श्रीदेवीच्या आणि आमच्या वयात तसं बर्यापैकी अंतर होतं. आम्ही महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत श्रीदेवीचा 'मिस्टर इंडिया' आणि (आपल्या) माधुरीचा 'तेज़ाब' येऊन गेले होते. त्यामुळे तिच्या घडलेल्या 'जुदाई'मुळे आम्हीं जरी हळहळलो असलो, तरी त्याचा फारसा 'सदमा' आम्हांला पोहोचला नाही आणि जखम भळभळली नाही.
नव्वदीत श्रीदेवीला सोडून (किंवा धरून) अनिल कपूरनं (आपल्या) माधुरीला हिरॉईन केलं याचा मात्र राग आम्हीं मित्रा-मित्रांमधे चांगलाच आळवला / चघळला होता. एकीकडे श्रीदेवीचे 'लम्हें', 'खुदागवाह',लाडला' वगैरे बघणं न थांबवता... अगदी 'रूप की रानी चोरों का राजा' देखील!
याउलट शाळेत असताना 'हिम्मतवाला', 'तोहफा' आणि 'जांबाज़' यांतली फक्त गाणीच आमच्या कानी पडली होती. तरीही 'आजची आघाडीची नायिका कोण?' या प्रश्नाचं उत्तर 'श्रीदेवी' असं डोळे झाकून देता येत होतं. त्या नावाचा उच्चार करताना एक कुतुहलवजा भीती वाटायची. इतर नायिकांची नावं त्यामानानं साधी होती, त्यांसारखी नावं इतर मुलींची असू शकायची. 'रेखा' नावाची आमच्या वर्गातच एक सुकन्या होती (सुंदर खासी किंवा सुबक ठेंगणी नसली तरी), तर 'हेमा' नावाची शेजारी एक कुत्री होती. (हे विनोदासाठी लिहिलं नाहीये, खरी गोष्ट आहे. 'हेमा, माझ्या प्रेमा' हे गाणं लागलं की ती उठून भुंकायला लागायची!) 'जयाप्रदा'जरी थोडंसं वेगळं वाटलं तरी 'जया', 'जयू', जयश्री' (शांतारांमांची किंवा गडकरांची) ही नावं ओळखीची होती. अगदी चित्रपटांशी ज्यांचा संबंध नाही त्यांनाही 'सबकी पसंद निरमा' मधून त्या नावांची सबक मिळाली होती. पण 'जया अंगी मोठेपण' असं म्हणता येईल त्या 'श्रीदेवी' नावाचं मात्र कुणी दुसरं भूतलावर असेल असा विचारही कधी मनात आला नाही.
अखेर अकरावीत आम्ही मुंबईला हॉस्टेलात राहायला लागलो आणि त्या एकमेवाद्वितीय श्रीदेवीच्या दर्शनासाठी 'चांदनी'चा समय जुळून आला. यश चोप्रांनी या तारकेचं ते स्वर्गीय स्थान अबाधित ठेवण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न आता आम्ही उघड्या डोळ्यांनी पाहिला. (आपली) माधुरी ही अलीकडेच 'सुपरस्टार' झाल्यामुळे श्रीदेवीचं वर्चस्व आम्हांला उघडपणे मान्य करायला जरा कसं-नुसं व्हायला लागलं होतं; पण तरीही 'चालबाज़' कोण आहे हे आम्हांला चांगलंच कळत होतं.
नोकरीला लागलो आणि श्रीदेवीच्या लग्नाची बातमी आली. तेव्हां मात्र आमचे सिनिअर सहकारी भडकले होते. रोज दादर ते डोंबिवली या प्रवासात अजूनही त्यांना दिवास्वप्नात श्रीदेवी दिसत असे. चित्रपटात हिरो अनिल, मात्र लग्न बोनीशी?... बोनी कपूर यांनी लग्नाची बोनी तर आधी एकदा केली होती, मग आता ते श्रीदेवीशी पुनः लग्न करण्याची अनहोनी करूच कशी शकतात हा त्यांचा (बाह्यतः) प्रश्न होता. (अंतःस्थ दु:ख बहुधा त्यापेक्षा आम्ही काय वाईट होतो हे असावं.) शिवाय, माधुरीच्या मागचा अनिल कपूरचा ससेमिरा चुकणार नाही याचं वैषम्य होतंच. त्यातच संजय कपूरनंही तिच्याबरोबर एक चित्रपट काढून घेतला होता. त्यामुळे ह्या श्रीदेवीच्या दीरांची लक्षणं काही खरी नाहीत, माधुरी जरा जपून - असाही एक अनाहूत निरागस (किंवा पुलंनी म्हटल्या प्रमाणे माफक रागस किंवा आगस) सल किंवा सल्लाही त्यात होताच. (खरं तर अनिल आणि संजयही शादीशुदा होते; पण ही बाब महत्त्वाची आहे का नाही, हा संशय बोनीच्या उदाहरणामुळे सावध झालेल्या आमच्या मनात सारखा येत होता.)
गंमत म्हणजे या सगळ्या गडबडीत श्रीदेवी, माधुरी आणि कपूर इ. मंडळींची काय मतं आहेत, त्यांच्या आयुष्यांबद्दल तेही काही ठरवू शकतात वगैरे प्रश्न आम्हांला पडत नसत! अखेर (आपल्या) माधुरीनं अनिल कपूरची 'पुकार' न ऐकता डॉ. श्री. नेने यांच्याशी विवाह केला, श्रीदेवीलाही मुलं-बाळं (मुली-बाळी - थोरलीचं नाव जान्हवी आणि धाकटीचं खुशी - ) झाली आणि आम्हीही आमच्या वरिष्ठांसोबत कंपनीचा नफा कसा वाढवता येईल याचा विचार करत आयुष्य कंठायला लागलो.
तसं कुणाचंच काही फारसं बिघडलं नाही. सर्वजण आपापली वाट चोखाळत होतो. आमच्या पुढच्या उमेदवार पिढीला चर्चा करायला काजोल आणि करीना कपूर मिळाल्या (हे कपूर आणि ते कपूर वेगळे). आम्हीही त्यांच्या चर्चेत सामील व्हायचो - खोटं का बोला? पण आता निष्ठा बदलल्या होत्या.
यानंतर जवळ-जवळ पंधरा वर्षांनी अचानक श्रीदेवी हे नाव पुनः ऐकू आलं ते 'इंग्लिश-विंग्लिश' मुळे. आम्ही सहकुटुंब सहपरिवार तो चित्रपट बघितला. कालांतरामुळे (म्हणजे वय झाल्यामुळे?) एक जुनी आठवण जागी झाल्याचा सुखद-सुंदर अनुभव आम्हांला आला. अर्थात, आम्हांला हे वाटण्यात काही विशेष नाही. पण, अगदी मुलांनीही एका घरातल्या व्यक्तीचाच चित्रपट बघावा अशा थाटात तो चित्रपट बघितला आणि श्रीदेवी काय चीज आहे (चुकलो - होती...) हे आमच्या लक्षात आलं.
श्रीदेवीचा तरुणपणीचा आवाज एकदम फोडणी घातलेल्या गरमागरम मसालेदार सांबारासारखा होता. या चित्रपटात तो साध्या वरणासारखा साजूक वाटला. (असाच अनुभव आम्हांला सचिन तेंडुलकरला त्याच्या 'अ बिलियन ड्रीम्स' मधे त्याच्या वडिलांची मराठी कविता म्हणताना ऐकलं होतं तेव्हा आला होता.) शिव-हरींना तर तिच्या आवाजात गायिकाही दिसली होती. (चालायचंच, आम्हांलाही भन्साळींमधे इतिहास-संशोधक दिसला होता.)
हिंदी सिनेमानं अखेर कात टाकली, आणि 'मैं तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा' असं फुत्कारणार्या श्रीदेवीला एक सामान्य व्यक्ती म्हणून बघता आलं. नाही तर हनी इराणीची कथा असलेल्या 'लम्हे' पासून ते जुनी पुराणीच कथा असलेल्या 'गुमराह' पर्यंत तिनं केलेल्या भूमिकांमधून ती एक नटी म्हणूनच लक्षात राहिली असती.
दर्शकांची आवड बदलली; पण बदलली नाही ती मनोवृत्ती. 'सदमा' हा शब्द ऐकला की आम्हांला दोनच गोष्टी आठवतात. एक - श्रीदेवी/ कमल हसनचा 'सदमा' (आणि त्यातलं 'ऐ ज़िंदगी गले लगा ले' हे इलाय राजाचं सुंदर गीत) आणि दुसरी - जगजीत / क़ातिल शिफाईची ग़ज़ल -
'सदमा तो हैं मुझे भी की तुझसे जुदा हूं मैं
लेकिन ये सोचता हूं के अब तेरा क्या हूं मैं'
वास्तविक दोघांमधे 'सदमा' शब्द सोडला तर काही फारसं साम्य नाहीये. (चित्रपटाच्या शेवटी कमल हसनला हा प्रश्न पडला असेल का?) मात्र श्रीदेवीच्या मृत्यूनंतर झालेल्या मिडिया-सोशल मिडिया वापरणार्यांच्या चर्चा आणि चर्वितचर्वणं ऐकून 'तेरा क्या हूं मैं' हा प्रश्न कुणालाच का पडत नाही असं वाटायला लागलं. किंबहुना श्रीदेवी मेल्याचं दु:ख यांना नाही, फक्त सोकावलेला काळ त्यांना हवा आहे अशीच धारणा त्यातून दिसली.
पाय घसरून पडायला बाथ-टबच लागतो असंही नाही आणि तोल ढळायला दारू प्यावी लागते असंही नाही. कित्येकदा असं विनाकारण बहकलेल्या लोकांचीच जास्त धास्ती वाटते मनाला.
कुसुमाग्रजांनी या वृत्तीवर 'नको क्षुद्र शॄंगार तो दुर्बलांचा, तुझी दूरता त्याहुनी साहवे' असं म्हटलं होतं, तर पाडगावकरांनी 'तुम्ही मला सांगा, तुमचं काय गेलं' असं या नाक-खुपश्यांना टोचलं होतं.
श्रीदेवीनं तर जग सोडलं आहेच; पण त्या सोडलेल्या जगानं तरी अजून तिला कुठे मुक्त केलंय?
- कुमार जावडेकर
प्रतिक्रिया
5 Mar 2018 - 4:18 pm | manguu@mail.com
छान
5 Mar 2018 - 4:27 pm | पैसा
चर्चा, चरवितचर्वण काही होवो, एक जीव हकनाक गेलाय. सुनंदा पुष्करला न्याय मिळणार नाही असं वाटतंय. त्या यादीत अजून एक नाव जमा झालं. विचित्र गोष्टी समोर दिसत असताना फाईल्स बंद कशा होतात काही कळेना.
5 Mar 2018 - 5:40 pm | प्राची अश्विनी
अगदी. बाथटबमध्ये पडून कुणी मरत नाही.
5 Mar 2018 - 5:30 pm | तिमा
पैसाताईंशी सहमत. पण, हीच घटना भारतात घडली असती तर बोफोर्सची चौकशी जितक्या वेळा झाली तितक्या वेळा या घटनेचीही चौकशी झाली असती आणि त्यानंतरही (नक्की काहीच सापडत नाही म्हणून सीबीआयने) ती फाईल बंद केली असती.
5 Mar 2018 - 5:40 pm | प्राची अश्विनी
लेख सुंदर झालाय.
5 Mar 2018 - 5:42 pm | माहितगार
छान लिहिलत
5 Mar 2018 - 6:19 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
मस्त जमलाय लेख रे कुमार.तिचा अपघाती मृत्यु नाही हे माहित आहे. आत्महत्या केली असावी असा अनेकांचा संशय आहे. खरे तर हॉटेलमधील त्या वेटरला विचारले तर केस एका दिवसातच बंद होईल. असो.
नंबर १ कोण? श्रीदेवी की माधुरी? असे प्रश्न १९८८ ते ९४ ह्या काळात चर्चिले जायचे.
5 Mar 2018 - 6:58 pm | जेम्स वांड
श्रीदेवीनं तर जग सोडलं आहेच; पण त्या सोडलेल्या जगानं तरी अजून तिला कुठे मुक्त केलंय?
हे कमाल जमून आलंय