दुष्मनांचा जोर आहे वाढलेला यारहो
जीव माझा आरशावर भाळलेला यारहो
बोर जिथल्या गावची तिथलीच बाभळ अंगणी
संग काट्यांचा मलाही भावलेला यारहो
पिंड कुठल्या वासनांचा राहिला मागे इथे?
कावळ्यांनी दंभ माझा टाळलेला यारहो
ती म्हणाली सोड तू जमणार नाही आपले
मी दुरावा मस्तकावर माळलेला यारहो
कोण तो वेडा भिकारी रोज हाका मारतो
प्राक्तनाने आरसा मज दावलेला यारहो
एकदा केसात वेडे वीज तू माळून बघ
बोल मग श्रृंगार मीही टाळलेला यारहो !
हंस कुठला? कोण कागा? वाद भलते वाढले
मी पुरावा सुज्ञतेचा जाळलेला यारहो
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा
दोर परतीचा तसाही कापलेला यारहो
© विशाल वि. कुलकर्णी
प्रतिक्रिया
15 Mar 2018 - 1:01 pm | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,
15 Mar 2018 - 2:54 pm | अत्रुप्त आत्मा
व्वाह,पढते पढते कव्वाली लगने लगी। मजा आया।
15 Mar 2018 - 4:21 pm | माहितगार
व्वा व्वा , आवडली
15 Mar 2018 - 7:28 pm | पुंबा
जबरदस्त!!
बहोत खूब!!
16 Mar 2018 - 11:51 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी !
17 Mar 2018 - 1:46 pm | मदनबाण
अप्रतिम...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Counting Stars [Lyrics] :- OneRepublic
21 Mar 2018 - 10:15 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद मंडळी .
21 Mar 2018 - 4:02 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
वि कु.. क्या बात!!
22 Mar 2018 - 10:39 am | गवि
विकुशेठ, मस्त ग़ज़ल.
इथे पहा:
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा
दोर परतीचा तसाही मी कापलेला यारहो
हा "मी" घातल्यास मीटरपूरक वाटेल का?
आगाव सूचनेबद्दल क्षमस्व..
22 Mar 2018 - 10:43 am | गवि
नाही. वेटेज बदलल्यास मूळ रचनेतही मीटर मेंटेन करता येतोय. उगीच वाटलं.
22 Mar 2018 - 10:43 am | प्रचेतस
मीटर म्हणजे काय? ते कसे मोजतात?
22 Mar 2018 - 10:46 am | गवि
ओ तुम्ही लेणी पहायला जा पाहू..
22 Mar 2018 - 10:55 am | प्रचेतस
:(
22 Mar 2018 - 11:04 am | गवि
जाहीर माफी मागत आहे.
माझ्या म्हणण्याचा प्रसारमाध्यमांनी विपर्यास केला आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा होता की नवनवीन लेण्याना भेटी देऊन अधिकाधिक नवनवे अभ्यासपूर्ण लेख वाचकांस मिळत राहावेत.
आय अपोलोगाईझ.
-ग.वि. केजरीवाल
22 Mar 2018 - 6:00 pm | प्रसाद गोडबोले
मीटर म्हणजे वृत्त रे !
इथे गालगागा गालगागा गालगागा गालगा हा मीटर आहे !
23 Mar 2018 - 8:09 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद गवि !
तुम्ही सांगितलेला बदल केलास वृतभंग होइल, कारण मग दोन मात्रा वाढतील आणि अक्षरगणाची रचना बदलेल>
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा
दोर परतीचा तसाही कापलेला यारहो
गालगागा गालगागा गालगागा गालगा
यात अजुन एक मी जोडायचा म्हणजे 'गालगागा गालगागागा गालगागा गालगा' असे होइल, त्यामुळे वृत्तभंग होतो, लयही चुकते कारण मात्रा चुकताहेत.
हवे तर असे करता येइल..
एकट्याने झुंजताना कैफ चढतो आगळा
दोर परतीचा स्वतः मी कापलेला यारहो
मनःपूर्वक आभार !
21 Mar 2018 - 10:57 pm | नाखु
जबराट
दोरायनी नाखु
21 Mar 2018 - 11:29 pm | पिवळा डांबिस
अतिशय आवडली.
सगळीच कडवी (शेर) मस्त आहेत त्यामुळे कुणा एकाचा उल्लेख करत नाही.
सौ साल जियो!
23 Mar 2018 - 8:11 am | विशाल कुलकर्णी
धन्यवाद नाखुशेठ आणि पिडांकाका _/|\_