सावधान ! आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे ...जागे व्हा आणि जागे रहा ..
प्रसंग पहिला.
एका तरूण मुलीच्या मागे चार ते पाच जण शाळेची बस घेऊन लागतात. ती मुलगी दुचाकी वरून कॉलेज मधून घरी येत असताना, तिचा पाठलाग करतात आणि बस आडवी घालून तिच्या दुचाकीचा अपघात घडवून आणतात. ती मुलगी जखमी होते . अगदी चित्रपटात घडते तसे दृश्य ...पण इथे खरे घडणारे ….त्या मुलीच्या जीवाचे काही बरे वाईट झाले नाही हे तिचे भाग्य. पण झाले असते तर ?
प्रसंग दुसरा.
एक दत्तक घेतलेली मुलगी . काळी सावळी. गोरी अजिबात नाही . तिच्या आईला ती गोरी व्हायला हवी आहे. कोण काय सल्ला देते तर कोण काय ? एक सल्ला. तिचे अंग काळ्या दगडाने घासा...आईच्या नावाला कलंक लावणारी बाई हे करून बघते ...त्या पोरीचे सगळे अंग सोलवटून निघते . वेदनेने तो ओरडू लागते ..
कोणीतरी शहाणी शेजारीण पोलिसांना बोलावते आणि या मुलीची सुटका होते.
प्रसंग तिसरा.
एक तरूण आपल्या आईला आणि सक्ख्या भावाला भोसकून मारून टाकतो . जवळजवळ ५० वेळा हा आपल्या आईला भोसकतो. त्याच्या मनाप्रमाणे त्याला मालमत्ता मिळाली नाही म्हणून.
प्रसंग चौथा.
एका आजारी आणि अंथरुणाला खिळून असणाऱ्या वयस्कर नाट्य दिग्दर्शिकाला देखभाल करण्यासाठी नियुक्त केलेला तरूण. या आजारी माणसाच्या वृद्ध पत्नीला डोक्यात एक जड वस्तू घालून मारून टाकतो .त्या या तरुणाला सारखे खायला देत नाहीत म्हणून …
फक्त उदाहरण म्हणून ह्या नुकत्याच घडलेल्या घटना ….
अजून अश्या किती असतील कुणास ठाऊक ?
अश्या कितीतरी घटना तुम्ही वाचल्या असतील. माझ्या मनात जे विचार आले तेच तुमच्या मनात आले असतील.
कोठून येतो हा इतका अमानुषपणा ? या आणि अश्या किती तरी बातम्या.सर्व समाजामध्ये हा क्रूरपणा वाढतो आहे का काही अपवादात्मक लोकांमध्ये हा अवगुण दिसू लागला आहे ?. मनुष्याचे जीवन इतके स्वस्त झाले आहे का ?
मी काही मानसशास्त्रज्ञ नाही किवा समाजशास्त्रीय विद्वान नाही पण या दोन्ही विषयांचा विद्यार्थी म्हणून मला जे जाणवले ते आपल्या समोर मांडतो आहे.
१.० या किंवा अश्या गुन्ह्यामागे मूळ कारण काय असावे ?
प्रत्येक गुन्ह्यामागे महत्वाच्या तीन कारणांपैकी एक असते असे म्हणतात . दारू,पैसा आणि स्त्री . वर दिलेल्या उदाहरणात सुद्धा यातीलच एक कारण सहज दिसून येते. पण एक दोन उदाहरणे सोडता हे सर्व गुन्हे पूर्व नियोजित पद्धतीने केलेले नसून ,तिथल्या तिथे क्षणिक रागाच्या भरात झालेले दिसतात. किवा या गुन्ह्यामुळे आपल्याला काय शिक्षा होईल आणि त्यातून कसे सुटू याचा सखोल विचार झालेला दिसत नाही . मला हे हवे आहे ..मग कोणत्याही मार्गाने ते मला मिळाले पहिजे ….. इतकाच विचार झालेला दिसतो ...किवा काय व्हायचे ते होऊ दे अशी बेफिकीर वृत्ती सुद्धा काही ठिकाणी दिसून येते.
ही तीन कारणे वर वर दिसत असली तरी या मागची मूळ कारणे(Root Causes) काय असावीत ?
ही मूळ कारणे शोधताना या ठिकाणी एक मूलभूत प्रश्न उपस्थित करायला हवा .
माणूस पहिल्यापासून असा क्रूर होता का आत्ताच तो असा झाला आहे ?
एक मतप्रवाह असा आहे कि माणूस हा मुळातच एक हिंस्र प्राणी आहे . पूर्वी सुद्धा अश्या घटना अश्याच घडत होत्या पण त्या आपल्यापर्यंत येत नव्हत्या इतकेच. आज मात्र आजकालच्या दूरदर्शन, भ्रमण ध्वनी ,आंतरजाल,वर्तमानपत्रे आणि इतर साधना मुळे अश्या घटना आपल्याला ताबडतोब समजत आहेत इतकाच फक्त फरक आहे.
श्री . अच्युत गोडबोले यांच्या “ मनात “ या पुस्तकाच्या प्रास्तविका मध्ये त्यांनी तेंडूलकरांच्या गिधाडे या नाटकाचे उदाहरण दिले आहे. त्यात तेंडूलकर एका मुलाखतीत असे म्हणतात कि पूर्वी गिधाडे मधील माणसातील हिंस्रपणा पाहून लोकांना धक्का बसायचा पण आता तसा धक्का बसत नाही ही तेंडूलकर यांच्या दृष्टीतून चिंतेची बाब होती. तेंडूलकर म्हणतात “ माणसे आता खरच एवढी क्रूर आणि गिधाडासारखी झाली आहेत का ?कि आता या नाटकात काहीच धक्कादायक (नसून त्याचे ) आश्चर्यही वाटेनासे झालय “
हाच प्रश्न मला आणि आपणा सर्वाना सुरवातीला दिलेले प्रसंग वाचून पडला असेल ! ( किंबहुना आपल्या सर्वाना तो प्रश्न पडावा आणि त्यातून काही उत्तरे सापडावीत म्हणून हा लेख !)
दुसरा मतप्रवाह असा आहे कि आजूबाजूच्या वातावरणा मुळे ,योग्य संस्कार न झाल्यामुळे किवा वाईट संगतीमुळे आणि पोट भरायची योग्य साधने उपलब्ध नसल्यामुळे माणूस कुमार्गाला लागतो .
माझ्यामते हे दोन्ही मतप्रवाह काही प्रमाणात बरोबर आहेत आणि यांचा एकत्रित विचार करायला हवा.
आता आपण पशू आणि मनुष्य यातील मूळ फरकाचा विचार करू.
पशु ,मनुष्य आणि देवत्व अशी उत्क्रन्ति होते असे सर्वसाधारण पणे मान्य केले गेलेले आहे.
म्हणजे काय ?
पशू कृती करतो पण या कृतीबद्दल तो जागरूक (Aware) नाही . कृती आहे पण जागरूकता नाही .
मनुष्य कृती करतो पण त्या कृतीबद्दल तो जागरूक असू शकतो . ही जागरूकता प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. ओशो तर असे म्हणतो कि मनुष्य हा ९९ % पशू असतो आणि १ % मनुष्य.
देवत्व गवसलेले आपल्या कृती बद्दल पूर्ण जागरूक असतात.
म्हणजे खरे तर असे आपण म्हणू शकतो कि जो आपल्या कृती बद्दल जागरूक नाही ..विवेक वापरून जर तो एखादी कृती श्रेयस नाही म्हणून नाकारू शकत नाही तो मनुष्य म्हणायच्या लायकीचा नाही .तो पशूच.
आपण एखादी कृती करतो म्हणजे नक्की काय होते आणि त्यात कुणा कुणाचा सहभाग असतो ?
२.० जेव्हा एखादे कृत्य माणूस करतो तेव्हा नक्की काय होते. ? यात अंतरमनाचा सहभाग किती असतो आणि बाह्यमनाचा किती असतो ?
The Wayward Mind by Guy Claxton.या पुस्तकात लेखक म्हणतो कि आपल्या मेंदू मध्ये प्रथम उर्मी निर्माण होते मग आपण त्या नुसार हालचाली करतो. एखाद्या व्यक्तीवर हल्ला करावा अशी उर्मी प्रथम आपल्या मेंदूत येते आणि मग आपण आपल्या हाताने किवा एखाद्या शस्त्राने त्या व्यक्तीवर हल्ला करतो. ज्याला पूर्व नियोजित हल्ला म्हणतात त्यात सुद्धा ही उर्मी प्रथम येते. मग त्यावर खूप विचार करून आणि योग्य संधी साधून हल्ला होऊ शकतो . तर काही वेळेला असे पूर्व नियोजन नसेल तर ही उर्मी लगेच प्रत्यक्षात आणली जाऊ शकते.
(In this book Claxton writes of experiments that prove our brains tell us
what to do before we consciously decide to do it. In one famous experiment
a neuroscientist named Benjamin Libet hooked people up
to an electroencephalogram (EEG) machine, which showed what
was happening in their brains. It revealed that a surge of brain activity
took place before the person had the conscious intention to do something,
suggesting that the intention came from the unconscious, and
then entered conscious awareness.)
लेखक असे सुद्धा सांगतो कि हि उर्मी आपल्या अंतरमनातून येते तर त्याची कार्यवाही हि बाह्यमनातून होते .
लिबेत नावाच्या शास्त्रज्ञाने असेही सिद्ध केले कि प्रत्यक्ष कार्यवाहीच्या आधी जवळ जवळ एक पंचमांश सेकंद आधी तुमच्या मेंदूत ते कार्य करायची उर्मी किवा इरादा प्रकट झालेला असतो.
आता इथे सर्वात महत्वाचा मुद्दा उपस्थित होतो . हा इरादा किवा उर्मी आपल्या मेंदूत कुठून येतो ? त्यावर कुणाचे नियंत्रण असते. म्हणजे आपण जर एखादे पुस्तक पुस्तकांच्या कपाटातून उचलतो तेव्हा प्रत्यक्षात आपल्या मेंदूतून एक संदेश येतो कि हे पुस्तक छान दिसते आहे हे मी उचलावे आणि मग आपले हात क्रिया करून ते पुस्तक उचलतात.
इथे आपण असे म्हणू शकतो कि माझ्या मनात ही पुस्तक उचलायची उर्मी आली हे मान्य पण मी ते पुस्तक उचलणार नाही . म्हणजे या अंतरमनाचा आदेश मी मानवा किवा नाही हे माझ्या हातात आहे पण मुळात हा अंतरमनात हा आदेशचा येऊ नये हे माझ्या हातात नाही .
आता परत त्याच प्रश्नापर्यंत आपण आलो पण एक नवीन फाटा आता दिसतो आहे. माझ्या मनात येणाऱ्या उर्मीवर मी म्हणजे माझे बाह्यमन आणि शरीर कार्यवाही करणार नाही असे मी केव्हा किवा कोणत्या परिस्थितीत ठरवू शकतो ?
आपण वर जे प्रसंग पहिले त्या लोकांच्या मनात सुद्धा पहिल्यांदा उर्मी त्यांच्या अंतरमनातून त्यांच्या मेंदूत आली आणि त्यानी त्यावर कार्यवाही केली . हे असे का घडले ? आपण करतोय ते चुकीचे आहे आणि ते करू नये असा निर्णय त्यांनी का घेतला नाही ? त्यावर ती उर्मी अयोग्य असताना सुद्धा कार्यवाही का झाली त्यांच्या हातून ?
ज्याला आपण स्वतंत्र विचार किवा free will म्हणतो ते त्यांना उपलब्ध नव्हते का ? त्यांची सद्सदविवेक बुद्धी जागृत नव्हती का ?
आणि नसेल तर ती का जागृत नव्हती ?
या प्रश्नाचे उत्तर अगदी सोपे आहे . असे विचार तुमच्या मनात आले तेव्हा तुम्ही जागरूक नव्हता. तुम्ही यांत्रिक हालचाली करत होता.
आपण फक्त असे म्हणतो कि माझा माझ्या मनावर ताबा आहे.फार क्वचित वेळा हे खरे असते.
खरे तर तुमच्या मनाचा तुमच्यावर ताबा असतो. मन सांगेल तसे तुम्ही वागता. किंबहुना आपल्या मनाविरुद्ध आपण वागू शकतो हेच आपण विसरून गेलो आहे.
तुम्हाला मधुमेह आहे हे माहित आहे ...गोड खाऊ नये हेही माहित आहे ...पण समोर लाडू आला ,किवा बर्फी आली वा अन्य तुमच्या आवडीचा पदार्थ आला कि तुम्ही तो खायचा मोह टाळू शकत नाही .
रमण महर्षी या बाबतीत असे म्हणतात ..” मनात वाईट विचार येणे अथवा न येणे आज आपल्या हातात नाही परंतु कृती मात्र आपल्या हातात आहे. आपण कृतीत चुकू नये आणि वाईट विचार आल्यास त्याकडे लक्ष देऊ नये. त्या विचारांच्या मागे जाऊन त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत; विचार येतील तसे जातील तिकडे लक्ष देऊ नये…”
पण मग ..असे म्हणावे का ? जर माणूस या उर्मी येतात तेव्हा जागरूक नसेल ...त्या क्षणात उपस्थित नसेल ( He is not there and then!) तर तो यांत्रिक पणे त्या उर्मी वर कार्यवाही करेल ...म्हणजे त्या क्षणी तरी तो पशू असेल ….
हे असे का होते आहे ?
३.० मनुष्य एक कळसूत्री बाहुली सारखा आहे का ? अंतरमनात येणाऱ्या उर्मी वर त्याचे नियंत्रण नाही ...पण त्या वर कार्यवाही करायचे किवा नाही हे नियंत्रण आहे पण ते तो वापरत नाही हे नक्की काय चालले आहे?
आजच्या सर्वसामान्य मनुष्याची काय अवस्था आहे ? आजकाल मनुष्य असा यांत्रिकपणे का वागतो आहे ?
आपल्या हिंदू शास्त्रामध्ये मनुष्य तीन अवस्था मध्ये सर्वसाधारण पणे वावरत असतो असे सांगितले आहे. जागृत अवस्था, निद्रा अवस्था आणि स्वप्न अवस्था.
पण आजचा मनुष्य जागृतावस्थेमध्ये तरी खरा जागृत असतो का हा प्रश्न उपस्थित करावा अशी सध्या परिस्थिती आहे. हाच प्रश्न थोडा बदलून आपण विचारू शकतो कि या जागृतावास्थेमध्ये तो जागरूक आहे का ? ( He may be awake but is he aware? ) आपण खालील प्रश्नांचा जरा विचार करू .
दारूच्या नशेत धुंद माणूस जागृतावास्थेमध्ये असेल पण तो जागरूक असतो का ?
एखादा माणूस गाडी चालवतो आहे पण त्याच वेळी भ्रमणध्वनीवर बोलतो आहे किवा text message करतो आहे तर तो गाडी चालवायच्या बाबतीत कितपत जागरूक आहे ?
बऱ्याच हॉटेलमध्ये दिसणारे दृश्य . लहान मुले किवा बरीच तरूण मंडळी भ्रमणध्वनीवर बोलत किवा चाट करत किवा एखादा चित्रपट किवा चित्रफीत पहात जेवत असतात ...आपण काय जेवत आहोत याची त्यांना नंतर आठवण तरी असते का ?
सिगारेट ओढणे हे आपल्या आरोग्यास अपायकारक आहे असे त्या सिगारेटच्या पाकिटावर लिहून सुद्धा किती तरी तरूण तरुणी अजूनही या व्यसनाधीन होत आहेत हे जागरूक नागरिक म्हणायचे का ?
एखाद्या व्यक्तीवर हल्ला होत असताना सभोवतालचा समाज आपल्या भ्रमणध्वनीवर शुटींग करत असतो पण ती घटना होऊ नये म्हणून तो काय करतो ?
किती तरी तरूण तरुणी दारू आणि मादक द्रव्यांच्या प्रभावाखाली हॉटेलात धिंगाणा घालतात त्यांना आपण त्या वेळी काय करतोय याचे भान असते का ?
यातून एकच निष्कर्ष सहज काढता येतो . जागरूकतेचा पूर्ण अभाव.
४. ही जागरूकता आपण आणू शकलो नाही तर त्याचे काय काय परिणाम होतील ? किवा होत आहेत ?
ही जागरूकता आज आपण आणू शकलो नाही याचे परिणाम आज आपल्या समोर आहेत .
ही जागरूकता लहानपणी योग्य संस्कार करून आई वडिलांनी ,शिक्षकांनी आणि नंतर तरूण वयात त्या व्यक्तीने स्वतःच्या प्रयत्नांनी गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली वाढवावी लागते.
आज हे होत नसल्याने किवा फारच थोड्या ठिकाणी अपवादाने होताना दिसत असल्यामुळे मनुष्य पशूच राहतो आहे आणि आपण वर जे प्रसंग पहिले आणि तश्याच अनेक घटना घडताना दिसत आहेत ..नव्हे त्या वाढतच जाणार आहेत.
याला अजून एक भयावह पैलू आहे. पशू नेहमी कळप करून राहतात. हे असे समविचारी (विचारी कसले ? अविचारी ) मनुष्यात लपून बसलेले पशू आपल्या सारख्या लोकांना ...आपल्या सारखेच वर्तन करणाऱ्या लोकांना एकत्र करून त्यांचे कळप बनवत आहेत आणि शिक्षण ,राजकारण ,न्याय व्यवस्था , वर्तमानपत्रे ,दूरदर्शन आणि सरकारी कार्यालये या सर्व ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करत आहेत आणि पुढेही करत राहणार आहेत ..यांचा नारा एकच …. आम्हाला सामील व्हा नाहीतर तोंड काळे करा …..
जर एखादा नेहमी शांत असलेला मनुष्य एकदम रागावला किवा एकदम खूप हिंसक झाला तर बऱ्याच वेळा आपण म्हणतो ,”काय याच्या अंगात कली संचारला का ?” या वाक्यात आपल्याला वाटते त्या पेक्षा जास्त सत्यता आहे. थोडक्यात त्या माणसाचे नेहमीचे व्यक्तिमत्व झाकाळून जाते आणि एक वेगळेच व्यक्तिमत्व बाहेर येते…..
हे त्याच्या अंगात काय संचारते ? मी वर जे प्रसंग लिहिले आहेत त्या सर्वांच्या अंगात हा कली संचारला होता ...त्या काळा पुरता तरी असे आपण म्हणू शकतो .
हे मानसशास्त्राप्रमाणे शक्य आहे ? का ही अंधश्रद्धा आहे ?
“मी विचार करतो” असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्या विचारांवर माझा ताबा आहे असे गृहीत असते . पण खरे तर बऱ्याच लोकांच्या बाबतीत हे असत्य आहे. तुम्ही विचार करत नाही ..विचार तुमच्यात प्रवेश करतात. मी पचन करतो ...मी रक्ताभिसरण करतो या विधानामध्ये जितकी सत्यता आहे तितकीच सत्यता मी विचार करतो या विधानांत आहे. बऱ्याच लोकांचे विचार हे अपोआप उद्भवणारे आणि उगीचच पुन्हा पुन्हा मनात प्रवेश करणारे आणि ज्याचा काहीही उपयोग नाही असे मानसिक निरूद्देश आवाज असतात.
बरेच लोक या आवाजाच्या अमलाखाली असतात. हा आवाज ..हे विचार त्यांना ग्रासून टाकतात
प्रसिद्ध लेखक आणि अध्यात्मिक विचारवंत Eckhart Tolle आपल्या A New Earth या पुस्तकात असे म्हणतो ...
“The voice in the head has a life of its own. Most people are at the
mercy of that voice; they are possessed by thought, by the mind. And since
the mind is conditioned by the past, you are then forced to reenact the past
again and again. The Eastern term for this is karma. When you are identified
with that voice, you don't know this, of course. If you knew it, you would no
longer be possessed because you are only truly possessed when you mistake
the possessing entity for who you are, that is to say, when you become it.
For thousands of years, humanity has been increasingly mind possessed”
म्हणजे ..हा कली आहे ..तुमच्या आणि माझ्या सुद्धा मनात जिवंत आहे आणि आपण आपल्या सभोवती जे क्रौर्य पाहतो ..युद्ध पाहतो ...ते या कली मुळेच जिवंत आहे. हा कली आपल्या मनात आहे आणि आपल्या अवतीभोवतीच्या सामाजिक मनात सुद्धा आहे. समाजपुरुषाच्या मानसिकतेत ही आहे.
हा जर जिवंत असेल तर त्याचे खाद्य काय ? आणि हा नेमका कुठे लपून बसतो आणि तो बाहेर कसा येतो ?
प्रसिद्ध लेखक आणि अध्यात्मिक विचारवंत Eckhart Tolle आपल्या A New Earth या पुस्तकात या कलीला वेदना कोष (Pain Body) असे म्हणतो . ह्याचे वैयक्तिक रूप असते तसेच सामाजिक सुद्धा असते. तुमच्या उर्जा क्षेत्रात( Energy Field) याचा निवास असतो . निराशा वादी भावना ज्या तुम्ही अंतरमनात दाबून टाकता आणि ज्या तुम्ही पूर्णपणे स्वीकारत नाही ...अश्या भावनांमधील वेदना या वेदना कोषात पडून राहतात .जसे वैयक्तिक वेदनाकोषा मध्ये वैयक्तिक वेदना साचून राहतात तश्या सामाजिक वेदना कोषामध्ये ( समाजपुरुषाच्या वेदना कोषात )समाजातील अगणित लोकानी भोगलेल्या वेदना ,त्रास साचून राहतात. या वेदना कोषाचे खाद्य म्हणजे नकारात्मक विचार ...निराशावादी भावना … वेदना आणि दुखः तुम्ही निराशावादा कडे सारखे झुकत असाल तसेच जर तुम्हाला दुखःमय भावना खूप हव्या हव्याशा वाटत असतील तर तुम्ही वेदना कोषाच्या प्रभावा खाली आहात असे म्हणता येईल .
जर तुम्ही या वेदना कोषाच्या प्रभावा खाली असाल तर परत परत तुमच्या जखमा उकरून काढून आपल्या वेदना कुरवाळीत बसाल ….
जर तुम्ही जागरूक नसाल ( If you are not absolutely present किवा aware ) तर हा वेदना कोष तुमच्या मनाचा कब्जा घेईल आणि तुमच्या मनात परत परत निराशाजनक विचार आणेल आणि वेदना देणारे अनुभव घ्यायला तुम्हाला प्रवृत्त करेल.
मग तुम्ही दुसऱ्यावर अत्याचार करून त्याला शारीरिक वा मानसिक वेदना देत रहाल किवा आपल्या स्वतःला वेदना देत रहाल .
साध्या सरळ शब्दात या वेदना कोषाचे वर्णन करायचे असेल तर …. दुखःमय भावनांचे व्यसन !
( Mr. Tolle says ….: The pain-body is my term for the accumulation of old emotional pain that almost all people carry in their energy field. I see it as a semi-autonomous psychic entity. It consists of negative emotions that were not faced, accepted, and then let go in the moment they arose. These negative emotions leave a residue of emotional pain, which is stored in the cells of the body. There is also a collective human pain-body containing the pain suffered by countless human beings throughout history. The pain-body has a dormant stage and an active stage. Periodically it becomes activated, and when it does, it seeks more suffering to feed on. If you are not absolutely present, it takes over your mind and feeds on negative thinking as well as negative experiences such as drama in relationships. This is how it has been perpetuating itself throughout human history. Another way of describing the pain-body is this: the addiction to unhappiness.)
हा वेदना कोष जर पूर्वापारपासून असेल तर आत्ताच याची दखल कशाला घ्या ?
आजच्या समाजात जागरूकता कमी आहे म्हणून .
५.० आजचे पकडले गेलेले गुन्हेगार हे वेदना कोषाच्या पूर्ण आहारी गेलेले खुले कली आहेत ...छुपे कली किती तरी जास्त आहेत !
वेदना कोषाला वेदना आवडतात . निराशावादी भावना हव्या हव्याशा वाटतात. दुसऱ्याला दुखः द्यायला आणि स्वतः सोसायला आवडते. काहीतरी कारण काढून दुसऱ्याशी भांडण करायला आपला अमानुषपणा दाखवायला आणि दुसऱ्याला वेदना ..शारीरिक आणि मानसिक द्यायला आवडते. क्रौर्य पहायला आणि अनुभवायला आवडते. या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवून त्यांना ही आपल्यासारखे करायला आवडते.मुष्टियुद्ध ...मुक्या जनावरांना भाल्याने टोचून जखमी करणारे खेळ पाहायला आवडते ...ते अश्यावेळी बेफान होतात.
अश्या लोकांना कळप तयार करायला आवडते सम अविचारी लोकांचा. मग हे लिखाण असेच करतात ..बातम्या अश्याच देतात ...चित्रपट असेच काढतात ...मारामारीचे ..एकमेकांना गोळ्या घालून मारण्याचे खेळ तयार करतात. लहान मुलांच्या कोवळ्या मनावर असेच संस्कार होत राहतात. त्यांच्या मनात या विश्वाची ही अशीच कल्पना तयार होते. मग या कळपाला हेच पहायला आणि ऐकायला आवडते. हे सर्व आवडणारे लोक आहेत म्हणून हे तयार करणारे लोक निर्माण होतात ... हे दुष्ट चक्र मग असेच चालू राहते.
मग फक्त पहायचे कशाला ? करून पाहायला काय हरकत आहे ? आभासी दुनियेतून सत्य दुनियेत मग सहज प्रवेश होतो.
दूरदर्शनवर क्रिकेट बघणाऱ्या लोकांना बऱ्याच वेळा गल्लीबोळात आपणही क्रिकेट खेळावे असे वाटते ….अगदी तसेच
चित्रपटात अदाधुंद गोळीबार करणारा खलनायक पाहून शाळेतील निरागस मुलांवर गोळीबार करणाऱ्याची मानसिकता कदाचित अशीच असेल का ? मलातरी तसे वाटते.
असे कली संचारलेले क्रूरकर्मा मग अनेक प्रकारचे गुन्हे करायला लागतात. हे सर्व आवडणारे याला वर्तमानपत्रात ...दूरदर्शनवर ...अंतरजालावर पुन्हा पुन्हा प्रसिद्धी देतात….पुन्हा नव्या छुप्या कलींचा मार्ग मोकळा करतात ...त्यांना छुपे प्रोत्साहन देतात.
मग आपण या लेखाच्या सुरवातीला सांगितलेले प्रसंग पुन्हा पुन्हा घडतात ….त्यांना पुन्हा प्रसिद्धी मिळते ….हे दुष्टचक्र सुरूच राहते…..
वेदना कोष वाढत राहतो ...आपल्या विळख्यात आणखी लोकांना घेत राहतो . साऱ्या समाजात जणू मग कली संचारतो ...
दुसऱ्याला वेदना देऊन आनंद मिळवणारी एक वेगळी जमात ..एक वेगळा कळप निर्माण होतो
६.० यावर उपाय काय ?
मुख्य उपाय तीनच. हे सरळ आहेत पण सोपे अजिबात नाहीत .
वेदना कोषाचे सकारात्मक विचारांपुढे काही चालत नाही . त्याचा पुरस्कार करा. गणपती अथर्वशीर्षामध्ये सांगितले आहे तसे …..
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।
मतितार्थ ...हे परमेश्वरा आमच्या कानांनी जे शुभ आहे तेच ऐकावे ..आमच्या डोळ्यांनी जे शुभ आहे तेच पहावे .
या प्रार्थानेप्रमाणे सकारात्मक वर्तन करावे. नकारात्मक गोष्टी समोर येताच डोळे मिटून घ्यावेत .. कान बंद करावेत…..
लहान मुलांवर सकारात्मक संस्कार करा . त्यांना लहानपणापासून योग आणि ध्यान ( Meditation..). शिकवा ...प्राणायाम शिकवा ….. त्यांना जास्तीतजास्त जागरूक कसे करता येईल हे पहा. प्रसिद्ध लेखक आणि अध्यात्मिक विचारवंत Eckhart Tolle आपल्या A New Earth या पुस्तकात असे म्हणतो ...वेदना कोषाशी सलग्नता तोडायला हवी . आपल्या मनात येणाऱ्या नकारात्मक भावना या वेदना कोषातून येत आहेत आणि त्या माझ्या नाहीत हे ओळखायला हवे. ही अशी जागरूकता आली कि वेदना कोषाच्या प्रभावापासून तुम्ही लांब जाता. अश्या लोकांची संख्या वाढली की सामाजिक वेदानाकोष हळू हळू कमी प्रभावी होतो. तो पूर्णपणे नष्ट होणार नाही ...काही लोकांवर त्याचा प्रभाव पडेल सुद्धा पण त्यांची संख्या कमी कमी होईल. कलीचा संचार जागरूक लोकांमध्ये होत नाही हे कायम लक्षात ठेवले पाहिजे ..
जागरूकता( awareness) तर हवीच पण जर योग्य अयोग्य याचा विवेक नसेल तर त्याचा प्रभाव कमी होईल . म्हणून लहानपणापासून मुलांवर योग्य संस्कार हवेत. आई वडील आणि शिक्षकांचे हे संयुक्त काम आहे. मुले शाळेत जायला लागल्यावर तर शिक्षकांचे जास्त. पण त्या साठी हा शिक्षणाचा बाजार बंद झाला पाहिजे. राष्ट्र रक्षणाचे काम करणाऱ्या सेनेत जसे शिस्त आणि क्षमता महत्वाची ...तसे राष्ट्र संवर्धनाचे काम जिथे होते त्या शिक्षण पध्दतीत ही यालाच महत्व देऊन शिक्षक तयार केले पाहिजेत. . शिक्षण हे पैसा उपसायच्या खाणी नसून तरुणांना तावून सुलाखून राष्ट्राचे सुजाण नागरिक करायचे यज्ञ कर्म आहे हे समजणारे या पेशाला पूजा समजून काम करणारे पात्र शिक्षक या क्षेत्रात यायला हवेत . प्राथमिक शिक्षणापासून हे योग्य संस्कार झाले पाहिजेत. आपल्या राष्ट्राची मुले आणि मुली कायम जागरूक आणि सुसंस्कारित झाली पाहिजेत . मग समाजातील आज सगळीकडे दिसणारी अमानुषता खूप कमी होईल .
गुन्हेगारांना कठोर शिक्षा विलंब न लावता देणे आणि ती कमीत कमी वेळात अमलात आणणे हे तर हवेच पण मुळात गुन्हे आणि ते ही अमानुष गुन्हे होऊच नयेत या साठी संस्कार आणि जागरूकता खूप महत्वाची आहे.
सगळीकडे पसरलेला हा क्रौर्याचा अंधार नष्ट करायचा असेल तर जागरूकतेचा दिवा लावणे हा एकच मार्ग मला तरी सध्या दिसतो आहे.
थोडक्यात काय?... तर जागे व्हा ...आणि जागे रहा !
************************************************************************************************
जयंत नाईक
प्रतिक्रिया
26 Apr 2018 - 1:11 pm | manguu@mail.com
छान लेख. व्हाट्सपवर देत आहे.
26 Apr 2018 - 1:16 pm | Jayant Naik
कृपया माझ्या नावासकट फोरवर्ड करावा. जरूर करा.
26 Apr 2018 - 6:31 pm | manguu@mail.com
या लेखाची मिसळपाव लिंक फॉरवर्ड केली आहे.
27 Apr 2018 - 10:32 am | Jayant Naik
आपल्या सहकार्याबद्दल आभारी आहे. मला हा लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत जायला हवा आहे. विचारांची देवाण घेवाण होऊन आपण आपल्यापरीने यातून मार्ग काढला पाहिजे
26 Apr 2018 - 1:21 pm | डॉ सुहास म्हात्रे
पूर्वी सुद्धा अश्या घटना अश्याच घडत होत्या पण त्या आपल्यापर्यंत येत नव्हत्या इतकेच. आज मात्र आजकालच्या दूरदर्शन, भ्रमण ध्वनी ,आंतरजाल,वर्तमानपत्रे आणि इतर साधना मुळे अश्या घटना आपल्याला ताबडतोब समजत आहेत इतकाच फक्त फरक आहे.
+१
आणि त्याच सहज उपलब्ध असलेल्या माध्यमांमुळे गुन्हे सहजी बाहेर येऊ शकतात
त्याच सहज उपलब्ध असलेल्या माध्यमांचा गुन्ह्यांविरुद्ध शिक्षण व गुन्हेप्रतिबंधक दबाव आणण्यासाठी सकारात्मक उपयोग होऊ शकतो.
26 Apr 2018 - 2:19 pm | Jayant Naik
गुन्हे मुळातच होऊ नयेत आणि इतके अमानुष तर अजिबात होऊ नयेत ...या साठी काय करावे ? या प्रश्नाला हात घालण्याचा एक नम्र प्रयत्न. आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.
26 Apr 2018 - 2:31 pm | श्वेता२४
खूपच अभ्यासपूर्वक लिहलेला चिंतनीय लेख आहे. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या
26 Apr 2018 - 2:32 pm | जूलिया
आपल्या समाजात\घरात 'snatching' आणि शक्ती-प्रद्रशन न बोलून महत्वाचे घटक आहेत. समानता हा फक्त शब्द आहे. घरातही समानता \respect खूप कमी असते - भावापेक्शा बहिण कमी, जास्ती शिकलेला\कमवणारा भाउ महत्वाचा etc.
+ शक्तीवान लोकानी काहीही केलेले चालत हि मानसिकता, त्यामूळे असे गुन्हे घडत असावेत.
26 Apr 2018 - 2:47 pm | अनिंद्य
@ जूलिया,
सहमती.
ओरबाडणे हे तर आहेच, समाजात 'राग' सुद्धा फार मोठ्या प्रमाणात आहे.
अगदी क्षुल्लक कारणांमुळे लोक बिथरतात, प्रचंड शिविगाळ, मारामारी करतात. बदला घेण्यासाठी / रागाच्या भरात खून वगैरे पुढची पायरी असावी.
27 Apr 2018 - 10:45 am | Jayant Naik
समाजातील क्रौर्य वाढते आहे हे दिसतच आहे. वेदना कोषाचा एक घटक आहे.... असमतोल किवा असंतुलित प्रतिसाद. साध्या साध्या कारणावरून खुनापर्यंत मजल जाते आहे. हे सर्व लोक माझ्या मते वेदना कोषाच्या अमलाखाली असतात. काही दिवसापूर्वी आपल्या गाडीला overtake केले याच्या रागातून पुढे गेलेल्या गाडीच्या चालकाचा खून केला असा प्रसंग वाचण्यात आला. कारण काय आणि प्रतिसाद काय ?
26 Apr 2018 - 2:32 pm | जूलिया
छान लेख!!!!!!!
26 Apr 2018 - 2:46 pm | अनिंद्य
@ Jayant Naik,
विचार करायला लावणारा लेख.
समाजात वाढत्या अपराधांमागे भरपूर कारणे असतील पण ते आवाक्यात आणण्यासाठी 'जलद निष्पक्ष तपास आणि कठोर शिक्षेची खात्री' हाच सर्वोत्तम उपाय वाटतो. हे करणे अवघड असले तरी अशक्य नाही.
अनिंद्य
26 Apr 2018 - 2:53 pm | माहितगार
नमस्कार , धागा लेखाचे वाचन चालू करतोय (माझ्या पद्धतीने ), काही जाणवलेल्या मत आणि शंका एक एक करुन मांडतोय
१) मी कुठेतरी या धाग्याच्या शीर्षकाशी आणि शेवटाशी जुळणारे काहीसे लिहिले, तेव्हा समोरची व्यक्तीचे म्हणणे असे पडले कि क्रौर्य अद्याप संपले असे नक्कीच म्हणता येत नाही पण ज्ञात इतिह्साची प्रत्येज १०० वर्षे आपण मोजत आज वर आलो तर हिंसा आणि क्रौर्याचे प्रमाण कमी होत गेलेलेच दिसते. हिंसा आणि क्रौर्याबद्दल संवेदनशीलता वाढल्यामुळे क्रौर्य वाढल्यासारखे वाटत असेल आणि मानव जागृत असेल तर येत्या काही शतकार हिंसा आणि क्रौर्य संपण्याची नक्कीच आशा करता येऊ शकेल .
26 Apr 2018 - 2:55 pm | माहितगार
सहमत !
26 Apr 2018 - 2:56 pm | माहितगार
कसे ?
29 Apr 2018 - 10:55 am | Jayant Naik
मी स्वतः शिक्षण तज्ञ नसल्यामुळे यावर भाष्य करत नाही. बऱ्याच वेळा आपल्याला कुठे जायचे ते माहित असते पण कसे जायचे ते नसते ...तोच प्रकार.
26 Apr 2018 - 3:00 pm | माहितगार
मी रोज शुभम करोती कल्याणम दिवसातन किमान एकदा मनातल्या मनात म्हणतो , (माझ्या प्रमाणे म्हणणारे महाराष्ट्रात बरेच असतील ) त्यात शेवटी 'शत्रु बुद्धी विनाशाय' हे शब्द रोज म्हटले जातात कळतात पण वळत नाही. मी प्रांजळपणे कबूल करतो हे म्हणणे सोपे आहे तेवढे करणे सोपे नाही असाच अनुभव इतर बर्याच जणांचा असेल तर अमुक असे व्हावे म्हणणे ठिक पण कृतीत कसे आणावे यावर इथे भाष्य दिसत नाही .
29 Apr 2018 - 11:04 am | Jayant Naik
मी ज्या तीन मार्गाबद्दल शेवटी सांगितले आहे तिथेच मी सांगितले आहे कि हे सोपे नाही . आपण शुभंकरोती म्हणता ...योग्यच करता. माझ्या मते याचा आपल्या अंतरमनात प्रवेश होतो . त्यामुळे हिंसात्मक उर्मी जरी आल्या तरी आपल्याकडून त्यावर कार्यवाही होत नाही . आपण सिंहावलोकन करून पहा ...आपण कितीवेळा हिंसात्मक कारवाई केली आहे? पूर्णतः अश्या उर्मीच्या आहारी जाऊन ? आणि तेही सबळ कारण नसताना ?
26 Apr 2018 - 3:02 pm | माहितगार
ते केल्या नंतर या लेख लिहिण्यास प्रयोजनच राहीले नसते ? :) हे जरा आणखी नेमके पणाने मांडता किंवा उलगडता येईल का ?
29 Apr 2018 - 11:30 am | Jayant Naik
जे व्हायला हवे ते होत नाही म्हणून तर अश्या घटना घडतात. the critical mass जर नकारात्मक गोष्टींकडे तटस्थ पणे पाहायला शिकला तर अश्या गोष्टीना अतीव महत्व देणारे कमी होतील ...वेदानाकोषाला बळी पडणारे कमी होतील ...पूर्ण नाहीसे होणार नाहीत ...
Albert Eliss हा एक ए..बी..सी मोडेल मांडतो . घटना घडते. त्याचा आपण आपल्या मनात अर्थ लावतो ..त्यावर आपली भावनिक प्रतिक्रिया होते आणि त्या प्रमाणे आपली क्रिया होते. यात सगळ्यात महत्वाची गोष्ट घटनेचा आपले मन काय अर्थ लावते ही आहे. हा अर्थ जर बदलू शकलो ...आपला दृष्टीकोन कसा अविवेकवादी आहे हे दाखवून ...अशी सवय लावून तर आपण आपली क्रिया बदलू शकतो. काही दिवसापूर्वी मी एक पुस्तक परीक्षण केले होते. The Noticer या पुस्तकाचे. त्यात हाच मुद्दा होता. दृष्टीकोन बदला ...वर्तन बदलेल. डोळे मिटून घ्यावेत ...कान बंद करावेत म्हणजे दृष्टीकोन बदलावा.
26 Apr 2018 - 3:10 pm | माहितगार
मुदलात पटले , गौतम बुद्धांचा दु:ख टाळण्याचा विचार वेगळ्या मार्गाने मांडला आहे का ? पण दुखा:चे व्यसन टाळणे खरेच म्हणावे तेवढे सोपे आहे का ? लेखात खाली दिलेले उपाय पुरेसे वाटत नाहीत . कारण काही वेळा ईप्सित साध्य हॉई पर्यंत मानवी मन थांबतच नाही . मला वाटते इतर मानसशास्त्रीय पर्यायाम्चाही सोबत विचार होण्याची आणि काही समस्या मुदलातून सोडवण्याचीही गरज असावी.
26 Apr 2018 - 3:40 pm | माहितगार
७. १ वर्तणूकीत सभ्यता असलेले अनेक लोकांना कदाचित आपल्या देवत्व संकल्पने बद्दल सहमती अवघड जाऊ शकेल का अशी प्रथमदर्शनी शंका वाटते.
७.२ कुणालाही देवत्व बहाल करुन व्यक्ती पूजा -आणि पुढे शब्द पूजा -- कराव्यात का ? या बद्दल साशंकता वाटते . आजीबात स्खलनशील नसलेले व्यक्तीमत्व अशी काही शक्यता असू शकते का ? (याचा अर्थ आदर्श मानण्यावर अथवा श्रद्धेवर आक्षेप आहे असे नाही) चिमूटभरमिठाची साशंकता न ठेवता केल्या जाणार्या व्यक्ती आणि शब्द पूजांबद्दल साशंकता वाटते.
७.३
पशु आणि मनुष्य अशा तुलनेस हरकत नाही तरीही , उपरोक्त वाक्याच्या वैज्ञानिक वस्तुनिष्ष्ठते बाबत प्रथमदर्शनी साशंकता वाटते .
७.४)
मनुष्य कृती करतो पण त्या कृतीबद्दल तो जागरूक असू शकतो . ही जागरूकता प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. ओशो तर असे म्हणतो कि मनुष्य हा ९९ % पशू असतो आणि १ % मनुष्य.
मनुष्य कृती करतो पण त्या कृतीबद्दल तो जागरूक असू शकतो . ही जागरूकता प्रयत्नपूर्वक वाढवावी लागते. हे ठिक पण ओशोंच्या विधानावर बर मग ह्या लेखाचे प्रयोजन संपले नाही ना , असा विनोदी विचार येऊन गेला . अॅक्चुअली ओशोंना मनुस्।य ९९ % स्खलनशील असतो म्हणजे त्यांना कदाचित व्यक्ति पूजा त्या मांडणी पुरती नाकाराय असावी तर ठिकच.
७.५ ) देवत्व गवसलेले आपल्या कृती बद्दल पूर्ण जागरूक असतात.
याला काही आधार ? आणि जागरुक असून अयोग्य कृती केल्यातर त्याचे काय ? आदर्श शद्धा असावेत पण टिका न करता येणारे देवत्व बहाल करणे या बद्दल जराशी साशंकता वाटते. ( मग ततवज्ञान, पंथ धर्म कोणतेही असू द्यात )
७.६) ..विवेक वापरून जर तो एखादी कृती श्रेयस नाही म्हणून नाकारू शकत नाही तो मनुष्य म्हणायच्या लायकीचा नाही .तो पशूच.
काही अमानुष केले आणि पशू असे विशेषण लावले तर खूप हराकत नाही, पण विधानात भावनेच्या आवेशातील सरसकटता नाही ना ? - आणखी वजन वाढू नये म्हणून वजनदार व्यक्तीने आईस्क्रीम खाणे टाळावे पण विनोदापलिकडे जाऊन तेवढ्यासाठी पशू म्हणावे का या बद्दल साशंकता वाटते - या विधानाबाबत दुसरी मुख्य शंका उर्वरीत लेखाती वेदना कोषातून बाहेर पडण्याच्या आवाहनास कुठे छेदतर देणार नाही ना अशी आहे ? कारण एकदा तुम्ही समोरच्याला पशू म्हटले की पशूवत न्याय देताना स्वतःचे मनुष्यत्व विसरु शकता आणि तुम्ही म्हणता तसे कलीचे कालचक्र चालू रहाते किंवा कसे ? किंवा असे होऊ नये म्हणून तुम्ही कोणती उपाय योजना सुचवता ?
27 Apr 2018 - 1:23 pm | Jayant Naik
पशू म्हणजे काय ? जो देह बंधनात बांधलेला आहे तो . खरे तर मनुष्याला अती पाशवी पशू म्हणायला हवे. पशू जर वेडा नसेल तर आपल्या भुकेसाठी आणि फक्त त्या वेळीच हत्या करतो . मनुष्य तर केव्हाही आणि आपल्या असुरी आनंदासाठी हे शिकार करतो . मनुष्य आणि पशू यात फरक एकच . धर्माचरण. जो योग्य गोष्टी करतो .
आहार निद्रा भय मैथुनं च
सामान्यमेतत् पशुभिर्नराणाम् ।
धर्मो हि तेषामधिको विशेष:
धर्मेण हीनाः पशुभिः समानाः ॥
हा मनुष्य जर जागरूक नसेल तर हा कसे धर्माचरण करणार ? ऐथे धर्म म्हणजे योग्य आचरण अपेक्षित आहे. आज धर्म या नावाखाली जे चालते ते अपेक्षित नाही .
26 Apr 2018 - 3:47 pm | माहितगार
या विधानात दुरुस्तीस वाव असावा असे वाटते. विशीष्ट पुरुष प्राप्त व्हावा म्हणून स्त्रीयाही अनपेक्षीत गोष्टी करु शकत असाव्यात . पैसा ठिकच . दारूचा मी समर्थक नाही , पण दारू पिणारे सर्वच लोक गुन्हे करतात अथवा वाईट असतात असे जर चित्र उभे करण्याचा प्रयत्न असेल तर जराशी शंका वाटते पण अर्थात , दारूच्या आहारी गेल्या नंतर बर्ञाच जणांचे भान सुटू शकते हे मान्य आहे पण दारुच्या आहारी गेला म्हणून चूक घडली असे घदलेल्या चूकीचे वावगे समर्थन यातून होऊ शकते ते वस्तुनिष्ठ नसावे .
आणि या विधानात सत्तेच्या आकर्षणाचा महत्वाचा मुद्दा सुटला आणि व्हिलन म्हणून सत्तेपेक्षा दारूस अधिक महत्व मिळाले असे वाटले असो.
26 Apr 2018 - 5:14 pm | पुंबा
अगदी अगदी..
27 Apr 2018 - 10:59 am | Jayant Naik
मुळात जेव्हा हा वाकप्रचार जेव्हा रूढ केला गेला ( Three W. Wine,Women and Wealth) तेव्हा कदाचित हे असे गुन्हे बाल्यावस्थेत असावेत. किवा त्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष केले असेल. पण धर्म या नावाखाली कत्तली झाल्यात त्या सर्वात जास्त असाव्यात. तसेच त्वचेचा रंग . बरीच कारणे आहेत . पण मुद्दा हा नाही . या कारणांच्या मागे असलेल्या व्यक्तीची मानसिकता काय असावी ? त्याच्या मनामध्ये काय उर्मी येत असाव्यात आणि त्या का येत असाव्यात आणि या किवा अश्या लोकांनीच या उर्मीवर कार्यवाही का केली असेल ? त्यांची सदसदविवेकबुद्धी जागृत का नव्हती ...? या प्रश्नांचा विचार मला करावासा वाटला.
26 Apr 2018 - 3:51 pm | माहितगार
कुठे कुठे फटी नाहीत ना असे वाटले म्हणून फट अन्वेषणाचा मोह पूर्ण केला , बाकी लेखाचा उद्देश चांगला वाटला शुभेच्छा.
27 Apr 2018 - 12:06 am | आनन्दा
पार थंडगार पडलो, आधी लेख वाचून, आणि नंतर तुमची चिरफाड बघून.. कसं जमतं हो तुम्हाला हे असं?
27 Apr 2018 - 8:50 am | माहितगार
घडलय बिघडलय नावची मी पाहिलेली सिरीयलचे शीर्षक तेवढे आठवले.
जेव्हा लेखन वाचणे अवघड जाते आणि इतर मंडळी गुण्या गोविंदाने वाचतात ते पाहून आधी अंमळ अपराधी वाटते, मग लेखकाचा राग नाही, स्वतः च्याच बुद्धूपणाचा राग येतो की आपल्याला पुढे पुढे वाचत का जाता येत नाही मग चक्क एक एक ओळ मागच्या दिशेने पॉईंट बाय पॉईंट वाचत जातो .
27 Apr 2018 - 8:57 am | माहितगार
किंवा शंकेखोर मनाचा दोष म्हणा हवे तर हाकानाका
29 Apr 2018 - 11:33 am | Jayant Naik
ते एक जिवंत पणाचे लक्षण आहे.
29 Apr 2018 - 1:36 pm | माहितगार
__/|__ वेळ काढून प्रतिसाद देताय या बद्दल आभार
27 Apr 2018 - 12:32 am | प्रसाद गोडबोले
आपला समाज ?
आपला म्हणजे नक्की कुठला ?
मी तर बुवा मुक मोर्चाला गेलो नाही , कुठे दगडफेक केली नाही , कुठं घोषणा दिल्या नाहीत , कुठं मुंबईवर टोळधाड काढली नाही , ना कर्जमाफ्या मागितल्या ना आरक्षण, कुठं भारतबंदच आवाहन केलं नाही , कोणत्या चित्रपटाला विरोध केला नाही , सोवळे पाळले नाही आणि पाळतात त्यांच्याविषयी आकांदतांआडवही केले नाही, भारत तेरे तु़कडे होंगे म्हणले नाही , अन तसे म्हणणार्यांचा निषेधही केला नाही .
ना व्हॉट्सअॅप्प मेसेज फोरवर्ड केले , ना फेसबुकी चळवळी चालवल्या ! आमचा झेंड्याचा रंग ना भगवा ना पांढरा ना हिरवा ना निळा ! आमच्या झेंड्याचा रंग हंड्रेंड परसेंट ट्रान्स्परंट प्लास्टीकी !
३१ मार्चला फॉर्म सोळा आला की गपगुमान टॅक्स फाईल करुन जी.एस.टी पेक्षाही वाढीव सेल्सटॅक्स भरलेली बियर पित उद्वेग काढणार्यांच्या समाजातले आम्ही ! हँगओव्हर उतरला कि परत कामाला रुजु !
तुका म्हणे उगी रहावे | जे जे होईल ते ते पहावे ||
27 Apr 2018 - 8:44 am | माहितगार
:) मार्कस एकदम धमाल मूड मध्ये आहेत, काय बाते, आज तुमचे सगळीकडचे प्रतिसाद भन्नाट मनोरंजन करतील असे दिसत:), पु.प्र.अ.प्र (पुढील प्रतिसादांच्या अत्यंत प्रतिक्षेत)
27 Apr 2018 - 11:55 am | Jayant Naik
The only thing necessary for the triumph of evil is for the good men to do nothing.
Edmund Burke.
27 Apr 2018 - 9:43 am | माहितगार
संस्कार, प्राणायम, योग, ध्यान यांच्या ओव्हर ऑल ऊपयूक्तते बाबत सहमत पण, त्याने घागा लेखक उल्लेख करत असलेली वेदनाकोषाशी संलग्नता कितपत तुटते ? ; एक उदाहरण देतो माझा हा एक धागा मिपावरील चर्चा लेख आहे त्यातील सकारात्मक संकल्पनेला विविध प्रतिसादातून जो विरोध दिसतो तो मुख्यत्वे अध्यार्हूत वेदनाकोशामुळे असण्याची शक्यता वाटते, यातील किती जणांनी प्राणायम, योग, ध्यान केला असेल माहित नाही पण यातील सकारात्मक मांडणीस विरोध करणारी मंडळी आपण म्हणता तसे संस्कारी आणि प्राणायम, योग, ध्यान संस्कृतीचा आदर करणारी आहेत . किंवा अगदी रोज प्राणायम, योग, ध्यान करणारी मंडळी आणून त्यांच्या समोरही हा सकारात्मक प्रस्ताव ठेवला तर हजारातील ९९९ तरी अडखळतील असे वाटते .
मला वाटते वेदना कोषाला भावनिक क्लोजरची गरज असते भावनिक closure ची व्याख्या ऑक्सफर्ड इंग्लिश डिक्शनरी नुसार A feeling that an emotional or traumatic experience has been resolved. अशी आहे . आणि त्यासाठीची मांडणी मी या धाग्यातून केली विस्तार भयास्तव ते इकडे घेत नाही. सांगण्याचा मुद्दा हा कि वेदनाकोशाच्या परिमार्जनासाठी संस्कार, प्राणायम, योग, ध्यान गोष्टी उपयुक्त आहेत पण तेवढेच पुरेसे आहे का या बद्दल साशंकता वाटते.
27 Apr 2018 - 12:25 pm | Jayant Naik
मी आज पुन्हा त्या चर्चा धाग्याला भेट देऊन आलो. त्यावर आणि त्याला का विरोध होतो याची चर्चा हा थोडा वेगळा विषय आहे. प्रथम आपल्या अभ्यास पूर्ण प्रतिसादाबद्दल आभार. मी काही या विषयातील विद्वान नाही. अभ्यास करणारा आहे. आपल्या मुद्द्यावर जसा वेळ मिळेल तसे आपण चर्चा करू. मुळात वेदना कोष हा तुमच्या अधायात्मक प्रगतीमधील एक टप्पा आहे. आपण म्हणता तो closure चा मुद्दा बरोबर आहे. पण त्यामुळे वेदानाकोषात भर पडत नाही . पण सामाजिक वेदानाकोष किवा तुमच्यामध्ये असलेल्या वेदानाकोष या पासून कशी सुटका करून घ्यायची ? Mr. Tolle या वेदना कोषाच्या पाशातून सुटण्याबद्दल असे म्हणतात
"The beginning of freedom from the painbody lies first of all in the realization that you have a painbody.
Then, more important, in your ability to stay present enough, alert enough, to notice the painbody in yourself as a
heavy influx of negative emotion when it becomes active. When it is recognized, it can no longer pretend to be you and live and renew itself through you.
It is your conscious Presence that breaks the identification with the painbody.
When you don't identify with it, the painbody can no longer control your thinking and so cannot renew itself anymore by feeding on your thoughts. The painbody in most cases does not dissolve immediately, but once you have severed the link between it and your thinking, the painbody begins to lose energy. Your thinking ceases to be clouded by emotion; your
present perceptions are no longer distorted by the past. The energy that was trapped in the painbody then changes into vibrational frequency and is transmuted into Presence. In this way, the painbody becomes fuel for consciousness. "
27 Apr 2018 - 3:49 pm | माहितगार
याची व्यक्ती अथवा समुहास आठव्ण करुन दिली जाते की पण टोल्लेंच्या "...When you don't identify with it.., " इथेच तर गोची होते , मला किंवा माझ्या समुहाला अमुक गोष्ट खुपते आहे . आता पुढच्या क्षणापासून त्या खुपण्याशी identify करु नका म्हणणे कसे शक्य आहे ? किंवा कित्पत प्रॅक्टीकल आहे कारण माझी माझ्या समूहाची मूळ तक्रार अद्याप शाबूत आहे . कारण टोले म्हणतात तसे तेवढे सोपे असते तर तुम्हाला क्रौर्याबद्दलचा आणि जागते रहो वगैरेची आवाहने करवीही लागली नसती . असे मला वाटते .
27 Apr 2018 - 9:46 am | चौथा कोनाडा
अभ्यासपूर्वक चिंतनीय लेख !
तुमच्या नावासह कायप्पावर ढकलत आहे!
27 Apr 2018 - 2:05 pm | आनन्दा
https://en.wikipedia.org/wiki/Thinking,_Fast_and_Slow
27 Apr 2018 - 4:22 pm | arunjoshi123
अर्थातच लेखकाचा उद्देश तसा नसावा. पण लेख दिशाभूल करणारा झाला आहे.
================================
मानवामधे कोणताही भौतिक, रासायनिक वा जैविक बदल झालेला नाही जेणेकरून त्याचे क्रौय वाढावे. मनुष्य हा मूलतः एक सम्यक प्राणी आहे ही धार्मिक शिकवण धर्म बाजूला ठेवल्यानं तशास तशी देता येत नाही हे आधुनिक काळाचं दुखणं आहे. पण अशा शिकवणीच्या अभावी देखील मनुष्य तितकाच सम्यकतेने वागण्याचा प्रयत्न करत आहे.
१. मनुष्याच्या क्रौयाच्या जगभराच्या कहाण्या माध्यमांमुळे ऐकता येत आहेत.
२. मनुष्यांची संख्या वाढली असल्याने घटनांची संख्या वाढली आहे. एक ऐवजी ५० डजन आंबे आणले आणि २ ऐवजी ३० आंबे नासके निघाले तर आंब्यांची प्रत घसरली आहे असे होत नाही.
३. जिवनशैली पिढीगणिक बदलत आहे. काय योग्य याची दृढ प्रस्थिपित संकल्पना समाजात नाही.
४. लेखात जोडलेला जैविकतेचा संबंध प्रचंड हास्यास्पद आहे. असे सबंध स्वीकारत गेलो तर अंततः मेंदूतल्या रसायनांना दोष आणि न्यायलयीन शिक्षा देत बसावे लागेल.
27 Apr 2018 - 5:16 pm | Jayant Naik
अतिशय क्षुल्लक कारणांनी ( Triggers) गुन्हे होत आहेत आणि ते अतिशय क्रूर पद्धतीने होत आहेत हा मुद्दा आहे. गुन्ह्यांची संख्या हा मूळ मुद्दा नाही . अर्थात सर्वाना हे मान्य व्हावे अशी माझी अपेक्षा नाही . याच्या मागे काही वेगळे कारण कुणाला सुचत असेल तर ते समजून घ्यायला मला आवडेल . माध्यमांचा हात यात आहेच मी ते मान्य केलेच आहे.
27 Apr 2018 - 6:14 pm | arunjoshi123
काही गुन्हे अत्यंत क्षुल्लक कारणांनी होत असतात. त्यांचे प्रमाण सिरियस कारणाच्या गुन्ह्यांपेक्षा वाढले आहे असं म्हणायचं कारण काय?
अधिक क्रौय म्हणजे काय? मला वाटतं कि किमान या पिढ्यांत आधुनिक आणि धार्मिक असे दोन्ही शांततेचे संस्कार असल्याने गुन्ह्यांचे क्रौय कमीच असावे. पुढच्या पिढीचं माहीत नाही.
-------------------
माध्यमांमुळे जास्त डिटेल्स कळतात. जास्त रिलायेबल वाटतात. पण इतिहासात असं क्रौय कमी होतं असं कसं म्हणता येईल? उलट आज कमी लोकांकडे खूप धन आहे आणि जास्तीत जास्त लोकांचे जीवन प्रचंड धकाधकीचे आहे. तरीही लोक अकोमोडेटीव आहेत.
28 Apr 2018 - 9:59 am | Jayant Naik
Dr. Gary Slutkin जे साथीच्या रोगांवर काम करतात ...त्यांचे असे म्हणणे आहे कि हिंसा हि साथीच्या रोगा सारखी पसरत जाते. त्यांनी नकाशावर प्लॉट करून असे सिद्ध केले कि हिंसेच्या घटना या एकाच प्रकारच्या आणि एकाच परिसरात पसरत जातात.
https://en.wikipedia.org/wiki/Cure_Violence
त्यांनी हि संस्था स्थापली आहे. मला यात वेदना कोषाचा सहभाग निश्चित दिसतो.
आज बहुतेक लोक आत्मकेंद्रित झाले आहेत. धन आहे ...सुखसोयी आहेत पण दुसऱ्याचा विचार फक्त आपला फायदा करून घेण्यासाठी होतो.
माध्यमामुळे जास्त माहिती कळते तसेच त्याच प्रकारे वागायला दुसऱ्याला प्रोत्साहन हि मिळते. माझा मुद्दा फक्त इतकाच आहे कि यांत्रिकपणे जगत असण्यामुळे मनात येणाऱ्या उर्मीवर कार्यवाही लगेच होते ....त्याचा योग्य अयोग्य हा विचार होत नाही .
29 Apr 2018 - 10:31 am | मंदार कात्रे
सहमत
अभ्यासपूर्ण लेख . सहमत .
29 Apr 2018 - 4:12 pm | Jayant Naik
नुकताच वरील लेख वाचनात आला. यात लेखकाने क्रोर्यावर फार सुरेख भाष्य केले आहे ....ते म्हणतात
"एवढी हिंस्त्रता एकाएकी येत नाही. आज नव्वद—पंच्याण्णव टक्के घरांत या हिंस्त्रतेचा रियाज साग्रसंगीत करुन घेतला जात आहे. ना घरात प्रार्थना ! ना घरात एखाद्या सामाजिक सेवेची साधना ! ना घरात ग्रंथवाचन ! ना पुस्तकाचं समृध्द कपाट ! ना व्याख्यानांना जाणं ! ना उत्तम संगीत ! फक्त संगणक, मोबाईल, व्हाँटसअप ते एसएमएस आणि रस्त्याच्या कडेला उभं राहून खाणं आणि हीसुध्दा नशा कमी म्हणून की काय, मैत्रीची सरहद्द ओलांडणार्या मजेनं सर्वनाशाची पूर्वततयारी करणं ! जीवनाची ओढ नाही म्हणून मरणाचं भय नाही !
जगलो काय न् मेलो काय, इतका बेफिकीरपणा वाढत चालला तर कुठली कर्माची महासत्ता येणार ?
आधी प्रतिष्ठापना हवी सुसंस्कृततेची, मानव्याची !संपूर्ण विकसित माणूसपणाची !"
मी जी लिंक म्हणतो आहे ती हीच ....जागरूकता....संस्कार ....सुसंस्कारित पिढी .....कमी क्रौर्य ....कमी गुन्हे ....
29 Apr 2018 - 11:25 pm | बिटाकाका
जर लेखातील क्रौर्याची उदाहरणे बघितली तर त्यांना डोळ्यासमोर ठेवून खरंतर उलटं चित्र दिसत आहे. इतिहासातील नुसत्या कौटुंबिक हिंसेच्या प्रकार आणि संख्या दोन्हीचा विचार केला तरी लक्षात येईल की आधी क्रौर्य जास्त होते आणि ते नक्कीच कमी होताना दिसतेय.
---------------
लेखातील उत्तरर्धाशी नक्कीच सहमत!! छान लेख!!
30 Apr 2018 - 1:01 am | डँबिस००७
Jayant Naik , छान लेख ,
गेले कित्येक दिवस हाच विषय "आपल्या समाजातील क्रौर्य वाढत आहे" मनात घोळत होता.
माझ्या मनातल्या विचारांची व्याप्ती तुमच्या लेखा मध्ये दिलेल्या ईतकी मोठी नाही. मानस शास्त्र हा तर माझा विषय सुद्धा नाही.
माझ्या मनात आलेल्या विचारांच मुळ आहे , क्राईम पेट्रोल , सावधान ईंडीया हे दोन प्रोग्राम !
ह्या दोन्ही प्रोग्राम मध्ये वारंवार सांगत असतात की क्राईम नेव्हर पेSSSSज !! कदाचीत शाळेतुन हेच शिकवल पाहीजे. संस्कार लहानपणा पासुन व्हायलाच हवेत, पण संस्कार म्हंटल की काही लोकांच्या मनात धर्म येतो आणि माशी शिंकते !!