तू मने गमे छे !

भन्नाट भास्कर's picture
भन्नाट भास्कर in जनातलं, मनातलं
3 May 2018 - 1:15 pm

म्हणजे तिला मी पहिल्यांदा पाहिलेले तेव्हाच आतून काहीतरी हललेले. पण सांगतोय कोणाला. सारेच हसले असते.

मी अगदीच पोरसवदा भासत होतो तिच्यासमोर. ती अगदीच गोलमटोल नव्हती, पण पुरेशी धष्टपुष्ट होती. अगदीच गोरी नसली, तरी गव्हाळ उजळ कांतीची होती. अगदीच मराठी नाही, पण मराठी बोलता येणारी होती. आयुष्यात पहिल्यांदा मी एका गुजराती मुलीच्या प्रेमात पडलो होतो, अगदी पहिल्याच नजरेत पडलो होतो.

तिलाही माझ्यात नक्कीच काहीतरी आवडले होते, ते ही पहिल्याच नजरेत. तिची नजरच तसे सांगत होती. पण माझा तो पहिल्या जॉबचा पहिलाच दिवस होता. आणि ती तिथे आधीच सरावलेली खेळाडू होती. मागाहून समजले की तिलाही जॉईन करून चारच महिने झाले होते. तिचाही तो पहिलाच जॉब होता. पण तरीही तिच्यामानाने मी नवखाच होतो.

कोणीतरी मग दुसर्‍याच दिवशी चिडवाचिडवीत माझी तिच्याशी जोडी जमवली. आणि पुढे त्या चिडवण्याला आणखी कोणी खतपाणी घालू नये म्हणून उगाचच, अगदी उगाचच मी तिच्याशी एकदा तुसडेपणाने वागलो. फक्त एकदाच..

बस्स ! मग ज्या मुलांनी मला तिच्यावरून चिडवायला घेतले होते, तेच आता आमच्यातील खुन्नसचे किस्से रंगवू लागले. आमच्यात तसे काहीही नसताना आमच्यातील शीतयुद्धाच्या कहाण्या रचू लागले. मी देखील वेड्यासारखा, कसेही का होईना, तिच्यासोबत आपले नाव जोडले जातेय यातच आनंद मानू लागलो. कधीतरी फटक्यात या सर्व अफवांतील फोलपणा जगासमोर येईल आणि आमच्यातील तथाकथित शत्रुत्व प्रेमात बदलेल या विचारांत रमू लागलो. हळूहळू मला जाणवत होते, की मी तिच्यात आता गुंतू लागलो होतो.

जेव्हा ती माझ्याकडे बघायची, रागानेच बघायची. मी सुद्धा माझी नजर कोरडीच ठेवायचो. पण नेहमी माझ्या नजरेला नजर मिळेल, अश्याच जागी ती बसायची.
माझ्या अगदी शेजारून जायची. तिच्यासाठी मी अस्तित्वातच नाही असे दर्शवून जायची. पण ज्या दिवशी मी ऑफिसला यायचो नाही, तेव्हा हलकेच माझी चौकशीही करायची.
मी कधी तिची खोडी काढल्यास, थेट माझ्याशी भांडायलाही लाजायची. पण तिच्यावरून मला चिडवणार्‍या, माझ्या मित्रांशी लाजत लाजत बोलायची.
एक वेगळीच केमिस्ट्री होती आमच्यात. तिचे नाव घेताच लोकांना मी आठवायचो, माझे नाव घेताच ती आठवायची..

वर्ष गेले अश्यातच..
आणि मग ठरवले आता बोलायचे..

निमित्त होते दिवाळीनिमित्त ऑफिसमधील एका कार्यक्रमाचे. प्रत्येकाला दहाबारा कागदांचे चिटोरे वाटण्यात आले होते. आणि ठरले असे होते की प्रत्येकाने आपल्या आवडत्या वा नावडत्या व्यक्तींबद्दल त्या कागदावर लिहून तो चिटोरा त्यांच्यात्यांच्या डेस्कवर लावायचा. स्वत:चे नाव मात्र लिहायचे नाही. आपल्याबद्दल लोकं काय विचार करतात याचा थेट फिडबॅक..

मला फक्त एकाच कागदात ईंटरेस्ट होता. काय लिहू, आणि काय नको...
अशी संधी पुन्हा येणार नव्हती... थेट भिडायचेच ठरवले !

ठरलं ! लिहून यायचे, तू मला आवडतेस !

पण भावना नेहमी मातृभाषेतच पोहोचतात. मराठी लिहिता बोलता येणारी असली तरी होती मात्र ती गुजरातीच.. मग मेहुलची मदत घेतली.. आणि गुजराती भाषेतील सर्वात गोड वाक्य त्या कागदावर अवतरले,

"तू मन्ने गमे छे ! "

दुपारच्या सत्रात बाहेर सारे कार्यक्रमात मग्न असताना मी हळूच तो कागद तिच्या डेस्कवर डकवून आलो. जणू काळजाचा छोटासा तुकडाच तिथे ठेवून आलो. आता प्रतीक्षा होती ते तिने माझे काळीज वाचण्याची.

प्रतीक्षा संपली. ती जागेवर आली. आम्ही टोळके करून जवळपासच उभे होतो. तिने तो डकवलेला कागद काढला. तो तसाच हातात घेऊन मुद्दामच आमच्या ग्रूपसमोर आली. आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला..

जरा धक्का लागल्यास खळ्ळकन फुटावे अश्या काचेच्या हृदयावर कोणीतरी तीक्ष्ण खिळ्याने कर्रकचून ओरखडा ओढावा असे झाले..

पण ते शेवटचेच ...
त्यानंतर मन कोडगे करून घेतले. पुन्हा त्याला नजरांचे चुकीचे अर्थ काढण्यापासून परावृत्त केले. साधारण दिडदोन महिन्यातच मला नवीन जॉब लागला आणि मी तिथून बाहेर पडलो. तेथील काही मित्र नंतरही संपर्कात होते. पण पुन्हा कधी तिचा विषय निघाला नाही. पुढे तिचे लग्न झाले हे मात्र उडत ऊडत कानावर आले. पण फारसे काही वाटले नाही. कारण एव्हाना माझेही झाले होते.

पण जगही किती छोटे असते ना..
वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये कामाचा अनुभव घेत अखेर आमची पुन्हा एकदा एकाच कंपनीत गाठ पडली.
बावरलेली नजर आम्हा दोघांची. काय बोलावे, कसे बोलावे. कि बोलूच नये. एक अवघडलेपण.
तरी सहा वर्षे झाली.. पण फरक असा काहीच नाही..
शेवटी मीच ठरवले, दोघांचीही लग्ने झाली आहेत. जे होते ते माझे एकतर्फी होते. उत्तरही तेव्हाच मिळाले होते. म्हणून संकोच सोडून हसतच तो विषय काढला, आणि जे झाले ते विसरून जाऊया म्हणालो..

चेंडू मी तिच्या कोर्टात ढकलला होता. आता अवघडून जायची वेळ तिची होती.
पण तिच्या डोळ्यात अविश्वास होता !
ते.. ते.. तू लिहिलं होतंस?? पण असं कसं.. तू मन्ने गमे छे.. ते अक्षर तर मेहुलचे होते ना ....

थोडसं गरगरलं मला.. आणि ते तर होणारच होते.
क्षणात जे एवढ्या वर्षांची कॅसेट रिवाईंड होत माझ्याच डोक्यावर आदळली होती...

- भन्नाट भास्कर

कथालेख

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

3 May 2018 - 1:26 pm | पद्मावति

अर्र्...=)))
मस्तं लिहिल आहे.

श्वेता२४'s picture

3 May 2018 - 1:29 pm | श्वेता२४

आवडली स्टोरी

अनिंद्य's picture

3 May 2018 - 1:30 pm | अनिंद्य

Such a cute story
आवडली :-)

तुषार काळभोर's picture

3 May 2018 - 2:05 pm | तुषार काळभोर

सरळ आपलं विंग्रजी टाकायचं ना राव...
आय लौ यु!!!

राही's picture

3 May 2018 - 2:25 pm | राही

कथा छानच आहे.
पण शीर्षकातला ' मन्ने' शब्द खटकला. तो ' मने' असा असायला हवा होता. खरे तर या चुकीवरून त्या मुलीला हे कळायला हवे होते की ती चिठ्ठी कोणा ' प्रॉपर' गुजरातीभाषकाने लिहिलेली नसणार. किंवा मेहुलने मुद्दामच ती चूक राहू दिली असावी आपली ओळख झाकायला.

अनिंद्य's picture

3 May 2018 - 2:45 pm | अनिंद्य

@ राही,

हेच लिहिणार होतो, पण रसभंग होईल असे वाटल्याने थांबलो.
'मन्ने - तन्ने' ही हरयाणवी बोली बॉलिवूडमुळे सध्या पॉप्युलर आहे.

बाकी कथा आवडली आहेच :-)

रुखरुख वाटली राव वाचून . लेखन फारच सुंदर झाले आहे . काहीतरी सकारात्मक शेवट पाहिजे होता . जस कि गुजरातला साखरपुडा आणि मुंबईला विवाह . शिवसेना आणि मनसेचा विरोध , बीजेपीचा छुपा पाठिंबा आणि पळून जाताना बुलेट ट्रेनची मदत , चौथ्या स्टेशनवर उडी घेऊन परत विरार फास्टने मुंबई गाठली आणि लग्नाची गाठ बांधली . असं काहीतरी जगावेगळं .
पण एक सांगू तुम्ही जे लिहिलंय ना त्यामुळे डोळ्यासमोर सर्व काही उभे राहत होते वाचताना . सुंदर लिखाण .

सिद्धेश्वर विलास पाटणकर

भन्नाट भास्कर's picture

4 May 2018 - 3:22 am | भन्नाट भास्कर

हा हा छान कल्पनाविलास. दुनियादारी चित्रपट आठवला. शेवटी डब्याला डबे जोडत बसले होते. आपली मालगाडी ईथेच थांबलेली बरी. तरी कधी शतकी प्रतिसादांचा धागा काढावासा वाटला तर नक्की हे असले संदर्भ जोडेन.

प्रतिसादाबद्दल धन्यवाद :)

अभ्या..'s picture

3 May 2018 - 4:41 pm | अभ्या..

भन्नाटच रे भास्करा.
भारी लिहिलंय

प्रचेतस's picture

3 May 2018 - 4:57 pm | प्रचेतस

भारीच लिहिलंय.

सूड's picture

3 May 2018 - 5:30 pm | सूड

अर्र!!

सस्नेह's picture

3 May 2018 - 5:33 pm | सस्नेह

अर्र र्र !
नाव तरी लिहाल की नै !! :(

भन्नाट भास्कर's picture

4 May 2018 - 3:18 am | भन्नाट भास्कर

तेवढं नाव नका विचारू, लेखात लिहिले नाही तर प्रतिसादात तरी का बदनाम करावे :)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

3 May 2018 - 7:30 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छन लिहिले आहेस रे भास्करा.
"आणि आम्हाला स्पष्ट दिसेल असे दोन्ही हातांत धरून तो टर्राटरा फाडला."
ह्या नंतर जरा एकदा बोलायला हवे होते. कारण आधी लेखात म्हंटल्याप्रमाणे-

तिची नजरच तसे सांगत होती.

भन्नाट भास्कर's picture

4 May 2018 - 3:17 am | भन्नाट भास्कर

माई आयुष्यात अश्या सर्व नजरांना पुढाकार घेत बोलायची हिंमत दाखवली असती तर किमान ७-८ प्रकरणं असती माझी :)
तेवढं जमायचे नाही म्हणून हा चिठ्ठीचपाटीचा उद्योग !

केवळ_विशेष's picture

3 May 2018 - 9:41 pm | केवळ_विशेष

गुगली

पिवळा डांबिस's picture

3 May 2018 - 10:49 pm | पिवळा डांबिस

आवडला...

सतिश गावडे's picture

3 May 2018 - 11:09 pm | सतिश गावडे

तिन्नेचे लग्न मेहूलसोबत झाले का?

भन्नाट भास्कर's picture

4 May 2018 - 3:14 am | भन्नाट भास्कर

नाही.
हा किस्सा लिहिताना तसा शेवटाला ट्विस्ट द्यायचा मोह झालेला. पण बळंच वाटले असते म्हणून टाळला. प्रत्यक्षात असे झाले असते तर खूनच केला असता नक्कीच मेहुलचा :)

टवाळ कार्टा's picture

3 May 2018 - 11:14 pm | टवाळ कार्टा

१ वर्ष???? मग दुसरे काय होणार

भन्नाट भास्कर's picture

4 May 2018 - 3:12 am | भन्नाट भास्कर

अश्या नाजूक बाबतीत मुखदुर्बळ असलेल्यांसाठी १ वर्षे हा काळ फार नाही :)

भन्नाट भास्कर's picture

4 May 2018 - 3:10 am | भन्नाट भास्कर

प्रतिसादांबद्दल धन्यवाद :)

तू मने गमे छे यात मने बरोबर आहे, मन्ने चुकीचे आहे. बरीच वर्षे झाली त्या किस्स्याला. माझे गुजराती भाषेचे ज्ञान शून्यच. त्या गुजराती मित्राने मने च लिहिले असणार. मी हा किस्सा लिहिताना मला जे आठवले, बरोबर वाटले ते लिहिले.

संपादनाची सोय असल्यास दुरुस्त करून घेतो. तेवढ्यासाठी ज्याचे गुजराती चांगले आहे अश्याचा रसभंग व्हायला नको.
चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद :)

सविता००१'s picture

4 May 2018 - 12:05 pm | सविता००१

किती गोड आहे किस्सा..

आवडला

अमरेंद्र बाहुबली's picture

4 May 2018 - 2:24 pm | अमरेंद्र बाहुबली

अरेरे. नेहमी प्रेमभंगा च्या कथांचा विनोद करणारा मी आज खरच हलहळलो. लै वाईट झालं. पण अश्या गोष्टीत रिस्क नाही घ्यायची. सरळ काय ते बोलून टाकायचं.

एस's picture

4 May 2018 - 3:09 pm | एस

वाईट झालं!

मराठी कथालेखक's picture

4 May 2018 - 4:53 pm | मराठी कथालेखक

कथा आवडली पण तुमच्या लिहिण्यावरुन वाटतंय की ती तुमच्या आयुष्यातली सत्यघटना आहे म्हणून हळहळ पण वाटली.
असो, आवडत्या व्यक्तीशी कोणत्याही नात्याने जवळीक करायला मिळणं हा आनंदच असतो असं मला वाटतं आता तुमची मैत्री होत असेल तर मागे सरु नका.

सरळ लवशिप देती का? विचारलं असतं तर आज खमण ढोकळा तांबड्या पांढऱ्यात बुडवून खायची फ्युजन हौस अन मिजास पुरवून घेता आली असती!

काल्पनिक कथा असेल तर लैच भारी लेखन, सत्यकथन असेल तर अरेरे मित्रवर्य भास्कराचार्य लैच वंगाळ झालं, जल्ला झालं गेलं विसरा आज निवांत एक चिल्ड बियर मारा अन सूशेगाद झोपा, उद्या सकाळी उठून आयुष्य आपोआप पुढं ढकलून नेईल.

भन्नाट भास्कर's picture

10 May 2018 - 11:50 am | भन्नाट भास्कर

धन्यवाद,
१०० टक्के काल्पनिक आणि १०० टक्के सत्यकथन काहीच नसते. हे देखील या दोघांच्याच अध्येमध्ये... :)

पुष्कर जोशी's picture

5 May 2018 - 6:22 pm | पुष्कर जोशी

खूप मनापासून लिहीले आहे

एक प्रश्न आहे तिने तुम्हास काही चिठ्ठी नाही दिली का..?

भन्नाट भास्कर's picture

10 May 2018 - 11:52 am | भन्नाट भास्कर

प्रत्येकाने प्रत्येकालाच द्यावे असे काही जरूरी नव्हते ..
थोडक्यात आपल्या शाळाकॉलेजातील रोज डे, चॉकलेट डे सारखे.. मुलांना संधी आणि मुलींची चंगळ :)

तिमा's picture

6 May 2018 - 11:24 am | तिमा

गोष्ट खूपच आवडली. त्यावरुन एक विनोदी किस्सा आठवला.
मी गुजरातमधे नोकरीसाठी गेलो होतो. गुजराती भाषा, तेंव्हा नीट येत नव्हती. तरीही दिसणारी प्रत्येक पाटी वाचायचा अट्टाहास्/संवय लागली होती. एक दिवस स्कूटरवर जात असताना, पुढे चाललेल्या बसच्या मागे, वस्त्राप्रावरणांची जाहिरात होती. लिहिले होते, ' गमे मनने, फावे तनने". गुजराती लिपीशी परिचय नसल्याने, मी ते भलतेच वाचले. फावे हा शब्द गुजरातीत जसा लिहितात तो जाणकारांनी डोळ्यासमोर आणावा, म्हणजे फावे च्या ऐवजी मी काय वाचले ते तुमच्या लक्षांत येईल.
समझनेवालोंको इशारा काफी है!!!

जेम्स वांड's picture

6 May 2018 - 6:14 pm | जेम्स वांड

Crying Laughter

अनिंद्य's picture

7 May 2018 - 1:57 pm | अनिंद्य

:-) :-) :-)

नाखु's picture

7 May 2018 - 9:50 am | नाखु

मिळता मिळता प्रेमाचाच फापडा झाला !!!

अखिल मिपा लोच्या झाला रे संघाच्या "झोलझपाटा काव्य फुपाटा" या पाक्षिकातून साभार