रेस्ट हाऊसवरून स्पेशल आयजींची गाडी बाहेर पडली आणि त्यापाठोपाठ पत्रकारांचा जत्था बाहेर पडला. डावीकडच्या गेटमधून सारे बाहेर आले. त्या क्षणी त्यांच्यापैकी कोणाच्याही हाती काहीही बातमी नव्हती.
स्पेशल आयजींची बैठक सुमारे सव्वादोन तास सुरू होती. बैठकीत एकूण परिस्थितीचा आढावा घेतल्याचं फक्त स्पेशल आयजींनी सांगितलं होतं. त्यांच्या म्हणण्यानुसार परिस्थिती नियंत्रणात होती. वाटाघाटींचा प्रयत्न सुरू असला तरी, जन संघर्ष समितीकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद आलेला नव्हता; मात्र समितीच्या कारवायाही थांबल्या असल्यानं कोंडी फुटण्याची चिन्हं होती.
अर्थात, स्पेशल आयजींनी हे जे काही सांगितलं ते पत्रकारांच्या समोर. मागं बरंच काही घडलं असणार याची किशोरला खात्री होती. किशोरचं काम तेच होतं. मागं जे काही घडलं असेल ते बाहेर काढायचं. तालुक्याच्या ठिकाणी, तेही प्रत्यक्ष संघर्षग्रस्त क्षेत्रात, स्पेशल आयजी येतो, सव्वादोन तास बैठक घेतो आणि फक्त परिस्थितीचा आढावा घेतो यावर त्याचा विश्वास नव्हता. बैठकीला त्यानं एसआरपीही बोलावली होती. एसआरपीचा कमांडंट बैठकीला येण्याची ही पहिलीच वेळ होती, पण ज्याअर्थी तो होता, त्याअर्थी स्पेशल आयजीच्या वरही काही घडलं असलं पाहिजे इतकं त्याला कळत होतं.
साडेचार झाले होते. अंधार पडायला दोन तास बाकी. म्हणजे हाती असलेला वेळ फक्त एका तासाचाच. किशोर रेस्ट हाऊसमधून बाहेर आला आणि त्यानं डावीकडचा रस्ता धरला. फॉरेस्टचं ऑफीस तिथून मैलावर. अर्थात, तिथंपर्यंत जाण्याची गरज नव्हती. अर्ध्या मैलाच्या अंतरावर रस्त्याच्या डावीकडं त्यांचा अड्डा होता. जमणारे सारेच बातमीदार. तिथं बसून बातम्या लिहायच्या. शेजारच्या पीसीओवरून फॅक्सनं पाठवायच्या. पूर्वी फॅक्सच्या आधी एसटीडी करायचे तिथूनच. एका बाजूला पीसीओ. दुसर्या बाजूला चहा-भजीची टपरी. दोन्हीच्या मध्ये तीन फूट बाय दहा फुटांची मोकळी जागा. त्या जागेचाच हा अड्डा. सगळ्यांनी मिळून पंचायत सभापती आणि इतरांनाही दमात घेऊन छत टाकून घेतलं. तिथं सगळ्यांना बसण्यासाठी शाळेतल्या बेंचसारखी लांबसडक सोय केली होती. सोपं जायचं. शेजारून चहा यायचा. एकत्र गप्पा करत बातम्याही कळायच्या. आणि मुख्य म्हणजे पीसीओ असल्यानं फोनचा फायदा.
स्पेशल आयजीनं जे सांगितलं होतं, त्याची बातमी किशोरनं सव्वापाचपर्यंतच तयार करून टाकली. त्याच्याकडं ती फार तर दुकॉलमी गेली असती. त्यापलीकडं नाही. त्यामुळं एका पानात त्यानं बातमी संपवली आणि ती पीसीओवर द्यायला तो निघाला तेव्हा तिथूनच बारक्या हाक मारत आला. "फोन आलाय..."किशोर धावत गेला.
"उद्या रात्रीनंतर केव्हाही डामखेड्यापासून सुरवात." किशोरच्या 'हॅलो'वर एवढं एक वाक्य उच्चारून फोन बंद झाला.
---
साला... देवरामनं मनातल्या मनातच शिवी हासडून घेतली. जवळपास सव्वापाच होत आले होते. सकाळपास्नं मिटिंगच्या नावाखाली पिट्टा पडला होता. मिटिंगमध्ये आतही शिरता येत नव्हतं. त्यामुळं आधीच आलेला वैताग, आता मिटिंग संपल्यानंतर तास होत आला तरी ही सारी मंडळी रेस्टहाऊसमधून जाण्याचं नाव घेत नसल्यानं, वाढू लागला होता. परिणामी ती शिवी.
दुपारी एकच्या सुमारास जेवणासाठी मंडळी उठली तेव्हा देवरामला मिटिंगच्या खोलीत घुसण्याची संधी थोडीशी मिळाली होती. त्यावेळी त्याच्या कानावर फक्त डीवायएसपींचं एकच वाक्य पडलं होतं, "सर, डामखेडा जर झालं तर पुढं फारशी अडचण येणार नाही."
पण त्याचा अर्थ नेमका काय घ्यायचा हे मात्र त्याला समजलं नव्हतं. त्यामुळं आतलं काही तरी ऐकणं गरजेचंच होतं. पण ती संधी मिळत नव्हती. मिटिंगच्या हॉलला एकूण तीन दारं. त्यापैकी एक मुख्य प्रवेशद्वारानंतरच्या व्हरांड्यातील. दुसरं दार होतं ते रेस्टहाऊसकडं तोंड करून उभं राहिल्यानंतर उजव्या हाताला असलेल्या व्हीआयपी स्यूटमध्ये उघडणारं. तिसरं दार मागच्या बाजूला. तिन्ही दारं आतून बंद होतीच. शिवाय पुढचा सज्जा आणि मागल्या बाजूला कोठीपर्यंतच्या मोकळ्या जागेत पोलीस होते. तिथं ते कुणालाही फिरकू देत नव्हते. त्यामुळं काही ऐकू येणं मुश्कीलच होतं. जेवणानंतरच्या सत्रात काहीही करून माहिती लागली पाहिजे... देवराम मनाशीच ठरवत होता.
अडीच वाजता देवरामला एका पोलिसानं बोलावलं आणि चहा सांगितला. देवरामच्या वैतागात भर पडली. तीस कप चहा. माणसं तीस, रेस्ट हाऊसवर कप मात्र फक्त बारा. म्हणजे तीन फेर्या तर नक्कीच. हा वैताग असायचा. कारण मधल्या काळात चहा गार होणं, एकाचवेळी सारे कप न मिळणं, एखाद-दुसर्याची नाराजी... पन्नास भानगडी.
चहाचं आधण टाकून देवराम वळला. कपाटातून त्यानं कप काढले. ट्रे काढला. सिंकवर जाऊन त्यानं कप विसळून घेतले आणि ट्रे घेऊन तो ओट्याकडे येऊ लागला. काय झालं ते त्याला कळलं नाही, पण त्याचा पाय निसटला आणि तोल सावरण्याच्या नादात ट्रेच्या हातात, ट्रेखाली अंगठ्याला अडकवून ठेवलेला कप निसटला, पडला आणि फुटला. क्षणात देवरामनं स्वतःलाच एक सणसणीत शिवी घालून घेतली आणि पुढच्याच क्षणी तो सावध झाला. त्याच्या डोक्यात काही तरी चमकलं आणि चेहरा सैल झाला. देवरामनं स्वतःला सावरलं आणि तो ओट्याकडं सरकला.
चहाचा तिसरा राऊंड होता तो फक्त पुढच्या-पाठीमागच्या बंदोबस्ताच्या पोलिसांसाठी. त्यापैकी पुढं जे तिघे होते, त्यांच्यापैकी एक जण येऊन तीन कप घेऊन गेला. मागचे तिघेच बाकी होते. देवराम त्यांच्यासाठी हातातच कप घेऊन गेला.
देसले हा हवालदार डांबरट आहे हे देवरामला ठाऊक होतं. त्यानं आधी त्याच्याच हाती कप ठेवला. मग तो दोघा कॉन्स्टेबलच्या दिशेनं वळला. आशेनं ते दोघं एकेक पाऊल पुढं आले आणि काही कळायच्या आत देवराम कडमडला आणि पडला. एका कॉन्स्टेबलला दिसलं ते इतकंच - डावीकडून पाठीमागं वळताना देवरामनं फक्त डावा पाय फिरवला असावा आणि उजवा पाय पुढं घेताना तो डाव्या पायाला अडला आणि त्याचा तोल गेला. दोन्ही कप पडले, फुटले. चहा देवरामच्या अंगावर सांडला. दोघांपैकी एक जण आधी पाणी आणायला पळाला. कप पडल्याचा झाला तितकाच आवाज. त्यानंतरच्या हालचाली निःशब्दच. कारण आत मिटिंग सुरू होती. दरवाजा फार काही भक्कम नव्हता. पाणी आलं, कॉन्स्टेबलनं देवरामला उठवलं, दंडाला थोडा चटका बसला होता. पाठीमागंच मिटिंग कक्षाच्या भिंतीला लागून असलेल्या खुर्चीवर त्याला बसवून दुसरा कॉ़न्स्टेबल चहा आणायला निघाला. देवरामनं हळू आवाजात सांगितलं, "काही नाही राव, पाय सटकला. बसतो थोडा वेळ इथंच. चहा घेतला की ठीक."
देवरामनं डोळे मिटून घेतले होते. त्याचे कान मात्र पूर्ण जागे होते. ज्या खुर्चीवर तो बसला होता, ती खुर्ची बरोबर मिटिंग कक्षात उघडणार्या खिडकीपाशी होती आणि खिडकीचं एक दार पूर्ण लागत नव्हतं हे त्याला ठाऊक होतं. त्याला तेवढंच हवं होतं. एकेक शब्द तो टिपत राहिला. त्याच्या गावाची लढाई होती अखेर. त्याच्याच गावाची नव्हे तर त्याच्या पंचक्रोशीची. एकदा जमीन गमवावी लागल्यानंतर आलेल्या शहाणपणाला आता समितीच्या कामाची जोड मिळाली होती. पुरेसं होतं देवरामसाठी, त्याच्या गावासाठी काम करण्याकरता.
अर्ध्या तासानं देवराम तिथून उठला. आता ठीक आहे म्हणत त्यानं किचन गाठलं आणि कप धुवायला सुरवात केली.
मिटिंग संपल्यानंतर केव्हा एकदा आपण फोन गाठतो असं देवरामला झालं होतं, पण सव्वापाचपर्यंत ती संधी त्याला मिळाली नाही. डीवायएसपींनी त्याला पुन्हा चहा टाकायला सांगितला होता. चहा घेऊन देवराम मिटिंग कक्षात गेला तेव्हा डीवायएसपींसह सारेच व्हीआयपी स्यूटमध्ये होते. तिथंच त्यानं सार्यांना चहा दिला. दार लावलं गेलं, देवराम मिटिंग कक्षात आला. दोनेक मिनिटं तो दाराच्या पुढं दोन पावलं येऊन थांबला आणि ते आता इतक्यात उघडणार नाही याची खात्री झाल्यावर त्याच कक्षात मागल्या खिडकीपाशी असलेल्या फोनकडं वळला.
"किशोरभाईला द्या. मी नरसापूरहून जिवाल्या बोलतोय..." देवरामनं सांगितलं. किशोरला कधीही कोणाचा फोन आहे हे सांगावं लागत नाही हे ठाऊक असूनही त्यानं आपलं 'नाव' सांगितलं.
किशोरचा हॅलो ऐकल्यानंतर देवराम बोलू लागला, "उद्या रात्रीनंतर केव्हाही..."
---
जबाबदारी किशोरवर होती. डामखेडा हे समितीचं पक्कं गाव. या गावानंच भूसंपादन रोखून धरलं होतं. सर्वेच होऊ दिला नव्हता. तिथूनच सर्वेची सुरवात सरकार करणार होतं हा त्या खबरीचा अर्थ होता. देवरामनं बाकी काहीही विचारण्याची संधी त्याला दिली नव्हती. ज्या अर्थी त्यानं झटकन फोन बंद केला त्याअर्थी तो रेस्टहाऊसमध्येच होता आणि अद्याप त्यानं तिथून फारसं काही बोलण्याजोगी परिस्थिती नसावी. म्हणजे, पोलीस आणि इतर मंडळी अद्याप तिथंच असावीत. त्यांच्या चहा-पाण्यातून मिळालेल्या सवडीचा देवरामनं निरोप दिला होता हेच महत्त्वाचं. आणि ज्याअर्थी त्यानं संध्याकाळी भेट वगैरे काही सांगितलेलं नव्हतं त्याचा अर्थ इतकाच की त्याच्याकडं तेवढीच माहिती होती.
पोलिसांची पहिली माघार झाली तेव्हाच खरं तर किशोरला संशय आला होता की सरकार गप्प बसणार नाही. ती माघार म्हणजे समितीची जित नव्हतीच. ती त्यांची तात्पुरती माघार होती. पोलीस तिथं असेपर्यंत त्यांना म्हणावे तसे हात-पाय हलवता आले नव्हते. गावात प्रवेशही करणं मुश्कील होतं. कॅप उभे होते आणि उभेच होते. पोलिसांच्या त्या माघारीनंतर प्रेशर वाढवायला हवं होतं. किशोरनं ते बोलूनही दाखवलं होतं, पण... असो. आत्ता गरजेचं होतं माहिती काढणं.
बातमी गेली होती. किशोर पीसीओतून बाहेर पडला. पोलिसांत दोन पर्याय होते. इन्स्पेक्टर गुर्जर किंवा डीवायएसपी जाधव. दोघंही पक्के. ताकास तूर लागू न देणारे. तिसरा पर्याय होता प्रांताधिकारी यंत्रणा. पण तिथंही पंचाईतच. शेवटचा पर्याय होता तो म्हणजे थेट अरवली गाठणं. अरवलीत पोलिसांचा आणि एसआरपीचा एकेक कॅप होता. तिथं हालचाली असणार. उद्यापासूनच काही होणार असेल तर नक्कीच. पण अरवली म्हणजे किशोरलाच परतायला रात्रीचे नऊ वाजणार. त्यानंतर निरोप जायचा कसा पुढं?
थोड्या विमनस्क स्थितीतच तो चालू लागला. स्टँडपर्यंत पोचायला पाचेक मिनिटं लागतात. पलीकडं तिठा. एक रस्ता सरळ अरवली आणि पुढं डामखेड्याकडं जाणारा. डोंगरांमध्ये घेऊन जाणारा. पुढं रस्ता म्हणायचा म्हणूनच. कारण डामखेडा गाठायचं झालं तर किमान सहा मैलांची पायपीट नक्कीच. मोटरसायकल जाऊ शकते, पण सराईतांनाच ते शक्य. तिठ्यावरून दुसरा रस्ता जिल्ह्याकडं. डोंगरांतून बाहेर नेणारा. स्टँडच्या गेटबाहेरच तीन जीप ओळीनं उभ्या होत्या. माल भरला जात होता. किशोरनं स्टँडकडं वळून पाहिलं. जिल्ह्याहून आलेल्या एसटीच्या टपावरून बॉक्स उतरवले जात होते. एक पोलीस व्हॅनही पलीकडं उभी होती. उजवीकडं दूरवर टेकडीच्या बाजूनं जिल्ह्याकडं जाणारा रस्ता दिसत होता. पाचेक मिनिटं तो तिथंच उभा होता. पोलिसांच्या जीपमध्ये सामग्री भरली जात होती. काय करायचं याचा निर्णय होत नव्हता. पण हिय्या करून त्यानं एका ड्रायव्हरला गाठलं.
"काय धावपळ इतकी?"
"आपल्याला काही कळत नाही." त्याचं तोडून टाकणारं उत्तर.
किशोर इतक्यात हार खाणारा नव्हता. "अरवली का? मला जायचंय तिकडं म्हणून विचारतो." त्यानं सूर बदलला.
"हो. पण सायबांना विचारा." या भागात असं अनेकदा जाता येतं एखाद्या सरकारी गाडीतून. त्याचाच फायदा घेण्याचा आपला प्रयत्न आहे असं किशोरनं दाखवलं. ड्रायव्हर किशोरला ओळखत नव्हता.
"उद्या परत येता येईल का? दुपारी दोननंतर बस नाहीये तिथून," किशोर.
"आता काय सांगावं? उद्या की परवा? मला नाही वाटत..." तो बोलू लागला. किशोरनं त्याला बोलू दिलं. पाच मिनिटांनी तो तिथून निघाला आणि स्टँडच्या दिशेनं वळला. वळतानाच त्याचं लक्ष गेलं जिल्ह्याच्या रस्त्याकडं. ओळीनं व्हॅन्स थांबलेल्या दिसत होत्या. म्हणजे ड्रायव्हरनं दिलेली माहिती नक्की होती. देवरामची माहितीही नक्की होती. आज निरोप पुढं जावाच लागेल. त्याच्या पायांना गती आली. किमान तिघांना भेटावं लागणार होतं.
अड्ड्यावर येताच किशोरनं बारक्याला बोलावलं. एका कागदाचे तीन तुकडे केले. प्रत्येकावर फक्त दुसर्या दिवसाची तारीख लिहिली. वकीलांकडं आधी, तिथून त्याच्या दोन खास माणसांकडं - रुपसिंग दुकानदार आणि धनजीसेठ - ही माहिती जाणं गरजेचं होतं. पैसाही महत्त्वाचा आता अशा वेळी; शिवाय धनजीकडून इतर माहितीही मिळणार हे नक्की. चिठ्ठ्या देऊन त्यानं बारक्याला पिटाळलं.
क्रमशः
प्रतिक्रिया
2 Mar 2010 - 11:39 pm | झकासराव
वेगवान घडामोडी!!!
येवुदेत पटापट पुढचे भाग!! :)
3 Mar 2010 - 1:10 am | संदीप चित्रे
वेगवान घडामोडी !
ते क्रमशः कशाला उगीच ?
पुढचे भाग लवकर टाका !
3 Mar 2010 - 12:10 am | राजेश घासकडवी
याची उत्कंठा लागलेली आहे. लेखनातल्या सराईतपणे आलेल्या बारकाव्यांवरून सरकारी यंत्रणा कशी चालते याचा जवळून अनुभव असावा असं जाणवतंय.
आता उशीर करू नका, निरोप लवकर पाठवा.
राजेश.
3 Mar 2010 - 1:15 am | शेखर
जबरदस्त वेग.. खिळवुन ठेवलेय त्यामुळे पुढचे भाग पटापट येऊ द्यात....
3 Mar 2010 - 7:54 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री मोडक, नेहमीप्रमाणेच छोट्या छोट्या वाक्यांतून सशक्त कथा आणि पात्रं उभी राहत आहेत. कृपया पुढच्या भागास अतिविलंब लावू नका.
3 Mar 2010 - 8:56 am | प्रभो
मोडक मोडक ..लवकर टाका भाग पुढचा..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
3 Mar 2010 - 8:54 am | मदनबाण
वाचतोय... दुसरा भाग लवकर टंका.
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
3 Mar 2010 - 4:31 pm | शैलेन्द्र
मस्त...
3 Mar 2010 - 5:34 pm | सुनील
सुरुवात उत्कंठावर्धक. पुढचा भाग लवकर येऊदे.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
3 Mar 2010 - 5:49 pm | नंदू
उर्वरित कथा लवकर टाका.
3 Mar 2010 - 7:16 pm | विसोबा खेचर
वाचतो आहे...
तात्या.