मन करा थोर!

समयांत's picture
समयांत in जनातलं, मनातलं
21 Feb 2018 - 3:57 pm

'कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, चंद्र व्हा हो पांडुरंगा, मन करा थोर' ह्या प्रसिद्ध नाट्यपदातील शब्द आहेत 'मन करा थोर!'.

आपण मनोव्यापारातले नाविक आहोत, कोलंबसाने मनोमन 'भारता'ला चंद्र बनवले होते, ध्यास घेतला होता आणि पूर्ण जगाला वळसा घालून त्याने मनाने थोर आहे, हे सिद्ध केले होते. तसेच आता 'सत्त्वा'ला चंद्र बनवून स्वतः चकोर बनत संपूर्ण आकाशगंगेत आपल्याला गरुडभरारी घ्यायची आहे, थोर मनाची व्याख्या पुन्हा नव्याने लिहायची आहे. विश्व आता पृथ्वीपुरता सीमित राहिलेले नाही.

हे सत्व सत्व आहे तरी काय नेमके? ते मनाने माणूसपण जपण्यात आहे. कुण्याच्या दुखःला कमी करण्यात आहे, आहे ते मान्य करण्यात, सत्यात आहे तरी हे माणूसपण आपल्याला उमजलं आहे का? माणूसपण कशात आहे? दिवसभराच्या यथेच्छ खादाडीत? की रात्रीच्या किर्र अंधारातल्या संभोगात? भरजरी कपडालत्त्यात? की बेभान तालाच्या धुंदीमध्ये? आळवलेल्या अनवट सुरांमध्ये? अमूर्त चित्रांच्या रेषांमध्ये? रेखीव शिल्पांच्या नजाकतीमध्ये? व्याकरणशुद्ध भाषेत? मौक्तिकसुंदर लिपींमध्ये? बहरलेल्या फुलांमध्ये? चमचमत्या तारकांमध्ये? जगभर हुंदडण्यात? की निर्वात पोकळीत लावलेल्या ध्यानात? नैराश्याच्या गर्तेत? कैवल्य आनंदात? निर्विकार समाधानात? की तान्ह्यांच्या जन्मांमध्ये? की विकलगात्र मृत्यूत? नाही यांत नाही तर या सर्वांमध्ये आपल्यासोबत कुणी नसले, एकंच एक एकटेच असलो तर माणूसपण नाही, तर दोन पावलं सोबत चालण्यात, आणि दोन क्षण सोबत जगण्यात माणूसपण आहे. प्रेमासाठी आसुसलेल्या दोन जीवांनी सोबतीने परत एकंच एक होण्यात माणूसपण आहे.

त्या माणूसपणाच्या जोरावर विश्वाची व्याप्ती समजून घ्यायला पुन्हा पुन्हा आपण जन्म घेत आहोत. आपल्यातल्या अभिव्यक्तीला पूर्ण रुपामध्ये आणण्याला,आणि यथोचित न्याय द्यायला सर्व विश्व सतत एकजूट व्हायला लागले आहे आणि पुढे आणखी जवळ येत राहणार आणि त्यात आपल्याला आपलं प्रतिबिंब दिसणार आहे. हे असणं आपलं असणं आहे हे मान्य करणे 'सत्त्व' आहे, असून तसं न दाखवणे, नसून तरी तसं दाखवणे, अन्यथा काहीना काही दाखवत आपलं 'सत्त्व' मान्य न करणे आज घडीला व्यर्थ ठरत आहे. मर्दुमकी तिथेच आहे जिथे ती असायला हवी, ना की जिथे दाखवायला हवी.

आताच्या समाजावर अतिवेगाने पुढे जाण्याच्या स्पर्धेत सगळ्या घडामोडींवर खुल्या अभिव्यक्तीची गदा आली आहे, आज गुगलने शौचालयापर्यंतची माहिती साठवून चिकित्सा करायला सुरूवात केली आहे. धर्म, अर्थ आणि मोक्ष आज पूर्णपणे एक्स्पोज्ड झाले आहेत, तिथे अजूनही चारही पुरुषार्थात सर्वांत सुंदर आणि सृजनशील असलेला काम पुरुषार्थ बंद दाराआडसुद्धा कुजबुजत उच्चारला जातो, कामशास्त्र असा जिथे यथार्थ ग्रंथ लिहिला जातो, तिथे त्याच समाजात बलात्काराचे थैमान माजले आहे. कामभावना, लैंगिक कल हे खुलेआमपणे तरी नाही पण पाठ्यक्रमातसुद्धा यायला जिथे वाद होत आहेत, तिथे हे 'सत्त्व' पणाला लागले आहे. बलात्कार, घटस्फोट, लैंगिक शोषण, आत्महत्या आणि बंद दाराआडची अनैतिक अराजकी हालचाली या सर्वांच्या मुळाशी आपले हे 'काम'वर काहीही न बोलणे आहे. कोणतेच काम पूर्ण होत नाही असे हे 'काम' आहे, मराठीत काम हा शब्दसुद्धा त्याच्याच एवढ्या महत्तेने आलेला आहे. किमानपक्षी ढोबळमानाने भिन्नलिंगी, उभयलिंगी, समलिंगी असे लैंगिक कल आणि पुरुष, स्त्री, तृतीयपंथी अशी लिंगओळख आपल्यापैकी किती जणांनी समजून घेतलेली असेल, आणि कामशास्त्रामध्ये फक्त संभोग करण्याचे धडे आहेत असा गैरसमज बाळगणारे कितीजण आज समाजात आहे, अशी विरुद्ध टोकाची परिस्थिती आज समाजात आहे.

भिन्नलिंगी पुरुष आणि स्त्री यांची आज समाजात मक्तेदारी दिसून येते, पण तसेच खरे 'असणे' आहे का? नाही तर असे काही उभयलिंगी, समलिंगी आहेत की जी ही मक्तेदारी स्वीकारून स्वतःला भिन्नलिंगी पुरुष अथवा स्त्री म्हणवून घेतात. का? का तर आपले हेच 'काम'वर काहीही न बोलणे. समलिंगी किंवा या मक्तेदारीच्या प्रवाहाविरुद्ध आपल्यात काही वेगळे असल्याची जाणीव झाली की तरंच अश्यांना 'काम'वर, कामभावनेवर, लैंगिक कलावर आणि लिंगओळखीवर लक्ष घालावे लागते, समजून घेण्यासाठी धडपडत राहावे लागते, अन्यथा भिन्नलिंगी पुरुष आणि स्त्री आजन्म सर्व करून सवरून, अपत्यप्रजनन करूनसुद्धा या कामभावनेचा ब्र देखील उच्चारत नाही.

पुष्कळ जाहले जन्म, पुरे तो जन्म पुरुषाचा
मज अजून का नाही दिधला अंकुर गर्भाचा

अशी भावना पुरुषाला एका पुरुषाप्रतीच्या आकर्षणातून उमजू आणि फुलायला लागते, तेव्हा ते पुरुषसमलिंगी 'असणे' असते. काही ते स्वीकारत जातात आणि तेव्हा ते 'सत्त्व'ही जपत असतात. केवळ जन्मतः जी लिंगओळख लाभली आहे म्हणून आपण तीच मनाला गहाण ठेवून वठवत राहायचे असे नाही आणि जेव्हा आज थोर मनाची, मनाच्या ताकदीने उभे राहण्याची आवश्यकता आहे, तेव्हा तर बिलकुल नाही.

त्यासाठी काहीही झुगारून देऊन बंड करण्याची गरज नाही. ती प्रक्रिया अगदीच सोपी आहे, जसे फुलाला फुलता येणे तसेच, पण फुलाच्या फुलण्याच्या शास्त्राला न वाचता, अभ्यास न करता डोळे बंद करून दूर कपाटात ठेवून दिले तर तीच फुले फुलण्याची प्रक्रियासुद्धा आपल्याला अवघड वाटेल. आज समाजात हेच होत आहे आणि विश्वाला, त्याच्या पूर्णपणे अभिव्यक्त होण्याच्या वेगाला बाधा येत आहे.

सामाजिकदृष्ट्या मनातून उमटलेले पुरूषसमलिंगी भावविश्व आता एक दृष्टीआड सृष्टी बनू पाहत आहे. पुन्हा एकदा संघर्षाला तोंड फुटू पाहत आहे. गुलामगिरी, वर्णभेद, आणि भांडवलशाही विरुद्ध समाजशाही असा आपला इतिहास पाहिला तर समजून येते, की त्यांसाठी घडलेली रक्तरंजित युद्धंदेखील दृष्टीआड सृष्टीचीच फळं आहेत.

निरंतर राहिला आहे प्रश्न तो गरीब-श्रीमंतीचा
समाजाची नाजूक कळ दाबून चघळण्याचा...

'मन करा रे प्रसन्न,सर्व सिद्धीचे कारण' असे तुकोबांनी फारच पूर्वी सांगितले आहे. आपण ते मन जपत, आहे त्या लिंगओळखीबरोबर आणि प्रसन्नचित्ताने सर्व सिद्धीचे कर्तेधर्ते होऊया. कामशास्त्रात प्रणय जोडीदारासोबत अनेक प्रकारांनी, विचारांनी, आचारांनी 'काम' पुरुषार्थाचा आनंद कसा घ्यावा हे दिलंय ते समाजामुखी करण्याची पुन्हा वेळ आली आहे, समाजातल्या बंदिस्तवादी दडपशाही प्रवृत्तीला मोडून काढायची वेळ आली आहे. सारे काही बोलून मोकळे निर्मळ होण्याची वेळ आली आहे. केवळ प्रजोत्पादन हा 'काम'चा उद्देश नाही, तर आयुष्यभर एकाच जोडीदारासोबत तृप्तीने, आनंदाने व्यतीत करण्याचे शास्त्र म्हणजेच 'कामशास्त्र' होय, त्या शास्त्राला सन्मानाने समाजात रुजुवूयात. 'काम'वर सहजी निर्भेळ बोलून आपण मानवी आयुष्यातली लपून छपून जगण्याची कैद पूर्णतः हद्दपार करूयात. एक जिवंत निकोप आत्मविश्वास निर्माण करूयात. योग्य तो संवाद वाढवून कित्येक लैंगिक आजारापासून कायमची सुटका करून घेऊयात. भरपूर पिढ्या जाव्या लागतील परिस्थितीत बदल व्हायला असे बोलणे टाळून, आपल्या येणाऱ्या पिढीवर परत तोच तणाव न ढकलता हा सकारात्मक बदल आपल्यापासून करूयात.

आज अल्पसंख्यांक झालेल्या समस्त उभयलिंगी, समलिंगी मनांची स्थिती ह्या गजलेमधून पुरेपूर उतरलेली आहे.

फासले ऐसे भी होंगे ये कभी सोचा ना था,
सामने बैठा था मेरे और वो मेरा ना था

वो के खुशबू की तरह फैला था मेरे चारसू,
मैं उसे महसूस कर सकता था छू सकता ना था

रात भर पिछली ही आहट कानो में आती रही,
झाँक कर देखा गली में कोई भी आया ना था

ख़ुद चढा रखे थे तन पर अजनबियत के गिलाफ,
वरना कब एक दूसरे को हमने पहचाना ना था

याद कर के और भी तकलीफ होती थी 'अदीब',
भूल जाने के सिवा अब कोई भी चारा ना था

समाजजीवनमानप्रकटन

प्रतिक्रिया

आपण मनोव्यापारातले नाविक आहोत, कोलंबसाने मनोमन 'भारता'ला चंद्र बनवले होते, ध्यास घेतला होता आणि पूर्ण जगाला वळसा घालून त्याने मनाने थोर आहे, हे सिद्ध केले होते
कोलंबस ने नाही.Ferdinand Magellan ने पृथ्वी प्रदक्षिणा घातली होती.

समयांत's picture

21 Feb 2018 - 10:37 pm | समयांत

माहिती अधिक सुधारित केल्याबद्दल..धन्यवाद!
उर्वरित संपूर्ण लेखावर आपला प्रतिसाद स्वागतार्ह आहे.