हिंदीतील प्रख्यात कवी कै. हरिवंशराय बच्चन ह्यांची 'मधुशाला' हे खूपच प्रसिध्द असे खंडकाव्य आहे. मूळ काव्यात १३५ आणि परिशिष्ठात ४ अशा एकूण १३९ रुबाया आहेत.
ह्या सुंदर काव्याने अनेकांना भुरळ घातली आहे. स्वतः अमिताभने ह्याचे वाचनही केलेले आहे. जयदेव ह्यांच्यासारख्या ताकदीच्या संगीतकाराने संगीतबध्द केलेले हे काव्य मन्ना डे सारख्या मनस्वी गायकाने स्वरबध्द केलेले आहे ह्यापरता गौरव तो कोणता!
अशा ह्या काव्यामागची प्रेरणा काय असेल ही मोठी विचार करण्यासारखी गोष्ट वाटते.
सकृतदर्शनी साकीचे आणि त्या मदिरेचे, कोडकौतुक गाणारा मदिरासक्त माणूस असे भासणारे काव्य जेव्हा एकेक रुबाई पुढे सरकते, किंबहुना वाचकाला खेचून नेते, त्यावेळी त्यातले वेगवेगळे अर्थ उलगडत जातात आणि आपण चकित होतो!
हरिवंशराय ह्यांचे हिंदी भाषेवरील आणि काव्यप्रकारावरील प्रभुत्व तर वादातीत आहेच पण त्यांच्यातला तत्वज्ञ त्याहीपेक्षा मोठा आहे असे नि:संशय वाटते. संपूर्ण जीवनविषयक तत्वज्ञानच त्यांनी 'मधुशाले'तून ज्या प्रकारे रसिकांना सुपूर्त केले आहे ते केवळ लाजवाब!
प्रथमपत्नी श्यामा हिच्या निधनामुळे आलेल्या खिन्नमनस्कतेतून हे काव्य निर्मिण्याची प्रेरणा मिळाली असावी असे मानण्यास वाव आहे. अतीव दु:खाने वैराग्याच्या उंबरठ्यावर असलेल्या प्रतिभावान आणि हळव्या माणसाच्या मनात जीवनाकडे बघण्याचा जो एक सर्वतः अलिप्त आणि तात्विक दृष्टिकोन येईल तो ह्या काव्यात जाणवतोच पण त्याच वेळी आपल्याला आलेल्या अनुभवांचे सार जगाला देण्याची त्याची बांधिलकीही जाणवल्याशिवाय रहात नाही हे विशेष आणि तेच बच्चन यांचे मोठेपण आहे असे मला वाटते.
(मागे मि.पा.वरच धनंजय यांनी मधुशाला - अर्थ आणि संदर्भ अशी एक छान चर्चा घडवून आणली होती. त्याचवेळी ह्या मधुशालेने माझ्या मनात घर केले!)
मि.पा.वरील रसिकांसाठी मी संपूर्ण मधुशालेचा भावानुवाद सादर करीत आहे. तो गोड मानून घ्यावा ही विनंती.
प्रथमतः हे नम्रपणे नमूद करु इच्छितो की मी उर्दू/फार्सी चा अजिबात जाणकार नाही हिंदीही थोडेबहुत माहीत आहे. त्याबळावर एवढे मोठे धाडस करावे की नाही हा मनाचा हिय्या होत नव्हता, पण मराठीत ही रचना का नाही? ती मराठीत असली पाहिजे, ह्या प्रेमापोटी हे धाडस करतो आहे!
अर्थातच ह्यातील जे काही मनाला भावेल त्याचे सर्व श्रेय कै. हरिवंशराय यांचेच आहे आणि जे काही टाकावू वाटेल तो माझा अज्ञ प्रयत्न आहे!
(टीप - संपूर्ण अनुवादात बालकवींच्या 'श्रावणमासी हर्ष मानसी' ह्या कवितेची चाल पकडण्याचा प्रयत्न आहे कारण मला ती चाल मूळ काव्याला चपखल वाटली. मात्रांच्या ओढाताणीत न अडकता काव्याची गेयता कशी टिकून राहील ह्याकडे मी जास्त लक्ष देण्याचा यत्न ठेवला आहे. त्यामुळे चाणाक्ष वाचकांनी कृपया 'मात्रांचे वळसे' देऊ नयेत ;)) प्रत्येक आठवड्यात कमितकमी पाच रुबाया ह्याप्रमाणे करण्याचे ठरवले आहे बघूया कसे काय जमते ते. )
------------------------------------------
मधुशालेत काही ठराविक शब्द पुनःपुन्हा येतात त्यांचे अर्थ -
साकी = मद्य देणारा
साकीबाला = मद्य देणारी
हाला, मदिरा = मद्य, दारु
मधुशाला = मद्यालय, मदिरालय
------------------------------------------
पहिल्या पाच रुबायात स्वतः कवी साकी आहे. आणि तो मदिरेचे आणि रसिकांचेही गुण गातो आहे.
मधुशाला
मृदु भावों के अंगूरों की आज बना लाया हाला,
प्रियतम, अपने ही हाथों से आज पिलाऊँगा प्याला,
पहले भोग लगा लूँ तेरा फिर प्रसाद जग पाएगा,
सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१।
प्यास तुझे तो, विश्व तपाकर पूर्ण निकालूँगा हाला,
एक पाँव से साकी बनकर नाचूँगा लेकर प्याला,
जीवन की मधुता तो तेरे ऊपर कब का वार चुका,
आज निछावर कर दूँगा मैं तुझ पर जग की मधुशाला।।२।
प्रियतम, तू मेरी हाला है, मैं तेरा प्यासा प्याला,
अपने को मुझमें भरकर तू बनता है पीनेवाला,
मैं तुझको छक छलका करता, मस्त मुझे पी तू होता,
एक दूसरे की हम दोनों आज परस्पर मधुशाला।।३।
भावुकता अंगूर लता से खींच कल्पना की हाला,
कवि साकी बनकर आया है भरकर कविता का प्याला,
कभी न कण-भर खाली होगा लाख पिएँ, दो लाख पिएँ!
पाठकगण हैं पीनेवाले, पुस्तक मेरी मधुशाला।।४।
मधुर भावनाओं की सुमधुर नित्य बनाता हूँ हाला,
भरता हूँ इस मधु से अपने अंतर का प्यासा प्याला,
उठा कल्पना के हाथों से स्वयं उसे पी जाता हूँ,
अपने ही में हूँ मैं साकी, पीनेवाला, मधुशाला।।५।
--------------------------------------
भावानुवाद -
मधुशाला
कोमल द्राक्षरसे मी भरतो, हा घ्या काव्यमयी प्याला,
प्रियजन म्हणुनी देतो तुम्हा, स्वीकारावा हा प्याला,
जगता तरि हा देइन नंतर, प्रथम तुम्हा हा भेटविला,
रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ||१||
असेल ती जर आस तुम्हां तर, त्रिभुवन फिरुनी भरि प्याला,
नर्तन मी ही करिन तुम्हांस्तव, घेउन हाती तो प्याला,
मधुर जीवना कधिच त्यागिले, देण्या रस हा तुम्हाला,
आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२||
तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला,
भरुनि तुम्हां ह्या प्याल्यामधुनी, तुम्हीच रस हा प्राशियला,
देता हिंदोळे परि तुजला, धुंद बनविशी जगताला,
तू माझा अन आज मी तुझा, हीच आपुली मधुशाला ||३||
भावबंधनी द्राक्षवल्लरी, खेचुनि 'कल्पक' वारुणिला,
भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला,
अक्षय हा तरि काव्यचषक जो सहज जिंकितो लाखाला,
काव्यरसिक हे भरुन पावती, पुस्तक माझे मधुशाला ||४||
मधुर भावना नित्य अशा ह्या बनविति सुमधुर मदिरेला,
शांतवितो मग तृषार्त जीवा भरुनि या अंतरिचा प्याला,
उचलुनि प्याला कल्पक हाती, प्राशुन घेतो मीच मला,
मीच वसे तरि माझ्यामधुनी, आज पिण्या ही मधुशाला ||५||
चतुरंग
प्रतिक्रिया
11 Mar 2008 - 11:00 am | केशवसुमार
चतुरंगशेठ,
स्तुत्य उपक्रम्..अभिनंदन आणि शुभेच्छा..
संकल्प सिद्धिस न्या..
पहिल्या पाच रुबाया उत्तम झालेल्या आहेत...
(मद्य न चाखलेला मधुशालेचा चाहता)केशवसुमार
11 Mar 2008 - 11:06 am | बेसनलाडू
नक्षीदार तरीही आकलनीय शब्दयोजना आणि लय. भावानुवाद आवडला.
पुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.
(उत्सुक)बेसनलाडू
11 Mar 2008 - 11:31 am | विसोबा खेचर
रंगराव,
सुरेखच भावानुवाद. तुमचं खरंच कौतुक वाटतं. संपूर्ण मधुशालेचा हा मराठी भावानुवाद म्हणजे मिपाकरता एक खजिनाच म्हणावा लागेल!
पुढील रुबायांकरता अनेकोत्तम शुभकामना. कृपया नियमितपणे येऊ द्या ही विनंती..
आपला,
(मधुशालाप्रेमी) तात्या.
11 Mar 2008 - 1:17 pm | नंदन
सुरुवात झकास झालीय. पुढील भाग वाचण्यासाठी उत्सुक आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Mar 2008 - 8:32 pm | चतुरंग
रसिकांनी काही सूचना केलेल्या आहेत त्याप्रमाणे मूळ लेखनात काही दुरुस्त्या करता आल्या तर निर्दोष कृती देण्याचे मनसुबे तडीस जातील.
नीलकांताच्या मदतीने संपादनाची शक्ती पूर्ववत स्थापित करावी ही आग्रहाची विनंती - ह्याबाबत आधीही संवाद साधलेला आहेच.
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते.
चतुरंग
12 Mar 2008 - 4:44 pm | विसोबा खेचर
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;) तेव्हा ही मागणी गैरलागू नाही असे वाटते.
आपली मागणी पूर्ण केली आहे असं आम्हाला आठवतं! :)
('नान्या' अद्ययावत होऊ शकतो तर आमचे लेखन का नाही?;)
नक्कीच होऊ शकते. मिसळपावला नान्या आणि मधुशाला दोघे सारखेच लाडके आहेत. येथे पंक्तिप्रपंच नाही! :)
आपला,
(न्यायप्रेमी) तात्या.
12 Mar 2008 - 7:11 pm | चतुरंग
त्याबद्दल आपले आभार. तुमच्या दिलदारपणाला आमची दाद!
चतुरंग
12 Mar 2008 - 12:21 am | कोलबेर
असेच म्हणातो!
11 Mar 2008 - 11:42 am | धनंजय
शुभेच्छा!
शब्दयोजना आवडली.
एक रुबाई तितकी समजली नाही
"भरुन आणिला काव्यचषक हा कविस्वरुपी मद्याला" ओळीचा अर्थ लागला नाही.
मुळात मोठे कल्पक समांतर रूपक आहे.
द्राक्ष/वेल=भाव
मद्य=कल्पना
प्याला=कविता
साकी=कवी**
वाचक=पीणारा
पुस्तक=मधुशाला
ती पूर्ण साखळी अनुवादित रुबाईत लागत नाही. विशेषकरून ** ठिकाणी.
बाकी अनुवादाला सलाम! आम्ही आनंदाने वाचत आहोत.
11 Mar 2008 - 8:37 pm | चतुरंग
प्रकाशित करण्याआधीच्या संपादनाच्या शेवटल्या फेरीत ही सुधारणा राहून गेली -
तिथे "भरुन आणिला काव्यचषक हा काव्यस्वरुपी मद्याला" असे योजले होते.
तात्यांनी संपादनाचा अधिकार पूर्ववत केल्यास मूळ लेखनात ही दुरुस्ती होईल.
--------------------------------------------------------------
धनंजय, वरील दुरुस्ती केली आहे आता रुबाई मूळ काव्याशी सलगी दाखवते!
संपादनाचे अधिकार दिल्याबद्दल तात्यांचे आभार :)
चतुरंग
11 Mar 2008 - 6:14 pm | लिखाळ
फार छान अनुवाद. कल्पक.
एक वाटले ते मोकळेपणी सांगतो. मला काव्य, अनुवाद यातले काही कळत नसून सुद्धा धाडस करतो आहे.
सबसे पहले तेरा स्वागत करती मेरी मधुशाला।।१।
रसिक स्वागते तुमच्या सादर, करतो मी ही मधुशाला ।।१।
आज अर्पितो रसिकांस्तव तरि, ही जगताची मधुशाला ||२||
तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला, ....
मूळ हिंदी कवितेत कवी प्रत्यक्ष वाचकाला उद्देशून लिहित आहे. तसेच हिंदीमधिल 'आप' न वापरता 'तू' असे मित्रत्वाने कवी संबोधत आहे. तो वाचकाशी सरळ संवाद साधत आहे असे जाणवले. आपल्या अनुवादात मात्र आपण सर्व रसिकांशी संवाद साधत आहात. त्यामुळे थोडी औपचारिकता वाढली आहे. त्यामुळे अनुवादित कविता थेट वाचकाशी बोलण्यात थोडी मागे पडेल का? !!
पुलेशु.
--लिखाळ.
'शुद्धलेखन' आणि 'शुद्ध लेखन' यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.
11 Mar 2008 - 8:39 pm | चतुरंग
आपली सूचना नक्कीच विचार करण्याजोगी आहे.
संपूर्ण काव्याच्या अनुषंगाने तिचा वापर कसा करुन घेता येईल हे मी जरुर तपासून बघेन.
चतुरंग
22 Jun 2008 - 6:34 pm | बहुगुणी
चतुरंगः अतिशय आवडलेला अनुवाद, धन्यवाद.
लिखाळांच्या वरील प्रतिक्रियेबद्दलः
तुम्हिच वारुणी माझ्यास्तव जणु, मी तो आसुसला प्याला,
या ओळीऐवजी
तूच सखे जणू वारुणी माझी, मी तो आसुसला प्याला,
अशी रचना केल्यास चालेल का?
22 Jun 2008 - 9:02 pm | चतुरंग
स्वागतार्ह सूचनेबद्दल आभारी आहे. आपण सर्व रसिक इतक्या आत्मियतेने ह्या अनुवादाचा विचार करत आहात ह्यातच सर्व आले!
'मधुशाला' हे अनेक वेगवेगळे आयाम दाखविणारे काव्य आहे. नुसते सखी, वारुणी किंवा एकच व्यक्ती ह्यांना उद्देशून लिहिलेले नसून ते सर्वसमावेशक तत्त्वज्ञाच्या पातळीवरही जाते, असे मला वाटते, तेव्हा काव्यात असलेल्या त्या सर्व भूमिकांना न्याय मिळेल अशीच संकल्पना वापरावी लागेल असे वाटते.
चतुरंग
11 Mar 2008 - 10:40 pm | सर्किट (not verified)
अतिशय सुंदर..
येऊ द्या...
- सर्किट
12 Mar 2008 - 12:51 am | प्राजु
मला वाटते धनंजय यांनी घडवून आणलेल्या चर्चेत मी आपल्याला सुचवलं होतं की आपण संपूर्ण मधुशाला मराठित आणा म्हणून...
मी खरंतर वाटच पहात होते.
खूप आनंद झाला आपण माझ्या विनंतीचा मान ठेवलात.
एकच सांगते आपल्या या मधुशालेने मिपाची उंची आंतर जालिय मराठी जगतात बाकीच्या संकेत स्थळांपेक्षा खूप वाढली आहे. आणि ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.
अतिशय सुंदर भाषा, शब्द आणि रचना.. लयबद्ध..
पुढच्या रूबायांच्या प्रतिक्षेत आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
12 Mar 2008 - 2:21 am | चतुरंग
धनंजयने घडवून आणलेल्या चर्चेचा दुवा माझ्या लेखनात देण्यामागचे कारणच हे होते की ह्या लेखनाची पार्श्वभूमी काय आहे ते वाचकांना कळावे.
ह्या अनुवादामागचे कारण माझे मराठीप्रेम जितके आहे तितकेच तुझ्यासारखे मि.पा. वरचे रसिकही आहेत हे नक्की!
चतुरंग
12 Mar 2008 - 5:15 pm | स्वाती राजेश
चतुरंग छान उपक्रम सुरु केलात..
अतिशय उत्तम ,लयबद्ध अशी रचना केली आहे...
पुढील भाग लवकरच टाका..वाट पाहात आहे.
29 Mar 2008 - 9:20 pm | सुवर्णमयी
हा भाग आवडला, धन्यवाद.
23 Jun 2008 - 9:33 am | चाणक्य
हेच म्हणतो. कॄपया अजुन येऊद्यात.
चाणक्य
23 Jun 2008 - 9:42 am | यशोधरा
लिहा लवकर पुढे.. सुरेखच जमले आहे...
24 Jun 2008 - 1:09 am | चतुरंग
एकूण आठ भाग प्रसिद्ध झालेत.
नववा लिहिणे सुरु आहे.
चतुरंग
24 Jun 2008 - 9:20 am | यशोधरा
चतुरंगजी, सॉरी, मला माहीत नव्हते, शोधते आता. इथे जुन्या लिंक्स देता येतील का?