तीन मालगाड्या एकाच वेळी रुळावर चालत असल्या की जेव्हढा धडधडाट कायम चाललेला असायचा.तेलाचा वास. घामाचा वास. साईजींग मध्ये कांजीचा वास.फोल्डींगमध्ये नव्या कपड्याचा वास.कार्डींगमध्ये गेलं की तासाभरात अंगावर कापसाच्या तंतूंचा एक कोट चढायचा. कुठंही नजर फिरवा माणसं काम करताना दिसायची.सहा हजार कामगार आणि साठेक ऑफीसर्.आमचं कँटीन वेगळं. टॉयलेट वेगळं. रेस्टरूम खास आमच्यासाठी. चाळीस चाळीस वर्षं अशा वातावरणात काम करणार्‍या माणसांचा मी साहेब झालो होतो.वयाच्या बावीसाव्या वर्षी मी दोनशे कामगार आणि सहा कारकून यांचा बॉस झालो होतो.पगार सोळाशे रुपये. सुपरअ‍ॅन्युएशनच्या लेव्हलला डायरेक्ट एंट्री.
*****************************************************************
आमच्या कॉलनीत मात्र माझी नोकरी एक थोडासा कुचेष्टेचा विषय झाला होता. आमच्या कॉलनीच सगळा ब्रह्मवृंद बॅकेत किंवा सरकारी नोकरीत.सकाळी साडेनऊ वाजता बाहेर .संध्याकाळी सात वाजता घरात.एकतीस मार्चला कधीकाळी हापीसात रात्रभर थांबायला लागलं तर त्या एकतीस मार्चची ष्टोरी एकमेकांना सहा सहा महीने सांगायचे.माझी नोकरी सुरु झाल्यावरतीन महीन्यांनी माझी पहीली रात्रपाळी लागली.मी घराबाहेर पडतानाच एका शेजार्‍यानी टोकलं .काय रे हेमंत एव्हढ्या रात्री छान कपडे घालून कुठे?आता ह्यांना माहीती होतं की मी गिरणीत कामाला लागलोय. पण ती कारकूनी जीभ स्वस्थ थोडी बसणार.मी पण सरळ उत्तर दिलं .आज रात्रपाळी आहे.अँ अँ रात्रपाळी ? मला वाटलं तू इंजीनीयर झालायेस.या सगळ्या कारकूनांना निदान एक दिवस का होईना गिरणीत डांबावं असं मला वाटलं.

वाङ्मयप्रकटन

प्रतिक्रिया

शुचि's picture

4 Apr 2010 - 11:12 pm | शुचि

प्रांजळ, सडेतोड, वास्तववादी प्रकटन. आवडलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Apr 2010 - 11:31 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्त. बहुतेक पुढे असावं काहीतरी असं वाटतंय. लिहा हो....

अवांतर: रामदासांची आठवण येतीय.

बिपिन कार्यकर्ते

मी-सौरभ's picture

4 Apr 2010 - 11:58 pm | मी-सौरभ

हेमंत जी: ह्याच्या पुढच पण लिहा...............

-----
सौरभ :)

प्रदीप's picture

5 Apr 2010 - 9:18 am | प्रदीप

असेच म्हणतो, असेच अजून येऊ दे.

क्रमशः आहे असं वाटावं असं लिखाण आहे, आणखी येऊ द्यात, वाचायला नक्कीच आवडेल. पुढे कालांतराने या मिल्स बंद कशा पडल्या याचं 'आतल्या' गोटातलं चित्रणही पहायला आवडेल.

विंजिनेर's picture

5 Apr 2010 - 7:32 am | विंजिनेर

पुढे लिहा नक्की.

राजेश घासकडवी's picture

5 Apr 2010 - 6:45 am | राजेश घासकडवी

काही वेळा नको त्या लेखांखाली क्रमश: दिसतं. आणि जिथे इच्छा असते अजून पुढे यावं, तिथे ते दिसत नाही. आयुष्य म्हणजे अपेक्षाभंगांची मालिकाच आहे एक...

राजेश

प्रमोद देव's picture

5 Apr 2010 - 11:18 am | प्रमोद देव

पुढचेही भाग येऊ द्या.

रामदास's picture

5 Apr 2010 - 11:26 am | रामदास

प्रवास वाचायला आवडेल.

चतुरंग's picture

5 Apr 2010 - 8:25 pm | चतुरंग

तुमच्या बहुपेडी आठवणींचा पुढचा भाग येऊदेत.

(उत्सुक)चतुरंग

मुक्तसुनीत's picture

5 Apr 2010 - 8:33 pm | मुक्तसुनीत

उत्सुकतेने वाट पाहातो.

नंदन's picture

5 Apr 2010 - 12:21 pm | नंदन

वेगळ्या जगाची ओळख. पुढल्या भागांची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चिरोटा's picture

5 Apr 2010 - 12:37 pm | चिरोटा

पुढचे भाग येवू द्या.(गिरणी कामगारांचा ८२ सालचा संप/नंतर उद्भवलेली परिस्थिती आपण जवळून पाहिली असेल.)

भेंडी
P = NP

Pain's picture

5 Apr 2010 - 1:42 pm | Pain

मस्त आहे. अजुन लिहा.

(चान (chan ha shabd, cha he akshar) कसे लिहायचे ? )

प्रमोद देव's picture

5 Apr 2010 - 3:53 pm | प्रमोद देव

लिहायचे...
chhaana=छान
किंवा
छान=Chaana

भाग्यश्री कुलकर्णी's picture

5 Apr 2010 - 1:52 pm | भाग्यश्री कुलकर्णी

खरच मस्त लिहीले आहे.पुढिल भागाच्या प्रतिक्षेत.

रेवती's picture

5 Apr 2010 - 6:09 pm | रेवती

मस्त लिहिलं आहे!
त्यावेळची परिस्थिती, पैशाचं मोल हे आज सगळं बदललं आहे.
नव्या पिढीला गंमत वाटावी असे आहे. त्यावेळच्या सरकारी नोकर्‍या व बँकेतील नोकर्‍यांचा काळ बरोबर डोळ्यासमोर आला.

रेवती

स्वाती२'s picture

5 Apr 2010 - 10:46 pm | स्वाती२

+१
सहमत!

भानस's picture

5 Apr 2010 - 6:38 pm | भानस

मी गिरणगावात राहीलेली. आजूबाजूला सगळेच मिलवाले. कथन भावले. येऊ देत अजून.

पाषाणभेद's picture

5 Apr 2010 - 10:26 pm | पाषाणभेद

आजून वाचू दे ना भाऊ. हात सैल सोड की जरा. मस्त लेखन हाय राव तुमचं.

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३